लहान माझी भावली

Submitted by स्वप्ना_राज on 4 February, 2017 - 10:36

'अनु, जेवायला ये बघू आता. बघ ममाने तुझ्यासाठी स्पेशली बटाट्याचे पराठे केलेत'. अविनाशने हाक मारली.

रात्री जेवताना सगळं कुटुंब एकत्र असावं असा त्याचा कटाक्ष होता. ऑफिसात लंच जवळपास १० मिनिटांत उरकायला लागतो त्यामुळे बऱ्याचदा काय खाल्लंय हेही लक्षात येत नाही. निदान रात्रीचं जेवण तरी सुखाने सगळ्यांनी एकत्र बसून हसतखेळत करावं असं त्याला मनापासून वाटायचं. तसं व्हायचंही. पण आजकाल अनु मात्र वेळेत कधी हजर होतच नसे.

'तू सुरुवात कर अवि. येईल ती पाचेक मिनिटांत.....तिच्या व्हिकीने परवानगी दिल्यावर' नेहा हसतहसत म्हणाली.

'काय पण नाव.....व्हिकी म्हणे' अनुष्काच्या मोठ्या भावाने, आर्यनने , मान झटकली.

'लहान आहे रे ती अजून. आणि तुला का एव्हढा फणकारा आलाय? अजयकाकाने तुला पण आणलेत ना गेम्स आणि टॉईज?' अविनाश म्हणाला.

'म्हणून मी २४ अवर्स नाही खेळत बसत त्यांच्याशी'

'आर्यन! जेव बघू चूपचाप' नेहाने दटावलं तसा आर्यन गप्प झाला.

नेहा म्हणाली होती तसं पाचेक मिनिटांत अनु हजर झाली.

'या अनुबाई. व्हिकीने दिली परवानगी जेवायची?' नेहाने तिच्याकडे प्लेट सरकवत विचारलं.

'हो. व्हिकी आणि शोना झोपल्या आता.' अनुने डोळे चोळत एक सुस्कारा टाकत म्हटलं. आर्यनने 'मुली पण काय येडचाप असतात' अश्या अर्थाने डोळे फिरवले. अनुचा आविर्भाव पाहून अविनाशच्या चेहर्यावर हसू उमटलं.

जेवण झालं आणि मुलं आपापल्या खोलीत गेली तरी नेहा आणि अविनाश किचनमध्येच होते. नेहाची आवराआवर सुरु होती आणि अविनाश जमेल तशी मदत करत होता.

'शोना म्हणजे तुझ्या बाबांनी अनुचा जन्म झाला तेव्हा दिलेली तुझी लहानपणची बाहुली ना ग?'

'हो अरे, आईने अगदी जपून ठेवली होती. अनु झाल्यावर गंमत म्हणून त्यांनी आणून दिली होती. अनु थोडी मोठी झाल्यावर खूप खेळणी झालेत म्हणून पूजाच्या बाळासाठी देऊन टाकणार होते मी. तशीसुध्दा आताच्या बाहुल्यांपुढे जुनीच दिसते ती. पण अनुने देऊ दिली नाही. शोना नेहमी माझ्याजवळच रहाणार म्हणे. हट्टी आहे तुझी मुलगी तुझ्यासारखी'

'अच्छा. हट्टी आहे म्हणून माझ्यासारखी होय? बाईसाहेब, तुम्ही काय कमी हट्टी आहात का?'

'मी हट्टी होते म्हणून आपलं लग्न झालं बरं. नाहीतर तुम्ही अजून त्या बैराग्याच्या मठीत राहिला असतात अविनाश साहेब.' नेहाने त्याला टपली मारली आणि दोघे हसले.
------------------------------------
'काय झालं व्हिकी? उठलीस का तू? झोप येत नाहीये का?' अनुने निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची ती नाजूक बाहुली उचलली आणि जवळ घेऊन तिला थोपटायला लागली.

'असंच शहाण्या बाळासारखं झोपायचं आता. बघ शोना कशी झोपलेय.' तिने व्हिकीला खाली ठेवलं आणि आपल्या बेडवर जाऊन झोपली. मग एकदम काहीतरी आठवल्यासारखी उठली. शोनाजवळ जाऊन तिलाही थोपटलं आणि परत जाऊन झोपली.
----------------------------------------------
'अनु, इकडे ये. खाऊन घे आधी. मला ऑफिसला जायला उशीर होतोय सोन्या.' नेहाने नुडल्सने भरलेली प्लेट तिच्यापुढे ठेवली.

खेळणं थांबवून अनुने प्लेट उचलली. नुडल्स चमच्यात भरून तिने आधी तो चमचा व्हिकीच्या तोंडाजवळ नेला.

"Aren't they delicious?" मान तिरकी करत तिने व्हिकीला विचारलं. आणि मग तो घास स्वत:च्या तोंडात घालत नेहाला म्हणाली 'व्हिकीला आवडल्या न्युडल्स'.

'आणि शोनाला ग?' नेहाने डोळे मिचकावत विचारलं.

अनुने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. 'विसरलेच. सॉरी शोना' असं म्हणत तिने शोनाला भरवलं.

दोघा बाहुल्यांना भरवत जेवणारी लेक बघून हसत नेहा खोलीबाहेर पडली.
----------------------------------------------------
खरं तर दोघा मुलांना अर्ध्या तासासाठी का होईना पण एव्हढ्या रात्री घरात एकटं सोडून जायचं अविनाश आणि नेहाच्या अगदी जीवावर आलं होतं. आजकाल बातम्यात कायकाय येतं. पण हेमंतच्या बाबांची तब्येत अगदीच खालावली होती. रात्र निभेल की नाही ह्याचीसुध्दा शंका होती. जवळच्या सगळ्यांना भेटून जायला सांगितलं होतं. हेमंतचा लहानपणापासूनचा मित्र म्हणून अविनाशवर त्यांचा जीव होता. जाणं भाग होतं.

'अर्ध्या तासात येतो आम्ही. आर्यन, अनुवर लक्ष ठेवायचं. कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. तसं काही वाटलं तर फोन कर.' दहावेळा सूचना देऊन दोघे बाहेर पडले तरी नेहाला काळजी वाटत होती.

हॉस्पिटलमधून निघायला उशीर झाला आणि अर्ध्या तासाच्या ऐवजी चांगला पाऊण तास लागला त्यांना परतायला.

'किशोरकाकांना असं बघून......' अविनाशचं वाक्य अर्धवटच राहिलं कारण घराचा मेन दरवाजा उघडून आत येतात न येतात तोच अचानक अनुच्या जोरात रडण्याचा आवाज आला.

दरवाजा कसाबसा बंद करून त्यांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. आत जाऊन बघतात तर काय? एका कोपर्यात अनु थरथरत रडत उभी होती. भीतीने तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. समोर व्हिकीचे तुकडे पडले होते - मुंडकं धडावेगळं, हात आणि पाय सुटे-सुटे, सोनेरी केसांचे पुंजके इथेतिथे पसरलेले, एक निळा डोळा जमिनीवर पडलेला. नेहाला तर काय बोलावं तेच सुचेना. समोरचा प्रकार बघून ती हतबुद्ध झाली. तिने आधी अनुला जवळ घेतलं.

अविनाश मात्र प्रचंड भडकला. 'आर्यन! आर्यन!' त्याने जोरजोरात हाका मारल्या.
'अवि, शांतपणे घे जरा'
'शांतपणे घेऊ? शांतपणे? हे बघतेयस ना तू? आर्यन! कम हिअर राईट अ‍ॅट धिस मोमेंट!'

आर्यन धावत खोलीत आला. अविनाशने त्याचं मनगट खसकन धरलं. 'हे काय आहे? काय आहे हे?' व्हिकीचं मुंडकं आर्यनच्या डोळ्यासमोर नाचवत तो ओरडला.

'मला माहीत नाही डॅड'
'माहीत नाही? तुला माहित नाही? मग कोणाला माहीत आहे? दुसरं कोण होतं इथे आर्यन?'
'अवि, काम डाऊन'

'आय एम नॉट गोइंग टू काम डाऊन डॅम इट. आज हद्द केलीय ह्याने. असं वागतात? हे असं वागायला शिकवलंय आपण ह्याला?'

'डॅड, मी नाही केलं हे'
'खोटं बोलायचं नाही आर्यन. मला अजिबात आवडत नाही. यू नो दॅट.'

'डॅड, मी खरं....' पण अविनाशने आर्यनला बोलायची संधीच दिली नाही. नेहाला काही कळायच्या आत त्याने आर्यनला एक मुस्काटात ठेवून दिली. आजवर त्याने कधीच मुलांवर हात उगारला नव्हता. पण आज त्याचा पारा चढला होता.

आर्यनला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं ते त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. वेदना आणि अपमानाने त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं.

'अवि!!' नेहा ओरडली. अविनाश भानावर आला. त्याने आर्यनकडे पाहिलं आणि काही न बोलता तो खोलीतून बाहेर निघून गेला. मुसमुसणार्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन नेहा बसून राहिली.
-----------------------------------------------------------------
रात्रीचे दोन वाजले होते तरी अनुची झोपायची हिम्मत होत नव्हती. बेडवर एका बाजूला अंगाची मुटकुळी करून ती बसली होती. ममाचे शब्द तिच्या कानांत होते 'डोंट वरी बेटा. आपण अजयकाकाला सांगू हं आणखी एक डॉल पाठवायला. किंवा असं करायचं का? पूर्वामावशीला सांगायचं का व्हिकीचं ऑपरेशन करायला? ती व्हिकीला एकदम फिट करेल पहिल्यासारखी. तोपर्यंत तू शोनाशी खेळ. मी उद्याच फोन करते हं तिला'

तिला ममाला ओरडून सांगावंसं वाटलं होतं की अजयकाकाने दुसरी डॉल आणली काय किंवा पूर्वामावशीने व्हिकीला पहिल्या सारखी केली काय त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. कारण......

पण ती काही बोलली नव्हती. काय म्हणाला होता डॅड आर्यनला? हं....."खोटं बोलायचं नाही आर्यन. मला अजिबात आवडत नाही. यू नो दॅट"......मी खोटं बोलतेय असं डॅडला वाटलं असतं. ममाला पण असंच वाटलं असतं का? हो, तिला पण असंच वाटलं असतं. अजयकाकाला, पुर्वामावशीला, आजोबा, आजी, निशु, यश, दीपिका.........सगळ्यासगळ्यांना असंच वाटलं असतं की मी खोटं बोलतेय.

पण मी खोटं नाही बोलत. मी खरंच खोटं नाही बोलत आहे. व्हिकीला आर्यनने काही नाही केलं. मला माहीत आहे कारण व्हिकीला कोणी हार्म केलं ते मी बघितलंय.

शोनाने................

Group content visibility: 
Use group defaults

छानच लिहिलिए... अंदाज आला होता मला मध्यंतरात पण त्यामुळे ती जमली नाही असा अर्थ अज्जिब्बात होत नाही बरं...
पुलेशु..

ज्यांना अंदाज आला त्यांनी असल्या प्रकारच्या कथा आधी वाचल्या असाव्यात असे वाटते. बरोबर का ऋन्मेष, सस्मित, स्वस्ति?>>>> हो मानव. यु आर म्हणिंग द राइट.

स्वप्ना कथा जमली नाहीये असं आजिबातच नाही. मांडणी छान आहे कथेची.

नावाने घोटाळा केला का ? हे म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेन्गे सारख झालं Happy
शेवटी सिमरन राजकडेच जाणार हे माहितीय ,फक्त कसं ते बघायच Happy .

स्वप्ना कथा जमली नाहीये असं आजिबातच नाही. मांडणी छान आहे कथेची.>> + १०००

मानव, तुम्ही आधी 'अंदाजच काय शिर्षक वाचूनच कथा कळली' म्हणाला होता आणि आता 'मला तरी आधी अंदाज आला नव्हता, अगदी शेवटी कळलं' असं म्हणताय की. Happy असो. पण दिलासा दिल्याबद्दल तुम्हाला आणि बाकी सर्वांना धन्यवाद! Happy

शीर्षकाने घोटाळा केला खरा. हे पुढल्या वेळी लक्षात ठेवेन नक्की.

अरेच्या, ते गमतीने लिहिलं होतं... पुढे ..फक्त प्रतिसाद द्यायला धागा उघडला वगैरे. डोमा स्म्यायलीपण टाकली.
कशी काय कथा कळणार शिर्षक वाचून?

Pages