एगलेस कॉफी कप केक

Submitted by अल्पना on 10 October, 2016 - 09:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मैदा - १ कप
साखर - पाउण कप
बेकींग पावडर - १ टीस्पुन
कोको पावडर - १ टेबलस्पुन (ऑप्शनल)
दुध - पाउण कप
बटर - चार टेबलस्पुन
वॅनिला इसेंस - १/२ टीस्पुन
कॉफी - १.५ टेबलस्पुन

क्रमवार पाककृती: 

मैदा आणि बेकींग पावडर चाळून घ्यायची.
त्यात साखर मिक्स करून घ्यायची. पिठी सखर घेत असाल तर पाउण कपापेक्षा कमीच घेतलेली बरी. मी साधी साखर वापरते. हवे असल्यास कोको पावडर घालायची.
हे सगळं चमच्याने कोरडंच मिक्स करायचं.
हे कोरडं मिक्स करून झालं की ओव्हन २०० डिग्री सेल्सियसला प्रीहीट करायला सुरु करावा.
या कोरड्या मिश्रणात बटर, व्हॅनिला इसेंस आणि दुध हळूहळू घालून मिक्स करावे.
नंतर यात किंचितश्या पाण्यात फेटलेली कॉफी घालावी. केकचं हे मिश्रण चमच्याने १५-२० मिनिट फेटून घ्यावे. हॅण्ड ब्लेंडरने फेटायचं असल्यास ५ मिनीट मिनिमम सेटींगवर फेटता येईल.
कपकेकच्या मोल्डमध्ये पेपर लायनर्स लावून त्यात हे मिश्रण घालावे.
हे करेपर्यंत ओव्हन गरम झालेला असतो.
आता ओव्हन मध्ये २०० डिग्री सेल्सियसवर १५-२० मिनीट बेक करावे. (मी जी रेसेपी वापरली होती त्यात १५-२० मिनीट लिहिले होते. मला माझ्या ओव्हनमध्ये १८ मिनीट लागतात. )

IMG_20160820_190121877(1).jpg

यात कोको पावडर दिड टेबल्स्पुन घातली आहे आणि बटर सुद्धा मुळ रेसेपीच्या प्रमाणानुसार आहे. फेटताना किंचीत जास्त फेटले गेल्याने आणि बटर जास्त झाल्याने यांना भेगा पडल्या होत्या आणि हाताला तेलकटपणा जाणवत होता.

IMG_20160408_152414143.jpg

यात कोको पावडर घातली नव्हती. आणि बटर सुद्धा वर दिलेल्या प्रमाणात घातले होते.

यावेळी करताना चॉको चीप्स घातले होते आणि एक चमचा कोको पावडर पण घातली होती. यावेळी फोटो काढायच्या आधीच कपकेक संपले.

वाढणी/प्रमाण: 
छोट्या साइझचे ९ कपकेक होतात.
अधिक टिपा: 

मूळ रेसेपीमध्ये दीड टेबलस्पुन कोको पावडर लिहिली आहे. मी एकदा कोको पावडर शिवाय, एकदा दिड टेबलस्पुन घालून आणि एकदा १ टेबल्स्पुन घालून केक केले. कोको पावडरशिवायही हे केक छान होतात पण मग फिका रंग येतो. दिड चमचा कोको पावडरमध्ये कॉफीची चव कमी जाणवते. वर लिहिलेल्या प्रमाणात अगदी मस्त कॉफीची चव येते.

मुळ रेसेपीमध्ये ५ टेबल्स्पुन बटर लिहिलंय. पण इतकं बटर मला जास्त वाटलं. मी यावेळी १०० ग्रॅम अमुल बटरचा ६०% भाग वापरला. तेवढं बटर पुरलं.

मुळ रेसेपी मध्ये कॉफी मिनिमम १ टेबलस्पुन घ्या असं सांगितलं आहे. चवी प्रमाणे कॉफीचे प्रमाण वाढवता येईल. मला दिड टेबलस्पुन कॉफी परफेक्ट वाटली.

यावेळी कपकेक करताना १० मिनीट बेक झाल्यावर चॉको चिप्स घातले होते. छान लागले.

याआधी एकदा आयसिंग शुगर, कॉफी आणि पाणी फेटून त्याचं ग्लेझिंग करून बघितलं होतं कपकेकवर. ते सुद्धा चांगलं लागलं. पण जर घरातली लहान मुलं कपकेक खाणार असतिल तर बिना ग्लेझिंगचेच कपकेक खाल्लेले बरे.

माहितीचा स्रोत: 
http://food.ndtv.com/recipe-eggless-coffee-cupcakes-284753
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान . तुझा ओव्हन कोणता आहे. साध्या मावे त. आणि कन्वेक्शन मोड असलेल्या मावे त करता येईल का? मावेसाठी कपकेक मोल्ड कोणते आणावे ?

माझ्याकडे मावे + कन्वेक्शन मोड वाला ओव्हन आहे. कन्वेक्शन मोडवर ॲल्युमिनियमच्या कपकेक मोल्डमध्ये केलेत हे कपकेक.

मावेत केक कधी केला नाहीये.

माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराचे सिलिकॉनचे कपकेकचे मोल्ड पण आहेत. पण त्यात केलेल्या केकची चव खरपुस भाजल्यासारखी येत नाही.

मस्त आहे रेसिपी. फोटो फारच सुरेख आहेत. एकदम tempting!
इन्स्टंट कॉफी घ्यायची ना? यात अक्रोड पण छान लागतील असं वाटतंय.

बटरचं दिलेलं प्रमाण हे मेल्टेड बटर आहे की रूम टेंपरेजर ला असलेल्या घट्टसर असलेल्या बटरचं...

मी काल केले होते... मस्तचं झाले होते. साबा ना चॉकोलेट केक आवडत नाही पण हे केक आवडीने खाल्ले. मी मेल्टेड बटर वापरलं ४ टेबलस्पुन.
आणि कुकर मध्ये बेक केले, माझ्याकडे पण मायक्रो+ कन्व्हेक्शन + ग्रील आहे पण मला काय ते जमत नाही. फक्त मायक्रो मोड वापरली जाते.

वितळवून.

छान आलाय फोटो मुग्धा.

लाजोची एक कॉफी मफिन्सची रेसेपी आहे. त्यात कॉफी, आयसिंग शुगर आणि पाणी वापरून ग्लेझींग / आयसिंग ची रेसेपी दिलिये. ते यावर छान लागतं.

लिंक देतेस का प्लीज..
तुम्ही कन्व्हेक्शन मोड कशी वापरता? माझा केक त्यात चांगला होतच नाही. आय एफ बी चा ओवन आहे माझा.
सेम रेसिपीने कुकर मध्ये छान केक होतो.

http://www.maayboli.com/node/35372

लाजोची मोका मिनी कपकेक्सची रेसेपी पण मस्त आहे. ( तिच्या सगळ्याच रेसेपीज भारी असतात म्हणा) पण त्यात अंडी आहेत. अंडी न खाणाऱ्या जावेसाठी हे केक केले होते.

कन्व्हेक्शन मोड सिलेक्ट करायचा. टेंपरेचर हवे तितकं सेट करायचा. त्यानंतर वेळ सिलेक्ट न करता स्टार्ट केलं की ओव्हन वर प्रीहीट लिहून येतं आणि प्रीहीटिंग संपल्यावर वेळ सिलेक्ट करून बेक करायचं ही माझ्या एल जी च्या ओव्हनची पद्धत आहे. आयएफबी चा ओव्हन बघितला नाहीये. ओव्हन बरोबर पुस्तक नाहीये का काही?

टेंपरेचर हवे तितकं सेट करायचा. त्यानंतर वेळ सिलेक्ट न करता स्टार्ट केलं की ओव्हन वर प्रीहीट लिहून येतं आणि प्रीहीटिंग संपल्यावर वेळ सिलेक्ट करून बेक करायचं ही माझ्या एल जी च्या ओव्हनची पद्धत आहे. >>>हे फार चांगलं सांगितलस . माझा एल जी चा कॉम्बो आहे. प्रीहीट च्या नावाने माझी बोंब असते . गणित जमतच नाही. आता नक्की प्रयत्न करेन .