खरं सुख

Submitted by Suyog Shilwant on 17 January, 2017 - 02:55

आपण कधी खरच विचार केला आहे का आपलं खरं सुख कशात आहे. आपण लहान असताना कोणत्याही गोष्टीत सुख मानत होतो. मग आता असे काय झाले ज्याने सुखाची परीभाषा बदलली.

त्यातलाच एक किस्सा सांगतो.
सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा ! हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.

मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कस काय सर्व ? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं, धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय..... एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय."

ह्या छोट्याशा किस्स्याची गम्मत बघा. ह्यात सर्व आहे राग, संय्यम, माया, चिडचिड, अक्कल, कटकट, वैताग, भक्ती, आनंद, कंटाळा, गडबड, दुःख, श्रध्दा, विश्वास, सुख, शांती, समाधान…
पण आपण योग्य वेळी काय करतो…सहाजिकच आहे की आपण ते करतो जे नाही करायला पाहिजे. जर खरच सुख हवं असेल तर संय्यम, माया, अक्कल, भक्ती, श्रद्धा, विश्वास योग्य वेळी आणि नियमीत पाळले तर आनंद, सुख, शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच लाभेल…

लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरुर द्या…

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेब मास्टर धन्यवाद...आता पुर्णपणे सुधारणा झाली आहे. तातडीने लक्ष दिल्या बद्दल खुप आभारी आहे.

मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर....वाढत्या अपेक्षा,आहे त्यात समाधान नसणे....

तुम्ही उदाहरणं दिली तर जास्त पटेल तुमचा मुद्दा...

कोणी काय लिहलय त्यातला बोध घायचा राहिला साईडला....मी आधीही वाचलयं याच गजर मात्र नक्की करतील...
भौतिक सुख बाळगणे शेवटी तसंच...
पालथ्या घड्यावर शेवटी पाणी...