इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग शेवटचा (आतापुरता तरी :) )

Submitted by विद्या भुतकर on 11 January, 2017 - 18:30

भाग ५: http://www.maayboli.com/node/61350

एक अवघडलेला आठवडा सोबत घालवून रितू आणि आनंद भारतात परत आले होते. दोघांनींही सुटकेचा श्वास घेतला होता. पुढे काय? कधी भेटायचं? काय करायचं? यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दोघांनाही द्यायचं नव्हतं.दोघेही आपापल्या घरी पोचले होते. घरी कितीही दिवसांनी जा किंवा वर्षांनी तुम्ही दोन मिनिटांत पूर्वीसारखे होता. घरात घालायचे कपडे, चप्पल, बसायची जागा, झोपायची गादी, पांघरूण, टिव्ही, रेडिओ जिथल्या तिथे असतं सर्व. जणू बाहेरच्या अस्थिर जगात ती एकच जागा स्थैर देते, काहीतरी शाश्वत असल्याचं आश्वासन देते. रितू इतक्या दिवसांनी आल्याने तिचे लाड चालू होतेच. गेल्या काही महिन्यांचा ताण, शीण सर्व कमी होत होता. यावेळी प्रोजेक्ट संपवून आल्याने तेही काही काम डोक्यात नव्हते. एक मोठठी सुट्टी घ्यायचं तिने ठरवलं होतं.

तिकडे आनंदही घरी गेला होता. पण आठवड्यातच परत आला. असेही घरी राहून करमणार नव्हते. रूमवर राहायला आल्यावर त्याला सगळ्यांत पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे आता सोबत रितू नाहीये. गेल्या सहा महिन्यांची सवय झालेली, 'हे असं वाटणारच थोडे दिवस' असं स्वतःला समजावून तो पूर्वीसारख्या रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करू लागला. एक चांगलं झालं होतं, ऑफिसला आल्यापासून आनंद थोडा मनातून शांत झाला होता. जुन्या मित्र-मैत्रिणींना इतक्या महिन्यांनी भेटल्याने, त्यांच्यासोबत बाहेर जाणंही सुरु झालं. वाईट फक्त एकाच गोष्टीचं होतं, इतक्या दिवसांत रितूने एकदाही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नव्हता. बरं त्यांचं नातं असं होतं की विचारणार कोणाला? उलट लोकंच त्याला विचारत,"रितू कैसी है?". तोही आपला,"ठीक है" म्हणून निभावून नेत होता.

काही दिवसांनी एके रात्री त्याने तिला फोन केला. आता पुढे काय? उचलेल किंवा नाही शंका होतीच. पण तिने उचलला. आता पुढे काय?

तो,"हाय!"

ती,"हाय."

तो,"कशी आहेस?"

ती,"मी ठीक आहे. तू?"

तो,"मी ठीक. परत ऑफिस जॉईन केलं."

ती,"अच्छा? लवकर जॉईन केलंस?'

तो,"हां, असंच."

मग बराच वेळ शांतता....

तो,"Happy Birthday."

ती,"मला वाटलं विसरलास."

तो,"मला वाटलं 'थँक्स' म्हणशील."

ती हसली, थोडंसं आणि 'थँक्स' म्हणाली.

..

..

..

त्याने विचारलं,"जेवण झालं?"

ती,"हो, केव्हाच."

तो,"हां बराच उशिरा कॉल केला. सॉरी. पण म्हटलं उचलशील की नाही म्हणून करत नव्हतो."

ती,"का नाही उचलणार?"
..

..

अनेक तास वाटतील अशा थोड्या वेळाने विचारलं,"काय केलंस आज विशेष?"

ती,"काही खास नाही. घरीच होतो. केक आणला होता."

तो,"छान."

ती,"बाकी सगळं ठीक?"

तो,"हां ठीकच आहे."

ती,"गुड !"

तो,"चल ठेवतो मग मी. गुड नाईट."

ती,"हा गुड नाईट. बाय."

त्याने फोन ठेवून टाकला. बराच वेळ फोन हातात धरून बसला. विचार करून त्याने तिला मेसेज केला,"I miss you."

त्याच्यासाठी ती रात्र जरा जास्तच लांबली होती.

-----------

घरी येऊन महिनाभर गेला तरी रितू ऑफिसला कधी जायचं यावर काही बोलत नव्हती. पण आई-वडिलांनी पाहिलं होतं की आल्या आल्या एकदम काळवंडलेली ती आता जरा सुधारली होती, सर्वांशी नीट बोलत होती, मिसळत होती.

असेच एकदा जेवण करताना तिने आईला सांगितलं," कांदा भाजताना मीठ घातलं ना की जरा लवकर भाजतो आणि चवही छान येते."

आईने जरा आश्चर्यानेच पाहिलं तिच्याकडे, म्हणाली,"आता मलाच टिप्स द्यायला लागलीस तू?"

ती हसली काहीतरी आठवत. तिकडे आई बोलतच होती,"चला आता मला लग्नाचं टेन्शन नाही म्हणजे. "

ती चिडली जराशीच आणि म्हणाली,"म्हणजे काय? लग्नासाठी प्रत्येक मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे का?"

आई,"असं नाही गं. गम्मत केली. पण चांगलं आहे ना तुला इतकं छान जेवण आता बनवता येतं."

ती,"हां, इतके दिवस तिथे स्वतःलाच सर्व करायला लागत होतं ना? मग काय शिकावंच लागलं. पण मी आता काही नाही करणार. मस्त पोळ्या-भाजीला बाई लावणार आणि आराम करणार."

आई,"बरं बाई, सांग नवऱ्याला सर्व कामाला नोकर ठेवायला. "

ती पुन्हा चिडली,"नवऱ्याला कशाला सांगू? मी आहे ना कमावणारी?".

आईने पुन्हा विषय काढला. "रितू, तुला येऊन बरेच दिवस झाले. तू यायच्या आधीपासूनच बरीच स्थळं येऊन गेलीत. आल्या आल्या, तू अगदीच दमलेली दिसत होतीस, म्हणून मीच नको म्हटलं तेव्हा. पण तुला असाही वेळ आहे प्रोजेक्ट सुरु व्हायला तर भेटून घेऊ ना काही मुलांना."

ती म्हणाली आईला,"अगं पण इतकी काय घाई आहे?"

आई,"घाई कुठे? तुझं वय आता २८ वर्षं झालं आणि तरीही तू म्हणतेस घाई का करताय? हे बघ, मी आता काही बोलू शकत नाही. तुला काय बोलायचं आहे ते बाबांना सांग. "

बाबांकडे विषय काढायची काही तिची हिम्मत नव्हती. आईनेच तिला दोन तीन मुलांचे प्रोफाईल दाखवले होते. त्यातले दोन तर तिने असेच कारणं सांगून नाही म्हणून सांगितले. शेवटी एका रविवारी एका मुलाला भेटायचे तिने मान्य केले.. अर्थातच 'एका भेटीत काही मी लगेच हो म्हणणार नाही' हेही तिने स्पष्ट सांगितलं होतं. मुलाला भेटणे ही आता केवळ औपचारिकता राहिलेली नव्हती. रविवारी तो मुलगा आणि त्याचा सर्व गोतावळा घरी आला.

तिने थोडी चिडचिड केलीच,"इतकं काय सोनं लागलंय मुलाला म्हणून तुम्ही इतकी धावपळ करताय?".

तिच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. ते लोक आले आणि सर्व वातावरण एकदम तंग झालेलं. तिच्या दिसण्याकडे आज आवर्जून लक्ष दिलं जात होतं. त्याचा तर तिला अजून राग येत होता. साडी वगैरे मी काही नेसणार नाही हे तर तिने सांगितलं होतं आणि हातात ट्रे ही घेऊन जाणार नाही. उगाच काय फालतू प्रथा! तिला आपलं असं प्रदर्शन अजिबात आवडत नव्हतं.

पण मुलगा ठीक होता. त्याच्याशी बराच बोललीही ती. उगाच नावं ठेवण्यासारखं काही नव्हतंच. पण एकमेकांना सांगण्यासारखंही काही नव्हतं. तिने थोडक्यात आटोपलं. बाकी सर्व ठीक होतं, घर, नोकरी, घरचेही सर्व ठीकच होते. पण त्या 'ठीक' असण्याने तिने त्याला 'हो' म्हणायचं का? की नकार द्यायला काही कारण नाही म्हणून 'हो' म्हणायचं? ते लोक गेल्यावरही घरात तीच बोलणी चालू होती. तिला कळत नव्हतं, इतका त्रास का करून घ्यायचा? म्हटलं 'नाही' तर काय होणारे? काही सोनं लागलं नव्हतं त्याला ! सोनं लागलं असतं तर कसा दिसला असता हे आठवून तिला हसू आलं. पण ते कुणाला सांगताही येईना.

रात्री बराच वेळ विचार करून तिने आनंदला फोन केला. उचलेल की नाही शंका होतीच. पण उचलला.

ती,"कसा आहेस?"

तो,"मी बरा आहे. तू?"

ती,"मी ठीक आहे."

'बोलणं पुन्हा एकदा मागच्या सारखंच चालणार वाटतं', असा त्याने विचार केला.

इतक्यात ती म्हणाली,"आज एक मुलगा आला होता घरी."

तो"कशाला?"

ती,"कशाला म्हणजे? मला बघायला?" त्याचा श्वास एक क्षण थांबला.

तो,"मग?"

ती,"मग गेला बघून."

तो गप्पच.

ती,"वेडाच होता. म्हटलं गाणी ऐकायला आवडतात का? तर म्हणाला, हो, शास्त्रीय संगीत ऐकतो कुठल्याशा पंडितजींचे. मला तर हसूच आले. तर चिडला. म्हणे 'इतके मोठे आहेत ते, त्यांना ओळखत नाहीस का?'.

अरे? असेल त्याचा पंडितजी. मी काय करू? त्याला कोडिंग दिले तर जमेल का?"

तिच्या बोलण्यात आज तो पूर्वीचा मिश्कीलपणा होता. पण त्याचे लक्ष त्या 'मुला' बद्दल ऐकण्यात होते.

"मग पुढे?"

"पुढे काय? मी 'नाही' म्हणून सांगितलं. अरिजितचा कुणी फॅन असेल तरच लग्न करणार म्हणूनही सांगितलंय." ती बोलली.

तो शांतच.

ती,"बरं चल ठेवते मी उशीर झालाय. पुढच्या आठवड्यात अजून कुणी येणार आहे म्हणे. बघू तो आहे का अरिजीतचा फॅन."

त्याने नुसतंच ह्म्म्म केलं आणि तिने फोन ठेवून दिला होता.
--------

पुढचा महिनाभर तिचा काही कॉल आला नाही. त्यानेही मग काही विचारपूस केली नाही. सोमवारी सकाळी त्याच्या दारावर एक मोठ्ठी थाप पडली. झोपेतून उठत त्याने दरवाजा उघडला. दूध, पेपर असेल म्हणून खाली वाकला तर ती म्हणाली,"आयुष्यमान भव!" आणि खूप हसली. तो दचकून तिच्याकडे पहातच राहिला. खाली पडलेली दुधाची पिशवी, पेपर आणि ती सर्व एकत्रच घरात आले. रूम अस्ताव्यस्त पसरली होती. त्याच्या गादीवर ते दोघेही बसले.

तिने विचारलं,"बसलास? चहा नाही करणार? छान आहे रे ही रूम. मी इथे कधी आले नव्हते. "

त्याने डोळे चोळत मान हलवली आणि तो चहा टाकायला उठला. तो पटकन ब्रशही करून आला. ती पेपर वाचत बसली होती. चहाचा पहिला घोट घेतल्यावर तिला एकदम त्यांच्या अमेरिकतेल्या घराची आठवण झाली. तिने त्याच्या विस्कटलेल्या केसांकडे पाहिलं, त्याचा नेहमीचा घरातला टीशर्ट आणि पॅन्ट, सर्व कसं ओळखीचं, अगदी गादीवरची त्याची चादरही.

तोही तिच्या फ्रेश चेहऱ्याकडे टक लावून बघत होता. किती छान दिसतेय, एकदम फ्रेश. इतकी का खुशीत असेल? लग्न ठरलं की काय?

"इकडे कशी काय?" शेवटी त्याने विचारले.

"इकडे म्हणजे? मग कुठे जाणार ना? ऑफिस इकडेच आहे अजून माझं."

"चला म्हणजे अजून नोकरी सोडलेली नाहीये. का राजीनामा द्यायला आलीयस?",तो.

"का रे? नकोय का मी तुला त्या ऑफिसमध्ये?", तिने डिवचून विचारलं. तो नुसताच हसला.

'किती छान दिसतो तो हसताना. किती दिवसांनी पाहतोय त्याला हसताना', तिने विचार केला.

"आजपासून जॉईन करतेय ना परत.",ती म्हणाली.

"अच्छा? मला वाटलं...." तो आश्चर्याने बोलला.

"काय वाटलं? ठरलं लग्न. जाईल एकदाची सोडून मला? हेच ना", ती.

त्याने पुन्हा मान हलवली. तिने त्याचा खाली बघत असलेला चेहरा हातात घेत वर केला.

"लग्न करायचंच असतं तर तिकडे अमेरिकेतच केलं असतं ना तुझ्याशी, आजपर्यत कशाला थांबले असते. ".

ती पुढे बोलत राहिली.

"घरी गेल्यावर खूप बरं वाटलं मला. आपलं घर, आईवडील, माझं बाकी सर्व जग हे किती महत्वाचं आहे मला हे जाणवलं. त्यांनीच मला माझ्या मनस्थितीतून बाहेरही काढलं. पण तरीही काहीतरी कमी होतीच. तुझी! एक मित्र म्हणून, एक रूममेट म्हणून, एक पार्टनर म्हणून.

तो पहिला मुलगा आला ना भेटायला तेंव्हाच क्षणोक्षणी तुझी आठवण येत होती. त्याच्या तोंडून जणू तू बोलशील तीच उत्तरं ऐकावीशी वाटत होती. तुला तेंव्हा फोन केला तो माझ्या मित्राला, त्याची आठवण जास्त झाली तेंव्हा. कुणाला सर्व सांगता येत नव्हतं, जे तुझ्याशी शेअर करता येतं. पण तेंव्हा काही बोलले नाही. वाटलं, बहुतेक तुझी सवय झाली म्हणून सर्वांची तुझ्याशी तुलना करतेय. ते कुणी नकोत म्हणून 'तू' हा ऑप्शन मला नको होता. म्हणून मग पुन्हा फोन केला नाही. घरी राहिले, तुझी आठवण येत होतीच. पाहायला येणारी मुलेही चालूच होती. प्रत्येक मुलगा एक चॅलेंज म्हणून बघत होते. एखादा, जो तुझी एक क्षणासाठी तरी आठवण येऊ देणार नाही. पण असा एकही भेटला नाही.

अनेकदा वाटलंही त्यांना विचारावं,'लग्ना आधीच्या सेक्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे'. पण घाबरले असते बिचारे. त्यांचा चेहरा कसा होईल हा विचार करून अजून हसू यायचं. एखाद्याला आपल्या अबॉर्शन बद्दल सांगून तो 'हो' म्हणतोय का हेही पाहणार होते. पण हे उगाच त्यांना 'गिनिपिग' केल्यासारखं झालं असतं. आपण दोघांनी गेल्या काही वर्षांत जे एकत्र अनुभवलं आहे ना? प्रेम, दुरावा, राग, त्रास, एकत्र राहणं, सेक्स, अबॉर्शन या सर्वांतून माझ्यासोबत अजून कुणीच गेला नसता किंवा मीही हे अजून कुणासोबत करू शकले नसते. कारण आपलं प्रेम, मैत्री, एकमेकांबद्दलचा आदर, करियरबद्दलची काळजी, आपले जुळलेले स्वभाव किंवा जुळवून घेतलेलेही. अजून कुणी कितीही जवळ आला तरी हे सर्व त्याच्याशी पुन्हा जोडू शकले नसते.

परत आले तेंव्हा भीती वाटत होती की जे झालं त्याच्याहून किती परीक्षा द्यायला लागत असतील एका लग्नाच्या नात्यात. पण आता वाटतंय आपण ज्यातून गेलो त्यापेक्षा अजून काय त्रासदायक असणार आहे? त्यातूनही आपलं नातं टिकलं. मला पुन्हा तुझ्याकडे घेऊन आलं. आपलं नातं वेगळंच आहे रे. हे सगळं कळायला मला इतका का वेळ लागला रे? मला खरंच खूप वेळ लागला. त्यासाठी तुझ्यापासून इतके दिवस दूर राहावं लागलं. तू काय करत असशील याचा विचारही केला नाही. कारण मला तुझा विचार करून परत यायचं नव्हतं. मला माझ्यासाठी परत यायचं होतं, कायमचं." ती बोलत कमी आणि रडत जास्त होती. तिचे हात पुन्हा एकदा त्याच्या हातात होते.

"I am really sorry" म्हणत तिने पुन्हा रडायला सुरुवात केली.

तो मात्र हसत होता. रडता रडता हसत होता.

तिने पाहिल्यावर तो बोलू लागला,"आपण किती वेडे आहे यावर हसत होतो. आयुष्यात आपण कधीतरी एका गावात राहणार आहे का? ".

"म्हणजे?"

"म्हणजे, तू परत येशील म्हणून मी इथे वाट बघत होतो. तुझा शेवटचा फोन येऊन गेला आणि मी पूर्ण आशा सोडली. तुझे 'मुलगा बघायच्या' कार्यक्रमाचे किस्से मला ऐकायचे नव्हते. आणि इथे राहावतही नव्हते. म्हणून मी माझी बदलीची request केली होती. ती नुकतीच अप्रूव्ह झालीय आणि आता मी हे सामानच आवरत होतो. "

"हे बघ, तू आता हे असले काही करू नकोस हं." ती चिडून बोलली.

"म्हणूनच तर हसत आहे. आता पुन्हा ती कॅन्सल करायला काय कारण सांगायचं याचा विचार करत होतो."

"मी इथे रडतेय आणि तुला चेष्टा सुचतीय?",ती रागाने बोलली.

"रितू, माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलणारी तू अशी गप्प झालीस. फोनवर तुझ्याशी बोललो तर जीव तुटला माझा. कधी इतका कुणासाठी हळवा झालो नव्हतो. मी आधीच म्हटलं होतं ना? हे प्रेम वगैरेंच्या भानगडीत पडायचचं नसतं. नसते व्याप. तू येशील म्हणून रोज ऑफिसला जायचो. तुझ्या मैत्रिणीशी बोलायचो. तुझीच आवडती भाजी खायचो आणि तुझीच आवडती गाणी ऐकायचो. हे सर्व थांबवायला हवं असं अनेकवेळा वाटलं पण जमलं नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण इतक्या वर्षांत जे अनुभवलं आहे, ज्यातून गेलो आहे ते सर्व विसरणं अवघड होतं.

काय केल्यावर हे विचार थांबतील कळत नव्हतं. शेवटी बदली मागून घेतली. पुन्हा पूर्वीसारखं होण्यासाठी. जरा चार दिवस उशिरा आली असतीस तर मग टाळेच असते दाराला. हे बघ, ती सीडी वरच ठेवली होती. तुला द्यायला आणली होती वाढदिवसाला. पण मीच रोज रात्री ऐकत होतो." त्याचा रडवेला चेहरा पाहून तिला पुन्हा भरून आलं.

"पण मला हे सर्व थांबवायचं आहे. एका ठिकाणी, एका गावात, एका घरात, कायमचं राहायचं आहे. तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे. आपण जी काही स्वप्नं पाहिली ती सर्व पूर्ण करायची आहेत. हे असं पुन्हा कधीच सोडून जायचं नाही आणि चिडूनही. नक्की ना?" त्याने तिच्या डोळ्यांत पाहून विचारलं विचारलं आणि तिनेही त्याला मिठी मारून होकार दिला.कितीतरी वेळ दोघे तसेच बसून राहिले.

थोड्या वेळाने थोडं शांत झाल्यावर तिने ती सीडी हातात घेतली आणि सिस्टीम मध्ये टाकली. सीडी कव्हरवर तिच्यासाठी 'हैप्पी बर्थडे' लिहिलेलं त्याचं अक्षर दिसलं. 'वेडा कुठला' म्हणत तिने त्याच्या खांदयावर मान ठेवली. सीडीमधलं पहिलंच गाणं सुरु झालं होतं.

"हम तेरे बिन अब रह नहीं सकते

तेरे बिना क्या वजूद मेरा

क्यों के तुम ही हो,

अब तुम ही हो...... जिंदगी अब तुम ही हो..... "

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मागचे सगळे भाग खरे वाटले...पण हा थोडा मेलोड्रमॅटिक.....हा भाग वाचुन अस वाटल की प्रत्यक्षात अस झाल असतं का ? कारण असं माहिनाभर फोन ही न करणं, नन्तर एकदम जाणीव तीव्र होणं...अस होतं का खरच?
कदाचित होत असेलही...

सुखांत असलेली एक् सुन्दर कथा सादर केलीस ह्या साठी खूप धन्यवाद, विद्या.

छान..!!! खुप म्हणजे खुपच गोड होती कथा...!! आवडली...!! जास्त ताणली नाही आणि पटपट भाग आले, त्यामुळे कथेची लिन्क तुटली नाही, म्हणुन कथा वाचताना, कथेतला इन्टरेस्ट टिकुन राहीला...!!! असेच लिहीत रहा...!!! पुढील लेखनास आणि भावी वाटचालीस माझ्याकडुन भरपुर शुभेच्छा... आणखीन एका नविन कथेची आपल्याकडुन अपेक्षा...!! आतुरतेने वाट पाहीन..... Happy

Haa bhag somehow PaTala nahi yevadha .
Mhanaje may be mazya vichar karayachya paddhatee mule asel.
Mhanaje if I m in love - thr is no holding back.. nantar kaay hoil the hoil types.
Ekun avadali katha. Happy

बिलकुलच नाही आवडले शेवटचे दोन भाग.

जेंव्हा वाटलं दूर केलं जेंव्हा वाटलं जवळ केलं - इतकं गृहीत धरणे अजीबातच नाही आवडले.

आनंदने रीतूच्या बाबतीत असे केले असते तर आवडले असते का ? Wink

कथा क्युट होती. Reality अशी असली तर मजा येईल.

नायिकाप्रधान कथा आहे त्यामुळे फक्त तिचा आणि तिच्या फॅटसीज चा विचार केलाय. नायकावर अन्याय झाला आहे बहुतेक. वाचायला जाम मजा आली. एखादी romcom बघितल्यासारखं वाटलं.

Kinda she's not that into you types. (हे type करायला
पण किती छान वाटलं)

मला ही कथा ईतकी नाही आवड्ली.
जेंव्हा वाटलं दूर केलं जेंव्हा वाटलं जवळ केलं हे पटतच नाही..
नायिका प्रधान कथा आहे. हो तरी पण नायकाच्या मनाचा काहीच विचार नाही..
ईतके दिवस फोन ही करत नाही..असं कधी होतं का?

त्यामुळे फक्त तिचा आणि तिच्या फॅटसीज चा विचार केलाय. >>> बापरे! फँटसी असली तरी दुसर्‍याच्या भावनांचा कणभरही विचार नाही? काही तरी सबळ कारण असल्याशिवाय पटणे आणि मान्य करणे अवघड आहे.

छान

प्रेम आणि ते निभवण्याची जबाबदारी हे तिला आजमावून पाहायचं असेल पण म्हणून मुलं बघण्याचा प्रोग्राम पण? रितू नी खुप लिबर्टी घेतली आणि आनंद च्या भावनांचा फारसा विचार केला नाही...
विद्या तुमचा विचार ऐकायला आवडेल या बाबतीत

सर्वात आधी सर्वांचे मनापासून आभार. Happy गोष्ट कशीही असो, आवडो, न आवडो, तुमच्या प्रोत्साहनामुळे मी इतके भाग लिहू शकले हेच माझ्यासाठी खूप आहे. Happy सो.. थँक यू ऑल. स्पष्टीकरण द्यायचा मोह टाळणे अतिशय अवघड काम आहे माझ्यासाठी तरी.. त्यामुळे देत आहे... Happy

प्रत्येक नात्यात दोन लोक असतात, एक प्रेम करणारा आणि एक प्रेम करून घेणारा(त्यांचं प्रेम असलं तरी जरा कणभर पहिल्यापेक्षा कमी असतं.) मी माझ्या मैत्रिणीला नेहमी म्हणायचे तू पहिल्या टाईपच्या माणसाशी लग्न कर, ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे. पण माणूस त्याच व्यक्तीकडे जास्त जातो जो त्याला जास्त आवडतो.

यामध्ये ज्याचं प्रेम जास्त तो जास्त व्यक्त करतो आणि सहनही. पण नात्यातले बरेचसे निर्णय कणभर कमी प्रेम असणाऱ्या व्यक्तीचे असतात. ब्रेक घेऊया म्हणणारे किंवा मुलगा बघून जाऊ दे ना(आईवडिलांच्या भीतिमुळे का होईना) असे म्हणणारे, लोक या प्रकारात मोडतात. आणि त्यांना एखाद्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं तर त्यांच्या शंका अजून बळावतात. अशा वेळी त्यांच्या मागे लागणे म्हणजे त्यांच्या त्या नात्याबद्दलच्या शंकेला अजून वाव देण्यासारखं असतं. ते लोक आपला वेळ घेतातच कुठलाही निर्णय घेताना.

आणि हे फिल्मी डायलॉग नाहीये. हे माझे निरीक्षण आहे बऱ्याच लोकांना पाहून केलेले, गेल्या १०-१५ वर्षातील. कितीही वाटलं तरी दोघांचं सेमच प्रेम असणं खूप कमी पाहिलं आहे. प्रेमात वेडी होऊन मुलाच्या मागे फिरणारी मुलगीही असतेच आणि तिला भाव न देणारा मुलगाही. त्यामुळे 'Its not fair to him' असे वाटले तरी ते 'अशक्य' वाटले नाही. आणि आपल्याला आजकाल खरंच इतकी घाई झालेली असते सर्व गोष्टींची की, १ महिना फोन न करता राहिले म्हणजे प्रेम संपलं किंवा 'ती असं कसं करू शकते' असं वाटतं. इंस्टंट रिऍक्टशन ची किती सवय झालीय आपल्याला. Happy

असो.

भेटूच पुढची कथा लिहिल्यावर... Happy

विद्या.

तुमची लिहिन्याची पद्धत आवडली...खुप उत्सूकतेने सगळे भाग वाचलें
मागच्या काही भागातला "आनंद" आवडला प्रेग्नसी च्या बाबतीतली त्याची भूमिका खूप तटस्थ वाटली Sad
त्यामध्ये त्याचा ही तेवढाच सहभाग होता, पन निर्णय घेन्यमध्ये त्याने तिला एकटे सोडले असे वाटले Sad

खूप छान लिहिले आहे !! लिहीत रहा !!

विद्या तुमचं निरिक्षण मस्त च !

प्रत्येक नात्यात दोन लोक असतात, एक प्रेम करणारा आणि एक प्रेम करून घेणारा >> खरच ! कदाचित ह्यात ही रोल एक्सचेंज होत राहातो बहुतेक!

आपल्याला आजकाल खरंच इतकी घाई झालेली असते सर्व गोष्टींची की, १ महिना फोन न करता राहिले म्हणजे प्रेम संपलं किंवा 'ती असं कसं करू शकते' असं वाटतं. इंस्टंट रिऍक्टशन ची किती सवय झालीय आपल्याला. >>

सहमत. पण मोबाइल च्या जमान्यात रोजच्या सानिध्यातल्या माणसासोबत असा अचानक, छोटा का असेना पण दुरावा जस्टिफायेबल वाट्ला नाही. पण इंस्टंट रिऍक्टशन सवय हे एकदम खरय...आता असं अचानक बोल्णं खुंटले तर मोठे निष्कर्ष काढले जातात...आनंद ला ही सगळे संपले असही वाटले असेल?

Happy विद्या...तुझं निरीक्षण खरंय....हे माझ्या लक्षात आले नव्हते.....इतके दिवस!
आणि आनंद ची भूमिका मला तर अगदी पटली....म्हणजे त्याने तर बेबी ठेवून लग्नच करायचा निर्णय घेतला होता नं...नॉर्मली, मुलं हे समहाऊ अ‍ॅबॉर्शन ला जास्त प्रिफर करतात.
पण त्याने शांतपणे तिला विचारलं! आणि रितू च्या पात्राचं या बाबतीत मला कंफर्म राहणं पण खूप आवडलं! कारण निर्णय डळमळीत होणं..एकमेकांना दोष देणं, तूच इंसिस्ट केलं....तुलाच नको होतं हे मूल...इथवर बाबी येणं...हे कॉमन ली होऊ शकलं असतं ना!
कदाचित इतकी सरळ, एकमार्गी, एक शब्द ठरला म्हणजे ठरला...असा विचार करणारी लोकं कमी भेटली मला.

मला लेखिकेची भुमिका/विचार वाचायला आवडतं, म्हणून मी पुस्तकाची प्रस्तावना कधीच मिस् नाही करत...

धन्यवाद विद्या तुम्ही तुमचा विचार उलगडून सांगितलात !

कुरुडी विचारलेत आणि प्रतिक्रियाही दिलीत. छान. Happy प्रत्येक्जण इतका प्रयत्न करतोच असे नाही.

आ.गो. Happy तुमचे विचार स्पश्ट करून मान्डले. धन्यवाद. Happy

Mast

Pages