कथा विवेकानंद शिलास्मारकाची

Submitted by झंप्या दामले on 18 January, 2017 - 14:20

स्वामी विवेकानंद म्हणजे ऊर्जा, चैतन्य, विचार यांचे तेजस्वी प्रकटीकरण. पूर्वेच्या वंगभूमीत जन्मलेला, वाढलेला हा तरुण या राष्ट्राच्या शोधासाठी घराबाहेर पडला, निरीक्षण, संवाद, अभ्यास, चिंतन करत करत देश पालथा घातला आणि सरतेशेवटी भारताच्या दक्षिणतम टोकावर जाऊन त्यांनी सर्व अनुभवांचे मनन केले तेव्हा त्यातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे उद्दिष्ट गवसले. अशा ऐतिहासिक ठिकाणी साठ वर्षांनी एका समर्पित कार्यकर्त्याच्या पुढाकाराने 'देशाचे गौरवस्थान' असा लौकिक मिळवेल असे भव्य शिलास्मारक उभे राहिले. त्या स्मारकाच्या जन्माची थक्क करणारी गाथा म्हणजे प्रस्तुत पुस्तक !

एकनाथजी रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय स्तरावरील पूर्णवेळ कार्यकर्ते. १९५७ ते ६३ या कालावधीत त्यांनी सरकार्यवाह हे संघातील क्र. दोनचे पदही भूषविले होते. ते संघकार्यात प्रामुख्याने उत्तर व पूर्व भारतात व्यस्त असताना सुदूर दक्षिणेत वेगळ्याच घटना घडत होत्या. ज्या खडकावर स्वामी विवेकांदांनी ३ दिवस ध्यान केले आणि त्यानंतर त्यांना आपल्यासमोरच्या उद्दिष्टाची निश्चित जाणीव झाली तो खडक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. स्थानिक मंडळींनी या शीलेचे महत्व जाणून तिथे विवेकानंदांचे स्मारक उभारण्यासाठी हालचाल सुरु केल्याचे कळताच स्थानिक ख्रिश्चन मंडळींनी अचानक हा खडक सेंट झेवियर्सचा खडक आहे असे जाहीर करून तिथे ख्रिस्ताची खूण म्हणून क्रूस लावला. या शीलेवर शंकराची वाट पाहणाऱ्या पार्वतीचे पाऊल उमटलेले आहे अशी श्रद्धा असल्यामुळे तसेच विवेकांदांच्या आयुष्यातली प्रेरणादायी घटना म्हणूनही हिंदूंच्या दृष्टीने ही शीला अनन्यसाधारण महत्वाची असल्याने त्यांना ही शिरजोरी रुचणे शक्यच नव्हते. त्यातूनच मग क्रूस उखडून तिथे विवेकानंदांबद्दल माहिती देणारा शिलालेख बसवणे, ख्रिश्चनांनी तो काढून पुन्हा क्रूस बसवणे असले प्रकार सुरु झाले. तेव्हा स्थानिक स्मारक राज्य समितीच्या मंडळींनी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींकडे स्मारकाच्या कामाची तड लावण्यासाठी ‘एकनाथजी रानडे यांची मदत मिळू शकेल का’ अशी विचारणा केली. गुरुजींनी होकार दिल्यामुळे एकनाथजी या कामाकडे वळले. त्यांना स्थानिक परिस्थितीबद्दल काहीच कल्पना नव्हती, परंतु मागच्याच वर्षी (१९६२) विवेकानंदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विवेकानंदांच्या प्रचंड विचारधनाचे सार ‘Rousing Call to Nation’ या नावाने (जे ‘हिंदुतेजा, जाग रे !’ या नावाने मराठीतही प्रसिद्ध आहे) सुटसुटीत स्वरुपात संकलित केले असल्याने ते स्वामीजींच्या विचारांशी अतिशय जवळून परिचित व प्रेरितही झाले होते. त्यामुळे पुढच्या कामासाठी वेगळ्या प्रेरणेसाठी अन्य कशाचीच आवश्यकता नव्हती. त्या दिवसापासूनच सुरू झाला एका जगड्व्याळ कामाचा विलक्षण प्रवास .... हिंदू-ख्रिश्चन वादात अतिशय बोटचेपी भूमिका घेतलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांना राजी करण्यासापासूनच सुरुवात करायची होती. त्यांना वळवून घेण्यासाठी एकनाथजींनी केलेले भगीरथ प्रयत्न, क्लृप्त्या, वैचारिक देवाणघेवाण ही कुठल्याही सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यासाठी एक आख्खा अभ्यासक्रमाचा विषय आहे. पाठोपाठ राष्ट्रीय पातळीवरचे नेते, दहा दिशांना तोंडे असणारी नानाविध पक्षाची मंडळी यांना अनुकूल करून घेणे, कन्याकुमारीच्या मंदीर व्यवस्थापनापासून ते राजकीय विरोधकांपर्यंत अनेकांना सांभाळत ऐनवेळेला उपटलेल्या वादांवर मात करत त्यांनी स्मारकाचा मुद्दा ज्या जिद्दीने पुढे नेला ते वाचून अक्षरशः स्तिमित व्हायला होते. त्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचण्याला पर्याय नाही.

खरंतर एकनाथजींचे निवेदन म्हणून हे पुस्तक आपल्यासमोर असले तरी त्याला कदाचित सर्वसामान्यपणे पुस्तकांना लागणारे निकष लावता येणार नाहीत. कारण हे आहे त्यांचे अनुभव, चिंतन, मार्गदर्शन यांच्या जाहीर प्रकटनाचे संकलन. विवेकानंद स्मारक समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी देण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या – ज्यांना ‘जीवनव्रती’ असे संबोधले जाते - पहिल्या फळीसमोर केलेल्या १० व्याख्यानांचे हे एकत्रीकरण आहे. स्मारकाचा इतिहास काय, त्यामागचा विचार काय आणि पुढे काय कार्य करायचे आहे या सर्व गोष्टी सुस्पष्टपणे चित्र उभे राहण्यासाठी ही व्याख्याने दिली गेली होती. सुनिश्चित उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम केलेले असल्यामुळे एकनाथजींच्या विचारांमध्ये कमालीची सुसूत्रता होती, ज्याचे प्रतिबिंब या भाषणांमध्ये उमटले आहे. स्वामीजींच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक होणे जितके महत्वाचे आहेच पण त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे त्याहूनही जास्त महत्वाचे आहे याबद्दल त्यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. म्हणूनच केवळ राजकीय व्यक्तींना राजी करणे, आर्थिक मदत घेणे एवढ्यापुरते हे काम सीमित न करता देशभरातून सर्व राज्यांतून प्रत्येकाकडून अवघा १ रुपया एवढेच निधीसंकलन केले गेले. त्यामुळे स्वामी विवेकानंद बंगालची अस्मिता म्हणून मर्यादित न राहता गावोगावी, घराघरात पोचले. पुस्तकाच्या पूर्वार्धात या सर्वाचे विस्तृत विवेचन आहे. तर उत्तरार्ध हा स्मारकउभारणीनंतर कायस्वरूपी संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश, त्यासाठी कार्यकर्ते घडवण्याची गरज व आपल्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून देत त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा अशा स्वरूपाचा आहे, त्यामुळे उत्तरार्धात घटनांचा तपशील अगदी कमी असून वैचारिकतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे.

शेवटी परिशिष्टाच्या विभागात अतिशय महत्वाचे असे ३ तपशीलवार संवाद आहेत. १) स्मारक निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात देशाचे सांस्कृतिक मंत्री असणारे हुमायून कबीर यांच्याशी एक्नाथजींचा संवाद २) तामिळनाडूचे तेव्हाचे मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्यात परवानगी मिळवण्याच्या दृष्टीने झालेले संभाषण ३) स्मारकाची परवानगी मिळाल्यानंतर अधिक तपशिलासंदर्भात एकनाथजी व भक्तवत्सलम यांच्यात झालेला संवाद (एकनाथजींच्या कामाची पद्धत इतकी विलक्षण होती की हा संवाद त्यांनी लिखित स्वरुपात नोंदवून स्थानिक जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेतला आहे (त्याने भक्तवत्सलम यांना तो मजकूर दाखवून पडताळूनही घेतला होता), त्यामुळे या संवादाला आता दस्तावेजाचे स्वरूप आले आहे).

विवेकानंदांइतकेच एकनाथजींच्यामोरही नतमस्तक व्हायला लावणारे हे पुस्तक आहे. कुठल्याही कार्याचा कार्यवाह कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे एकनाथजी. जिद्द, चिकाटी, कष्टाची तयारी, नियोजन हे तर सर्व महत्वाचे गुण त्याच्या अंगी असायला हवेतच, पण त्याच्यात असायलाच हवा असा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे 'संवादकौशल्य'. परस्पर विवादाचे मुद्दे बाजूला ठेवूनही राष्ट्रकार्यासाठी अनेक विचारधारांच्या लोकांना एकत्र आणता येऊ शकते हे त्यांनी फार नेमके जाणले होते. कुणी कुठल्याही विचारधारेचा असला तरी त्याचा पृष्ठभाग थोडासा खरवडला तर त्याच्यातले हिंदुत्व, राष्ट्रीयत्व जागे करता येऊ शकते हा त्यांचा दृढविश्वास. याच विश्वासातून त्यांनी दिल्लीश्वरांपासून ते तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या करुणानिधींपर्यंत, बंगालच्या ज्योती बसूंसारख्या कम्युनिस्ट मंडळींपासून नागालँडचे मुख्यमंत्री व जनतेपर्यंत सर्वांना या कामाशी जोडून घेतले. तब्बल सव्वातीनशे खासदारांच्या स्मारकाला पाठिंबा देणाऱ्या स्वाक्षऱ्या घेतल्या ! सर्वसमावेशकतेचे यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे कुठले असू शकते ?

या सर्व घडामोडींमध्ये एकनाथजींना काय काय कष्ट करावे लागले असतील ? प्रत्येकाच्या कलाने घेणे, त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, विचारांची दिशा, हळवे कोपरे जोखत-जोखत स्मारक उभारणीचे महत्व सर्वांच्या गळी उतरवणे, त्यांच्या सह्या घेणे एवढेच काय पण पत्रकारांनाही हे सर्व पटवून देऊन त्यांच्याकडून स्मारकाला अनुकूल लिखाण प्रसवेल याची काळजी घेणे .... एक ना दोन ... अशा वेळेस त्यांच्या मदतीला धावून आलेली गोष्ट म्हणजे पूर्वीपासूनच असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क ! संघ कार्यकर्त्याच्या जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायात भिंगरी असावी लागते असे म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २३ वर्षे त्यांच्यावर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे या गोष्टी एकनाथजींकडे विपुल प्रमाणात होत्या. ते केवळ रा.स्व.संघांचे काम करत होते म्हणूनही अनेकदा स्मारकाला पाठिंबा देणे नाकारले जायचे अशा वेळेस जिभेवर साखर असणे आवश्यक. अनेक संघर्षाच्या प्रसंगात ते हिमालयासारखे शांत उभे राहिले आणि वाद टाळले. कामानिमित्त एकनाथजींनी प्रचंड प्रवास केला. शब्दशः आसेतुहिमाचल देश पिंजून काढला. त्यांनी कुठल्याकुठल्या ठिकाणाचे किती किती वेळा संदर्भ दिलेत याहे पुस्तक वाचल्याशिवाय कळणार नाही. या काळातल्या त्यांच्या प्रवासाची तुलना बहुदा फक्त गोळवलकर गुरुजींच्या प्रवासाशीच होऊ शकते (गुरुजी वर्षातून २ वेळा आख्खा भारत पालथा घालत - असा प्रवास जवळपास ३० वर्षं केला होता !)

संघ कार्यकर्ते जातील तिथे एवढी माणसे जोडतात की पुढे जेव्हा एखादी हाक जरी त्या व्यक्तीच्या कानी पडली तरी तो ‘ओ’ दिल्याशिवाय राहत नाही. किंबहुना एकनाथजींवर स्मारकाची जबाबदारी येऊन पडण्याचे कारणच हे होते की त्यांचा दिल्लीत व इतर ठिकाणी मोठमोठ्या माणसांशी खूप चांगला संपर्क होता. यासंदर्भात पुस्तकातले उदाहरण देतो. स्मारक उभारणीचा विचार अगदी बीजरूपात होता तेव्हाच (१९६३ मध्ये) एकनाथजी रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी माधवानंद यांना भेटून त्यांचे याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी गेले. कारण रामकृष्ण मिशन ही यांनीच स्थापिलेली संस्था. १९५० ते १९६३ च्या काळात कलकत्त्याला असताना एकनाथजी दर १५ दिवसांनी स्वामी माधवानंद यांना भेटायला जात असल्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्यामुळे या कामासाठी विचारायला जेव्हा एकनाथजी गेले तेव्हा त्यांनी आनंदाने अनुमोदन तर दिलेच पण उलट मिशनचा संपूर्ण पाठिंबा या कार्यात मिळेल अशी ग्वाही देऊन आशीर्वाद देखील दिले. पुढे पूर्वांचालासारख्या ठिकाणी निधीसंकलनाच्या निमित्ताने जेव्हा संपर्क झाला त्यासाठीच्या वातावरणनिर्मितीसाठी तेव्हा रामकृष्ण मिशनने प्रकाशित केलेल्या विवेकानंदांच्या साहित्याचा खूप उपयोगही झाला.

पन्नास वर्षापूर्वीच्या या भव्य जागरण यज्ञातून एक अद्वितीय शिल्प १९७० साली साकारले गेले आणि सोबतच स्थापन झालेल्या विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आज आपल्या समर्पणातून वनवासी भाग, पूर्वोत्तर राज्यांमधले दुर्गम भाग अशा ठिकाणी शाळा, आरोग्यसेवा अशा सेवाकार्यांच्या माध्यमातून देश जोडण्याचे आणि देश बलशाली करण्याचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकारण्यासाठी झटत आहेत. १२ जानेवारीच्या स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने त्यामागच्या एकनाथजींच्या प्रेरणेची माहिती घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी हे पुस्तक अनन्यसाधारण महत्वाचे आहे.

- विवेकानंद केंद्र प्रकाशन,
- मराठी विभाग,
- पृष्ठे १८४,
- किंमत ५० रू,
- आवृत्ती आठवी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ओळख करून दिली आहे पुस्तकाची. <कुणी कुठल्याही विचारधारेचा असला तरी त्याचा पृष्ठभाग थोडासा खरवडला तर त्याच्यातले हिंदुत्व, राष्ट्रीयत्व जागे करता येऊ शकते हा त्यांचा दृढविश्वास. याच विश्वासातून त्यांनी दिल्लीश्वरांपासून ते तमिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या करुणानिधींपर्यंत, बंगालच्या ज्योती बसूंसारख्या कम्युनिस्ट मंडळींपासून नागालँडचे मुख्यमंत्री व जनतेपर्यंत सर्वांना या कामाशी जोडून घेतले. तब्बल सव्वातीनशे खासदारांच्या स्मारकाला पाठिंबा देणाऱ्या स्वाक्षऱ्या घेतल्या ! सर्वसमावेशकतेचे यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरे कुठले असू शकते ?> ग्रेट !
शिलास्मारकामध्ये स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्यासमोर उभे राहिले की विलक्षण वाटते. एकावेळेसच शांती आणि चैतन्य याने मन भारावून जाते. स्वामी विवेकानंद आणि एकनाथजी रानडे दोघांच्या स्मृतीस अभिवादन !

शिलास्मारकामध्ये स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच्यासमोर उभे राहिले की विलक्षण वाटते. एकावेळेसच शांती आणि चैतन्य याने मन भारावून जाते. स्वामी विवेकानंद आणि एकनाथजी रानडे दोघांच्या स्मृतीस अभिवादन !+ १
छान ! पुस्तक परीचय आवडला!

पुस्तक परिचय आणि एकनाथजी रानडेंचा थोडक्यात असलेला व्यक्तिपरिचयही आवडला.
पुस्तक मिळवून वाचणार.

नंद्या४३ तो तीरुवल्लुवरचा पुतळा वेगळ्या आयलॅंडवर आहे.

हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. तीथे स्मारकामधील दुकानातच मला हे पुस्तक मिळाले. तोपर्यंत एवढे काही त्यासाठी झाले याची कल्पनाही नव्हती.

धन्यवाद मंडळी.

@पारू, मंजुताई : तो पुतळा उभ्या स्थितीत का आहे आणि ध्यानस्थ स्थितीत (जी त्या स्थानाचे महत्व पाहता अगदी ऑबव्हीअसली असायला हवी होती) का नाही, याचाही फार विचार केला होता एकनाथजींनी. त्याबाबद्दल तुम्हाला तपशिलात या पुस्तकात वाचायला मिळेल.

@प्रज्ञा९ : हे पुस्तक विवेकानंद केंद्राच्या कुठल्याही स्थानिक कार्यालयात मिळू शकेल.

@नंद्या४३ : कुणा दाक्षिणात्य कवीचा पुतळा पण तिथेच उभारला आहे त्यावर पुस्तक केंव्हा येणार? >> तो तिरुवेल्लूर यांचा पुतळा आहे आणि तो विवेकानंद स्मारकासमोरच उभा करण्यामागे काही राजकारण आहे असे वाचनात आले होते. शिवाय तो पुतळा स्मरकापेक्षाही उंच केल्याने तो प्रकार तमीळ अस्मिता जपण्यासाठी जाणीवपूर्वक केल्यासारखा वाटतो.
त्याच्या उभारणीमागची कहाणी विवेकानंद स्मारकासारखी रोमहर्षक नाहीये.

झंप्या, १९ नोव्हेंबर साधना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यादिवशी माननीय एकनाथजींच्या जीवनाचा थोडक्यात परीचय असा एक भाग व कथा शीलास्मारकाची असा दिसरा भाग मी_ आर्या हीने टाकला होता तो ह्या पुस्तकातूनच घेतलाय.