जयललिता

Submitted by बेफ़िकीर on 6 December, 2016 - 04:09

काही महिन्यांपूर्वी एका अंकासाठी जयललिथा ह्यांच्यावर एक लेख लिहिलेला होता. काल जयललिथा ह्यांचे निधन झाले. त्यांच्यावरचा हा लेख त्यामुळे येथे द्यावासा वाटला. श्रदधांजली
==========================

माणसाला जिवंतपणी देवत्व केव्हा प्राप्त होते? जेव्हा त्याच्यावर अक्षरशः भक्तीच करणारे लाखो अनुयायी समाजात तयार झालेले असतात तेव्हा! हयातीतच दंतकथा ठरावी अशी काही व्यक्तिमत्त्वे असतात. त्यांच्यावर आरोप असतात, खटले असतात, त्यांच्याबाबत संमिश्र भावना असतात, त्यांचे स्पर्धक असतात, शत्रू असतात, ते बदनाम झालेले असू शकतात आणि ते तिरस्कारास पात्रही झालेले असू शकतात. पण मुळात त्यांचे अनुयायी इतक्या प्रचंड संख्येने असतात की निव्वळ लोकप्रियतेच्या जोरावर अशी व्यक्तीमत्त्वे पुन्हापुन्हा सर्वोच्चपदी विराजमान होत राहतात.

अम्मा उर्फ जयललिथा हे असेच एक व्यक्तीमत्त्व!

१९४८ साली कर्नाटकात जन्म झालेल्या जयललितांचे त्यांच्या आईने ठेवलेले नांव होते कोमलावली! जयराम आणि वेदावली ह्या तमीळ ब्राह्मण असलेल्या जोडप्याला झालेल्या ह्या कन्यारत्नाचे आजोबा हे म्हैसूरच्या राजाच्या पदरी म्हणजे जयचंराजेंद्र वडियारच्या पदरी शल्यविशारद म्हणून कार्यरत असत. त्या राजाच्या नावाचा 'जय किंवा जया' हा भाग म्हणूनच त्यांनी आपल्या कुटुंबियांमधील अनेकांच्या नावांसोबत जोडलेला होता.अश्याच प्रकारे जयललिता ह्यांचे नांव जयललिता असे ठरले. जयललिता दोनच वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि जयललितांना घेऊन त्यांची आई बंगळूरू येथे स्वतःच्या माहेरी स्थलांतरीत झाली. कुटुंबाला हातभार म्हणून जयललितांची आई तमिळनाडूमधील चेन्नई येथे जाऊन चित्रपटात कामे करू लागली तर जयललिता बंगळूरूमध्येच राहून शिकू लागल्या. उर्वरीत शालेय शिक्षण मात्र त्यांनी चेन्नईतून पूर्ण केले.

जात्याच बुद्धीमान असलेल्या जयललिता ह्या दहावीत केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण तमिळनाडूत पहिल्या आल्या. त्यांना त्यासाठीचे गोल्ड स्टेट अ‍ॅवॉर्ड मिळाले. ह्या गुणवत्तेमुळे त्यांच्यासमोर चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजने प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवला जो त्यांनी नाकारला. जयललितांचे भाषाप्रभूत्व अजब आहे. त्या कन्नडा, तमिळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी व इंग्लिश ह्या भाषांमध्ये लीलया बोलू शकतात.

मात्र जयललितांना चित्रपट क्षेत्राचे वेड होते. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांना त्या क्षेत्रात संधी मिळावी ह्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून उन्हाळी सुट्टीतच शूटिंग घेतले जावे असा आग्रह आईने चित्रपट निर्मात्यांकडे धरला व तो मान्यही करण्यात आला.

वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी म्हणजे इ.स. १९६४ मध्ये जयललिता ह्यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट केला. हा चित्रपट कन्नड भाषेतील चित्रपट होता. पुढच्याच वर्षी त्यांनी तमिळ व पाठोपाठ तेलुगु सिनेमातही प्रवेश मिळवला. तमिळ सिनेमामध्ये स्कर्ट घालणार्‍या जयललिता ह्या पहिल्या अभिनेत्री होत्या. १९६८ साली त्यांनी धर्मेंद्र ह्या अभिनेत्यासोबत इज्जत हा हिंदी चित्रपटही केला.

सहसा असे दिसते की प्रमुख अभिनेता किंवा हिरो हा वर्षानुवर्षे हिरोच्याच भूमिका करत राहतो व त्याच्यासमोर हिरॉईन म्हणून उभी ठाकलेली अभिनेत्री बदलत जाते. तब्बल दोन दोन दशके तोच अभिनेता हिरो असूनही नवनवीन हिरॉईन्ससोबत तो काम करत राहतो. जयललितांच्या बाबतीत नेमके उलट झाले. प्रमुख अभिनेत्रीच्या पदावर त्या दोन दशकांइतका काळ कायम राहिल्या. नवनवीन प्रमुख अभिनेते येऊन त्यांचे को-स्टार्स होत राहिले. इतके अद्भुत वलय आणि इतकी अफाट लोकप्रियता जयललितांना कशी मिळाली?

तर तमिळनाडूचे महान व लोकप्रिय अभिनेते एम जी रामचंद्रन ह्यांच्यासह जयललिता ह्यांनी केवळ १९६५ ते १९७३ ह्या आठच वर्षांच्या कालावधीत २८ सुपरहिट सिनेमे दिले. हा प्रवास अजब आणि अविश्वसनीय होता. जनतेने जणू एम जी आर आणि जयललिता ह्यांची जोडी मनात ठरवूनच टाकलेली होती.

त्याचवेळी इतर भाषिक चित्रपटांमध्ये जयललितांच्या एकसे एक सरस आणि अतिशय लोकप्रिय ठरणार्‍या भूमिका समोर येत राहिल्या.

ए नागेश्वर राव ह्या अभिनेत्यासोबत त्यांनी आठ चित्रपट केले व ते सर्व लोकप्रिय ठरले. तसेच जयशंकर ह्या अभिनेत्यासोबत जयललितांनी केलेले आठ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. तेलुगु अभिनेते टी रामा राव ह्यांच्याबरोबर केलेले बारा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरले. तमीळ अभिनेता रवीचंद्रनसहित केलेले दहाच्या दहा चित्रपट लोकप्रिय ठरले.

एकुण काय, तर जयललिता ह्या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत जणू परिसाप्रमाणे ठरल्या होत्या. ज्या चित्रपटात त्या असतील तो सुपरहिट होणारच असे जणू समीकरण झालेले होते. लोकप्रियता अमाप वाढत चाललेली होती. मुळातच दाक्षिणात्य प्रेक्षक हे इतर भाषिक प्रेक्षकांच्या तुलनेत आपल्या आवडत्या कलाकारावर सर्वस्व उधळून प्रेम करतात. त्यात जयललितांची कारकीर्द म्हणजे 'बघाल तेथे दैदीप्यमान यश' अशी होती. उघड होते की जयललितांनी लोकप्रियतेची परमावधी गाठली.

१९७२ साली जयललिता ह्यांनी पट्टिकडा पट्टनमा ह्या तमीळ चित्रपटात शिवाजी गणेशन ह्यांच्यासोबत केलेल्या भूमिकेला फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले. पाठोपाठ आलेल्या सूर्यकांथी ह्या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी श्रीकृष्ण सत्य ह्या तेलुगु चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला व तोही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचाच! दैवा मगन हा त्यांची व शिवाजी गणेशन ह्यांची भूमिका असलेला तमीळ चित्रपट असा पहिलाच तमीळ चित्रपट जो अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स फॉर फॉरीन लँग्वेज ह्या सदरात स्पर्धेसाठी पाठवला गेला.गंमत म्हणजे जयललिथा ह्यांनी शिवाजी गणेशन ह्यांची हिरॉईन म्हणून १७ तर त्यांची मुलगी ह्या भूमिकेतही एक चित्रपट केला. ह्यावरून लक्षात यावे की प्रमुख अभिनेत्रीपदी जयललिता किती प्रदीर्घकाळ टिकून राहिल्या.

जयललितांच्या लोकप्रियतेची आकडेवारी स्तिमित करणारी आहे. तमीळ सिनेमात ९२ पैकी ८५ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली देणारे होते. तेलुगु भाषेत केलेल सर्वच्या सर्व २८ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली हिट्स होते. १९६५ ते १९८० ह्या काळात त्या भारतातील सर्वाधिक मानधन मिळवणार्‍या अभिनेत्री होत्या. १९ वर्षांत त्यांनी १२५ चित्रपटांमध्ये हिरॉईनची भूमिका केली व त्यातील चक्क ११७ चित्रपट सुपरहिट ठरले.

ह्यापेक्षा अधिक वलय काय असू शकेल?

ह्या सगळ्या अद्भुत वाटचालीनंतर जयललिता ह्यांनी राजकारणात प्रवेश केला. एम जी आर ह्यांच्या ए आय ए डी एम के पक्षात त्या सामील झाल्या. तेथे त्यांनी स्त्रीशक्तीवर दिलेले भाषण गाजले. लवकरच त्यांना नियोजन सचिव बनवण्यात आले. १९८४ ते १९८९ त्या राज्यसभेच्या सदस्य म्हणून नियुक्त केल्या गेल्या.

एम जी आर ह्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी ह्यांना अल्पकाळ तमिळनाडूची सत्ता मिळाली पण तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी ३५६ व्या कलमाचा वापर करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर १९८९ साली एम जी आर ह्यांच्या राजकीय वारसदार म्हणून जयललिता ह्या विरोधी पक्षाच्या पहिल्या स्त्री नेत्या ठरल्या.

२५ मार्च १९८९ रोजी एक अतिशय वाईट घटना घडली. विधानसभेत झालेल्या अतिशय हिंसक आंदोलनात डी एम के च्या नेत्यांनी विरोधकांवर अक्षरशः हल्लाबोल केला. त्यात जयललितांच्या स्त्रीत्त्वाचा उघड अपमान करण्यास ते कचरले नाहीत. त्यांनी जयललितांच्या साडीलाही हात घातला. फाटकी साडी घेऊन कृद्ध नजरेने जयललिता सभागृहातून बाहेर पडल्या. ही घटना जनतेला समजली आणि तमिळनाडूत एकच संतापाची लाट उसळली. हे दुष्कृत्य करणार्‍यांच्या विरोधात प्रचंड जनमत एकवटले. जयललितांची तुलना साहजिकच महाभारतातील द्रौपदीशी केली जाऊ लागली. भडकलेल्या जयललितांनी पुढे काँग्रेसशी हातमिळवणी केली व पुढील निवडणूकीत २३४ पैकी २२५ जागा मिळवून अफाट बहुमताने तमिळनाडूच्या पहिल्या स्त्री व सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून जयललिता विराजमान झाल्या.

त्या क्षणापासून आजतागायत तमिळनाडू आणि एकुणच भारताच्या राजकारणात जयललिता ह्यांचे स्थान वादातीत राहिलेले आहे. लोकप्रियतेचे अक्षरशः नवनवे विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. १९९१ - १९९६, २००१, २००२-२००६, २०११ - २०१४ आणि २०१५ पासून पुढे अश्या पाच वेळा त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे, आजही सांभाळत आहेत.

संपत्ती जाहीर करण्यावरून ओढवलेल्या वादात त्यांच्या लोकप्रियतेला तडे गेले होते खरे पण न्यायालयाने त्यांना निर्दोष जाहीर करताच त्यांच्या लोकप्रियतेने पुन्हा पहिलीच उत्तुंग पातळी गाठली व तमिळनाडूची सत्ताही त्यांच्या हातात पुन्हा सोपवली.

'अम्मा कॅन्टीन' हा अत्यंत अभिनव उपक्रम सुरू करण्याचे श्रेयही जयललितांकडे जाते. समाजातील अतिशय गरीब घटकांसाठी स्वस्तात अन्न विकण्याची योजना असे ह्या कॅन्टीनचे स्वरूप असते. कढीभातासारखे बेसिक अन्न तेथे केवळ पाच रुपयांना उपलब्ध होते. ह्या कॅन्टीनला एक इडली एक रुपयाला तर दोन पोळ्या आणि आमटी तीन रुपयांना मिळू शकतात. असे म्हंटले जाते की अवघ्या भारताने आणि तमाम राजकारण्यांनी घटकाभर थांबून ह्या योजनेच्या परिणामकारकतेचा विचार करायला हवा. जर गरीबांपुढील अन्नाचा प्रश्न इतक्या सहज सुटला तर समाजातील कित्येक आपत्ती नष्टच होतील.

जयललितांकडे असलेल्या साड्या, चपलांचे जोड आणि त्यांची बांधली गेलेली मंदिरे ही नेहमीच कुतुहलमिश्रीत चर्चेचा विषय बनलेली आहेत.

जयललितांवर त्यांचे नशीब प्रसन्न असेलही पण समजून घेण्यासारखी बाब ही आहे की त्यांनी आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर काहीतरी धक्कादायक किंवा धाडसी पाऊल उचलले. पंधराव्या वर्षी हिरॉईन होणे, तमिळनाडूतील त्या काळातील संस्कृतीत स्कर्ट घालून पडद्यावर येणे, धाडसी दृश्ये देणे, सत्तेसाठी जोर लावणे, लोकप्रियता आणि लाईमलाईट कमी होणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेणे!

थोडक्यात, सौंदर्य आणि प्रतिभेला त्यांनी कुशाग्र बुद्धीची जोड दिली तेव्हा कुठे आज दिसणारी अम्मा निर्माण झाली.

भारतीय राजकारण व दाक्षिणात्य चित्रपट ह्यावर एक कायमस्वरुपी ठसा उमटवण्यात जयललिता ह्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही हे नक्कीच!

==================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयललिथा नव्हे जयललिता... त्यांच्याकडे स्पेलिंग जरी तसे असेल तरी उच्चार साध्या 'त' सारखाच असतो Happy
बाकी लेख छानेय. सध्या तमिळ मित्र मंडळ जास्त असल्याने काल पासून एकच विषय चर्चेला आहे.

रीया, टोचा - धन्यवाद! मला वाटायचे की त्यांच्याकडे तसा उच्चार करतात म्हणजे आपण तसेच लिहायला हवे. सुधारणा करतो.

एका प्रसिद्ध मुलाखतीमध्ये जयललिता म्हणाल्या की, चित्रपटांत येणं हा आईचा निर्णय होता, आणि राजकारणात येणं हा एम्जीआरचा निर्णय. जर मला संधी मिळाली असती तर मी माझ्यासाठी ही दोनही क्षेत्रे निवडली नसती.

अफाट लोकप्रियता मिळूनही जयललिता कधीच चीप वागल्या नाहीत. आक्रस्ताळी भाषणे, आरडाओरडा, पातळी सोडून बोलणे हे त्यांनी कधीही केले नाही. तमिळनाडूचे राजकारण हे कायमच गुंडांसारखे, रावडी आणि आक्रस्ताळे राहिले आहे. अम्मांनी ते सर्व एकहाती बदलून दाखवले. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनदेखील लोकांना दाख्वण्यापुरते सभेमध्ये साध्या साड्या नेसणे वगैरे करून त्यांनी कधी स्वतःचे वागणे "स्वस्त" केले नाही.

त्यांचं बहुतांश काम हे ऑटोक्रेटिक होते. इतरांवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. प्रत्येक निर्णय हा त्यांच्या हाताखालूनच जात असे. तरीही, त्यांनी माणसं टिकवून ठेवली. पक्ष भरभक्कम केला. २०१५ मधे त्या निवडणुक् हरणारच असा बहितेक लोकांचा होराहोता तो खोटा ठरवत त्या निवडून आल्या. त्यांनी अनेक लोकप्रिय योजनांची आश्वासने दिली. ती आश्वासने पूर्णदेखील केली. मुलींना सायकली, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, दप्तरं, ग्ग्रामीण भागात ग्राईंडर, फॅन अशा अनेक फ्री वस्तू दिल्या.

त्यांच्या अम्मा कँटीन ही योजना मला विशेष आवडली आहे. मुळात चेन्नईकडे जेवण स्वस्त आणि उत्तम मिळते तरीही लोकांसाठी पाच रूपयांत सांबार राईस त्यांनी उपलब्ध् करून दिला.

त्यांच्या जाण्याने तमिळनाडूच्याच काय, देशाच्याही राजकारणाचे नुकसान झाले आहे. श्रद्धांजली!!!

सांबार राईस ना!
नशीब!
इथे वर लेखात कढीभात वाचून मला जयललिता गुजरातच्या होत्या की काय असे वाटले क्षणभर.
कुठल्या तरी इंग्रजीवाल्याने सांबारराईस चे करीराईस आणि मग यांनी कढीभात केले असणार!

जात्याच बुद्धीमान असलेल्या जयललिता ह्या दहावीत केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण तमिळनाडूत पहिल्या आल्या. त्यांना त्यासाठीचे गोल्ड स्टेट अ‍ॅवॉर्ड मिळाले.

वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी म्हणजे इ.स. १९६४ मध्ये जयललिता ह्यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट केला. हा चित्रपट कन्नड भाषेतील चित्रपट होता.

>>>>

सही आहे. म्हणजे दहावीत अभ्यासात एवढा मोठा पराक्रम करून लगेचच चित्रपटातही पदार्पण Happy

चांगली माहिती दिलीत. जयललिता यांना श्रद्धांजली!

तो व्हॉटस अप वरचा फोटो त्यांच्या अनुपम सौंदर्याचा नमुना आहे.

वरचा फोटो जयललिता यांचा नाही. त्यांच्या मुलीचा आहे/ असावा. त्यांची शोभन बाबु नावाच्या अभिनेत्यापासुन झालेली एक मुलगी आहे अशी वदंता आहे. हा फोटो तिचा आहे असे नेटवर वाचले. ख खो दे जा.

अरे खरंच की, मी कढीभात कसं काय लिहिलं! Lol

फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर आला आणि नवाच वाटला म्हणून टाकला. नाहीतर नेटवरनंच टाकले असते. असो.

इथे वर लेखात कढीभात वाचून मला जयललिता गुजरातच्या होत्या की काय असे वाटले क्षणभर.

>>>आम्ही महाराष्ट्रात पण कढीभात खातो. मग जयललीता महाराष्ट्रीयन वाटायला हरकत नव्हती. Wink

गिरीकंद,
मी ट्रिपल शेजवान फ्राईड राईसपण खाते हो कर्नाटकात.
पण कर्नाटकाची ओळख ती नाही.
दक्षिणेत सांबार राईस, महाराष्ट्रात वरण भात नाहीतर पिठलं भाकरी आणि गुजरातेत कढी भात असं साधारण कंफर्ट फूड मानलं जातं.
पंजाबी दालरोटी खातात(सरसोंका साग /मक्केदी रोटी त्यांचं कंफर्ट फूड नाही.)

त्या त्या जनतेला तिचं तिचं कंफर्ट फूड्/पोटभरीचं अन्नं स्वस्तात द्यावं असा साधारण राजकीय नेत्यांच्या स्वस्त अन्न योजनेचा हेतू असतो.
म्हणून मला कढीभात वाचून आश्चर्य वाटलं इतकंच!

जयललिता ह्यांना श्रद्धांजली!

जयललिता ह्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल कोणी सविस्तर लिहू शकेल का?
त्या पाच-पाचदा मुख्यमंत्री झाल्या ते चित्रपटातल्या लोकप्रियतेमुळे नक्कीच नसेल. त्यांचं प्रशासन कसं होतं, कुठले निर्णय घेतले, राजकारण / खेळ्या ह्याबद्दल वाचायला आवडेल.
त्यांच्या राजकारणाची पटकन आठवणारी उदाहरणं म्हणजे वायपेयी सरकारला पाठींबा देणार पत्र राष्ट्रपतींना पाठवायला तमिळ भाषेच्या दर्जावरून दोन-तीन दिवस उशीर केला होता आणि नंतर पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांना श्रीलंका दौर्‍यावर जायला तमिळ कार्ड वापरून परावृत्त केलं होतं. पण हे इमोशनल राजकारण वगळता आणखी सविस्तर वाचायला आवडले.
सध्या येत असलेल्या लेखांमध्ये जास्त भर हा चित्रपटांच्या संख्येबद्दलच आहे!

बेफिकीर, लेख आवडला.

त्या अय्यंगार फॅमीलित जन्मल्या होत्या. म्हणजे तामीळ ब्राह्मण. त्यांचे आजोबा म्हैसूरच्या राजांकडे सर्जन म्हणून नोकरीला होते. त्यांनी खूप पैसा कमावला. तो बहुधा जयललितांच्या वडिलांनी उधळ्ला. त्या दोन वर्षांच्या असताना वडील वारले. त्यांच्या आईनी त्यांचा कसा सांभाळ केला आणि उर्वरित राजकीय आयुष्य या बद्द्ल त्या खूप छान बोलल्या आहेत, सिमी गरेवालच्या मुलाखतीत.

तरुणपणी त्यांचे क्रश कोण होते तर नरी काँट्रॅक्टर आणि शम्मी कपूर.

https://www.youtube.com/watch?v=DzqLo_1SPZg&t=645s

https://www.youtube.com/watch?v=Cf2bU9xD-3E&t=2s

माफ करा पण हा लेख विकिपीडियाछाप झाला आहे. अम्मा, त्यांचे exploitation त्यातून सावरलेली राजकारणी हे अनेक पैलू त्यांच्या आयुष्याला होते. त्यात खरी गोष्ट लपली आहे.
थोडं फिल्मी अंदाजात बघ्यायचे असेल तर इरुवर सिनेमा बघा.

टण्या +१
तमीळ सिनेमा आणि राजकारण यांचं घट्ट नातं आहे हे आपल्याला माहीतीच आहे. पण ते तसे का आहे हे समजण्यासाठी तमीळ सिनेमा, त्यामागची द्रविडीयन चळवळ, त्यातून पुढे आलेल्या अभिनेत्यांना-अभिनेत्रींना साक्षात देव मानणे आणि मग त्यांनी पुढे राजकारणात जाऊन आपापल्या विचारधारेप्रमाणे बर्‍यापैकी फिल्मी पद्धतीने राजकारण करणे हे सगळं बघणं फारच इंटरेस्टिंग आहे. जयललिता ह्यांचे आयुष्य ही काही कमी फिल्मी नव्हते.
त्यांच्याकडे असलेली अफाट संपत्ती, भ्रष्टाचार, अत्यंत गुप्त पद्धतीने काम करणे, एकाधिकारशाही ह्या सगळ्याशी आपण परिचीत असलो तरी "अम्मा" म्हणजे काय रसायन आहे हे तमीळनाडुमध्ये गेल्यावरच कळू शकते. गरीब, स्त्रीया आणि जातीच्या उतरंडीवर खाली असणार्‍या लोकांसाठी "अम्मा" साक्षात देवीच होत्या.
१० रुपयात जेवण, १ रु किलो तांदुळ, मोफत सॅनिटरी नॅपकीन, मोफत लॅपटॉप हे सगळं "मत मिळवायला वापरलेले पॉप्युलिस्ट फंडे" एवढंच नसून त्यामागे त्यांच्या "वेल्फेअर स्टेट" चालवण्याचा प्रयत्नही होता. शाळेत मुलांच्या वडलांचे नाव असलेच पाहिजे ही सक्ती त्यांनी मोडली. "स्त्री सशक्तीकरणा"चे त्यांनी प्रयत्न केले त्याहूनही जास्त त्यांच्या "असण्या"ने तमीळ स्त्रियांना जी प्रेरणा मिळाली, ती महत्वाची.
आपल्यावर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विरोधकांच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्री बनणारी आणि करुणानिधीना अपमानास्पद पद्धतीने अटक करणारी स्त्री मला फार आवडते. जयललितांना श्रद्धांजली.

जयललितांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचार, भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध न केलेली कारवाई, आपल्या पक्षातून आणि मंत्रिमंडळातून हद्दपार केलेली लोकशाही, व्यक्तिपूजेला दिलेलं प्रोत्साहन यां बाबी लक्षात घेऊनही मला त्यांच्याबद्दल आदर आहे. कारण -

१. अफाट जिद्द. केवढे अपमान सोसले त्यांनी! त्या सगळ्यांना पुरून उरल्या. विधिमंडळात त्यांची साडी फेडली गेली, तेव्हा त्या कपड्यांचे अनेक थर घालून वावरू लागल्या. आज जे त्यांचे गोडवे गात आहेत, त्याच लोकांनी अल्पजीवी सरकार पाडलं म्हणून जयललितांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्यांनी न बदललेल्या धर्माबद्दल कितीतरी वावड्या उठवल्या. ममता, मायावती यांच्याप्रमाणे कधीही थयथयाट न करता त्या शांतपणे विरोधकांना नामोहरम करत राहिल्या.

२. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर स्त्रीभृणहत्या रोखण्यासाठी उचललेली पावलं. याचा परिणाम म्हणून तमीळनाडूतलं प्रमाण हजारामागे ९९६ इतकं झालं.
३. अम्मा कँटिन
४. स्वस्त दरातले बी-बियाणे
५. स्वस्त वैद्यकीय सुविधा (परवडणारी औषधं, वैद्यकीय तपासण्या, डायलिसिससारखे उपचार)
६. स्वस्त सिमेंट
७. चेन्नईला 'एशियाचं डेट्रॉइट' बनवलं.
८. आज भारतात सर्वत्र प्रचलित असणारं रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वप्रथम तमीळनाडूमध्ये बंधनकारक झालं.
९. भारतातलं पहिलं स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेलं पोलिस स्टेशन,
१०. तृतीयपंथीयांसाठीच्या योजना, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेली पावलं.
११. बंगळुरूत फोफावलेला बायोटेक्नॉलॉजी हब चेन्नईकडे वळवण्याचे प्रामाणिक प्रयत्न.
१२. प्रशासकीय अधिकार्‍यांना दिलेली मोकळीक
१३. तमीळनाडूचा पाणीप्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले.
१४. चेन्नईचे, तमीळनाडूतले रस्ते सुधारण्यावर भर दिला. राज्यांतर्गत वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले.

अम्मांच्या योजनांमुळे राज्यावर असलेलं कर्ज वाढलं, पण तमीळनाडूच्या एकंदर प्रगतीमुळे ते डोईजडही झालं नाही, असं आकडेवारी सांगते.

अनेक मानांकनांनुसार तमीळनाडू भारतातल्या सर्वोत्तम राज्यांपैकी एक आहे. सर्वांत वेगानं प्रगती करणार्‍या राज्यांच्या यादीत तमीळनाडू दुसर्‍या नंबरावर आहे.

जातिभेद, गुन्हे, स्त्रियांवर होणारे अत्याचार या बाबतीत तमीळनाडूचं रेकॉर्ड उत्तम आहे.

जयललितांनी लॅपटॉप, पंखे, दिवे इत्यादी फुकट वाटण्याचा सपाटा लावला, पण ही पद्धत मुळात द्रमुकची होती. बाईंनी ती पुढे चालू ठेवली. द्रमुकच्या भ्रष्टाचाराचाही बाईंनी फायदा करून घेतला. दिल्लीवर राज्य करण्याची त्यांची इच्छा नसावी. हेही एक फायद्याचं ठरलं.

तमीळनाडूत सिनेमाचं जास्तीत जास्त तिकीट पूर्वी १२० रुपये होतं. आता ते १५० रुपये झालं. अजूनही कितीही महागड्या थेटरात समोरची रांग १० रुपयांची असते. अम्मा मला या कारणासाठी आवडायला लागल्या.चेन्नईच्या, तमीळनाडूच्या खेपा वाढल्या, तसं सर्वत्र दिसणार्‍या अम्मांबद्दल मला विलक्षण कुतुहल वाटलं. त्यातच माझी अत्यंत आवडती असलेली अण्णा सेंटेनरी लायब्ररी दुसरीकडे नेण्याचा त्यांनी घाट घातला. पुढे कोर्टानं त्यांना तसं करू दिलं नाही. आणि अम्मांबद्दल मला वाटत असलेलं आकर्षण कायम राहिलं. मद्रास विद्यापीठाशेजारी विधानसभा आहे. विद्यापीठात जातायेताना दोनतीनदा अम्मांचा ताफा माझ्या समोरून गेला. पहिल्यांना त्यांची गाडी येते आहे, हे कळल्यावर लोकांना रस्त्यातच लोटांगण घालत नमस्कार केले होते. पुढे या प्रकाराची सवय झाली. ऑगस्ट महिन्यातही विद्यापीठातून बाहेर पडताना अम्मांचा ताफा समोरून गेला. किलोमीटरभर रांग नमस्कार करायला उभी होती.

त्यांचा लख्ख गोरा रंग, सुंदर इंग्रजी, खानदानी जरब आणि अम्मा अशी जनमानसांत झालेली प्रतिमा यांचाही जयललितांना तमीळनाडू काबीज करताना फायदा झालाच असणार.

अण्णा विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, आयआयटी इथल्या विद्यार्थ्यांशी अम्मांबद्दल चर्चा झाल्या तर बाईंना गरिबांबद्दल असलेला कळवळा, तमीळनाडू हे कल्याणकारी राज्य व्हावं यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचा भ्रष्टाचार हे तीन मुद्दे यायचे. भ्रष्टाचारी सर्वच नेते आणि पक्ष आहेत / होते. समर्थकांनी अम्मांच्या योजना आणि आपल्यावर राज्य करणारी राणीसारखी आई निवडली.

बाईंची देशीवादी मतं, तमीळनाडू एखादं स्वतंत्र राष्ट्र आहे, अशा थाटात राज्याबद्दल बोलणं, तमीळ जनतेचा सतत कैवार घेणं या बाबीही महत्त्वाच्या होत्या.

*

हल्लीच्या सक्तीवरून आठवलं. त्यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं - 'तमीळ जनतेचा हिंदीला विरोध नाही, हिंदीच्या सक्तीला आहे. सक्ती कराल तर हिंदीला नाकारतच राहू.'

*

बेफिकीर,
अम्मा कँटिन फक्त गरिबांसाठी नाही. सुटाबुटातलेही तिथे जेवतात. मीही तिथे खाल्लं आहे. अत्यंत स्वच्छ ठिकाणं आहेत ही.

*

शशिकला आणि तिचे कुटुंबीय यांची कारस्थानं, तथाकथित विषप्रयोग इत्यादी माहीत असूनही अम्मांनी तिला पुन्हा घरात घेतलं. आज अम्मांचा मृतदेह आणि शेजारी उभी असलेली शशिकला बघून फार वाईट वाटत होतं. अम्मांचे अंतिमसंस्कार शशिकलेने केले. राष्ट्रध्वजही तिने स्वीकारला. नव्या मुख्यमंत्र्यांनी आता तिला तिचं स्थान दाखवणं अत्यावश्यक आहे.

चिनुक्स+1.

बाईचं इंग्रजी अप्रतिम होतं. युट्युबवर बरेच व्हिडिओ आहेत मुलाखत इत्यादींचे.

>>>>लेख विकीपिडीया+शाळा निबंध स्वरूपाचा झाला आहे. वाचायला मजा आली नाही.<<<<

टण्या आणि सायो,

आक्षेप मान्य आहेच. पण हा लेख परिचयपर लेखांपैकी एक म्हणून होता. जयललिता गेल्यानंतर त्यांच्याबद्दल काही खास / विशेष वेगळे असे लिहावे अश्या उद्देशाने हा लिहिलेला नाही व जयललितांच्या राजकीय कारकीर्दीबाबत मला विशेष खास अशी माहितीही नाही कारण तमिळनाडूचे राजकारण हा विषय विशेष आवडीचा नव्हता. (जेवढे सहज माहिती व्हायचे तेवढेच माहीत होते).

चिनूक्स,

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार!

मला जयललितांच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. लेख आणि त्यावरचे प्रतिसाद दोन्हीमुळे माहिती बरीच मिळाली.
चिनूक्स ची पोस्ट फारच माहितीपूर्ण.

या निमित्ताने जयललिता गेल्यानंतर का होईना त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळतेय. त्यांच्याबद्दल आदरही वाढतोय. जर एखाद्या व्यक्तीने समाजासाठी काही चांगले केले असेल तर ते माहीत होणे केव्हाही चांगलेच. बाकी धुतल्या तांदळाचा कोणीही नसतो ईथे, धुतल्या तांदळाचा टिकूही शकत नाही या सिस्टीममध्ये. सर्वच माहितीपुर्ण पोस्टबद्दल धन्यवाद.

छान लेख .
जयललिता ह्यांना श्रद्धांजली!
चिनूक्स,
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार! >> +1

Pages