संयोजकांचे आवाहन

Submitted by BMM2017 on 24 February, 2017 - 15:10

नमस्कार मंडळी,

anjali_anturkar.pngBMM २०१७.. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ह्या १८व्या अधिवेशनात तुमचे सहर्ष स्वागत! महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) जुलै २०१७ मध्ये, केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहे. एवढं मोठं अधिवेशन करायचं म्हणजे सोपं काम नाही. पण डेट्रॉइटच्या माणसांनी दाखवलेली कष्टाची तयारी, इतर मंडळांनी दाखवलेला विश्वास आणि देऊ केलेला मदतीचा हात, ह्या जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलण्यास सज्ज होत आहोत.

आपलं अधिवेशन कसं असावं ह्याबद्दल आम्ही जाणकारांशी, मित्रमंडळींशी बरीच चर्चा केली. अमेरिकेत राहण्याऱ्या आणि पूर्वी अधिवेशनांत सहभागी झालेल्या अनेकांची मते जाणून घेतली. ह्या अभ्यासामुळे आपल्या अधिवेशनात होणाऱ्या कार्यक्रमांचे आणि जेवणाचे नियोजन करण्यास आम्हांला विशेष मदत होत आहे. ‘अतिथी देवो भव’ चे व्रत प्रत्येक स्वयंसेवकाने मनात रुजवले असून आपल्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या लोकांचा अनुभव अत्यंत सुखद असेल, ह्याची मी आपणास ग्वाही देते.

नियोजनाच्या पायरीपासूनच आम्ही मुलांना आणि तरुणांना अधिवेशनाच्या तयारीत सहभागी करून घेतले आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हा ह्या मंडळींसाठी मराठी संस्कृतीच्या जवळ जायचा मार्ग असतो. त्यांची आपापसातली मैत्री वाढावी, नवीन ओळखी व्हाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अधिवेशनात मजा यावी हा त्यामागचा उद्देश! विशेष करून ‘मुलांसाठी आणि तरुणांसाठी’ ह्या मंडळींनी खूप धमाल गोष्टींचे नियोजन केले आहे.

ज्या लोकांनी हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी देणगी देऊ केली आहे त्यांचे मी विशेष आभार मानते. आपल्या आशीर्वादामुळेच हे अधिवेशन अधिक यशस्वी होईल आणि आपण सहभागी होणाऱ्या लोकांना ३ दिवसांकरता एक अद्भुत आनंद देऊ शकू असा मला विश्वास वाटतो.

२०१७ ला जणू आपल्या घरीच गणपती बसतोय, असं वातावरण सध्या डेट्रॉइटमध्ये आहे. ह्या उत्सवात आपणही सहभागी व्हा, कला-संस्कृती-भाषेच्या ह्या आपुलकीच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा, असे मी आपणास आवाहन करते.

आपलीच विनम्र,
अंजली अंतुरकर
(संयोजक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक शुभेच्छा!

उत्सवात सहभागी होण्याची इच्छा आहे. लवकरच नोंदणी करीन.

BMM आणि संयोजकांना शुभेच्छा !

स्लोगन चांगले आहे पण तिथे गर्व च्या ऐवजी अभिमान हवा ना? हिंदीतला गर्व आणि मराठीतला गर्व यांचा अर्थ वेगळा होतो.

शुभेच्छांबद्दल सर्वांना धन्यवाद. असाच उत्साह कायम असू दे.

चीकूजी, एखाद्या गोष्टीचा गर्व असण्यात काहीच हरकत नाही जोवर आपण त्यामुळे इतर कशाला/ कुणाला कमी लेखत नाही. प्रत्येकाने इतर संस्कृतींचा आदर जरूर करावा पण आपल्या स्वतःच्या संस्कृतीबद्दल प्रेम, आदर, आपलेपण या सर्व भावना एकत्र येऊन गर्वाने छाती भरून येणे हे अगदी स्वाभाविक आहे. इतकाच या स्लोगन मागचा हेतू. 'चांगले आहे' असे सांगितल्याबद्दल विशेष आभार.

चिकू यांच्याशी सहमत. मराठीमध्ये गर्व शब्दांत अ‍ॅरोगन्टली सुपिरीअर असल्याचाच अर्थ निघतो. मराठीत तरी गर्वाने उर भरून येत नाही तर अभिमानानेच येते. तुम्हाला चिकू म्हणतायत तसा हिंदी मधला अर्थ अभिप्रेत असावा.

BMM2017 ची वेब साईट बघितली होती.. खुप जोरात तयारी आहे.. BMM, स्वयंसेवक आणि संयोजकांना शुभेच्छा !