मिसइंटरप्रिटेशन - संवादांचे, वर्तणुकींचे, घटनांचे चुकीचे अन्वयार्थ

Submitted by सई. on 6 December, 2016 - 03:48

खूपदा असं होतं, की आपण आपल्याशी संबंधित बोलण्याचे, आजुबाजुच्या व्यक्तींच्या वागण्याचे किंवा वर्तमानपत्रात किंवा पुस्तकातून वाचनात येणा-या आपल्याशी अजिबात संबंध नसणा-या घटनांचेही चुकीचे अन्वयार्थ लावतो. कुणाकुणाबद्दल ओळख नसतानाही आपले काही पूर्वग्रह असतात, कुणाकुणाकडून आपल्याला चांगले अनुभव आलेले नसतात, काही वेळेला ह्यापैकी कोणतंही कारण नसलं तरी उगीचच त्यांच्याबद्दल आपलं मत चांगलं नसतं. अशा बाह्य घटनांच्या मिसइंटरप्रिटेंशन्सनी आपल्या आयुष्यावर तसा फारसा दृष्य परिणाम होत नाही. [खरंतर होत असतो, पण तो त्या त्या वेळी लक्षात येत नाही.] पण कुटुंबिय, मित्रमंडळी, नातेवाईक, ऑफिसातले सहकारी, शेजारीपाजारी, जुजबी तोंडओळखीतले लोक, इतकंच काय अगदी रस्त्यात वादंग होणा-या अनोळखी लोकांच्या वागण्याचा, बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळेसुद्धा आपल्याला जे भयंकर मनस्ताप होतात, ते दुर्लक्ष करण्यासारखे नसतात. ह्यातून आपला वैयक्तिक ताण वाढतो. मैत्रीत, नातेसंबंधात दुरावे येतात. एकंदरीतच आयुष्य सोपं रहात नाही. आपल्यासमोर 'माझ्याकडं आधी बघ' म्हणून आ वासून उभ्या ठाकलेल्या अडचणींच्या गदारोळात ह्या विनाकारण गैरसमजातून निर्माण झालेल्या गोंधळांची भर पडून किचकटपणा वाढतो. तो आपोआप आपल्या वागण्या-बोलण्यातून बाहेर वाट काढायला लागतो. मग अर्थातच आपल्याबद्दलच्या आधीपासूनच्या मिसइंटरप्रिटेंशन्समध्ये आणखी वाढ.

हे सगळं फार त्रासदायक असतं. एखाद्या दिवशी अचानकच तुमची एखादी मैत्रिण तुमच्याशी बोलणं बंद करते. तुम्ही मुद्दाम खटकण्यासारखं वागला असाल तर प्रश्न नसतोच. पण तसं नसेल आणि तुम्ही अनवधानाने किंवा इतर कोणत्या संदर्भाने बोलून गेला / वागला असाल तर ते क्लिअर होणं आवश्यक असतं. तुम्ही रोजच्या संपर्कात असाल, तर तुम्हाला तिचा अबोला किंवा बोलत असेल तर वागण्यातला तुटकपणा लगेच कळतो. तुम्ही लांब असाल तर ते लक्षात यायला वेळ लागतो. तोवर त्या अबोल्याला कारणीभूत असलेले संदर्भ मागे पडलेले असतात आणि तुम्ही तर त्या संदर्भांबद्दल पूर्णपणेच अनभिज्ञ असता. मग ती समजते, तुम्हाला काही फिकीरच नाही. हे दुष्टचक्र आहे. तुम्हाला खरोखरीच पर्वा नसेल, तर प्रश्न नसतो. पण तसं नसेल, तर त्याची वेळीच दुरुस्ती व्हावी लागते, आपण करावी लागते. त्यासाठी घडाघडा बोलायची गरज असते. इगो बाजूला सरकवावे लागतात. दृष्टीकोन स्वच्छ ठेवण्याची आणि सॉर्टेड [REBT शैलीतली] विचार करण्याची सवय करून घेतली तर हे आणखी सुलभ होऊ शकतं.

इथे मैत्रिण हे उदाहरण प्रातिनिधीक आहे. मित्र, नातलग, नवरा, बायको, सासू, भावजय, मुलं, शेजारी, थोडक्यात आपण स्वतः नंतर सुरू होणारे सगळे ह्या कॅटेगरीत येतात.

हे चित्र जुनं आहे. पण त्यानं होणारी पडझड जुनी होत नसते. एखाद्या प्रसंगाला नीट समजून त्यावर प्रतिक्रिया देणं किंवा गैरसमज करून न घेता समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं जमू शकतं, आपण ते सहसा करत नाही.

हे सगळं आपण इतरांच्याबाबतीत करतो आणि आपल्याही सगळ्यांच्याबाबतीत हे घडत असतं. आपल्याबाबतीत घडलेले असे प्रसंग, त्यातून झालेलं आपलं नुकसान, त्यातून आपण घेतलेला धडा शेअर करण्यासाठी हा धागा.

असा धागा आधीच कुठे असेल तर सांगा, म्हणजे हा काढून टाकता येईल.

असं का घडतं, ह्यासंदर्भातला स्वातीनं सुचवलेला http://www.bakadesuyo.com/2016/08/neuroscience-of-mindfulness/ हा ब्लॉग वाचनीय आणि उपयुक्त आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा सई ..

सग़ळ्यांनाच आपल्याला काय म्हणायचे ते जसे च्या तसे लिहिता येत नाही. जे लिहिले ते वाचणारा त्या वेळच्या मूड, पूर्वग्रह इ. प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे इन्टरप्रेट करणार >>>+++११११

ब्लॉग वाचते आता.
या धाग्यामध्ये मांडलेल्या विचारांशी १००% सहमत आहे. रिसिव्हिंग एन्ड अनुभवला आहे व स्वतः देखील हा गुन्हा केलेला आहे. अतिशय कॉमन अनुभव.

Pages