स्वप्नाळू : भाग ३

Submitted by विद्या भुतकर on 23 February, 2017 - 22:05

ती रात्र वगळता मुक्ता पुन्हा तिच्या विश्वात रमली होती. एके दिवशी सकाळ सकाळी फोन चेक करताना मुक्ताला एक मेसेज दिसला, नितीनचा. तिने उघडून पहिले तर त्यात फोटो होता वालाच्या शेंगाचा त्याच्या रोपट्यासहित. धुक्यातल्या त्या सकाळच्या फोटोमध्ये शेंगांवरचं दव खुलून दिसत होतं. त्या वाफ्यात भरभरून आलेल्या शेंगा पाहून तिला आनंद झाला. तिने हसून त्याच्या मेसेजला 'गुड मॉर्निंग' असं उत्तर पाठवलं. दिवस सरताना तिने अजून एक मेसेज त्याला केला, एक फोटो. ती आठवणीने वालाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तिने त्याची वाफवून भाजी केली, कारळ्याची चटणी, बाजरीची तीळ पेरून भाकरी केली. त्याचा एक छान फोटो काढून तो तिने पाठवला होता. त्यानेही मग त्यावर स्मितहास्य असलेला स्मायली पाठवला आणि 'गुड नाईट' ही लिहिलं होतं.

केदार आणि तिची बाकी कामे चालूच होती. एका जुन्याच हॉटेलला विकत घेऊन दुरुस्ती आणि नवीन रूप द्यायचं ठरलं होतं. मुक्ताची उत्सुकता शिगेला लागली होती. कधी होणार हे सगळं आणि कधी एकदा आपलं स्वप्न पूर्ण होणार असं तिला राहून राहून वाटत होतं. केदारनेही सर्व प्रोजेक्टचे बजेट काढले. प्लॅनिंग मध्ये काय काय कधी झाले पाहिजे हे पाहिले. रोज प्लॅन्स बनवून आणायचें आणि त्यावर चर्चा करायची. कामांसाठी किती लोक लागतील, काऊंटरवर कोण असणार, टायमिंग काय ठेवायचे, इ. तो तिला विचारत असायचा.

एकदा तो म्हणालाही,"तुला माहितेय ना? जेवण हा हॉटेलचा फक्त एक भाग आहे?"

तिने नुसती मान हलवली.

"People management लागतं खूप त्याला. खूप प्रॉब्लेम्स असतात त्यात. मदतीला लोक लागतात, त्यांना आपण आपल्याला लागणारे काम शिकवण्यात वेळ जातो मग तेच शिक्षण घेऊन ते सोडून जातात. मी बरंच रिसर्च केला आहे."

"तू केलंयस ना? मग मला काय टेन्शन आहे?" ती म्हणाली.

"अगं आपल्याला अगदी प्रत्येक प्लेटसाठी किती खर्च येतो, किती ओव्हरहेड आहे आणि किती फायदा होईल हे सर्व पहायला लागेल. "

"बघू ना मग? तू का चिंता करतोस?" तिने विचारलं.

"असं नाही मुक्ता, पण तू इतके लाईट घेऊन नकोस हे सर्व. तुझं स्वप्न हे हॉटेल आहे तसंच माझंही आहे 'एक यशस्वी व्यवसाय' म्हणून. " तो काळजीने म्हणाला.

तिने मग त्याला समजावलं,"मला माहीत आहे रे. तू अभ्यासही किती मन लावून करायचास. म्हणून तर आपण इतके परफेक्ट पार्टनर आहोत. बरं, आय प्रॉमिस, मी माझ्याकडून सर्व लागेल ती माहिती देते मी तुला. चालेल?"

त्याने हसून मान हलवली.

एका जाहिरात कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याने. रोज वेगवेगळ्या आयडिया घेऊन तो मुक्ताकडे यायचा. तिने सांगितलं तसे काम करायला सुरुवात केली. एकेक पदार्थ बनवून त्यांचे प्रमाण मोजून पाहायची, दोन लोकांना किती लागते, ४ जणांची ऑर्डर आली तर काय? केटरिंग साठी कुणी विचारले तर दर काय? असे अनेक विचार तिच्या डोक्यात असायचे. कधी नितीनला भाज्यांचे दर विचारायची. कुठली भाजी किती दिवस टिकते, हेही विचारायची. हळूहळू ती तिच्याकडून जमेल तशी माहिती केदारला देत होती.

इकडे, मुक्ता आणि नितीनचा हळूहळू रोजचा नियमच झाला. रोज सकाळी मेसेजचा आणि संध्याकाळीही. सकाळ सकाळी शेतातून येणाऱ्या ताज्या फोटोंमध्ये कधी त्याचा हात फक्त दिसायचा. त्याचे ते हात तिच्या साठी 'कष्टाची' एक ओळख बनले होते. तो मात्र क्वचितच दिसायचा. दिसला तरी ते फोटोसाठीचं हसू त्यात नसायचं. तिच्या फोटोंमध्येही केवळ एकाहून एक सरस पदार्थ दिसायचे. जणू त्यांच्या भाज्यातून, जेवणातून ते एकमेकांचं हसू पाहत होते. बाकी मग शब्दांची गरज कुणाला होती? केवळ 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' पुरेसे होते. आता केदारलाही काही अंधारात ठेवलेलं नव्हतंच कुणी. काही विषय निघाला की त्यावर तिघांचं बोलणं व्हायचंच. पण या दोघांची भाषा मात्र त्याला कळली नव्हती.निदान त्यांना तरी असंच वाटलं होतं.

असेच एक दिवस संध्याकाळी मुक्ता टीव्ही बघत बसलेली असताना दारावरची बेल वाजली. दार उघडले तर नितीन उभा होता. हातात एक जाड कापडाची पिशवी भरगच्च भरली होती. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.

तो आत येता येता म्हणाला,"सॉरी ना सांगता आलो पण फोन बंद पडला होता आणि रात्रीच परत जायचं आहे. पण या भाज्या इतक्या ताज्या होत्या की..... ".

तिला स्वष्टीकरणाची गरज नव्हतीच. तिने पिशवीतले हरभऱ्यांचे डहाळे, वाटाण्याच्या शेंगा, गाजरे सगळं एका भांड्यात काढलं होतं. तिने चहा ठेवला. त्याने हात धुवून, डहाळे विसळून घेतले आणि हरभरे सोलायला सुरुवात केली. तिनेही भाकरी थापल्या, भात लावला, उडिदाच्या डाळीची आमटी केली. त्याने सोललेले हरभरे खलबत्यात भरडून घेतले. तिने भाजीला फोडणी टाकली, उकळलेल्या भाजीवर मस्त तवंग आला. मसाल्याच्या वासाने त्याला थोडा ठसका लागलाच आणि फोडणी चांगली बसली हे पाहून ती हसली.

ती काकडी, गाजर चिरून घेईपर्यंत त्याने ताटे, वाट्या घेतले. ती त्याला म्हणाली,"तू बैस मी नंतर बसते."

त्याने विचारलं, "का?" परत काही विचार करून म्हणाला,"केदारसाठी का?"

तिने नुसतीच मान हलवली आणि त्याला ताट बनवून दिले. गरम गरम भाकरी, हरभऱ्याची भाजी, आमटी त्याने भरपेट जेवण केलं. ती केवळ लागेल तसं वाढत राहिली. आणि तो जेवत राहिला. त्याच्या मन लावून जेवण्याकडे ती मन लावून पहात होती. मधेच तिने,"कसं झालंय?" विचारलं. त्याने एकदाच मान वर करून डोळ्यात डोळे घालून सांगितलं,"चांगलं झालंय की" आणि पुन्हा तो जेवणात गुंगला. जेवण होतं आलं इतक्यात बेल वाजली आणि दोघांची तंद्री भंग पावली. ती पटकन उठून गेली आणि दार उघडलं. केदारच होता.

तो आत आला आणि नितीनला पाहून म्हणाला,"अरे तू कधी आलास? मला फोन नाही केलास?"

तीच बोलली मधे,"हां, मी पण हेच म्हणलं तर म्हणाला फोन बंद पडलाय.".

"आणि तुझा?" केदारने तिला विचारल्यावर मात्र काही उत्तर तिच्याकडे नव्हतं.

ती घाईने म्हणाली,"बस, जेवायला थांबलीय मी."

नितीनच्या चेहऱ्याने मात्र वेगळंच उत्तर दिलं होतं. तिने दोघांचं ताट वाढून घेतलं.

पहिला घास घेतला आणि तिने केदारला विचारलंही,"कसं झालंय?".

त्यानेही नेहमीसारखंच उत्तर दिलं होतं,"नेहमीसारखंच ...छान". तिला ओल्या हरभऱ्याची भाजी किती आवडते हे त्याला चांगलंच माहित होतं.

ती पुढे बोलत राहिली,"हे बघ, नितीन गाजरं, वाटाणा सगळं घेऊन आलाय. उद्या पुलाव करू, लग्नात असतो ना तसला?"

त्याने मान हलवली आणि न बोलता जेवत राहिला. नितीनचं जेवण झाल्यावर तो हात तसेच धरून दोघांची वाट बघत बसून राहिला.

जेवण झाल्यावर मुक्ता आवरत असतानाच नितीन म्हणाला,"चला मी येतो परत उशीर होईल सकाळी पाणी द्यायचंय. पालक, मेथी द्यायची आहे एका हॉटेलला."

"बरं" म्हणून ताटं उचलून केदारने सिंकमध्ये घेतली आणि सवयीप्रमाणे धुवायला सुरुवात केली.

नितीनने रिकामी पिशवी घडी घालून हातात घेतली आणि दारात आला. तशी मुक्ताही बाहेर आली.

दाराच्या चौकटीत उभे राहून तिने त्याला 'बाय' म्हटलं.

तो तिच्याकडे पहात क्षणभर थांबला आणि "धन्यवाद" म्हणून निघून गेला.

ती आत आली आणि मुकाट्याने आवरू लागली. थोड्या वेळाने केदार निघून गेला. आज एक वेगळीच निशब्द रात्र होती.

दुसरा दिवस तसा उदासच उजाडला. कितीतरी वेळ मुक्ता आपल्या फोनकडे पाहत राहिली. आज गुड मॉर्निंग मेसेज आलाच नव्हता. आपण केदारच्या सोडून त्याच्या मेसेजची वाट पाहतोय हा विचार करून तिला स्वतःचीच लाज वाटली क्षणभर. पण तरीही नितीनचा विचार येतच राहिला. त्याचं ते शांत असणं, आपण केलेला स्वयंपाक पोट भरून जेवणं तिला सुखावत होतं. कुठलेही शब्द न बोलता त्याने भाजी आणली आणि आपण त्याच्यासोबत वाहवत गेलो असं तिला वाटलं. पूनमच्या फोनने तिची विचारांची चक्रं थांबली.

"काय गं अजून आली नाहीस ऑफिसला?", पूनमने विचारलं.

"हा जरा उशीर झाला रात्री आवरायला. निघतेच आहे."

परत विचार करून ती म्हणाली,"मी आज जरा सुट्टीच घेते. बरं वाटत नाहीये."

"काय गं एकदम काय झालं? सगळं ठीक आहे ना? केदार थांबला होता वाटतं रात्री?" पूनमने लाडाने विचारलं.

"तू पण ना? गप बरं. दमलेय जरा सारखी धावपळ पण चालू आहे ना हॉटेलसाठी." मुक्ता म्हणाली.

फोन बंद करून ती बराच वेळ पडून राहिली. काही सुचेनासं झालं म्हणून उठली किचनमध्ये जाऊन आधी चहा ठेवला. कॅलेंडर पाहिलं तर आज चतुर्थी होती. तिने साबुदाणा शोधून भिजवला, बटाटे मोजून ठेवले. तिथेच असलेलं रताळे चिरून त्यांना तुपात परतायला सुरुवात केली. थोडा गूळ चिरून त्यांना लालसर परतले. चहा झाला तशी तो घेऊन कॅलेंडर हातात घेऊन बाल्कनीत बसून राहिली. हॉटेलचं वेळापत्रक तिने कॅलेंडरवरच लिहिलेलं होतं. आज मेनूकार्डच्या प्रिंटिंगच्या आधी त्याचे डिझाईन चेक करायला जायचं होतं. चहा घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. विचार करून तिने केदारला फोन लावला. केदारने फोन उचलला नव्हताच. तिने त्याला मेसेज केला,"डिझाईन अपॉइंटमेंट ३pm". थोडा वेळ फोन हातात धरून उत्तराची वाट बघत राहिली. पण काही उत्तर आले नव्हते. टाईमपास म्हणून तिने नितीनने पाठवलेले फोटो चाळायला सुरुवात केली. एकेका फोटोकडे पाहून तिला काहीतरी आठवत होतं आणि थोडंसं का होईना हसू येत होतं.

दिवस असाच आळसात गेला. रताळ्यांवरच तीच दुपारचं जेवण झालं. कुणाचाही फोन, मेसेज नाहीच. ३ वाजताची अपॉइंटमेंट तिने फोन करून कॅन्सल केली. आपण हे करत आहोत या विचाराने तिला स्वतःवरच चीड आली. थोडं बरं वाटावं म्हणून ती बाहेर पडली, मिरच्या, कढीपत्ता, उपवासाची भाजणी घेऊन घरी आली. भिजलेल्या शाबुदाण्यात तिने हिरवी मिरची आणि जिऱ्याचे वाटण घातले, मीठ, कूट, साखर, उकडलेला बटाटा,कोथिंबीर घातलं. सर्व एकजीव करून त्याचे वडे तळून घेतले आपल्यापुरतेच. सोनेरी रंगाचे ते एकसारखे वडे पाहून ती स्वतःवरच खूष झाली. 'वडे बाकी हजार हॉटेल्स मध्ये मिळत असले तरी लोकांनी माझ्या हातचे वडे खायला यायला हवं' असा विचार करून उगाचच हसली. जेवण करताना फोन चाळताना केदारचं उत्तर आलंच नव्हतं हे पाहून पुन्हा ती निराश झाली.

"आपल्याला खरंच काय हवंय आणि काय नको हे विचार केलेच पाहिजेत आणि तेही लवकरच" हे तिला कळून चुकलं होतं.

क्रमशः

विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं खादाडी वर्णन वाचून पुन्हा भूक लागायला लागली आणि नायिकेच्या वजनाची चिंताही वाटायला लागली. Wink

मस्त!! !
खुप छान चाललिये कथा... Happy

पूर्वी बायकांच्या मासिकात अश्या छान कथा येत त्यात खूप सारी पदार्थांची वर्णने असत. छान वाट्ते वाचायला. प्रेमाचा त्रिकोणी समोसा. फक्त ते पॉट भरून जेवला एडिट कराल का? इट इस गिविन्ग अ व्हेग फीलिन्ग.

मस्त...!!! पण मला थोडी शंका वाटतय की, ही कथा 'प्रेमाचा त्रिकोण' कडे झुकते आहे....!!! किंवा नितीन हा 'कबाब मध्ये हड्डी' बनेल, किंवा 'दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ' अशीही परिस्तीथी ऊद्भवु शकेल....!!!