मिसइंटरप्रिटेशन - संवादांचे, वर्तणुकींचे, घटनांचे चुकीचे अन्वयार्थ

Submitted by सई. on 6 December, 2016 - 03:48

खूपदा असं होतं, की आपण आपल्याशी संबंधित बोलण्याचे, आजुबाजुच्या व्यक्तींच्या वागण्याचे किंवा वर्तमानपत्रात किंवा पुस्तकातून वाचनात येणा-या आपल्याशी अजिबात संबंध नसणा-या घटनांचेही चुकीचे अन्वयार्थ लावतो. कुणाकुणाबद्दल ओळख नसतानाही आपले काही पूर्वग्रह असतात, कुणाकुणाकडून आपल्याला चांगले अनुभव आलेले नसतात, काही वेळेला ह्यापैकी कोणतंही कारण नसलं तरी उगीचच त्यांच्याबद्दल आपलं मत चांगलं नसतं. अशा बाह्य घटनांच्या मिसइंटरप्रिटेंशन्सनी आपल्या आयुष्यावर तसा फारसा दृष्य परिणाम होत नाही. [खरंतर होत असतो, पण तो त्या त्या वेळी लक्षात येत नाही.] पण कुटुंबिय, मित्रमंडळी, नातेवाईक, ऑफिसातले सहकारी, शेजारीपाजारी, जुजबी तोंडओळखीतले लोक, इतकंच काय अगदी रस्त्यात वादंग होणा-या अनोळखी लोकांच्या वागण्याचा, बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळेसुद्धा आपल्याला जे भयंकर मनस्ताप होतात, ते दुर्लक्ष करण्यासारखे नसतात. ह्यातून आपला वैयक्तिक ताण वाढतो. मैत्रीत, नातेसंबंधात दुरावे येतात. एकंदरीतच आयुष्य सोपं रहात नाही. आपल्यासमोर 'माझ्याकडं आधी बघ' म्हणून आ वासून उभ्या ठाकलेल्या अडचणींच्या गदारोळात ह्या विनाकारण गैरसमजातून निर्माण झालेल्या गोंधळांची भर पडून किचकटपणा वाढतो. तो आपोआप आपल्या वागण्या-बोलण्यातून बाहेर वाट काढायला लागतो. मग अर्थातच आपल्याबद्दलच्या आधीपासूनच्या मिसइंटरप्रिटेंशन्समध्ये आणखी वाढ.

हे सगळं फार त्रासदायक असतं. एखाद्या दिवशी अचानकच तुमची एखादी मैत्रिण तुमच्याशी बोलणं बंद करते. तुम्ही मुद्दाम खटकण्यासारखं वागला असाल तर प्रश्न नसतोच. पण तसं नसेल आणि तुम्ही अनवधानाने किंवा इतर कोणत्या संदर्भाने बोलून गेला / वागला असाल तर ते क्लिअर होणं आवश्यक असतं. तुम्ही रोजच्या संपर्कात असाल, तर तुम्हाला तिचा अबोला किंवा बोलत असेल तर वागण्यातला तुटकपणा लगेच कळतो. तुम्ही लांब असाल तर ते लक्षात यायला वेळ लागतो. तोवर त्या अबोल्याला कारणीभूत असलेले संदर्भ मागे पडलेले असतात आणि तुम्ही तर त्या संदर्भांबद्दल पूर्णपणेच अनभिज्ञ असता. मग ती समजते, तुम्हाला काही फिकीरच नाही. हे दुष्टचक्र आहे. तुम्हाला खरोखरीच पर्वा नसेल, तर प्रश्न नसतो. पण तसं नसेल, तर त्याची वेळीच दुरुस्ती व्हावी लागते, आपण करावी लागते. त्यासाठी घडाघडा बोलायची गरज असते. इगो बाजूला सरकवावे लागतात. दृष्टीकोन स्वच्छ ठेवण्याची आणि सॉर्टेड [REBT शैलीतली] विचार करण्याची सवय करून घेतली तर हे आणखी सुलभ होऊ शकतं.

इथे मैत्रिण हे उदाहरण प्रातिनिधीक आहे. मित्र, नातलग, नवरा, बायको, सासू, भावजय, मुलं, शेजारी, थोडक्यात आपण स्वतः नंतर सुरू होणारे सगळे ह्या कॅटेगरीत येतात.

हे चित्र जुनं आहे. पण त्यानं होणारी पडझड जुनी होत नसते. एखाद्या प्रसंगाला नीट समजून त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा गैरसमज करून न घेता समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं जमू शकतं, आपण ते सहसा करत नाही.

हे सगळं आपण इतरांच्याबाबतीत करतो आणि आपल्याही सगळ्यांच्याबाबतीत हे घडत असतं. आपल्याबाबतीत घडलेले असे प्रसंग, त्यातून झालेलं आपलं नुकसान, त्यातून आपण घेतलेला धडा शेअर करण्यासाठी हा धागा.

असा धागा आधीच कुठे असेल तर सांगा, म्हणजे हा काढून टाकता येईल.

असं का घडतं, ह्यासंदर्भातला स्वातीनं सुचवलेला http://www.bakadesuyo.com/2016/08/neuroscience-of-mindfulness/ हा ब्लॉग वाचनीय आणि उपयुक्त आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी यावर नवीन धागा सुरु करणार होतो. पण योगायोगाने तुम्ही सुरूच केलाय तर आता त्यावरच माझी समस्या मांडतो. मला सल्ला हवाय.

या धाग्यावर मिळालेल्या सल्ल्यानुसार एक नवीन मैत्रीण बनवली. रविवारी तिला घेऊन फिरायला गेलो होतो. रविवारचा दिवस चांगला गेला. हिंडणे फिरणे गप्पा इत्यादी जे काही शुद्ध मैत्रीत होते ते सगळे झाले. संध्याकाळी घरी परत आलो.

सोमवारचा दिवस उजाडला. ती तिच्या ऑफिसात. मी माझ्या. दहा वाजता सहज म्हणून "गुड मॉर्निंग. कशी आहेस?" असा मेसेज टाकला. तर तिचा फक्त "gm" इतकाच रिप्लाय. बहुदा बिझी असेल म्हणून मी हि फार मनावर घेतले नाही. पण मन अस्वस्थ होते आणि काहीतरी निमित्त करून तिच्याशी बोलायचे होते. लंच च्या वेळेत पुन्हा मेसेज टाकला,

"सोमवार असल्याने आज माझे कामात मन लागत नाही. तुझे लागतेय का?" केवळ बोलायला काहीतरी विषय हवा म्हणून मी हे बोललो होतो.

तर तिने काय रिप्लाय द्यावा?

"तुझे कामात लक्ष सोमवार आहे म्हणून लागत नाही. आणि शुक्रवारी विकेंड सुरु होणार म्हणून लक्ष लागत नाही असे पण काल म्हणाला होतास. म्हणजे तू काम फक्त तीनच दिवस करून पगार मात्र पूर्ण आठवड्याचा घेतो का? चांगले आहे. पण मी तशी नाही"

हे वाचून मला धक्काच बसला. माझ्या Casual मेसेजचा चुकीचा अर्थ लावून तिने हे लिहिले होते. कारण कामाच्या ठिकाणी मी किती पर्टिक्युलर असतो हे मला माहित आहे, माझ्या सहकाऱ्यांना माहित आहे. आणि हि कालची ओळख झालेली मुलगी जिला कामाच्या ठिकाणी मी काय चीज आहे, हे माहितीही नाही, मला शहाणपण शिकवत होती. माझी खूप चरफड झाली. पण मैत्रीची गरज मलाच होती. रागाच्या भरात ती तुटू नये म्हणून मी जास्त न ताणता काहीतरी थातूरमातुर रिप्लाय केला. पण त्यानंतर आतापर्यंत तिचा काहीही मेसेज आलेला नाही.

माझे मन आता खात आहे कि हेच जर होणार होते तर मैत्रीची गरज आहे म्हणून कचखाऊ रिप्लाय देण्यापेक्षा निदान तिला रोखठोक बोललो असतो तर बरे झाले असते. कारण तिने बोलायचे तसेही थांबवले आहेच.

पण जर आता पुन्हा त्या विषयावर काही मेसेज टाकला तर म्हणेल "अजून तेच आहे का तुझ्या डोक्यात? एकच गोष्ट जास्त वेळ ताणून धरण्याचा स्वभाव आहे बहुतेक तुझा". म्हणजे पुन्हा माझ्यावरच पारडे उलटणार.

काय करावे तेच सुचत नाही. कुणीतरी प्लीज सल्ला द्या.

इगो बाजूला सरकवावे लागतात >>>>>> पण समोरच्या माणसाचा इगो बाजूला सरकत नसेल आणि आपण पहिले पाऊल टाकूनसुद्धा वारंवार आपला अपमान होत असेल तर वेळीच त्या माणसापासून दूर व्हायला हवं. असे खूप अनुभव आहेत. खूप शिकायला मिळाले आहे. नक्की लिहिन

काय करावे तेच सुचत नाही. कुणीतरी प्लीज सल्ला द्या.>>>> मैत्रीची गरज दोघांना असेल तरच ती मैत्री टिकेल.

सुमुक्ता >>> सहमत आहे.

गैरसमज नक्कीच दूर करावेत. पण ते नाते / मैत्री ओढून ताणून परत आपणच जोडण्याचा प्रयत्न करु नये.

बरेच वेळा आपला समजूतदारपणा, आपला दुबळेपणा मानला जातो.

चांगला धागा!
पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे अनुभव असता हे.
सुमुक्ता यांना अनुमोदन.
वारंवार मैत्रीचा हात पुढे करुन ही कडु कार्ल्यांना...माफ़ करुन टाकावे, म्हणजे कायमची फ़ुली मारावी. न्युट्रॅलीटी वाढवायची आणि पुढे जायचे.

स्त्रियांच्या तुलनेत पुरुष बोलून मोकळे होतात असे मला वाटते. किंवा मग तोडून टाकतात. स्त्रियांना जितके नाते हवेसे असते त्यापेक्षाही नात्यात तेढ निर्माण झाली की त्यांना ती तेढ अधिक आकर्षक वाटू लागते.

ती तेढच जपावी, आपली व्हर्जन्स सगळ्यांना ऐकवत बसावीत, त्यातूनच आनंद मिळवावा, जमतील तेव्हा टोमणे मारावेत, कॉमन फ्रेंड्सना आपल्या बाजूला वळवण्यासाठी त्यांच्याशी एरवीहूनही फारच चांगले वागावे असे प्रकार जनरली बायका करताना दिसतात.

धागा आवडला.

आता यात स्त्रिया नि पुरुष हा भेदभाव कशाला घुसडलात?
वाद वाढवायची लक्षणे.

बाकी मुद्दा बरोबर आहे. माझ्या बोलण्यातून नेमका चुकीचा नि नसलेला अर्थ काढण्यात माझी बायको पटाईत आहे. पुष्कळदा माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती तडा तडा बोलू लागते, अग, अग वाक्य तर पूर्ण करू दे म्हणावे तर काही बोलू नका - मला ता वरून ताकभात ओळखता येतो!
अश्या वेळी, जाऊ द्या झाले म्हणून तोंडात मारल्यासारखा चेहेरा करून दूर व्हावे. जिथे तर्कशास्त्र खुंटते, किंवा आपले तर्कशास्त्र नि त्यांचे तर्कशास्त्र वेगळे वेगळे असते तिथे वाद कशाला? नवर्‍याला नेहेमीच पडते घ्यावे लागते. हे कळायला अशी कितीशी वर्षे जावी लागतात लग्नानंतर?

एखादं यंत्र बनवताना सुद्धा त्याच्या प्रत्येक भागाचं काम डिझाईनरने निश्चित केलेलं असतं. तसंच मानवी स्वभावाचं. स्वभाव, भावभावना हे एखाद्या सॉफ्टवेअरसारखं आहे. दाखवता येत नाही पण त्यामुळे अनेक गोष्टी घडून येतात. समज, गैरसमज हे सर्व योजनेचाच भाग असतात. त्यासाठीच हा सर्व खटाटोप. समज, गैरसमज त्यातून निर्माण होणा-या दु:ख, द्वेष , हेवा, सूड या भावना हा पुढच्या घडामोडींचा कार्यकारणभाव ठरतात. वैज्ञानिक दाखले देत अध्यात्म शिकवणारे माझे गुरुजी असं सोपं करून सांगत असतात.

सारांश : - जे घडायचं ते घडणारच असतं.

इन्टरेस्टिंग दिसतोय तो ब्लॉग! ते ब्रेन गेम्स चे एपिसोड्स पण असेच फार फॅसिनेटिंग वाटतात मला. कधी कधी एकदम आपल्याच वागण्याचं किंवा रिअ‍ॅक्शन्स चं उत्तर मिळून जातं आणि एकदम प्रकाश पडल्यासारखं वाटतं डोक्यात! Happy
बाफाच्या विषयासंदर्भात - मिसइंटरप्रिटेशन, गैरसमज वगैरे होणे टाळण्यासाठी परिस्थितीचे, दुसर्‍या व्यक्तीबद्दलचे जजमेन्ट चांगल्या प्रकारे करता यायला हवे. दुसर्‍या माणसाच्या दृष्टीकोनातून विचार करता यायला हवा. बर्‍याच वेळा होतं काय की माणूस रागाच्या किंवा भावनेच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि ते जे शब्द असतात त्यावर समोरचा रिअ‍ॅक्ट करतो! त्या व्यक्तीला खरच तसं म्हणायचं असावं का ? असा एकदा प्रश्न त्याआधी स्वतःला विचारला तर नी-जर्क रिअ‍ॅक्शन टळतात. विशेषतः लेखी संवादात हे फार होते. सग़ळ्यांनाच आपल्याला काय म्हणायचे ते जसे च्या तसे लिहिता येत नाही. जे लिहिले ते वाचणारा त्या वेळच्या मूड, पूर्वग्रह इ. प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे इन्टरप्रेट करणार ! मजाच सगळी Happy
समोरचा अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर वागत आहे अशी शंका आली तर सरळ बोलून/ विचारून क्लियर करावे ना, नक्की काय म्हणायचेय ते! काहीतरी अंदाज बांधून त्यावर विचित्र रिअ‍ॅक्ट करण्याने अजूनच अवघड होईल परिस्थिती! Happy

मैत्रेयी, मला काय म्हणायचंय ते बरोबर इंटरप्रिट केलंयस आणि नेमक्या शब्दात मांडलंयस Happy

वरची लिंक अजून पाहिली नाही. वर ज्यांनी उल्लेख केलेत, त्यांच्या अनुभव / किश्श्यांच्या प्रतिक्षेत.
मिसइंटरप्रिटेशन फक्त बायको/ बायकांपुरतं मर्यादित असतं? ऐकावं ते नवलच.

जब किसीसे कोई गिला रखना
सामने अपने आईना रखना Happy

https://www.youtube.com/watch?v=kKCPwc8L86s जगजित.

>>>>मिसइंटरप्रिटेशन फक्त बायको/ बायकांपुरतं मर्यादित असतं? ऐकावं ते नवलच.<<<<

हे माझ्या प्रतिसादाबद्दल तर नव्हे ना? मला असे काहीही म्हणायचे नाही. स्त्रीपुरुषांमधील वागणुकीतील आढळलेला एक फरक नोंदवला. (कृपया हे बिल माझ्या नावावर फाडले जाऊ नये) Wink Happy

नाही बेफि, पण तेवढ्यावरच फोकस होऊ नये.

माझ्या मिसइंटरप्रिटेशचं ताजं उदाहरण म्हणजे, जयललिता. मी ह्या बाईंकडे कधीच गांभिर्यानं पाहिलं नव्हतं. आता त्यांच्याबद्दल इतकं वाचनात येतंय, तेव्हा त्या काय ताकदीच्या होत्या हे लक्षात येतंय. दुर्दैवाने त्यांच्या इतरच बिनमहत्त्वाच्या लौकिकांमुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह रुतून बसले. असं अनेक लोकांबद्दल होतं. शिक्के मारण्यात आपण पटाईत असतो.

खुपदा रस्त्यावर लोकं त्यांच्या गाडीला धक्का लागला म्हणून समोरच्याला अद्वातद्वा बोलताना दिसतात किंवा वाहतुकीची शिस्त पाळणा-या लोकांना ते सोडून इतर लोक बेशिस्त वाटतात. ही जनरल उदाहरणं.

>>>>माझ्या मिसइंटरप्रिटेशचं ताजं उदाहरण म्हणजे, जयललिता. मी ह्या बाईंकडे कधीच गांभिर्यानं पाहिलं नव्हतं. आता त्यांच्याबद्दल इतकं वाचनात येतंय, तेव्हा त्या काय ताकदीच्या होत्या हे लक्षात येतंय. दुर्दैवाने त्यांच्या इतरच बिनमहत्त्वाच्या लौकिकांमुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह रुतून बसले. असं अनेक लोकांबद्दल होतं. शिक्के मारण्यात आपण पटाईत असतो.<<<<

अगदी! माझेही जयललितांबाबत अस्सेच झालेले होते. काल त्यांच्याबद्दल मीडियाने जे काही अफाट दाखवले ते पाहून मी लिहिलेला एक जुना साधासा लेख इथे द्यायची इच्छा अनावर झाली. तो लेख फारच भाबडा होता हे येथील सदस्यांनी दिलेल्या माहितीमुळे समजले. तुमच्याप्रमाणेच जयललितांच्या बिनमहत्वाच्या बाबीच लक्षात होत्या.

बाईंनी दिलेली लिंक भारीच आहे. कालपासून मी खरच डोक्याचा उजवा भाग पुढे करून बोलत, वागत, चालत आहे. असे वाटत आहे की उजवा भाग पुढे केला की आपोआप मेंदूचा उजवाच अर्धा भाग काम करेल आणि डावा गप्प बसेल.

मला इतकेच म्हणायचे होते की मिसइंटरप्रिटेशन दोघांचेही होत असले तरी बायका सहसा ते अधिक ताणतात. हे चुकीचेही असू शकेल.

माझ्या मिसइंटरप्रिटेशचं ताजं उदाहरण म्हणजे, जयललिता. मी ह्या बाईंकडे कधीच गांभिर्यानं पाहिलं नव्हतं. आता त्यांच्याबद्दल इतकं वाचनात येतंय, तेव्हा त्या काय ताकदीच्या होत्या हे लक्षात येतंय. दुर्दैवाने त्यांच्या इतरच बिनमहत्त्वाच्या लौकिकांमुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्वग्रह रुतून बसले. असं अनेक लोकांबद्दल होतं. शिक्के मारण्यात आपण पटाईत असतो>>>>+१
हा लेख वाचल्या वाचल्या याच पार्श्वभूमीवर हा लेख लिहिला असावा असंच वाटलं.

स्वाती, त्या लिंकसाठी अनेकानेक आभार! अतिशय माहितीपूर्ण. धाग्याच्या विषयाला थेट उपयुक्त आहे. मुख्य पोस्टमध्ये डकवत आहे.

खूप दुःख होते यामुळे कधी कधी वाटते आपल्याच बाबतीत का असे घडते. लोक समजून घेत नाहीत आणि कायम एक नकारात्मक दृष्टिकोनाला सामोरे जावे लागते. कधी कधी आपल्या बाबत चुकीचे गैरसमज बाळगून असलेले लोक हे अगदी जवळचे असतात समोर चांगले बोलतील पण मागून आपली बदनामी करतात आणि हे आपल्याला त्रयस्थाकडून कळते.

>> खूप दुःख होते यामुळे कधी कधी वाटते ... आपल्याला त्रयस्थाकडून कळते.

आपण आनंदी का दु:खी व्हायचे ते आपल्या हातात हवे. ते इतर लोकांना ठरवू दिले तर समस्याच निर्माण होणार. हे म्हणजे बल्ब आपल्या घरात आणि त्याचे बटन दुसऱ्यांच्या घरात. ते चालू का बंद करतील त्यावर आपले अवलंबून.

If you want to be happy, be. - Leo Tolstoy

ह्या सात शब्दात खूप काही सांगितले आहे Happy

Pages