चला डोकावूया - भाग १. 'अंध व्यक्तींच्या जीवनात!'

Submitted by सचिन काळे on 17 January, 2017 - 21:59

काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो. म्हणजे घराबाहेर वावरताना ज्या गोष्टी आपल्याला अगदी शुल्लक वाटत असतात, त्याच गोष्टी अंधांना फार अडचणीच्या वाटत असतात. त्यांच्या बोलण्यात नेहमी त्या संबंधीचेच विषय येत असतात. घराबाहेरच्या जगात वावरायचे कसे याचीच चिंता कायम त्यांचे डोके पोखरीत असते. 

ह्या आलेल्या अनुभवाने मला अंधांच्या जीवनाविषयी, त्यांच्या अडचणींविषयी जाणून घ्यावेसे वाटू लागले. त्याकरीता मी बरेचसे वाचन केले. आणि जे काही वाचले, समजले ते तूम्हालाही सांगावेसे वाटतेय. म्हणून हा लेखन प्रपंच.

अंध व्यक्तींची दोन प्रकारात वर्गवारी करता येईल. १. पूर्णतः अंध व्यक्ती - हे अंधार व प्रकाश यातला फरक ओळखू शकत नाहीत. यांना एका अंधाऱ्या खोलीत बसवले आणि तेथील दिवा लावला तरी त्यांना प्रकाशाची थोडीसुद्धा जाणीव होत नाही. २. अंशतः अंध व्यक्ती - डोळ्याला एखादी इजा झाल्यामुळे किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात अंध झालेल्या व्यक्ती. यांना दिसण्याची टक्केवारी प्रत्येक व्यक्तीनुसार कमीजास्त असू शकते.

एक आकडेवारी सांगते कि संपूर्ण जगात असलेल्या ३.७ कोटी अंधांपैकी १.५ कोटी अंध एकट्या भारतातच आहेत. आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यापैकी ७५ टक्के रुग्ण अंध होण्यापासून टाळता आले असते. भारताला दरवर्षी २.५ लाख नेत्रदान केलेल्या डोळ्यांची आवश्यकता भासते. पण भारतात असलेल्या १०९ नेत्रपेढींमधून दरवर्षी फक्त २५ हजारच नेत्र जमा केले जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांपैकी ३० टक्के नेत्र हे विविध कारणांमुळे वापरता येत नाहीत.

बहुतेकांना प्रश्न पडतो कि जन्मतः पूर्ण अंधव्यक्तींना काय दिसते? काहीच दिसत नाही. साधा अंधारही दिसत नाही. त्यांना अंधार, प्रकाश, काळापांढरा रंग म्हणजे काय हेच माहित नसते. त्यांना फक्त एक लांबच लांब निर्वात पोकळी दिसत असते. काहींना डोळे चोळल्यावर दिसतात तशा चांदण्या दिसतात.

अंधव्यक्ती आपल्या स्वप्नात काय बघतात? एक म्हण आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'. आपण रोजच्या जीवनात जी दृश्ये बघतो, त्यांना आपला मेंदू वेगवेगळ्या स्वप्नाच्या रुपाने आपणांस पुन्हा दाखवत असतो. पण मग एखादा जन्मतः अंध असेल आणि त्याने डोळ्याने कुठलेच दृश्य कधीही पाहिलेच नसेल, काय आणि कसे दिसते याचे त्याच्या मेंदूने कधी अवलोकनच केले नसेल तर त्याला स्वप्नेही कशी पडणार? पण ज्याला साधारणतः वयाच्या ५-७ व्या वर्षांनंतर अंधत्व आलेले असेल, त्याने जग म्हणजे काय हे पाहिलेले असते. त्याला स्वप्ने पडू शकतात.

अंध व्यक्ती पापण्यांची उघडमीट करतात का? ज्यांना आपल्यासारखी बुब्बुळं आहेत ते आपल्या पापण्यांची उघडमीट करतात. पण ज्यांना डोळ्यांच्या ठिकाणी फक्त खाचा आहेत त्या अंधव्यक्तींना पापण्यांची उघडमीट करता येत नाही.

अंधव्यक्तींच्या मूलभूत गरजांकडे समाजाचे एक नागरिक म्हणून दुर्लक्ष करणे आणि त्यांना आपल्यासारखेच एक सामान्यव्यक्ती म्हणून समाजाने न स्वीकारणे हे फक्त भारतातच नाही तर अगदी जागतिक स्तरावरसुद्धा दिसून येते. 

अंधव्यक्तींना घराबाहेर लोकांच्या गर्दीत वावरायला सहज सोपे पडतील अशा मूलभूत सुविधा उभारण्यात सरकारी खात्यांत बऱ्याचदा अनास्था दिसून येते. अंधांकरिता असलेल्या विविध सरकारी योजनांच्या माहितीबाबत स्वतः अंधांच्यातच अज्ञान असते.

शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये ब्रेललिपीतील पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. सर्व सोयींनी युक्त अशा अंधशाळांची कमतरता असते. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रम बनवताना अंधही सहजरीत्या शिकू शकतील याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होते आणि ते शिकवताना पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसल्याने अंधांचे मूलभूत अधिकार डावलले जातात. अंधांमधील असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने साहजिकच बेरोजगारीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त आहे.

भारतातील बऱ्याचशा मागासलेल्या भागात एखादी व्यक्ती अंध असणे हे त्याचे पूर्वजन्मीचे पाप समजून त्याला सामाजिक त्रासही दिला जातो. लहान खेडेगावात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आणि लोकांना डोळ्यांना होणाऱ्या आजारांची माहिती नसल्याने, तसेच त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंध झालेल्यांचे प्रमाणही वाढत असते.

अंधत्वामुळे ते समाजामध्ये जास्त मिसळू शकत नसल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. ते स्वतःच्या नजरेतून उतरतात. काहीवेळा लोकं अंधांच्या समोरच त्यांच्या अंध असण्याविषयी चर्चा करतात. त्यांच्या मनाचा जरासुद्धा विचार करीत नाहीत. काही निपुत्रिक अंधांना ते बाळाची योग्य काळजी घेऊ शकणार नाहीत या शंकेने काही देशांत त्यांना मुल दत्तक देणे नाकारले जाते. अंधांवर आपण फार मोठे उपकारच करीत आहोत अशा भावनेतून त्यांना रोजगार दिला जातो, शिवाय त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न देऊन त्यांची पिळवणूकही केली जाते.

अंधव्यक्ती सामान्य लोकांसारखे मैदानी खेळ, व्यायामाचे काही प्रकार करू शकत नाहीत. त्यांच्या शारीरिक हालचाली एकदम मंद असतात. त्यामुळे साहजिकच त्यांची पचनसंस्था मंद झाल्याने त्यांना शारीरिक तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असतात. सर्वसामान्यांचं रोजचं २४ तासांचं जीवनचक्र घड्याळ्याबरोबर पळत असते. त्याप्रमाणेच त्यांना तहान, भूक, झोप लागत असते. पण अंधांना वेळेची तितकीशी जाणीव नसल्याने त्यांचे रोजचे जीवनचक्र कधी २० तासांचे तर कधी २८ तासांचे असू शकते. त्यामुळे अंधव्यक्ती आपणांस अवेळी झोपताना, जेवताना दिसू शकतात. ह्यामुळे त्यांना समाजाच्या धावपळीबरोबर जुळवून घेताना किती अडचण येत असेल याची तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता.

सध्याच्या काळात मोबाईलफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. तूर्त तरी ज्यांना मोबाइलची स्क्रीन बघता येते, अशा लोकांकरीताच मोबाईलफोन बनविला जातो. आयफोन सोडल्यास कोणत्याही कंपनीच्या गावीही नाही कि आपला फोन अंधांनाही वापरता येऊ शकेल असा बनवावा.

पण सध्या अंधांकरीता फार आशावादी चित्र दिसते आहे. अंधांकरीता सरकारी नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक प्रवासांच्या वाहनांमध्ये आरक्षण ठेवले जाते. प्रवासभांड्यामध्ये त्यांना सवलत दिली जाते. आज काही अंध upsc, mpsc पास होऊन सरकारी अधिकारीही झालेले दिसताहेत. अंधशाळांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढते आहे. फक्त अंधांसाठी असलेल्या काही निवासी सेवाभावी संस्थांमध्ये त्यांच्या रहाण्या खाण्यासहित शिशुवर्ग ते आठवीपर्यंत शिक्षणाची मोफत सोय होत आहे. तेथे त्यांना गायन, वादन, मल्लखांब, शारीरिक कसरत करण्याकरिता प्रोत्साहित केले जाते. तेथे फक्त अंधांकरिता खेळांच्या स्पर्धांही घेण्यात येतात. त्यांना काही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. 

अंधांचे जीवन सुखकर होण्याकरिता आज माहितीतंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. कॉम्पुटरच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनच्या मदतीने अंधव्यक्ती आता लिहू, वाचू आणि शिकूही शकतायत. कॉम्पुटर प्रोग्रामर बनून नोकऱ्याही पटकावताहेत. टायपिंग करून विंडोजचे वर्ड आणि एक्सेल वापरतायत. खास ब्रेल लिपीचे प्रिंटर वापरून पुस्तकेही लिहिताहेत.

एखाद्याच्या आयुष्यात अंधत्व येणे हे खरोखरीच दुर्दैवी आहे. पण अंधांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण आता हळूहळू बदलतोय. सरकार, समाजसेवी संस्था आणि समाजही त्यांना विश्वास देऊ पाहतोय कि चिंता करू नका. तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आता आमचीही आहे. तुमचे जीवन सुखकर करण्याकरिता आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहोत.

माझा ब्लॉग : www.sachinkale763.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका दुर्लक्षित अशा विषयावर तुम्हाला वाचन करावेसे वाटले आणि ते तुम्ही केले देखील! आम्हालाही सांगितले! अभिनंदन.

अतिशय उत्तम लेख!

ज्यांनी अंध लोकांना जवळून पहिले नाही त्यांच्या डोक्यात अंध म्हणजे कायम इतरांवर अवलंबून असे काहीसे समीकरण असते, कोणी अंध व्यक्ती भेटलीच तर सहानुभूती व्यक्त करणे आवश्यक वाटते. पण एका ट्रेकवर एका अंध गृहस्थांशी भेट झाल्यावर माझे हे सगळे विचार म्हणजे केवळ अंधविश्वास आहेत याची खात्री पटली. गोव्याच्या जंगलातून भटकंतीच्या 5 दिवसाच्या ट्रेकमध्ये हा अंध आम्हा डोळसांचा ग्रुप लीडर होता कारण ट्रेकिंगचा सर्वात जास्त अनुभव त्याच्या गाठीशी होता. त्याच्या सोबत त्याचा एक मित्र होता जो त्याला चालताना 'पुढे फांदी आहे' 'दोन फूट रुंद खड्डा आहे' वगैरे मार्गदर्शन करत होता. आम्ही जेव्हा हा सोबती आहे म्हणून तुमचे नीट चाललंय वगैरे बोलायला लागलो तेव्हा त्याने दरदिवशी ट्रेकमधल्या तरुण मुलामुलींपैकी एकेकाला सोबती म्हणून निवडायला सुरवात केली. या मुलांनाही त्यामुळे अंधांना किटपत मदत हवी असते आणि आपण कशी मदत करू शकतो याचे आकलन झाले. या माणसाने महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले सर केलेले, वर हिमालयन ट्रेक सुदधा केलेले. अजूनही हा उपक्रम चालूच असणार यात शंका नाही. त्याला प्रकाशाचा सेन्स जन्मापासून अजिबात नव्हता, पण आयुष्यात आलेल्या या ठार अंधारामुळे त्याने फारसे काही अडू दिले नाही.

चांगला लेख. पु ढचे भाग येउ देत.
समाजातील अंधत्व काही प्रमाणात तरी कमी होण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान खूप प्रमाणात झाले पाहिजे. त्यासाठी पाहिजे फक्त जवळच्या व्यक्तीची इछाशक्ती आणि झटपट कृती.

श्रीलंकेत नेत्रदान सक्तीचे आहे या मुद्द्यावरून मला त्या देशाबद्दल अतीव आदर वाटतो.

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांचे जाहीर आभार !!! आपण देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्यासारख्या नवलेखकांना दोन शब्द लिहिण्याचा हुरूप येतो. आपणां सर्वांचे पुनः एकवार धन्यवाद!!!

'चला डोकावू या!!!'च्या पुढील भागात विविध लोकांच्या जीवनात डोकावण्याचा मानस आहे. आपल्या आशीर्वादाने माझी इच्छा तडीस जाईल याची मला खात्री आहे.

@ गिरीश, आपण दिलेली व्हिडीओची लिंक पाहिली. फारच सुंदर आहे. ती लिंक मी पुन्हा खाली देत आहे. सर्वांनी जरूर पहावी अशी आपणांस विनंती आहे.

https://youtu.be/hxS5He3KVEM

argus2 नावाचा कृत्रिम डोळा विकसीत करण्यात आला आहे ,यात एक कॅमेरा जोडलेला असतो व त्याचे इनपुट्स थेट रेटीनाला दिलेले असतात,गाडीची नंबरप्लेट वाचण्याइतपत नजर अश्या व्यक्तींना मिळते.
याला biomechatronics असे शास्त्रीय नाव आहे.या शास्त्राने बरीच प्रगती केलेली आहे ,नजिकच्या भविष्यात कुणीही आंधळे नसेल हे आपण खात्रीने सांगु शकतो.
प्लस स्टेम सेल रिसर्चनेही आपली कमाल दाखवली आहे.भविष्यात स्टेम सेल थेरपीने अंधत्वावर मात करता येइल.

argus बद्दल आधी वाचलं होतं. रेटिनोपॅथीवर अेक शक्य अुपाय म्हणुन.
आता ते अेवढे प्रगत झालेय माहित नव्हते.
अधिक माहिती द्याल का सिंजी?

मस्त लेख..
छान अनुभव साधना..त्या व्यक्तीच कौतुक वाटत..

>>>पण अंधांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण आता हळूहळू बदलतोय. सरकार, समाजसेवी संस्था आणि समाजही त्यांना विश्वास देऊ पाहतोय कि चिंता करू नका. तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आता आमचीही आहे. तुमचे जीवन सुखकर करण्याकरिता आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहोत.--

खरेच असे असो आणी परिस्थितीत लवकर आणि जलद परिवर्तन होवो.

वा मस्त लेख आणि विषय! अजून माहीती वाचायला आवडेल.

श्रीलंकेत नेत्रदान सक्तीचे आहे या मुद्द्यावरून मला त्या देशाबद्दल अतीव आदर वाटतो. >>> ईंटरेस्टींग. आणि सही आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली. नेत्रदान, अवयवदान अजून करायचे राहिलेय माझे. घरच्यांचाही फॉर्म भरायचाय.

स्टेम सेल रिसर्चनेही आपली कमाल दाखवली आहे.भविष्यात स्टेम सेल थेरपीने अंधत्वावर मात करता येइल. >>> स्टेम सेल थेरपीवर मागे एका धाग्यात मायबोलीवरच थोडाफर गदारोळ पाहिलेला. अजून यात काहीही म्हणावी अशी प्रगती नाही, बस्स मार्केटींग चालू आहे वगैरे..

नेत्रदान, अवयवदान अजून करायचे राहिलेय माझे. घरच्यांचाही फॉर्म भरायचाय. >>

खरे सांगू, हे अर्ज भरणे वगैरे सोपस्कार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे व्यक्ती मरण पावल्यावर नातेवाइकांनी त्वरीत नि र्णय घेणे व झटपट हालचाली करणे. बरेचदा इथेच घोडे पेंड खाते.

समजा एखाद्याने अर्ज जरी भरलेला नसला आणि नातेवाइकांनी त्याचे अवयवदान केले तर काहीही फरक पडत नाही. कृती महत्वाची. बस्स.

अधिक माहिती मिळेल का अवयवदाना बद्दल? कुठली / कुठल्या संस्था आहेत? पुढे ते अवयव गजरुला कसे देण्यात येतात वगैरे..

साधना, छान पोस्ट !
सचिन, लेख आवडला.
डोळस राधा अशी अंध राधाची मुलाखत लिहली होती तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय फोटो टाकून धागा वर