जयललिता

Submitted by बेफ़िकीर on 6 December, 2016 - 04:09

काही महिन्यांपूर्वी एका अंकासाठी जयललिथा ह्यांच्यावर एक लेख लिहिलेला होता. काल जयललिथा ह्यांचे निधन झाले. त्यांच्यावरचा हा लेख त्यामुळे येथे द्यावासा वाटला. श्रदधांजली
==========================

माणसाला जिवंतपणी देवत्व केव्हा प्राप्त होते? जेव्हा त्याच्यावर अक्षरशः भक्तीच करणारे लाखो अनुयायी समाजात तयार झालेले असतात तेव्हा! हयातीतच दंतकथा ठरावी अशी काही व्यक्तिमत्त्वे असतात. त्यांच्यावर आरोप असतात, खटले असतात, त्यांच्याबाबत संमिश्र भावना असतात, त्यांचे स्पर्धक असतात, शत्रू असतात, ते बदनाम झालेले असू शकतात आणि ते तिरस्कारास पात्रही झालेले असू शकतात. पण मुळात त्यांचे अनुयायी इतक्या प्रचंड संख्येने असतात की निव्वळ लोकप्रियतेच्या जोरावर अशी व्यक्तीमत्त्वे पुन्हापुन्हा सर्वोच्चपदी विराजमान होत राहतात.

अम्मा उर्फ जयललिथा हे असेच एक व्यक्तीमत्त्व!

१९४८ साली कर्नाटकात जन्म झालेल्या जयललितांचे त्यांच्या आईने ठेवलेले नांव होते कोमलावली! जयराम आणि वेदावली ह्या तमीळ ब्राह्मण असलेल्या जोडप्याला झालेल्या ह्या कन्यारत्नाचे आजोबा हे म्हैसूरच्या राजाच्या पदरी म्हणजे जयचंराजेंद्र वडियारच्या पदरी शल्यविशारद म्हणून कार्यरत असत. त्या राजाच्या नावाचा 'जय किंवा जया' हा भाग म्हणूनच त्यांनी आपल्या कुटुंबियांमधील अनेकांच्या नावांसोबत जोडलेला होता.अश्याच प्रकारे जयललिता ह्यांचे नांव जयललिता असे ठरले. जयललिता दोनच वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि जयललितांना घेऊन त्यांची आई बंगळूरू येथे स्वतःच्या माहेरी स्थलांतरीत झाली. कुटुंबाला हातभार म्हणून जयललितांची आई तमिळनाडूमधील चेन्नई येथे जाऊन चित्रपटात कामे करू लागली तर जयललिता बंगळूरूमध्येच राहून शिकू लागल्या. उर्वरीत शालेय शिक्षण मात्र त्यांनी चेन्नईतून पूर्ण केले.

जात्याच बुद्धीमान असलेल्या जयललिता ह्या दहावीत केवळ शाळेतच नव्हे तर संपूर्ण तमिळनाडूत पहिल्या आल्या. त्यांना त्यासाठीचे गोल्ड स्टेट अ‍ॅवॉर्ड मिळाले. ह्या गुणवत्तेमुळे त्यांच्यासमोर चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजने प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवला जो त्यांनी नाकारला. जयललितांचे भाषाप्रभूत्व अजब आहे. त्या कन्नडा, तमिळ, तेलुगु, मल्याळम, हिंदी व इंग्लिश ह्या भाषांमध्ये लीलया बोलू शकतात.

मात्र जयललितांना चित्रपट क्षेत्राचे वेड होते. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांना त्या क्षेत्रात संधी मिळावी ह्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून उन्हाळी सुट्टीतच शूटिंग घेतले जावे असा आग्रह आईने चित्रपट निर्मात्यांकडे धरला व तो मान्यही करण्यात आला.

वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी म्हणजे इ.स. १९६४ मध्ये जयललिता ह्यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट केला. हा चित्रपट कन्नड भाषेतील चित्रपट होता. पुढच्याच वर्षी त्यांनी तमिळ व पाठोपाठ तेलुगु सिनेमातही प्रवेश मिळवला. तमिळ सिनेमामध्ये स्कर्ट घालणार्‍या जयललिता ह्या पहिल्या अभिनेत्री होत्या. १९६८ साली त्यांनी धर्मेंद्र ह्या अभिनेत्यासोबत इज्जत हा हिंदी चित्रपटही केला.

सहसा असे दिसते की प्रमुख अभिनेता किंवा हिरो हा वर्षानुवर्षे हिरोच्याच भूमिका करत राहतो व त्याच्यासमोर हिरॉईन म्हणून उभी ठाकलेली अभिनेत्री बदलत जाते. तब्बल दोन दोन दशके तोच अभिनेता हिरो असूनही नवनवीन हिरॉईन्ससोबत तो काम करत राहतो. जयललितांच्या बाबतीत नेमके उलट झाले. प्रमुख अभिनेत्रीच्या पदावर त्या दोन दशकांइतका काळ कायम राहिल्या. नवनवीन प्रमुख अभिनेते येऊन त्यांचे को-स्टार्स होत राहिले. इतके अद्भुत वलय आणि इतकी अफाट लोकप्रियता जयललितांना कशी मिळाली?

तर तमिळनाडूचे महान व लोकप्रिय अभिनेते एम जी रामचंद्रन ह्यांच्यासह जयललिता ह्यांनी केवळ १९६५ ते १९७३ ह्या आठच वर्षांच्या कालावधीत २८ सुपरहिट सिनेमे दिले. हा प्रवास अजब आणि अविश्वसनीय होता. जनतेने जणू एम जी आर आणि जयललिता ह्यांची जोडी मनात ठरवूनच टाकलेली होती.

त्याचवेळी इतर भाषिक चित्रपटांमध्ये जयललितांच्या एकसे एक सरस आणि अतिशय लोकप्रिय ठरणार्‍या भूमिका समोर येत राहिल्या.

ए नागेश्वर राव ह्या अभिनेत्यासोबत त्यांनी आठ चित्रपट केले व ते सर्व लोकप्रिय ठरले. तसेच जयशंकर ह्या अभिनेत्यासोबत जयललितांनी केलेले आठ चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. तेलुगु अभिनेते टी रामा राव ह्यांच्याबरोबर केलेले बारा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरले. तमीळ अभिनेता रवीचंद्रनसहित केलेले दहाच्या दहा चित्रपट लोकप्रिय ठरले.

एकुण काय, तर जयललिता ह्या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत जणू परिसाप्रमाणे ठरल्या होत्या. ज्या चित्रपटात त्या असतील तो सुपरहिट होणारच असे जणू समीकरण झालेले होते. लोकप्रियता अमाप वाढत चाललेली होती. मुळातच दाक्षिणात्य प्रेक्षक हे इतर भाषिक प्रेक्षकांच्या तुलनेत आपल्या आवडत्या कलाकारावर सर्वस्व उधळून प्रेम करतात. त्यात जयललितांची कारकीर्द म्हणजे 'बघाल तेथे दैदीप्यमान यश' अशी होती. उघड होते की जयललितांनी लोकप्रियतेची परमावधी गाठली.

१९७२ साली जयललिता ह्यांनी पट्टिकडा पट्टनमा ह्या तमीळ चित्रपटात शिवाजी गणेशन ह्यांच्यासोबत केलेल्या भूमिकेला फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले. पाठोपाठ आलेल्या सूर्यकांथी ह्या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी श्रीकृष्ण सत्य ह्या तेलुगु चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला व तोही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचाच! दैवा मगन हा त्यांची व शिवाजी गणेशन ह्यांची भूमिका असलेला तमीळ चित्रपट असा पहिलाच तमीळ चित्रपट जो अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स फॉर फॉरीन लँग्वेज ह्या सदरात स्पर्धेसाठी पाठवला गेला.गंमत म्हणजे जयललिथा ह्यांनी शिवाजी गणेशन ह्यांची हिरॉईन म्हणून १७ तर त्यांची मुलगी ह्या भूमिकेतही एक चित्रपट केला. ह्यावरून लक्षात यावे की प्रमुख अभिनेत्रीपदी जयललिता किती प्रदीर्घकाळ टिकून राहिल्या.

जयललितांच्या लोकप्रियतेची आकडेवारी स्तिमित करणारी आहे. तमीळ सिनेमात ९२ पैकी ८५ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली देणारे होते. तेलुगु भाषेत केलेल सर्वच्या सर्व २८ चित्रपट सिल्व्हर ज्युबिली हिट्स होते. १९६५ ते १९८० ह्या काळात त्या भारतातील सर्वाधिक मानधन मिळवणार्‍या अभिनेत्री होत्या. १९ वर्षांत त्यांनी १२५ चित्रपटांमध्ये हिरॉईनची भूमिका केली व त्यातील चक्क ११७ चित्रपट सुपरहिट ठरले.

ह्यापेक्षा अधिक वलय काय असू शकेल?

ह्या सगळ्या अद्भुत वाटचालीनंतर जयललिता ह्यांनी राजकारणात प्रवेश केला. एम जी आर ह्यांच्या ए आय ए डी एम के पक्षात त्या सामील झाल्या. तेथे त्यांनी स्त्रीशक्तीवर दिलेले भाषण गाजले. लवकरच त्यांना नियोजन सचिव बनवण्यात आले. १९८४ ते १९८९ त्या राज्यसभेच्या सदस्य म्हणून नियुक्त केल्या गेल्या.

एम जी आर ह्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी ह्यांना अल्पकाळ तमिळनाडूची सत्ता मिळाली पण तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी ३५६ व्या कलमाचा वापर करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर १९८९ साली एम जी आर ह्यांच्या राजकीय वारसदार म्हणून जयललिता ह्या विरोधी पक्षाच्या पहिल्या स्त्री नेत्या ठरल्या.

२५ मार्च १९८९ रोजी एक अतिशय वाईट घटना घडली. विधानसभेत झालेल्या अतिशय हिंसक आंदोलनात डी एम के च्या नेत्यांनी विरोधकांवर अक्षरशः हल्लाबोल केला. त्यात जयललितांच्या स्त्रीत्त्वाचा उघड अपमान करण्यास ते कचरले नाहीत. त्यांनी जयललितांच्या साडीलाही हात घातला. फाटकी साडी घेऊन कृद्ध नजरेने जयललिता सभागृहातून बाहेर पडल्या. ही घटना जनतेला समजली आणि तमिळनाडूत एकच संतापाची लाट उसळली. हे दुष्कृत्य करणार्‍यांच्या विरोधात प्रचंड जनमत एकवटले. जयललितांची तुलना साहजिकच महाभारतातील द्रौपदीशी केली जाऊ लागली. भडकलेल्या जयललितांनी पुढे काँग्रेसशी हातमिळवणी केली व पुढील निवडणूकीत २३४ पैकी २२५ जागा मिळवून अफाट बहुमताने तमिळनाडूच्या पहिल्या स्त्री व सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून जयललिता विराजमान झाल्या.

त्या क्षणापासून आजतागायत तमिळनाडू आणि एकुणच भारताच्या राजकारणात जयललिता ह्यांचे स्थान वादातीत राहिलेले आहे. लोकप्रियतेचे अक्षरशः नवनवे विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. १९९१ - १९९६, २००१, २००२-२००६, २०११ - २०१४ आणि २०१५ पासून पुढे अश्या पाच वेळा त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे, आजही सांभाळत आहेत.

संपत्ती जाहीर करण्यावरून ओढवलेल्या वादात त्यांच्या लोकप्रियतेला तडे गेले होते खरे पण न्यायालयाने त्यांना निर्दोष जाहीर करताच त्यांच्या लोकप्रियतेने पुन्हा पहिलीच उत्तुंग पातळी गाठली व तमिळनाडूची सत्ताही त्यांच्या हातात पुन्हा सोपवली.

'अम्मा कॅन्टीन' हा अत्यंत अभिनव उपक्रम सुरू करण्याचे श्रेयही जयललितांकडे जाते. समाजातील अतिशय गरीब घटकांसाठी स्वस्तात अन्न विकण्याची योजना असे ह्या कॅन्टीनचे स्वरूप असते. कढीभातासारखे बेसिक अन्न तेथे केवळ पाच रुपयांना उपलब्ध होते. ह्या कॅन्टीनला एक इडली एक रुपयाला तर दोन पोळ्या आणि आमटी तीन रुपयांना मिळू शकतात. असे म्हंटले जाते की अवघ्या भारताने आणि तमाम राजकारण्यांनी घटकाभर थांबून ह्या योजनेच्या परिणामकारकतेचा विचार करायला हवा. जर गरीबांपुढील अन्नाचा प्रश्न इतक्या सहज सुटला तर समाजातील कित्येक आपत्ती नष्टच होतील.

जयललितांकडे असलेल्या साड्या, चपलांचे जोड आणि त्यांची बांधली गेलेली मंदिरे ही नेहमीच कुतुहलमिश्रीत चर्चेचा विषय बनलेली आहेत.

जयललितांवर त्यांचे नशीब प्रसन्न असेलही पण समजून घेण्यासारखी बाब ही आहे की त्यांनी आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर काहीतरी धक्कादायक किंवा धाडसी पाऊल उचलले. पंधराव्या वर्षी हिरॉईन होणे, तमिळनाडूतील त्या काळातील संस्कृतीत स्कर्ट घालून पडद्यावर येणे, धाडसी दृश्ये देणे, सत्तेसाठी जोर लावणे, लोकप्रियता आणि लाईमलाईट कमी होणार नाही ह्याची पूर्ण दक्षता घेणे!

थोडक्यात, सौंदर्य आणि प्रतिभेला त्यांनी कुशाग्र बुद्धीची जोड दिली तेव्हा कुठे आज दिसणारी अम्मा निर्माण झाली.

भारतीय राजकारण व दाक्षिणात्य चित्रपट ह्यावर एक कायमस्वरुपी ठसा उमटवण्यात जयललिता ह्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही हे नक्कीच!

==================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> प्रसादक | 11 December, 2016 - 10:49 नवीन

अगदी काही लोकांना आपल्या नेत्याने कितीही चुकीचे केले तरी त्याचे मुल्यमापन केलेले आवडत नाही.
लगेच "देशद्रोही" ठरवण्यात येते
<<<<

जयललिता ह्या विषयावर बोलले गेल्यास आनंद वाटेल.

साधना Happy ... यामुळेच कळत नव्हते काय लिहावे.
प्रसादक, तुमचा कंपूच स्वतःला चेष्टेत का होईना सारखा देशद्रोही म्हणून घेतोय हां, सगळ्या धाग्यात.

अहो, सगळेच देशाच्या बाजुने आहोत आपण. फक्त ते एकमेकांना सांगताना फारच प्रेमळ संवाद फारच घडतात इथे हाच काय तो प्राब्लेम. Happy

बिपीनचंद्रजी,

Happy

जयललितांची अनेक छायाचित्रे आंतरजालावर आहेत. ती मी पोस्ट करू शकलो असतो.

तो विशिष्ट फोटो त्याचवेळी आला म्हणून पोस्ट केला व तोही प्रतिसादात!

हे वर एकदा लिहिलेलेही आहे.

लिंकसाठी आभार!

अकेला थलनेवाला थेल अर्थात प्रधान प्रचारक मोदींनी जय ललितांच्या अ ण्णा द्रमुकशी युती केलेली आहे हो ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
काल त्यांनी अम्मा जयललितांवर स्तुतिसुमने उधळली आणि त्यां च्या लोककेंद्री कार्याची प्रशंसा केली.

अकेला थलनेवाला थेल अर्थात प्रधान प्रचारक मोदींनी जय ललितांच्या अ ण्णा द्रमुकशी युती केलेली आहे हो ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
<<

भाजपाने अण्णा द्रमुकशी युती केली तर तुम्हाला इतका त्रास का झाला ?
युती/अघाडी करण्याचा हक्क फक्त कॉंग्रेसलाच आहे की काय ?
--
काल त्यांनी अम्मा जयललितांवर स्तुतिसुमने उधळली आणि त्यां च्या लोककेंद्री कार्याची प्रशंसा केली.
नवीन Submitted by भरत. on 2 March, 2019 - 11:43
<<

श्री मोदींनी आता कुणावर स्तुतिसुमने उधळायची व कुणावर टिका करा करायची, यासाठीची परमिशन दहा जनपथ रोडवरुन घ्यायची का ?

बाळ बीबीसीन्युजहब, या धाग्यावर काही लोकांनी जयललिता, विशेषतः त्यांच्या भ्लष्टाचालाबद्दल आपली मतं अतिशय परखडपणे लिहिली होती. त्यांच्यासाठी हे मोरपीस आहे. तुम्ही तुमच्या त्यावेळच्या जन्मात इथे लिहिलं नसेल, तर आता नका जिवाला त्लाश कलून गेऊ.

@भरत,

त्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपातून कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वर्गीय जयललीता यांची निर्दोष मुक्तता केली होती हे तुम्ही प्रामाणिकपणे विसरलेले दिसताय.

आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेत/आहेत म्हणून दूसर्या कोणत्याही पक्षाशी युती/आघाडी न करण्याचे निकष असतील तर महाघोटाळेबाज व भ्रष्टाचारी कॉंग्रेसचे वर्तमान व पुर्व अध्यक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपात, न्यायालयाचा जामिन घेऊन बाहेर फिरत आहेत त्यांना इतर पक्षांशी युती/आघाडी करणे तर सोडाच, राजकारणातून हद्दपार करावे लागेल.

Pages