लहान माझी भावली

Submitted by स्वप्ना_राज on 4 February, 2017 - 10:36

'अनु, जेवायला ये बघू आता. बघ ममाने तुझ्यासाठी स्पेशली बटाट्याचे पराठे केलेत'. अविनाशने हाक मारली.

रात्री जेवताना सगळं कुटुंब एकत्र असावं असा त्याचा कटाक्ष होता. ऑफिसात लंच जवळपास १० मिनिटांत उरकायला लागतो त्यामुळे बऱ्याचदा काय खाल्लंय हेही लक्षात येत नाही. निदान रात्रीचं जेवण तरी सुखाने सगळ्यांनी एकत्र बसून हसतखेळत करावं असं त्याला मनापासून वाटायचं. तसं व्हायचंही. पण आजकाल अनु मात्र वेळेत कधी हजर होतच नसे.

'तू सुरुवात कर अवि. येईल ती पाचेक मिनिटांत.....तिच्या व्हिकीने परवानगी दिल्यावर' नेहा हसतहसत म्हणाली.

'काय पण नाव.....व्हिकी म्हणे' अनुष्काच्या मोठ्या भावाने, आर्यनने , मान झटकली.

'लहान आहे रे ती अजून. आणि तुला का एव्हढा फणकारा आलाय? अजयकाकाने तुला पण आणलेत ना गेम्स आणि टॉईज?' अविनाश म्हणाला.

'म्हणून मी २४ अवर्स नाही खेळत बसत त्यांच्याशी'

'आर्यन! जेव बघू चूपचाप' नेहाने दटावलं तसा आर्यन गप्प झाला.

नेहा म्हणाली होती तसं पाचेक मिनिटांत अनु हजर झाली.

'या अनुबाई. व्हिकीने दिली परवानगी जेवायची?' नेहाने तिच्याकडे प्लेट सरकवत विचारलं.

'हो. व्हिकी आणि शोना झोपल्या आता.' अनुने डोळे चोळत एक सुस्कारा टाकत म्हटलं. आर्यनने 'मुली पण काय येडचाप असतात' अश्या अर्थाने डोळे फिरवले. अनुचा आविर्भाव पाहून अविनाशच्या चेहर्यावर हसू उमटलं.

जेवण झालं आणि मुलं आपापल्या खोलीत गेली तरी नेहा आणि अविनाश किचनमध्येच होते. नेहाची आवराआवर सुरु होती आणि अविनाश जमेल तशी मदत करत होता.

'शोना म्हणजे तुझ्या बाबांनी अनुचा जन्म झाला तेव्हा दिलेली तुझी लहानपणची बाहुली ना ग?'

'हो अरे, आईने अगदी जपून ठेवली होती. अनु झाल्यावर गंमत म्हणून त्यांनी आणून दिली होती. अनु थोडी मोठी झाल्यावर खूप खेळणी झालेत म्हणून पूजाच्या बाळासाठी देऊन टाकणार होते मी. तशीसुध्दा आताच्या बाहुल्यांपुढे जुनीच दिसते ती. पण अनुने देऊ दिली नाही. शोना नेहमी माझ्याजवळच रहाणार म्हणे. हट्टी आहे तुझी मुलगी तुझ्यासारखी'

'अच्छा. हट्टी आहे म्हणून माझ्यासारखी होय? बाईसाहेब, तुम्ही काय कमी हट्टी आहात का?'

'मी हट्टी होते म्हणून आपलं लग्न झालं बरं. नाहीतर तुम्ही अजून त्या बैराग्याच्या मठीत राहिला असतात अविनाश साहेब.' नेहाने त्याला टपली मारली आणि दोघे हसले.
------------------------------------
'काय झालं व्हिकी? उठलीस का तू? झोप येत नाहीये का?' अनुने निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची ती नाजूक बाहुली उचलली आणि जवळ घेऊन तिला थोपटायला लागली.

'असंच शहाण्या बाळासारखं झोपायचं आता. बघ शोना कशी झोपलेय.' तिने व्हिकीला खाली ठेवलं आणि आपल्या बेडवर जाऊन झोपली. मग एकदम काहीतरी आठवल्यासारखी उठली. शोनाजवळ जाऊन तिलाही थोपटलं आणि परत जाऊन झोपली.
----------------------------------------------
'अनु, इकडे ये. खाऊन घे आधी. मला ऑफिसला जायला उशीर होतोय सोन्या.' नेहाने नुडल्सने भरलेली प्लेट तिच्यापुढे ठेवली.

खेळणं थांबवून अनुने प्लेट उचलली. नुडल्स चमच्यात भरून तिने आधी तो चमचा व्हिकीच्या तोंडाजवळ नेला.

"Aren't they delicious?" मान तिरकी करत तिने व्हिकीला विचारलं. आणि मग तो घास स्वत:च्या तोंडात घालत नेहाला म्हणाली 'व्हिकीला आवडल्या न्युडल्स'.

'आणि शोनाला ग?' नेहाने डोळे मिचकावत विचारलं.

अनुने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. 'विसरलेच. सॉरी शोना' असं म्हणत तिने शोनाला भरवलं.

दोघा बाहुल्यांना भरवत जेवणारी लेक बघून हसत नेहा खोलीबाहेर पडली.
----------------------------------------------------
खरं तर दोघा मुलांना अर्ध्या तासासाठी का होईना पण एव्हढ्या रात्री घरात एकटं सोडून जायचं अविनाश आणि नेहाच्या अगदी जीवावर आलं होतं. आजकाल बातम्यात कायकाय येतं. पण हेमंतच्या बाबांची तब्येत अगदीच खालावली होती. रात्र निभेल की नाही ह्याचीसुध्दा शंका होती. जवळच्या सगळ्यांना भेटून जायला सांगितलं होतं. हेमंतचा लहानपणापासूनचा मित्र म्हणून अविनाशवर त्यांचा जीव होता. जाणं भाग होतं.

'अर्ध्या तासात येतो आम्ही. आर्यन, अनुवर लक्ष ठेवायचं. कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. तसं काही वाटलं तर फोन कर.' दहावेळा सूचना देऊन दोघे बाहेर पडले तरी नेहाला काळजी वाटत होती.

हॉस्पिटलमधून निघायला उशीर झाला आणि अर्ध्या तासाच्या ऐवजी चांगला पाऊण तास लागला त्यांना परतायला.

'किशोरकाकांना असं बघून......' अविनाशचं वाक्य अर्धवटच राहिलं कारण घराचा मेन दरवाजा उघडून आत येतात न येतात तोच अचानक अनुच्या जोरात रडण्याचा आवाज आला.

दरवाजा कसाबसा बंद करून त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. आत जाऊन बघतात तर काय? एका कोपर्यात अनु थरथरत रडत उभी होती. भीतीने तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. समोर व्हिकीचे तुकडे पडले होते - मुंडकं धडावेगळं, हात आणि पाय सुटे-सुटे, सोनेरी केसांचे पुंजके इथेतिथे पसरलेले, एक निळा डोळा जमिनीवर पडलेला. नेहाला तर काय बोलावं तेच सुचेना. समोरचा प्रकार बघून ती हतबुद्ध झाली. तिने आधी अनुला जवळ घेतलं.

अविनाश मात्र प्रचंड भडकला. 'आर्यन! आर्यन!' त्याने जोरजोरात हाका मारल्या.
'अवि, शांतपणे घे जरा'
'शांतपणे घेऊ? शांतपणे? हे बघतेयस ना तू? आर्यन! कम हिअर राईट अ‍ॅट धिस मोमेंट!'

आर्यन धावत खोलीत आला. अविनाशने त्याचं मनगट खसकन धरलं. 'हे काय आहे? काय आहे हे?' व्हिकीचं मुंडकं आर्यनच्या डोळ्यासमोर नाचवत तो ओरडला.

'मला माहीत नाही डॅड'
'माहीत नाही? तुला माहित नाही? मग कोणाला माहीत आहे? दुसरं कोण होतं इथे आर्यन?'
'अवि, काम डाऊन'

'आय एम नॉट गोइंग टू काम डाऊन डॅम इट. आज हद्द केलीय ह्याने. असं वागतात? हे असं वागायला शिकवलंय आपण ह्याला?'

'डॅड, मी नाही केलं हे'
'खोटं बोलायचं नाही आर्यन. मला अजिबात आवडत नाही. यू नो दॅट.'

'डॅड, मी खरं....' पण अविनाशने आर्यनला बोलायची संधीच दिली नाही. नेहाला काही कळायच्या आत त्याने आर्यनला एक मुस्काटात ठेवून दिली. आजवर त्याने कधीच मुलांवर हात उगारला नव्हता. पण आज त्याचा पारा चढला होता.

आर्यनला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं ते त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. वेदना आणि अपमानाने त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं.

'अवि!!' नेहा ओरडली. अविनाश भानावर आला. त्याने आर्यनकडे पाहिलं आणि काही न बोलता तो खोलीतून बाहेर निघून गेला. मुसमुसणार्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन नेहा बसून राहिली.
-----------------------------------------------------------------
रात्रीचे दोन वाजले होते तरी अनुची झोपायची हिम्मत होत नव्हती. बेडवर एका बाजूला अंगाची मुटकुळी करून ती बसली होती. ममाचे शब्द तिच्या कानांत होते 'डोंट वरी बेटा. आपण अजयकाकाला सांगू हं आणखी एक डॉल पाठवायला. किंवा असं करायचं का? पूर्वामावशीला सांगायचं का व्हिकीचं ऑपरेशन करायला? ती व्हिकीला एकदम फिट करेल पहिल्यासारखी. तोपर्यंत तू शोनाशी खेळ. मी उद्याच फोन करते हं तिला'

तिला ममाला ओरडून सांगावंसं वाटलं होतं की अजयकाकाने दुसरी डॉल आणली काय किंवा पूर्वामावशीने व्हिकीला पहिल्या सारखी केली काय त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. कारण......

पण ती काही बोलली नव्हती. काय म्हणाला होता डॅड आर्यनला? हं....."खोटं बोलायचं नाही आर्यन. मला अजिबात आवडत नाही. यू नो दॅट"......मी खोटं बोलतेय असं डॅडला वाटलं असतं. ममाला पण असंच वाटलं असतं का? हो, तिला पण असंच वाटलं असतं. अजयकाकाला, पुर्वामावशीला, आजोबा, आजी, निशु, यश, दीपिका.........सगळ्यासगळ्यांना असंच वाटलं असतं की मी खोटं बोलतेय.

पण मी खोटं नाही बोलत. मी खरंच खोटं नाही बोलत आहे. व्हिकीला आर्यनने काही नाही केलं. मला माहीत आहे कारण व्हिकीला कोणी हार्म केलं ते मी बघितलंय.

शोनाने................

Group content visibility: 
Use group defaults

भन्नाट लिहिलंय.. शॉर्टफिल्म चं पोटेन्शियल आहे कथेत !

>>पण ही क्रमशः का नाही?

क्रमशः लिहिण्याइतकी कुवत आणि पेशन्स दोन्हीचा अभाव, दुसरं काय Happy

>>गोष्टीचा शेवट थोडा फुलवून सांगाल का ??

एकदा पब्लिश केल्यावर फार बदल करणं योग्य नाही असं वाटतंय हो Sad पण सूचनेबद्दल धन्यवाद!

>>अंदाज आलेलाच पण आवडली

एकाही वाचकाला शेवटल्या वाक्यापर्यंत अंदाज येणार नाही अशी एखादी गोष्ट लिहायची तह-ए-दिलसे ख्वाहिश आहे माझी. अजूनपर्यंत सगळे प्रयत्न फसलेत Proud

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

मस्त लिहिलीय कथा!

अंदाजच काय शिर्षक वाचूनच कथा कळली. फक्त प्रतिसाद टाकायला धागा उघडला smiley-4.jpg

स्वप्ना, मग हीच कथा उलटी लिहून बघा. बाहुल्यांशी खेळणार्‍या मुलीला बटाट्याचे पराठे आवडत असतील हा अंदाज बांधणे सोपे जाणार नाही Happy

भारीच!

जराही अंदाज नव्हता आला शेवटपर्यंत. एकतर गोजीरवाण्या घरात गोष्ट सुरू होते त्यामुळे त्या घटनेच्या धक्क्यात चांगलेच गुंतायला होते. कोणी केले असेल हा विचार सुरू होण्याआधीच शेवटचा धक्का देऊन संपते कथा.

पर्फेक्ट ट्वीस्ट !

पुढची कथा केंव्हा आता?

प्रेडिक्टेबल पण छान.>> + १००

बाहुल्यांशी खेळणार्‍या मुलीला बटाट्याचे पराठे आवडत असतील हा अंदाज बांधणे सोपे जाणार नाही >>>> Rofl

छान कथा आहे. भयकथा आहे हे बराचवेळ कळत नाही. पण आर्यन जेव्हा म्हणतो की बाहुलीला मी काहीच केलं नाही तेव्हा वाचक विचार करतो की आर्यन नाही, अनु काही करू शकत नाही मग उरलं कोण तर दुसरी बाहुलीच न.
शेवटपर्यंत आर्यनवर संशय टिकवला असता आणि शेवटच्या फक्त एका वाक्याने बाहुलीने हे केलंय असा खुलासा आला असता तर अजून मजा आली असती.
पण तरीही, कथा उत्तमच आहे. माबो चे वाचक साधे वाचक नसून खूंखार वाचक बनल्यामुळे त्यांना शेवट कळतात... हा तुमचा दोष नाही. So dont worry keep writing.

स्वप्ना राज, शेवटी "शोनाने..." असा खुलासा अ‍ॅड करण्याची गरज नव्हती असे मला वाटते.
ज्यांना जे वाटतेय ते वाटु द्यावे.
जसे कुणाला वाटतेय तिनेच केले किंवा कुणाला वाटतेय आईने केले..

मला एक शेवट सुचतोय. बघा कसा वाटतो-

“मम्मी मी…मी न बुक्स आणायला गेले होते स्टडीलूम मध्ये. आणि पलत आले तेव्हा भय्या पलून जात होता आणि माझी डॉलू…” अनुला पुढे बोलल्या गेलं नाही. ती हमसून हमसून रडू लागली.

नेहा अनुशेजारी बसली अन हलकेच तिचे इवले इवले अश्रू टिपले.

“रडू नको ह बाळा, आपण भय्याचं घर उन्हात बांधू.”

“उन्हात नको मम्मी, चांगलं माल त्याला तू.”

नेहाला त्याही स्थितीत तिचे निरागस बोल ऐकून हसू फुटलं.
“बरं बाईसाहेब… आर्यनS… आर्यनSS”
तिने आवाज दिला. पण पलीकडुन काहीच प्रतिसाद आला नाही.

“तू राहू दे, मी बघतो त्याला. खुप आगाउ झालाय कार्टा आजकाल.” अविनाशने तिला अडवलं अन आर्यनला शोधायला आतल्या खोलीत गेला.
घरभर शोधून शेवटी तो आर्यनच्या बेडरुम जवळ जाउन पोहोचला. दरवाजा आतून बंद होता..

“आर्यन दरवाजा उघड”

काहीच प्रतिसाद नाही.

अविनाशने दरवाजा ठोठावला.
“आर्यन, मार खायचा नसेल तर बाहेर ये लवकर.”
तरीपण काहीच परिणाम नाही.

आर्यनची ही नेहमीची पद्धत होती. मार बसणार हे लक्षात येताच तो खोलीत जाउन लपून रहायचा. कितीही वाजवलं तरी तो दरवाजा उघडायचा नाही.
अविनाशने मग तो नाद सोडून दिला.

नेहाने अनुला बेडरूम मध्ये नेऊन झोपी घातलं. ते दोघेही थोड्या वेळात झोपी गेले. लवकरच त्या तिघा जिवांना निद्रेने आपल्या कबज्यात घेतलं.
आर्यन मात्र टक्क डोळे उघडे ठेऊन जागा होता. त्याची नजर भिरभिरत होती, कान कसल्यातरी आवाजाचा कानोसा घेण्याचा यत्न करत होते. त्या अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात तो अंगाचं मुटकुळं करून बसून होता. सहा इंचांची दोन पावलं त्याच्या रूमच्या जवळ येऊ लागली होती.
------

>>स्वप्ना, मग हीच कथा उलटी लिहून बघा. बाहुल्यांशी खेळणार्‍या मुलीला बटाट्याचे पराठे आवडत असतील हा अंदाज बांधणे सोपे जाणार नाही

Happy

>>पुढची कथा केंव्हा आता?

एक लिहून तयार आहे. पण सध्या ती अनप्रेडिक्टेबल करता येते का ते पहातेय Proud

>>आईच काम, नविन भावली आल्यावर शोनु मागे पडु नये म्हणुन

मलाही नंतर वाटलं की आईने केलंय असं दाखवलं असतं तर कदाचित इतकी प्रेडिक्टेबल झाली नसती.

>>माबो चे वाचक साधे वाचक नसून खूंखार वाचक बनल्यामुळे त्यांना शेवट कळतात... हा तुमचा दोष नाही. So dont worry keep writing.

धन्यवाद! असा दिलासा हवा होता थोडासा Happy बाकी तुम्ही केलेला गोष्टीचा शेवट मस्त आहे.

>>ज्यांना जे वाटतेय ते वाटु द्यावे. जसे कुणाला वाटतेय तिनेच केले किंवा कुणाला वाटतेय आईने केले..

हो.....मलाही असंच वाटतं की फार खुलासा करू नये गोष्टीत मग वाचक एकाच दिशेने विचार करतात. पाहू पुढली गोष्ट जमतेय का ते. नाही जमली तर काय चुकलंय ते सांगायला तुम्ही लोक आहातच की. Happy

पाहू पुढली गोष्ट जमतेय का ते. >>>>
काही जणांना अंदाज आलेला म्हणुन जमली नाहीय असं वाटतंय का?
चांगली जमलीय. मला तरी आधी अंदाज आला नव्हता, अगदी शेवटी कळलं.
ज्यांना अंदाज आला त्यांनी असल्या प्रकारच्या कथा आधी वाचल्या असाव्यात असे वाटते. बरोबर का ऋन्मेष, सस्मित, स्वस्ति?

Pages