बंधन

Submitted by सुमुक्ता on 6 December, 2016 - 06:30

विद्यापीठाच्या तिच्या छोटेखानी क्वार्टरचे कुलूप उघडून मेधा आत आली. कपडे बदलून कॉफीचा एक मग घेऊन ती तिच्या स्टडी मध्ये आली. पण आज तिचं मन कामात लागणार नव्हतं. मग तशीच उठून बाल्कनी मध्ये जाऊन उभी राहिली. अजूनही संधीप्रकाश होता पण दूरवर विद्यापीठातील काही इमारतींचे दिवे हळूहळू लुकलुकयाला लागले होते. अशा कातर वातावरणात तिचे मन उदासीने आणखीनच भरून गेले. खरेतर आज तिच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल मिळणारा भारतातील मानाचा भटनागर पुरस्कार तिला मिळणार अशी ई-मेल तिला आज सकाळीच मिळाली होती. इतक्या वर्षाच्या मेहनतीचे फळ तिला आज मिळाले होते. दिवसभर विद्यापीठात होणाऱ्या अभिनंदनाच्या वर्षावाने तिचे मन गुदमरून गेले होते . सतत अभिनंदनाचा स्वीकार करून मेधा थकून गेली होती होती. खूप आनंदाचा दिवस असूनसुद्धा मेधा मात्र उदास होती. तिचे मन भूतकाळाचाच ठाव घेत होते. एवढ्या मोठ्या पुरस्कारानंतर कौतुकाने पाठ थोपटायला आज तिचे आई-वडील हयात नव्हते आणि अभिजित कुठे होता हेच तिला माहित नव्हते.

सतरा अठरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आज तिला पुन्हापुन्हा आठवत होता. अभिजीतची आणि तिची पहिली भेट. तिच्या बालमित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती. तिच्या मित्राचे मेडिकलचे मित्रमैत्रिणी पार्टीला येणार होते त्या सगळ्यांमध्ये ती थोडी वेगळीच दिसली असती. पण मेधा लाजरीबुजरी कधीच नव्हती. तिच्या अफाट वाचनामुळे तिचे सामान्य ज्ञान वाखाणण्याजोगे होते. आणि त्यामुळे कोणत्याही गप्पांमध्ये सहज भाग घेण्याची तिची हातोटी होती. त्या पार्टीत गणित विषयात उच्चशिक्षण घेणारी मेधा अगदी सहज मिसळली. पण तिची खरी तयार जुळली अभिजीतबरोबर. अगदी तिच्याचसारखे वाचनाचे वेड असणारा अभिजीत तिला प्रथम भेटीतच खूप आवडला. अभिजीतलासुद्धा तिच्यामधील हुशारी आणि आत्मविश्वास खूप आवडला. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुस्तकांच्या देवाणघेवाणीसाठी, वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी फोन आणि भेटींचे प्रमाण वाढत गेले. आणि ह्याच भेटींचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. कॉलेज आणि अभ्यास सांभाळून दोघे जमेल तसे एकमेकांना भेटू लागले.

यथावकाश अभिजीत डॉक्टर झाला आणि एका प्रथितयश हॉस्पिटलमध्ये कामाला लागला. मेधानेसुद्धा पुढील शिक्षण घेण्यास आणि संशोधन करण्यास चालू केले. आता मात्र अभिजीतच्या आईवडिलांनी लग्नासाठी त्याच्यामागे तगादा लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अभिजीतने दुर्लक्ष केले पण रोजच्यारोज तीच चर्चा आणि आईचे वेगवेगळी स्थळे घेऊन येणे ह्या सगळ्याला अभिजीत कंटाळून गेला. आज मेधाला लग्नाचे विचारायचेच असे ठरवून अभिजीत तिला भेटायला गेला.

"मेधा, बरेच दिवसापासून माझ्या मनात एक विचार येतो आहे. आज तुला सांगायचं आहे"

"हम्म्म बोल"

"आईबाबा लग्नाचा तगादा लावत आहेत."

"मग करून टाक लग्न. तुझ्यासारख्या डॉक्टरच्या गळ्यात माळ घालायला कोणीही मुलगी एका पायावर तयार होईल"

"अगं गम्मत नाही करत मी." अभिजीत जरा वैतागला.

मेधा काहीच बोलत नाही हे पाहून अभिजीतने मनाचा हिय्या करून एका दमात विचारले

"मेधा माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील का ?"

मेधाला हे सगळं इतक्या लवकर आणि सहजपणे होईल असं वाटलंच नाही. एवढ्यात लग्न करण्याची तिची तयारी नव्हती. अजून थिसीस पूर्ण व्हायचा होता. तिचे आईवडीलसुद्धा तिच्या लग्नाचा विषय काढत नव्हते आणि मध्येच अभिजीतने हे काय विचारलं?

"अभिजीत, आर यु जोकिंग? तुला माहित आहे अजून माझा थिसीस पूर्ण व्हायचा आहे. पुढचे तीनचार वर्षे तरी माझा लग्नाचा विचार नाही"

"तू नकार देते आहेस का?"

"तसं नाही रे. पण तुला माहितेय ना...... " अभिजीतच्या चेहेरा पाहून मेधाला कसेसेच झाले "माझंसुध्दा प्रेम आहे तुझ्यावर. पण एवढ्यात लग्न वैगेरे. मी विचारच केला नाहीये रे"

"अंग तुझ्या करियरच्या आड यायचं नये मला/ हवंतर तुझा थिसीस झाला की मग लग्न करू. पण आता आईबाबांना काहीतरी उत्तर देणं मला भाग आहे"

"ठीक आहे. मला थोडा वेळ दे."

मेधाने वेळ मागून घेतला असला तरी तिला उत्तर माहित होते. अभिजीतशिवाय दुसऱ्या कोणाचाही ती विचार करू शकत नव्हती. तिचा थिसीस होईपर्यत थांबायला अभिजीत तयार होता मग हरकत घेण्याचे काही कारणच नव्हते. तिने घरी गेल्यागेल्या अभिजीतला फोन करून तिचा होकार कळविला पण तिचा थिसीस होईपर्यत थांबायची अट घालूनच. लग्न ठरले, घरच्यांचा होकार मिळाल्यामुळे हिंडण्याफिरण्याचे प्रमाण वाढले. अभिजित नोकरी करताकरता हळुहळु समाजसेवा करू लागला. त्याने गोरगरिबांना फुकट वैद्यकीय सेवा देणे चालू केले. अभिजीतचे मत स्पष्ट होते -- स्वत:चा चरितार्थ चालाविण्याकरिता नोकरी केली तरी समाजाचे आपण देणे लागतो आणि वैद्यकीय व्यवसाय तर नोबल प्रोफेशन म्हणून ओळखला जातो तेव्हा आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना व्हायला हवा. अभिजितच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू मेधासाठीसुद्धा नवीन होता. पण त्याच्या ह्या विचारांमुळे ती अधिकच त्याच्या प्रेमात पडली

तीन वर्षांनंतर मेधाचा थिसीस पूर्ण झाला. मेधाला विद्यापीठात संशोधक म्हणून तात्पुरती नोकरी मिळाली आणि मेधा-अभिजीत लग्नाच्या बंधनात अडकले. नव्या नवलाईचे दिवस सरले. लग्न झालं आता मुले हवीत म्हणून दोघांच्याही आईबाबांनी सुचवून पहिले. पण सध्या करियर महत्वाचे म्हणून दोघांनीही ह्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले. अभिजीतच्या हॉस्पिटलचे काम वाढायला लागले. मेधा विद्यापीठात प्राध्यापकपद मिळावे म्हणून झटायला लागली. खूप स्पर्धा होती पण ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती. आपापल्या करियरवर दोघांचाही फोकस वाढू लागला. खरेतर कामामुळे एकमेकांना देण्यासाठी वेळ कमी पडत होता पण जो वेळ होता तो ते एकमेकांच्या सहवासात आनंदात घालवीत होते. आपल्या करियरबद्दल, स्वप्नांबद्दल दोघेही भरभरून एकमेकांशी बोलत होते.

हळूहळू मेधाला जाणवले की अभिजीत शहरातील कामाला कंटाळला आहे. नोबल प्रोफेशन म्हणून डॉक्टर झालेल्या अभिजीतला इथे नोबल काहीच दिसत नव्हतं. थोडीफार समाजसेवा इथे करता आली तरीही आपली खरी गरज खेडेगावांमध्ये आहे हे त्याला जाणवायला लागले होते. अभिजीतची निराशा वाढतच होती त्यातच मेधाचा विद्यापीठातील करार संपला. विद्यापीठाने पुन्हा करार करावा ह्यासाठी मेधा प्रयत्न करत होती पण विद्यापीठातील तिच्या प्रकल्पासाठी असलेला निधी आता संपला होता. दुसरा प्रकल्प चालू झाला की तुला बोलावू असे मेधाच्या बॉसने सांगितले. आता मेधाकडे नोकरी नव्हती. अभिजीत आणि मेधा करियरच्या अतिशय अवघड वळणावर होते. त्यातच अभिजीतने आसपासच्या खेडोपाडी डॉक्टरांची काय गरज आहे, काय काम असेल, काय वातावरण असेल ते चाचपडायला चालू केले. आणि एक दिवस तो हॉस्पिटलची नोकरी सोडून घरी आला. जवळच्या खेडेगावातील सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून कामाला लागला. मेधालासुद्धा नोकरी नव्हतीच त्यामुळे तीही अभिजीतबरोबर राहू लागली.

सरकारी दवाखान्यात काम करण्याबरोबरच अभिजीत जवळपासच्या खेडोपाडी जिथे सरकारी दवाखाना अथवा डॉक्टर नाही अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यास जाऊ लागला. मेधाला जवळच्या तालुक्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. अभिजीत खूप खूष होता. कधी नव्हे तो आनंद त्याला त्याच्या कामांमधून मिळत होता. खूप काम असल्यामुळे हळूहळू अभिजितजवळ मेधासाठी वेळ राहीनासा झाला. मेधाला प्राध्यापकपद मिळाले असले तरीही तेथे तिला तिच्या आवडीचे संशोधन करण्यास पुरेसा वाव नव्हता. मेधा उदास राहायला लागली. आपण ज्या कारणासाठी एवढे शिक्षण घेतले त्या कारणासाठी आपण त्याचा उपयोग करत नाही अशी खंत तिला वाटायला लागली. त्यातच अभिजित प्रचंड व्यस्त राहू लागला. हळूहळू मेधाच्या उदासीचे रूपांतर चिडचिडीत होऊ लागले. मेधा आणि अभिजीत भेटले की त्यांचे फक्त वादविवाद होऊ लागले. अशाच एका रात्री मेधा आणि अभिजीत वाद घालत बसले होते

"मेधा तुला संशोधन करायला कोणी अडवलं आहे का? पण इथे राहून थोडंफार जे करता येईल ते कर. इथल्या कॉलेजमध्येसुद्धा तुझ्यासारख्या हुशार प्राध्यापकाची गरज आहेच की"

"अभिजीत अरे थोडंफार काय असतं?? मला कबूल आहे की इथल्या कॉलेजमध्येसुद्धा प्राध्यापकांची गरज आहे. पण तसंच ह्या देशात संशोधकांची गरज नाहीये का? एकप्रकारे ते सुद्धा महत्वाचं आहेच"

"मग काय करायचं?? असं करूयात का? मी पुन्हा शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी धरतो आणि तू तुला हवी ती नोकरी कर. आणि मी हे रागावून म्हणत नाहीये. खरंच सांगतोय. मला जसं जमेल तसं खेडोपाडी मी काम करीन."

"नाही अभिजीत. ते तुझ्या मनाविरुद्ध असेल. इथल्या कामामुळे तुला किती आनंद मिळतो आहे ते मी पहाते आहे. तुला दु:खात टाकून मी आनंद कसा मिळवू?"

"अगं मग काय करायचं? आहे त्या परिस्थितीत मार्ग काढायला नको का? एकानी कुणीतरी पाऊल मागे घ्यायलाच हवं. आणि ते तू घे असा माझा मुळीच आग्रह नाही."

"नाही. मनाविरुद्ध काम करायला लागलं की काय वाटतं ते माहित आहे मला. आणि मी तुला ते का करायला लावू?
माझं प्रेम आहे तुझ्यावर. एकमेकांबरोबर राहून आपण आपली स्वप्नं पूर्ण करू शकत नाही का रे?"

ह्या प्रश्नावर अभिजीत आणि मेधा दोघांकडेही उत्तर नव्हतं. मेधाचं आधीच सैरभैर असलेलं मन अजूनच बावचळून गेलं. अभिजीतवरचे प्रेम आणि करियर ह्यात काय निवडायचे हा निर्णय तिला करता येत नव्हता. अभिजीतचे प्रेम निवडले तरी आनंदानी आपली स्वप्ने विसरून त्याच्याशी संसार करता येईल ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. रोजच्या रोज वाद घालून एकत्र राहण्याला संसार कसे म्हणायचे? करियर निवडले तर अभिजीतशिवाय राहता येईल अशीही खात्री वाटत नव्हती. यशाच्या शिखरावर पोहोचता आले आणि जोडीदार नसेल तर त्या यशाचा काय आनंद? अभिजीतला शहरात यायला सांगायचे तर त्याच्या मनाविरुद्ध त्याला इकडे खेचून आणायचे आणि दररोज स्वत:ला दोषी मानत जगायचे हेसुद्धा तिला कबूल नव्हते. नुसता विचार करून तिच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली. तिकडे अभिजीतची अवस्थाही काही वेगळी नव्हती. तिच्या हुशारीला आपल्यामुळे ग्रहण लागलेले त्याला नको होते. तिच्यासाठी स्वत:ची स्वप्ने विसरून तो शहरात जायला तयार होता पण ह्या गोष्टीलाही तिची तयारी नव्हती. तिला काय हवे होते हा निर्णय तिला घेता येत नव्हता आणि अशा परिस्थितीत आपण काय करायला हवे हे अभिजीतला कळत नव्हते.

एक दिवस मेधाला एका विद्यापीठातून प्राध्यापकपदासाठी बोलावणे आले. तिच्या संशोधनासाठी खूप चांगली संधी ह्या विद्यापीठात मिळणार होती. तिने अभिजीतला सांगितले आणि एका क्षणार्धात अभिजीत म्हटला

"जाऊया आपण"

"अरे पण तुझे काम तुला तिथे करता येणार नाही. त्यामुळे मी ह्या विद्यापीठाला नकार द्यायचा ठरविला आहे "

"मेधा, अगं इतक्या दिवसांनी मनासारखं काम करायची संधी मिळते आहे. नकार देऊ नकोस. आपण जाऊया"

मेधाची द्विधा अभिजितला समजत होती. त्यामुळे ह्या परिस्थितीत अभिजीतला एकच मार्ग सुचत होता. तो मेधाला म्हटला

"बरं मग असं करूयात. तू जा, मी इथेच राहतो. तू तिथे नीट स्थिरस्थावर हो पुढे बघू काय करायचं ते"

मेधाला पटलं आणि नवीन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून मेधा रुजु झाली. एका छोटेखानी क्वार्टरमध्ये तिनी तिचा संसार थाटला आणि मन लावून काम करण्यास चालू केले. मेधा खूप खूष होती, तिच्या आवडीचे विषय शिकविणे, संशोधन करणे आणि फावल्या वेळात अवांतर वाचन करणे तिनी चालू केले. अभिजीत महिन्यातून १-२ वेळेला तिला भेटायला येत असे. तीसुद्धा वेळ मिळेल तसे त्याच्याकडे जाऊन राहात असे. दोघांचे रुटीन अगदी व्यवस्थित चालू झाले. मेधा नसल्यामुळे अभिजीतने आता सरकारी दवाखान्यातील काम कमी केले वेगवेगळ्या ठिकाणी हिंडूनफिरून आपली समाजसेवा चालू केली. काही दिवसांनी दोघांनाही हे आयुष्य आवडायला लागले. इतरांसारखा आपला संसार नाही ह्याची दोघांनाही कल्पना आली होती पण संसारासाठी एकाने स्वतःच्या स्वप्नांचे बलिदान देण्यापेक्षा लांब राहून आनंद मिळविणे त्यांना आवडत होते. त्यांचे वादविवाद बंद झाले आणि एकमेकांबरोबर असणारा वेळ ते आनंदात घालवू लागले. पण वर्षभरात दोघांच्याही कामाचा व्याप वाढला आणि एकमेकांना अजिबातच वेळ देणे त्यांना शक्य होईना. अभिजीतला वेळ असला की मेधाचं कोणत्याश्या कॉन्फरन्समध्ये गुंतलेले असणे आणि मेधाला थोडा वेळ असला की अभिजित इमर्जंसी असणे वाढू लागले. त्यांचे एकमेकांकडे जाणेयेणे सुद्धा कमी झाले. भेट होत नसली तरी जेव्हा अभिजीतला जमेल तेव्हा फोनवर गप्पा होतंच होत्या.

वेगळे राहत असल्यामुळे मुले वैगेरेचा प्रश्नच नव्हता. उगीचच गुंतागुंत वाढविण्यात त्यांना अर्थ वाटत नव्हता. दोघांच्या ह्या निर्णयाला त्यांच्या आईवडिलांचा मात्र कडाडून विरोध होता. मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा मेधा-अभिजित गॉसिपचा एक विषय झाले होते. दोघांचा घटस्फोट झाल्याच्या खोट्याच बातम्या त्यांच्या नातेवाईकांमध्ये पसरत होत्या. ह्या सगळ्याला वैतागून दोघांनीही नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. आईवडिलांची मात्र सणावाराच्या निमित्ताने भेट होत होती आणि भरपूर बोलणी खायला लागत होती. दोघांनी एकत्र राहून संसार करावा म्हणून आईवडील सतत मागे लागत होते. अशा परिस्थितीतसुद्धा त्यांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. दोघांनीही ह्या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष करायचे ठरविले. एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती. वर्षाकाठी ज्या एक दोन भेटी होतील त्यात वर्षभराच्या गप्पागोष्टी करणे आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून राहणे हे त्यांना अजूनही करता येत होते.एकमेकांची कामातील प्रगती आणि एकमेकांचा आनंद बघून ते दोघेही खूष होत होते.

आज एवढ्या मनाचा पुरस्कार प्राप्त झाल्यावर मेधाला अभिजितशी भरभरून बोलायचे होते. तिने त्याच्या मोबाईलवर मेसेज पाठवायला, त्याला ई-मेल पण केली पण जिथे तो होता तिथे कदाचित ना इंटरनेटची सुविधा होती ना फोन ना मोबाईलचे रेंज. नाहीतर त्याने लगेचच तिला फोन केला असता. मेधाला अजूनच उदास वाटायला लागले. कधीही न रडणाऱ्या, न हरणाऱ्या मेधाच्या डोळ्यात आज अश्रू होते आणि मनात हरल्याचे दु:ख. एवढी प्रगती केली पण आज आपले कौतुक करायला कोणीच नाही ह्या विचारांनी ती सैरभैर झाली. इतके दिवस आपण वेगळे राहून संसार करायचा निर्णय घेतला तो योग्यच आहे हे तिला ठामपणे वाटत होते. पण आज मात्र तिला हा निर्णय चुकला की काय असे वाटायला लागले. पुन्हापुन्हा भूतकाळातील घटना आठवून काय चुकले काय बरोबर ह्याचा हिशोब ती मांडत बसली होती. अभिजीतच्या आठवणीने तिला रडू येऊ लागले. आईवडिलांनी सतत एकत्र राहून संसार करा हे बजावले होते. त्यांचे ऐकले नाही ते चुकले का? आज तर ते दोघेही हयात नाहीत. अभिजीत कुठे आहे माहित नाही. मग आता कोणाला विचारू की काय चुकले? विचार तिची पाठ सोडत नव्हते. तिला कळत नव्हते एवढ्या खंबीर असणाऱ्या आपण आज पार मोडून कसे काय गेलोय. खरेतर तसे कोणते कारण नाही. ह्याआधीही असे आनंदाचे प्रसंग येऊन गेलेच की जे आपण एकटीनेच साजरे केले होते. अभिजीतला अनेक पुरस्कार मिळले तेव्हा मी तरी त्याच्याबरोबर कुठे होते? आजच असे का वाटते आहे ? एवढ्या तरुण वयात अशी अवस्था झाली आहे. मग उभं आयुष्य एकटीने कसे काढणार? म्हातारपणी कोणाची तरी साथ हवी असे आईबाबा म्हणत होते ते बरोबरच होते. पण आता दोघे आपापल्या वाटांनी एवढे पुढे गेलो आहे की परतीची वाट बंद झाली आहे.

तिच्या विचारांची मालिका फोनच्या आवाजाने भंगली. सावकाश उठून तिने फोन उचलला आणि तिच्या चेहेऱ्यावरचे भाव झरझर बदलायला लागले. अभिजीतचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असलेल्या कानांची तृप्ती झाली होती. मोबाईलवर मेसेज वाचल्या वाचल्या अभिजतने लगेचच अभिनंदनाचा फोन केला होता. त्याला खूप आनंद झाला होता. ती मात्र फोनवरच हमसून हमसून रडायला लागली. मनातलं सगळं सगळं भडाभडा बोलली. सगळे बोलल्यानंतर तिला थोडे बरे वाटायला लागले. अभिजित शांतपणे ऐकून घेत होता. तिचे बोलून झाल्यावर तो म्हणाला

"अगं चारचौघांसारखा आपला संसार नसणार आहे हे आधीच आपल्याला माहित होतं. मग असं करून कसं चालेल ? शरीराने आपण दूर असलो तरी मनाने जवळच आहोत. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून आपण आपलं नातं इतकं छान जपलं . एकेमकांच्या जवळ राहून वादविवाद करून एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा आपण आपल्या मनातलं प्रेम जपलं. ते प्रेम मोठं की सहवास मोठा हे तूच ठरव. आपलं लग्न हे समाजानी आपल्यावर लादलेलं बंधन नाहीये मेधा. ते आपल्या दोघांच्या मनांचं बंधन आहे"

त्यानंतर कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांशी बोलत राहिले. अभिजीतचा फोन ठेवल्यानंतर तिच्या मनात भूतकाळाचा मागमूसही नव्हता. उद्याच्या लेक्चरची आखणी तिने मनातल्या मनात करायला चालू केली. अभिजीतसुद्धा उद्याच्या कामांची यादी करण्यात गर्क झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान कथा .. आवडली ..मेधाच्या मनातील तळमळ छान व्यक्त झाली आहे.अशाच छान कथा लिहित रहा.

धन्यवाद Shaila Mandave. मी "Gently Falls Bakula" वाचलेले नाही. आता निश्चित वाचेन.

सुमुक्ता, खूप छान जमलिये गोष्टं. अगदी इथला-तिथला असाच प्रॉब्लेम आहे गोष्टीत. पण मानवी मनाची गुंतागुंत खूप छान मांडलीये शब्दांत.

धन्यवाद दाद, आशिका, मंजूताई आणि अमोल. एवढ्या सर्वांना कथा आवडते आहे हे पाहून मला कथालेखनासाठी हूरुप आला आहे Happy

Pages