हायवे ....

Submitted by अजातशत्रू on 23 November, 2016 - 11:21

गोष्ट पावसाळयातील आहे. आषाढातील एका पावसाळी दिवसांत बहुधा ऑगस्टचा महिना अखेर असावा, घराकडे निघायला मला बराच उशीर झाला होता. त्या दिवशी पुण्याहून सोलापूरकडे येणारी कन्याकुमारी एक्स्प्रेस खूपच उशिरा आल्याने स्टेशनवरून निघायला रात्रीचे दिड वाजले होते. पार्किंग लॉटमध्ये सकाळी जाताना ठेवलेल्या गाडीच्या सीटवर जमा झालेली धूळ हाताच्या एका फटक्यात उडवून काहीशा त्राग्याने बाईक स्टार्ट केली. जुना पुणे नाका क्रॉस करून पुढे गेलो. शहरी वसाहतीचा भाग संपला. पावसाळी दिवस असल्याने रस्ता निसरडा झाला होता. मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने क्वचित एखादी दुसरी लहान सहान दुचाकी रस्त्यावर दिसत होती. हायवेचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने चकाचक टार रोडवरून सुंइक आवाज करत कट मारत, ओव्हरटेक करत गाड्या पळवण्याचे काम मोठे जोमाने चालू होते. मोठाले मालट्रक. अजस्त्र कंटेनर आणि वेगाने धावणारया कार्सनी रस्त्याचा जणू ताबाच घेतला होता. या रहदारीचा काही नेम नाही असा विचार करत मी जपूनच साईड रोडवरून गाडी चालवत होतो. बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती. सुंसुं आवाज करत वारे कानाशी लगट करत होते. सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाईटस बंद झाले होते, काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते. एखाद दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जाग असल्याची साक्ष पटवून देत होता. लॉंग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वा अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती. एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज काढणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती. अवती भोवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने दोन चार माणसं हाताची घडी घालून उभी होती. मी इकडे तिकडे बघण्याचे टाळत पुढे बघून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो. पण निरीक्षण सवय काही केल्या मोडत नसल्याने किती जरी टाळले तरी इकडे तिकडे हटकून लक्ष जात होते. त्या नादात मला लक्षातच आले नाही की एकाएकी रहदारी अगदीच तुरळक होत गेली आणि रस्ता निर्मनुष्य होत गेला. काही वेळातच गावाकडचा रस्ता लागणार असल्याने मी गाडीचा वेग कमी केला. तोच दूर अंतरावर एक कार रस्त्यावरच उभी असल्याचे लांबुन दिसले, शिवाय कारच्या उजव्या बाजूस ड्रायव्हींग साईडला एक जोडपं उभं होतं. बहुधा त्यांनी मला पाहिलं असावं. ते गाडी थांबवण्यासाठी अंगठ्याची खुण करत होते. दुरून मला काही स्पष्ट दिसले नाही मात्र जवळ येताच ध्यानात आले की अलिशान पांढरी शुभ्र स्कोडा गाडी अगदी रस्त्यातच उभी होती. तिच्या बाहेर श्रीमंतीच्या खाणाखुणा अंगावर असणारं, देखणं रुबाबदार मध्यमवयीन जोडपं उभं होतं. बहुधा ते बरयाच वेळापासून इथे उभे असावेत. त्यांनी माझ्याआधी काहींना विनंती केली असावी पण कुणी थांबले कसे नाही याचे मला जरा नवल वाटले.खरे तर मला फार उशीर झाला होता, घरातले सगळे जण नेमके गावाकडे गेलेले होते. गावाकडे जाऊन तब्बल एक महिना उलटला असल्याने कधी एकदा गावातल्या घरी जाऊन पलंगावर पाठ टेकवतो असे झाले होते. पण समोरील गोंधळात टाकणारे दृश्य बघून आणि मदतीचा स्थायीभाव अंगी जरा जास्तच असल्याने माझ्या नकळत मी गाडीचे ब्रेक्स दाबले देखील .....

त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर मी बाईक आधी रस्त्याच्या कडेला घेतली. कधी कधी बारा भानगडी देखील हायवेवर घडत असल्याने अगदी सावधपणे त्यांना विचारले,"काय झाले सर ? काही अडचण ?"
माझ्या प्रश्नावर त्यांनी एकमेकाकडे पाहिले. तो पुरुष काही बोलणार त्या आधी ती स्त्रीच बोलली,
"काही नाही ओ भाऊ आमची कार बंद पडलीय. खरे तर आम्ही पुढे गेलो होतो. पण आमच्या मुलांनी हट्ट केल्याने आम्ही पुन्हा मागे फिरलो आहोत."
त्यांनी काय सांगितले मला काहीच कळले नाही. माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत तो पुरूष उत्तरला.
"त्याचे काय झाले, आम्ही मुंबईचे आहोत. आमच्या मुलांना आणि भावाच्या कुटुंबाला सोबत घेऊन आम्ही दोन कारमधून एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सोलापूरला आलो होतो. रात्री निघण्यास उशीर झाला. मुले लहान आहेत, त्यांना भूक लागली. मग वाटेत लागणाऱ्या टोल प्लाझापाशी थांबावे अशी त्यांची इच्छा होती, पण नेमके आजच टोलप्लाझावरील हॉटेल बंद होते. मग आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा मागे फिरून पार्सल आणण्यासाठी मागे वळलो होतो. मुले भावाच्या गाडीत झोपी गेली असतील, त्यांना भूक लागली असेल. भाऊ आणि वाहिनी देखील दिवसभराच्या ताणाने थकले असतील. ते ही झोपी गेले असतील. त्यांची तरी झोपमोड का करावी म्हणून आम्ही त्यांना कळवले नाही. पण काही वेळात गाडी सुरु झाली नाही तर त्यांना कळवावे लागेलच. होय ना गं !"
शेवटचे वाक्य बोलताना त्या माणसाचा कंठ दाटून आल्यासारखे वाटले, सगळे एका दमात बोलून झाल्यावर त्याने कारचे दार उघडले. दोन तीन कॅरीबॅगमध्ये काही तरी खाद्यपदार्थ होते, डॅशबोर्ड मधील ड्रॉवर खोलून त्याने आतील एका नक्षीदार टिफिनमध्ये त्या कॅरीबॅग ठेवल्या. टिफिन माझ्या हाती दिला आणि भावाच्या बीएमडब्ल्यूच्या गाडीचा नंबर सांगितला. "टोलप्लाझापाशी गाडी थांबली असेल त्यांना एव्हढे पार्सल नेऊन द्या हो. माझी मुले भुकेली असतील हो."
अगदी काकुळतीला येऊन त्या स्त्रीने सांगितले. फिकट निळसर साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाउज, बांगड्या तिला खुलून दिसत होत्या. त्या चांदण्या रात्री तिच्या कपाळावरचे लालभडक कुंकु चांगलेच उठून दिसत होते. वाऱ्यावर भुरभुरणारे केस कपाळावर येत होते, इतक्या गार हवेत देखील तिच्या कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू मला उगाच कासावीस करून गेले. मंगळसूत्राशी चाळा करत पदर सावरत एका अनामिक अस्वस्थतेने ती बोलत होती.
"अहो त्यात काय एव्हढे ? मुलांचा डबा हातोहात नेऊन देतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. कार सुरु होत नसेल तर माझ्या ओळखीच्या मॅकेनिकला बोलावू का?"
माझ्या अनपेक्षित प्रश्नाने ते दोघेही किंचित गांगरले. त्यामुळे मीच बोलता झालो.
"नाही तर तुम्ही हायवे पोलिसांना कळवा ते तुम्हाला मदत करतील, असं हायवेवर थांबणं धोक्याचे आहे. शिवाय तुमच्या सोबत बाईमाणूस आहे."
माझ्या ह्या उद्गारांनी ते अजूनच हतबल झाल्यासारखे वाटले. मग मी न राहवून त्यांना म्हटले,
"माझे घर लहान आहे, पण इथून जवळ आहे. तुम्ही, तुमची मुले आणी भाऊ - वाहिनी सगळेच जण आमच्या घरी थांबा. मुक्काम करून गाडीचे काम करून सकाळी तुमच्या मुंबईला रवाना व्हा !"
"आता त्याचा काय उपयोग...बराच उशीर झालाय ... दबा थंड होईल... आधीच सगळं संपलंय... निघा लवकर... आम्ही निघतोच आहोत असं सांगा त्यांना.."
माझे बोलणे अर्ध्यात तोडत ती स्त्री कातर आवाजात अर्धवट तोंडात पुटपुटत बोलली. शेवटचे शब्द बोलताना तिचा आवाज खूपच कातर झाल्यासारखा वाटला.
मग मीही अधिक पाल्हाळ न लावता तो टिफिन घेतला, हँडलला असणाऱ्या पिशवीत ठेवला. त्या दोघांनी हात जोडले तसे मीही यंत्रवत हात जोडले. का कुणास ठाऊक पण त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखे वाटले. मी तिथून निघालो खरं पण पुढे काही अंतरावर रस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रककडे पाहून उगाच मनात वाईट विचार चमकून गेले....

खरे तर माझे गाव टोलप्लाझाच्या अलिकडे होते. पण त्या जोडप्याने इतके कळवळून सांगितल्याने आणि त्यांचे कारणही रास्त वाटल्याने मी गावाचा रस्ता लागूनही गावाकडे न वळता वेगाची झिंग असणारया निर्जीव भकास रस्त्यावरून गाडी चालवणे मला मुळीच आवडत नाही. माझी आपली पाऊलवाटच बरी, वाटसरूशी बोलणारी, त्याच्या सुखदुखात सामील होणारी. त्याला आपलंसं करणारी अन आईच्या कुशीची ऊब देणाऱ्या पाऊलवाटेची सर ह्या डांबरी हायवेला कधीच येणार नाही हे माझे विचारांचे नेहमीचे पालुपद डोक्यात घोळवीत मी पुढे मार्गस्थ झालो. काही वेळात सावळेश्वरचासावळेश्वर जवळचा टोलप्लाझा आला. माझ्या गावापुढे असणारया ह्या गावाचे नाव मला खूप आवडते. सावळेश्वर, सावळा ईश्वर, श्रीकृष्ण ! गावाचे नाव साक्षात श्रीकृष्ण ! पण टोलप्लाझाजवळ आल्यावर मी जरा चकितच झालो कारण तिथले हॉटेल चालू होते. बाहेरील साईन बोर्डच्या लाईट्स चालू होत्या. हॉटेलच्या आजूबाजूस किंवा विरुद्ध दिशेसही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार दृष्टीस पडली नाही. मी जरा विचारात पडलो. म्हटले हेच तिकडे गेले की काय ? विचार करत करत हॉटेलबाहेर गाडी उभी केली. हँडलला लावलेली पिशवी हातात घेऊन लगबगीने हॉटेलच्या पायरया चढून 'ते लोक' आत आहेत का ते पाहण्यासाठी डल आत डोकावून पाहीले. पण आत फक्त एकदोन वाट आणि वेळ चुकलेले ग्राहक होते. त्या जोडप्याने सांगितल्यापैकी दुसरे जोडपे वा कुणी लहान मुले नव्हती. कदाचित मी इकडे येत असताना हे लोक विरुद्ध दिशेने माघारी फिरले असतील अशी शक्यता मनात धरून मी इकडे तिकडे नजर फिरवीत उभा राहिलो. तोंडावर झोपेचा नकाशा वागवत जांभया देत एक वेटर कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून होता. कॅश काउंटरवरील साहेबराव पेंगेच्या आधीन झाला होता. मी त्याच्या समोरील बरणीवर हात मारत 'अरे, साहेबराव उठ की लेका ..' अशी जोरदार हाळी देताच तो जरासा दचकून जागा झाला. एकवार त्याने हातातील घड्याळाकडे पाहिले, भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले अन मग पहिल्यांदा बघत असल्यागत त्याने मला खालपासून वरपर्यंत न्याहाळले. माझ्या हातातील पिशवीकडे लक्ष जाताच तो एकदम दक्ष स्थितीत आला. "अरे आत गिऱ्हाईक येऊन बसलंय, वेटर झोपा काढतोय आणि मालक घोरत बसलाय...कसं चालवणार रे हॉटेल ? आणि हॉटेल कधी उघडलंस ? तासा दोन तासाआधी बंद होतं का हॉटेल ? इथं थांबलेली माणसं कुठं गेलीत ? की आज ररात्री जेवण बनवायचे थांबवलंय का आपला वस्ताद आला नाही ? नेमकं काय झालंय आज ? का तुला गिऱ्हाईक ज्यादा झालंय ?"
माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता साहेबराव माझ्या तोंडाकडे मख्ख नजरेने बघत बसला होता. मला जरा रागच आला. "अरे घुम्यागत बघत काय बसलास ? बोल की जरा !" असं खडसावून देखील त्याने विशेष प्रतिसाद दिला नाही. त्या उलट आतल्या पोरयास माझ्यासाठी कडक चहा ठेवायला सांगितला ! आता मात्र मी जरा चमकलो. माझ्याकडे बघत साहेबराव गंभीर चेहरा करत घोगऱ्या आवाजात बोलला, "बापू झालं का बोलून ? का अजून काही विचारायचे आहे ? मी काही सांगू का तुम्हाला ? आधी हातातली पिशवी खाली ठेवा !" त्याच्या ह्या थंड पवित्र्याने मी सर्दच झालो...

माझ्या चेहऱ्याला न्याहाळत साहेबराव बोलता झाला. "बापू, तुमच्या जवळ कुणी जेवणाच्या पार्सलची पिशवी दिली आहे का ?"
मला जरा आश्चर्य वाटले. पुन्हा मनात आलं की आपल्याआधी किंवा नंतर त्या जोडप्याने आणखी कुणाजवळ पार्सल दिले की काय ? बहुधा तसेच झाले असेल. ते पार्सल घेऊन ही मंडळी इथून पुढे गेली असतील. ह्या विचाराने थोडेसे हायसे वाटून मी मान डोलावली. त्यावर साहेबरावच्या चेहऱ्यावर थोडेसे भीतीचे भाव उमटले. कपाळावर आठ्यांचे जाळे गोळा झाले. घसा खाकरत त्याने पुढचा प्रश्न टाकला.
"बघू कुठे आहे ती पार्सलची पिशवी ? जरा दाखवा बर मला !"
आता ह्याला त्याच्याशी काय असेल बरं असा विचार मनात आला. पण पार्सल दाखवाच असे म्हणतोय तर त्याला दाखवायला काय हरकत असा विचार करत मी पिशवीत हात घातला. आणि दचकलोच ! त्या जोडप्याने दिलेला टिफिनचा डबा जागेवर नव्हताच. म्हटलं वाटेत डबा पडला की काय ? मग डबा पडल्याचा आवाज कसा काय आला नाही ? मग डबा गेला कुठे ? मी पिशवीत वरपासून खालपर्यंत हात घालून चाचपू लागलो. एकेक करून पिशवीतले सगळे साहित्य बाहेर काढले पण तो टिफिन काही जागेवर नव्हता. मनात विचार आला,समजा ते लोक इथे आले तर काय उत्तर द्यायचे ? त्या जोडप्याचे भाऊ - वाहिनी आपल्याला शोधायला पुढे मागे गेले असतील अन ते आता कशी क्षणात इथे आले तर काय करायचे ? त्या भुकेल्या लहानग्या जीवांनी आई बाबांनी पाठवलेल्या पार्सलमधील चीजवस्तू खायला मागितल्या तर काय करायचे ? ह्या सगळ्या विवंचना माझ्या चेहऱ्यावर साफ झळकल्या असाव्यात. त्यामुळेच की काय साहेबराव अगदी शांतपणे माझ्याकडे बघत होता. माझ्या अस्वस्थतेला निरखत तो जड आवाजात बोलला. "बापू तुमच्या कडे कुठला टिफिन कुणी दिलेलाच नाही ! हा एक भास आहे ! मागील दहा दिवसापासून हे असंच चालू आहे. रोज अपरात्री कुणी ना कुणी येतो आणि त्यांनी दिलेले टिफिन घ्या म्हणतो पण हाती काहीच नसते !"
साहेबरावच्या ह्या खुलाशाने मी भेदरून गेलो. त्याला म्हटलं अरे असे कसे काय शक्य आहे ? भास कसे म्हणतोस तू ? मी तर त्यांच्याशी काही वेळापूर्वीच बोलून आलो आहे. तेही थोड्या वेळात येतीलच !...."
माझे वाक्य अर्ध्यात तोडत साहेबराव बोलला, " आपले हॉटेल बंद आहे, काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूत त्यांचे भाऊ आणि वहिनी इथे टोलप्लाझापाशी बाहेर कार थांबवून उभे आहेत. त्यांच्या सोबत दोन लहान मुलं आहेत. ते मुंबईहून सोलापूरला कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. निघायला उशीर झाला होता. मुलांना भूक लागली, मग टोलप्लाझा वरील हॉटेल बंद असल्याने मुले भावाच्या गाडीत ठेवून ते पार्सल आणायला माघारी फिरले. काही अंतरावरील ढाब्यावर गेले. पार्सल घेतले. ढाब्यापासून काही अंतर जाताच रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी बंद पडली. त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरु होत नव्हती. भाऊ आणि वाहिनी झोपले असतील म्हणून त्यांनी त्यांना फोन केला नाही. आता सुरु होईल मग सुरु होईल म्हणून हायवे पोलिसांना कळवले नाही. गाडी सुरु होईपर्यंत पार्सल कुणाजवळ तरी पुढे पाठवून द्यावे म्हणून त्यांनी एखादा वाटसरू दिसतो का हे पाहण्यास सुरुवात केली आणि तुम्ही त्यांच्या नजरेस पडलात. तुम्हाला बघून त्यांनी अंगठ्याने गाडी थांबवण्याची खुण केली. इतक्या रात्री काय झाले असेल हा विचार करत तुम्ही आपसूक गाडी थांबवलीत. त्यांच्याशी बोलून झाल्यावर त्यांनी एका नक्षीदार टिफिनमध्ये ते पार्सल घालून दिले. ते घेऊन तुम्ही पुढे निघून आलात. इथे येऊन चकित झालात कारण इथे तर कुणीच नाही !"
साहेबराव एका दमात एका लयीत सांगत गेला आणि मी आ वासलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे दिग्मूढ होऊन बघत त्याचे बोलणे ऐकत राहिलो ! त्यावर काय बोलावे हे मला सुचलेच नाही. जणू मी थिजून गेलो होतो.
"बापू, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसे काय ठाऊक ?"
साहेबराव मला काहीतरी विचारत होता आणि माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. नेमके काय झाले आहे हेच मला कळत नव्हते. इतक्यात गरमागरम वाफाळता चॉकलेटी चहा आला. साहेबरावने वेटरला तिथून जाण्यास हातानेच खुणावले. घरून आणलेली कॅश काउंटरच्या खाली ठेवलेली पाण्याची बाटली त्याने वर काढली. एका ग्लासात पाणी ओतून ग्लास माझ्याकडे सरकावत त्याने हलकेच माझ्या खांद्यावर थोपटले. 'बापू चहा घ्या थंड होतोय, हवेत जरा गारवा आहे...मी सगळं सांगतो तुम्हाला....आधी जरा चहा तरी घ्या..'
त्याच्या उद्गाराने मी जरा भानावार आलो. मनगटातील घड्याळाकडे बघितले. अडीच वाजून गेले होते. इतक्या रात्री मी कधीच चहा प्यालो नव्हतो. ती रात्र मात्र अपवाद होती. बाहेर येऊन तोंडावर पाण्याचे दोन सपकारे मारले. आत वॉश बेसिन असूनही मी तोंड धुण्यास बाहेर आलो नव्हतो. खरे तर पुन्हा एकदा बाहेर कुठे बीएमडब्ल्यू दिसते का हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो होतो. साहेबराव माझे बारकाईने निरीक्षण करत आहे हे लक्षात येताच मी आत वळलो. रुमालाने तोंड पुसून होताच चहाचा कप ओठाला लावला. झोप तर आधीच पळाली होती. डोक्यात प्रश्नांचे अन विचारांचे काहूर माजले होते. त्याला ह्या चहाने थोडीशी चालना मिळाली. आता चहा पिऊन झाल्यावर साहेबराव काय सांगतो ते ऐकण्यास मी पुरता अधीर होऊन गेलो होतो.......

माझा चहा पिऊन होताच साहेबरावने बडीशेप पुढे केली. त्याला मी हातानेच अडवले. त्या सरशी पुन्हा एकदा बळेने घसा खाकरत तो बोलता झाला. "मी काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका बापू .."त्याने अशी सुरुवात करताच मी अगदी कान टवकारून बसलो. "कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्ही गावात नसल्यामुळे तुमच्या कानावार आले नसेल. दहा दिवसापूर्वी आपल्या आत्माशांती ढाब्यापाशी एक अपघात झाला."
माझ्या अंगावर आता शहारे आले होते. साहेबराव पुढे सांगत होता...
"त्या दिवशी रात्री बहुधा साडेअकरा बाराची वेळ असावी. आपल्या हायवेला एक बाराचाकी ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यांनी हायवे पोलिसांना क्रेन साठी कळवले होते. पण क्रेन येण्यास काही अवधी तर लागतोच ना !'
मी यंत्रवत मान डोलावली.
"तर क्रेन येण्यापूर्वी चाकाखाली ठेवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणारे दगड गोळा करण्यासाठी व झाडाचे फाटे तोडून ट्रकच्या कडेने ठेवण्यासाठी करण्यासाठी ड्रायव्हर क्लीनर ट्रकमधून उतरून थेट रस्त्याच्या कडेला गेले. त्या नंतर काही क्षणातच रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या मालट्रकचा अंदाज न आल्याने पांढरया रंगाची एक अलिशान स्कोडा गाडी त्या ट्रकला वेगाने येऊन धडकली. टक्कर इतकी जोरात होती की स्कोडा गाडी ट्रकच्या चेसीखाली जाऊन अडकली !'
साहेबरावच्या ह्या वाक्याने माझ्या काळजाचे ठोके चुकले.
"कारमध्ये पुढच्या सीटवर सोलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे मोहिते दांपत्य जागीच ठार झाले. त्या दिवशी मी सासरवाडीला गेलो होतो. वस्तादपण सुट्टीवर होता शिवाय पावसाळी दिवस असल्याने हॉटेल बंदच ठेवलेले होते. त्यामुळे मी काही त्या लोकांना बघू शकलो नाही. मात्र नंतर कळले की मोहिते कुटुंब दोन कारमधून मुंबईच्या दिशेने चालले होते. मुलांना फार भूक लागलेली असल्याने ते टोलप्लाझापाशी आले. नेमके त्या रात्री हॉटेल बंद असल्याने त्यांनी पुढे जाण्याऐवजी एक गाडी टोलजवळ साईडला उभी केली. मुले त्याच गाडीत त्यांच्या भावाच्या गाडीत बसवली अन ते दोघे मुलांना पार्सल आणण्यासाठी काही अंतरावरील आत्माशांती ढाब्याकडे वळले. पार्सल घेऊन वेगाने पुढे येताना त्यांना रस्त्यातील ट्रकचा अंदाज आला नाही. ते त्या ट्रकवर जाऊन आदळले. त्यात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील हवेचे फुगे का काय म्हणतात ते देखील उघडले नव्हते. गाडी इतक्या जोरात आदळली की हवेचा दाब बसून पुढची दोन्ही दारे तुकडे होऊन उडाली होती.." साहेबराव वर्णन करून सांगत होता आणि मी मेंदू गोठल्यागत ऐकत बसलो होतो. काही वेळापूर्वी आपण ज्यांच्याशी बोललो, ज्यांना पाहिले, ज्यांच्याकडून एक डबा घेतला ती खरी माणसे नव्हती. आपण जिथं थांबलो होतो ती गाडी देखील खरी नव्हती. तो सगळा एक आभास होता. ह्या विचाराने माझ्या अंगावर थरारून काटा आला.

"त्या दिवसापासून रोज रात्री एक का होईना मोटरसायकलवाला इथं आपल्या हॉटेलवर येतो आणि गाडीतल्या जोडप्याने न दिलेले टिफिन देण्याचा प्रयत्न करतो. इथल्या त्या नातेवाईकांना शोधायचा प्रयत्न करतो. मग सत्य ऐकताच चक्रावून जातो. मला तर कळेनासे झालेय की असे किती दिवस चालणार ? भीतीने कुणी मरून जाऊ नये म्हणजे मिळवले..." साहेबराव बोलतच होता...
"मग पुढे काय झाले ?" त्याची बोलण्याची तार अर्ध्यातच तोडून मी त्याला विचारले.
"मग काय होणार ? त्यांच्या अपघातानंतर काही क्षणात ट्रकच्या ड्रायव्हरने पोलिसांना कळवले. क्रेन सोबत घेऊन पोलिस तिथे आले. त्यांच्या खिशातील मोबाईलवरून फोनद्वारे टोलप्लाझा जवळ थाबलेल्या त्यांच्या भावाशी संपर्क झाला. पंचनामा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमार्टेम सह सर्व सोपस्कार पार पडले. त्या नंतर त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी पार पडला इथवरची माहिती माझ्याकडे आहे.....आता जास्त विचार न करता बापू सरळ घरी जावा...गाडी सावकाश चालवा की कुणाला सोबत देऊ ?" असं साहेबरावने विचारताच माझी विचारांची तंद्री भंगली.
सोबत कुणी नको एकट्यानेच व्यवस्थित जातो असे सांगून मी काही वेळ तिथेच रेंगाळून तिथून काढता पाय घेतला. काही वेळात घरी पोहोचलो. अंथरुणावर अंग टाकले खरे पण चित्त स्थिर नव्हते. डोळ्यापुढून ते जोडपे जात नव्हते. त्या जोडप्याचा आवाज\ कातरल्यासारखा का वाटत होता, त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे का वाटत असावे हे सर्व आता लक्षात आले. पण राहून राहून एकच प्रश्न मनात येत होता की त्यांना भेटणारया व्यक्तीस अडवून ते टिफिन का देत असावेत ? त्यांना काही सांगायचे किंवा सुचवायचे असेल का ? हा प्रश्न काळजात घर करून राहिला. सकाळी उठल्यावर घरातील सर्व लोकांना हा प्रसंग सांगितला तर भूताटकी झाली वा भानामती झाली असले काही तरी थोतांड सुरु होईल या हेतूने मी गप्प बसणे पसंत केले. सकाळची कामे आटोपून काही त्रोटक भेटीगाठी घेऊन रात्री माझ्यासोबत ज्या ठिकाणी ती घटना घडली होती तिकडे कूच केले. काही वेळातच तिथे पोहोचलो. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टमटम रिक्षा, मालवाहतूकीची वाहने आणि एसटी बसेस -सिटी बसेसची बरयापैकी वर्दळ होती. थोडीशी थंड हवा अंगाला झोंबत होती. वाटेने भेटणारया परिचितांचा रामराम स्वीकारत 'त्या' ठिकाणी पोहोचलो. रस्त्याच्या कडेला गाडी लावताच मी हादरलो. कारण रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या बाजूला शेतात नेऊन टाकलेली अपघातग्रस्त कारकडे माझे लक्ष गेलेच नव्हते ! ती गाडी अद्याप तिथेच चक्काचूर झालेल्या अवस्थेत होती. मी कुतूहल म्हणून गाडीजवळ गेलो/ कारच्या बॉनेटचा सर्वनाश झाला होता. पुढचे सीट पूर्णतः चेमटून गेले होते. काचांचा चुरा आत पडून होता. मागचे दरवाजे दबून गेलेल्या अवस्थेत होते. पुढच्या दाराचे तुकडे तिथेच गोळा करून टाकलेले होते. पुढच्या सीटच्या सांदीत निळसर बांगड्यांचे काही बारीक तुकडे पडून होते. ज्याचा माझे मन शोध घेत होते अशी एक वस्तू तिथेच आसपास असायला हवी होती असे मला राहून राहून वाटत होते.अपघात झाला त्या क्षणी या दोघांच्या मनात काय विचार आले असतील ? त्यांचा जीव जाताना त्यांना काय वाटले असेल ? त्या दिवशी जर साहेबरावचे हॉटेल बंद नसते तर असे जर तरचे अनेक प्रश्न मनात चमकून गेले. आणि एका दूरवरून चकाकणारया एका वस्तूकडे बघून मी थक्क झालो ! दुरून चकाकणारी ती वस्तू म्हणजे काल रात्री माझ्या हाती दिलेल्या टिफिनची कार्बन कॉपी होती म्हटलं असतं तरी चाललं असतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर तो काल रात्री माझ्या हाती दिलेल्या नक्षीदार टिफिनसारखाच दोन ताळी चपटा डबा होता. डबा उघडून पाहिला तर उग्र आंबुस वासाचा भपकारा नाकात घुसला. डब्यातील अन्न कुजून गेले होते. विटल्यामुळे त्याची दुर्गंधी बाहेर पडली. अपघात घडला त्या क्षणी बहुधा हा डबा त्या अभागी स्त्रीच्या हाती असावा कारण अपघात होताच अजस्त्र वायूदाबामुळे तिच्या बाजूचे दार तुकडे होऊन उडून पडले होते. तिला जोराचा धक्का बसला असावा आणि निमिषार्धात तिच्या हातातला डबा उडून गेला असावा. लांबून फेकला गेला असल्याने तो कलंडून शेतात माळावर झुडपात पडला होता त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नसणार. आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले होते.....

दुपारी तालुका पोलिस स्टेशनमध्ये फोन करून मृत मोहित्यांच्या भावाचा मोबाईल नंबर घेतला. त्यांना संपर्क साधला. ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते पण त्यांना महत्वाचे बोलायचे आहे असे सांगून मागील दहा दिवसापासून हायवेवर घडणारया घटनेबाबत थोडक्यात माहिती दिली. माझा अनुभवही सांगितला. ते ऐकून त्यांना अश्रू अनावर झाले. ते लहान मुलासारखे रडू लागले. मी त्यांना विनंती केली की त्या सर्वांनी जमल्यास दुसरयाच दिवशी अपघातस्थळी यावे, आई बापा विना पोरकी झालेली ती मुलेही सोबत आणावीत असं त्यांना कळवळून सांगितलं. माझ्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी दुसरयाच दिवशी येण्याचे कबुल केले. 'जवळ आल्यावर मला फोन करा' असे सांगून मी त्यांना माझा मोबाईल नंबर दिला. ठरल्याप्रमाणे दुसरयाच दिवशी भर दुपारी त्यांचा मला फोन आला. मी त्यांना इकडे तिकडे न बोलवता थेट त्या अपघात घडलेल्या ठिकाणी बोलावले. आधी त्यांनी मुलांसाठी आढेवेढे घेतले पण मी खूप मिनतवारया केल्यावर मुलांसह तिथे यायला ते राजी झाले. काळ्या बीएमडब्ल्यूमधून ते त्या ठिकाणी दाखल झाले. रस्त्याच्या एकदम कडेला . ते गाडीतून खाली उतरताच मी पुढे होऊन त्यांना नमस्कार करून माझी ओळख करून दिली. ते दोघे पती पत्नी उतरल्या चेहरयाने सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहत होते. मुले मात्र गाडीतच बसून होती बहुतेक कारच्या दरवाजाला असणारया फिकट काळसर काचाआडून ते अपघातग्रस्त कारकडे पाहत असावेत. मोहिते दांपत्याने आपल्या लहान भावाच्या चक्काचूर झालेल्या कारकडे पाहिले आणि त्यांचे डोळे वाहू लागले. ते सावकाशपणे यंत्रवत चालत कारजवळ गेले. कारच्या भग्न अवशेषांवरून हात फिरवताना जणू त्यांना आपल्या लहान भावाच्या पाठीवरून हात फिरवत असल्यासारखे वाटत होते. मोहितेवहिनींनी मात्र आपल्या भावनांचा बांध खुला केला. कारजवळ येताच त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. काही मिनिटात वातावरण गंभीर झालं होतं, नकळत माझेही डोळे पाणवले. शेवटी काही वेळ तसाच निशब्द गेला. मी मोहित्यांच्या जवळ गेलो. जणू काही खूप जुनी ओळख असावी अशा पद्धतीने त्यांच्या पाठीवर हलकेच थापटले. तोवर त्यांनी स्वतःला सावरले. त्यांची पत्नी देखील शांत झाली होती. मी बाईकच्या हॅण्डलला लावलेली पिशवी काढून आणली. आदल्या दिवशी सापडलेला तो टिफिनचा नक्षीदार डबा मी घरी नेऊन लख्ख धुवून पुसून त्या पिशवीत ठेवला होता, तो डबा काढून त्यांच्या हाती देताच त्यांनी मला मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोके टेकवून ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून गाडीत बसलेली मुले कावरीबावरी होऊन बाहेर आली. आपल्या काकांच्या हातातील टिफिनकडे त्यांचे लक्ष जाताच 'आईं, बाबा'चा त्यांनी आर्त आक्रोश सुरु केला. मोहिते वहिनी त्या मुलांच्या जवळ गेल्या. ती मुले त्यांना अलगद बिलगली आणि सगळे कुटुंब शोककल्लोळात बुडून गेले. काही वेळानी सगळे सावरले. मुलांच्या मनातील मळभ रिते झाले होते. त्या सगळ्यांना घरी घेऊन गेलो. छोटासा पाहुणचार आटोपून पुन्हा भेटण्याच्या शर्तीवर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना मुलांनी 'बापूकाका. बाय बाय !' असे म्हणत हलवलेले ते चिमुकले हात डोळ्याच्या पारयात रुतून बसले. ते गेले त्या दिशेने मी ओलेत्या डोळ्यांनी पाहत राहिलो.....

त्या दिवसानंतर 'ते' अपघातग्रस्त दांपत्य कुणालाही दिसले नाही ! कदाचित त्यांना तो टिफिन मुलांच्या हाती पोहोच करून आई बाबांनी आपला अखेरचा शब्द पाळल्याचे जाणवून द्यायचे असेल वा याच जागेवर सर्वांची एक भेट घ्यावी अन मग इथून कायमचे प्रस्थान करावे असे काही तरी त्या जोडप्याच्या मनात असावे....
गावाकडे येताना मी चुकून कधी तिथे थांबलो तर माझ्या काळजातून काही सुस्कारे आपोआप बाहेर पडतात आणि समाधानाची स्मितरेषा चेहरयावर तरळते...

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in/2016/11/blog-post_23.html

highway.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sameer sir,Ekach number......pan he kharach tumhi anubhavalay ka?kiti bhayanak asel sagal?

hi katha khari aahe ka? vachun khup wait watale pan niyatichya pudhe konache kay chalnar?