आत्मशोधाचा काव्यात्मक प्रवास - 'डिअर जिंदगी' (Movie Review - Dear Zindagi)

Submitted by रसप on 28 November, 2016 - 06:10

एक यह दिन जब सारी सड़कें रूठी-रूठी लगती हैं
एक वोह दिन जब आओ खेलें सारी गलियाँ कहती थी

एक यह दिन जब जागी रातें दीवारों को तकती हैं
एक वोह दिन जब शामों की भी पलकें बोझल रहती थी

असं बालपण अनेकांचं असतं. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे वचनंही आपण अगदी सहजपणे आपल्या मनात जपली आहेत. भले ते बालपण जगत असताना मात्र, आपल्याला नेहमीच मोठं होण्याची आणि मोठ्या माणसांसाखं आपल्या मर्जीनुसार वागण्याची ओढ लागलेली असायची, पण प्रत्यक्षात मोठं झाल्यावर मात्र हे मोठेपण नकोसं होत असतं. वर उल्लेख केलेल्या जावेद अख्तर साहेबांच्या शेरांसोबतच अजून एक शेरही आहे, तो असा -

एक यह घर जिस घर में मेरा साज़-ओ-सामाँ रहता है
एक वोह घर जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थी

मोठे झालो, स्वत:च्या मर्जीने वागतो आहोत, स्वत:चं घर आहे. पण तरी कुठे तरी आत एक अशी पोकळी राहतेच, जी कधीच भरून निघत नाही. सतत मन भूतकाळात जाऊन एखादी खपली उघडत राहतं किंवा हेच दाखवत राहतं की हे आत्ताचं सुखासीन आयुष्य म्हणजे सगळं झूठ आहे. खरं सुख तर काही तरी औरच होतं, जे आजीच्या गोष्टींत होतं किंवा अजून कुठे. लहानपण जर एखाद्या जराश्या डिस्टर्ब्ड कुटुंबातलं असेल, तर ह्या स्मृती तर पुसता पुसल्या जात नाहीत. मग तयार झालेली मानसिकता बंडखोर नसली, तरच नवल. ही बंडखोरी स्वत:खेरीज प्रत्येकाविरुद्ध असते आणि काही वेळेस तर अगदी स्वत:विरुद्धही ! कुठल्याही 'कम्फर्ट झोन' मध्ये टिकून राहावंसं वाटतच नाही. सतत पळत राहायचं. निरुद्देश. अखेरीस ह्या पळण्याचा थकवा येणार असतोच, येतोच. मग पडणारे प्रश्न मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या ओढाताणीहून जास्त तणावपूर्ण वाटतात. कारण आपलाच प्रश्न, आपणच उत्तर द्यायचंय आणि आपल्यालाच समजत नसतं की नेमका प्रश्न आहे तरी काय ?

संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी

हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं आहे. हा गुंता शांतपणे, सावकाश, विचारपूर्वक उलगडायला हवा. गौरी शिंदेंचा 'डिअर जिंदगी' हेच करतो. ही धीमी गती ह्या विषयासाठी आवश्यकच आहे. पण जर हा गुंता ओळखीचा नसेल किंवा समजून घेता आला नाही, तर ही गती रटाळ वाटते. शाहरुख आहे म्हणून काही विशिष्ट अपेक्षांनी जर सिनेमा पाहायला जाल, तर त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच. कारण मुळात हा सिनेमा त्याचा नाहीच. तो आहे आलिया भट्टचा.

Dear_Zindagi_poster.jpg

एक अतिशय कुशल कॅमेरावूमन, जी तिच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करते आहे आणि एकंदरीत तिचं तसं बरं चाललं आहे. तरी 'सब कुछ हैं, पर कुछ भी नहीं' अशी अवस्था असलेल्या कायरा (आलिया) ची ही कहाणी आहे. गोव्यासारख्या नयनरम्य भागात लहानाची मोठी झालेली कायरा, फक्त तिच्या करियरसाठी गोव्यातून बाहेर पडून मुंबईला आलेली नसून, तिच्या मनात तिचं लहानपण, तिचं कुटुंब आणि ह्या दोन्हीमुळे गोवा, ह्या सगळ्याविषयी एक अढी आहे. ती ह्या सगळ्यांपासून दूर जाऊ पाहते आहे. मेहनत व कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशातही तिला समाधान वाटतच नाहीय. ह्या सगळ्या नैराश्यामुळे सतत नवनवी अफेअर्सही सुरु आहेत. कुठल्याच नात्यात मन रमत नाहीय. ती आत्ममग्न आणि नैराश्यग्रस्त आहे. 'डिअर जिंदगी' हा 'कायरा'चा 'प्रेमात न पडण्यापासून प्रेमात पडण्यापर्यंत', 'एकटेपणापासून कुटुंबापर्यंत', 'गोवा नावडण्यापासून गोवा आवडण्यापर्यंत' आणि 'एका जिंदगीपासून दुसऱ्या जिंदगीपर्यंत'चा प्रवास आहे. हा तिचा प्रवास डॉ. जहांगीर खान (शाहरुख खान) घडवतो. अनेक दिवसांनी शाहरुखमधला चार्म त्याने कुठल्याही प्रकारचा बाष्कळपणा न करता दिसला आहे. ह्यापूर्वी तो दिसला होता 'चक दे इंडिया' मध्ये. वेगळ्या धाटणीची, स्वत:ला अधिक साजेशी भूमिका निवडणारा हा शाहरुख अतिशय आवडतो. भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन !
गौरी शिंदेंचे 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' हे दोन अत्यंत भिन्न प्रकारचे सिनेमे आहेत. पण दोन्हींत दिग्दर्शिका स्वत:चं एक बेअरिंग पकडून ठेवते आणि ते कुठेही सुटत नाही. मनोरंजनात्मक मूल्य पाहिल्यास 'डिअर जिंदगी' अनेकांना नकोसा होईल, झालाही. माझ्यासमोरच किती तरी लोक अर्ध्यातून उठून बाहेर निघून गेले. ते शाहरुखचे नेहमीचे चाळे पाहायला आले असावेत. लोक स्वाभाविकपणे शाहरुखला पाहायला येतीलच म्हणून स्वत:ला जे आणि जसं सांगायचं आहे त्यावर जराही परिणाम दिग्दर्शिकेने होऊ दिला नाहीय. हा मोह आपल्याकडे फार क्वचितच कुणाला टाळता आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे. अगदी लक्षात राहील, असं हे संगीत नाही. रात्रीपुरतं भुंग्याला कैद करून सकाळी त्याला सोडून देणाऱ्या कमळाप्रमाणे हे संगीत आहे. भुंगा जसा आनंदाने कमळात कैद होतो, तसेच आपणही त्या त्या गाण्यात रमतो. आणि दल उघडल्यावर भुंगा जसा लगेच पुढे निघून जातो, तसेच आपणही पुढे निघतो.

गोवा सुंदर दिसणार नाही, असं दाखवायचं असेल तरच काही विशेष कसब लागेल. त्यामुळे नेत्रसुखद छायाचित्रण हे 'साहजिक' ह्या प्रकारात येतं. तरीही दाद !

'फोबिया'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली 'यशस्विनी दायमा' इथेही कायराची जिवलग मैत्रीण म्हणून सहाय्यक भूमिकेत दिसते. अफाट चार्मिंग मुलगी आहे ही ! तिला एखाद्या मुख्य भूमिकेत पाहायची उत्कंठा आहे. सर्व सहाय्यक व्यक्तिरेखांत ती उठून दिसते. सळसळता उत्साह, चमकदार डोळे आणि अचूक टायमिंग. तिची 'जॅकी' लक्षात राहतेच.

आणि सरतेशेवटी, आलिया भट्ट.
केवळ मोजक्या ८-१० सिनेमांतच तिने जी परिपक्वता साधली आहे, ती अविश्वसनीय आहे. तिचा पहिला सिनेमा पाहताना असं अजिबातच वाटलं नव्हतं की ही इतकी छाप सोडेल. त्या सिनेमात तर ती 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागली होती ! पण 'टू स्टेट्स', 'हायवे', 'कपूर अ‍ॅण्ड सन्स', 'उडता पंजाब' आणि आता 'डिअर जिंदगी' मुळे आलिया 'नॉट टू मिस' यादीत आली आहे. एका प्रसंगात नकाराचं दु:ख होत असतानाही, आयुष्य गवसल्याचा आनंदही तिला झालेलं असतो. एकाच वेळी रडू येत असतं आणि हसूही ! त्या वेळी आलियाने जे काम केलं आहे, त्यासाठी तिला त्रिवार सलाम ! एक असं एक्स्प्रेशन जे शब्दात सांगतानाही कठीण जाईल, ते ती प्रत्यक्षात दाखवते, हे केवळ अचाट आहे. त्या क्षणी, तिथेच सिनेमा संपायला हवा होता. तो संपला नाही, ही माझी 'डिअर जिंदगी'बाबत एकमेव तक्रार आहे. नजर लागू नये म्हणून लावलेलं गालबोट असावं बहुतेक.

dear-zindagi-et00044213-04-10-2016-05-18-38.jpg

'डिअर जिंदगी' हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट'सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही. तो जिंदगीसारखाच आहे. 'जिंदगी' हा ज्यांचा आवडता पास-टाईम आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. 'पाहा किंवा नका पाहू, पण मी आहे हा असाच आहे', असं एक बाणेदार स्टेटमेंट हा सिनेमाच स्वत:विषयी देतो, कायरा आणि आलियासारखंच !

लव्ह यू, जिंदगी !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/11/movie-review-dear-zindagi.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रिव्यू!
पहिल्यांदाच तुमचा -आमचा रिव्यू जुळला.
धन्यवाद!

मला पण तो सिनेमा तिथेच संपायला हवा होता.
पण मग तिला व्यावसायिकदृष्ट्याही एस्टॅब्लिश झालेलं दाखवलं नसतं तर इतक्या ट्रीटमेंटचा उपयोग काय असं व्यावहारिक मनांना वाटलं असतं.
म्हणूनही खेचला असेल सिनेमा पुढे.

बारिक सारिक डिटेलिंगही मस्तं केलंय.

मला त्यातलं आवडलं ते मोलकरणीबरोबरचं नातं!
आपण जेव्हा एकट्या रहातो तेव्हा फुलटाईम मोलकरीण अगदी जीवाभावाची बनते
तुम्ही कुणाकुणाबरोबर असताना कंफर्टेबल असता विचारल्यावर ती बाकी मित्र मैत्रिणी आणि भावाबरोबरच मोलकरणीचंही नाव सांगते ते फार आवडलं.

जॅकी खासच आहे. मला त्यात जॅकीमुळे आपल्याला स्पेशल वाटतं तर आपल्यामुळे जॅकीला वाटायला हवं म्हणून आलिया काही करते, आणि ते करत असताना जॅकीही आनंदते ते फार आवडलं.

खरंच अगदी सुंदर सिनेमा आहे.
पहावाच सगळ्यांनी!

मस्तच लिहिलंय... लेख वाचून movie बघण्याची उत्सुकता वाढली खरंच ..
आलीय पहिला खरंच आवडली नव्हती पण हायवे पासून तिचे काम खूप भावून गेले... अगदी उडत पंजाब मध्ये speechless
बघायचा आहे हा हि मूवी
लवकरच

छानच लिहिलंय.. आलियाने खरेच अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत आता. तिला अश्याच अर्थपूर्ण भुमिका मिळत राहोत.

तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट'सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही >> Happy

मस्त लिहिले आहे, परीक्षण कम छानसा लेख झालाय.
चित्रपट बघायला जायच्या आधी काय बघायला जाणार आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. तो माईंडसेट कामात येईल ... तसे ट्रेलरमधील संवांदावरून आणि शाहरूखच्या बेअरींगवरून चित्रपटाच्या जातकुळीची कल्पना आलेलीच..

The maid is also invited to the last function of her movie screening. Very sweet.

आश्वासक रिव्यु. शाहरुख असूनही बघावा का? असं वाटायला लावणारा. त्याचे नेहमीचे मेंटल चाळे नाही म्हणताय, तेव्हा रिस्क घ्यायला हरकत दिसत नाही. Wink

रसप, पर्फेक्ट रिव्ह्यू! पिक्चर आणि विशेषतः आलिया एकदम मस्त!! शाहरूख आवडतोच. या सिनेमात जास्त आवडला.

शाहरुख असूनही बघावा का? असं वाटायला लावणारा. त्याचे नेहमीचे मेंटल चाळे नाही म्हणताय, तेव्हा रिस्क घ्यायला हरकत दिसत नाही. >>>>>>>>>>>सायो +१००
बघावाच म्हणते मी! :स्मितः

मस्त! छान लिहिलंयस.
बघायचा आहेच. आलिया, ऑफबीट शाहरुख आणि सर्वात जास्त गौरी शिंदेच्या ट्रीटमेंटसाठी. पण रिव्ह्यू वाचून आणखीही बोनस आहेत, ह्याची खात्री झाली.

बघितला, आवडला. पण थोडा ओढूनताणून बनवला आहे. इंग्लिश विंग्लिश इतका सुंदर फ्लो नाहीए. आलियाचं काम फार छान झालं आहे. गाणी छान आहेत. शाहरुख ओके. माझ्या मते साडेतीन स्टार.

ती फॅटी एका सीनमध्ये मी प्रेग्नंट आहे असं सांगते आणि पुढच्या सीनमध्ये दारू पिते Uhoh

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे>>>> +१००
हा तर देव डी पासुन माझ्या फेवरेट लिस्ट मधे आहे. Happy
चांगला रीव्ह्यु.नक्की पाहिन चित्रपट.

अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे >>

एक अपवाद ...गोव्यातल्या पब/डीस्को/हॉटेल मद्धे....आलियाला तो गायक भेटतो तेव्हा "ईद का चांद" वगैरे काहीतरी शब्द असलेलं गाणं गात असतो...ते सुद्धा गिटार वर ..मला तरी कानाला जरा खटकलं...
अगदी टीपिकल गोवन स्टाईल नाही पण जरा गोव्यात आहोत असं वाटणारं काहीतरी तिथे असायला हवं होत असं मला वाटलं..
बाकी लव्ह यु जिंदगी गाणं अतिशय आवडलेलं आहे..

परीक्षण आवडले. खूप सुंदर चित्रपट आहे. आलिया सुपर्ब. अतिशय मॅच्युअर्ड अभिनय केला आहे. चित्रपटाच्या कथेनुसार तिच्यात घडणारा बदल उगाच अगदी कायापालट झाल्यासारखा न दाखवता ती आहे तशीच ठेवून नेमका टिपला आहे. याचे मार्क्स गौरी शिंदेलाही जातात. या चित्रपटाची तुलना ईंग्लिश विंग्लिशशी करणे हा तिच्यावर अन्याय होईल. पण आपण प्रेक्षक हा नेहमीच आनंदाने करतो. कारण दोन चित्रपटांची, दोन हिरोंची, दोन हिरोईनींची तुलना करण्यासारखी दुसरी मजा नाही. शाहरूख खान खास आवडीचा नाही. पण त्याची मुलाखत आवर्जून बघते. त्याची बोलायची पद्धत आणि त्यातून झळकणारा सेन्स ऑफ ह्युमर चांगला वाटतो. या त्याच्या रोलमध्ये ते पैलू वापरले गेले असल्याने यात तो आवडला. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे बॉलीवूडचा प्रेक्षक अश्या चित्रपटांना स्विकारू लागलाय याचे लक्षण आहे आणि हे चांगले लक्षण आहे.

हो

आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन >>
कुठलाही सिनेमा हा डायरेक्टरचाच असतो बाकी अभिनेते मग आपआपल्या कुवती किवा स्वभावाप्रमाणे हस्तक्षेप करतात, बच्चन साहेबाचा तो अतिशय कमी किवा नगण्य असतो हे त्यानी हजारवेळा वेगवेग्ळ्या ठिकाणि बोलुन दाखवलय, आमिर करतो हेही त्याने बोलुन दाखवलय, शाखा किती करत असेल हे त्याचे आधिचे ओवाळु आरती मुव्ही बघितले(फॅन अगदी रिसेन्ट) तर सहज कळेल.त्यामुळे पिन्क वरचा तुमचा आक्षेप असला तरी तो बच्चन मुळे असेल तर चुकिचेच आहे.

सिनेमा काल पाहिला, नाही आवडला !
सिनेमा पहिल्यावर 'हायवे' मधली आलिया हीच का ? 'इंग्लिश विंग्लिश' ची दिग्दर्शका गौरी शिंदे हीचाच हा सिनेमा का ? असे प्रश्न पडले.या दोघींसाठी सिनेमा पहायचा होता पण शाहरुख असल्याने पाहू की नको असा संभ्रम होता. माझ्याकरता सिनेमानंतर बरोब्बर उलट झालं. दोघींनी निराशा केली आणि शाहरुख सुसह्य वाटला !

पाहिला. गाणी सुंदर आहेत. गोव्यातला गायक तर खतरनाक दिसतो Wink

आलिया काही विशेष भावली नाही. जॅकीचे पात्र जास्तं आवडले. किडो चा रोल पण मस्तं आहे. शाहरुख काय डोळ्यांनीच बोलतो, नेहमीप्रमाणे. हॅट्स ऑफ!

बंडल सिनेमा. एकदम भिकार!
काईराच्या तथाकथित 'उच्चभ्रू ' प्रॉब्लेम्स पेक्षा बरेच सिरीयस प्रॉब्लेम्स आजच्या तरुण तरुणींना आहेत.
बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत (किंवा हीच टिकवत नाही!) हाच काय तो इश्यू!

शाहरुख चा माईल्ड अभिनय सुखद! किड्डो पण मस्त!
पण ओव्हरॉल सिनेमा बोअर आणि अनरिअ‍ॅलिस्टीक!

दोन तिन वाक्ये छान वाटली बाकी प्रचंड कंटाळवाणं वाटलं.शाहरुख चा माईल्ड अभिनय छान वाटला.
बाकी जोडिदार निवडणं -'कुर्सी' निवडण ही analogy बघुन डोळे पाणावले हो..
उतारा म्हणुन shawshank redemption पहवा लागला.

काईराच्या तथाकथित 'उच्चभ्रू ' प्रॉब्लेम्स पेक्षा बरेच सिरीयस प्रॉब्लेम्स आजच्या तरुण तरुणींना आहेत.
बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत (किंवा हीच टिकवत नाही!) हाच काय तो इश्यू! >>> आगो, आता हे प्रॉब्लेम्स फक्त उच्चभ्रू लोकान्ची मक्तेदारी राहिली नाहिये. तुम्ही जर आजकालच्या मिडलक्लास मुलीन्चे फोनवरचे सम्भाषण ऐकले तर झीट येऊन पडाल.

मागे एकदा trailer पहिलेला..तो पाहुन सिनेमा पाहयला गेलो..
सिनेमा पाहुन जो धक्का बसला त्यातुन सावरायला बराच काळ जावा लागला.. Happy

या काव्यात्मक प्रवासात ८ गाणी.. बापरे... डोक्याचा भुगा नुसता...
अभिनेत्रीला खरच आत्मशोधाची गरज आहे.. तो आत्मशोध म्हणजे.. अभिनय ही सकाळच्या चहा सोबत खायची बिस्कट नव्हेत...!!! तीचा अभिनय खुप fake वाटला..

आयुष्यात पहिल्यान्दा सिनेमाहॉल मध्ये झोपतोय की काय अस वाटत होत... ईतका रटाळ...ईतका रटाळ की..
माझ स्वता:च willing suspension of disbelief झाल...!!!

एक प्रेक्षक म्हणुन मला शेवटी हा आत्मशोधा झाला की ...
फक्त trailer चा छान आहे म्हणुन सिनेमा पहीला तर..पदरी सुमार कथानक, तद्दन आणि मसाला छाप गाणी व दुय्यम अभीनय पडलाय..!!

End Credit नन्तर डोळे दिपुन गेले...या धक्क्यातुन कसाबसा सावरत मी .. parking मधील माझी कार शोधाच्या दिव्यात्मक प्रवासाला निघालो..!!!

शंभर करोडचा बिजनेस झाला! वाटले नव्हते, कारण एका ठराविक वर्गाला आवडणारा, मल्टीप्लेक्समध्येच चालेल असा चित्रपट होता.
या प्रकारच्या चित्रपटाला प्रेक्षक हल्ली वाढत आहेत ही चांगली बातमी आहे.. कारण असे चित्रपट चालले तरच आणखी निघतील..
पण अर्थात या बॉक्स ऑफिस यशाचे काही क्रेडीट शाहरूखलाही जातेच. त्या जागी कोणी दुसरा असता तर बॉक्स ऑफिसवर आलिया किंवा दिग्दर्शक गौरी शिंदे आपल्या जीवावर हा चित्रपट खेचू शकल्या नसत्या.

Pages