थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. http://www.maayboli.com/node/60405 पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात. पुढे जाऊन माझा त्यात खरंच फायदा होता का? आणि २०० रुपये शेकड्याने मिळणाऱ्या पणत्यातून जिने त्या घडवल्या तिला काहीच फायदा नाही. असे असताना त्यातून मी पैसे कमावणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न मनात येत होतेच.
पण हे सर्व नाहीसे झाले कारण त्यातला हेतू. मागच्या वर्षी एका मैत्रिणीने तिने बनवलेल्या पणत्या विकून आलेले पैसे दान केले होते. त्यामुळे यावेळी आमचाही तोच विचार होता. हेतू निश्चित असला ना मग बाकी सर्व गोष्टी फिक्या वाटतात. आता फक्त एकच हेतू होता, ज्या संस्थेला आम्हाला देणगी द्यायची होती त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी. अर्थात तरीही ज्यांना पणत्या खरंच आवडल्या आहेत त्यांनाच तो हेतू आम्ही सांगितला होता. कारण त्याची जाहिरात करून त्या मला विकायच्या नव्हत्या. एकेक करत २३०$ च्या पणत्या विकल्या गेल्या. यात झालं काय की अनेकदा मला वाटायचं की कशाला लोकांना पुन्हा विचारायचे किंवा नवीन पणत्यांचे फोटो टाकायचे? या सर्व विचारांना मागे सारून एकच विचार पुढे होता, जितके जास्त विकल्या जातील तितकी जास्त मदत आपण करू शकतो. त्यामुळे काही सोशल ग्रुपवर पण मी पणत्यांचे फोटो आणि त्यांचे दर दिले. ऑफिसमध्ये विचारायला मन थोडं कचरत होतं पण म्हटलं,"कुठे आपल्याला ते आपल्यासाठी विकायचेत?" त्यामुळे तिथेही मैत्रिणींना विचारले. ज्यांना आवडल्या त्यांनी आवर्जून मागून घेतल्या. आता घरी फक्त डझनभर पणत्या राहिल्यात. त्या घरी वापरेनच.:)
कुणाला वाटेल हे सर्व सांगायची काय गरज आहे? एखादी ५ किमी ची रेस पळल्यावर १० फोटो टाकतो आपण. बाकी कुठं गेलो, काय खाल्लं त्यावर १००. मग यावर का नाही लिहायचं? दोनेक वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने आम्हाला सांगितलं, तिच्या आईच्या ७५ व्या वाढदिवशी तिने एक चांगले काम केले. सिंधुताई सपकाळ यांच्या मुलींच्या आश्रमातील एका मुलीचे शैक्षिणक पालकत्व घेतले आहे. वर्षातून त्या मुलीच्या शाळेसाठी लागणार खर्च ती करते. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या कामाबद्दल मला माहिती झाली. सासवड जवळच्या एका गावात असलेला तो मुलींचा आश्रम. त्यानंतर माझ्या अजून एका मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी तिथे देणगी दिली. त्यांच्याकडून त्या आश्रमाबद्दल ऐकून जायची, काहीतरी करायची इच्छा झाली.
दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तेंव्हा तिथल्या मुली, त्यांची स्वच्छता, कॉलेजसाठी जाणाऱ्या मुलीची धावपळ आणि तिची शिक्षणासाठीची जिद्द सर्वच प्रेरणादायी होतं. तिथे असणाऱ्या शिलाईच्या मशीन आणि पिशव्या शिवण्याचा, विकण्याचा उद्योगही पाहिला. आपण त्यांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो हा एकच विचार तेंव्हा मनात येत होता. कपडे, पैसे, स्टेशनरी, मुलांचे शैक्षिणक पालकत्व किंवा एकरकमी देणगीमुळे त्यांचे एखादे मोठे कामही मार्गी लागू शकते असे अनेक पर्याय समोर आले. सध्यातरी आम्ही एकहाती रक्कम देण्याचा पर्याय अवलंबला आहे. पण खरंच करण्यासारखं खूप आहे आणि लोक कमी असं वाटलं. आणि हो, माझ्या मैत्रिणीने मला त्यांच्या कामाबद्दल सांगितले म्हणून मी काहीतरी करू शकले. मग मी बाकी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही चांगले झाले तर का नाही? म्हणून हा उपद्व्याप.
कालच माझी ती मैत्रीण, पणत्यांचे आलेले आणि आमच्याकडून थोडे असे पैसे संस्थेत जाऊन देणगीची रक्कम देऊन आली. दिवाळीच्या आधी हे काम व्हावे अशी खूप इच्छा होती. ती जाऊन आल्यावर, अशा कामासाठी लोकही किती उत्साह दाखवतात असं वाटून गेलं. आपण इथून विचारल्यावर तिकडे कुणीतरी हे करतंय हेही भारीच ना? तिच्यासोबत बाकीच्यांनीही मग पैसे, कपडे, मिठाई जमेल तसं दिलं. आज तिच्याकडून तिथले फोटो मिळाले आणि खूप भारी वाटलं. आपण केलेल्या कामाने कुणाचे तरी काही चांगलं झाल्याचं समाधान. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पणत्या विकत घेतल्या त्यांनाही ते फोटो दाखवले आणि त्यांनाही तोच आनंद मिळाला. तर एकूण काय, तुम्हालाही खरंच काहीतरी करायची इच्छा झाली तर जरूर कळवा त्या संस्थेला. त्यांचा नंबर माझ्या एका फोटोत दिसेलच. आणि हो, त्यांचा मुलांचाही आश्रम आहे पुण्यात. तुमच्याकडून काही भलं झालं तर बाकीच्यांनाही जरूर सांगा. त्याचं समाधान तुम्हालाही मिळेलच.
माझी मैत्रीण म्हणते ते बरोबर आहे, अशा कामात विचारायची लाज कशाला बाळगायची आणि लोकांना सांगायचीही? "नेकी कर फेसबुक पे डाल", बरोबर ना ? आता पुढच्या वेळी पणत्यांच्या उद्योगाला अजून हुरूप येणार आहे हे नक्की.
सर्वाना शुभ दीपावली !
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
छान केलेत! आणि फेसबूकवर शेअर
छान केलेत!
आणि फेसबूकवर शेअर करणेही योग्य. चांगल्या कामांची जाहिरात झाली पाहिजे. काय करता येईल असा विचार करणारयांपर्यंत ते पोहोचले पाहिजे.
छान पोस्ट विद्या! असे शेअर
छान पोस्ट विद्या!
असे शेअर केल्याने लोकांना आपण काय करू शकतो या ही कल्पना येते.
परवाच फेसबुकवर एक पोस्ट पाहिली.
एकीने लिहिले होते की ती तिच्या कारमध्ये पारले जी चे छोटे छोटे पुडे असलेला बॉक्स नेहमी ठेवते आणि सिग्नलवर भिक मागणार्या छोट्या मुलांना हे पुडे देते.
मलाही ती आयडिया खूप आवडली.
कधी शहरात कार चालवायची वेळ आली तर नक्की असे करेन.
छान विद्या
छान विद्या
छान काम विद्या. हे पार्ले जी
छान काम विद्या.
हे पार्ले जी उद्योग मी पण करते. विशे ष करून जे लोक अगदी पायात काही नसलेले सुद्धा रस्त्यात झोपलेले असतात त्यांच्या पायाशी ठेवते. जेणे करून उठल्यावर ते खाउ शकतील. मुलांचे फोटो अगदी निरागस व छान.
छान
छान
गुड शो! अभिनंदन.
गुड शो!
अभिनंदन.
छान काम केलतं .
छान काम केलतं .
विद्या खूप छान काम केलंत.
विद्या खूप छान काम केलंत. तुमचं मनपूर्वक अभिनंदन
चांगलं काम केलं आहे विद्या.
चांगलं काम केलं आहे विद्या.
पारले जी ऐवजी छोटे फाइव्ह
पारले जी ऐवजी छोटे फाइव्ह स्टार, डेरी मिल्क द्या. यामुलांना चाॅकलेट देऊन लाड करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
छान काम केलंत!
छान काम केलंत!
चांगले काम, विद्या! साती आणि
चांगले काम, विद्या!
साती आणि अमांची पार्लेजी बद्दलची पोस्ट वाचून आजच आलेला अनुभव सांगावासा वाटतोय. सिग्नलला आज माझ्यापुढे गाडीत असलेली व्यक्ती अशीच भिक मागणार्या छोट्या मुलांना पतंजलीचे बिस्कीट पुडे वाटत होती.
नंतर मी पाहिले दोन मुलांनी ते पुडे घेऊन मागे येउन डिव्हायडर मधल्या कचर्यात टाकून दिले. आणि पुन्हा दुसर्या बाजूला जाऊन भीक मागू लागली.
सर्वान्चे कमेन्टबद्दल
सर्वान्चे कमेन्टबद्दल धन्य्वाद. माझ्या कामाचे कौतुक हा हेतू नक्कीच नव्हता. सर्वाना पुन्हा एकदा विचारतेय, कुणाला या सन्स्थेबद्दल माहिती हवी असल्यास मला नक्की विचारा. तुम्हाला काही मदत करायची असेल तर जरुर कळवा. या पोस्टमधून अजून कुणाची मदत सन्स्थेला झाली तरच याचा फायदा आहे. अनेक्दा लोकाना काहीतरी करायचे अस्ते पण काय ते नक्की लक्शात येत नाही. यातून कुणाला काही प्रोत्साहन मिळाले, काय करु शकतो याची कल्पना आली तर छानच.
विद्या.
माधवी, पतंजलीचे होते
माधवी,

पतंजलीचे होते ना!
पारले जी चे खात असावीत मुले.
मी अजून स्वतः प्रयोग करून पाहिले नाही.
बेगर्स माफिया बद्दल इथे
बेगर्स माफिया बद्दल इथे कोणाला काही माहित दिसत नाही, पतंजली बिस्कीट टाकून देणारे नक्कीच त्या माफिया टोळीतले असावेत. दान सत्पात्री असावं. एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये असे काही दानाचे एटिकेट्स आहेत. असो.
'एका हाताने केलेले दान
'एका हाताने केलेले दान दुसर्या हाताला कळू नये'
का?
जर त्यामुळे दान करणारे हात वाढणार असतील तर का नको?
जर त्यामुळे दान करणारे हात
जर त्यामुळे दान करणारे हात वाढणार असतील तर का नको? >>> +1 याचसाठी....इथे लिहिलेय. मी खूप काही मोठी देणगी दिलेली नाहिये आणि जी दिलीय त्याची रक्कम पण लिहिली नाहीये इथे. पण ती सोडून अजून कुणाला मदतीचे आवाहन नक्कीच करु शकते.
विद्या.
@ विद्या भुतकर, माझ्या
@ विद्या भुतकर, माझ्या मैत्रिणीने मला त्यांच्या कामाबद्दल सांगितले म्हणून मी काहीतरी करू शकले. मग मी बाकी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही चांगले झाले तर का नाही? >>> आपले म्हणणे अगदी योग्य आहे.
.
विद्यातै, धन्यवाद!
विद्यातै,
धन्यवाद!
दुरुस्त केले आहे. माझ्या एक
दुरुस्त केले आहे. माझ्या एक मैत्रिनिचे ते आडनाव आहे त्यामुळे हातात बसले आहे.
सुचनेसाठी धन्यवाद.
पारले जी चा प्रकार ओळखीचा आहे
पारले जी चा प्रकार ओळखीचा आहे माझ्याही. कारने प्रवास नसल्याने माझे असे करणे होत नाही. ट्रेनने प्रवास करताना काही भीक मागणार्या मुलांच्या चेहर्यावर एवढे गुर्मीचे भाव असतात की तसेजा बाबा पुढे असेही रागाने सांगावेसे वाटते. कदाचित मी त्यांना ओळखण्यात चुकतही असेन. पण मुंबईत ईतका विचार करायला वेळ कोणाकडे असतो..
यामुलांना चाॅकलेट देऊन लाड करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. >>> याच्याशी मात्र सहमत. कारण अगदी कालचाच किस्सा. मी आणि माझा मित्र बाहेर हॉटेलात जेवून बाहेर पडलो. मित्राने एका सिगारेटच्या टपरीवर त्याचा स्टॉक भरला आणि सोबत चॉकलेटही घेतले. चालता चालताच त्यातील एक माझ्यासमोर धरले. मी जेवणानंतर चॉकलेट काय खायचे म्हणत त्याला नको बोलणार ईतक्यातच समोरून एका भीक मागणार्या मुलाचा हात पुढे झाला. आणि मी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसे ते चॉकलेट मित्राच्या हातून घेत त्या मुलाच्या हातात ठेवले. तो टायमिंग एवढा जबरदस्त होता की मित्रालाही मौज वाटली. पुढे जाताना मागे वळून आम्ही पाहिले तर तो मुलगा आणखी एका मुलाला आनंदाने नाचवत ते चॉकलेट दाखवत होता
विद्याताई, अतिशय उत्तम काम.
विद्याताई,
अतिशय उत्तम काम. पुढील वर्षासाठी शुभेच्छा. लेखाचं नावही समर्पक!
रस्त्यावर मुलांना बिस्किटं देणं हे सत्पात्री दान होत नाही. त्यानी आपण फक्त भिकारी प्रवृत्तींना प्रोत्साहन देतो. तिथली प्रत्येक भिकारीण धडधाकट असते, तिच्या हातातलं प्रत्येक मूल drugged असतं आणि फक्त पार्लेच खाणारी ती सर्वं मुलं मोठी होऊन भिकारीच बनणार असतात कारण त्यांना तेच शिक्षण मिळालेलं असतं. या मुलांना कानाला धरून शाळेत बसवण्याची जरूर आहे. ते आपण करू शकंत नाही. निदान भीक मागायला प्रोत्साहन तरी देऊ नये.
प्रत्येकानी दान तर करावंच, पण ते अशा ठिकाणी जिकडे ते व्यवस्थित वापरलं जात आहे ना ह्याची आपण खात्री करुन घेवू शकतो. उदा. गावोगावी उत्तम तर्हेनी चालवली जाणारी महिला सबलीकरण केन्द्रं, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, परित्यक्तांना आधार देणारी केंद्रं वगैरे.
यासाठी अतिशय साधी सिस्टिम आहे. आपण आपल्या मिळकतीच्या किती टक्के दानधर्म देणार आहोत याचा एकदाच निर्णय घ्यायचा. दर वर्षी मार्च महिन्यात तितके टक्के आधीच बघून ठेवलेल्या उत्तम संस्थेला द्यायचे. त्यानी कित्येक जणा/जणींचं आयुष्य तर उजळतंच, आपल्यालाही असे misplaced दयेचे उमाळे येत नाहीत.
छान काम केलंत. अभिनंदन.
छान काम केलंत. अभिनंदन.
छान. स्वीट टोकर, 'misplaced
छान.
स्वीट टोकर, 'misplaced दयेचे उमाळे' भारी शब्द आहे. पोस्ट पटली.
स्वीट टॉकर, आपल्या संपूर्ण
स्वीट टॉकर, आपल्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन. आपण बिस्कीट वा तत्सम खाद्यपदार्थ देऊन त्यांची समस्या आयुष्यभरासाठी सोडवू शकत नाही, तर उलट नकळत असे लाजिरवाणे जिणे जगायला हातभार लावतो.
त्यापरीस विद्याने निवडलेला पर्याय उत्तम. एखाद्या जबाबदार संस्थेला मदत करून आपण त्यांच्या शिक्षणास व रोजगारास थोडा हातभार लावू शकतो. एखाद्याचे शैक्षणिक पालकत्व घेणे, हाही अगदी चांगला पर्याय आहे.
हे एकदम अस्थानी होईल. पण
हे एकदम अस्थानी होईल.
पण लहानपणी अशी मागून खाणारी मुले नंतर अत्यंत परिश्रमाने कष्ट करून शिकून सवरून नावारूपाला आलेली मी याची देही याची डोळा पाहिलेली आहेत.
अगदी माझ्या ओळखीचे काही माबोकरही यात आहेत.
जर त्यांना त्यावेळेपुरती दया येऊन कुणी खायला दिले नसते आणि त्यावेळेपुरता त्यांना पोटाला आधार मिळाला नसता तर ते जगू ही शकले असते की नसते मला माहित नाही. मग पुढची प्रगती दूरच.
बिस्कीटचा पुडा एका वेळची भूक नक्की भागवू शकतो.
आणि बिस्कीटचा पुडा वाटणारे इतरत्र दानधर्म करत नसतील असेही नाही.
तर ते असो.
मी अजूनतरी बिस्कीटचे पुडे वाटले नाहीयेत, पण ती कल्पना मला आवडली इतकेच.
कित्येकदा गरीब लोकांची परिस्थिती इतकी बिकट असते की कित्येकजण मदत करणार्या संस्थांपर्यंत पोचतील किंवा संस्था त्यांच्यापर्यंत पोचतील असे नाही.
या प्रकारची मोट्ठी चर्चा
या प्रकारची मोट्ठी चर्चा http://www.maayboli.com/node/12475 इथे आहे.
खाद्यपदार्थांच्या वाटप
खाद्यपदार्थांच्या वाटप दयावृत्तीनेच होते, यात काहीच शंका नाही. उलट निव्वळ बिस्कीट वाटपावर न थांबता शक्य असल्यास एखाद्याच्या संपूर्ण पोषक आहाराची जबाबदारी घेणे जास्त उपयुक्त ठरावे (कित्येक जण असे करताही असतील, प्रत्यक्ष अथवा संस्थेद्वारे).
माझा मुद्दा इतकाच की, समस्या कायमस्वरूपी सोडवण्यावर भर हवा. बिस्किटांनी काही दिवसांचा प्रश्न मिटू शकेल, पण कायमस्वरूपी नाही.
हलाखीत असणाऱ्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न काहीजण वाटपाद्वारे सोडवतील, पण त्याबरोबरच अर्थार्जनाच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणे तितकेच महत्वाचे आहे, कदाचित दररोजची ददात मिटवण्यापेक्षा जास्तच. ते काम आपल्याला सहज शक्य नसेल, तर किमान इतर संस्थांना यथाशक्ती मदत करावी, हे जास्त योग्य ठरेल.
केवळ पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे, हे एका पातळीवर गरजेचे असले तरी केवळ तेवढेच करणे पुरेसे नाही.
छान चर्चा चाललीय. यावरून
छान चर्चा चाललीय. यावरून जाणवते कि प्रत्येकाच्याच मतामध्ये काहीतरी तथ्य असते. प्रत्येक जण आपल्या परीने बरोबर असतो. आणि सर्वांची मते जाणून घेऊनच आपण एका ठोस निष्कर्षावर आले पाहिजे.
स्वीट टॉकर, मस्त प्रतिसाद.
स्वीट टॉकर, मस्त प्रतिसाद.
Pages