बाळ! तू मोठेपणी कोण होणार?

Submitted by सचिन काळे on 5 February, 2017 - 21:23

'बाळ! तू मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. "मी ना! डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल" नाहीतर "मी ना! अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन "हो का रे लब्बाडा!" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.

बाळ हळूहळू मोठे होई. शाळेत जायला लागे. त्याचे अनुभवविश्व विस्तारे. मग त्याचा 'मोठेपणी कोण' होण्याचा अग्रक्रम बदले. आता त्याला रोजच्या जीवनात भेटणारी माणसे जसे 'शाळेत शिकवणाऱ्या बाई', 'बस कंडक्टर', 'ट्रक/इंजिन ड्रायव्हर', मुलांना शाळेत पोहचविणारे 'रिक्षावाले काका' व्हावेसे वाटू लागे.

काही वर्षांनी बाळ कॉलेजला जाऊ लागे. मग त्याच्या स्वप्नांना पंख फुटत. 'मोठेपणी कोण' होण्याचे मनोरथ पक्के होऊ लागत. कोणाला 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', 'संंशोधक', 'आय ए एस' असं बरंच काही व्हावंसं वाटे. त्याकरिता कोणी प्रयत्नपूर्वक तर कोणी आपलं आयुष्य वहात नेईल तसे आपले 'मोठेपणी कोण' होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करी. कोणास यश मिळे तर कोणी जीवनाशी तडजोडीचा मार्ग स्वीकारे.

आता त्या बाळापाठच्या 'मोठेपणी तू कोण होणार?' ह्या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला असे. बाळाला लहानापासून मोठे होईपर्यंत दिवसरात्र छळणार्या त्या प्रश्नरुपी संमंधाचा आत्मा आता शांत झालेला असे.

पण 'मी मोठेपणी कोण होणार?' हा प्रश्न एवढ्यावरच संपायला हवा का?रितिरिवाजाप्रमाणे आपण फक्त 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', किंवा 'संंशोधक' एवढेच व्हायला हवेे का? ह्या प्रश्नाचे उत्तर आपण फक्त एक पोटापाण्याची व्यवस्था करणारे एखादे साधन म्हणूनच द्यायला हवे का?

जगात अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांना ह्या रुळलेल्या वाटांबरोबरच काही वेगळंही व्हावंसं वाटत आहे. कोणाला सदा आनंदी असणारी व्यक्ती व्हायचं आहे. राग, लोभ, मत्सर आदी षडरीपूंवर त्यांना मात करायची आहे. सदा आनंदी राहून सर्व सुखांची गुरुकिल्ली हस्तगत करायची आहे.

कोणाला मोठं होऊनही कायम लहान बाळासारखंच रहायचं आहे. बाळाच्या दृष्टीतून सर्व जगाला पुन्हा अनुभवायचं आहे. बाळासारखं खळाळून हसायचं आहे, खेळायचं आहे.

कोणाला असा व्यवसाय पत्करायचा आहे जो त्याच्या छंदाशीच निगडित असेल. आवडणाऱ्या छंदात रमण्याचाच त्याला मेहनताना मिळत राहील.

कोणाला मोठेपणी 'माणूस' व्हायचं आहे. त्यांना मानवतेचा धर्म अंगिकारायचा आहे. गरजू लोकांना मदत करायची आहे. त्यांची सेवा करायची आहे.

कोणाला गृहिणी व्हायचं आहे. अशी एक वात्सल्यपूर्ण आई व्हायचंय, जी आपल्या मुलाबाळांवर निर्व्याज्य प्रेमाचा वर्षाव करते. जी त्यांना वाढवताना स्वतःचं अस्तित्वदेखील विसरून जाते.

कोणाला कोणीच व्हायचं नाहीए. त्यांना फक्त आजचा दिवस भरभरून जगायचा आहे. त्यांना नेहमी वर्तमानकाळातच जगायचं आहे. त्यांना उद्याच्या चिंतेच्या सावटाला स्वतःपासून दूर ठेवायचं आहे. ह्या विचाराने, कि न जाणो ह्या जगात आपण उद्या असू कि नसू.

म्हणूनच 'बाळ, तू मोठेपणी कोण होणार?' ह्या प्रश्नाचे उत्तर 'डॉक्टर', 'इंजिनियर', किंवा 'वकील' ह्याबरोबरच अजूनही काही असू शकते. निर्विवाद सत्य आहे की 'मोठेपणी कोणीतरी' होऊन अर्थप्राप्ती करणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असू शकते, पण सर्वांचे नाही. काहींना मनाचे सुख, शांती आणि समाधान मिळवणे हेसुद्धा जीवनाचे सार वाटू शकते. काहींचे दुसर्यांकरीता आयुष्य वेचणे हेसुद्धा ध्येय असू शकते. त्यांच्याप्रमाणेच आपणही 'डॉक्टर', 'इंजिनियर', आणि 'वकील' ह्याच्याजोडीने एक वेगळा परिघाबाहेरचा विचार करायला काय हरकत आहे?

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहीलंय. मला लहानपणी कुणीतरी विचारलं तेव्हा मी आई होणार असं सांगितलेलं. सगळे खो खो हसलेले. तेव्हापासुन मी पोलिस, टीचर असं सांगु लागले Happy आता माझा मुलगा दर आठ्वड्याला वेगळंच काहीही सांगतो. (सिंगर, डान्सर, पोलिस, जादुगार असं काहीही) पण मी अज्जिबात हसत नाही त्याला Happy

छान लिहिली आहे .
राया Rofl

अवांतर :
गेल्या आठवड्यातच माझ्या , लेकाशी गप्पा चालु होत्या .
लेक : मी जेन्व्हा मोठा होणार आणि मला exam मध्ये लिहायला सांगणार की मला कोण बनायचय? तेन्व्हा मी काय लिहु ?
मी: तुला जे हवं ते लिही . तुला काय बनावस वाटतं , ते लिहायचं .
लेक : पण मग मी जे लिहिणार ते मला बनाव लागणार ? समजा मी लिहिल की football player आणि मी नाही बनू शकलो तर???
मी: चालेलं रे . तुला जे आवडतं ते लिहि.
लेकः ( प्रदीर्घ शांततेनंतर) , mummaa , can I write "Father"?
मी : Uhoh
लेक : म्हणजे जेन्व्हा मी डॅडी सारखा मोठा होणार आणि मला कोणी मिळणार , मी लग्न करणार , बेबी झालं तेन्व्हा मी Father बन्णार ना.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!!

माझ्या ब्लॉगमधील याच लेखावर माझ्या मुलीने लिहिलेली प्रतिक्रिया तिच्याच शब्दांत खाली देत आहे.

'khup Chan lekh apratim
Mala motha houn pan balasarkha rahaicha aahe'

आणि खरं सांगतो, ती सद्या LLM करतेय पण तिच्या सर्व आवडीनिवडी अजूनही लहान बाळासारख्याच आहेत.

ह्या प्रश्नाचे उत्तर आपण फक्त एक पोटापाण्याची व्यवस्था करणारे एखादे साधन म्हणूनच द्यायला हवे का?
मुळीच नाही
पोटापाण्याचे साधन तर हवेच. मग ते इंजिनियर असो, डॉक्टर, स्टॉक ब्रोकर, नट/नटी काही असो. पैसा जमवल्याखेरीज बाकीच्या गमजा चालत नाहीत. त्यामुळे ते अध्याहृत असावे.

कोणाला सदा आनंदी असणारी व्यक्ती व्हायचं आहे. सदा आनंदी राहून सर्व सुखांची गुरुकिल्ली हस्तगत करायची आहे.
हे तर सगळ्यांनाच व्हायचे आहे
राग, लोभ, मत्सर आदी षडरीपूंवर त्यांना मात करायची आहे.
या गप्पा. असले काही जमले तर ते लोक साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी इ. महान लोकांसारखे संसारातून निवृत्त होऊन जगतात - त्यांना म्हणे जेवण, झोप यांची पण काळजी नसते. मौन व्रत धरून बसतात - त्यांच्या नावे कुणी वाईट व्यक्ति इतरांना फसवून त्यांचे पैसे लुबाडतात तरी ते व्यक्तिशः यात नसतात.
फार तर जरा संयम बाळगून असावे. ते जमले तरी नशीब.

माझ्या लेकाने "मी मोठा झालो की आजोबांसारखा रिटायर होणार" असं उत्तर देऊन उपस्थित सगळ्यांना आडवं केलं होतं.

आपले विचार पटले. मोठेपणी चाकोरीबाहेरचे व्हावेसे वाटले तर काहीच हरकत नाही. आजकाल मोठं होण्याच्या खूप वाटा उपलव्ध आहेत, म्हणून हे शक्य आहे. मध्यमवर्गाचे विचार आता बदलायला लागले आहेत, हे सुचिन्ह आहे.

नन्द्या४३ +१००.

कोणाला सदा आनंदी असणारी व्यक्ती व्हायचं आहे. सदा आनंदी राहून सर्व सुखांची गुरुकिल्ली हस्तगत करायची आहे.
राग, लोभ, मत्सर आदी षडरीपूंवर त्यांना मात करायची आहे
.>>
याच्यासाठी काय काय किंमत मोजावी लागते, याची कल्पना बाळाला असेल का?

म्हणूनच 'बाळ, तू मोठेपणी कोण होणार?' ह्या प्रश्नाचे उत्तर 'डॉक्टर', 'इंजिनियर', किंवा 'वकील' ह्याबरोबरच अजूनही काही असू शकते. >>> एकदम सहमत.
मोठेपणी कोणीही व्हावे पण मुख्य म्हणजे एक चांगला नागरिक व्हावे. हे वाटते तितके सोपे नाही !