वनस्पतीचे संरक्षक कवच -पिवळा रंग

Submitted by दीपा जोशी on 12 November, 2016 - 11:12

वनस्पतीचे संरक्षक कवच -पिवळा रंग

उन्हाळा संपता संपता मी सकाळी नियमित फिरणं सुरु केलं आणि साहजिकच निसर्गाचं निरीक्षण नित्यनेमाने होऊ लागलं. अलीकडे दिवाळी निमित्त बाहेरगावीही जाणं झालं. जाता येताना निसर्गाची मजा लुटताना इतके दिवस पाहिल्याने एक निरीक्षण मनात सारखं घिरट्या घालू लागलं , की एकूणच निसर्गात पिवळ्या रंगाची रेलचेल दिसते आहे.
अगदी रस्त्याकडेला उगवणाऱ्या झाडांची फुले घ्या! छोटी छोटी पफसारखी पिवळी धम्मक फुले अंगावर मिरवणारी बाभळी ; अगदी छोट्या झाडापासून मोठ्या वृक्षापर्यंत पिवळ्या फुलांच्या घोसांनी बहरलेला काशीद ( किंवा कासोद ); तसाच सोनमोहोर. अहाहा! याचं नावच इतकं छान आहे ! पिवळ्या फुलांचे तुरे अंगावर मिरवतांना अगदी सोन्याचा मोहोर आल्यासारखं झाड सुंदर दिसतं.
तसंच बिट्ट्यांचं झाड- हिरव्या हिरव्या छोट्या कमंडलू सारख्या बिट्ट्यांच्या जोडीला एकाला एक लागून असणाऱ्या, सहा पाकळ्यांच्या मोहक पिवळ्या फुलांच्या रंगाबरोबर गंध देखील मन वेधून घेतो. शेतातल्या, वर माना उंचावून पाहणाऱ्या पिवळ्याधम्मक सूर्यफुलांच्या रंगाचं गारुड क्षणभर तरी मनावर पडतंच पडतं. अशी किती उदाहरणं सांगावी ..भोपळ्याची फुले, बहावा, झेंडू, शेवंती, गुलाब, इतकाच काय पण गवतावर डोलणारी रानफुले - अशी कितीतरी पिवळ्या रंगाची फुले अगदी सहज नजरेला पडतात. फळांवरही पिवळ्याचा भलताच लोभ आहे . कडू निंबाच्या लिंबोण्यां पासून , केळी , पेरू, लिंबू ,पपई ते फळांचा राजा आंब्या पर्यंत च्या फळांवर कितीतरी पिवळ्या रंगाच्या छटा पसरतात. झाडाची पानेसुद्धा पिकली की पिवळीच व्हायची!
काय बरं कारण असावं की निसर्गात पिवळा रंग एवढा ओतप्रोत भरलाय?
निसर्गात पिवळा रंग असणाऱ्या फुलात, फळात किंवा पानात- पानाना हिरवा रंग देणाऱ्या क्लोरोफिल च्या जोडीला ‘कॅरोटिनॉइड्स’ अथवा ‘फ्लॅव्होनॉइड्स’ हे रंगकण असतात. ही एक प्रकारची रासायनिक संयुगेच असतात. त्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. पिवळाच काय पण एव्हडी सगळी रंगाची सृष्टी याच रंगकणांच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून निर्माण होते. टोमॅटोला लाल रंग ‘लायकोपिन’ हे कॅरोटिनॉइड देते .तर गुलाबाला लाल रंग देणारे ‘अँथोसायनिन’ हे फ्लॅव्होनॉइड आहे. ‘बीटा कॅरोटिनॉइड’ असणारी फुले-फळे पिवळी जर्द किंवा नारिंगी असतात. केळे किंवा आंबा पिकताना, सालीत असणाऱ्या हिरव्या क्लोरोफिल ची जागा हळूहळू हे पिवळे कॅरोटिनॉइड्स घेतात. मग असे फळ पिवळे दिसू लागले की आपल्याला ते पिकले असे समजते . लिंबा मध्ये फ्लॅव्होनॉइड्स असतात, म्हणून ती पिवळी दिसतात. लॅटिन शब्द ‘फ्लॅव्हस ‘ चा अर्थच मुळी ‘पिवळा’ असा आहे.
सूर्यप्रकाश फुलांवर पडला की त्या सप्त रंग- तरंगातले, पिवळा सोडून बाकी सगळे रंग -तरंग कॅरिटोनॉइड्स शोषून घेतात व पिवळे रंग-तरंग परावर्तित करतात, मग त्या फुलांचा रंग आपल्याला पिवळा दिसतो.
ह्या ‘कॅरोटिनॉइड्स’ अथवा ‘फ्लॅव्होनॉइड्स’ चं अजून असं काय विशेष काम असतं की त्यांना वनस्पती जवळ बाळगतात?
फुलांना विविध रंग असण्याचे एक कारण भडक रंगामुळे परागीभवनासाठी कीटक लगेच आकर्षित होतात. त्यांची रंग ओळखण्याची गती सुध्दा आपल्यापेक्षा पाचपट जास्त आहे. म्हणून आपल्याला फुलांच्या गुच्छात वेगळ्या रन्गाचे फुल पटकन ओळखू येणार नाही, पण मधमाशी मात्र लाम्बूनच हेरुन त्यावर झेप घेइल! काही कीटक पिवळ्या रंगाकडे पटकन आकर्षीत होतात. पण एक मात्र आहे. मधमाशी सारख्य कीटकांना आपल्याला दिसतात तसे रंग दिसत नाहीत. त्यांना, आपल्याला अदृश्य असणाऱ्या अतिनील किरणांच्या पट्ट्यातील निळा आणि हिरवा हे रंग आणि त्यापासून तयार झालेले इत्तर रंग दिसतात.
पिवळ्या रंगाची फुले मधमाश्याना निळी दिसतात. मधमाश्या खास करून निळ्या रंगाकडे जास्त आकर्षित होतात. पिवळी फुले त्यांना निळी दिसत असल्याने साहजिकच पिवळी फुले त्यांची लाडकी होतात! आणखी एक म्हणजे, कॅरोटिनॉइड्स हे सूर्याकडून आलेली अतिनील किरणे, अतिनील किरणांच्या पट्ट्यात शोषून घेतात. अतिनील किरणांच्या पट्ट्यात, आपल्याला अदृश्य असणारे पण मधमाश्याना पटकन ओळखू येणारा आकृतिबंध हे रंगकण फुलांच्या पाकळ्यांवर तयार करतात आणि त्यामुळे मधमाशीसारखे कीटक पटकन आकर्षित होतात, आणि परागिभवनाला मदत करतात. फ़ुलातले पुन्केसर आणि पराग पिवळे असतात त्या-पाठिमागे पण हेच करण आहे की काय कोण जाणे!
मला दिसलेले पिवळ्या फुलांचं वैभव आपल्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात दिसले. उष्ण प्रदेशात अति उष्णेतेमुळे फुलासारख्या नाजूक भागाला इजा पोहोचू नये म्हणून निसर्गाने रंग-कणांचे सुरक्षा-कवच वनस्पतींना दिले आहे. हे रंगकण सूर्य- प्रकाशातून फुलापर्यंत पोचणारी जास्तीची ऊर्जा हळूहळू इतस्ततः पसरवून टाकतात, आणि फुलाना अतिरिक्त ऊर्जेमुळे होणाऱ्या नुकसानी पासून वाचवतात. आणखी एक काम म्हणजे, प्रकाश किरणांमधली ऊर्जा शोषून घेतल्याने हिरव्या रंगाच्या, वनस्पतीचे अन्न तयार करणाऱ्या क्लोरोफिल रंग कणांचे पण रक्षण होते. उष्ण प्रदेशात उष्णताधिक्याने होणाऱ्या परिणामांपासून हे रंगकण फुलांना असं वाचवतातच पण त्याच बरोबर आकर्षक पिवळा रंग पण बहाल करतात!
तिकडे अमेरिका वगैरे देशात उन्हाळा -संपता संपता आणि थंडी सुरु होण्याच्या सुमारास म्हणजे ‘फॉल’ (आपल्याकडचा ‘शरद’) ऋतू मध्ये झाडांची पाने पिवळ्या -नारिंगी अश्या अप्रतिम सुंदर रंगानी माखली जातात. तो रंग सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो. त्यावेळी दिवस लहान होऊ लागतो अन दिवसाचं तापमानही कमी कमी होऊ लागतं. पानांना अन्न - पाणी पुरवठा करणाऱ्या नलिका संकुचित होऊ लागतात, तसतसं क्लोरोफिल नष्ट होऊ लागतं, आणि ‘कॅरोटिनॉइड्स’ प्रकट होऊ लागतात. त्यामुळे मग पाने पिवळ्या, नारिंगी वगैरे रंगाची दिसू लागतात.
झाडांवर वाऱ्याबरोबर डोलणारी मोहक पिवळी फुले, पाने, फळे पाहताना आपल्याला कल्पनाही येत नाही की या पिवळ्या रंगापाठीमागे निसर्गाची इतकी सुज्ञपणे आखलेली यंत्रणा आहे!

yellow flower_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख! ह्या विषयावर थोड्या वेगळ्या अनुषंगाने काम केले असल्याने वाचायला मजा आली. सोप्या भाषेत छान समजावले आहे!

मस्त लेख! ह्या विषयावर थोड्या वेगळ्या अनुषंगाने काम केले असल्याने वाचायला मजा आली. सोप्या भाषेत छान समजावले आहे!>>>>>>> +१

छान लेख...
बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या.. धन्यवाद _/\_

तुमच्या हातातील ते पिटूकले फुल मलासुद्धा खुप आवडतात... अगदी बारीकबारीक... याच आकारात गुलाबी फुलसुद्धा येतात..ती घेउन आम्ही खेळायचो..

हा लेख वाचुन काढून ठेवलेले बरेच प्रचि आठवले. त्यातल्यात्यात माझ्याकरता स्पेशल असलेला देते... काही लोकांनी पाहिलासुद्धा असेल इथं..

घर बांधल, नावाला कंपाऊंड झाल्यावर कुंडीत मोठ्या हौशीन लावलेल पहिलवहिलं निवडूंग... मग सगळ्या दैनंदिन राड्यात स्वतःहुनच नेटानं वाढलेले अन कुंडीभर पसरल्यामुळे तसच राहिलेलं हे पिटूकल जवळपास १० १२ वर्षानंतर पहिल्यांदा फुलावर आलं तेपन हाच रंग घेउन..

अगदी पहिल्या फुलाचा प्रचि आकाशाच्या निळाईच्या बॅकग्राऊंड्वर काढला होता. त्यात त्या फुलाच्या लोभाने आलेली एक चुकार किटकसुद्धा कैद झाला होता... तो फोटो दिसेना आता मला.. असो.. हा पन तितकासा वाईट नाही आलाय नाही?

लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद दिनेश, टीना आणि विनी!

टीना , मला आत्ता आठवलं… तुम्ही लिहिलंय ती गुलाबी फुलं मी सुद्धा पूर्वी पहिली आहेत. पण लेखात फोटोमध्ये दिलेली ही पिवळी फ़ुलं मी पहिल्यांदाच पाहिली होती. खूप चमकदार पिवळा रंग होता त्यांचा.
आणि तुमचा निवडुंगाचा फोटो तर अप्रतिम सुंदर! निवडुंगाची फ़ुलं एव्हढी सुंदर दिसू शकतात….

लेख आणि विषय आवडला...

निसर्गाशी जुळवून घेण्याची कला आत्मसात करणारी प्रजात, जिव (वनस्पती, प्राणी) या जगात तरुन जआण्याची क्षमता ठेवते. तसे करणे जमले नाही तर प्रजाती नामशेष होतात.

धन्यवाद स्वाती, उदय , आणि सोनाली .
उदय , तुम्ही म्हणता ते खरं आहे. (‘“निसर्गाशी जुळवून घेण्याची कला आत्मसात करणारी प्रजात, जिव (वनस्पती, प्राणी) या जगात तरुन जआण्याची क्षमता ठेवते. तसे करणे जमले नाही तर प्रजाती नामशेष होतात.”) म्हणूनच लाखो वर्षे निसर्गात उत्क्रांती होतेय.

कुठे शेअर करताय?>> नातेवाईकांच्या wa ग्रुपवर. त्यांनी फॉरवर्ड केला तर प्रॉब्लेम नको म्हणून तुमच्या नावासह पाठवते.

Interesting