ब्यूटी पार्लर - लेडीज अ‍ॅन्ड जेन्ट्स सलून ! !

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 October, 2016 - 17:05

मागे मी "एसी सलून" नामक लेख खरडवला होता. त्याची ही लिंक -
http://www.maayboli.com/node/53197

आधीच वाचायला हवे असे काही नाही, नंतर सावकाश वाचा.

तर आता तिथूनच एक पाऊल पुढे,
,
ब्यूटी पार्लर - लेडीज अ‍ॅन्ड जेन्ट्स सलून ! !

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- -- - - - - - - - - -

जगात असेही सलून कम ब्यूटीपार्लर आहेत जिथे स्त्री-पुरुष एकत्र जाऊ शकतात. हे कालपर्यंत ऐकून होतो. आज बघून आलो.

एकेकाळी हा फॅन्टेसीचा भाग होता. पण आताच्या काळात असे पार्लर दर चौथ्या नाक्यावर दिसतात. पण तरीही आजवर पाय टाकायची हिंमत झाली नव्हती. किंबहुना तशी हिम्मत करायची कधी गरजही पडली नव्हती. सलूनमध्ये जाऊन नियमितपणे करायच्या दोनचार गोष्टी माझ्या ठरलेल्या जागी आणि ठरलेल्या माणसाकडून आजवर होत आल्यात. मग उगाच वाट वाकडी करून का जा. तसेही मी वाकड्या चालीचा माणूस नसल्याने आजवर ही उत्सुकताही मनात तशीच दडवून ठेवली होती. पण आज मात्र योग आला. थॅन्क्स टू माझी गर्लफ्रेंड!

दिवाळीची शॉपिंग, आमचे ‘लूट लो’ चालू होते. ‘तिचा खेळ होत होता, पण माझा जीव जात होता’ या चालीवर ‘तिची खरेदी होत होती आणि माझी हमाली होत होती’. दिवाळी म्हटले की मुख्य खरेदी कपड्यांचीच असते. कधी आपल्यासाठी अस्तित्वातही नसलेली दुकाने ईतकी ओसंडून वाहात असतात की प्रत्येक ठिकाणाहून काही ना काही घेऊनच बाहेर पडावे असे वाटत राहते. पण चांगले दिसणे म्हणजे केवळ चांगले कपडे घालणे असे नाही. तर सोबत मेक अप आणि ब्यूटी पार्लरही हवे. माझ्यासाठी ते तीनचार महिन्यांचे वाढलेले केस कापणे आणि साठ-पासष्ट दिवसांची दाढी करणे ईतकेच असते. गर्लफ्रेंडसाठी मात्र तीन तासांची अपॉईंटमेंट घेऊन साजरा केलेला कार्यक्रम असतो. पण यंदा मात्र कामाच्या बिजी शेड्यूलमधून तिलाही वेळ काढणे जमत नव्हते. अखेर आज चार-पाच तासांची शॉपिंग तीन-अडीच तासांमध्ये उरकल्याने तिने वरचा वेळ सत्कारणी लावायचे ठरवले. मी तिच्या खरेदीच्या पिशव्या सांभाळत स्टोअरबॉय बनून राहण्यापेक्षा मलाही तिने केसदाढी उरकायचा सल्ला, कम परवानगी, कम आज्ञा दिली. आम्हाला एकत्रच आमचा कार्यभाग उरकता येईल अशी जागाही तिनेच शोधली. स्टाईल अ‍ॅन्ड स्माईल - लेडीज अ‍ॅन्ड जेन्ट्स - पार्लर अ‍ॅन्ड सलून - अशी काहीशी लांबलचक पाटी असलेल्या वातानुकुलीत दुकानात आम्ही शिरलो.

आत शिरताच तिने अशी काही भरभर सूत्रे फिरवली की जणू काही हे तिचे नेहमीचेच ठिकाण होते आणि ईथले सारे तिच्या बालपणीचे सवंगडी होते. केवढा तो कॉन्फिडन्स. बघता बघता त्यातील एका पार्लरवाल्या बाईला पकडून ती आतल्या दालनात गेली. जाताना ती बाई माझ्याकडेही बघत हसून गेली. तेवढाच आपलेपणा, आणि तेवढेच हलके वाटले. आजूबाजुला पाहिले तर नेहमीच्या टिपिकल सलून चेअर आणि आपल्या नंबरची वाट बघत बसायचा सोफा कुठे दिसला नाही. कुठल्याही भिंतीला मोठाला आरसा लावला होता, समोर चित्रविचित्र डिजाईन आणि बैठकीच्या खुर्च्या होत्या. वेटींगमध्ये असणार्‍यांसाठी मोठाल्या फूटबॉलच्या आकाराचे गादले कम बोचके सांडले होते. काही जण त्यात घरच्यासारखे लोळत पडले होते. एक दोन रिकामे गादले मला खुणावत होते, पण त्यावर बसलो तरी पन्नास रुपये चार्ज मारतील असे काहीतरी वेगळेच दडपण मला आले होते. एकंदरीत कुठे या बाईच्या नादाने शिरलो असे झाले होते. आधीच तिचे बिलही मला द्यावे लागणार का याचे टेंशन होते. वर मी केसदाढी केले तर त्याचेही हे लोकं किती चार्ज लावतील याचा अंदाजा येत नव्हता. नेहमीपेक्षा कमी मिळालेला यंदाचा दिवाळी बोनस आठवायची आजच्या संध्याकाळची ही सदतीसावी वेळ होती.

ईतक्यात त्या बोचक्यांत लोळत पडलेला एक जण उठला आणि माझ्या सेवेस तत्पर झाला. मला थोडा अंदाजा आला. रेड मरून रंगाचे टीशर्ट आणि ब्ल्यू जीन्स हा तिथला युनिफॉर्म होता. तो माझ्यापेक्षा कमी स्मार्ट आहे असे मला उगाचच वाटून गेले. तसे न वाटते तर माझ्या मनात उगाचच एक न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे हे उगाचचे वाटणे मी नेहमीच वाटू देतो.

जेवढे अदबीने माझ्या गर्लफ्रेंडला आतल्या दालनात नेले गेले तसे काही माझ्याशी झाले नाही. फक्त हाताने माझी बसायची जागा दाखवत त्याने आपल्या सामानाची जुळवाजुळव सुरू केली. माझे वाढलेले, किंबहुना वेडेवाकडे फोफावलेले डोक्यावरचे जंगल पाहता, त्याचे काय करायचे हे न विचारताच त्याने माझे केस पाणी मारून मारून गच्च ओले केले. त्यावर तो कात्री फिरवणार ईतक्यातच मला आठवले आणि मी म्हणालो, छोटा काटना, साईडसे और पीछेसे मशीन घुमा देना. ‘जेवढे जास्त कापून घेऊ तेवढे पैसे वसूल’ हा त्यामागचा प्रामाणिक हिशोब. त्याचा चेहरा मात्र किंचित त्रासला. मी दबकतच कारण विचारले. त्याने स्पष्टपणे सांगितले, की केस ओले करायच्या आधी हे सांगितले असते तर बरे झाले असते. मी विनम्रपणे म्हणालो, की पुढच्यावेळी लक्षात ठेवेन. पण प्रत्यक्षात पुढच्यावेळी मी ईथे येईन याची काही शाश्वती नव्हती.

यानंतर पुढचे दहा-पंधरा मिनिटे आमच्यात काहीही संवाद झाला नाही. त्याचे कौशल्य आणि त्याकडची अत्यानुधिक साधने पाहता मी बिलाच्या आकड्याचा अंदाज लावत शांत पडून होतो. खुर्ची माझी स्टायलिश होती. जणू काही बार काऊंटर वर स्टाईलमध्ये बसून दारूचा पेग हातात धरत काऊंटरपलीकडील मुलीशी गप्पा माराव्यात असा फील देणारी. पण मी केस कापून घ्यायला आलो असल्याने त्याला साजेशी अशी आरामदायी बैठक काही ती मला देत नव्हती. पण न आवडून सांगतो कोणाला.

ईतक्यात बाजूला कोणीतरी आले म्हणून लक्ष गेले तर एक पस्तिशीची तरुणी येऊन जवळच्याच चेअरवर बसली. आतले दालन फुल्ल झाल्याने बहुधा बाहेर बसली असावी की ती तिची नेहमीचीच जागा होती कल्पना नाही. पण माझ्यापेक्षा कम्फर्टेबल बसली होती एवढे मात्र खरे.

तिच्या मदतीला एक ब्यूटीफूल पार्लर गर्ल आली. कानात कुजबुजत काय करायचेय हे विचारले. आणि मग त्या चेअर भोवतालचे पडदे लावले गेले. तरीही त्या आड काय चाललेय हे बघायची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती. थोडावेळ टकमक बघत बसल्यानंतर मला जाणवले की ज्या अर्थी पडदा लावला आहे त्या अर्थी कोणी बघू नये असा हेतू आहे. आणि तरीही मी कुतूहलापोटी का होईना वेड्यासारखा बघत होतो. अचानक मला स्वत:ची लाज वाटू लागली. स्वत:च्या नजरेतून उतरणे की काय तसे वाटू लागले. पटकन नजर वळवत समोर आरश्यात पाहिले तर पाठीमागे आणखी एक हादरवणारे द्रुश्य दिसले. मागे एक तरूणी एका बेडवर झोपली होती. तिच्या डोक्यामागे असलेल्या बेसिनमध्ये तिने केस सोडले होते आणि एक पार्लर मदतनीस ते पाण्याने धुत होती. उगाचच मनात वेडेवाकडे विचार येऊ लागले आणि सोबत मी अश्या एखाद्या जागी यायच्या लायकीचा नाही असेही वाटू लागले.

आता नजर थेट समोर ठेवून मी आरश्यात फक्त आणि फक्त माझाच चेहरा न्याहाळू लागलो. केस सुरेख कापले होते. एक अमुकतमुक रक्कम याबदल्यात घेतली तर वाईट वाटणार नाही असे मी मनाशीच म्हणालो. पण येणारे बिल त्या अमुकतमुक रक्कमेच्या दुप्पट असल्याने मला वाईटच वाटणार होते याची मला तेव्हा कल्पना नव्हती.

पार्लरबॉयने आता आपला मोर्चा माझ्या दाढीकडे वळवला होता. फोमचा फेस माझ्या चेहर्‍याभोवती थापला होता. अश्यावेळी आपण पांढर्‍या दाढीचे कसे दिसू अशी कल्पना करत आपला चेहरा न्याहाळायला मला खूप आवडते. सहजच आरश्यात पाहताना जाणवले की मला असे करताना तिथे वेटींगमध्ये बसलेली एक महिला न्याहाळतेय. तोंडाला दाढीचा साबण लावत एका अनोळखी महिलेसमोर बसायची ही माझी आयुष्यातील पहिलीच वेळ होती. घरातही कधी दाढी करताना पाहुणे आले तर मी आतल्या खोलीत धूम ठोकतो. त्यामुळे मला अचानक फारच ऑकवर्ड वाटू लागले. त्यानंतर मी तिच्याकडे बघायचे टाळले. मात्र पुर्ण दाढीभर ती माझ्याकडेच बघतेय असे मला उगाचच वाटत होते. दाढी झाल्यावर त्याने मशीन फिरवत माझ्या कानांवर उगवलेले दोनचार केस उडवायला घेतले. हे असे करायला मीच त्याला आधी सांगितले होते. पण आता ते तसे करताना कोणीतरी महिला बघतेय हे मला आणखी अस्वस्थ करणारे होते.

साधारण पाऊणेक तासांत माझे काम उरकले. गर्लफ्रेंडचे उरकायला अजून चिक्कार वेळ होता. त्यामुळे तिने मला घरी सुटायची परवानगी दिली. दोघांचे पैसे मीच देते असे म्हणत तिने मला एकाच वेळी सुखद धक्का आणि थोबाडात मारणे असे दोन्ही अनुभव दिले. वाचलेल्या पैश्यांत जीवाची मौजमजा करायला मी एका छानश्या हॉटेलात शिरलो. दिवाळी खरेदी करणारे सारे पोटपूजेसाठी हॉटेलातही गर्दी करत असल्याने तिथेही जागा मिळणे कठीण होते. मला टेबल दुसर्‍या एका सिंगल गिर्हाईकाशी शेअर करावे लागणार होते. माझी काही हरकत नव्हती. पण पाहिले तर ते सिंगल गिर्हाईक पुन्हा एक तिशीच्या घरातील महिलाच होती. मी माझा फेव्हरेट मसाला डोसा मागवला. आणि समोर बसलेल्या बाईची पर्वा न करता काटेचमच्यांना तिलांजली देत हाताने खाऊ लागलो. तिनेही आपले सॅन्डवीच आणि ज्यूस ऑर्डर केले आणि मी तिच्या जगातच नसल्यासारखे बिनधास्त आपला मोबाईल काढून त्यात गुंगून गेली.

हळूहळू माझ्याही नकळत मी पुन्हा एकदा लेडीज अ‍ॅन्ड जेन्ट्स ब्यूटी पार्लर कम सलूनमध्ये जाण्यासाठी तयार होत होतो ..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते युनिसेक्स सलुन म्हणतात तो प्रकार हाच काय?
बाई आणि बाप्यांचे केस कापतात मग त्याला बायसेक्स सलून म्हणायला पाहिजे ना?

एक बावळट प्रश्न
ह्या सलूनमध्ये बगलेतले केस साफ करुन द्यायचे पण वेगळे चार्जेस लावतात का? आपल्या साध्या मेन्स सलून मध्ये केस कापल्यावर ही सर्विस फ्री असते ना?

मस्त लिहिलंय! अशाच एका ठिकाणी गेल्यावर हेअरकट करायला बाई उपलब्ध नसल्यामुळे एका बाबाने माझे केस कापले होते, त्यात तू लिहिलं आहेस तसा ' केस धुण्याचाही' समावेश होता त्यामुळे मला भयंकर ऑक्वर्ड वाटायला लागलं होतं पण हळूहळू ऑक्वर्डनेस गेला. एकदम प्रोफेशनली करतात ते.

बाहुबली, हो तेच ते. आधी मी सुद्धा शीर्षकात तसेच नाव टाकणार होतो. पण युनिसेक्स शब्दातील सेक्स मला अश्लीलतेकडे झुकणारा शब्द वाटल्याने बदलले Happy

सिंथेटील जिनिअस, माझे केस लख्ख काळे आहेत. पण जर पांढरे झालेच तर मी अमिताभ बच्चन दिसेन का हे त्या दाढीच्या पांढरया फेसात शोधायचा प्रयत्न करतो ईतकेच!

प्रतिसादांचे धन्यवाद Happy

आवडलंच <<माझ्यासाठी ते तीनचार महिन्यांचे वाढलेले केस कापणे आणि साठ-पासष्ट दिवसांची दाढी करणे ईतकेच असते. >> अरे काय रे असं करू नकोस.
<<आधीच तिचे बिलही मला द्यावे लागणार का याचे टेंशन होते>> असं काय ते. तुझी गर्लफ्रेंड आहे ना ?
<<तरीही त्या आड काय चाललेय हे बघायची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती>> हा हा हा हा आईगं ह ह पुवा

भन्नाट अनुभव. आत्ता पर्यंत असा अनुभव कधी घेतला नव्हता आणि घेणार पण नाही. मी फक्त "मसाज पार्लर" जिथे जेन्टस आणि लेडीज दोघेही करू शकतात ( गणपती ऑफर/दिवाळी ऑफर इत्यादी इत्यादी. त्यामुळे स्वस्त म्हणूनच नाहीतर तशी शक्यता नाहीच ) अशा ठिकाणी गेले होते पण रूम्स सेपरेट असल्याने ( अर्थात असणारच तो गोष्ट वेगळी ) सगळं आवरून सावरूनच रूम बाहेर पडता आले . मस्त लिहिलं आहेस Happy

मस्त लिहिलयसं रे .

माझ्यासाठी ते तीनचार महिन्यांचे वाढलेले केस कापणे आणि साठ-पासष्ट दिवसांची दाढी करणे ईतकेच असते. >>> हे असलं काही करत जाऊ नकोस बे , जरा क्लीन रहात जा , नाहीतर तुझी ग्फ्रे तुलाच ड्च्चु देईल. Proud

Javed Habib Hair And Beauty Salon जागजागी झालेत. ९९ रु ज मधे हेअरकट करून मिळतो त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या बायका जातात. मी जाते तिथे तरी मुलंच हेअरकट करतात. त्याच्यावर आजच्या जमान्यात लेख लिहावासा वाटला हे नवल वाटलं.

त्याच्यावर आजच्या जमान्यात लेख लिहावासा वाटला हे नवल वाटलं. >>> हो ना. अगदीच. आजकाल युनिसेक्स सलोन हा किती कॉमन प्रकार आहे.

मी जाते तिथे तरी मुलंच हेअरकट करतात. >>> मी तर पेडिक्युअर पण मेल प्रोफेशनलकडुन करुन घेते. H2O मधल्या कोणत्याही लेडी ब्युटिशिअनपेक्षा तोच बेस्ट पेडिक्युअर करतो.

स्वप्नसुंदरी,
आजचा जमाना वगैरे असे काही नसते.
तीनशे वर्षांपूर्वीही लोकं दगडालाच्या देवाला पूजायचे. आजही नवसाला पावतो म्हणत रांगा लागतात Happy

श्री,
ती शॉर्टफिल्म मी पाहिली आहे. किंबहुना मलाही हे लिहिताना मध्यावर ती आठवली. आणि मग माझे लिखाण त्यापासून कसोशीने वेगळे ठेवायची कसरत करावी लागली.
आणि हो, माझी गर्लफ्रेंड यातच कम्फर्टेबल असते. कारण मी दाढी केस करताच तिच्या स्वत:च्याच मैत्रीणी माझ्या मागे लागतात. असे तिला वाटते.

दक्षिणा Proud
येस्स खरेय! पण प्रत्यक्षात मी यापेक्षाही बरेच काही लिहितो. ऊलट सारेच मायबोलीवर टाकत नाही. दैनंदिन जीवनातल्या चांगला गोष्टी शोधून लिहून काढतो. त्याने एक पॉजिटीव्ह फील येतो. जर रोजच किंवा वरचेवर आपल्या आयुष्यात हे एवढे चांगले घडतेय तर मग आपले आयुष्य नक्की सुंदर आहे हे आपल्या मनाला पटतच नाही तर नकळत मनाशी ठाम होते. आयुष्यातील सुखं शोधली जाऊ लागतात आणि दुखं दुर्लक्षली जातात किंवा ती देखील एंजॉय केली जातात Happy

तीनशे वर्षांपूर्वीही लोकं दगडालाच्या देवाला पूजायचे. आजही नवसाला पावतो म्हणत रांगा लागतात >>> जिओ मेरे लाल , म्हणुनच तुझा फॅनक्लब काढायचा विचार चालु आहे Proud

अय्यो ऋन्मेष, बाकी लिहून कुठे टाकतोस मग माबो व्यतिरिक्त?
ब्लॉग किंवा फेबु अकाऊंट असल्यास प्लीज मला विपू कर.
यू नो आय अ‍ॅम युवर फॅन!

चांगलं लिहिलं आहेस रे. छोटे छोटे प्रसंग पण खुलवून / रंगवून सांगितलेस. आवडलं .......... Happy

खिशाला किती महागात पडलं ते मात्र नाही सांगितलस; का गफ्रे नेच भरलं बिल (तुझपण) ............. Lol

मी पण य वर्षं झाली मेल हेअर ड्रेसर कडून केस कापून घेते, कर्ल्स करून घेते, स्पा, कलर... इ.
त्यात नाविन्य काय? मी पहिल्यांदा मेल हेअर ड्रेसर कडून कट करून घेतला होता ते पण ९७-९८ साली. पुण्यात. camp मध्ये. तेव्हा त्याने ६० रुपये चार्ज केले होते. मला त्यात काही नवीन वाटत नाही.
आता एकदा मला पेडीक्युअर करून घ्यायचं आहे. योग केव्हा येतो पाहू.

ऋ तू बरच लिहितोस पण इथे टाकत नाहीस हे आमच्यावर थोर उपकारच करतोस हो... Proud

साती, जे प्रकाशित करावेसे वाटत नाही ते डायरीत. कधी मग जुनी डायरी चाळूनही लिखाण बनते. किंवा मग जे फक्त आपल्यासाठीच असते ते प्रकाशित करत नाही. पण जे प्रकाशित करण्यायोग्य आहे ते आज ना उद्या मायबोलीवर पडतेच. त्यामुळे मायबोलीच माझा ब्लॉग Happy

अरे वा !
तू 'लिहितोस' अजूनही!
बरेचजण फक्त टंकतातच हल्ली.
मी तर डायरीपण मोबाईलच्या अ‍ॅपवरच टंकते.
Wink

खरे तर मलाही टंकणेच सोयीचे वाटते आता. कारण मोबाईल हाताशी असल्याने ट्रेनमध्ये किंवा कुठेही बसल्याजागी सुचेल तेव्हा लिहिता येते. तसेच माझे मुळातलेच घाणेरडे अक्षर आणि लिहायचा सराव कमी कमी झाल्याने स्पीड कमी होणे, लवकर कंटाळा येणे वगैरे प्रकार घडतात. फक्त लिखाण ही माझी आवड असल्याने आणि सवयीने लिहिणे होत असल्याने आहे अजूनपर्यंत तरी डायरी आहे. पण उद्या असेलच याची शाश्वती नाही.

गंमत म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडलाही डायरी लिहायची सवय आहे.
फरक ईतकाच ती ईंग्रजी भाषेत लिहिते Happy

Pages