पुरोगामी - प्रतिगामी

Submitted by संदीप ताम्हनकर on 11 December, 2016 - 00:48

मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले.
पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते. पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.
या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.
एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का आणि कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की व्यक्तीचे बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतले तर चांगले.
मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी - प्रतिगामी हा विचारभेद अथवा झगडा चिरंतन आहे. आहार निद्रा मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा प्रवृत्ती भेद असू शकणे शक्य आहे. अखिल मानवजातीचा विचार करताना ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा विचारभेद अथवा प्रवृत्तीभेद दिसतो आणि दिसत राहील. भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष अनेकदा झालाय असे दिसून येते. यातील काही महत्वाचे आणि भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारे संघर्ष आपण पाहू.
वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य कुलीन राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता. पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला. शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली. त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय?)
ज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यास सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोस करून टाकला असणार की बिचा-यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून त्यांनी नदीत आत्महत्या केली. सनातन्यांनी मुलांना वाळीत टाकले. तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्रकृत मराठी लोकभाषेत आणण्याचे बंडखोर कार्य याच ज्ञानदेवांनी केले. वेदांचे सार असणा-या श्रीमत्भगवतगीतेचे भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले एक मोठेच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रात भरपूर वाढला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.
शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच. डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मनाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला.
सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.
टिळक, आगरकर, शाहू, फुले - काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून टिळकमहाराजांचे युग सुरु झाले. आचार विचार आणि कृतीने टिळक हे सनातनी ब्राह्मणच होते. आधी स्वातंत्र्य का आधी समाजसुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले.
गांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली.
आणीबाणी - इंदिराजींच्या वेळी आणीबाणी पूर्व काळात नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटले आणि विरुद्ध गेले. विद्यार्थ्यांची आंदोलने चालू झाली. विरक्त आयुष्य जगणा-या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे जनसंघी आणि सनातनी शक्ती एकजूट झाल्या. सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली. पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली पण असे कोणतेही आंतरराष्ट्रीय दडपण इंदिराजींवर नव्हते. या निवडणुकां नंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या. पण हि सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा जनसंघी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडले.
राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक आध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं खून करून सनातन्यानी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगलं आहे पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे.
श्रुतिस्मृतिपुराणोक्ताने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन (Deviation) कट्टर वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत थोडेसेही, कृतीचे तर सोडाच - विचारांचेही स्वातंत्र्य, कोणालाही नाही, हाच सनातनधर्म आहे. सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्च वर्णीय लोक, तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन, सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात. मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.
या दरम्यानच्या कालखंडात प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे. वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, सामान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटेल असे सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणे, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, देशप्रेमाची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर देशद्रोहाचा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदा नालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत.
वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही उलट अभिमानच वाटेल हे नक्की. प्रत्येकाने स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचे मानतो, आपले मानतो हे नक्की ठरवल्यास गोबेल्स प्रचाराला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायाने देशाला वाचवता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरोगामी वा प्रतिगामी असे कुठलेही टोक न गाठता तारतम्याने सुवर्ण मध्य साधून जगणारे अनेक असतात.

प्रकाश घाटपांडे +१

पुरोगाम्यांनी (!) पुरोगामीपणा (!) करूनही त्यांचे अनुयायीच आज प्रतिगामी विचारसरणी का बाळगतात ह्याचे विवेचन केले गेले तर बरे होईल.

ज्यांना प्रतिगामी म्हंटले जात आहे त्यांचा भौतिक विकास हा नक्कीच इतरांना ओरबाडून केला गेलेला असणार ह्याबद्दल आपण ठाम दिसता.

वेगवेगळे संदर्भ लिहून एका विशिष्ट समूहाबाबत चीड निर्माण करणारे लेखन काहीही संदर्भ नसताना केले जाते ह्याचे आजकाल नवल वाटत नाही.

'जगात दोनच प्रकारची माणसे असतात, एक आमच्यासारखी आणि एक आमच्या शत्रूपक्षातील' ह्या विचारसरणीला आपण प्रतिगामी म्हणायला कधी सुरू करूयात?

लेख खूप सुंदर आहे हे पुराव्यानिशी सिद्ध होणारच ह्यात तीळमात्र शंका नाही.

"या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे जगातील लोकांना दोन प्रकारांत विभागतात ते, व इतर" - या फेमस वाक्याची आठवण झाली.

लॉजिक काही पटले नाही भारतातील बहुसंख्य लोक हे एकाच वेळेस धार्मिक, दैववादी, कर्मविपाकसिद्धांतवादी, तसेच सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्षही आहेत. गांधीजी हे तर त्याचे मोठे उदाहरण होतेच पण बाकी देशही साधारण तसाच आहे.

बाकी ब्राह्मणांना उगाच धरून धोपटले आहे ते सोडा.

आणीबाणी स्वतःहून उठवली म्हणून आधी लावलेली बरोबर होती हे अजब लॉजिक आहे. मग चीन सुद्धा हल्ल्यानंतर स्वतःहून परत गेले होते. त्यांचाही हल्ला काहीतरी रास्त कारणाने होता का?

खर्‍या पुरोगाम्यांशी माझा अधूनमधून वाद होत असतो, पण त्यांच्याबद्दल मला नक्कीच आदर आहे. कोणत्याही परंपरेला/सनातनी गोष्टीला त्यांचा विरोध "कारण त्यातून माणसांना इजा होते, अन्न/पैसे वाया जातात, निसर्गाची हानी होते" वगैरे स्पष्ट कारणाने असतो व तो विरोध जातीधर्मविरहित असतो. प्रत्येक गोष्ट पारखून पाहण्याच्या सवयीने झालेला असतो.

पण असे लोक संख्येने अत्यंत कमी आहेत. त्यापेक्षा प्रचंड संख्येने आहेत ते इतर लोकांच्या नजरेत आपण पुरोगामी आहोत अशी प्रत्येक सोशल नेटवर्कच्या प्रत्येक पोस्टवरून स्वतंत्रपणे पूर्ण खात्री पटली पाहिजे अशा हट्टाने लिहीणारे हट्टी पुरोगामी . मग ते करायला बराच आटापिटा करावा लागतो. म्हणजे समजा मुस्लिम समूहातून कोणी काही देशविरोधी किंवा इन जनरल निषेध करण्याजोगे केले, की आधी त्याचा उल्लेखच टाळायचा. केलाच, तर त्याबरोबर "पण सर्वच धर्मातील अतिरेकी वाइटच. हिंदू अमुक अमुक, ब्राह्मण तमूक, गांधीहत्या..." वगैरे आणले की मग त्यांना हायसे वाटते. यांची आणखी एक सहज दिसणारी सवय म्हणजे इतर पुरोगामी सर्कल्स मधून वर आलेले विचार स्वतः स्वतंत्ररीत्या शहानिशा न करता आपलेसे करणे व ते सिद्ध सत्य आहे अशा थाटात आणखी पुढे फिरवणे. एखादी अशी पोस्ट्स कोणीही लिहू शकतो. पण अशा पॅटर्न्स च्या अनेक पोस्ट्स दिसल्या तर सहज ओळखू येतो हट्टी पुरोगामीपणा.

<<<<शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच.>>>>>
हे लिहिलंच आहे तर याचा पुरावा सुद्धा द्या. याचा अर्थ असा घ्यायचा का, कि शिवाजी महाराज , संभाजी महाराज , शाहू महाराज सनातन्यांसमोर घाबरले?????? ह्यावर स्पष्टीकरण द्या.
<<<<<राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.>>>>>>
तुम्ही ठार वेडे आहेत हे सिद्धच झालं. काँग्रेस काय खुद्द सोनिया गांधी पण ह्याला शुद्ध वेडेपणा म्हणेल. तामिळ इलम च्या लोकांना कोर्टाने शासन दिलेला आहे. मग कोर्ट सुद्धा YZ आहे का ????? का कोर्टात सुद्धा सनातनी न्यायाधीश बसले आहेत ????? १० वर्ष काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी काहीच केला नाही का ते पण सनातन्यांना घाबरतात ?????

शिवाजी महाराज त्यांच्या राज्यभिषेकाला झालेला विरोध याबद्दल एक सविस्तर लेख येउ द्या ताम्हनकर साहेब.

मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते.
अनुमोदन. आता हे फक्त भाजप वाले करतात का? पुढल्या निवडणुकी आधी प्रतिपक्ष काय करणार आहे?

या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.
अनुमोदन.
कोणत्याही परंपरेला/सनातनी गोष्टीला त्यांचा विरोध "कारण त्यातून माणसांना इजा होते, अन्न/पैसे वाया जातात, निसर्गाची हानी होते" वगैरे स्पष्ट कारणाने असतो व तो विरोध जातीधर्मविरहित असतो. प्रत्येक गोष्ट पारखून पाहण्याच्या सवयीने झालेला असतो.
खरे आहे.

फक्त मुस्लिम धर्मियांच्या ज्या कारवायांनी माणसांना इजा पोचते त्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद भारतात कुणाकडे नाही. हिंदूंना काय, कुणिहि येऊन झोडपावे, त्यांना त्याची लाज नाही. विशेषतः हिंदूच या झोडपण्यात पुढाकार घेतात.

खरी अडचण अशी की ढोंगी लोकांची, स्वार्थसाधू लोकांची संख्या भारतात खूप जास्त झाली आहे, म्हणजे टक्केवारी इतर देशांपेक्षा कमी असेल, पण एकूण लोकसंख्या खूप असल्याने त्यांची संख्या पण खूप होते.