
'मोहम्मद रफी' हे वादळ आहे वादळ... किंबहूना एक खूळ आहे... जे एकदा डोक्यात शिरलं तर आयुष्यभर बाहेर निघणार नाही. नाहीतर मी लहान असताना इहलोकीची यात्रा संपवलेला हा गायक माझ्या अत्यंत आवडीचा का असावा? खरतर हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला. पण नेमकं उत्तर नाही सापडलं. तसे बरेच धागेदोरे मात्र हाती लागले आणि हळू हळू उलगडलं की त्याची गायनशैली ही अत्यंत भूरळ पाडणारी आहे. वेड लावणारी आहे. धुंद करणारी आहे. स्वतःमधला 'स्व' विसरायला लावणारी आहे.
माझे बाबा तर रफी साठी अत्यंत 'दिवाणे'. बहुतेक त्यांच्यामूळेच हे खूळ झिरपत झिरपत... (झिरपतय कसलं... प्रपातासारखं कोसळतच) मी आणि माझ्या ताईपर्यंत पोहोचलं असावं. घरात कायम जुनी गाणी आणि शम्मी कपूर हेच दोन विषय. तसे इतरही विषय होतेच. छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे इ. पण शम्मी आणि त्याची गाणी ही म्हणजे माझ्या बाबांची दुखरी नस. इतकी की दु:खाच्या सर्व छटांवर शम्मीची गाणी हा रामबाण उपाय.
आता जर आठवायचा प्रयत्न केला की रफीजींचं असं मी ऐकलेलं पहिलं गाणं कोणतं? तर ते सांगणं अत्यंत कठिण आहे. सांगण शक्यही नाही. जन्म झाल्यापासून त्यांची गाणी सतत ऐकत आलेय मी. याच गाण्यांपैकी एखाद्या अंगाईमुळे अनेकदा झोपलेही असेन. बाबा नेहमी 'त्यांचा मृत्यू १९८० साली झाला तेव्हा मी रडलो होतो' असं कित्येक वेळेला सांगायचे. हा सीन हमखास त्यांच एखाद सुंदर गाणं रेडिओवर लागून संपलं की व्हायचा. मला तेव्हा वाटायचं की आपले वडील रफी गेल्यावर का रडले असतील?
तेव्हा उत्तर मिळवण्याइतकी मी मोठी नव्हते. आणि एखाद्या माणसासाठी आपण का रडतो हे आकलन होण्याइतकी बौद्धिक क्षमताही नव्हती माझ्याकडे. पण हा प्रश्न पडायचा हे मात्र नक्की.
आम्ही लहानाचे मोठे झालो ते त्यांची गाणी ऐकत आणि शम्मीची हेलकावे खाणारी मान पहात. लताची सुरेल गाणी गुणगुणत. माझे बाबा किशोर कुमार म्हटलं की थोडे नाराज वाटत... अजूनही वाटतात. पण आम्ही मोठे झाल्यावर मला किशोरजींची काही गाणी अत्यंत जवळची वाटली. ती पण बाबांनी आणलेल्या एका रेकॉर्ड मुळेच. किशोरकुमार नव्हते फारसे आवडत तर ती डिस्क आमच्या घरी का होती? हा प्रश्न आता हा लेख लिहितानाच पडला. 
रफीजी हे 'सिंगर ऑफ द मिलेनियम आहे' आणि त्यांची गाणी ही सर्वात जास्त ऐकली जातात हे एका सर्व्हेमध्ये सिद्ध सुद्धा झालंय. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४०००च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.
पूर्ण नाव - मोहम्मद हाजी अली मोहम्मद रफी.
जन्मतारीख - २४ डिसेंबर १९२४
जन्म ठिकाण - कोटला सुलतान सिंग, जिल्हा अमृतसर, पंजाब
कारकिर्द - १९४४ ते १९८०
मृत्यू - ३१ जुलै १९८०
टोपणनाव - फिको
रफीजींचं जन्मठिकाण 'कोटला सुलतान सिंग' (अमृतसर, पंजाब) (होय, हे एका खेड्याचं नाव आहे.) हेच त्यांचं काही वर्षं वास्तव्यस्थान होतं. पुढे त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबासह लाहोरला स्थलांतरीत झाले. रफीचे वडील हाजीअली मोहम्मद.. तिथे न्हाव्याचे दुकान चालवत. तेव्हा तिथे किंवा संपुर्ण गावात गात फिरणार्या फकिरांची गाणी मोहम्मद रफी पाठ करून गुणगुणत असे. एकूण सहा भावात, रफीचा नंबर ५वा... त्यामुळे बर्यापैकी अंतर. सर्वात थोरल्या भावाच्या मेहुण्याने रफीजीमध्ये असलेली ही कला हेरून, त्याच्या वडिलांना त्यांना मुंबईला पाठवण्याची विनंती केली. इतकंच नव्हे तर ते स्वतः त्यांच्याबरोबर मुंबईत आले. रफीजीचे वय तेव्हा निव्वळ २० वर्षं इतके होते.
शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. त्याचं असं झालं की रफीजी, त्यांचे मोठे भाऊ आणि हमीद हे तिघे एकदा श्रेष्ठ गायक के. एल. सहगल यांच्या कार्यक्रमाला गेले. तिथे काही तांत्रिक अडचणींमूळे लाईट्स गेले. सहगलजींनी लाईटस आणि ध्वनीप्रक्षेपकांशिवाय गायला नकार दिला. दरम्यान वाट पाहून कंटाळलेले प्रेक्षक चूळबूळ करू लागले. तेव्हा हमीदजींनी तिथल्या व्यवस्थापकांना विनंती करून व्यवस्था पुर्ववत होईपर्यंत रफीजींना गाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. नशिब कुठे साथ देईल ते सांगणे कठिण ! कारण त्याच प्रेक्षकांत ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीयुत शाम सुंदर उपस्थित होते. रफीजींना गाताना पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी रफीजींना त्यांच्या सिनेमात गाण्याचे आमंत्रण दिले. हिच त्यांची पहिली व्यावसायिक संधी. पाकिस्तानात तयार झालेल्या 'गुल बलोच' या सिनेमातली तर मुंबईत 'गाँव की गोरी'. या दोन्हीत एकूण चार वर्षांचं अंतर होतं.
१९४४ पासून मोहम्मद रफी व त्यांच्या भावाचे स्नेही हमीद हे मुंबईतल्या भेंडी बाजारात एका दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत रहात होते. 'गाँव की गोरी' हा सिनेमा त्यांना १९४५ मध्ये मिळाला. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या.. अनुक्रमे लैलामजनू व जुगनू अशी त्या चित्रपटांची नावं होती.
एकीकडे चित्रपटक्षेत्रात गायनाला सुरुवात झाली होती आणि दुसरीकडे रफीजींनी आपल्या नात्यातल्या एका मुलीशी लग्न केलं. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय आपलं संपूर्ण कुटुंबही इकडेच स्थलांतरीत केलं. पण त्यांच्या पत्नीने भारतात रहाण्यास नकार दिला. पहिल्या पत्नीकडून रफिजींना एक मुलगा होता. पुढे त्यांनी व हमीदजींनी दोन सख्ख्या बहिणींशी विवाह केला. रफिजींच्या पत्नीचं नाव 'बिल्किस रफी'. रफीजींची राहणी अत्यंत साधी व घरेलू होती. 'घर ते स्टुडिओ' आणि 'स्टुडियो ते घर' असा त्यांचा दिनक्रम असे. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. ते खूप धार्मिक, अतिशय प्रामाणिक व दयाळू होते. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.
१९५२ मध्ये बनलेल्या 'बैजु बावरा' या सिनेमाशी निगडीत एक आठवण आहे. खरंतर यातली सर्व गाणी तलत मेहमूद हे गाणार होते. पण संगीतकार नौशाद यांनी एकदा त्यांना स्टुडिओत धुम्रपान करताना पाहिलं आणि ती सर्व गाणी मग रफीजींना मिळाली. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील.
६०चं दशक हे रफीजींसाठी खास होतं असं मानायला हरकत नाही. त्याच वर्षी (१९६०) मध्ये त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली.
या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी 'मन मोरा बावरा' (चित्रपट - रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' (चित्रपट - शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. पुढे किशोरकुमार यांना अभिनय क्षेत्रात फारसा वाव उरला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गायकावर लक्ष केंद्रीत केलं. ६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना ' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली.
पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. एक लाट आली ती संपूर्ण डायलॉगबाज सिनेमांची. शोले सारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकवर्गांचं सगळं लक्ष वेगळीकडेच वेधलं. मग हे क्षेत्रं डिस्कोने व्यापलं. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाय यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.
चित्रपटक्षेत्रात नेहमीच शांती नांदली असं नाही. तिथेही आपसातले मतभेद हे होतेच. त्याला कोणीही सन्माननिय अपवाद नाहीत. अगदी लताजी, आशाजी सकट. रफीसाहेब सुद्धा त्याचा बळी ठरले होते. लता मंगेशकर या स्वत:चा पगडा ज्या पद्धतीने या क्षेत्रात वापरत, ते अनेकांना खटकत असे. त्यात मोहम्मद रफी हे सुद्धा एक होतेच. अनेक छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. त्या गाण्याचा बाज पाहून सोनिक ओमींनी प्रथम आशा भोसले यांचा विचार केला होता, पण नंतर तो वगळून मग सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले.
थोड्या फार प्रमाणात लताजी आणि रफीजी यांच्यातले मतभेद हे व्यावसायिक पातळीवर कमी झाले/मिटले असं म्हणायला हरकत नाही, परंतू वैयक्तिक पातळीवर मात्र ते कधीच मिटले नाहीत.
रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगितकारांना रफीजींच्या गाण्याचे मानधन देणे परवडत नसे, अशा वेळी ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांच्या (दिग्दर्शक आणि निर्देशक म्हणून) पहिल्या चित्रपटासाठी 'आप के दिवाने' साठी रफीजींनी शिर्षकगीत गायलं. पण गाण्याचं मानधन म्हणून एक रूपयासुद्धा घेतला नाही. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.
आता या लेखातला माझा आवडता टप्पा म्हणजे रफीजींची गाणी आणि गायकी. त्यांनी अनेक कलाकारांना आपला आवाज दिला आणि अगदी भारत भूषणसाठी गायलेल्या 'ओ दुनिया के रखवाले' पासून ते शम्मीसाठी गायलेल्या 'बदतमीज कहो, या कहो जानवर' पर्यंत म्हणा किंवा ऋषिकपूरसाठी 'दर्द्-ए-दिल'.. साठी म्हणा.. प्रत्येक नायकाची अदा, पडद्यावरील त्यांचा वावर, एकूण व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते गायचे.
पण माझं वैयक्तिक मत आहे की त्यांची शम्मीकपूरवर थोडी जास्तच मेहेरनजर होती.
कारण शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील. 'याहू.. चाहे कोई मुझे जंगली कहे' व 'अय्यय्या सुकु सुकु (जंगली)',' लाल छडी मैदान खडी' किंवा 'बदतमीज कहो या कहो जानवर..(जानवर)',' छुपनेवाले सामने आ',' यूं तो हमने लाख हंसी देखे है..(तुमसा नही देखा)'.
असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ.

फक्त शम्मीच असं नव्हे, पण त्याकाळच्या अनेक अभिनेत्यांना रफीजींचा आवाज चपखल बसला. मग ते सुनील दत्तचं 'आपके पेहलू में आकर रो दिये...' असो.. किंवा विश्वजित चं 'पुकारता चला हूं मैं' असो... जॉनी वॉकरचं 'सर जो तेरा चकराये असो... किंवा गुरूदत्तचं 'चौदहवी का चाँद हो..' असो किंवा 'उधर तुम हंसी हो' असो... प्रत्येकासाठी एक विशिष्ट गायनपद्धती. इतकच नव्हे तर 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. बाकीची सर्व गाणी उदा. 'जानेवालो जरा मूडके देखो इधर', 'मेरा तो जो भी कदम है',' कोई जब राह ना पाये' आणि 'राही मनवा दु:ख की चिंता.' ही गाणी सुद्धा प्रचंड गाजली.
या सर्व अविट गाण्यांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ २० वर्षांनी त्यांना 'बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम' हे पारितोषिक देण्यात आलं.
रफीजींनी अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं.
उदा. नौशाद, (एकूण १४९ गाणी पैकी ८१ सोलो होती.) एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदनमोहन, ओ.पी. नय्यर आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे.


रफीजी आपल्या मृत्यूदिनापर्यंत कार्यमग्न होते. ३१ जुलै १९८० या दिवशी रफीजींनी 'आसपास' या चित्रपटासाठी 'तु कही आसपास है दोस्त' हे गाण ध्वनिमुद्रीत केलं आणि संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याच रात्री ८ वाजेपर्यंत ते सर्वांना सोडून अल्लाहला प्यारे झाले.
अनंत पावसकर यांनी त्यांच्या 'आठवणीतली गाणी' या पुस्तकात रफीजींच्या अंत्ययात्रेचे वर्णन असं केलंय की रफीजींच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणतात ...
"१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या ठोक्याला जनाजा उचलला गेला. गर्दी न्यू टॉकिजवरून बडी मस्जिदच्या दिशेने निघाली होती. 'जनाजे नमाज' पढला जात असताना अचानक पावसाचा जोर वाढला. गर्दीतला प्रत्येक जण रडत होता. जणू निसर्गही आक्रंदत होता. अश्रू पुसायची गरज नव्हती कारण पाऊसच त्या अश्रूंना संगे घेऊन त्या मार्गावर भावनातिरेकाचा गलिचा अंथरत होता. कबरीवर माती लोटताना गर्दीने जो हंबरडा फोडला होता, त्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या काळजाचा थरकाप उडवतो. 
रफी साहेब गेले तेंव्हा झालेल्या दूरदर्शन मुलाखतीत जॉनी वॉकर म्हणाले होते, ''मालीश.... तेल मालीश, सर जो तेरा टकराए' ह्या गाण्याच्या आधी रफी साहेबांनी मुद्दाम मला त्यांच्या घरी बोलावून माझ्याशी चर्चा केली. चित्रपटातील माझ्या लकबीचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी ते गाणे गायलं." ही आठवण सांगताना जॉनी वॉकरजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
रफीजींना मिळालेले अॅवॉर्डस -
नॅशनल फिल्म अॅवॉर्ड - क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही.
फिल्मफेअर -
चौदहवी का चाँद हो - चौदहवी का चाँद
तेरी प्यारी प्यारी सुरत को - ससुराल
चाहुंगा मैं तुझे - दोस्ती
बहारों फुल बरसाओ - सुरज
दिल के झरोके में - ब्रह्मचारी
क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही
संगीतावर प्रेम करणार्या या मनस्वी कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा निस्सिम प्रेम केलं. त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी सांगितलय...
"तुम मुझे यूं भुला ना पाओगे
जब कभी बी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे"
प्रलयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पृथ्वीवर चंद्र असेल, सुर्य असेल तसेच 'मोहमद रफी' या गंधर्वाच्या स्वर्गीय आवाजाचे चाहते सुद्धा असतील.
या अमर कलाकाराला माझी ही छोटीशी श्रद्धांजली !!!!
********************************************
माहीती व प्रकाशचित्रं आंतरजालावरून साभार.
********************************************
छान... रफी साहेबांचं निधन
छान...
रफी साहेबांचं निधन झालं त्यावेळी मी दहावीत होतो. कोकणात टी.व्ही.चं आगमन त्यानंतर झालं. त्यामूळे मनोरंजनाची सगळी मदार होती ती फक्त आणि फक्त रेडिओ वर(च). त्यामूळे त्या दिवसांत विविध-भारती, रेडिओ सिलोन आणी ऑल ईन्डीया रेडिओ (ऊर्दू सर्विस) या रेडिओ केन्द्रांनी पै. रफी साहेबांना दिलेली सांगितीक श्रद्धांजली आजही कधीतरी आठवते... त्यातही लक्षात राहीलेली श्रद्धांजली म्हणजे रेडिओ सिलोन वरुन सु-प्रसिद्ध निवेदक मान. आमिन सयानी यांनी दिलेली श्रद्धांजली... सतत तीन आठवडे (फक्त बुधवारीच) हा कार्यक्रम सुरु होता...
त्या नंतर एकदा कुडाळला(च) असताना दूर्-दर्शन वर 'सिद्धार्थ काक'ने बनवलेल्या कार्यक्रमात (सन १९९१-९२) रफी साहेबांच्या एका गाण्याच्या 'लाईव्ह रेकॉर्डीन्ग्'चे काही भाग (कृष्ण-धवल) मी Video Cassette वर उतरून घेतलेले... आणी ते भाग माझ्या इतर संगीत-प्रेमी मित्र-मैत्रीणींना दाखवून उगाच 'जळवण्या'चे केलेले उपद्व्याप आता आठवतायत... दूर्दैव एव्हढंच की पूढे ती Video Cassette पूर्णपणे 'निकामी' झाली, आणी उतरवून घेतलेला 'तो ठेवा' अक्षरशः नाहीसा झाला...
...
मला अत्यंत आवडणारी रफी साहेबांची दोन गाणी म्हणजे -
१> जागी-जागी अँखियोंकी सपनोंमे, जाने क्या-क्या देखा है?... संगीतकार - जयदेव, चित्रपट - माहीत नाही... (कुणाला कल्पना असल्यास सांगा...)
२> न किसीकी आँख का नूर हूं... चित्रपट - लाल किला ...
अतिशय सुरेख लेख
अतिशय सुरेख लेख
दक्षे, मस्त लेख
दक्षे, मस्त लेख
आवडते गायक म्हणून आपण
आवडते गायक म्हणून आपण दहाजणांबरोबर फिरतो, पण फिरुन फिरुन पुन्हा रफिंसोबतच राहतो!>>> परफेक्ट!
जागी-जागी अँखियोंकी सपनोंमे,
जागी-जागी अँखियोंकी सपनोंमे, जाने क्या-क्या देखा है?... संगीतकार - जयदेव, चित्रपट - माहीत नाही... (कुणाला कल्पना असल्यास सांगा...)
>>>
चित्रपटः- बीवी और मकान (१९६६)
'कितनी अंजानी सूरतें लेकर,लबपे जानेसे नाम आते हैं...
जाने कहां देखा हैं, कहां देखा हैं तुम्हें,
जागी जागी अखियोंकी सपनोंमें....'
http://www.youtube.com/watch?v=gFqTFUwfU3Y&feature=related
माहीतीपुर्ण लेख. मलाही याआधी
माहीतीपुर्ण लेख.
मलाही याआधी किशोर कुमार जवळचे वाटायचे. पण आता रफीजीही तितकेच आवडतात.
रफी, परग्रहावरून आपले
रफी, परग्रहावरून आपले सांगीतिक विश्व समृद्ध करायला आलेला माणूस. परमेश्वराला आवाज असेल तर तो रफी सारखा असेल असे म्हटले जायचे. १ ऑग.१९८०, रफीचा जनाजा निघाला, मुसळधार पाऊस होता दूरदर्शनवर दाखवत होते आणि मागे गाणे वाजत होते 'आज पुरानी राहोंसे कोई मुझे आवाज ना दे ..... (आदमी)'. कधीही न विसरण्यासारखा प्रसंग. असे बरेच किस्से आहेत ..... रफीची आठवण जगवल्याबद्दल तुला धन्यवाद! आठवणींच्या मोहोळावर दगड मारलास.....
<<पुरुषांमध्ये रफी हा
<<पुरुषांमध्ये रफी हा अष्टपैलू गायक आणि बायकांमध्ये आशा! असा रफी पुन्हा होणे नाही. >> प्रमोद मी पुर्णपणे सहमत आहे.
सुन्दर लिहीलं आहेस दक्षिणा!!
सुन्दर लिहीलं आहेस दक्षिणा!!
अशोकजी खूप छान माहिती दिलीत.
अशोकजी
खूप छान माहिती दिलीत. रफीसाहेब गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची काही काळ परवड झाली होती हे खरे आहे का ? फिल्मी दुनियेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि सरकारनेही कसलीही मदत केली नाही असं कुठेतरी वाचनात आलं होतं.
त्यांची मुलं आता सेटल झालीयेत हे वाचून समाधान वाटले.
ओ दुनिया के रखवाले, ये महलों ये तख्तों कि दुनिया, क्या से क्या हो गया बेवफा, ओ मेरे जीवनसाथी, तेरी जुल्फों से , एहसान तेरा होगा मुझ पर ही माझी आवडती गाणी आहेत.
याशिवाय सुन सुन सुन जालिमा, अच्छा जी मै हारी चलो, मन रे तू काहे ना धीर धरे, कुहु कुहु बोले कोयलिया ही गाणी देखील जेव्हां कानावर पडतात तेव्हां ऐकाविशी वाटतात. मैने पूछा चांद से.. या गाण्यात रफीचा आवाज फिल्टरच्या अनेक थरातून साखरेचा पाक गाळून घ्यावा तसा मधाळ आणि मुलायम वाटलाय.
तेरी आंखों कि चाहत मे या गाण्याला स्वतः रफी फसले होते अशी वदंता आहे. पण या गाण्याच्या गायकाची माहिती घेऊन त्याला प्रेमाने भेटवस्तू देण्याचं औदार्य त्यांच्याकडे होतं. फिल्मी दुनियेत काही गायकांनी आपल्याला स्पर्धा होईल अशा नव्या गायकांना गाणी मिळू नयेत अशी व्यवस्था केल्याचं ऐकिवात आहे. त्या पार्श्वभूमीवर रफींचं वागणं उठून दिसतं. रफींइतकाच अष्टपैलू , गुणी पण दुर्लक्षित राहीलेला एक गायक आहे.. त्याबद्दल केव्हातरी बोलूयात.
अप्रतिम!!! मोहम्मद रफींचा
अप्रतिम!!!
मोहम्मद रफींचा आवाज कानावर पडला की क्षणभर सगळ विसरुन त्या गाण्यात मन रमुन जात. आणि गाण संपल की परत ते रोजच जिवन सुरु. मग काही काळ अस वाटत राहत की आयुष्य आनंदात जगण कशाला म्हणाव? रोजच्या धकाधकीच्या जगण्याला की त्या काही मिनिटांच्या क्षणांना?
खूप वाचनीय लिहिला आहे हा लेख
खूप वाचनीय लिहिला आहे हा लेख आपण. पण माझे मत असे आहे की रफी साहेबाना जे मिळायला पाहिजे होते, ते श्रेय आज ही त्यांना दिले जात नाही. गुरुदत्त यांच्या सगळ्या चित्रपटात रफी साहेबांची गाणी मस्ट असायची. पण आज ही त्या गाजलेल्या चित्रपटांचे श्रेय रफी साहेबांच्या गायकीला दिले जात नाही.काही वैश्विक सत्य असलेल्या गोष्टी सरळ पणे नाकारल्या जातात. उदा. शंकर जयकिशन, ओ.पी.नय्यर लक्ष्मी-प्यारेलाल. नौशाद यांच्या संगीतात असलेले वर्चस्व नाकारले जाते.तुम्हीही सहमत आहात का या विधानांशी?
छान लेख. आणखी मास्टर
छान लेख. आणखी मास्टर स्ट्रोक्स,
कभी खुद पे कभी हालात पे रोना आया
तुम जो मिल गये हो
दिन ढल जाये
चांद मेरा दिल
आणी खुप सारे.......
जयंती
जयंती
धन्यवाद ट्यागो.....आजच्या
धन्यवाद ट्यागो.....आजच्या दिवशी तुमच्यामुळेच हा धागा वाचायला मिळाला.
धन्यवाद दक्षिणा!!!
शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली.>>>> हे लिहिल्यामुळे खूप खूप धन्यवाद. गुरूच्या नावाशिवाय शिष्याची तारीफ शिष्यालाही आवडत नाही!
<जागी-जागी अँखियोंकी सपनोंमे,
<जागी-जागी अँखियोंकी सपनोंमे, जाने क्या-क्या देखा है?... संगीतकार - जयदेव, चित्रपट - माहीत नाही... (कुणाला कल्पना असल्यास सांगा...>
चित्रपटाचं नाव बाळू जोशींनी सांगितलंच आहे. संगीत हेमंतकुमार. गीत गुलजार
दक्षे, खूप छान लिहिलस.
दक्षे, खूप छान लिहिलस. धन्यवाद!
"तुम मुझे यूं भुला ना पाओगे
जब कभी बी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे">>>>>>>>>.+११११११११११११११११११११११११
प्रलयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पृथ्वीवर चंद्र असेल, सुर्य असेल तसेच 'मोहमद रफी' या गंधर्वाच्या स्वर्गीय आवाजाचे चाहते सुद्धा असतील.>>>>>>>>>>>>>+११११११११११११११११११११११११
या अमर कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली !!!! __________/\__________.
या अमर कलाकाराला माझी
या अमर कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
९२ वी जयंती
९२ वी जयंती
मस्त लिहलयं दक्षिणा. काही
मस्त लिहलयं दक्षिणा. काही ठिकणी तर अगदी अगदी झालं
माझ्या जन्माच्या आधीच रफी या जगामधून गेले होते पण मी वाढले ती त्यांना ऐकतच. तेव्हा आमच्याकडे टेपरेकॉर्डर होता आणि मो.रफी, किशोरकुमार, लता आणि आशा यांच्या खुप सार्या कॅसेट. बाबा रोज सकाळी रफींची गाणी लावत असत त्यातली बहुतेक गाणी तोंडपाठ होती आणि अजुनही आहेत. चौधवी का चांद आणि बहारो फुल बरसाओ; माझे ऑल टाइम फेव्हरेट


मी गाणी ऐकली तर होती पण कधी पाहिली नव्हती त्यावेळेस बाबा त्या त्या गाण्याबद्दल, रफीसाहेबांबद्दल भरभरून सांगायचे आणि नकळत मनात त्या गाण्यांचे चित्रीकरण होऊन जायचे. बहुतेक वेळेस ते चित्रीत गाण्याशी साधर्म्य दाखवणारे असायचे
तेव्हा लहान होती म्हणुन समजत नव्हते पण आता कळतयं की ५ मिनीटे एका जागी शांत न बसणारी मी बाबांकडुन मो.रफी, किशोरकुमार, लता आणि आशा यांच्याबद्दल ऐकताना तसेच त्यांची गाणी ऐकताना कितीतरी वेळ शांत बसुन असायची कदाचित यालाच 'फॅन' म्हणतात.
आवडते गायक म्हणून आपण दहाजणांबरोबर फिरतो, पण फिरुन फिरुन पुन्हा रफिंसोबतच राहतो! >> हज्जारवेळा सहमत.
या अमर कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
Pages