अराजकता आणि असुरक्षितता !

Submitted by विद्या भुतकर on 1 February, 2017 - 22:37

गेल्या काही दिवसांपासून पाहतेय, माझ्यासारखेच अनेक लोक 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे प्रत्येक विषयावर आपले मत देत आहेत. त्यामध्ये, स.ली. भ. ने बाजीराव मस्तानी मध्ये जे काही दाखवलं ते चूक हे आधीच ठरवून, नंतर त्याचंच कौतुक करणारे लोक पाहिले. दुसऱ्याने आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं, बायकोचे कुठले फोटो पोस्ट करायचे, कुठल्या देशातील लोकांना मुव्ही मध्ये घ्यायचे किंवा नाही, आणि आता त्या नवीन मुव्ही मध्ये जे काही 'सो कॉल्ड' शूटिंग होत आहे त्यावरही मत आहेच. बर नुसते मत नाही, आता तर मारहाणही होत आहे. म्हणजे साध्या माणसाच्या आयुष्यात रोजच्या जीवनात इतके काही घडत असताना या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा त्रास का?

आपल्या शेजारच्यांनी जाऊ दे, मुलांनीही त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ठरवले तर त्यात आपण काही बोलू शकत नाही. का? तर तो त्यांचा प्रश्न आहे. मग कुणी आपल्या मुलाचे नाव अमुकतमुक ठेवले तर आपला काय संबंध? खरं सांगायचं तर आपल्याकडे मुलीला 'लग्न झाल्यावर नवऱ्याकडे जाऊन काय हवं ते कर' असं म्हणणारे अनेक आईवडील असतात. आणि खरंच नवऱ्याला चालतंय ना? मग आम्ही कोण बोलणारे असे म्हणून नंतर गप्पही बसतात. पण तेच एखाद्याने आपल्या बायकोसोबतचा फोटो टाकल्यावर त्याला वाटेल ते कमेंट लिहिणे याला काय अर्थ आहे?

परवा पासून जी पद्मावतीच्या सेटवरचा प्रसंग आणि त्यांवर नंतर लोकांचे आलेले कमेंट पाहून खरंच कळत नाही की लोक कुठे चालले आहेत? एखाद्या चित्रपटात काय दाखवले आहे हे पाहिल्याशिवाय कसे कळणार आहे? आणि त्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे अजून. आणि आपल्याकडे मस्ती च्या सिरीजसारखे असणारे गलिच्छ चित्रपट चालतात, मग अजून प्रदर्शितही न झालेल्या चित्रपटासाठी एकदम मारहाण? कधी कधी प्रश्न पडतो हे असे कोण लोक असतात ज्यांना आपल्या पोटापाण्याचे सोडून बाकी प्रश्न महत्वाचे आहेत? आणि समजा असतील तर मग तक्रार करा पोलिसात, शूटिंग वर बंदी आणा, असे अनेक पर्याय आहेत त्यासाठी. कुठला तरी हेतू या लोकांच्या मनात नक्कीच असणार असं मला तरी वाटतं आणि त्यांना प्रसिद्धी देऊन, त्यावर चर्चा करून आपण त्यांना अजून खतपाणी घालतो.

मध्ये पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर, एका चित्रपटावर अनेक विरोध झाले, वाद झाले. त्यानंतर अजून दोन पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट प्रदर्शित झाले. त्यावेळी हा असाच गोंधळ का नाही केला गेला? म्हणजे देशभक्ती फक्त १५-२० दिवसच टिकते का? आणि दोन महिन्यात, दुसरे चित्रपट कसे १०० कोटीच्या घरात जातात यावर चर्चा करतात. का? विरोध करायचाच तर सर्वांनाच करायचा, सरसकट. उगाच नुसते मीडियामध्ये नकारात्मक कमेंट टाकून नंतर पिक्चर बघायला जायचे नाही. आपल्या नकारात्मक वागण्याचा लोकांवरही सामुदायिक परिणाम होत असतो याचा विचार कुणी करतं का?

तामिळनाडू मध्ये जल्लीकटूच्या समर्थनासाठी इतके मोर्चे निघाले. मग त्यांनी काढले म्हणून केरळमध्ये अजून एका खेळासाठी निघाले. उद्या पुन्हा दहीहंडी किती थरांची करायची यासाठी निघतील. अजून मराठा मोर्चा वगैरे आहेच. मला असं वाटतंय की एखाद्या देशात इतकी अराजकता का? कोणी मुद्दाम हे सर्व तर करत नाहीये ना? आपण या अशा अनेक आवाहनांच्या आहारी जाऊन आपणच कुठल्या मोठ्या कारस्थानाला बळी पडत नाहीये ना हा विचार जरूर करायला हवा.

दोन तीन दिवसांपूर्वी एका मुलीची इन्फोसिस ऑफिस मध्ये हत्या झाली. त्यावरून आम्ही बोलत होतो की मुलींना अशा शिफ्ट मध्ये येऊ द्यायचं की नाही? मी म्हणले का नाही यायचं त्यांनी? जर एखादा मुलगा शिफ्ट मध्ये काम करू शकतो तर मुलीलाही करता आले पाहिजे. लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, तिचे काम नाही? हा, त्या सुरक्षिततेसाठी उपाय जरूर करू शकतो, पण एखादा वाटेल त्या नजरेने मुलीकडे बघतो म्हणून त्याला शिक्षा न देता मुलींचे काम बंद करणे हा उपाय नक्कीच नाही. आता वरच्या आणि या हत्येचा संबंध तसा पाहिला तर काहीच नाही. पण मला प्रश्न पडलाय, लोकांना एखाद्याच्या बायकोचे फोटो कसे किंवा एका राणी पद्मावती बद्दल सिनेमात काय दाखवलं जावं किंवा नाही याची इतकी काळजी असते, तेच लोक स्त्री सुरक्षा आणि त्यांचा सन्मान अशा महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्षात का काम करत नाहीत?

खरं सांगते आजकाल अजिबात बातम्या वाचायची इच्छा होत नाही. कुठलीही बातमी काही ना काही कारण असल्याशिवाय समोर येत नाही. मीडियावरचा तर विश्वास उडतच आहे, पण लोकांच्या चांगुलपणावरचाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मला अतिशय असुरक्षित वाटते आजकाल, सगळीकडेच. फक्त ते तसं वाटू देण्याचा प्रयत्न कोणी मुद्दाम करत आहे का हे मात्र जरूर वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असुरक्षित वाटण्याइअतपत विचार कधी केला नाही सगळ्या गोष्टींचा.
पण बातम्यां बद्दल +१. आणि माणसांच्या भावना पण आजकाल कोणत्याही क्षुल्लक कारणावरुन दुखावल्या जाताहेत.

झुंडशाही जोम धरतेय. एकदा चिथावून झुंड तयार झाला की तो मग सारासार विचार करत नाही आणि चिथवायला भरपूर माध्य्मे मिळत आहेत आणि ती वापरणार्‍या लोकांची संख्या वाढलेली आहे. आणि परत अशा बातम्या अती रंजीत करायलासुद्धा तीच माध्यमे आहेत.
त्यामुळे चित्र दिसतंय तेवढं भयानक नसावं असं म्हणायलाही वाव असला तरी एकंदरीत वाटचाल भलत्याच दिशेने होत आहे हे मात्र जाणवत रहातं.

सस्मित, धन्यवाद. बदल केलाय. Happy

झुंडशाही जोम धरतेय. एकदा चिथावून झुंड तयार झाला की तो मग सारासार विचार करत नाही आणि चिथवायला भरपूर माध्य्मे मिळत आहेत आणि ती वापरणार्‍या लोकांची संख्या वाढलेली आहे. आणि परत अशा बातम्या अती रंजीत करायलासुद्धा तीच माध्यमे आहेत.>> Exactly. आणि लोक सारसार विचार करतच नाहियेत असे वाटत आहे. त्यात भर घालनार्या लोकान्च्या हिमतिबद्द्ल अजून राग येत राहतो.

>>झुंडशाही जोम धरतेय. एकदा चिथावून झुंड तयार झाला की तो मग सारासार विचार करत नाही आणि चिथवायला भरपूर माध्य्मे मिळत आहेत आणि ती वापरणार्‍या लोकांची संख्या वाढलेली आहे. आणि परत अशा बातम्या अती रंजीत करायलासुद्धा तीच माध्यमे आहेत.>> सहमत.
असुरक्षिततेबद्दल कल्पना नाही पण सोशल मिडीया, सोशल नेटवर्किंग साईट्स, स्मार्ट फोन्स, सहज उपलब्ध इंटरनेट ह्यांचाही ह्या सगळ्याला हातभार लागत असावा नक्कीच.

>> झुंडशाही जोम धरतेय.

सहमत. वैचारिक प्रगल्भता जितकी कमी तितका समाज झुंडशाहीकडे झुकतो. आणि वाचनाअभावी वैचारिक प्रगल्भता घटते. विवेक उरत नाही.

काही दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या विवेकवाद्यांच्या मेळाव्यात मुग्धा कर्णिकांचे झालेले भाषण या संबंधात वाचण्या सारखे आहे. त्याची लिंक मिळाली तर पोष्ट करतो. पण सध्याची परिस्थिती का उद्भवली आहे त्याचे जे विश्लेषण त्यांनी केलेय ते आवर्जून वाचण्यासारखे आहे. त्यातील काही मुद्दे जे मला क्लिक झाले ते येथे देत आहे:
.
१. नको इतकी निर्ढावलेली कुटुंबसंस्थाही लोकशाही मूल्यसंवर्धनाला मारक आहे
.
२. वडील म्हणाले गांधी नादान होते, नेहरू ऐय्याश होते की तीच खात्री निष्ठेने पुढे नेली जाते. संघाची लोकं हलकट असे बाबा म्हणाले की ते तसेच मान्य केले जाते. वास्तव नेमके कसे ते तपासून घेतले जात नाही.
.
३. व्यक्तिस्वातंत्र्याची मूल्येच मुळात न रुजलेला समाज व्यक्तीकेंद्री प्रभावक्षेत्रात न आला तरच नवल
.
४. भीती ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे
.
५. धुळवडीकडे सरळ दुर्लक्ष करून विचारस्वातंत्र्य प्रिय असलेल्या सर्व विवेकी लोकांनी आपली कठीण अशी झुंज सुरूच ठेवली पाहिजे
.
६. जगभर न वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे. भारतात विशेषच.
.

२. वडील म्हणाले गांधी नादान होते, नेहरू ऐय्याश होते की तीच खात्री निष्ठेने पुढे नेली जाते. संघाची लोकं हलकट असे बाबा म्हणाले की ते तसेच मान्य केले जाते. वास्तव नेमके कसे ते तपासून घेतले जात नाही. >> +1. आणि तपासून पाहिले तरी त्यावर आपण बोललेच पाहिजे असे नाही. आज देशात हजारो गोष्टी आहेत ज्यावर प्रत्यक्शात काम करता येईल. अशी एनर्जी वाया का घालवायची?

४. भीती ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे. >> माझा प्रश्न असा आहे की ही भीति आपल्या मनात निर्माण करण्यासाठी हे प्रकार घडवून आणले जात आहेत का? सत्ता हातातून गेल्यावर हे असले प्रकार करुन जे आहे त्यापेक्षा भयानक चित्र लोकान्समोर उभे करुन, पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? प्रत्येक व्यक्तिचा काहितरी हेतू आहे ते करण्यामागे असे वाटत राहते. कोणीही निरपेक्ष काम करत आहे असे वाटत नाही.

६. जगभर न वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे. भारतात विशेषच. >> होय. आणि जे मिडिया वारन्वार दाख्वते तेच पाहून अजून भडकत आहेत लोक असेही वाटते.

कमेन्टबद्दल सर्वान्चे आभार. अतुल, छान प्रतिसाद.

अतुल यांच्या प्रतिसादापासून सुरू झालेल्या बोलण्यासंदर्भात :
>>जगभर न वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे. भारतात विशेषच. <<

जे वाचले तेच मुळात कम्युनिस्ट इतिहासकारांनी खोटे लिहिले, असे लिहिणार्‍या पुराणिक बोवांच्या संख्येबद्दल व सध्या सुरू असलेल्या इतिहासाच्या सहेतुक विकृतीकरणाबद्दल आपले काय मत आहे?

मस्त पोस्ट अतुल.
वडिल म्हणाले.. आणि वाचणार्‍यांची संख्या..... अगदीच सहम्त.

मनातील विचार व्यक्त करण्या साठी उपलब्ध असलेली, मुक्त आणि सहज उपलब्ध असलेली मध्यमे ( फेसबूक , ब्लोग , व्हत आप , बातम्या खालील प्रतिक्रिया देण्याची सोय) या मुळे हे विचार (अविचार) प्रचारीत होतात.
वेगवेगळी मत / टोकाची मत पूर्वी सुद्धा होतीच फक्त फरक एवढाच पडला आहे कि - ती मत आज काल सहज प्रचार पावली जातात. मग त्या मधून प्रत्येक बातमी वर , प्रत्येक घटनेवर मत व्यक्त करण्याची इच्छा आणि त्यावर प्रतिमत. मग त्यातून होणारे ग्रुप , मग त्यातले वाद हे क्रमाने आलेच.
यातून बाहेर पडायचे असेल तर - सुरुवात म्हणून आपण एक करू शकतो, प्रत्येक घटना , बातमी पाहिल्यावर , वाचल्यावर आपण मत दिलेच पाहिजे (प्रतिक्रिया लिहिणे , चर्चा हा अट्टाहास सोडायचा - जसा मी आता दिलेला प्रतिसाद Happy
दुसरा वाचन वाढावा म्हणजे वेग वेगळी मत / दृष्टिकोन कळतील पण लक्षात ठेवा लेखकाचे लिखाण हा त्याचा ओपिनियन (मत) असते ती फॅक्ट (सत्यताच )असेल असे नाही.
सोशल मीडिया हा डेटा पुरवू शकतो , analysis केल्या शिवाय तो वर्थ आहे.
लिहिलेला लेख , पुस्तक , कथा हि त्या लेखकाची त्या वेळेची मनस्थिती , सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आणि मत यांचा आरसा असते, त्याचा काळा नुसार रेफेरेंस बदलतो.
तेव्हा अश्या बातम्या / मत फक्त वाचा , प्रतिक्रिया टाळा - डिमांड/ TRP कमी झाला कि आपोआप हे प्रकार कमी होतील Happy

सर्वांचा पोटापाण्याचा बिजनेस आहे हा !!
मिडीया, राजकारणी, नेते, अभिनेते, उद्योगपती, जातीधर्माच्या नावावर बनलेल्या संघटना, त्यांचे कार्यकर्ते, सोशलसाईट्स, त्यावर वावरणारे, मग या सर्वात मी देखील एक आलो, मलाही अश्या विषयांवर धागे काढायला वा चर्चा करायला खूप आवडते ..

इतिहासाचे विकृतीकरण ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे ... कधी सोयीनुसार अमका धर्म म्हणजे पाखंडी ... तर कधी तमका तो आमचाच अवतार असे प्रकार पुर्वीपासूनच आहेत.

इतिहास, हिन्दुत्ववाद, पाखन्डि, हे सर्व शब्द सुद्धा नकारात्म्क आहेत. मला काहीच नकोय, हे अतीरन्जित चित्र जे सगळीकडे साकारले जातेय त्याचा जास्त त्रास होतो.
जगात, भारतात खरेच लोकाना रोज्च्या जेवणाची मारामार आहे. सिरिया इ तर बोलाय्लाच नको. साधे जिवनाचे हक्कही नाहियेत. आपण मात्र या चोट्या गोषटीन्चा बाऊ करत आहे, तोही किती? याला काही मर्यादाच नाहीये.

जगात, भारतात खरेच लोकाना रोज्च्या जेवणाची मारामार आहे.
>>>>
यावरच तर हा ऊपाय आहे. धर्म ही एक नशेची गोळी आहे. ती खाल्ली की मग भूक नाही लागत. ईतर समस्या विसरायला होतात.

सपना, अमेरिकेतील एक भारतीय म्हणून जे वाटते ते तर अजून वेगळेच. त्या विचारान्चि झलक या लेखातही उतरली आहेच. पण नुकताच स्वतः ट्रेनमधे रेसिझमचा स्वतः किस्सा पाहिल्यावर अजून काळजी वाटते.