माझे पहिले क़्विल्ट

Submitted by अश्विनी कंठी on 9 October, 2016 - 01:21

एक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात. क़्विल्टची दुनिया म्हणजे भलताच समृद्ध कलाप्रकार निघाला. इंटरनेटवर तर क़्विल्टविषयी अगणित व्हिडीओ क्लिप्स, फोटोज आणि माहिती आहे. आता तर त्याचे ऑनलाईन क्लासेस देखील आहेत. संपूर्ण आयुष्यभर क़्विल्ट करणाऱ्या, त्यातच करीयर करणाऱ्या अनेक अमेरिकन स्त्रिया आहेत, ज्यांच्या स्वताच्या वेबसाईट आहेत.

हळूहळू मला ‘निदान एक तरी क़्विल्ट करावे’ असे वाटू लागले. दरम्यान माझी मुलगी कॉलेज शिक्षणाकरता परगावच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. तिला मायेची ऊब देणारे, घरची आठवण करून देणारे क़्विल्ट करायचं असे मी मनाशी पक्के ठरवले.

क़्विल्टचे आपले भारतीय रूप म्हणजे गोधडी. माझ्या आईला लहानपणी मी गोधडी करताना बघितलं होतं. ती आजीच्या मऊसूत साड्या घ्यायची, त्या एकावर ठेऊन त्याला हाताने धावदोरा घालायची. झाली गोधडी तयार! पण हा प्रकार थोडा वेगळा होता. माझ्या लवकरच लक्षात आलं की गोधडीच्या मानाने या क़्विल्टचे बरेच लाड करावे लागणार आहेत. यात काटेकोरपणा आणि चिकाटीची कसोटी लागणार आहे. आणि ते बरेच खर्चिक पण असणार आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसते.

सगळ्यात पहिला प्रश्न होता कोणत्या डिझाईनचे,कोणत्या कापडाचे मी क़्विल्ट करणार आहे. क़्विल्ट करण्याकरता एखाद्या ठराविक थीमची कापडे विकत घेतली जातात. त्या त्या सिझनला त्या त्या थीमची कपडे क़्विल्टच्या दुकानात मिळतात. उदा. फॉलच्या सिझनला पिवळ्या, लाल फुलांची रंगसंगती असणारी, ख्रिसमसला स्नो, सांताक्लोज असे चित्र असणारी. तसेच लहान मुलांकरता वेगवेगळ्या खेळण्यांची,कार्टून्सची चित्रे असलेली कपडे मिळतात. जी गोष्ट थीमची तीच गोष्ट पॅटर्नची. क़्विल्ट करताना कापडाचे अनेक वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करून, वेगवेगळ्या भौमितिक रचना करत परत ते तुकडे एकमेकांना जोडत वेगवेगळी डिझाईन्स केली जातात. मग याला मधले फिलिंग आणि मागून अस्तर लावून आधी हाताने आणि नंतर मशीनवर शिवण घातली जाते.

हा प्रांत माझ्याकरता नवा होता. म्हणून मग मी एखादा ऑनलाइन कोर्स मिळतो का याचा शोध घेतला. मला एक बेसिक कोर्स craftsy.com वर सापडला. माझी ऑनलाईन गुरु होती Jenny Doan. तो कोर्स मी अगदी मनोभावे पूर्ण केला. लेकीचे आवडते बाटिकचे कापड निवडले आणि परत एकदा इंटरनेटची मदत घेवून त्या कापडाला साजेसे डिझाईन निवडलं. माझे डिझाईन होते Herringbone style. (Herringbone माश्याच्या हाडासारखे हे डिझाईन दिसते. )या डिझाईननुसार क़्विल्ट कसे बनवायचे याची मला एक व्हिडीओ लिंक मिळाली. https://www.youtube.com/watch?v=uMah6wsve7o

आता काम बरेच सोपे झाले होते. या लिंकच्या मदतीने मी माझे क़्विल्ट बेतले. आणि या डिझाईननुसार कोणती कापडं आणि किती लागतील त्याचा हिशोब सुरु केला. बरीच आकडेमोड आणि (दहावीनंतर पहिल्यांदा शाळेतल्या बाईंची आठवण काढत) भूमितीची सूत्रे आठवून किती लांबीचे प्रत्येक कापड लागले ते ठरवलं. मग सुरु झाली दुकानांची पायपीट. कुठे मनासारखा रंग मिळेना तर कुठे डिझाईन पसंत पडेना. दोन्ही आवडलं तर किंमत आवडेनाशी होई. मग शेवटी इंटरनेटवर आखूडशिंगी, बहुढंगी, माझ्या मनाला आणि खिश्याला आवडणारी कापडं मिळाली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. कॉटनचे बॅटिंग(फिलिंग), अस्तर, रोटरी मॅट, रोटरी कटर, रुलर, खास क़्विल्टकरता वापरला जाणारा दोरा अश्या काही गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या.

Quilt 1.jpg

क़्विल्ट करण्यापूर्वी मी सगळी कापडे पाण्यातून काढली आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री केली. माझ्या कोर्समध्ये क़्विल्ट करताना प्रत्येक स्टेपला इस्त्री करायची असते हे पक्के बिंबवले होते. इस्त्री केली की डिझाईनमध्ये टोके अचूकपणे जोडली जातात हे त्याचे मुख्य कारण होते. एकुणात मी इतके वेळा इस्त्री केली आहे न की बोलायलाच नको.

मी फूल साईझचे (60 इंच x 90 इंच) क़्विल्ट करणार होते. डिझाईन आणि क़्विल्टचा तयार साईझ यांचा हिशोब करून मी बाटीकच्या कापडाचे आणि फ्लोरल प्रिंटच्या कापडाचे कापले. नंतर एक फ्लोरल तुकडा आणि एक बाटीक तुकडा एकमेकांवर सुलट बाजू आत ठेऊन चारी बाजूनी शिवले.

Quilt 2.jpg

नंतर त्या प्रत्येक चौकोनाचे त्रिकोणाच्या आकारात ४ तुकडे केले. ते तुकडे उघडून त्यांना परत एकदा इस्त्री केली. दर वेळेस हे तुकडे काळजीपूर्वक कापावे लागत होते, कारण अगदी काटेकोरपणे कापले तरच त्यांचा डायमंड आकार अचूक येणार होता. या आकाराच्या उभ्या भागात दर वेळेस पाव इंच शिवणीकरता जागा सोडायाची होती. हे जागा सोडण्याचं काम सोपं व्हावं या करता बाजारात एक ‘क्वार्टर इंच सीम’ नावाची शिवणाच्या मशीनला लावायची अटॅचमेंट मिळते, पण दुर्दैवाने ते माझ्या मशीनला बसले नाही. म्हणून मला दरवेळेस पेन्सिलने आखून घ्यायचा वेळखाऊ उपद्व्याप करायला लागला.

Quilt 3.jpg

मग हे त्रिकोण एक वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला डायमंड आकार तयार होईल अश्या प्रकारे जोडले आणि त्या दोन चौकोनी पट्ट्या जोडून उभे आयत तयार केले. निम्म्या पट्ट्या होत्या वरच्या दिशेने जाणारे डायमंड्स आणि निम्म्या पट्ट्या होत्या खालच्या दिशेने जाणारे डायमंड्स.

Quilt 4.jpg

ठरवलेल्या पॅटर्नप्रमाणे या तयार आयताकृती पट्ट्यांचे तुकडे उभे एकमेकांना जोडले. अश्या सर्व उभ्या पट्ट्यांना इस्त्री करून घेतली. मग एका पट्टीचे डायमंड वरच्या दिशेने आणि पुढच्या पट्टीचे डायमंड खालच्या दिशेने असे ठेवून त्या उभ्या पट्ट्या एकमेकांना आडव्या जोडल्या. आता क़्विल्टचा एक मोठा आयत तयार झाला. पुन्हा एकदा इस्त्री केली.

Quilt 5.jpg

हे वरवर दिसायला सोपे दिसत असले तरी माझी बरेचदा त्रेधा तिरपीट उडाली आहे. मी बाटीकचे तुकडे जोडताना ते एकाच ठिकाणी एक रंग एकत्र येणार नाही याची काळजी घेत जोडले आहेत. त्यामुळे कधी एक तुकडा बदलावा लागला की पर्यायाने अजून २-४ तुकडे बदलायला लागायचे. शिवाय त्यांची दिशा वर आहे का खाली यामुळे पण बदल करताना विचार करायला लागायचा. क़्विल्ट करताना आकड्यांचा आणि दिशेचा इतके वेळा गोंधळ उडाला की बस. मला तर एकदम सुडोकू खेळल्यासारखे वाटायला लागले होते. बारकाईने पाहिल्यावर कळते की प्रत्येक डायमंड २ तुकड्यांचा आहे. त्यांची एकमेकांशी दिशा आणि त्यांची त्या क़्विल्टवर असणारी वर जाणारी अथवा खाली येणारी दिशा या सगळ्यांचा मेल घालणे हे खरेच एक चॅलेंज होता. एकदा तर मी चक्क पूर्णपणे उलट्या दिशेने जाणारी पट्टी तयार करून जोडली होती. ते सगळे उसवणे जीवावर आले होते. पण मुकाट्याने उसवायला सुरुवात केली.

मग याला फ्लोरल प्रिंट कापडाची चारी बाजूनी बोर्डर शिवली आणि परत एकदा इस्त्री करून घेतली.

कधी भूमिती तर कधी अंकगणित तर कधी चिकाटी या सगळ्यांची परीक्षा देत असले तरी मला हे क़्विल्ट बनवायला खूपच आनंद होत होता. रोज सकाळी उठल्यावर कधी एकदा माझा नवरा ऑफिसला जातोय, लेक शाळेत जातेय आणि मी क़्विल्ट करायला सुरुवात करतेय असे मला होत असे.

पुढचे कौशल्याचे काम होते बॅटिंग(कापसाची लादी/फिलिंग) आणि अस्तर जोडणे. जमिनीवर सगळ्यात आधी अस्तर (धुवून आणि इस्त्री करून घेतलेले )मग बॅटिंग आणि सगळ्यात वर क़्विल्ट अश्या प्रकारे रचून,त्यातल्या छोट्या मोठ्ठ्या सुरकुत्या काढत या तिन्ही कापडांना मिळून सगळीकडून सतराशे साठ सेफ्टी पिना लावून घेतल्या.
कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे घेताना बॅटिंग आणि अस्तरचे कापड क़्विल्टच्या कापडापेक्षा ४ इंचाने सगळीकडून जास्त घेतले होते. जे मी धावदोरा घालून झाल्यावर कापून टाकणार होते.

Quilt 6.jpg

मग मी या तयार तीन पदरी कापडाला रंगीत दोऱ्याने काळजीपूर्वक उभे आणि आडवे धावदोरे घातले आणि जास्तीचे अस्तर आणि बॅटिंगचे कापड कापून टाकले.

Quilt 7.jpg

आता शेवटचा भाग म्हणजे या क़्विल्टला पायपीन करायची होती. एकाच रंगाची पायपीन करण्यापेक्षा बाटीकच्या तुकड्यांची पायपीन केली तर क़्विल्ट अधिक उठून दिसणार याची मला खात्री होती. हे काम जास्त वेळखाऊ होणार होते, पण मला उत्साह होता. त्याकरता मी ८-१० वेगवेगळ्या बाटीकच्या कापडाच्या पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या एकमेकांना जोडून एक लांबलचक पट्टी तयार केली. ही पट्टी आता या क़्विल्टला चारी बाजूनी शिवायची होती. हे पट्ट्या करण्याचे एक तंत्र मला माहीत होते. एक पट्टी दुसरीला जोडताना ती 45 अंशाच्या कोनात जोडायची असते आणि जादाचा भाग कापून टाकायचा असतो. असे केल्यामुळे जिथे जोड तयार होतो तिथे शिवण फुगत नाही आणि एकसलग पट्टी तयार होते आणि काम सुबक दिसते. ही लांबलचक पायपिन जोडण्यापूर्वी ती मध्यावर दुमडून इस्त्री करून घेतली.

Quilt 8.jpg

आता ही पायपीन क़्विल्टला सुलट बाजूने शिवून घेतली आणि दुमडीवर घडी घालत उलट बाजूला हेम घालून घेतली. सुबक पायपीन लावण्याची दोन तंत्रे माझ्या ऑनलाईन कोर्स मध्ये शिकले होते. एक म्हणजे जोडताना चारी कॉर्नरला टोक कसे आले पाहिजे आणि दुसरे म्हणजे पायपीन बंद करताना सफाईदार कशी बंद करायची जेणेकरून ती कोठे बंद केली आहे त्याचा पत्ता पण लागणार नाही.आणि अर्थातच सगळ्यात शेवटी शेवटची इस्त्री केली.

अश्या प्रकारे माझे क़्विल्ट तयार झाले. रोज एक दोन तास काम करत मी एका महिन्यात हे क़्विल्ट पूर्ण केले. आयत्या वेळेस अजून एक गोष्ट सुचली. याला मँचिंग होईल असा उशीचा अभ्रा देखील मी तयार केला. आता माझ्याकरता आणि माझ्या लेकीकरता एक सुंदर आठवण तयार झाली होती.

Quilt 9.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Woww! Kaamach chikatiche ani kaushalyaache kaam aahe. Finishing ni rangsangati khoop surekh.

Ani itkya chikatibaddal ek manacha mujra.

शाब्बास! मस्त झालंय क्विल्ट. त्या क्विल्टना मध्येही डिझाईनच्या शिवणी घालतात ना वरचं खालचं कापड पापुद्र्यासारखं पोकळ राहू नये म्हणून? त्या शिवणी घातल्या का? कश्या घातल्या?

वाह!! खुपच सुंदर झालेय quilt.
जबरदस्त ! तुमच्या चिकाटीला मानलं . प्रचंड किचकट आणि मेहनतीचं काम दिसतय .>>> +१

Mast

@ पारुबाई, व्वा:!!! क्विल्ट फारच सुंदर दिसतंय. आणि शब्दांकनही उत्तम तऱ्हेने केलेय. लिखाण अगदी ओघवत्या भाषेत झालंय. सोबत दिलेली प्रकाशचित्रे क्विल्टच्या प्रत्येक टप्प्यावरच्या प्रगतीची अगदी योग्य कल्पना देतात. आपण घेतलेल्या मेहनतीला सलाम! ह्या निमित्ताने मला गोधडीची आठवण झाली.

सुरेख झालयं, सफाईदार! पहिल्यांदाच केलय असं जाणवतच नाहीये. तुम्ही अंकगणित, भूमिती, चिकाटी सर्वच परिक्शा पहिल्या प्रयत्नात, पहिल्या श्रेणीत, पहिल्या क्रमांकानी उत्तिर्ण झालात की!

सुंदर! पहिलीच quilt इतक्या सफाईने बनवली आहे तुम्ही! अभिनंदन!!
बाकी < ते सगळे उसवणे जीवावर आले होते. पण "मुकाट्याने " उसवायला सुरुवात केली.> हे अगदी भिडले. शिवणयंत्रावर बसले की हाती घेतलेले प्रोजेक्ट एकदा तरी कुठे न कुठे उसवल्याशिवाय पूर्ण झाले आहे असे मला कधीही आठवत नाही Happy

खूप सुंदर. आधी गणीत आणि भूमिती आठवत हे क्विल्ट शिवायचं आणि मग सगळी किचकट प्रोसेस आठवून लिहायचं, बाप रे केवढी ती चिकाटी. पण खूपच सुबक झालंय क्विल्ट!
मी तसं बरंच काही शिवत असते...पण क्विल्ट हा प्रकारच मुळात प्रचंड आवड्तो तरीही चिकाटी नसल्याने आणि गणित भूमितीच्या भीतीने कधी फंदात पडले नाही.

आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाने मी भारावून गेले आहे.
आपल्या सर्वाना मनापासून धन्यवाद.

अश्विनी के ......

तुम्ही जी शिवण म्हणता त्याला LONGARM QUILTING म्हणतात. त्याने देखील तीन पदर एकत्र जोडता येतात. मी थोडा पारंपारिक फिल आणायला हाताने धावदोरा घातला.(सातवा फोटो)

खूपच सुरेख झाले आहे. किती मेहनत व चिकाटीचे काम आहे. हैद्राबादेत शेफाली म्हणून एक बुटीक होते तिथे अश्या प्रकारचे क्विल्ट मिळत. डॉबी स्टिच हा एक पॅटर्न लक्षात आहे. मी क्विल्ट फॅन क्लब मध्ये. एकावेळी चार पाच तरी घेउन येते. गुरफटून बसायला बेस्ट.

तुम्ही लिहीले आहे त्या बायकांच्या वेब साइट व मटेरिअल कुठून घ्यायचे ती माहिती द्याल का?

जी ए कुलकर्ण्यांच्या एका कथेत. ( म्हातारा आंधळा माणूस बायकोने बनवलेले क्विल्ट तिने कस सर्प्राइज म्हणून पाठीवर घातले होते ती आठवण काढतो ते) आणि निर्मला मोन्यांच्या कोकणावरील पुस्तकात एक कमी बोल्णारी काकू सुरेख नक्षीचे क्विल्ट बनवते तो उल्लेख आठवला.

फोटो व लिखाणही छान . कालच फोन्वरून वाचले होते. पण प्रतिसाद देता येइना , म्हणून आज लिहीले.

Pages