स्फुट ३१ - आजोबाचा मोबाईल

Submitted by बेफ़िकीर on 12 October, 2016 - 02:41

"फोन आला होता का मित्राचा?"
"नाही, व्हॉट्स अ‍ॅप"
".... काय असतं रे हे व्हॉट्स अ‍ॅप?"
त्याच्या चेहर्‍यावरील कुतुहल शिगेला पोचलेले!
उत्तर देणार्‍याचा चेहरा वैतागलेला!
"तुम्हाला नाही हो माहिती, जाऊ का आता?"
"हो हो, नीट जा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषू सर्वदा"
'सर्वदा' हा शब्द ऐकूही येणार नाही इतक्या दूर तो केव्हाच पोचलेला!
मग हा आजोबा बसतो!
स्वतःचा मोबाईल हातात घेऊन!
बाराशे रुपयांचा!
मला काय करायचय महागाचा मोबाईल म्हणत घेतलेला!
स्वतःच्या पेन्शनीतून!
मला काय? नुसते फोन आले की झालं!
ते मेसेज बिसेज काही समजत नाही मला!
पण आता खिन्न होऊन तो बसतो मोबाईलकडे बघत!
सगळी बटणे दाबून बघतो!
कुठे व्हॉट्स अ‍ॅप असं काही दिसतंय का ते तपासायला!
तसं काहीच नसतं त्याच्या मोबाईलमध्ये!
मग तो मनाशी म्हणतो!
हवंय कशाला व्हॉट्स अ‍ॅप?
तारीख दिसतीय
वेळ दिसतीय
कॉल येतो दिवसातून एखादा
आपणही करू शकतो कॉल वाटले तर
बाकी काही कशाला हवंय?

मग कधीतरी अचानक काहीतरी टुईं टुईं वाजतं
मग तो आजोबा उत्सुकतेने मोबाईल हातात धरून
चालत चालत येतो कोणापाशीतरी
आणि विचारतो
"हा कसला आवाज आला रे?"
उत्तर येतं
"च्च! एस एम एस असेल"
"कोणाचा?"
"अहो कंपनीचे येतात आपोआप"
"मग त्यावर काय करायचं?"
"काही नाही, डिलीट करायचे"
"कसे?"
"च्च, ते आत्ता नाही हं मी संगत बसणार"
"ठीके ठीके"

आजोबा चालत चालत आपल्या खोलीत जातो
नकळत त्याचे डोळे भरून येतात

मग कधीतरी
पुढच्या पिढीतले खूप जण घरी जमतात
काही फंक्शन वगैरे असते
सगळे एकमेकांशी बोलतात
ए ह्याचं डीपी बघितलंस का?
हा व्हिडिओ बघ
शेअर कर ना ग्रूपवर
आयला ह्याचा आज मेसेज आला
नाही तर काय
एरवी एक अक्षर बोलत नाही
तू लेटेस्ट व्हर्जन केलंस डाऊनलोड?
नाही, कसं करू?
आण इकडे मी शिकवतो

आजोबा बघत असतो
सगळे एकमेकांना काहीतरी शिकवत असतात
आपल्याला कोणीच काही शिकवू इच्छित नाही
व्हिडिओ दाखवू इच्छित नाही
फोटो दाखवत नाहीत
काहीतरी खूप मजा करतात सगळे
पण आपल्याला त्यात घेत नाहीत
आपण नाहीच का कोणी?

===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटलं Sad जे त्या परिस्थितीत असतात त्यांना खरंच किती वाईट वाटत असेल!

ओह Sad

खरे आहे. मी स्वतःच असा कुचकेपणा अनेकदा केला आहे, आई वडिल काही विचारतात तेव्हा. मी खुप वेळा सांगुनही त्यांना कळत नाही मग मी वैतागते.

मी आग्रह करकरून माझ्या बाबांना आणि सासूबाईं ना स्मार्टफोन घेतला आणि त्यांना त्यात पारंगत केले.

बेफिकीर यांनी मांडलेली परिस्थिती बदलल्यास किती चांगले.खर तर घरच्या जेष्ठ नागरिकांना स्मार्ट फोन घेऊन दिल्यास ते त्यात रमले तर तरुणांच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणे थांबेल.पारुताई तुम्ही हे केलत.अभिनंदन.पारुताई प्रमाणे जेष्ठांना मदत करणारे आमच्याही गटात तरुण कुटुंबीय आहेत.पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटाला अतुल ठाकूर यांनी 'शुभंकर' नावाने अ‍ॅप करुन दिल आहे.घरबसल्या बेडरीडन व्यक्तीही वाचू ऐकू शकतील असा खजिनाच दिला आहे.यासाठी स्मार्टफोन वापरणार्यांची संख्या वाढली तरच उपयोग होईल.यामुळे खूप मोठा मानसिक आधार मिळत असल्याने औषधासाठी पैसे खर्च करावे लागताततच ना? तर यासाठी केले तर उपयोगच होईल.जे वापर करतात त्यांना खूप उपयोग होत आहे.बेफिकीर हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

जे त्या परिस्थितीत असतात त्यांना खरंच किती वाईट वाटत असेल!
काही एव्हढे वाईट वाटत नाही . ही थेरं येण्या आधी सुद्धा आम्हा म्हातार्‍यांचे मजेत चालले होते, नि अजूनहि चालू आहे.
आता ज्यांना कागदावर लिहीलेले वाचताच येत नाही, कागदावर लिहिताच येत नाही, ज्यांना बोलता येत असूनहि न बोलता वावरायची सवय आहे त्यांचीच कीव येते. जीपीएस आधी लोकांना पत्ते सापडतच नव्हते की काय? इतर अनेक मार्गअसतात हो.
मोबाईल फोनच काय, अगदी न्यू जर्सीत राहूनहि मोबाईलच काय काँप्युटर सुद्धा नसलेली माणसे आहेत. इंटरनेट, इ-मेल शिवाय त्यांचे काही अडत नाही. मुळात पायी सुद्धा चालता येते त्यांना, म्हणजे गाडी नसेल किंवा वयोमानाप्रमाणे गाडी चालवणे शक्य नसेल असे लोक सुद्धा भरपूर प्रमाणात सोशल लाईफ एंजॉय करतात - काSSहि वाईट वाटत नाही.

पण काळजी करण्याबद्दल धन्यवाद. जरा पेपरात पण लिहा म्हणजे आमच्यापर्यंत पोचेल तुमची कळकळ नि साहानुभूति.

हम्म!
घरातील जेष्ठांना सामावून घ्यायची मानसिकता असेल तर नव्या बदलांशी त्यांना कसे जुळवून घेता येइल, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन त्यांचे आयुष्य समृद्ध कसे करता येइल याचा आपोआप विचार केला जातो. आता मोबाईल हे निमित्त. पूर्वी घरी कुणाचा फोन आला की चौकश्या करणार्‍या आजोबांना त्रोटक उत्तरे देवुन कटवणे, तुम्हाला कशाला हव्यात नसत्या चौकश्या असे म्हणणे , गप्पांत सामावून न घेणे चालायचे त्याचीच ही नवी आवृत्ती.
खरेतर अगदी स्वतंत्र स्मार्ट फोन देणे शक्य नसले तरी आपल्या जवळच्या स्मार्टफोनवर अधून मधून फेसबुकवर नव्या पिढीने शेयर केलेले कुटुंबीयांचे/ट्रिपचे फोटो दाखवणे, इतर नातेवाईकांशी वेळ ठरवुन फेस टाईम, कार्यक्रमासाठी एकत्र भेटल्यावर गप्पांमधे त्यांना सामावून घेणे, अधुन मधुन फोन करुन त्यांची प्रेमाने चौकशी करणे, आपली खुशाली/प्रगती सांगणे एवढे केले तरी जेष्ठांच्या मनाला खूप उभारी मिळते. शक्य असेल तर साध्या लॅपटॉपवर स्काईप, नेटफ्लिक्स, युट्युब वगैरे वापरायला शिकवले तर नातवंडांशी गप्पा मारणे, सिनेमा-नाटक-जुनी गाणी वगैरे पहाण्यात वेळ छान जातो. मात्र हे वर्तन आज जेष्ठांना गरज आहे म्हणून एकाएकी घडणार नाही. त्याची बीजं खूप आधी पेरावी लागतात. तीन-चार पिढ्यांच्या नात्याची घट्ट वीण ही छोट्या-छोट्या प्रसंगातून कळत-नकळत संस्कार करत हळूहळू घातली जाते. तंत्रज्ञान नवे असले तरी जेष्ठांशी कसे वागायचे याचे संस्कार / मानसिकता ही काही नवी गोष्ट नाही. ज्या तरुणाईला लहानपणापासुन घरातील जेष्ठांना सामावुन घ्यायची सवय आहे, घरातील मोठ्यांना तसे करताना बघितले आहे ते आजही आवर्जून तसेच वर्तन ठेवतात.
पारुबाई, अभिनंदन!
शोभनाताई, छान पोस्ट!
बिपीनचंद्र, दुव्या साठी धन्यवाद.