मजेशीर अनुभव

Submitted by kokatay on 10 November, 2016 - 16:10

आज माझ्या चिट्ठी मध्ये लिहिले आहे ते “ मजेशीर अनुभव “ चिठ्ठी पाहून बऱ्याच गोष्टी आठवतात. ६०-७० दशकाच्या दरम्यान जे लोकं भारतातून अमेरिकेत आले त्यांना पुष्कळ कडू-गोड परिस्थितीतून जावं लागलं. कारण, त्या वेळेस आजच्या सारख इंटरनेट नव्हतं. त्यामुळे अमेरिकेतल्या रोज च्या जीवनाबद्दल काहीच कल्पना नसायची .

आमचे एक काका जे भारतात वास्तूविशारद होते आणि ते एका मुलाखतीसाठी अमेरिकेत आले. संध्याकाळी विमान न्यूयॉर्कला पोहोचलं. ते रात्री हॉटेल मध्ये थांबले. सकाळी ते मुलाखतीसाठी ऑफिसमध्ये गेले. ते तासभर आधीच पोहोचले होते. तेव्हां त्यांनी लॉबीमध्ये वेळ काढायचे ठरविले. त्यांना खूप तहान लागली होती आणि कोका-कोला प्यावा असं वाटलं. काका बिल्डिंगच्या कॉफी शॉप मध्ये गेले आणि दुकानदाराला म्हणाले ‘मला एक कोका-कोला ची बाटली हवी’. त्या दुकानदाराला काही कळलंच नाही . नंतर ते बिल्डिंगच्या बाहेर जायला निघाले. तेव्हा दारावर उभ्या असलेल्या द्वारपालाला त्यांनी विचारलं ‘कोका –कोला ची बाटली कुठे मिळेल?’ त्या व्दारपालालादेखील काही कळलं नाही. मग शेवटी त्यांनी हातवारे करून सांगितलं ‘ मला पाणी प्यायचं आहे’ . तेव्हा त्या व्दारपालाला कळलं काकांना काय हवं ते. त्याने काकांना पाणी पिण्यासाठी कसं जा ते सांगितलं. ‘ सरळ जाऊन उजवीकडे वळा, तिथे एक ‘ फाऊंटन’ आहे’.

व्दारपालाचं म्हणणं ऐकून काकांना खूपच राग आला. हा मनुष्य मला काय कावळा समजतो? जो मला पाणी पिण्यासाठी कारंजाचा रस्ता सुचवतो .
काका तिथून निघून पुढे गेले. तिथे खरोखरच एक कारंजा होता. पण त्याच्याही पुढे एक सार्वजनिक पाण्याचा नळ होता. नंतर काही दिवसांनी त्यांना कळले की इथे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याला ‘फाऊंटन’ असं म्हणतात!

असाच एक मजेशीर किस्सा माझ्या स्वतः बरोबर झाला होता. मी माझी दीड वर्षांची मुलगी आणि माझे पती असे आम्ही एकदा एका दुकानात गेलो होतो. माझ्या मुलीला मी शॉपिंगकार्ट मध्ये बसवलं होतं. तर तिथे आलेली एक अमेरिकन बाई माझ्या मुलीशी बोलू लागली. ती बाई माझ्या मुलीचं तीचं कौतुक करू लागली. तिने माझ्या मुलीला विचारलं ‘ तुझं नाव काय ?’
मग मी माझ्या मुलीला सांगितलं कि ‘Aunty’ ला सांग तुझं नाव काय ते’

माझ्या ‘Aunty’ या शब्दाने त्या बाईचं तोंड ताबडतोड आंबट झालं. इतकं की तिनं तिथून काढता पाय घेतला. नंतर मला माझ्या पतीकडून कळलं. ‘ जर तुमचं खरं नातं असेल तरच तशी हाक मारायची. नाहीतर सरळ नावानेच हाक मारायची पद्धत आहे’

पण, आता परिस्थिती खूपच बदलली आहे. आताच्या पिढीतले आधीच सगळी चौकशी करतात. यासाठी त्यांना इंटरनेटची खूप मदत होते.

परवाच, माझ्या मावस बहिणीचा भारतातून फोन आला होता. ती आणि तिचे पती दोघं अमेरिकेत नोकरीसाठी येणार आहेत. मी तिला म्हटलं ‘लॉस एन्जेलीसला’ आलात तर खूपच छान वाटेल. तर त्यावर तिचं उत्तर होतं. “ताई, मला देखील आवडेल. पण, तिकडे राहण्याचा खर्च मिनिआपोलीसपेक्षा दुप्पट आहे, तेव्हा आम्ही मिनिआपोलीस ला जायचं ठरवलं आहे!

तिचं उत्तर ऐकून मला फारच कौतुक वाटलं. जेव्हा सुमारे १९ वर्षे आधी मी लग्न करून अमेरिकेत आले. तेव्हा इथे रहायचा किती खर्च लागेल वगैरे बाबींचा विचारही मनात आला नाही. काळाप्रमाणे सगळं बदलतं. पण, मला अजूनही ३०-४० वर्षं आधी जी मंडळी अमेरिकेत आली, त्यांचं कौतुक करावसं वाटतं. त्यांनी सहजपणे नवीन वातावरणात स्वतःला अॅडजस्ट केलं आणि त्यांना तसं करायला फार अवघड गेलं असावं. त्यांना माझं मनः पूर्वक अभिवादन!

ऐश्वर्या कोकाटे

लॉस एन्जेलीस
http://www.marathicultureandfestivals.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ kokatay, 'फाउंटन'चा किस्सा लई भारी!! Rofl

खरंय! मला कोणी पाणी प्यायला 'कारंज्याकडे' पाठवलं असतं तर माझंही डोकं नक्कीच भिरभीरलं असतं.

In 1965 founder of ISKCON went from India to New York. And established the biggest international society, which he could not do in India.

छान मजेशीर,
पण हे नाही समजले,
<< जर तुमचं खरं नातं असेल तरच तशी हाक मारायची. नाहीतर सरळ नावानेच हाक मारायची पद्धत आहे’ >>
नाव माहीत नसताना काय हाक मारायची?

मस्तं किस्से. ईथे सुरुवातीला असे घोळ बरेच होतात.

>>>>३०-४० वर्षं आधी जी मंडळी अमेरिकेत आली, त्यांचं कौतुक करावसं वाटतं. त्यांनी सहजपणे नवीन वातावरणात स्वतःला अॅडजस्ट केलं आणि त्यांना तसं करायला फार अवघड गेलं असावं. त्यांना माझं मनः पूर्वक अभिवादन!----

पटलं.

नाव माहित नसेल तर can you tell her your name? वगैरे बोलायचं. पण अंकल, आँटी बि ग नो नो!! मुलांच्या मित्रांच्या आई वडीलांना मुलांनी काय हाक मारावी असा मला पूर्वी प्रश्न पडायचा. मी त्या मंडळींना विचारायचे, माझ्या मुलांनी तुम्हाला काय हाक मारावी? ते नावाने हाक मारली तरी चालेल सांगतात, क्वचित कोणी मि./मिस (आडनाव/नाव)असं म्हटलं तर चालेल म्हणतात. आपली पोरं बिनधास्त दुसऱ्या मोठ्या माणसांना नावाने हाक मारताना ऐकून मला आधी झेपायचं नाही. आत सर्व झेपतं. Happy

LA airport वर पहिल्यांदाच रात्री उतरुन रस्त्यावर मोठ्या मोठ्या बॅगा ओढत असतांना एका दोघांनी जोरात हाय केला, तेव्हा घ्यायला आलेल्या मित्राच्या किती ओळखी म्हणुन कौतुक वाटलेला!