साखर संघर्ष :भाग २

Submitted by सई केसकर on 21 September, 2016 - 12:53

साखरेचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लिहिता लिहिता मला २०१० साली मी वाचलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली. हे पुस्तक म्हणजे (कु)प्रसिद्ध अमेरिकन लेखिका एलिझाबेथ ॲबट यांचे शुगर: ए बिटरस्वीट हिस्ट्री. ॲबट यांचे 'हिंदू' नावाचे पुस्तक भारतात खूप वादग्रस्त ठरले होते. पण साखरेवरचे हे संशोधन वाचून तरी त्यांच्याबद्दल मला आदरच वाटला होता. साखरेचा शरीरावरील परिणाम जसा कटू आहे, तसं तिचं जगात प्रस्थापित झालेलं वर्चस्वदेखील कडवट आहे.

शर्करेचा पहिला उल्लेख भारतातील कौटिल्य याने वेदांमध्ये केलेला आढळतो (३२५ बी सी). यात पाच प्रकारच्या साखरेचा उल्लेख आहे ज्यात खांड (खांडसरी) साखरेचादेखील होतो.' खांड' या शब्दातून पुढे कँडी हा शब्द जन्माला आला आणि शर्करा--सुक्र--शुगर हा प्रवासदेखील कित्येक मसाल्यांसारखा भारत-मध्यपूर्व-इंग्लंड असा झाला. प्राचीन काळात उसापासून साखर बनवायच्या प्रक्रिया सध्या होत्या. त्याचं पाश्चिमात्य उद्योजकांनी जसं जसं तांत्रिकीकरण केलं तशी तशी साखर साता समुद्रापार पोचली. आणि मधाची जागा झपाट्याने साखरेनी घेतली. मधापेक्षा साखर मिळवणे, साठवणे आणि टिकवणे सोपे असल्यामुळे लवकरच साखरेची मागणी वाढू लागली. सुरुवातीला साखर श्रीमंत पतीची राणी होती. राजामहाराजांच्या समारंभात साखरेच्या बशा आणि साखरेचे चमचे दिले जायचे. जेवण संपल्यावर अतिथी वाटी-चमचे पण खाऊन गेलेले असायचे. काही ठिकाणी साखरेचे एखादे पोकळ शिल्प बनवले जायचे. पाहुण्यांनी शिल्प खाऊन त्यात पुरेसे मोठे भोक पाडले की आतून पांढरी कबुतरे बाहेर उडून जायची. औद्योगिक क्रांतीनंतर साखर खऱ्या अर्थाने सामान्य माणसांमध्ये आली. दुपारच्या वेळेस कामगारांना चटकन फुर्ती यावी यासाठी टी ब्रेक सुरु झाले. आणि बायका घराबाहेर पडल्या तसं घरी साग्रसंगीत जेवण न बनवता हाय टीची संकल्पना सुरु झाली. याच आसपास दुसऱ्या महायुद्धानंतर खाद्यपदार्थांचेदेखील घाऊक प्रमाणात उत्पादन सुरु झाले आणि या प्रवासात गोड-गोजिरी साखर फास्ट फूड ची जन्मोजन्मीची जोडीदार बनली.

पण साखरेचा न सहज समोर न येणारा असा एक काळा चेहरादेखील आहे. साखर उत्पादनाने बेछूट गुलामगिरी आणि वर्णभेदाला सुरुवात केली. उसाच्या शेतात काम करण्यासाठी आफ्रिकेतून कृष्णवर्णीय गुलाम जगभर पाठवले जाऊ लागले. अमेरिकेतील 'आफ्रिकन अमेरिकन' जमात मुख्यत्वे दक्षिणेतील ऊस आणि कापूस उत्पादनासाठी पहिल्यांदा अमेरिकेत आणण्यात आली. याआधी ब्रिटनने ही प्रथा जगभर रूढ केली. उसाच्या शेतीसाठी कित्येक भारतीयांनादेखील फिजीमध्ये पाठवण्यात आले. जमेका, फिजी या ब्रिटनच्या कॉलनीज होत्या. ब्राझील मध्ये साखर पोर्तुगीज लोकांनी नेली. उत्तर अमेरिकेत कोलंबसने नेली आणि त्या पाठोपाठ गुलामदेखील गेले. या गुलामांना प्रचंड हलाखीत दिवस काढावे लागत आणि त्यांनी कापलेल्या उसाप्रमाणेच त्यांच्या देहाची देखील चिपाडं बनायची. कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला न मिळता केवळ आपल्या रंगामुळे या लोकांना आजन्म गुलामगिरी पत्करावी लागत असे. अर्थात वर्णभेद हा स्त्री-पुरुष संबंधांच्या आड कधीच येत नसे. त्यामुळेच मिश्र वर्णीय अपत्यांना नवे देण्याची अपमानास्पद पद्धत देखील गोऱ्या लोकांनी विकसित केली होती.

श्वेत आणि कृष्णवर्णीय पालकांच्या अपत्याला मुलॅटो, अर्थात घोडा आणि गाढवापासून बनणाऱ्या प्राण्याची उपमा देण्यात आली. मुलॅटो पासून पुढे श्वेत किंवा कृष्णवर्णीय दिशेने जाणाऱ्या प्रत्येक अपत्याला वेगळे नाव असायचे. आणि जेव्हा एखाद्या मुलॅटोचं श्वेत बाजूला शुद्धीकरण व्हायचं, तेव्हा त्याच्या पुढील पिढीचा पाव पेक्षा कमी भाग कृष्णवर्णीय असेपर्यंत त्यांना श्वेतवर्णीयांचे संबोधन मिळायचे नाही. कित्येक पिढ्या हे शोषण चालल्यामुळे, एकावेळी वेगवेगळ्या "छटांचे" गुलाम एकाच मालकाकडे काम करायचे. त्यांची कामेदेखील त्यांच्या वर्णावर ठरवली जायची. सगळ्यात जास्त काळ्या कातडीचे लोक नेहमी उन्हातान्हात काम करायचे आणि गोरेपणाकडे वाटचाल करणारे गुलाम घरगुती कामांसाठी वापरले जायचे. अर्थात यातून गुलामांमध्ये अंतर्गत अस्थिरता टिकून राहायची. आणि गुलामाही आपापसात वर्णभेद करू लागायचे.

साखर फ्रेंच आणि इंग्रज लोकांच्या तणावाचे एक कारण ठरली. आणि इंग्रजांनी फ्रेंच नवदलाला शह द्यायला सुरुवात केली. युरोपीय देशात ऊस उगवण्यासाठी पोषक हवामान नसल्याने साखर आयात फ्रेंच राजवटीची दुखरी नस बनू लागली. एव्हाना फ्रेंच पदार्थांमध्ये साखरेचा मुबलक वापर होऊ लागला होता आणि साखर फ्रेंच पाककलेच्या नाकातली नथ बनून गेली होती. अशात नेपोलियनने शास्त्रद्यांना उत्तेजन देऊन बीट शुगरचा शोध लावला. उसाप्रमाणेच शुगर बीट यात मुबलक प्रमाणात सुक्रोज सापडते आणि उसासारखाच तांत्रिकी ढाचा घेऊन युरोपमध्ये बीट शुगर बानू लागली. अजूनही युरोपीय देशात बीट शुगर वापरली जाते .
साखर आहे तिथे राजकारण आहे. आजही महाराष्ट्रातले कित्येक कारखाने यशस्वी राजकारण्यांच्या हातात आहेत. साखरेचा भाव आणि साखरेची निर्यात हादेखील राजकारणाचा विषय आहे. अमेरिकेतील शुगर लॉबी गेली कित्येक वर्षं आहारतज्ज्ञांना नारोवा-कुंजरोवा पद्धतीने साखरेचे गोडवे गायला भाग पाडते आहे. आणि आता खाद्यपदार्थ उत्पादकांचा आणि साखर उत्पादकांचा दुग्ध-शर्करा योग आला आहे. प्रोसेस्ड फूड इंडस्ट्रीत साखर बेमालूमपणे विरघळून गेली आहे. आणि आता साखरेमुळे वर्णभेद होत नसला तरी कित्येक अनभिद्न्य ग्राहकांना बेमालूमपणे आपल्या मधुर पाशात अडकवायचे काम साखर अखंड करते आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही. Happy

मस्त लेख दोन्ही.

साखर कारखान्यांनी होणारं प्रदूषण आणि उसाच्या शेतीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम या बद्दल पण लिहा

(

मस्त!
गेल्याच आठवड्यात, अमेरिकन शुगर इंडस्ट्रीने ६० च्या दशकात शास्त्रज्ञांना पैसे चारुन साखरेपेक्षा सॅचुरेटेड फॅट्स हृदयासाठी जास्त धोकादायक आहेत असे 'सिद्ध' करवून घेतले अशी बातमी होती.