आपले हवाईयोद्धे

Submitted by पराग१२२६३ on 7 October, 2016 - 14:31

८ ऑक्टोबर. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस. याच दिवशी १९३२ मध्ये अवघ्या ४ वेस्टलँड वापिटी विमाने आणि ५ वैमानिकांसह भारतीय हवाई दलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने विविध संकटांच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. भारत प्रजासत्ताक झाल्यावर रॉयल इंडियन एअर फोर्सचे इंडियन एअर फोर्स झाले. दुसरे महायुद्ध, १९४८, १९६५ आणि १९७१ मधील भारत-पाक युद्धे, १९८४ मधले ऑपरेशन मेघदूत, १९८७ मधले ऑपरेशन पुमालाई आणि ऑपरेशन पवन, १९९९ मधला कारगिल संघर्ष या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. गेल्या ८४ वर्षांमध्ये आपल्या हवाई दलाने आपल्या क्षमतेत बरीच वाढ केलेली आहे. त्यामुळे आज त्याला व्यूहात्मक हवाई दल म्हणून ओळखले जात आहे. अशी ओळख जगातील काही ठराविक हवाई दलांनाच मिळालेली आहे.

युद्धप्रसंगी शत्रुला सर्वांत जलदतेने प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेले आपले आकाशयोद्धे नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सर्वांत जलदतेने मदतकार्य पोहचवत असतात.

4.jpg

केवळ भारतातील नाही, तर अन्य देशांमधील नैसर्गिक आपत्तींच्या काळातही भारतीय हवाई दलाने तातडीने मदत पोहचवलेली आहे. २००४ मध्ये अमेरिकेतील न्यू ऑर्लिंन्स राज्यात आलेल्या कॅटरिना चक्रीवादळानंतर तेथील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. अशा वेळी मदत साहित्य घेऊन तेथे पोहचलेले पहिले परदेशी विमान भारतीय हवाई दलाचे आयएल-७६ एमडी हे होते, हे उल्लेखनीय.

6.jpg

जगाच्या कोणत्याही प्रदेशात उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीतून आपल्या नागरिकांबरोबरच इतर देशांच्या नागरिकांची सुटका करण्यात आपल्या हवाई दलाने कायमच सक्रीय योगदान दिलेले आहे.

भारतीय हवाई दलाने जागतिक शांतता प्रस्थापनेमध्येही आपले योगदान दिलेले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध शांततारक्षण मोहिमांमध्ये भारतीय हवाई दल कार्यरत असते.

युद्धाबरोबरच भारतीय हवाई योद्ध्यांनी विमानांच्या कसरतींमध्येही आपले कौशल्य सिद्ध केलेले आहे. विमानांच्या चित्तथरारक कसरती करणाऱ्या सूर्यकिरण आणि हेलिकॉप्टरच्या कसरती करणाऱ्या सारंग पथकांनी तर जगात नाव कमावलेले आहे.

8.jpg

येत्या काळात भारतीय हवाई दलाला रफालसारखी मध्यम पल्ल्याची लढाऊ विमाने, पाचव्या पिढीची लढाऊ विमाने, चिनूक आणि अपाचे यांसारखी हेलिकॉप्टर्स, क्षेपणास्त्रे, रडार अशी विविध प्रकारची साधनसामग्री आपल्या हवाई दलाला मिळणार आहे.

आज हिंदी महासागर क्षेत्रातील प्रबळ हवाई दल अशी ओळख बनलेल्या आपल्या हवाई दलाची कार्यकक्षा प्रचंड प्रमाणात विस्तारलेली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने विविध देशांबरोबर केलेल्या युद्धसरावांचा यात मोठा वाटा राहिलेला आहे.

7.jpg

अलीकडील काळात हवाई दलात सामील करण्यात आलेल्या सुखोई-३० एमकेआय या दीर्घपल्ल्याच्या लढाऊ विमानांबरोबर आलएल-७८ (टँकर), सी-१७ यासारख्या विमानांमुळे आपल्या हवाई दलाची व्यूहात्मक पोच वाढण्यास मदत झालेली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित सामग्रीच्या जोरावर हिमालयाच्या उत्तुंग शिखरांपासून अंदमान व निकोबारपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशावरील भारताच्या हवाई क्षेत्राचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या, आणि इतकेच नाही तर आंतरखडीय तैनातीमध्येही तेथील आकाश गाजवणाऱ्या निळ्या वर्दीतील आपल्या आकाशयोद्ध्यांना ८५व्या स्थापना दिनी माझा कडक सलाम..

3.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरवर्षीप्रमाणेच आजही हवाई दल दिनाचे मुख्य आणि दिमाखदार संचलन हिंदन हवाईतळावर पार पडले. काय शान होती वायुसैनिकांची आणि प्रदर्शित केलेल्या शस्त्रास्त्रांची. तिथे उभी असलेली सी-१७, सुखोई-३० आणि मिराज-२००० (अपग्रेड) मस्त दिसत होती.

मस्त. आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा लेख!
हे बेफि म्हणतोय तसे साईज जरा कमी करा प्रचिची, बरे होईल.