तुम मुझे युं भुला ना पाओगे....

Submitted by दक्षिणा on 30 July, 2012 - 08:36

Rafi1.jpg

'मोहम्मद रफी' हे वादळ आहे वादळ... किंबहूना एक खूळ आहे... जे एकदा डोक्यात शिरलं तर आयुष्यभर बाहेर निघणार नाही. नाहीतर मी लहान असताना इहलोकीची यात्रा संपवलेला हा गायक माझ्या अत्यंत आवडीचा का असावा? खरतर हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला. पण नेमकं उत्तर नाही सापडलं. तसे बरेच धागेदोरे मात्र हाती लागले आणि हळू हळू उलगडलं की त्याची गायनशैली ही अत्यंत भूरळ पाडणारी आहे. वेड लावणारी आहे. धुंद करणारी आहे. स्वतःमधला 'स्व' विसरायला लावणारी आहे.

माझे बाबा तर रफी साठी अत्यंत 'दिवाणे'. बहुतेक त्यांच्यामूळेच हे खूळ झिरपत झिरपत... (झिरपतय कसलं... प्रपातासारखं कोसळतच) मी आणि माझ्या ताईपर्यंत पोहोचलं असावं. घरात कायम जुनी गाणी आणि शम्मी कपूर हेच दोन विषय. तसे इतरही विषय होतेच. छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे इ. पण शम्मी आणि त्याची गाणी ही म्हणजे माझ्या बाबांची दुखरी नस. इतकी की दु:खाच्या सर्व छटांवर शम्मीची गाणी हा रामबाण उपाय.

आता जर आठवायचा प्रयत्न केला की रफीजींचं असं मी ऐकलेलं पहिलं गाणं कोणतं? तर ते सांगणं अत्यंत कठिण आहे. सांगण शक्यही नाही. जन्म झाल्यापासून त्यांची गाणी सतत ऐकत आलेय मी. याच गाण्यांपैकी एखाद्या अंगाईमुळे अनेकदा झोपलेही असेन. बाबा नेहमी 'त्यांचा मृत्यू १९८० साली झाला तेव्हा मी रडलो होतो' असं कित्येक वेळेला सांगायचे. हा सीन हमखास त्यांच एखाद सुंदर गाणं रेडिओवर लागून संपलं की व्हायचा. मला तेव्हा वाटायचं की आपले वडील रफी गेल्यावर का रडले असतील? Uhoh तेव्हा उत्तर मिळवण्याइतकी मी मोठी नव्हते. आणि एखाद्या माणसासाठी आपण का रडतो हे आकलन होण्याइतकी बौद्धिक क्षमताही नव्हती माझ्याकडे. पण हा प्रश्न पडायचा हे मात्र नक्की.

आम्ही लहानाचे मोठे झालो ते त्यांची गाणी ऐकत आणि शम्मीची हेलकावे खाणारी मान पहात. लताची सुरेल गाणी गुणगुणत. माझे बाबा किशोर कुमार म्हटलं की थोडे नाराज वाटत... अजूनही वाटतात. पण आम्ही मोठे झाल्यावर मला किशोरजींची काही गाणी अत्यंत जवळची वाटली. ती पण बाबांनी आणलेल्या एका रेकॉर्ड मुळेच. किशोरकुमार नव्हते फारसे आवडत तर ती डिस्क आमच्या घरी का होती? हा प्रश्न आता हा लेख लिहितानाच पडला. Happy

रफीजी हे 'सिंगर ऑफ द मिलेनियम आहे' आणि त्यांची गाणी ही सर्वात जास्त ऐकली जातात हे एका सर्व्हेमध्ये सिद्ध सुद्धा झालंय. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४०००च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.

पूर्ण नाव - मोहम्मद हाजी अली मोहम्मद रफी.
जन्मतारीख - २४ डिसेंबर १९२४
जन्म ठिकाण - कोटला सुलतान सिंग, जिल्हा अमृतसर, पंजाब
कारकिर्द - १९४४ ते १९८०
मृत्यू - ३१ जुलै १९८०
टोपणनाव - फिको

रफीजींचं जन्मठिकाण 'कोटला सुलतान सिंग' (अमृतसर, पंजाब) (होय, हे एका खेड्याचं नाव आहे.) हेच त्यांचं काही वर्षं वास्तव्यस्थान होतं. पुढे त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबासह लाहोरला स्थलांतरीत झाले. रफीचे वडील हाजीअली मोहम्मद.. तिथे न्हाव्याचे दुकान चालवत. तेव्हा तिथे किंवा संपुर्ण गावात गात फिरणार्‍या फकिरांची गाणी मोहम्मद रफी पाठ करून गुणगुणत असे. एकूण सहा भावात, रफीचा नंबर ५वा... त्यामुळे बर्‍यापैकी अंतर. सर्वात थोरल्या भावाच्या मेहुण्याने रफीजीमध्ये असलेली ही कला हेरून, त्याच्या वडिलांना त्यांना मुंबईला पाठवण्याची विनंती केली. इतकंच नव्हे तर ते स्वतः त्यांच्याबरोबर मुंबईत आले. रफीजीचे वय तेव्हा निव्वळ २० वर्षं इतके होते.
Young Rafi.jpg

शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. त्याचं असं झालं की रफीजी, त्यांचे मोठे भाऊ आणि हमीद हे तिघे एकदा श्रेष्ठ गायक के. एल. सहगल यांच्या कार्यक्रमाला गेले. तिथे काही तांत्रिक अडचणींमूळे लाईट्स गेले. सहगलजींनी लाईटस आणि ध्वनीप्रक्षेपकांशिवाय गायला नकार दिला. दरम्यान वाट पाहून कंटाळलेले प्रेक्षक चूळबूळ करू लागले. तेव्हा हमीदजींनी तिथल्या व्यवस्थापकांना विनंती करून व्यवस्था पुर्ववत होईपर्यंत रफीजींना गाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. नशिब कुठे साथ देईल ते सांगणे कठिण ! कारण त्याच प्रेक्षकांत ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीयुत शाम सुंदर उपस्थित होते. रफीजींना गाताना पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी रफीजींना त्यांच्या सिनेमात गाण्याचे आमंत्रण दिले. हिच त्यांची पहिली व्यावसायिक संधी. पाकिस्तानात तयार झालेल्या 'गुल बलोच' या सिनेमातली तर मुंबईत 'गाँव की गोरी'. या दोन्हीत एकूण चार वर्षांचं अंतर होतं.

१९४४ पासून मोहम्मद रफी व त्यांच्या भावाचे स्नेही हमीद हे मुंबईतल्या भेंडी बाजारात एका दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत रहात होते. 'गाँव की गोरी' हा सिनेमा त्यांना १९४५ मध्ये मिळाला. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या.. अनुक्रमे लैलामजनू व जुगनू अशी त्या चित्रपटांची नावं होती.

एकीकडे चित्रपटक्षेत्रात गायनाला सुरुवात झाली होती आणि दुसरीकडे रफीजींनी आपल्या नात्यातल्या एका मुलीशी लग्न केलं. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय आपलं संपूर्ण कुटुंबही इकडेच स्थलांतरीत केलं. पण त्यांच्या पत्नीने भारतात रहाण्यास नकार दिला. पहिल्या पत्नीकडून रफिजींना एक मुलगा होता. पुढे त्यांनी व हमीदजींनी दोन सख्ख्या बहिणींशी विवाह केला. रफिजींच्या पत्नीचं नाव 'बिल्किस रफी'. रफीजींची राहणी अत्यंत साधी व घरेलू होती. 'घर ते स्टुडिओ' आणि 'स्टुडियो ते घर' असा त्यांचा दिनक्रम असे. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. ते खूप धार्मिक, अतिशय प्रामाणिक व दयाळू होते. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.

१९५२ मध्ये बनलेल्या 'बैजु बावरा' या सिनेमाशी निगडीत एक आठवण आहे. खरंतर यातली सर्व गाणी तलत मेहमूद हे गाणार होते. पण संगीतकार नौशाद यांनी एकदा त्यांना स्टुडिओत धुम्रपान करताना पाहिलं आणि ती सर्व गाणी मग रफीजींना मिळाली. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील.

६०चं दशक हे रफीजींसाठी खास होतं असं मानायला हरकत नाही. त्याच वर्षी (१९६०) मध्ये त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली.

या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी 'मन मोरा बावरा' (चित्रपट - रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' (चित्रपट - शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. पुढे किशोरकुमार यांना अभिनय क्षेत्रात फारसा वाव उरला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गायकावर लक्ष केंद्रीत केलं. ६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना ' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली.

पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. एक लाट आली ती संपूर्ण डायलॉगबाज सिनेमांची. शोले सारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकवर्गांचं सगळं लक्ष वेगळीकडेच वेधलं. मग हे क्षेत्रं डिस्कोने व्यापलं. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाय यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

चित्रपटक्षेत्रात नेहमीच शांती नांदली असं नाही. तिथेही आपसातले मतभेद हे होतेच. त्याला कोणीही सन्माननिय अपवाद नाहीत. अगदी लताजी, आशाजी सकट. रफीसाहेब सुद्धा त्याचा बळी ठरले होते. लता मंगेशकर या स्वत:चा पगडा ज्या पद्धतीने या क्षेत्रात वापरत, ते अनेकांना खटकत असे. त्यात मोहम्मद रफी हे सुद्धा एक होतेच. अनेक छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. त्या गाण्याचा बाज पाहून सोनिक ओमींनी प्रथम आशा भोसले यांचा विचार केला होता, पण नंतर तो वगळून मग सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले.

थोड्या फार प्रमाणात लताजी आणि रफीजी यांच्यातले मतभेद हे व्यावसायिक पातळीवर कमी झाले/मिटले असं म्हणायला हरकत नाही, परंतू वैयक्तिक पातळीवर मात्र ते कधीच मिटले नाहीत.

रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगितकारांना रफीजींच्या गाण्याचे मानधन देणे परवडत नसे, अशा वेळी ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांच्या (दिग्दर्शक आणि निर्देशक म्हणून) पहिल्या चित्रपटासाठी 'आप के दिवाने' साठी रफीजींनी शिर्षकगीत गायलं. पण गाण्याचं मानधन म्हणून एक रूपयासुद्धा घेतला नाही. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.

आता या लेखातला माझा आवडता टप्पा म्हणजे रफीजींची गाणी आणि गायकी. त्यांनी अनेक कलाकारांना आपला आवाज दिला आणि अगदी भारत भूषणसाठी गायलेल्या 'ओ दुनिया के रखवाले' पासून ते शम्मीसाठी गायलेल्या 'बदतमीज कहो, या कहो जानवर' पर्यंत म्हणा किंवा ऋषिकपूरसाठी 'दर्द्-ए-दिल'.. साठी म्हणा.. प्रत्येक नायकाची अदा, पडद्यावरील त्यांचा वावर, एकूण व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते गायचे.

पण माझं वैयक्तिक मत आहे की त्यांची शम्मीकपूरवर थोडी जास्तच मेहेरनजर होती. Happy कारण शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील. 'याहू.. चाहे कोई मुझे जंगली कहे' व 'अय्यय्या सुकु सुकु (जंगली)',' लाल छडी मैदान खडी' किंवा 'बदतमीज कहो या कहो जानवर..(जानवर)',' छुपनेवाले सामने आ',' यूं तो हमने लाख हंसी देखे है..(तुमसा नही देखा)'.
असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ.

mohd-rafi-with-shammi-kapoor.jpg

फक्त शम्मीच असं नव्हे, पण त्याकाळच्या अनेक अभिनेत्यांना रफीजींचा आवाज चपखल बसला. मग ते सुनील दत्तचं 'आपके पेहलू में आकर रो दिये...' असो.. किंवा विश्वजित चं 'पुकारता चला हूं मैं' असो... जॉनी वॉकरचं 'सर जो तेरा चकराये असो... किंवा गुरूदत्तचं 'चौदहवी का चाँद हो..' असो किंवा 'उधर तुम हंसी हो' असो... प्रत्येकासाठी एक विशिष्ट गायनपद्धती. इतकच नव्हे तर 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. बाकीची सर्व गाणी उदा. 'जानेवालो जरा मूडके देखो इधर', 'मेरा तो जो भी कदम है',' कोई जब राह ना पाये' आणि 'राही मनवा दु:ख की चिंता.' ही गाणी सुद्धा प्रचंड गाजली.

या सर्व अविट गाण्यांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ २० वर्षांनी त्यांना 'बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम' हे पारितोषिक देण्यात आलं.

रफीजींनी अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं.
उदा. नौशाद, (एकूण १४९ गाणी पैकी ८१ सोलो होती.) एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदनमोहन, ओ.पी. नय्यर आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे.

mohd-rafi-and-naushad.jpgshankar-jaikishen-with-rafi-raj.jpg

रफीजी आपल्या मृत्यूदिनापर्यंत कार्यमग्न होते. ३१ जुलै १९८० या दिवशी रफीजींनी 'आसपास' या चित्रपटासाठी 'तु कही आसपास है दोस्त' हे गाण ध्वनिमुद्रीत केलं आणि संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याच रात्री ८ वाजेपर्यंत ते सर्वांना सोडून अल्लाहला प्यारे झाले.

अनंत पावसकर यांनी त्यांच्या 'आठवणीतली गाणी' या पुस्तकात रफीजींच्या अंत्ययात्रेचे वर्णन असं केलंय की रफीजींच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणतात ...
"१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या ठोक्याला जनाजा उचलला गेला. गर्दी न्यू टॉकिजवरून बडी मस्जिदच्या दिशेने निघाली होती. 'जनाजे नमाज' पढला जात असताना अचानक पावसाचा जोर वाढला. गर्दीतला प्रत्येक जण रडत होता. जणू निसर्गही आक्रंदत होता. अश्रू पुसायची गरज नव्हती कारण पाऊसच त्या अश्रूंना संगे घेऊन त्या मार्गावर भावनातिरेकाचा गलिचा अंथरत होता. कबरीवर माती लोटताना गर्दीने जो हंबरडा फोडला होता, त्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या काळजाचा थरकाप उडवतो. Sad

रफी साहेब गेले तेंव्हा झालेल्या दूरदर्शन मुलाखतीत जॉनी वॉकर म्हणाले होते, ''मालीश.... तेल मालीश, सर जो तेरा टकराए' ह्या गाण्याच्या आधी रफी साहेबांनी मुद्दाम मला त्यांच्या घरी बोलावून माझ्याशी चर्चा केली. चित्रपटातील माझ्या लकबीचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी ते गाणे गायलं." ही आठवण सांगताना जॉनी वॉकरजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

रफीजींना मिळालेले अ‍ॅवॉर्डस -
नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड - क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही.

फिल्मफेअर -
चौदहवी का चाँद हो - चौदहवी का चाँद
तेरी प्यारी प्यारी सुरत को - ससुराल
चाहुंगा मैं तुझे - दोस्ती
बहारों फुल बरसाओ - सुरज
दिल के झरोके में - ब्रह्मचारी
क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही

संगीतावर प्रेम करणार्‍या या मनस्वी कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा निस्सिम प्रेम केलं. त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी सांगितलय...
"तुम मुझे यूं भुला ना पाओगे
जब कभी बी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे"

प्रलयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पृथ्वीवर चंद्र असेल, सुर्य असेल तसेच 'मोहमद रफी' या गंधर्वाच्या स्वर्गीय आवाजाचे चाहते सुद्धा असतील.

या अमर कलाकाराला माझी ही छोटीशी श्रद्धांजली !!!!
********************************************
माहीती व प्रकाशचित्रं आंतरजालावरून साभार.
********************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!!!

छान लिहिलं आहेस दक्षिणा. माहितीबद्दल धन्यवाद Happy

रफींचा आवाज.. त्यांची गाणी.... कानात गुंजत रहातात Happy

किती एक से एक बढिया गाणी आहेत त्यांची.

रफींना सलाम!!!

छान लेख.

लता आणि रफी यांच्यातला वाद मानधनावरून होता. लता मंगेशकर यांनी गायकांची युनियन बनवण्याचा प्रयत्न केला होता. रॉयल्टी आणि ठराविक मानधन यातला हिस्सा गायकाला मिळावा अशी काहीशी त्यांची मागणी होती जी मान्य होत नव्हती. रफी भिडस्त स्वभावामुळे ओळखीच्या संगीतकाराकडे मोफत गायले त्याचा राग येऊन लता मंगेशकर यांनी रफींसोबत गाणार नाही असा निर्णय घेतला..

त्यांनी नुसतं हाय म्हणावं की दिल काढून द्यावा असं प्रत्येकाला वाटतं, असा गायक पुन्हा होणे नाही...
दिवाना हुआ बादल.. त्यातला घटा शब्द आणि शम्मी, असे चमत्कार रफीच करू जाणे. दोस्ती सिनेमातली सगळी जीव ओवाळून टाकावा इतकी सुंदर.. यादी तर लांबतच जाईल..

रफींचं उदार व्यक्तिमत्व अन काळ डोळ्यांसमोर उभा राहिला..स्वरातला आर्जवी घरंदाज रोमान्स थेट काळजात जखम करणारा.. हा थोर कलाकार माझ्या गावात वावरला. आजही वांद्र्याच्या मुख्य चौरस्त्याला स्व. (होय स्व.!!) मोहम्मद रफी चौक असे नाव आहे..आभार दक्षिणा या लेखासाठी.

एक मुद्दा चुकिचा आहे असे वाटतेय. जरा लक्ष देशील का?

अगदी भारत भूषणसाठी गायलेल्या 'ओ दुनिया के रखवाले' पासून ते शम्मीसाठी गायलेल्या 'बदतमीज कहो, या कहो जानवर' पर्यंत म्हणा किंवा ऋषिकपूरसाठी 'तुमने कभी किसिसे प्यार किया'? साठी म्हणा.. प्रत्येक नायकाची अदा, पडद्यावरील त्यांचा वावर, एकूण व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते गायचे.
>>>

'तुमने कभी किसिसे प्यार किया'? ह्या ओळी ऋषी कपूर "मेरी उमर के नौजवानो..." ह्या गाण्याच्या सुरुवातीला म्हणतो ना? ते गाणे तर किशोर चे ना? की अजून असे कुठले रफीचेही दुसरे गाणे आहे? Uhoh

खल्लास! अप्रतिम लेख!!!
लेखातला शब्द न शब्द मनाला भिडला.

छान लेख दक्षे!

>> आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' (चित्रपट - शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती.

हा मुद्दा तितकासा बरोबर वाटत नाही. कारण शरारत मधे किशोरचा डबल रोल आहे. एका रोलची सगळी गाणी किशोरने तर दुसर्‍याची रफीने गायली आहेत.

अप्रतिम लेख !
बर्‍याच दिवसांनी दक्षीमधील लेखिका जागी झालेली दिसतेय. Proud
लेखासाठी रिसर्च चांगला केला आहेस. 'कर्ज'मधील वरील गाणं मात्र किशोर कुमारचं आहे. रफीजींनी 'दर्दे दिल.. दर्दे जिगर' हे एकमेव गाणं त्यात गायल आहे. तेवढा बदल नक्की कर. बाकी 'शरारत'बद्दल काही कल्पना नाही. शोधा म्हणजे सापडेल. Happy
संगीतकार जयदेव जेव्हा आजारी होते. तेव्हा रफीसाहेब त्यांना भेटायला गेले होते. आर्थिक अडचणीत असलेले जयदेव आपल्याकडून मदत घेणार नाही याची कल्पना असल्याने रफीसाहेबांनी जयदेवांच्या गादीखाली दहा हजार ठेवले होते. माहीती ऐकीव आहे. खरी असावी असे वाटते.
दक्षे, तुझ्याकडून अजून काही लेखांची अपेक्षा करायला हरकत नाही. Happy

मस्त लेख दक्षिणा.
रफीची अनेक गाणी लाडकी आहेत.
(मी किशोरकुमारची पंखी जास्त...पण तरीही काहीवेळा ते विसरून रफीला चढा भाव दिला जातो)

'तेरे आने की आस है दोस्त, शाम क्यूँ उदास है दोस्त,
महकी महकी फिजाँ यह कहती है, तू कही आसपास है दोस्त

दक्षिणा, सुरेख लेख.

रफी काय किंवा किशोरकुमार काय दोन्ही आम्हासाठी एकच - स्वर्गीय आवाज.
खरंच स्वतःला नशिबवान समजतो जे यांची गाणी ऐकायला, अनुभवायला मिळाली. एक इच्छा मात्र राहिली या दोन दैवतांना प्रत्यक्ष पाहण्याची. Sad

खूपच छान लेख लिहिलाय दक्षिणा. हा माहितीपूर्ण लेख लिहून रफीच्या आठवणी जाग्या केल्याबद्दल, आणि त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

कुठल्याही कलाकाराला आवाज सूट करण्यासाठी त्या त्या कलाकाराचा आवाज, त्याची धाटणी याचा अभ्यास रफींनी नक्कीच केला असावा.

मला रफीच्या गाण्याबाबत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते :
काही गाण्यात एखाद्या ओळीतील काही शब्द किंचितशा नशील्या आवाजात गाणे ही एक खासियत रफीनी जपली असावी असं मला जाणवतं.
उदाहरणार्थ ------
"तुमने पुकारा और हम चले आए" - चित्रपट : राजकुमार
या गाण्यातील ’तुमने पुकारा’ हे शब्द म्हणताना किंचितसा नशीला आवाज आहे.

“ओ मेरे शाह-ए-खूबाँ, ओ मेरी जान-ए-जनाना
तुम मेरे पास होते हो, कोई दूसरा नहीं होता” - चित्रपट : लव्ह इन टोकियो
या गाण्यातील ’तुम मेरे पास’ हे शब्द (काही वेळा) कसे म्हटले आहेत हे आठवावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
’काजल’ सिनेमातील रफींनी गायलेल्या आणि राजकुमारवर चित्रित झालेल्या
“छू लेने दो नाज़ुक होठों को
कुछ और नहीं हैं जाम हैं ये”
आणि
“ये ज़ुल्फ़ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा
इस रात की तक़दीर सँवर जाए तो अच्छा”

रफीच्या या गाण्यांसाठी (आणि राजकुमारसाठी) तो चित्रपट मी पूर्वी ६ वेळा पाहिला होता.

आहाहा.. उत्तम लेख दक्स!!
खूप छान लिहिलंयस.. रफी च्या आवाजातला दर्द, नशा,रोमांस आजही भारावून टाकतो आतपर्यन्त.

रफी... मी खूप उशीरा म्हणजे लग्नं झाल्यावर फिल्मी संगीत ऐकायला सुरुवात केली.
रफी गायला की त्याचा टोन, पीच, उच्चारंची लकब त्या त्या कलाकारासाठी बदलायची. ... अन तरीही त्यात "रफी" हा एक ठळक ठसा उमटलेला असायचा.
रखीसाहेबांच्या नॉन फिल्मी गजल... अभ्यास करण्याइतक्या अप्रतिम आहेत...
किती अप्रतिम लेख लिहिला आहेस, दक्षिणा... जियो!

उल्हास... हज्जार मोदक Happy

खूपच सुंदर माहिती/लेख.........!

रफीशी माझी ओळख झाली १९९४ला
कारण तोवर गायक हा प्रकारच अनाकलनीय होता माझ्यासाठी.
मी अभ्यासाला जायचो त्या सरांकडे "फिर रफी" नावाची कॅसेट होती
त्यावर रफी हे नाव पहिल्यांदा वाचलं.. तसं विविधभारतीवर खूपदा ऐकलेलं पण कळायचं नाही काय ते...
पण त्या कॅसेटने अशी जादू केली की सर नसताना फक्त ती कॅसेट ऐकणे हाच अभ्यास असायचा...
मोठा झाल्यावर माझ्याकडे वॉकी आला तेंव्हा पहिल्यांदा ही कॅसेट मिळवली..

त्यातलं "मै एक राजा हूँ" .... मला मोजता येणार नाही इतक्या वेळा ऐकलय मी.....

सॅल्यूट टू हिज व्हाईस!!!

अतिशय सुंदर ललित आहे दक्षिणा!

तुमचे व बाबांचे रफीवरचे प्रेम अगदी जाणवत आहे. लेखात आढावा सुंदर घेतला आहे. अनेक गोष्टी नव्याने कळल्या, त्याबद्दल आभार.

रफी आणि किशोर हे खरे तर 'रफी' आणि किशोर' म्हणण्यासारखेच लोकप्रिय. रफीजी म्हंटले की किंचित दुरावा वाटतो.

रफींचा मुलायम आवाज, अभिनेत्याच्या लकबींनुसार बदल व कोणत्याही सूरसप्तकात सहजपणे वावरण्याची विलक्षण क्षमता! व्वाह!

ते गेल्याची बातमी पेपरमध्ये ज्या दिवशी वाचली होती, आजही आठवतंय की मी माझ्या बाबांना विचारले होते.

'बाबा, मुहम्मद रफी गेले... तुम्हाला आवडायचे?'

त्यावर बाबांचा चेहरा खूप उदास झाल्याचे आजही आठवते.

आराधनामध्ये किशोरने जे नवे युग आणले त्या युगात येथील आपल्या बहुतेकांचा जन्म असावा. पण खोया खोया चाँदसारखी गाणी रफीलाही डोक्यावर घ्यायला लावतातच.

दक्षिणा, उत्तम लेख व योग्य वेळी आलेला लेख. आपले आभार, खूप खूप

-'बेफिकीर'!

आवडल..:)
गायक मोहम्मद रफी यांनी संगीतकार श्रीकांत ठाकरे यांसाठी अनेक मराठी गाणी देखिल गायली आहेत. त्यांचा उल्लेख हवा होता..

१. अग पोरी, संबाल >> गीतकार - वंदना विटणकर
२. प्रभू तूं दयाळू >> गीतकार - उमाकांत काणेकर
३. हे मना >> गीतकार - वंदना विटणकर
४. शोधिसी मानवा, राउळीं मंदिरीं >> गीतकार - वंदना विटणकर
५. सोड ना अबोला >> गीतकार - वंदना विटणकर
६. प्रकाशांतले तारे तुम्ही >> गीतकार - उमाकांत काणेकर
७. प्रभु रे, खेळ तुझा न्यारा >> गीतकार - वंदना विटणकर
८. नको भव्य वाडा >> गीतकार - उमाकांत काणेकर
९. हा छंद जिवाला लावि पिसें >> गीतकार - वंदना विटणकर
१०. विरलें गीत कसें? >> गीतकार - वंदना विटणकर

रफी .. महान गायक आणि तितकाच उमदा माणूस. चित्रपटसृष्टीत राहुनदेखिल व्यसनांपासुन कोसो दूर राहिलेला 'पाक' मुसलमान!! कॉलेजात असताना किशोरप्रेमी आणि रफीप्रेमी असे दोन गट होते आम्हा मित्रांचे. मग दोघांची गाणी गायची, उगाच दुसर्‍यामधे काहीतरी 'नुस्ख' काढायची आणि शेवटी गळ्यात गळे घालुन चहा कटींग मारायला जायचं!!

ज्याकाळी प्रतीसैगल होण्यासाठी सगळे गायक धडपडत होते, तेव्हा आपली वेगळी शैली निर्माण करणं आणि ती लोकप्रिय करणं.. हॅट्स ऑफ!! रफी आणि नूरजहांचं 'यहां बदला वफा कां' जरुर ऐका.

सुधीर फडकेंच्या लग्नात रफीने मंगलाष्टका म्हटल्या होत्या, ही आठवण फडकेसाहेबांच्या आत्मचरित्रात वाचलेली स्मरतेय.

आज रफीच्या पुण्यतिथीनिमित्ताने छान लेख. धन्यवाद दक्षे! Happy

मस्त लेख! धन्यवाद दक्षिणा !
प्रत्येक कलाकाराबरोबर रफीचा आवाज बदलायचा, अगदी त्या त्या कलाकाराच्या लकबी डोळ्यासमोर येत अन तरीही रफी जाणवत रहायचाच !
रफी एक सुरेल गारुड !
अतिशय मुलायम, मोहून टाकणारा, गारुड घालणारा अन तितकाच निर्मळ, तरल आवाज अन व्यक्तीही !

धन्यवाद सर्वांचे. Happy
सतिश... मी सर्वच कव्हर केलेलं नाही हे ठाऊक आहे मला. वाचकांनीही त्यांच्याबद्दल प्रतिसादामध्ये शेअर करण्यात वेगळी मजा असते नाही का? Happy

बेफी, भ्रमर, आणि उल्हास तुमचे प्रतिसाद आवडले. Happy

रफिंबद्दल अजून बरंच लिहिण्याजोगं आहे.. त्यांची रागावर आधारीत गाणी, मराठी गाणी, इतर भाषांतली गाणी... आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रफी+शम्मी यांची गाणी, याचा तर वेगळा बाफच तयार होईल एक.

दक्षिणा, सुरेख लेख.

रफी काय किंवा किशोरकुमार काय दोन्ही आम्हासाठी एकच - स्वर्गीय आवाज.
खरंच स्वतःला नशिबवान समजतो जे यांची गाणी ऐकायला, अनुभवायला मिळाली. >>>>> +१००

उकाकांनाही संपूर्ण अनुमोदन............
मनापासून धन्यवाद दक्षिणा....

Pages