कामथे काका (भाग १५ वा )

Submitted by मिरिंडा on 20 September, 2016 - 04:41

सगळे गेल्यावर दादाने दिवाणजींचं काम करणाऱ्या माणसाला फोन केला. कारण अजून पन्नास लाखांचा प्रश्न होता. खोपडी देणारा म्हणाला, " दादासाब, खोपडीया एकदम ताजी है. अभी अभी घंटा पह्यले लायी है. डिलिव्हरी देनेको मै खुद निकला हूं. " दादाला जरा बरं वाटलं. पण त्याला संशयही आला. आपण तर ह्याला केव्हा ये हे न सांगताच हा कसा काय येतोय? काही दगा फटका होईल या शंकेने त्याने प्रथम आपलं पिस्तूल काढून हातात धरलं. मग दिवाणजींना फोन लावून खोपड्या शनिवारी रात्री पोहोचतील असे कळवले. फक्त उरलेले पैसे घेऊन येणाऱ्या माणसाजवळ ताबडतोब द्यावे लागतील. जर त्यात काही गफलत केली तर प्राणाशी गाठ असेल. बेल वाजली. हातातलं पिस्तूल रोखत दादाने स्वतः दार उघडले. दारात पूर्ण काळा कभिन्न माणूस उभा होता. त्याच्या हातात एक प्लास्टिकची निळ्या रंगाची पिशवी होती. त्यात दुसऱ्या एका पिशवीत बर्फाच्या चुऱ्यात पॅक केलेली पाच बालकांची शिरे होती. तो आत आला. मग त्याच्याकडूनच आणलेलं पॅकिंग उघडून दादाने त्या खास कामासाठी बनवलेली लाकडाची पेटी उचलून आणली. त्यात बर्फाचा चुरा भरला. त्यात आणखीन थोडा बर्फ मोठ्या फ्रीज मधून काढून पसरला. ती पाचही शिरे त्या दोघांनी एकेक करून बर्फात निर्विकारपणे ठेवली. जगात आल्या आल्याच वरचा रस्ता दाखवणाऱ्याचं दर्शनही निदान मेल्यानंतर नको म्हणूनच जणू काही त्यांचे निरागस डोळे मिटले होते. निर्दयपणाला सुद्धा लाज वाटेल इतक्या निर्दय पणे त्या दोघांनी त्यांच्या डोक्यांवर बर्फाचा दाट थर पसरला. फ़ार टिकतील की नाही याची खात्री नसल्याने शनिवारी बँकेत जायच्या आधी जास्त आणि नवीन बर्फ टाकून ठेवण्याचे दादाने ठरवले. मग तो माणूस गेल्यावर दादाने ती पेटी ओढत फ्रीजजवळ आणली. फ्रीजमधल्या निरर्थक बाटल्या आणि इतर सामान काढून त्याने ती फ्रीजमध्ये मोठ्या मुश्किलीने ठेवली. नुसते एवढे काम करताना त्याला जबरदस्त धाप लागली. याची डिलिव्हरी किती त्रासदायक होईल याची त्याला जाणीव झाली............ जवळ जवळ एक वाजून गेला होता, जेव्हा हिरा आणि जीवनदान सूर्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले. दोघांनी मिळून बांधलेल्या सखारामला कसंतरी उचललं. सखाराम बेशुद्ध नव्हता. त्यामुळे त्याने त्यातल्या त्यात बांधलेल्या अवस्थेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण उचलणारे धंदेवाईक गुन्हेगार असल्याने सखारामचा विरोध मावळला. ते दोघेही सखारामला घेऊन दादाच्या केबिनमध्ये शिरले आणि त्यांनी सखारामचं मुटकुळं खाली ठेवलं. त्याबरोबर दादा कडाडला, " तुम लोग कौनसा भी काम हो, लफडा करतेही हो क्या? एक काम साला ठीक तरहसे नही कर सकते. अब किसको पकडके लाये? " दोघेही स्तब्ध होते. त्यांना तसे उभे पाहून तो म्हणाला, " जबान भाग गयी क्या? बोलते क्यूं नही कमीनो? " त्यावर जीवनदान म्हणाला," दादा ये हवालादार है. बहोत नड राहा था, इसलिये उसको यहां लाना पडा. वो मरा नही है? अब इसे खोले क्या? " तशी दादा म्हणाला, " किसीकी राह देख रहे हो क्या? " ......... ते दोऱ्या सोडणार तेवढ्यात सखारामच्या मोबाइलची रिंग वाजली. हिराने तो घेतला. पण काही बोलला नाही. तो पर्यंत जीवनदानने त्याला कसातरी ओढत पुढे आणला.हिराने फोन बंद केला. आणि दोऱ्या सोडून हवालदाराला बाहेर काढलं. सखारामला पाहून दादा म्हणाला," अरे हवालदार साब आप ? उस दिन पैसा कम पड गया क्या ? " सखाराम काहीच बोलला नाही. तो उभा राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच हिराने त्याच्या कानफटात मारली . तोभेलकांडला आणि जमिनीवर पडला. मग हिरा म्हणाला, " दादा अब इसका क्या करे? " खरंतर दादा स्तंभित झाला होता. हे लोक एका पोलिसाला पकडून घेऊन आले होते. त्याला त्याची जाणीव झाली. त्याला सोडलं तरी त्रासदायक नाही सोडलं तरी त्रासदायक. त्याला पुन्हा एकदा त्या दोघांचा राग आला. मग त्याला हिराने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, असं करण्याशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. मग तो थोडा विचार करून म्हणाला. " इसको बांधके डाल दो सुरंगमे. बादमे सोचके इसका फुल ऍड फायनल करेंगे. " त्याला त्या दोघांनी मग यथेच्छ तुडवला. अर्धमेला केला. आणि पुन्हा एकदा बांधून केबिन खालच्या भुयारात बंद केला. ख्ररं तर दादाचं डोकं चालत नव्हतं. अचानक निर्माण झालेल्या या अडचणीवर काय उपाय करावा त्याला सुचेना. मग ते दोघे गेले. दादाने व्हिस्कीचा ग्लास तोंडाला लावून विचार करायला सुरुवात केली................
.
भुयारात टाकलेल्या सखारामला, खोल विहिरीत पडल्यासारखं वाटत होतं. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, त्याबरोबर त्याला डोक्यात वेदनेच्या इंगळ्या डसल्यासारखा भास झाला. ती एकच कळ नव्हती. ते वेदनांचं मोहोळ होतं. मग पुन्हा त्याला ग्लानी आली. आणि तो खालच्या पायरीवर अस्ताव्यस्त पसरला. देहाचा बराचसा भाग पायरी लहान असल्याने खालच्या पाण्यात लोंबत होता. जवळ जवळ अर्ध्या तासाने तो आता हळू हळू शुद्धीवर येत होता. प्रथम त्याला पाणी पिण्याची इच्छा झाली. अत्यंत कुबट, कुजट अशा पाणथळ वासाने त्याला अस्वस्थता आली. सबंध अंग ठणकत होतं. पाण्यातले उंदीर आता त्याच्या अंगावर उड्या मारून त्याच्या पायातल्या बुटांना चावून चावून कंटाळले. त्याने कष्टाने डोळे उघडले. अंधाराला सरावल्यावर त्याला आपल्या डोक्यावरचे छत जवळच असल्याचीजाणीव झाली. समोरच्या बाजूला असलेल्या गंजक्या जाळीवजा गेटची कल्पना यायला त्याच्या मेंदूला फार कष्ट पडले. पण एकूण आपणकुठेतरी जमिनीखाली आहोत हे त्याला कळले. उठून बसण्याची शक्ती नव्हती. आणि हाता पायांना बांधलेल्या दोऱ्या आता काचू लागल्याहोत्या. त्यामुळे झालेल्या लहान सहान जखमांची आग आता त्याला जाणवू लागली. त्याला प्रथम आठवण झाली ती श्रीकांत सरांची . त्यांनाकसं कळणार , आपण इथे अडकलो आहोत ते. या विचाराने तो जास्त अस्वस्थ झाला. आपला फोन किशाच्या माणसांनी घेतला असणार, हे नक्की . त्याच्या मनात आलं, हा किशा बँकेवर दरोडा घालण्याच्या तयारीत आहे. पण उपयोग नव्हता. त्याचा फोन त्याच्या जवळ नव्हता, आणि श्रीकांत सरांना कळवण्याचा दुसरा मार्गही त्याला कळत नव्हता. अंगात अजूनही ताकत नसल्याने त्याला चांगलाच थकवा जाणवत होता. पाण्यात उंदीर आहेत हे त्याला त्यांच्या आवाजावरून जाणवलं. पण त्याला कोणताही प्रतिकार करता येत नव्हता, की तो पाय वर घेऊ शकत होता. थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या जागेतून त्याला वर काहीतरी सरकवल्याचा आवाज आला. काय असेल बरं हे? मेंदूला ताण देणं जमत नव्हतं. पाय मोकळे असते तर ते त्याने हातातून काढले असते. पण तसं नव्हतं. त्यामुळे निराशेने त्याने पाय तसेच ठेवले. बूट चावून कंटाळलेल्या उंदरांनी त्याच्या पँटमध्ये उड्या मारून पाहिलं. त्यांना मांसाचा वास आला त्या बरोबर चावायला लागले. पण त्यांच्या तोंडात बांधलेली दोरी आली. तीच त्यांनी कुरतडायला सुरुवात केली. एका वेळेला पाच पाच सहा सहा उंदीर कुरतडू लागले. साधारण पणे अर्ध्या पाऊण तासाने दोऱ्यांचं बळ कमी झालं. एकेक करीत त्यांचा विळखा सुटला. त्या सैल होऊन लोंबू लागल्या. जणू काही परमेश्वरानेच उंदरांना बुद्धी दिली. पण आता मात्र ते सखारामच्या पायांना चावे घेऊ लागले. त्यामुळे सखारामला येणारी ग्लानी पळाली. तो त्या पायरीवर उठून बसला. त्याने पाय वर घेतले. पण त्याचे बूट मात्र सैल झाल्याने पाण्यात गळून पडले. हळू हळू जमेल तसे पाय मागे बांधलेल्या हातांच्या दोऱ्यांमध्ये घालून हात पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ गेला. पँट ओली असल्याने अथक प्रयत्नाने पाय बाहेर आले व हात बांधलेल्या अवस्थेत का होईना पुढे आले. आता प्रश्न होता. हात सोडवण्याचा. पण ते तितकंसं सोप नव्हतं. दम लागल्याने तो बराच वेळ तसाच बसून राहिला. अंधाराला डोळे आता चांगलेच सरावू लागल्याने भुयाराचे छत त्याला दिसू लागले. तो जिथे बसला होता तिथे ते बरंच खाली होतं. त्यामुळे उभं राहण्याचा प्रश्नच नव्हता. आता त्याला तहान आणि भूक लागल्याची जाणीव झाली. त्याने आशेने भुयाराच्या भिंतीकडे पाहिलं. पण त्यात असलेल्या भोकशांशिवाय तिथे काही नव्हतं. त्या भोकशांमध्ये काही असलं तरी उठून पाहण्याची ताकत असायला हवी. निदान सध्यातरी काही करता येण्यासारखं नव्हतं.

किशा पीत बसला होता. रात्रीचे दोन वाजले होते. बरोबर आणलेला नाश्ता तो खात होता. दारूने त्याच्या डोक्याचा आता पक्का ताबा घेतला. त्याला समोरचं सगळं अदृश्य झाल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याला जुन्या आठवणी खाऊ लागल्या. अधून मधूनत्याला प्रथम भेटलेली स्त्री आठवली. जिच्यापासून त्याने प्रथमच शरीरसुख लुटलं होतं. तेव्हापासून त्याला बाईची गरज सारखी वाटू लागलीहोती. त्याला आता जमाना झाला होता. पुढे पुढे त्याने कितीतरी मुली, स्त्रिया भ्रष्ट केल्या होत्या. त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळे अनोळखी चेहरेयेऊ लागले. त्यातलीच एक साधनाबेन होती. त्याला एकदम तिची आठवण झाली तेव्हा त्याने लगेचच जायचे ठरवले. तो उठलाही. पण तोलसांभाळणं त्याला कठीण गेल्याने तो परत खुर्चीत पडला. शांततेचा भंग करीत फोनची बेल वाजली. तो केवढ्यांदा दचकला. त्याने एक घाणशिवी देऊन तो उचलला. पलीकडून दगडी आवाज आला " पीते रहो भोसडिके, मै परसू आ राहा हूं. " .....किशाच्या डोक्यात ओळख यायलावेळ लागला. तेवढ्या अवधीत पलीकडच्या माणसाने गोळ्यासारख्या शिव्या झाडल्या . आणि तो म्हणाला, " किशा मै किक्ला बोल राहा हूं. अब पहचाना क्या ? .... " किशा अर्धवट भानावर येत म्हणाला, " अरे , किक्लाभाई , कैसा है तू ? परसू रातको आयेगा क्या ? लगता है , तुझे लेने आना पडेगा. लेकीन भाई कलही तो तेरा काम होनेवाला है. " ......किक्लाने जोरदार शिवी देऊन म्हंटलं, " वो मेरेको मालूम नही. किसीको भी भेजो. " त्याने फोन खाली ठेवला. किशाची आता पूर्ण उतरली होती. तो मनाशीच म्हणाला, कुछ ना कुछ तो दिक्कत पैदा होतीही है. अब ये बीचमे क्यूं आ राहा है . सूर्याको भेजूं या और किसीको ? ........ त्याला काकांची आठवण झाली . काकाको भेजनेका तो गाडी लगेगी, गाडी लगेगी तो हिराको जाना होगा. साला ये क्यूं आ राहा है ? ........ कुछ करना तो पडेगा...... मग अचानक त्याला एका नव्या विचाराची शंका आली. अगर ऐन टाइमपे पुलिस आ धमकी तो क्या करेंगे. या विचाराने तो चांगलाच अस्वस्थ झाला. याचा विचार इतके दिवसात त्याने केलाच नव्हता. अगर किसीने उनको खबर दी तो. कोई गद्दार अपनेमेसेही निकला तो? आता त्याची चांगलीच उतरली. त्याने काहीच तजवीज केली नव्हती. आणि त्याचा असा अनुभव होता, की असले परके विचार खरे होतात. पण आता काय उपयोग होता. मग असं काही झालंच तर तर.....? त्याला साधनाची आठवण झाली. आणि त्याच्या डोक्यात आशेचा किरण आला. आपण तिच्या घरी पळून जाऊ. लुटलेला माल सूर्याला ऑफिसमध्ये घेऊन जायला सांगू. म्हणजे सगळं ठीक होईल. पण ते इतकं सोपं नव्हतं. याचीही त्याला जाणीव झाली. त्याने नऊ वाजता ताराबाईंच्या फ्लॅटमधे जाण्यापेक्षा आपण जीवनदानला घेऊन सातसाडेसात वाजता पोहोचू. म्हणजे वेळही जास्त मिळेल.

********** *************************************************************************************
काकांनी पैशांची पिशवी नीट ठेवल्यावर ते हॉलमध्ये आले. त्यांनी नीताच्या चेहऱ्याकडे पाहिले. पण तिला कसलाच संशय आलेला दिसला नाही. ती आत गेली मधला दरवाजा लावला. काका पण अंथरूण घालून झोपी गेले. आज शनिवार होता. आजचा दिवस त्यांच्या आयुष्याला काय कलाटणी देतो कुणास ठाऊक. या विचाराने ते अस्वस्थ झाले सकाळी उठल्यावर त्यांनी प्रथम काही केले असेल तर साधनाला फोन केला. तिने हॅलो म्हणायच्या आतच त्यांनी म्हंटले, " फोन ठेवू नकोस, फक्त एकदा ऐकून घे, मग वाटलं तर बंद कर. मला तुझी माफी मागायची आहे. " असं म्हणून त्यांनी तिला आपण कसे परिस्थितीने लाचार होत गेलो, आणि त्यामुळे तिला त्यांना कसे काही सांगता आले नाही, हे पटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ती स्वस्थ व्हावी म्हणून ते म्हणाले, " तुझ्या जागी मी असतो तरी तुझ्याच सारखा वागलो असतो, पण दुसऱ्या माणसाचं ऐकायचंच नाही हा कुठला न्याय? थोडी फार तर संधी दिली पाहिजे, नाही का? तुला काय वाटतं? " असं म्हणून त्यांनी तिच्यावरच बोलण्याची जबाबदारी ठेवली. खरंतर मी तुझ्या जागी असतो तर, वगैरे बोलणं म्हणजे उगाचंच आपण दुसऱ्याचाही विचार करतोय असं वाटण्यासाठी म्हंटलेलं असतं, आणि सामान्य माणूस त्याला बळी पडतो. तेच झालं. ती म्हणाली, "ठीक आहे, तुम्हाला यायला हरकत नाही. पण मी काहीही वचन देत नाही. निर्णय माझाच असेल. " आता काकांना थोडी आशा वाटली. म्हणजे जायला हरकत नाही. अजून तरी किशाकडून बोलावणं न आल्याने काका अंधोळ करून निघाले. नीताला सांगून ते बाहेर पडले. जाताना तिला मी लवकरच येईन असे म्हणाले. बससाठी उभे राहिले. पण बसला एवढी गर्दी की त्यांना शिरताच आलं नाही. अशा दोन तीन बसेस सोडल्यावर त्यांना एकदाची बस मिळाली. ते घाईघाईने साधनाच्या फ्लॅटजवळ आले. त्या घाईत त्यांना त्यांचा पाठलाग होतोय हे त्यांना कळलच नाही. बेल वाजवल्या बरोबरच दार उघडले गेले. प्रथम ते प्रसन्न चेहऱ्याने साधनाकडे बघून हसले. तिचा चेहरा मात्र मख्ख होता. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते आत आले. सोना शाळेत गेली असणार असे समजून त्यांनी काहीच विचारले नाही. मधल्या काही दिवसांनंतर ते साधनाला प्रथमच भेटत होते. म्हणजे त्यांनी सगळं सांगितल्या दिवसापासून. आत शिरल्या शिरल्या त्यांना तिला जवळ घ्यावंस वाटलं. पण त्यांनी घाई न करण्याचं ठरवलं. सोफ्यावर बसत ते म्हणाले, " साधना मला खरच माफ कर. पुढचा विचार करून आपण काय करायचं हे ठरवलं तर चालेल ना? " उत्तरादाखल ती किचनमध्ये गेली. त्यांना काही कळेना काय करावं. मग तेही थोडा वेळ वाट पाहून आत गेले. सोना आत झोपलेली होती. त्यांना आश्चर्य वाटलं. हिला बरबिरं नाही की काय? पण ते आत गेले आणि तिला म्हणाले. " साधना तुला माझ्याशी काहीच बोलायचं नाही का? " उत्तरादाखल तिने फक्त ते चहा घेणार का विचारले. मग मात्र काकांचा धीर सुटला. त्यांनी तिचा हात धरून तिला आपल्याकडे वळवली. आणि घाईघाईने म्हणाले, " साधना तुला नक्की काय निर्णय घ्यायचाय हे ऐकायला मी आलोय आणि तू लक्षच देणार नसलीस तर निघेन मी आणि परत कधीही भेटणार नाही. तुला काय वाटतं, सगळं विसरता येईल तुला? असंच जर होतं तर इतकी जवळीक तरी कशाला निर्माण केलीस? मी उशिरा सांगितलं हे खरं, पण लपवून तर ठेवलं नाही ना? मला सांगायचा धीरच झाला नाही, त्याला, मी तरी काय करणार? माझ्या मनात कपट नाही हे लक्षात ठेव. " जेवढं जमलं तेवढं त्यांनी बोलून टाकलं. आणि तिचा हात सोडून ते बाहेर सोफ्यावर जाऊन बसले......
जवळ जवळ दहा पंधरा मिनिटं अशीच गेली. काकांना चांगलंच असुरक्षित वाटू लागलं. आपलं आयुष्य असच एकट्याने जाणार. सगळं आयुष्य असं काढणं याची त्यांना अचानक भीती वाटू लागली. आपल्याला चक्कर येते की काय अशी त्यांना भावना झाली. या जगात आपलं कोणीही नाही अशा नैराश्याने त्यांना ग्रासले. जरा कुठे आशा निर्माण झाली होती तीही संपल्याचं त्यांना जाणवलं. थोड्याच वेळात साधना आतून चहाचे कप घेऊन बाहेर आली. ती काय बोलते इकडे त्यांचं लक्षच नव्हतं. ते सोफ्यावर मागे डोकं टेकून बसले. तिने समोर ठेवलेल्या चहाच्या कपाला त्यांनी हात लावला नाही. मग ती म्हणाली, " ठीक आहे मी सगळं विसरून जायला तयार आहे पण तुमचा या दरोड्याशी काही संबंध नाही ना? " ....... त्यांचा चेहरा फिका पडला. तिच्या लक्षात आलं की नाही ते त्यांना कळलं नाही. खरं त्यांच्या ओठावर होतं. आजच दरोडा पडणार असल्याची त्यांना जाणीव झाली. . एकीकडे हादरा देणारं वास्तव आणि दुसरीकडे आपल्या भवितव्याचा प्रश्न. मग मात्र ते पटकन खोटं बोलले. त्यावर ती म्हणाली, " तरीही मी पोलिसांना कळवणार आहेच........ " ती थोडी थांबली. तिला काकांची प्रतिक्रिया पाहायची होती. ते मख्ख चेहरा करून बसले. आता त्यांना खऱ्या खोट्याची पर्वा नव्हती. ते सहसा खरं बोलत नसत. ज्याच्यामुळे ते विचलित होतील, किंवा त्यांना आवडणारी व्यक्ती विचलित होईल. रोहिणीच्या बाबतीत ते असंच करीत. पण तिची गोष्ट वेगळी होती. ती त्यांना समर्पित झाली होती. ती त्यांना वेगळी वाटतच नसे. इथे तसं नव्हतं. ते साधनाच्या बाबतीतही पझेसिव्ह होते. पण साधनाकडून रोहिणी इतकं समर्पण त्यांना झालेलं दिसलं नाही. शेवटी ती दुसऱ्याची बायको होती. तसंच अजूनही तिने त्यांच्याशी लग्न केलेलं नव्हतं. हिला आता उत्तेजित करायला हवं. पण ते सोपं नव्हतं. ते तसेच उठले. त्यांनी चहाला हातही न लावलेला पाहून ती म्हणाली, " लहान लहान गोष्टीसुद्धा किती गांभीर्याने घेता तुम्ही. मी पोलिसांना सांगणार म्हटल्यावर तुम्हाला एवढं असुरक्षित का वाटायला लागलं? तुमचा तर या
दरोड्याशी संबंध असेल असं मला तरी वाटत नाही. चहा गार झालाय तो गरम करून आणते. तेवढा घ्या आणि मग हवंतर जा. नाहीतर काहीतरी उपाय सुचतोय का ते पाहा. इतके हताश का होता? " ....... ती चहाचा कप आत घेऊन गेली. ती जाताना त्यांना परत एकदा तिला सांगावंस वाटलं, की ते त्यांच्या मनाविरुद्ध ह्या सगळ्यात कसे ओढले गेले. आणि तिने ते सहानुभूतीने ऐकावे असं त्यांना वाटू लागलं. ती आत गेली. पण आपणही आत जाऊन तिला अचानक जवळ घेतलं तर तिचे विचार बदलतील असं त्यांना वाटलं. मग ते थांबले नाहीत. तसंही गेले काही दिवस ते अगदी एकटे पडले होते. त्यांना कोणतीच आशा वाटत नव्हती. ते विचार बदलायच्या आत स्वयंपाकघरात गेले. त्यांना तिने लावलेला सेंट जाणवू लागला. ती चहा गरम करीत असतानाच अचानक तिच्या दंडाला स्पर्श झाल्याने ती घाबरली. पटकन ती त्यांच्याकडे वळली. आता काकांनी न थांबता तिला जवळ ओढली आणि म्हणाले, " साधना माझ्यावर विश्वास ठेव. " पण तिला हे अजिबात आवडलं नसल्याने त्यांना दूर लोटलं. चहा त्यांच्या हातात देऊन म्हणाली, " दूर राहा. मी आता फसणार नाही. . मला हे सगळं सांगितलत तरी कशाला. ............" ते हॉलमध्ये आले.

खिशातला फोन फुरफुरला. काकांनी पाहिलं. तो किशाचा होता. फोन घ्यावा की नाही, अशा दोलायमान अवस्थेत त्यांनी तो घेतला. किशा म्हणाला, " काकाजी, आपको मिटिंगमे आनेकी जरुरत नही. लेकीन रात के दो बजे ऑफिस आना है. " त्यांनी काही बोलण्याच्या आतच त्याने फोन बंद केला. ही काय वेळ झाली, ऑफिसला जाण्याची? नीताला काय सांगणार? आणि केव्हा निघणार? असले विचित्र प्रश्न मनात घोळू लागले. साधनाच्या बाबतीतला विचार आता सोडावा हेच बरं. तरीही त्यांनी तिला मी संध्याकाळी आलो तर चालेल का अस विचारलं. त्यावर तिने जास्त उत्साह न दाखवता होकार दिला. तिच्या मनात आलं, काहीतरी अजून यांच्या मनात आहे. पण ते सांगायला तयार नाहीत. असं काय लपवीत असावेत? यांना तात्पुरती आशा दाखवली तर तेही कळेल. म्हणून तिने अचानक भाव बदलले. आणि पूर्वीच्या उत्साहात ती म्हणाली, " या संध्याकाळी अवश्य बोलू. "...... ते घाईघाईने निघाले. ताराबाईंच्या फ्लॅटकडे त्यांची नजर गेली. आज मीटिंग आहे तरी आत कोणीतरी असेलच. त्यांचा अंदाज बरोबर होता. आत सध्यातरी फक्त रमजान होता. बाकी सगळेच मीटिंगला गेले होते. ते, लवकर निघाल्याने त्यांना घरी जाताना तरी बस लगेचच मिळाली. ते घरी आले तेव्हा बारा वाजून गेले होते. बार वाजायच्येत आणि बारा वाजले व बारा वाजून गेले किती धोकादायक शब्दप्रयोग, त्यांच्या सहज मनात आलं. ते घरात शिरल्या शिरल्या नीताने विचारलं, " हे काय आज गेलात काय आलात काय? लवकर सुटका झाली वाटतं? " ती कणीक मळत होती. श्रेया खेळत होती. त्यांनी कपडे बदलले आणी तिच्याशी खेळू लागले. तिच्याशी खेळता खेळता त्यांना सहज आठवण झाली. आज रात्री आपण किती वाजता घरी येणार, की येणारच नाही. संध्याकाळी लवकरच निघावं, म्हणजे नीताला संशय येणार नाही. मग त्यांनी आत जाऊन नीताला सांगितले की ते संध्याकाळी सहा वाजता ऑफिसला जाणार आहेत आणि जर उशीर झाला तर ते त्यांच्या मित्राकडे राहतील. तिने अर्थातच जास्त विचारलं नाही. तिला लक्षात आलं यांच्यावर अंकुश ठेवण्याऐवजी नुसतं लक्ष ठेवावं हे बरं, म्हणजे रमेश आल्यावर त्याला सविस्तर सांगता येईल. मग यांची पिडा कायमची टळेल. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते श्रेयाला घेऊन बागेत गेले. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यांनी बाहेर असतानाच साधनाला फोन केला. आणि जेवायला येत असल्याचं सांगितलं. त्यावर ती काहीच बोलली नाही. तिची मूक परवानगी आहे हे त्यांनी ठरवलं. बरोबर साडेसहाच्या सुमारास ते तिच्या घरी पोहोचले. अजूनही ताराबाईंच्या घराला कुलूप होतं. ते मुद्दामच चालत गेले. आता आतमधे सगळेच असण्याची शक्यता आहे. काकांचा अंदाज बरोबर होता. ते सगळेच आत होते. फक्त दादा तेवढा रात्री नऊच्या आसपास येणार होता. तो पर्यंत सगळ्यांनीच पुन्हा एकदा प्लानवर विचार करायचा. असं मीटिंगमध्ये ठरलं. जीवनदान तेवढा बाहेर राहणार होता. खरंतर हे काम सूर्याला हवं होतं. कारण किक्लाला त्याला आणायला जायचं होतं. तसा काण्या जाणारच होता . त्याची त्यामुळे त्याची निराशा झाली होती. काण्या किक्लाला सूर्याच्या फ्लॅटवर घेऊन जाणार होता. त्याच्याकडून सूर्याला खरी माहिती हवी होती पण ते तेवढं सोपं नव्हता. किक्ला म्हणजे नागाची जात होती. कितीही खूश केलं तरी त्याचं समाधान होत नसे. आणि नंतर तो काय करील याचा भरवसा नसे. त्याच्या वागण्याचा कोणालाच अंदाज येत नसे. अगदी दादाला सुद्धा..........

काकांनी बेल वाजवल्या बरोबर लगेचच दार उघडलं गेलं. ते सोनाने उघडलं. तिला त्यांना पाहून आनंद झाला होता. त्यांना जवळजवळ चार दिवस झाले होते. तेव्हा ते तिला दिसत होते. त्यांनी तिच्या गालाला हात लावला. ती दार बंद करून त्यांना बिलगली आणि म्हणाली, " तुम्ही मम्मीचं मनावर घेऊ नका, हं.! ती अशीच आहे. किचनच्या दारात उभ्या असलेल्या साधनाला पाहून ते म्हणाले, '"असं नाही बोलूं. " ती बाजूला झाली. ते हॉलमध्ये बसून राहिले. ती बोलवत नाही तो पर्यंत आपण कशाला जा. असं त्यांच्या मनात आलं. पण त्यांना राहवत नव्हतं. आयुष्यात सहकाऱ्याची गरज असते हे तीव्रतेने त्यांना जाणवत होतं. कारण ते एकटे होते. तसं तिचं नव्हतं. तिला सोना होती आणि त्या दोघींचं घरही होतं. मुलगा आणि सून यांच्यात काका फारसे मिसळळे नव्हते. तेही त्यांना फारसे हवे होते असं नव्हतं. बदनाम बाप आणि सासरा याला जवळ ठेवून काय करायचं, असा त्यांचा सरळ हिशेब होता, असा काकांनी ग्रह करून घेतला होता. तोही त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे. दहा पंधरा मिनिटं बसल्यावर साधना बाहेर आली. " आलाच आहात तर आत येऊन बसा ना. म्हणजे बोलता येईल. " असं तिने म्हंटलं आणि पडत्या फळाची आज्ञा मानून ते उठले. तिने लावलेला. सेंट पुन्हा एकदा त्यांना ढवळून गेला. तिच्या अगदी जवळून जात त्यांनी तिच्या अंगाचा आणि सेंटचा वास नाकात भरून घेतला. ही परत भेटणार की नाही याबद्दल ते सांशक होते. आता हिला काय सांगायचं? दरोड्याबद्दल तर बिलकुल बोलायचं नाही असच त्यांनी ठरवलं. उलट तिच्याशी जवळीक कशी साधता येईल त्याचा प्रयत्न त्यांना करावासा वाटला. ते काहीच बोलत नाहीत असे पाहून तिने परत पोलिसांना दरोड्याची माहिती देण्याविषयी त्यांना सांगितलं. पण आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून ते डायनिंग टेबलाजवळील एका खुर्चीत बसले. काही वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. काकांना सारखी सगळं खरं सांगायची उबळ येत होती. तशीही तिने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता ती नेहमीसारखा त्यांना दुजोरा देत नव्हती. खरंतर त्यांना आता जादूच्या कांडीसारखं आयुष्य एकदम बदलावं असं वाटत होतं. म्हणजे त्यांचा गुन्हेगारी जगताशी आलेला संबंध संपुष्टात येईल. तसं पाहिलं तर ते केवळ दुर्दैवाने या परिस्थितीत अडकले होते. यातून सुटकेचा त्यांना पूर्णतया अधिकार होता. लाचेचे पैसे त्यांनी घेतलेच नव्हते. केवळ शिपायाची जबानी आणी तक्रारदाराची जबानी यावर सगळं कुभांड रचलं गेलं होतं. खर सांगितलं तर फार तर ती नाही म्हणेल. का कोण जाणे त्यांना आजचा दिवस निर्णायक वाटत होता. तसा तो प्रत्येक संबंधित व्यक्तीकरता निर्णायकच होता. भले ती दूरान्वये संबंधित असेल. विचारांच्या भोवऱ्यात अचानक तिने प्रश्न विचारला, " तुम्ही काही तरी सांगणार होतात ना....... " मनातल्या काहुराचा भंग झाला. ते म्हणाले, " तसं विशेष काही नाही. प्रश्न परत एकच आहे. आपण एकत्र आयुष्य घालवायला काय हरकत आहे म्हणजे...... "असं म्हणून त्यांनी बोलणं अर्धवट ठेवलं. संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. किशा दादा आता कुठे असेल कुणास ठाऊक. तो एक तर ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये असेल किंवा बँकेत असेल असं त्यांच्या मनात आलं. काकांचा अंदाज खरा होता. किशा आत्ता ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये होता. साधनाला काहीतरी पण उत्तर देणं भाग होतं. ती स्वतःशी म्हणाली आपण समजा यांच्याबरोबर मुंबई सोडून जायचं नाही म्हंटलं तरी लग्न करणं कितपत योग्य ठरेल? हे जर दरोड्याशी संबंधित असतील तर आपली आणि सोनाची त्यांच्याबरोबर किती फरफट होईल काही सांगता येत नाही. यांना आपली एवढी गरज का आहे? तिचा कोणताही निर्णय पक्का होईना. पण एक नक्की होतं की ती पोलिसांना दरोड्याबद्दल सांगणार होती. तिला हे माहीत नव्हतं की दरोडा आजच पडणार आहे. ती उघड उघड एवढंच बोलली, " खरं सांगू का तुम्हाला, मला काहीही ठरवणं अजूनही कठीणच जातय. आपण एक दोन दिवसानी विचार करू. " घाईघाईने काका म्हणाले, " म्हणजे तुझा नकार आहे तर...... " त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला कोणतीही घाई नव्हती. मग त्यांना उठावंस वाटलं. पण ते जाणार कुठे? घरी जाता येत नाही. दोन वाजता रात्री ऑफिसला जायचंय, हे कोणालाही सांगता येत नव्हतं. ते फारच अस्वस्थ झाले. एखाद्या लहान पिशवीत खूपसे कपडे कोंबून भरावेत तशी त्यांची मन:स्थिती झाली. कोणताच कपडा काढता येत नाही आणि भरले तर आणखीन हवेत पण. त्यांची आउटलेटच बंद झाली. त्यांच्या मनात जमलेल्या वाफेचं झांकण उघडता येणं कठीण होतं. बळजबरीने एकेक करून विचार काढणं जरूर होतं. पण समोर साधना पाहत असताना ते करणं कठिण होतं. त्यांनी झटकन विषय बदलला. " अजून जेवण तयार व्हायला वेळ असेल तर मी जरा बाहेर, हॉलमध्ये बसतो. " त्यांना स्वतंत्र विचार करायचा आहे हे तिने ओळखले. मग त्यांना जास्त अस्वस्थ न करता ती म्हणाली, " तासभर तरी लागेल. "........ असं म्हंटल्यावर उठले बाहेर सोफ्यावर जाऊन बसले. कॉर्नर टेबलावरचा निर्जीव घोडा आता त्यांच्याकडे डोळे वटारून पाहत असल्याचा त्यांना भास झाला. किंबहुना त्यांनी लवकरा लवकरात लवकर जावं असंच तो सुचवीत असावा. त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. घरातल्या निर्जीव वस्तूंना पण वातावरणाचा अंदाज येत असावा. ते डोक्यावर हात आडवा ठेवून सोफ्यावर पडून राहिले. नीताला जरी आवडत नसलं, तरी साधनाने त्या बाबत कधी हरकत घेतली नव्हती.

इथे जेवल्यावर आपण कुठे जाणार आहोत? लवकर निघालं, तर घरी जावं लागेल, मग पुन्हा दोन वाजता बाहेर पडता येणार नाही. उशिरा निघालं तर कुठे जातोय हे सांगावं लागेल. चुपचाप निघालो तर साधनाला आवडणार नाही. पण त्यांनी चुपचाप निघण्याच ठरवलं. तशीही साधना त्यांच्या आयुष्यात आता येईल किंवा नाही याबाबत ते चांगलेच सांशक होते. मग काहीतरी करायचं म्हणून ते सोनाच्या खोलीत डोकावले. ती गाढ झोपेत होती. ती अश्या भलत्याच वेळी कशी झोपली . त्यांना ते आवडलं नाही. ते तिच्याजवळ बसले तिच्या डोक्यावरून हात फिरवताना त्यांना एकदम निलूची आठवण झाली. निलू लहानपणी कशी आपल्याशिवाय झोपायचीच नाही. तिची घट्ट मिठी त्यांना आठवली. मग ते जरा सोनाजवळच लवंडले. त्यांनाही झोपावंस वाटलं. त्यांनी डोळे मिटले, पण पुढच्याच क्षणी सोनाने त्यांना घट्ट मिठी मारली. जवळ जवळ अर्धा पाऊण तास झाला. अचानक त्यांना काहीतरी धपकन कुठेतरी दूर काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणती तरी जड वस्तू पडली असावी. त्यांना त्याचा अंदाज येईना. तर आठ वाजून गेले होते. अजून साधनाचा स्वयंपाक झाला नव्हता. एवढं ही काय करत्ये? त्यांच्या मनात आलं. सोनाची मिठी सोडवून ते आत गेले. पुन्हा एकदा खुर्चीत बसले. साधनाला अंदाज आला. मन शांत झालेलं दिसतय. साधनाने प्रथम सोनाला उठवलं. मग जेवणाची तयारी करुन ते तिचेही जेवायला बसले. कोणीतरी काहीतरी बोलावं अस दोघांना वाटत होतं. पण कोणीच काही बोलेना. मग सोनानेच शांततेचा भंग करीत विचारले, " काका आज तुम्ही इथेच राहणार ना? " ते मानेनेच हो म्हणाले. त्यांना भीती वाटली आपण प्रकट उत्तर दिलं आणि भलत्याच विषयाला तोंड फुटलं तर...... ‍ जेवणं तर झाली. ते पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. हिला आपल्याशी बोलायचंच नाही. आपल्यालाही इथे येणं भाग होतं. तासभर असाच गेला. साधनालाही अस्वस्थता आली. संवाद साधायचाय पण कसा, तिला कळेना. साडेनऊ वाजायला आले. तिने अंथरूणं घातली. ती आज सोनाजवळ झोपली. काकांना आतल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. तेवढाच संवाद...... पोलिसांना आपण केव्हा सांगणार? तिला कळेना. आपल्याला तरी काय करायचंय, दरोडा पडतोय तर आपण तरी काय करणार आहोत. तेच तेच विचार तिला कंटाळा आणू लागले. एक माणूस आपल्या घरात आहे आणि आपण बोलायलाही तयार नाही. हे बरोबर नाही. काहीतरी निमित्त काढून ती आतल्या बेडरूममध्ये आली. पडदे सरकवण्याच्या मिषाने पण काकांना ऐकू जाईल असं ती स्वतःशी म्हणाली, " केवढा पाऊस लागलाय? " काकाही जागे होते. ते म्हणाले, " साधना तुला पुढचं आयुष्य एकटीनेच काढण्यात रस आहे का?, विचार कर. मला, मुलगा सून आहेत पण असून नसल्यासारखी. तुला नातेवाईक नाहीतच. मग तू उरलेलं आयुष्य कसं काढणार? सोनाचं कधीतरी पण लग्न होईलच. आपण एकत्र आलो तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील...... " असं म्हणून ते तिच्या जवळ आले. ती विचारात गढलेली पाहून त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. हळूहळू त्यांनी तिला आपल्याकडे वळवली आणी तिला आपल्या जवळ घेत म्हणाले, " थोडं रिस्क आहे, पण त्याशिवाय सुख कसं मिळणार? अजून आपल्या अंगात जोर आहे पुष्कळ गोष्टी करता येतील. " तिच्या अंगाचा वास घेत ते तिच्यावर झुकले आणि तिला मिठीत घेत त्यांनी तिच्या गालावर ओठ टेकले. तीही विचार करून दमली असल्याने त्यांना आपोआपच प्रतिसाद देऊ लागली. तिला घेऊन मग ते बिछान्यावर बसले. पुढचे काही क्षण तरी त्यांचे धुंदीत गेले. जरा वेळाने भानावर येत ती म्हणाली, " तरीसुद्धा मला विचार करायला हवा. " काकांनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. अजून हिचं जसं आहे तसच आहे तर. ते स्वतःशी म्हणाले " शी इज डिफिकल्ट टु कन्व्हिन्स ". नंतर साधना झोपायला गेली. दहा वाजले. काका बिछान्याकडे वळले, पण डोक्यात अनिश्चितता घेऊनच. झोपायचं म्हंटलं तरी थोडीशी तरी स्वस्थता लागते. दोन वाजेपर्यंत ऑफिसला जायचं म्हणजे साडेबारा एकला तरी जायला पाहिजे. बस मिळाली तर बरी नाहीतर लोकल किंवा टॅक्सीने जाणेच ठीक राहील. दहा म्हणजे काही त्यांची झोपायची वेळ नव्हती. खरंतर त्यांची कोणतीच वेळ झोपायची नव्हती. तुरुंगात नऊ साडेनऊ म्हणजे झोपायची वेळ. घरी रोहिणी असताना प्रेमालाप करून झोपेपर्यंत त्यांना एक वाजून जाई. पण तिथे रोहिणी होती. भलेही दुसऱ्या दिवशी जळजळत्या डोळ्यांनी ऑफिसला जावं लागलं तरी त्यांना चालायचं. जाताना घालण्याचे कपडे त्यांनी जवळच ठेवले होते. साधनाला न सांगताच जायचं असल्याने त्यांनी बूट दरवाज्याबाहेर पडल्यावरच घालायचे ठरवले. नुसतं तळमळतच वेळ काढावा लागल्याने त्यांना साडे अकरा वाजायच्या सुमारास अचानक झोपेने घेरले. मोबाइलवर गजर लावला असता तर साधना उठली असती. ते दर अर्ध्या तासांनी आत्तापर्यंत उठले होते. पण अचानक लागलेल्या झोपेने ते गाफील राहिले. त्यांना एकदम घड्याळातल्या साडेबाराच्या ठोक्याने आणि लगेचच आलेल्या गोळीबाराच्या आवाजाने अर्धवट जाग आली. ते ताडकन उठले. दबल्या पावलांनी त्यांनी पुढचे दार उघडले. कॉरिडॉरमध्ये जाऊन त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण काहीच ऐकू आले नाही. मग ते मागे वळले. त्यांनी बूट घातले आणि सावकाश आवाज न करता ते बाहेर पडले. कितीही सावकाश दार लावायचा प्रयत्न केला तरी रात्रीच्या शांत वातावरणात सेफ्टी लॅचचा खटकन आवाज झाला. ते थोडावेळ थांबले. साधना उठली तर काहीतरी फालतू कारण सांगून परत आत शिरून झोपायचं. पण तसं काही झालं नाही. ते जिन्यानेच खाली आले. ताराबाईंच्या फ्लॅटकडे त्यांची नजर गेली. आत्ता कुलूप दिसत नव्हतं. ते तिथे रेंगाळलेच नाही. तसेच ते तळमजल्यावर जाणाऱ्या जिन्याने उतरू लागले. त्यांचं लक्ष सहज म्हणून मुख्य गेटजवळ गेले. तिथे पोलिसांची गाडी पाहून ते थोडे बावचळले. पण जसं काही पाहिलंच नाही अशा रितीने ते गेटमधून बाहेर पडले. तिथले पोलिस गोळीबाराच्या दिशेने निघून गेल्याने काकांना जाणं सोपं झालं. ते अंधारलेल्या भागातून जात होते. आता त्यांनी टॅक्सी पकडण्याचं ठरवलं. पण मिळाली पाहिजे ना. रस्त्याने एखाद दुसरी टॅक्सी जात होती. पण अशा आडवेळी वाहतूक अशी नव्हतीच. शिवाय पावसाला कसलं एवढं उधाण आलं होतं कोण जाणे. तेवढ्यात एक टॅक्सी त्यांच्याजवळ येऊन थांबली. आतून दोन चार तरूण मुलांचा अचकट विचकट आवाज येत होता. त्यांनी काकांना विचारलं. " ए बुढ्ढे, चलता है क्या रांड बझार? तेरेको पागल बना देगा. " आतले प्यायलेले होते. काकांनी पण एक जबरदस्त शिवी हासडून " चल चल.... म्हंटलं. पण ते "डरता है स्साला. " असं म्हणून निघून गेले. काकांना या वेळेला बाहेर पडण्याचा पश्चात्ताप झाला. नाही गेलो तर दादा काय करणार आहे? पण आपण कोणत्या लोकांच्या संगतीत आहोत याची जाणीव होऊन त्यांनी थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्याला विचारले त्यावर तो म्हणाला, " डबल भाडा लगेगा. चलना है तो चल, नही तो मेरेको सोने दे., ये साला सोनेका टाइम है. आजकल तुम्हारे जैसे बुढ्ढे लोगही राडबझार ज्यादा जाते है. " तरीही काकांनी स्वतःवर ताबा ठेवला व म्हणाले, " ठीक है, चल जलदी. "

********************** ********************** ************************ ************

इन्स्पे. डावलेंना सर्च वॉरंट तर मिळालं. पण ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये काय सापडणार? फक्त एखादा सुगावा अथवा लहानसा पुरावा. म्हातारी तर सापडणार नाही ना. तरीही त्यांनी फाइल परत परत वाचली. श्रीकांत सरांची टिपणं वाचून त्यांना लक्षात आलं की खबऱ्याने दोन तीन वेळा तरी किशा बँकेवर दरोडा घालण्याच्या तयारीत आहे हे सांगितलं होतं. . पण मग त्यांनी हे सगळं खंडागळे साहेबांना का नाही सांगितलं, त्यांचा स्वभाव डावलेंना माहीत होता. कदाचित त्यांनी ऐकलं नसतं अस सरांना वाटलं असावं. किंवा तशी संधी त्यांना मिळाली नसावी. सगळी सूत्रं कटिल वकिलाच्या ऑफिसमधून हालतात असं दिसतंय. त्यांनी संध्याकाळी साडेसहाला सर्च घेण्यासाठी पार्टी तयार केली. नेटके, देखणे, हजारे, बेंजामिन आणि दोन तीन कॉन्स्टेबल्स व बरोबर कुलूप उघडणारा इब्राहिमही घेतला होता . त्याला असंच अनाधिकृतपणे बरोबर घेतलं जायचं. असा टॅलेंट असलेला माणूस खात्यात तरी नव्हता. डावलेंना त्याची खंत होती, (पण सरकारी नोकरीत डोकं घरी ठेवूनच काम करावं लागतं. )तसं शासनाला कळवलंही होतं. पण असा तज्ज्ञ माणूस मिळणं, तोही शासनाकडून म्हणजे कर्मकठीण काम. इब्राहिम विश्वासू होता. खात्याच्या कामाला तो कधी नाही म्हणत नसे. त्याची तक्रार फक्त पैशाची पण तीही सुरुवातीला होती. पुढे पुढे त्याने तक्रार करणं बंद केलं. इब्राहिम दिसायला तसा काही खास नव्हता. पण त्याची बोटं मात्र नाजुक आणि स्त्रियांसारखी होती. ते सगळा तांडा घेऊन निघणार एवढ्यात त्यांना फोन आला. श्रीकांतसरांनीच फोन केला होता. रेडच्या कामातून वेळ काढून कोणाला कळणार नाही अशा रीतीने त्यांनी फोन केला. त्यांनी ताबडतोब कटीलच्या ऑफिसवर रेड करावी असं सांगितलं. तिथे सखाराम असणार असं ते म्हणाले. जर तिथे नसेल तरी निदान रिपोर्ट करताना कारवाई काय केली हे लिहिता येईल. फोन बंद झाला. डावलेंनी विचार केला, जिथलं वॉरंट आहे तिथे काहीही सापडण्याची शक्यता नाही आणि जिथे वॉरंट नाही तिथे नक्कीच काहीतरी सापडेल. पण वास्तव विचित्र होते. वॉरंट असो वा नसोदोन्हीकडे काही ना काही तरी सापडणारच होते. अर्थातच हे त्यांना कसं माहीत असणार ? ते लवकरच सगळ्यांना घेऊन कटीलच्याऑफिसच्या समोरच्या फुटपाथावर पोहोचले. सगळेच साध्या कपड्यात होते. ड्रायव्हरने गाडी लावली. फुटपाथवर सगळेच वेगवेगळे उभेराहिले. सगळ्यांचीच नजर ऑफिसच्या मुख्य दरवाज्यावर होती. आत लाइट दिसत होता. आणि बाहेर एक पांढरी स्कोर्पियो उभी होती. अजून काहीही हालचाल नव्हती. जवळ जवळ पंधरा वीस मिनिटं गेली. आत जावं तर कसं जावं आणि एकूण सगळंच काम कसं साधावं याचा ते विचार करीत होते. त्यांनी तश्या अनेक रेड्स आजपर्यंत केल्या होत्या. पण प्रत्येक वेळी त्यांची छाती धडकली होती. आत्त्ताही तसंच काहीसं फिलिंग होतं. पण ही स्थिती चांगली असते . अतिआत्मविश्वासाची स्थिती मात्र धोकादायक असते असं श्रीकांतसर म्हणत,त्यावर डावेलंचा विश्वास होता. मग त्यांना अचानक दरवाजा उघडलेला दिसला. आतून किशा बाहेर आला होता. त्याच्या हातात काही सामान होतं. त्यांनीत्याला ओळखला. म्हणजे हा कुठेतरी बाहेर निघालाय तर. बरं झालं.आपल्या मार्गातली एक अडचण आपोआपच दूर झाली. खरंतर त्यालाचपुढे होऊन उचलायला हवा होता. पण त्यांच्याजवळ वॉरंट नव्हतं आणि सखाराम मिळेल याची खात्री नव्हती. त्यांनी इथेच चूक केली.संशयाखाली त्याला ताब्यात घेता आला असता. ....... उलट , रेडला गेल्यावर लगेच आत न घुसण्याची त्यांची पद्धत होती. म्हणजे काही घडायचे असेल तर घडून जाते आणि आपल्या आराखड्याप्रमाणे रेड यशस्वी होते असा त्यांचा अनुभव होता. ..... किशा गाडीत बसला .स्कॉर्पियो निघाली आणि त्यांच्या विरुद्ध दिशेकडे वळली. प्रथम ते, नेटके , देखणे आणि इब्राहिम असे चौघेच दरवाज्याशी आले. त्याबरोबर समोर बसणारा म्हातारा म्हणाला, " अरे साब अभी तो बडा साब बाहर गया. आप अब कल आओ. " त्यावर डावले म्हणाले, " चाचा तुम अपनेकाम पर ध्यान दो " . म्हाताऱ्याने जाने दो अशा अर्थी हात हवेत उडवले. पण त्याला शंका आली ,कही ये पुलिस तो नही ? पण त्याच्या जवळ दादाचा नंबर नव्हता. आणि करायला फोनही. तो फक्त बघत बसला. या सर्व प्रकाराचं निरीक्षण करणारा आणखी एक माणूस होता. तो म्हणजे "काण्या " त्याला आलेला अंदाज त्याने ताबडतोब सूर्याला कळवण्यासाठी फोन केला. पण सूर्याचा फोन बंद होता. आणि त्याला किक्लालाहीआणायला जायचं होतं. तरीही त्याने नंतर परत प्रयत्न करण्याचे ठरवले. जिथे होत तिथेच तो मुद्दाम उभा राहिला. पूर्ण माहिती काढावी आणि मगच फोन करावा.
डावलेसाहेबांनी कुलुपाचं निरीक्षण केलं, त्त्यांच्या लक्षात आलं की हे कुलूप साधं नाही किंवा हा सेफ्टी लॅचही नाही. सबंध दरवाजा त्यांनी काळजीपूर्वक न्याहाळला. नेटकेही चौकस नजरेने बघत होते. कोठेही कुलुपाचं काही निशाण सापडलं नाही. आता हे उघडावं कसं, हा प्रश्न निर्माण झाला. मग इब्राहिमने आपली सराईत नजर फिरवली. त्याला काचेच्या एका नक्षीदार डिझाइनमध्ये एक लहानसा खाच्या दिसला. त्याने हात लावल्यावर आत कोठेतरी बारीक घंटी किणकिणू लागली. त्याने परत हात लावल्यावर तिचा आवाज वाढत गेला. त्याला असल्या कुलुपांचा अनुभव नव्हता. त्याने डावलेंना खूण केली. मग त्या तिघांनी परत एकदा पाहून घेतलं. आतली बेल आता बंद झाली होती. कदाचित वेळेशी निगडित तिचा आवाज येत असणार. कदाचित एक मिनिट, अर्धा मिनिट, दोन मिनिटं, वगैरे. कुलुपाचा पत्ता नाही. डावले एकदम अस्वस्थ झाले. आता काय करायचं.......? अगदी ऐन वेळेला हे असं काही घडण्याची शक्यता त्यांनी विचारात घेतली नव्हती. कुलूप म्हंटलं की इब्राहिम आणि इब्राहिम म्हंटलं की कुलूप. असा गाढा विश्वास होता. मग त्या चौघांना आपण इथे प्रथम येण्यात चूक केली की काय असं वाटू लागलं. बाहेर पावसाळी वारा होता. पण त्यांना मात्र घाम फुटू लागला. त्यांनी नेटक्यांना खूण केली. परत नेटक्यांनी निरीक्षण केले. ते इलेक्ट्रॉनिक्स मधले पदवीधर होते. पण प्रत्यक्ष काम करणं आणि पदवी पर्यंतचे ज्ञान असणं यात फरक होता. त्यांना दाट शंका होती, की कुठेतरी लपलेली एखादी तरी कळ असणार, पण शोधणार कसं? मग त्यांना एकाएकी आठवलं. प्रोफेसरच्या एका लेक्चरमध्ये त्याने साधारणपणे कुठे कुठे कळ लपवता येते अशी जवळ जवळ तीस पस्तीस उदाहारणं सांगितली होती. आणि जर कुठेच कळ मिळाली नाही तर ती दरवाज्याच्या चौकटीच्या बाहेर आजूबाजूच्या जमिनीत किंवा एखाद्या कार्पेट खाली दडवलेली असण्याची शक्यता असते. पण नक्की तसंच असेल हे सांगता येत नाही. कारण अशी कळ ही फक्त मालकालाच माहीत असते. म्हणून ते आजूबाजूचं फ्लोअरिंग, भिंतीच्या कडा, कोपरे, वगैरे न्याहाळू लागले. पायाखालचे कार्पेट त्यांनी खाली पाहण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केला आणि खटकन दरवाज्या उघडला. आलेले ते चौघे कठीण गणिताचं उत्तर सापडावं तसे आ वासून उघड्या दरवाज्याकडे पाहू लागले . ................ मग मात्र नेटके म्हणाले," लवकर. लवकर आत शिरा आणि बाहेर उभ्या असलेल्यांना इशारा करा. म्हणजे सगळेच आत येतील . मात्र आता उघड्या दरवाज्याला अडसर लावून , कोणाला तरी इथे बसवून सर्च करावा नाहीतर ते परतबंद झालं तर आपल्याला आतच राहावं लागेल. कारण आतली दरवाज्या उघडण्याची यंत्रणा कुठे बसवलेली आहे ते पाहण्यात वेळ घालवणं ठीक होणार नाही. आपल्याला नंतर दुसरी रेड करायची आहे हे लक्षात ठेवायला हवं. " डावलेंना आता हा अचानक दरवाज्या उघडल्याचा शुभशकुन वाटला, म्हणजे सखाराम इथे नक्की सापडणार. त्यांनी नेटकेंच्या पाठीवर थाप मारली. आत सगळेच शिरल्यावर प्रथम त्यांनी सगळे कोनेकोपरे शोधले. पण कुठेच काही सापडले नाही. की कोणतीही छुपी जागा सापडली नाही, जिथे एखाद्याला ठेवता येईल. जणू काही ते एखाद्या रंडीखान्यावर रेड घालीत होते अशा रीतीने ते तपासीत होते. मग आतल्या केबिनमध्ये पिस्तूल रोखून पोझिशन घेत ते आत शिरले. त्यांना जरा आशा वाटली. परत एकदा सूक्ष्म शोधाशोध झाली पण त्या लांबट खोलीच्या कोणत्याच कोपऱ्यात किंवा भिंतीत काही सुगावा लागला नाही. आतली सगळी कपाटं, सूर्याचं टेबल, संशयाने पाहत त्यांनी तपासली. एक पिस्तूल मात्र सूर्याच्या टेबलमध्ये मिळालं. मोठा फ्रीज होता पण त्यांना तो उघडून पाहावासा वाटला नाही. नाहीतर तिथेच त्यांना बरेच माग लागले असते. डावले आता कंटाळले. नाही म्हंटलं तरी दिड एक तास फुकट गेला होता. काही सापडलं असतं तर फुकट गेल्यासारखा वाटला नसता. सखाराम मिळण्याची शक्यता फक्तशक्यताच राहते की काय असे त्यांना वाटू लागले. ते निराशेने सुर्याच्या खुर्चीत बसले आणि म्हणाले, " इथे सखाराम सापडला नाही तर मग तो कुठे असेल? बेंजामिन म्हणाला, " मला वाटतं सर, आपण बाहेरच्या हॉलमध्ये पुन्हा एकदा शोधून पाहू. " डावलेंना ते पटलं नाही. परत परत काय तिकडेच बघायचं? म्ह्णून त्यांनी नकार दिला.....अचानक त्यांना कार्पेट उचलून पाहावंसं वाटलं. शेवटचा मार्ग म्हणून तोही त्यांनी चोखाळला. हळूहळू कार्पेट गुंडाळलं जाऊ लागलं. खोलीच्या मध्यापर्यंत ते आले. पण कार्पेट खालचा कोबा त्यांच्याकडे निर्विकार पणे पाहू लागला. त्यावरचं उत्तम डिझाइनही त्यांच्या डोक्यात जाऊ लागलं. एरवी ते कलात्मक दृष्टीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी खात्यात येण्यापूर्वी कमर्शियल आर्टिस्टचा कोर्स एका खासगी संस्थेतून हौस म्हणून केला होता. ते दुसऱ्या बाजूने कार्पेट गुंडाळण्यासाठी वळले

इथे पुन्हा नेटकेंचं ट्रेनिंग कामी आलं. त्यांना असं शिकवल्याचं आठवत होतं. की कुठेच काही सापडलं नाही तर जमिनीला कान लावून पाहावा. त्यांनी ते सांगितलं पण डावलेंना ते पटेना. सगळ्याच गोष्टी ट्रेनिंगमधल्या उपयोगी पडतील असं थोडंच आहे. हे प्रत्येकाचे अनुभवाने बांधलेले अंदाज असतात. आणि प्रत्येकाचे अनुभव निराळे असतात. दुसऱ्या बाजूने कार्पेट गुंडाळायला सुरुवात झाली. पण नेटके तसे सोडणार थोडेच होते. ते केबिनच्या दरवाज्यापासून जमिनीला कान लावीत पुढे सरकत होते. अजून तरी त्यांना जमिनीखालचा एकही आवाज येत नव्हता. ते अशा रितीने मध्यावर आले. जिथे कार्पेटखाली भुयारात जाण्याचा मार्ग होता. आतून सखाराम हताशपणाने ओरडत होता, " अरे कोणी आहे का वर? अरे बोला ना रे. अरे मला बाहेर काढा रे...... " असं म्हणून तो रडू लागला. लहान मुलासारखं त्याने शेवटी भोकाड पसरलं. मग तो विव्हळत भेसूर आवाजात रडू लागला. त्याची चिकाटी आता संपली होती. काल रात्रीपासून आत असेपर्यंत त्याच्या पोटात दारूच काय पाण्याचा थेंबही नव्हता. खाणं जेवणं तर बाजूलाच राहिलं होतं. आता त्याने आपले गुडधे वर घेतले होते आणि त्यावर तो बांधलेले हात धरून बसला होता. खालचे रडण्याचे आवाज नेटकेंना लांंबून येणाऱ्या आवाजांसारखे ऐकू आले. ते उत्साहित होऊन डावेलेंकडे पाहू लागले. "सर आत नक्कीच कोणीतरी आहे. मला रडण्याचा आवाज येतोय. या, तुम्ही एकदा खात्री करून घ्या. " डावले अनिच्छेनेच जागेवरून उठले. हा स्वतःला शेरलॉक होम्स समजतो की काय असे स्वतःची पुटपुटत ते पुढे झाले. त्यांनीही कान लावून पाहिला. प्रथम त्यांना काहीच ऐकू आलं नाही. त्यांनी नेटकेंकडे प्रश्नार्थक मुद्रा करून पाहिले. पण त्यांनी त्यांना जरा जास्त वेळ कान लावायला सांगितले. मग मात्र काही सेकंदानी डावलेंना रडण्याचा आवाज ऐकू आला. नक्कीच आत कोणीतरी होतं. सखाराम असेल तर बरं होईल. नाही तर जो कोणी असेल त्याच्याकडून माहिती तर नक्कीच मिळेल. मग त्या दोघांनी जमिनीवर हात आपटून पाहिलं. जर आत कोणी असेल तर त्यांना नक्कीच प्रतिसाद मिळेल. थोडावेळ गेल्यावर आतूनही हाताने केलेला आवाज दोघांनी ऐकला. मग मात्र ते थांबले नाहीत बाकीच्यांना बोलावून कार्पेट खालचा कोबा तपासायला सुरुवात केली. इब्राहिमला असल्या गोष्टी बरोबर माहीत होत्या. सगळ्या नक्षीकामावर हात काळजीपूर्वक फिरवून त्याने पाहिलं. पण कोठेच काही हाती लागेना आता त्याने इंचन इंच दाब देऊन तपासायला सुरुवात केली. साधारण वीस एक मिनिटांच्या प्रयत्ना नंतर त्याचा हात एका नक्षीचा रंग जिथे गडद होता. त्याच्यावर पडला. हाताला खाच लागली. आणि खाचेतली स्प्रिंग बसवलेली कळ ही लागली. त्याने इशारा करून त्यांना खात्री करून घेण्यास सांगितले. मग नक्की ठरल्यावर वरच्या बाजूवर असलेले सगळे बाजूला झाले. विरुद्ध दिशेला उभं राहून इब्राहिमने जोरात कळ दाबली. त्याबरोबर करकर आवाज करीत कोबा उचलला गेला. आणि खाली उतरण्याचा मार्ग दिसू लागला. आत सर्च लाइट टाकल्यावर त्यांना पायरीवर बसलेला माणूस दिसला. त्यालाही आश्चर्य वाटलं. सगळ्याच्याच हातात पिस्तुलं होती. दुसरा कोणी असेल तर कव्हर केलेलं बरं. पण नेटकेंनी हात दिलेला माणूस सखाराम निघाला. त्याला उचलून बाहेर काढण्यात यश आलं पण बाहेर आल्यावर त्याची शुद्ध हरपली. उपाशी पोटी आणि पाण्याशिवाय काही तास राहणं सोपं नव्हतं. मग मात्र ऍम्बुलन्स बोलावून प्रथम त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये हालवण्यासाठी डावलेंनी सूचना दिल्या. बेंजामिन आणि इतर एक दोघे बरोबर गेले. आता मात्र खाली काय आहे , शोधणं जरूर होतं........

डावलेंनी एकवार घड्याळाकडे पाहिलं. साडेअकरा वाजून गेले होते. म्हणजे आपल्याला इथे येऊन तीन साडेतीन तास होऊन गेले होते. अजून ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये जायचं होतं. खरंतर तेही कंटाळले होते. पण ड्यूटी इज ड्यूटी. सकाळी दहा वाजल्यापासून घर सोडलेल्या डावल्यांना कंटाळा येणं साहजिक होतं. पण टीका करताना पोलिसांचे हे कष्ट कोणी पाहत नाहीत हेच खरं. त्यांना आवरायला बराच वेळ लागला होता. त्यांनी मग बाहेर येऊन मुख्य दरवाजा सील केला. सीलचा फारसा उपयोग नव्हताच. कुलूप लावून सील करण शक्यच नव्हतं. त्यासाठी कडी कोयंडा असावा लागतो. नंतर रेडिंग पार्टी तडक ताराबाईंच्या फ्लॅटकडे निघाली. . पण त्यांना समाधान होतं की त्यांच्या हातून सखाराम सापडला होता.

ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये असलेल्या सगळ्यांनाच इतक्यात बँकेत उतरायची घाई नव्हती. दादा तो नऊ बजे आयेगा. असं सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे ते निर्धास्त होते. फक्त बंद घरात बसावं लागत होतं. पण त्याची त्या सगळ्यांनाच जेलमध्ये जाऊन आल्यामुळे सवय होती. खिडक्या उघडण्याची सोय नव्हती. जरी पावसाची काळोखी होती, तरी उघड्या खिडकीमुळे संशय आला असता. त्या सगळ्यांनीच मग आणलेले जेवण जेवून घेतले. परत जेवण केव्हा मिळेल याची त्यांना खात्री नव्हती. फार कशाला उद्या आपण जागेवर राहणार की नाही याचीही त्यांना खात्री नव्हती. तसे सगळे त्यांच्या कामात वाकबगार होते. उद्या आपण मालामाल होणार हे एकच स्वप्न त्यांच्या डोक्यात होतं. अशातच अचानक दरवाज्याच्या कुलुपात किल्ली फिरल्याचा आवाज झाला. अकड्याने आणि इतरांनीही आपापले घोडे दाराच्या दिशेने वळवले. अगदी पोलीस जरी असतील तरी गोळीबार करीत बाहेर पडायचं , याची त्यांना पूर्वीपासून सवय होती. तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्यांपैकी ते होते. फक्त त्यांचं क्षेत्र चुकलेलं होतं, इतकंच . दरवाजा उघडून दादा आत आला आणि परत दरवाज्याला कुलूप लागलं. सगळे स्तंभितच झाले. धीर करून अकडा म्हणाला, " आप तो नऊ बजे आनेवाले थे, इसलिये हम लोग ऐसेही बैठे थे. " मग दादाने त्याला आलेली शंका बोलून दाखवली. तशी सूर्याची इमानदारी उफाळून आली आणि तो म्हणाला, " ऐसी हालतमे मै माल लेके ऑफिस चला जाउंगा, आप फिकीर नही करना. " आणि पुढच्याच क्षणी त्याला बोलल्याचा पश्चात्ताप झाला. आपण विनाकारण जबाबदारी घेतली. आपल्याला तर दादाला संपवायचय. मग दादाने त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हंटले" यही तो मै चाहता था. " बाहेर पावसाला विजा चमकून सुरुवात झाली. रस्त्यावरची रहदारी पण त्यात भर टाकीत होती. मग त्यांनी दरोड्याचा श्रीगणेशा केला. त्यांच्या सुदैवाने दोन वॉचमन पैकी एक जेवायला बसला होता. दुसरा फेऱ्या मारीत होता. एवढ्या आवाजात त्यांच्यातल्याच दोघांनी मिळून घण उचलला आणि कोरलेल्या स्लॅबवर मारला. आधीच कोरून ठेवलेल्या स्लॅबला त्यांनी इतके दिवसात कडांना अशा रीतीने भोके पाडली होती की त्यातून दोरखंड घालून पडणारा स्लॅब प्रथम दोरखंड सांभाळतील मग आस्ते आस्ते दोरखंड खाली सोडतील . म्हणजे फार मोठा आवाज येणार नाही. तरीही धपकन पडल्याचा आवाज झालाच . फिरणाऱ्या वॉचमनला ते ऐकू आलं नाही तरी जेवणाऱ्याला ऐकू आलं. अंदर कुछ तो गिर गया. असं म्हणत त्याने जेवण अर्धवट टाकून फिरणाऱ्याला गाठले. पण तो म्हणाला , " तू सपनेमे है. खाना पूरा कर ले. जा. " पण त्याचं समाधान होईना. त्याने कसेतरी जेवण पुरे केले. आणि तो बॅकेच्या बंद दरवाज्याला कान लावून ऐकू लागला. त्याला खरंतर कुलूप उघडून आत जाण्याची इच्छा होती. पण कुलूप सील केलेलं होतं. पण नंतर काहीच ऐकू न आल्याने परत फिरला. खरंतर आवाज आणखीही दोघांनी ऐकला होता. त्यातले एक काका होते आणि दुसरे साठेमामा. पण साठेमामा फसले. त्यांना आवाज ऐकू आला तरी दुरून यावा तसा आला. पावसाचा आणि वाहतुकीचा आवाजही भरपूर होता. त्यामुळे एखाद्या मोटरने दुसऱ्या मोटारीला ठोकले असावे असे त्यांना वाटले. पण बाहेर येऊन खात्री करून घेणार नाहीत , मग साठे कसले. ते धावतच बाहेर आले . त्यांच्या मजल्यावर त्यांनि इकडे तिकडे पाहिले. पण काही दिसले नाही , की दुसरे कोणीही बाहेर आले नाहीत. तरीही ते धावत जिन्यावरून खाली रस्त्यावर आले. तो त्यांना वॉचमन बँकेच्या दरवाज्याला कान लावून ऐकत असल्यासारखा वाटला. म्हणून ते तिकडे गेले. पण विचारणा करण्याआधीच वॉचमन निघून गेला. ते हात चोळीत बसले. मग त्यांनी रस्त्यावर येऊन पाहिले. पावसाचा जोर चांगलाच होता. आणि वाहतुकीचाही. कोठेही नजर फिरवूनही काही दिसेना तेव्हाच ते लिफ्टने वर गेले. काकांना कळायला जरा वेळ लागला. कारण ते साधना कोणताच प्रतिसाद देत नसल्याने निराशेत बुडले होते. पण भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं , काय झालं असावं. मीटिंगमध्ये सगळं ऐकल्यामुळे असेल . तसे ते हुशार होते. त्याने ते शहारले.

आलेले सगळेच जण तोंडाला मुखवटे लावून डोक्यावर हॅट लाइट्स घालून बँकेत एकेक करीत उतरले. वर फक्त अकडा होता. जर काही दगाफटका झालाच तर त्याने खालच्या लोकांना विशिष्ट शीळ घालून कळवायचे होते. म्हणजे सगळेच पळण्यासाठी सज्ज राहतील. दादाने जीवनदानला साडेनऊ दहाच्या सुमारास फोन करून कळवण्याचे ठरवले होते. काही विपरित घडलेच तर फक्त मिसकॉल येईल. मग त्याने अक्कल हुशारीने सगळ्यांची सुटका करायची होती. दादाला आता घाई झाली होती. पंधरा नंबरचा लॉकर कधी एकदा उघडतो आणि त्यात काय आहे ते पाहतो. पण प्रथम सुरुवात करायची म्हणून त्यांनी अगदी लहानसा लॉकर प्रथम उघडायला सांगितलं. रमजान पुढे झाला. त्याच्याजवळ मास्टर की सारखं काहीतरी हत्यार होतं. ते त्याने किल्लीच्या जागेत घालून एक जोरदार झटका दिला. पण लॉक जरादेखील हाललं नाही. आता मात्र त्याला घाम आला. दादा आणि तो यांचेच हॅट लाइट्स चालू होते. दादाने त्याचा आक्रसलेला चेहरा पाहिला. पण तो काही बोलला नाही. हे होण्याची शक्यता धरलेली होती. रमजान मात्र परत प्रयत्न करू लागला. आता त्याने एका हाताने लॉकरची कड त्याच्याकडील असल्या कामांसाठी खास बनवलेल्या स्क्रू ड्रायव्हरने दाबून धरली. आणी दुसऱ्या हाताने मास्टर की किल्लीच्या भोकात घालून जोर लावला. "खट ... ‌..... ऽ " असा आवाज करीत लॉकरचे दार उघडले. त्याबरोबर त्याच्या तोंडावर समाधान झळकले . मग दबक्या आवाजात दादा म्हणाला, " अगर एक लॉकरको इतना टाइम लगाओगे तो दो दिन यही रहना पडेगा. एकही झटकेमे जितने लॉकर खुलते है , उतने खोलते जा. " असं म्हणून त्या बोळवंडीसारख्या जागेत दादाने हात घातला. आतून हातात सोन्याचे दहा बारा प्रकारचे दागिने निघाले. चमकणारा धातू पाहून सगळ्यांचेच डोळे चमकले. साडेआठ वाजले होते. आता रमजानने दुसरे चार पाच लॉकर उघडून ठेवले. मग दादाने सर्वांना खुणाकरून बरोबर आणलेल्या जाड प्लास्टीक पिशव्यामध्ये आतला माल भरायला सांगितले. मिस्चिफ सोडून उरलेले सगळे त्याच कामाला लागले. नंतर एक मोठा लॉकर उघडला. त्यातला माल काढण्यासाठी त्याने सूर्याला सांगितले. त्याला पंधरा नंबरचा लॉकर उघडताना सूर्या मागे नको होता. त्याने रमजान बरोबर जाऊन पंधरा नंबरचा लॉकर शोधला. तो मागच्या एका लॉकरच्या कॅबिनेटमध्ये होता. तो एक मध्यम आकाराचा लॉकर होता. त्याचं लॉक तोडायला रमजानला अशीच पंधरावीस मिनिटं लागली. पण एकदाचा उघडला. प्रथम चांगल्या पैकी सुगंध आला. त्याने उत्सुकतेने हॅट लाइट लावून आत पाहिले. .....आत काही कागदांची भेंडोळी होती . एक सीडी , काही फोटोंच्या निगेटिव्हज , शंभर यूरोंच्या नोटांच्या शंभर नोटा एका लहानशा पिशवीत होत्याआणि एक चंचीसारखी लहानशी पिशवी . त्यात अत्तराच्या बाटल्या होत्या. पण लहान लहान दगडांसारखा आवाज येत होता. अत्तराऐवजी दगड ? ...... दादा चक्रावला. यासाठी किक्लाने आपल्याला पंधरा नंबर लॉकर तोडायला सांगितलादादाने एक बाटली काढली. तिचे बूच उघडले आणि हातात ती उपडी केली. बाहेर दगड आले. पण हॅट लाइटच प्रकाशात ते दगड चांगलेच चमकू लागले. हे हिरे होते. चकाकणारे हिरे पाहून त्याने पटकन बाटली बंद केली. जवळ कोणीही नसल्याने त्याने ती चंचीवजा पिशवी खिशात टाकली. " कई करोडका माल होगा" त्याच्या मनात आलं . ये कागजोंमे क्या है , ये तो काका बता सकता है. तो स्वतःशीच म्हणाला. बाकी सगळे जण लॉकर उघडून मिळालेला माल आणलेल्या प्लास्टीक पिशव्यांमध्ये भरण्यात मग्न होते. काही लॉकर उघडत होते. जे मोठे लॉकर उघडत नव्हते ते तसेच सोडून दिले होते. नंतर प्रयत्न करायचा असे ठरलेच होते. म्हणजे गॅस कटर वापरून पाह्यचे होते. तेवढ्यात काहीतरी वस्तू पडल्याचा आवाज झाला. सगळ्यांनीच मग लाइट्स मालवले. मग त्यांचं लक्ष गेलं , टॉयलेट कडे त्तिथल्या उघड्या दारातून आत येणाऱ्या मांंजरीचे डोळे चमकले. तेव्हा कुठे सगळ्यांना सुटल्यासारखं वाटलं. दादाने मिस्चिफला काहीही न करण्याच सांगितलं. अर्थातच दबक्या आवाजात . नाहीतर जे आत येईल त्याला लगेच यमसदनाला पाठवायचे असे ठरले होते. पुन्हा कामाला सुरुवात झाली. वरती असलेल्या अकड्याला बाहेरच्या दारापाशी कुजबुज ऐकू आली. त्याने ताबडतोब आपलं पिस्तूल रोखून धरले. आणि भोक पाडलेल्या भागाजवळ जाऊन खुणेची शीळ घातली. त्याबरोबर दादा सावध झाला. त्याने पटकन सगळ्यांनाच काम थांबवून सज्ज राहण्यास सांगितले. आपापल्या पिशव्या बांधून ते सगळे लगेच तयार झाले. ताराबाईंच्या दरवाज्याबाहेर इन्स्पे. डावले इतर कॉन्स्टेबल्स , साठेमामांना घेऊन उभे होते. कुलूप उघडण्याचा प्रयत्न चालू होता. ते चांगलंच वफादार होतं. रात्रीचे साडेबारा वाजत होते. बँकेतले जवळ जवळ निम्मे लॉकर उघडून झाले होते. तसा माल बराच सापडला होता. बाकीचे लॉकर उघडणं म्हणजे वेळ घालवण्यासारखं होतं. दादाने सूर्याला निदान जो माल जमा झालाय तो तरी ऑफिसमध्ये नेऊन ठेवण्यास सांगितलं. तरी दहा बारा धोपट्या होत्या. सूर्याला जरा बरं वाटलं. निदान बाहेर जाऊन काण्याला सांगून किक्लाला भेटता येईल. बऱ्याच गोष्टी करता येतील आणि माल आपल्या फ्लॅटवर नेऊन ठेवला तर दादाला काय कळणार आहे ? तसंही काही करून आज दादाला मारण्याचा त्याचा प्लान होता. त्यात अकडा पण सामील होता. त्याच्यावर सूर्याचा भरवसा नव्हता. तो कधीही फिरेल. आपल्याला आत्ता गरज आहे म्हणून त्याच्या बरोबर भागीदारी करायची आहे. तो आणि इंजिनियर दोघांनी मिळून जायचं ठरवलं. पण खुणेची शीळ ऐकू आल्याने सगळ्यांनाच एकदम ताण आला. वर अकडा वाट पाहत होता. त्याने वर त्यांची असलेली हत्यारे एका पोतडीत भरून खाली नेलीच होती. दादाने जीवनला मिस कॉल दिला. अकड्यालाही त्याने खाली यायला सांगितल सगळ्यांनीच हॅटलाइटस बंद ठेवले होते. सध्या अकडा सोडून बाकीच्यांनी मुखवटे लावल्याने त्याच्या मागचे चेहरे ते स्वतः सुद्धा विसरले होते. मग दादाने त्यांच्या दोन फळ्या तयार केल्या. पुढल्या फळीत दादा , सूर्या, रमजान घोडे वापरून फायर करण्यासाठी उभे राहिले, मधल्या फळीत बाकी सर्व पिशव्या पाठीला बांधून तयार राहिले आणि शेवटच्या फळीत अकडा आणि मिस्चिफ फायर कव्हर देऊन उभे राहिले. तेवढ्यात सूर्या अंधाराचा फायदा घेऊन मागे आला आणि अकड्याच्या कानाशी लागून म्हणाला, " हो सके तो फ्रंट डोअर खुलनेके बाद दादाको उडा देना " मग तो पुढे जाऊन उभा राहिला. पण काहीतरी प्लान असल्याचा वास लागल्याने मिस्चिफ सावध झाला . दादाको कव्हर करते करते अकडाको उडानेका उसने तय किया. त्याच्या मनात आलं , साली हरामीकी अवलाद......जीवन आणि हिरा दूरवर ठेवलेल्या स्कॉर्पियो मध्ये पेंगत होते. दादाचा मिसकॉल पाहून जीवनदान म्हणाला, " चलो हिराभाय , लगता है कुछ लोचा हो गया है. " हिराने मग सावकाश सावली पाहून गाडी लावली. त्याबरोबर त्याचं लक्ष मुख्य गेटजवळ उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनकडे गेलं. त्याने गाडी योग्य तेवढं अंतर ठेवून सहजासहजी दिसणार नाही अशा रितीने लावली होती. आता जीवनदानला फ्लॅटपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. पण पोलिसांची आलेली व्हॅन पाहून तो सावध झाला. सध्यातरी सुटकेचा एकच मार्ग होता. वॉचमनला पकडून त्याच्याजवळून किल्ल्या काढून घेणं आणि फ्रंट डोअर उघडणं. फ्लॅट जवळ जाण्यापेक्षा ते बर, असं त्याने ठरवलं. ते तितकसं सोपं नव्हतं. व्हॅनजवळ तीन चार पोलीस उभे होते. अर्थातच पाठमोरे. ते जाणार कसे ? त्यांच्यापैकी एखाद्याला मारून पुढे जाता येईल. बाकीच्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा काहीतरी उपाय शोधवा लागणार होता. मग त्याला अचानक एक कल्पना सुचली. हिराला त्याने आत जाऊन ती सांगितली. तो तयारच होता. त्यालाही जीवनदानच्या बुद्धीचं कौतुक वाटलं. तसा त्याने दादाला फोनही केला आणि बँकेतच राहण्यास सांगितले. तसा त्या प्लानमध्ये धोका होताच. आपण पकडलेल्या वॉचमन कडे बँकेच्या दरवाज्याच्या किल्ल्या असायला हव्यात आणि आपल्या प्लान प्रमाणे पोलिसांनी धावायला हवं. थोडी भीती तर होतीच. प्लान फसला तर सगळेच पकडले जाण्याची किंवा मरण्याची शक्यता होती. ठरल्याप्रमाणे हिरा गाडीतून उतरून आवाज न करता मागे वळला आणि समोरच्या फुटपाथवरील दोन बिल्डिंगच्या मधील एका अंधाऱ्या बोळात शिरला. सांडपाण्याचा वास मारणारा तो बोळ त्याला आवडला नाही. पण काम पुरं करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची सवय त्याला होती. वास्तविक पाहता ही किती चांगली सवय होती , काम चांगलं असतं तर. बोळाच्या दोन्ही बाजूने पाच पाच मजली बिल्डिंग्ज होत्या. रात्रीची वेळ असल्याने कोणत्याही घरात प्रकाश असण्याची सुतरामही शक्यता नव्हती. त्याने प्लानची उजळणी केली. इथे यायला त्याला फक्त तीन मिनिटं लागली होती. आणि काम झाल्यावर तेच अंतर तोडण्यासाठी त्याला फक्त एक किंवा दीड मिनिट मिळणार होतं. तेवढ्यात एक कुत्रं तो शिरलेल्या बोळाकडे आलं . आणि गुरगुरू लागलं. त्याच्यामागे आणखी कुत्री येण्या आधीच त्याने त्या कुत्र्याला जवळ बोलावले. कुत्रं आत येताच त्याने
खिशातलं छोटेखानी पिस्तूल काढून त्याच्यावर रोखलं. आणि ट्रिगर दाबला. रात्रीच्या अंधाराचा वेध घेत जोरदार आवाज झाला. मग मात्र तो रस्त्यावरच्या दुकानांच्या छपरांखालून सावकाश आणि सावधपणे परत जाण्यासाठी वळला. बोळाबाहेर पडला तर त्याच्यासमोर चार पाच कुत्र्यांची फौज उभी असलेली त्याला दिसली. पिस्तुलात फक्त दोनच गोळ्या उरल्या होत्या. त्याने त्यातली एक पुन्हा चालवली. एक कुत्रा खाली पडला. पण बाकीचे कुत्रे त्याच्यावर झेपावले. त्याला कोणी त्याला चावायला सुरुवात केली. तर कोणी त्याच्या हातापायाचे लचके तोडले. तो बोळात भेलकांडला. मग ते सगळेच त्याच्या अंगावर चढून त्याची जिवंतपणी शवचिकित्सा करू लागले. त्यातल्या एक दोघांना कसेबसे बाजूला सारीत त्याने उरली सुरली गोळी पण वापरली. पण इतर कुत्र्यांची पकड काही सुटली नाही. मग मरण यातना भोगीत भेसूर ओरडत ,तो तिथेच तडफडू लागला. पण योग्य तो परिणाम मात्र साघला गेला........गोळ्यांचे आवाज ऐकून साठेमामा घाबरले. तसेच काकाही . तो साडेबारा एकचा सुमार होता.

********* **************** ****************** ***************

गोळीचे आवाज ऐकून तिघांपैकी दोघे जण तिकडे धावले. तो पर्यंत हिरा मरणाचे आचके देऊ लागला. जीवनदानने मात्र उभ्या असलेल्या पोलिसाला मागून धरून त्याच्या मानेवरून चॉपर फिरवला. काही करण्याच्या आणि कळण्याच्या आतच तो खाली पडला. गाडीत बसलेल्या ड्रायव्हरने उठून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोक्यात चॉपर बसल्याने तो बेशुद्ध झाला. आता त्याचा मार्ग निर्वेध झाला. तो पुढे सरकून गेटजवळ येणाऱ्या वॉचमनवर धावला. त्याला जोरात धक्का मारून त्याने प्रथम त्याला खाली पाडले आणि म्हणाला, " हरामी चल बैंक खोलके देना मुझे. तेरेपास चाबी नही होगी तो दुसरेसे मांगके लाना. चल ! " फ्लॅटमध्ये शिरलेले डावले आधीच सावध झाल्याने त्यांनी बेंजामिनला गोळ्या झाडल्याच्या दिशेने पाठवले. त्या गडबडीत त्यांना जीवनदानचा आवाज ऐकू आला नाही. हात पिरगाळलेल्या अवस्थेत उभ्या केलेल्या वॉचमनला जीवनदानने ढकलतच मुख्य दरवाज्यापाशी आणले. बेंजामिन धावतच निघाल्याने त्याचे लक्ष बँकेच्या मुख्य दरवाज्याकडे गेले नाही. सुदैवाने पकडलेल्या वॉचमनच्या खिशात बँकेच्या किल्ल्या होत्या. पण हात पिरगाळलेल्या अवस्थेत त्याला कुलूप उघडणं जमेनासं झालं. तशी पिरगाळलेला हात सोडून जीवनदानने चॉपर मानेवर ठेवला. वॉचमनची रायफल केव्हाच पडली होती. आता कुलपावरचं सील तोडून वॉचमनने कुलूप उघडले. जाळीचा दरवाजा उघडला गेला. आतलं मोठं लॉकही त्याने उघडले. मग दरवाजा आतल्या बाजूला उघडला गेला. त्याने वॉचमनला अशा रितीने जखमी केले की तो धड जिवंत राहणार नाही
आणि मरणारही नाही आणि बँकेत ढकलले. तो आत शिरला तेव्हा सगळेच आपापले घोडे दरवाज्याकडे रोखून उभे राहिलेले दिसले. आता तर सूर्याचा प्लान पूर्ण होणं कठीण झालं. त्याला पोलिसांच्या गोळीबाराची अपेक्षा होती, त्यात दादाला मारणं सोपं होतं. सगळे तयार झालेले घाईघाईने बाहेर पडले. आत कोणताही पुरावा न ठेवता. मग जीवनदानने दादाला थोडक्यात घडलेलं सांगितलं. मग आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता ते सगळेच स्कॉर्पियोमध्ये जाऊन बसले. गाडी चालवण्याची जबाबदारी त्याने जीवनदानवर सोपवली. थोड्याच वेळात ते ऑफिसच्या रस्त्याच्या दिशेने जाऊ लागले. जाताना त्यांनी हिरा पडलेल्या बोळात ढुंकूनही पाहिले नाही. अजूनही त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या ऑफिसला पोलिसांनी सील लावलेलं होतं. लवकरच ते सगळे ऑफिसजवळ पोहोचले. रस्त्यावरचा म्हातारा पुढे झाला आणि त्याने दादाला इत्थंभूत घटना सांगितली. मग म्हाताऱ्याला समजावून दादा मुख्य दरवाज्याजवळ पोहोचला. सगळेच मालासहित आत शिरले. दरवाज्या लागला. आत शिरल्या शिरल्या दादाला दिवाणजींचा फोन आला. " अरे दादासाब हम तो राह देख रहे है, आपके आदमियोंकी. आपसे कोई पैगाम नही इसलिये फोन किया. नाराज मत होना. लेकीन कब मिलेगा माल ? आपका माल तो कबका तय्यार है. " दादाने फोन न बोलता बंद केला. ऑफिसमध्ये पोहोचायलाच रात्रीचा दीड वाजायला आला होता. .......काका दोन वाजेपर्यंत येतील हे दादाला माहीत होतं.

इकडे डावले आत शिरले .तेव्हा साडेबारा वाजून गेले होते. हातातल्या टॉर्चने त्यांनी प्रथम लाइटची बटणं शोधली. आणि सगळे दिवे एकदम लावले. आत काही खाल्लेल्या रिकाम्या कागदी प्लेटा दिसल्या. त्यांना कळेना इथे कोण आलं होतं. खरंतर इथे आजींशिवाय कोण येणार . पण प्लेटांना लागलेलं अन्न नुकतंच खाऊन झालेलं दिसत होतं. मग ते आतल्या खोलीत वळले. त्यांना आजूबाजूला किड्यांच्या रांगा पसरलेल्या दिसल्या. कोणीतरी ही जागा वापरत असणार. त्यांची आणि नेटकेंची बारीक नजर समोरच्या कपाटावर खिळली. ते अर्धवट उघडं असावं. मग किडे त्या कपाटातून येत असलेले दिसले. आणि फार विचित्र पण ओळखीचा वास येऊ लागला. म्हणजे जसा मॉर्गमध्ये येतो तसा. नाकाला रुमाल लावून त्यांच्यापैकी दोघांनी कपाट उघडले. आणि ते घाबरून बाजूला झाले. कारण आजींचा कोंबलेला मृतदेह आतून वेडावाकडा बाहेर पडला. ठिकठिकाणी खाल्लेलं मास दिसत होतं. त्यांचा चेहराही बराचसा लचके तोडल्यासारखा दिसत होता. तर काही भाग जाळीदार झाला होता. त्यातूनच ते किडे बाहेर येत होते. अचानक साठेमामा म्हणाले, " पाहिलतं ना , तरी मी सांगत होतो , आजी आतच असतील. " पण सामान्य नागरिकावर विश्वास ठेवला मग पोलीस कसले. " ..... त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. पण ते पुन्हा बडबड करणार असं वाटून डावले म्हणाले, " मामा जरा सबुरीनं घ्या. आम्ही कायद्याने बांधलेली माणसं आहोत, आम्हाला तुमच्या सारखं कृती करण्याचं स्वातंत्र्य नाही. " .........सहज म्हणून नेटक्यांची नजर बाथरूमच्या उघड्या दरवाज्याकडे गेली . आणि ते झटकन तिथे वळले. बाथरूमच्या जमिनीच्या स्लॅबला एका पिंपाच्या झाकणाएवढं भगदाड पडलेलं दिसलं. थोडे पुढे होऊन त्यांनी त्यावर टॉर्च मारला. त्या प्रकाशात खालच्या मजल्यावरच्या बाथरूम मध्ये पडलेला स्लॅबचा कोरलेला गोलाकार तुकडा पडलेला दिसला. खाली बॅंक असल्याचं त्यांना आठवलं. त्यांनी सरांना इतर दोघा तिघांना मृतदेह हालवण्यासंबंधी सूचना देताना ओढून आणलं आणि खाली बँक असल्याचं सांगितलं. ते पाहिल्यावर डावलेंना श्रीकांत सरांची आठवण झाली. म्हणजे सरांचा संशय बरोबर होता तर. आजच्या कारवाई बद्दल आपल्याला मेडल मिळायला हरकत नाही असं जाणवून त्यांनी येणारी झोप उडवीत नेटकेंना म्हंटलं. "चला आपण खाली जाऊन बँकेत पाहू. वॉचमनला उठवा. " असं म्हणून ते सगळेच खाली बँकेच्या दरवाज्याशी पोहोचले.त्यांना कल्पनाच नव्हती की आजच दरोडा पडला होता. दरवाज्या उघडाच होता. त्यांनी ताबडतोब ठसेतज्ञांची व्यवस्था करण्यास सांगितले. कुठेही हात न लावता त्यांनी आतल्या लॉकर रूमचा आढावा घेतला. काही लॉकर्स उघडे होते. तर काही बंद. नुकताच दरोडा पडला असावा. . आतल्या दारामागे वॉचमन पडलेला आढळला. इतर कोणताही पुरावा मिळाला नाही. मात्र खालच्या बाथरुम सारख्या खोलीत स्लॅबचा गोलाकार तुकडा सापडला. त्यांनी त्यातून वर पाहिलं. आजींच्या खोलीचा काही भाग दिसत होता. उशीर झाला असता तर वरच्या फ्लॅटमधले किडे इथेही लवकरच आले असते. मग एकदम त्यांना आठवलं. जर दरोडेखोर नुकतेच पळालेले असतील तर ते कटीलच्या ऑफिसमधे जातीलच. म्हणून त्यांनी देखणे आणि एक कॉन्स्टेबल यांना तिथे थांंबायला सांगून ते कटीलच्या ऑफ़िसकडे निघाले. दोन वाजत होते. केलेलं सील तकलादू होतं . नक्कीच ते सगळे त्यांच्या भुयाराचा आश्रय घेतील. मग त्यांनी थेट खंडागळे साहेबांना फोन करून झालेली प्रगती सांगितली. त्यावर त्यांनी आणखीन काही शस्त्रधारी कुमक पाठवण्याचं आश्वासन दिलं आणि केलेल्या कामाबद्दल त्यांना प्रोत्साहनही दिले. डावलेंची झोप आता उडाली होती. त्या जागी उत्साह संचारला होता. ही केस नक्कीच सॉल्व्ह होणार. फक्त बरोबर श्रीकांतसर नाहीत. समोरच्या फुटपाथवर उभ्या असलेल्या डावलेंना काका आत शिरत असलेले दिसले. हा नक्की कोण त्यांना लक्षात येईना. खरंतर आत्ता सखाराम जर शुद्धीवर आला असेल तर त्याच्या जबानीतून बऱ्याच गोष्टी कळतील पण तिथे पाटवणार कोणाला ? ते जास्तीची कुमक येण्याची वाट पाहत होते. अजून काहीच घडत नव्हतं. जाऊन हल्लाबोल केल्याशिवाय परिस्थितीत काबू येणार नव्हता. त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं इतके दिवस स्लॅब फोडेपर्यंत कोणालाच कसा आवाज ऐकू आला नाही. निदान बँकेतल्या कर्मचाऱ्यांना तरी ऐकायला यायला हवं होतं. किंवा अगदी बाजूला राहण्याऱ्या कापसे बाईंना तर नक्कीच ऐकू यायला हवं होतं. त्यांनी पटापट फोन करून स्टेशनमध्ये प्रथम बँक मॅनेजरला आणि महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्याचं सांगितलं . मॅनेजरने तर यायलाच हवं.. लवकरच तो तिथे येईल. त्याचा जाब जबाव घेण्यास त्यांनी देखणेंना सांगून ठेवलं. इथे वाट पाहण्याशिवाय काही इलाज नव्हता. एकदा का कुमक आली की वाट न पाहता आपल्याला आत घुसायचंय याची कल्पना त्यांनी बरोबरीच्या लोकांना दिली. .त्यांच्या वाट पाहण्याला अखेर फळ आले. पोलिसांच्या दोन व्हॅन्स मधून आलेले पंचवीस एक सशस्त्र जवान उतरले. त्यांना आल्याबरोबर डावलेंनी कटिलच्या ऑफिसभोवती वेढा घालायला सांगितला. तेवढ्यात एका पोलिस कार मधून खंडागळे साहेब उतरताना त्यांना दिसले. त्यांना कडक सलाम ठोकून डावलेंनी घटनेची कल्पना दिली. कधीही कौतुक न करणाऱ्या खंडागळेंनी त्यांच्या पाठीवर थाप मारली. डावके मोहरले.त्यांना आता झोप नसूनही एक प्रकारचा उत्साह आला होता. आपल्याला मेडल मिळणार याची त्यांना आता खात्री वाटू लागली होती. प्रत्यक्षात मिळेल की नाही याची शंकाही त्यांना वाटल्याशिवाय राहिली नाही. पण त्यांनी असला विरोधी विचार झटकून टाकला. प्रथम हे मिशन यशस्वी झालं पाहिजे. त्यांनी आलेल्या जवानांना सांगितले, " हे पाहा टोळीतला एकही माणूस निसटता कामा नये. शक्यतोवर जिवंत पकडता आलं तर बरं होईल. पण इलाज नसेल तर ठार करायलाही हरकत नाही. सांगितलेले लक्षात राहील ? " त्यांना संमती दिली. आपापल्या जागा धरल्या. अडीच वाजून गेले होते. लवकरच "फायर.. ‌ ... " असा आवाज आला. त्याबरोबर ऑफिसच्या मुख्य दरवाज्यावर गो ळ्या सुटल्या. आवाजाने आजूबाजूचे रहिवासी , जागे झाले पण खाली येऊन पाहण्याचं धैर्य त्यांच्यात नव्हतं. ..... दोन तीन पोलिस शिपाई धैर्य करून पुढे झाले . पण त्यांच्या हालचालींवर कोणाची तरी बारीक नजर असावी असं आतून झाडलेल्या गोळ्यांमुळे लक्षात आले. त्यातले एक दोघे जखमी झाले. मग मात्र डावलेंनी खंडागळे साहेबांच्या मदतीने पुढची कारवाई सुरू केली. .......हे सगळं लांबून बघणाऱ्या दोन व्यक्ती
होत्या. एक काण्या आणि दुसरा किक्ला. सुटून आल्यावर सूर्यांच्या घरी तो फार वेळ थांबू शकला नाही. बरेच मागे लागल्यावर आणि सूर्याचा संपर्क तुटल्यावर काण्याने सूर्याच्या ऑफिसमध्ये किक्लाला घेऊन जाऊन ऑफिस दिसेल अशा रितीने गाडी थांबवली. किक्लाला बँकेतल्या वस्तूंमध्ये जास्त रस होता. आणी किशाची टोळी ताब्यात घेण्याच्या सूर्याच्या प्रयत्नाना त्याचा पाठिंबा होता. कारण सगळी जबाबदारी सूर्या घेत होता, मग किक्लाला फुकटची भाईगिरी करता येणार होती. जेव्हा वाटेल तेव्हा तो वाटेल त्या माणसांना सूर्यासहित मारू शकणार होता. त्याचे स्वतःचे असे संपर्क होतेच.
*****************************************************************************************************

........... दादाला ऑफिसमध्ये शिरून पंधरावीस मिनिटं झाली असतील तेवढ्यात बेल वाजली. सगळेच जण सावध झाले. सूर्याने दरवाज्या उघडला . दारात काका उभे होते. सूर्याचं डोकं त्यांना पाहून ठणकलं. तो बाजूला झाला. काका दरवाजा लावून आत आले. दादाने त्यांना पाहताच माल तपासण्याची खूण केली. आतून दरवाज्या लॉक झाला. आता तो उघडायचा नाही असं ठरलं. काका पुढे होऊन प्रत्येक पिशवीत जे होतं ते बाहेर काढू लागले. त्यात बरेचसे दागिने निघाले. तर काही यूरो, काही रुपये. एक कागदपत्रांची प्लास्टिकची पिशवी, दोन तीन सीडीज, काही फोटोज, काही दस्तैवज, . नोटांची मोजदाद त्यांनी सुरू केली. बाकी सगळेजण आशाळभूतासारखे पाहत होते. ते पाहून दादा ओरडला. "देख क्या रहे हो. जाओ कार्पेट उठाओ और नीचे क्या चीज वस्तू पडी है देख लो. मेरे साथ सिर्फ रमजान ,मिस्चिफ़ और अकडा रहेगा. बाकी सब लोग काम पे लगो. त्याला अचानक फोन आला. मोबाइलची रिंग त्या तंग वातावरणात त्याला टोचल्यासारखी वाटली. दिवाणजींचा फोन पाहून त्याने तो बंद केला. आता तरी ती पाच मुंडकी घेऊन जाणं कोणालाही शक्य नव्हतं. आधी इथून मालासहित पळणं भाग होतं. " बचेंगे तो और भी लडेंगे " ही उक्ती वाईट अर्थाने का होईना खरी झाली होती. पोलीस कोणत्याही क्षणी येऊ शकतात. मग काहींनी बाहेरच्या हॉलमध्ये काही खास आहे का ते पाहून ते ताब्यात घेण्याचं काम चालू केलं. बाकी सर्व खालच्या भुयारात शिरले. शेवटी जाणारा सूर्या होता. त्याची निराशा झाली होती. किक्ला आत्ता कुठे असेल त्याला अंदाज येईना काण्याने त्याला संध्याकाळीच त्याच्या घरी नेलं असेल का ? अनेक प्रश्न पण उत्तरं नाहीत. खरं तर आत्ताच काहीतरी कारण काढून दादाशी पंगा घ्यायला हवा अकडा आहेच पण साला मिस्चिफ पण आहे. दादाचा वफादार आणि शार्प शूटरही. कसल्या शूटिंगमधल्या ट्रिक्स शिकला होता कोण जाणे. त्याच्याकडे म्हणे बॅकफायरिंग गन पण होती. वेळ आलीच तर समोरच्या माणसाला थोपवून धरून ट्रिगर दाबला की आपलाच बळी जातो म्हणे. असली गन वापरायला दादाच नको म्हणाला होता. जिनको खुदपर भरोसा नही वही ऐसी गन वापरते है. असं त्याचं म्हणणं होतं. थोडा रेंगाळणं त्याला महाग पडणार होतं त्याने अकड्याकडे पाहून "काय करू "अशा अर्थी डोळे हालवून खूण केली . पण अकडा नाही म्हणाला. स्साला घाबरट लेकाचा. असं स्वतःशी पुटपुटत सूर्या खाली उतरला. त्याला पोलिसांची आशा होती. तेही साले आळशी आहेत. अशी त्याची कल्पना होती. पण कायद्याच्या कारवाईला वेळ लागतो हेच खरं. अनिच्छेनेच खाली उतरावे लागल्याने त्याने बाकी सर्वांवर डाफरायला सुरुवात केली . तो स्वतः मात्र सखाराम बसला होता त्या पायरीवर बसून राहिला. बाकीचे कामाला लागले. वेगवेगळी भोकशी
तपासण्याचं काम चालू होतं. अजूनही सूर्याला संशय होता. या बॅकेत एवढं काही सापडण्याची शक्यता नसली तरीही दादाने तिथेच दरोडा का घातला त्याला कळत नव्हतं. पण किशा चांगलाच फायदा असल्याशिवाय असलं काही करणार नाही याची त्याला कल्पना होती. काहीतरी करून या मिस्चिफलाच पहिल्यांदा खलास केलं पाहिजे . वर काय चालू होतं याचा अंदाज येत नव्हता. काकाला तर तो यमसदनाला पाठवणारच होता. फुकटचा भागीदार. तेवड्यात त्याला काण्याचा फोन आला. किक्लाला त्याने सूर्यांच्या फ्लॅटवर नेऊन ठेवल्याचं तो म्हणाला. पण किक्ला ऐकायला तयार नाही , काय करू त्याने विचारले. शेवटी सूर्या म्हणाला, " मै मिसकॉल दूंगा, तभी फौरन निकलना और ऑफिस आ जाना. " असं सांगून त्याने फोन बंद केला. निदान दादाला डबलक्रॉस करण्याची संधी तरी मिळेल.

वरती मालाची मोजदाद करता करता काका म्हणाले, " दादा सब मिलके कमसे कम साठ लाख होते है. यूरोका क्या भाव है मुझे मालूम नही. फिरभी अंदाजे पाच छे लाख होगे. और सोना होगा सात आठ किलो . वो भी दो तीन किलोकी लगडी और बाकी सब जेवर. इसकी कीमत तो विठालाल कर सकता है. " ....... थोडा वेळ जाऊन देऊन दादाने विचारले, " और वो कागजात ? " ....... वो तो पढना पडेगा. इतना टाइम कहाँ है ? " . दादा थोडासा चिडला. नंतर म्हणाला, " फिरभी जरा नजर मारना और वो सीडीज चलाके देखना. चल , चल जल्दी कर. तबतक मै दूसरा काम देखता हूं. असं म्हणून त्याने विठालालला फोन लावला. रात्रीचे दोन वाजून गेले होते. काकांना जरा या वेळेला विठालालला बोलावणं बरोबर वाटलं नाही. तेवढा वेळही हवा ना. पण ते नुसतेच टेबलावरच्या वस्तू वर खाली करत असल्याचे पाहून दादा म्हणाला, " कुछ कहना है क्या ? " मान वर न करताच काका म्हणाले, " विठालालको इस वक्त बुलाना ठीक नही और अब पुलिससे धोखा है तो जल्दबाजीमे गलती हो सकती है. एक दोन दिनमे मामला ठंडा होनेके बाद बैठके ये सब करभी सकते है. " एकदाचं काकांनी बोलून टाकलं. ..... दादा विचारात पडला. मग म्हणाला, " शायद आप ठीक कहते है.,. लेकीन वो सीडीज और कागजात जरा जल्दीही देख लो. मुझे किसीको जवाब देना है . " ...... दादा तिथेच बसून स्वतःसाठी ड्रिंक बनवू लागला. त्याने अकड्यासाठीही बनवलं , मिस्चिफ काम करताना कधी घेत नसे. ते एक बरं होतं. त्याने काकांना खुणेने विचारले. पण ते नाही म्हणाले. आता ते कागद पाहू लागले. त्यांना महसूल खात्यात काम केल्यामुळे त्यातली माहिती होती. ते तिथल्याच एका लहानश्या टेबलापाशी बसून कॉंपुटरवर सीडी पाहू लागले. आवाज त्यांनी बंद केला होता. सीडी कोणत्यातरी बड्या माणसाच्या घरची होती. त्यात एका बड्या माणसाचा बेड सीन होता. पूर्ण नग्न अवस्थेतले ते प्रकार पाहून काकांना लाज वाटली. तो बडा माणूस आणि त्यातली स्त्री दोघांना वर्तमानपत्रात अनेक उद्घाटन प्रसंगात काकांनी पाहिलेलें होते. पण त्यांना नावं आठवत नव्हती. सगळं नीट चालू असतानाच बाहेरून फायरिंगचा दणदणीत आवाज आला. पुढच्या दरवाज्याची काच लवकरच फुटली. मग दादाने सगळं फटाफट दोन तीन मोठाल्या बॅगांमध्ये भरलं. त्या लॉक केल्या आणि मिस्चिफला कसलीशी खूण करून ते सगळे कार्पेटखालच्या भुयारात उतरले. मिस्चिफने हॉलमध्ये जाऊन त्याला वाटणाऱ्या संशयास्पद हालचालींवर दोन तीन गोळ्या झाडल्या. एक दोन पोलिस शिपाई जखमी झाले आणि तो चपळाईने मागे फिरला सगळ्यात शेवटी मिस्चिफ उतरला. त्याने कार्पेट थोडेतरी गुंडाळले जाईल अशा रितीने वरचा दरवाज्या लावला. आता आतल्या कुबट हवेत बरीच गर्दी झाली होती . सगळ्यांनीच मग आपापले हॅटलाईटस डोक्यावर लावले. फक्त काका आणि सुर्या यांच्या डोक्यावर ते नव्हते. सूर्याची हॅट सापडेना, तेव्हा दादाने चिडून विचारले, " स्साले , तेरी हॅट तो बैंकमे रह गयी. इतनी बडी गलती तुमने की ? अब हम सब पकडे जायेंगे. पुलिस बेवकूफ नही है. तेरेको तो उडा देता हूं. त्याने सेफ्टी कॅच सरकवलेला पाहून सूर्या घाबरला. ते पाहून अकडा म्हणाला, " दादा जिंदा रहे तो इसको देख लेंगे, अभी अपने पीछे पुलिस पडी है , वो सोचना होगा. " अचानक दादाला फ्रिजमधल्या खोपड्यांची आठवण झाली. पण तो मुद्दामच गप्प बसला. दिवाणजींचा विचार या कोंडी मधून सुटल्यावर करता येणार होता. पण दिवाणजींचा फोन आलाच नाही त्यांना आपण फसवले गेल्याची खात्री झाली होती. ......... आता जायचं कसं याचा विचार सगळ्यांच्याच मनात होता. भुयाराचं दुसरं टोक एका मोठ्या जमिनीखालच्या गटारात उघडत होतं. पालिकेची माणसं कितीतरी वर्षात सफाईसाठी आली नव्हती. त्यांच्या दफ्तरात हे एक एक बंद केलेलं गटार होतं . त्याच फायदा घेऊन दादाने भुयारात रुपांतर केलं होतं. दुसऱ्या टोकाचं ग्रिलही त्यानेच बसवून घेतलं होतं. जाण्याची योजना दादाने सांगितली. सगळ्यात पुढे काकाजी आणि तो असेल, मागून सूर्या, इंजिनियर , रमजान ,राजासाब, मग दुसरे दोघे नंतर अकडा आणि शेवटी मिस्चिफ असेल.. सूर्याला हे आवडलं नाही. आपण काही दगा फटका करू म्हणून सर्वात शेवटी अकडा आणि मिस्चिफ होते. जास्त वेळ न दवडता टोळी निघाली. खालच्या पाण्यात उभं राहून सगळ्यांच्याच पायांना वाम आले होते. पण समोरचं ग्रिल कापण्यासाठी रमझानला पुढे यावं लागलं. लवकरच कापणं जरूर होतं. घाई गर्दी आणि कमी वेळ त्यामुळे रमजानच्या हातून करवतीची ब्लेड पाण्यात पडली. तशी दादा ओरडला, " अबे क्या कर राहा है ? अब जानेको नही मिलेगा ना तो जान जायेगी समझे. चल जल्दी ढूंढ , नही तो दूसरी ब्लेड ले. " त्यावर तो म्हणाला, " एकही तो ब्लेड है. " मग कोणीच काही बोलले नाही. दहा पंधरा मिनिटं फुकट गेल्यावर त्याला ब्लेड मिळाली . वरून पायांचे आवाज हलके का होईना , पण येऊ लागले. दादा म्हणाला, " सब लोग पोझिशन लेलो. पुलिस उपर आ पहुची है. " ज्यांच्याकडे घोडे होते त्यांनी ते वरच्या दरवाज्याकडे वळवले. केव्हाही फायरिंग होणार होतं. कसला आवाज झाला, कळलं नाही अचानक वरून हवेचा झोत आला. सगळेच मग भिंतींना चिकटून उभे राहिले. वरून पडलेल्या प्रकाशाच्या झोतात, कोणालाच काही दिसले नाही ., परत मिस्चिफने वरती फायरिंग केलं. जवळच उभे असलेले डावले साहेब वेळेत बाजूला झाले म्हणून बरं झालं. प्रकाशाचा झोत थांबला. आता रमझानने ग्रिल कापून उघडलं होतं. पण वरून जबरदस्त फायरिंगला सुरुवात झाली. कुबट्ट , घाणेरड्या पाण्यातून टोळी सैरावैरा पळू लागली. ज्याला जिथे वाट मिळेल तिथे तो पाण्याची अडचण असूनही पळू लागला. हातातल दोन बॅगा धरून काकांचे हात राहून आले. दादाच्या एका हातात एक बॅग आणि दुसऱ्या हातात पिस्तूल होतं. ते सगळेच मागे वळून फायरिंग करीत होते. मिस्चिफचं लक्ष अकडा ,सूर्या आणि दादा यांच्याकडे होतं. तरीही तो वर फायरिंग करीत होता. पण वरच्या जबरदस्त फायरिंग पुढे फार वेळ टिकणार नाही याची त्याला कल्पना आल्याने त्याने पळत पळत दादाची पिछाडी गाठली. आता भुयारात कोणीही राहिलं नाही. डावले, खंडगळे , आणि नेटके आत उतरले.पळणाऱ्या किशाच्या टोळीला टिपून मारण्यास सुरुवात झाली. पण पाणी त्यातले उंदीर , हे त्यांना नवखे असल्याने (आणि उंदरांनाही ते) नेम धरण्यास अडचणी येऊ लागल्या.
त्यात रमझान , अकडा आणि सूर्या यांना जखमी अवस्थेत धरण्यात पोलिस यशस्वी झाले. तरीही फायरिंग चालूच होतं. मग पुन्हा एकदा प्रकाश झोत टाकला गेला. इंजिनियर, राजासाब , दादा , मिस्चिफ, काकाजी आणि इतर दोघे पळतच होते. पळता पळता जमेल तेवढे ते फायरिंग करीत होते. तेवढ्यात पुढे जाणारा दादा थांबला. त्याला गटार नक्की कुठे मिळत होतं हे माहीत असावं . त्याला थांबलेला पाहून काका जवळ गेले. त्याला पाठीत गोळी लागलेली होती. असंख्य वेदनांनी त्याचा चेहरा आक्रसत होता. अंधुक उजेडामुळे नीट दिसत नव्हतं. त्याचा तोल जात होता. काकांनी एक बॅग खाली ठेवून त्याला धरण्याचा प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. तो हातातल्या बॅगेसहित पाण्यात आडवा झाला .मागच्या बाजूने पोलिसांचा सर्च लाइट पडत असल्याने थोडेतरी दिसत होते. अचानक परत गोळ्यांची सरबत्ती झाली. उरलेले पाची जण जिवावर उदार होऊन गोळ्या झाडीत होते. अचानक गटारातल्या पाण्याची पातळी वाढली. टोळीचा गोळीबार बंद झाला. म्हणजे गटार कोठे तरी उघडत होते. पण नक्की कुठे हे कळेना . मगे ते सगळेच जमेल तसे माना वर करून पाण्याबाहेर येऊ लागले. पाणी एवढं घाण होतं. की ते नाकातोंडात शिरत नव्हतं हे नशीब. अजूनही पोलिसांचा गोळीबार चालूच होता. आता पोलीस जवळ आले. त्यांनी इंजिनियर, मग राजासाब आणि इतर दोघे यांना ताव्यात
घेतलं. आता फक्त मिस्चिफ आणि काका राहिले. उघडा भाग एका बिल्डिंगच्या मागची बाजू होती. कोणता विंग होता कोण जाणे. पण आता काका अर्धे पाण्याबाहेर आले होते. ते पटकन त्या विंगच्या जिन्याच्या पायरीशी आले. त्यांनी पाय ठेवायला आणि कोणत्यातरी गुळगुळीत वस्तूवर पाय पडायला एक वेळ आली . ती मानवी घाण होती.काकांच्या हातातली एक बॅग मागेच सुटली होती. उरलेली बॅग घेऊन ते पुढे जाऊ लागले. अंगात त्राण नव्हतं. त्याबरोबर मागून खंडागळेंचा आवाज आला , "कोण आहे ताबडतोब थांब, नाहीतर गोळी घालीन . " काका थांबले. त्यांनी मागे वळून पाहिलं. मिस्चिफ कुठे दिसत नव्हता. कदाचित पकडला गेला असेल , पळाला असेल किंवा मारला गेला असेल. पण सघ्या त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. हातातली बॅग टाकून त्यांनी हात वर केले. डावल्यांनी पुढे होऊन त्यांना पकडले. काकांनी सुटण्याची बिलकुल धडपड केली नाही. . त्यांना आता पोलिसांबरोबर कोणताही पंगा नको होता. पोलिसांना दोन बॅगा मिळाल्या. काकांना हॅडकफ करुन ते रस्त्यावर आले. रमजान, सूर्या, अकडा, यांना आधीच ऍम्बुलन्स मधून हॉस्पिटलात पोहोचवले होते. इंजिनियर , राजासाब इतर दोघे आणि काका यांना पोलिस व्हॅन मध्ये घालून जवळच्याच पो; स्टेशनला घेऊन गेले.

खरंतर काकांना या सर्व श्रमांनी घेरी येत होती. झोप झाली नसल्याने त्यांचे डोळे जळजळत होते. बाकीच्यांची अवस्था तशीच होती . घाणेरड्या पाण्यातून गेल्याने सर्वांच्याच कपडयांना घाण येत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. शरीराच्या सगळ्याच अवयवांनी संप पुकारला होता. पोलिस ठाण्यात आल्याबरोबर. पाची जणांना डीसीपी गर्दम साहेबांपुढे पेश केलं गेलं . खंडागळे साहेबांना बसण्याची खूण करताना त्यांनी समोर उभ्या असलेल्या आरोपींकडे खत्रुड नजरेने पाहिलं. काका सोडून बाकी सगळे सराइत गुन्हेगार असल्याने त्यांना भीती अशी वाटलीच नाही. पूर्वी किती डीसीपींपुढे ते उभे राहिले असतील कोण जाणे. मग साहेबांनी प्रत्येकाला नावं विचारली. इंजिनियरने आणि इतर तिघांनी आपापली धंद्यातली नावं सांगितली. काकांना उभं राहवत नव्हतं. समोरच्या रिकाम्या खुर्चीचा आधार घेत ते म्हणाले, " मी रामचंद्र भास्कर कामथे. " बाकीच्यांबाबत साहेब काही म्हणाले नाही. पण काकांनी नाव सांगताच ते ओरडले, " उभं राहायला आधार लागतो का रे तुला ? खुर्चीवरचा हात काढ. आणि नजर खाली. " मग ते खंडागळेंकडे वळून म्हणाले, " गुड जॉब , लवकरच तात्पुरता अहवाल तयार करून माझ्या टेबलावर पाठवा. तुमचं काम चालू द्या. मीडियाला तात्पुरत्या स्वरूपाची उत्तरं तरी देता येतील आणि या गुन्ह्याशी संबंधित उरलेले आरोपी शोधायला मदतही होईल. " .........पाची आरोपींना कस्टडीत ठेवण्याच्या सूचना देऊन ते गेल्यावर खंडागळे साहेब म्हणाले, " सर जरा संध्याकाळपर्यंत वेळ मिळाला तर बरं होईल, म्हणजे आणखी दोन जखमी आरोपींचेही जाबजबाब घेता येतील. " ....... ‌साहेबांना कल्पना आली पण ते म्हणाले, " बाकीच्या गोष्टी होत राहतील, तुमच्या कारवाईचा तपशील महत्त्वाचा आहे. .... ओके ? " ........
काका आणि इतर चौघांना कोठडीत ढकलले. समोरच डावले साहेबांचं टेबल होतं. पण साहेब फ्रेश होण्यासाठी गेले होते. थोड्याच वेळात डावले , नेटके, देखणे आले. आल्या आल्या डावले साहेबांनी किशाच्या टोळीची फाइल काढली. त्यातली एकूण माणसं मोजली. आत फक्त पाच माणसं आणि हॉस्पिटलमधले तीन एवढेच सापडले होते. बाकी बाहेर होते. त्यांनी कॉन्स्टेबल पाठवून हॉस्पिटल मधल्या आरोपींची काय खबर आहे ती मागितली. म्हणजे सगळी स्टोरी तयार करता येईल. साधारण तासाभराने डॉक्टरांचा निरोप आला. ते आरोपींना जुजबी उपचार करून सोडणार होते. प्रत्यक्षात गोळ्या त्यांना चाटून गेल्याने मामुली जखमा झाल्या असल्याचे कळवले होते.म्हणजे लवकरच इतर आरोपी पण येथे येतील. कोठडीत काका डोक्याला हात लावून इतरांबरोबर पेंगत होते. मध्येच एकदा ऍल्युमिनियमच्या टमरेलातून त्यांना चहा दिला गेला. आत मध्ये मरणाची घाण येत होती. खूप वेळ अंधोळ करावी असं त्यांना वाटत होतं. लवकरच त्यांच्या खिशातला फोन फुरफुरला. तो नीताचा होता . तिला काय सांगणार ? त्यांनी भीतिने फोन बंद केला. अजून हा विचार त्यांनी केलाच नव्हता. किंबहुना ते रात्रीपासून एक वेगळे स्वप्नच जगत होते नीताच्या फोनने त्यांच्या आयुष्यातल्या एका वास्तवतेची त्यांना जाणीव झाली. पण असा फोन बंद करून काय होणार ? ते स्वतःशी पुटपुटले. तिने परत परत फोन करण्या आधी आपणच तिला फोन करावा. त्यांनी हळूच कोपऱ्यात तोंड लपवलं आणि तिला फोन लावला. तिचा वैतागलेला आवाज आला, " अहो , आहात कुठे तुम्ही ? असंच वागणार असाल तर तुमचा मला काय उपयोग ? केव्हा येणार आहात ? " ते उत्तर देणार तेवढ्यात कोठडीचा दरवाजा उघडत असल्याचा आवाज झाला. सुरक्षितता म्हणून त्यांनी तो फोन जवळ न ठेवता तिथेच एक उंदारांचं बीळ झालं होतं तिथे लपवला पण बंद करूनच. म्हणजे आता फोन येणार तरी नाही. उघड्या दरवाज्यातून इन्स्पे. डावले , नेटके आणि देखणे आणखीन दोन हवालदारही आले होते. आत आल्या आल्या त्यांनी पूर्वीच्या कैद्यांना दम दिला. "कोणीही मध्ये बोलणार नाही, समोरच्या कोपऱ्यात बसा. चला " . असं म्हणून त्यांनी त्यातल्या एक दोघांना विनाकारण लाथ मारली. ते अंग चोरून सांगितल्याप्रमाणे बसले. मग सगळ्यांना उभं राह्यला सांगितलं. इंजिनियर , राजासाब, टोळीसाठी फालतू कामं करणारे दोघे आणि काका ,दुखऱ्या अंगाने आणि जळजळत्या डोळ्यांनी उभे राहिले. डावले साहेब म्हणाले, " आता एकेकांनी पटापटा बोलायचंय, समजलं , नाहीतर एकेकाला चार्ज रुममध्ये घ्यावं लागेल. " काकांना पोलिस कोठडीचा अनुभव नव्हता , कारण मागे घडलेला गुन्हा हा लांच घेण्याचा होता. आणि जामिनासाठी त्यांना थेट कोर्टात बोलावलेलं होतं. इंजिनियर कडे वळून डावले म्हणाले, " काल तुझ्याकडे काय काम दिलं होतं. ? नीट विचारतोय, " त्याने बोलायला तोंड उघडलं. " साहेब मी काहीच केलेलं नाही. मला ..... " तो वाक्य पुरं करणार एवढ्यात , डावले साहेबांनी आधी राजासाबच्या तोंडात मारली आणि मग त्याच्या. मग कोणालाच काही सांगायचं नाही असं समजून आलेल्या सगळ्यांनी विनाकारण लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातून काकाही सुटले नाहीत. ते पाची जण भेलकांडले आणि मार चुकवायचा प्रयत्न करू लागले. मग काकांनी हात जोडून विनंती केली, " सर , प्लीज मारू नका, मी सगळं सांगतो. पहिल्यापासून. पण मारू नका सर. ..... " असं म्हंटल्यावर त्यांची गचांडी धरत नेटके म्हणाले, " उपकार् करतोस आमच्यावर ? आणि कोण आहेस तू ? माझा भाऊ ? तुला मारायचा नाही, ओ देखणे बघा याची नाटकं बघा. हा प्रेम करा म्हणतोय. " मध्येच दुसऱ्याला झोडपीत असलेले डावले म्हणाले, " मग आपल्या पद्धतीने प्रेम करा की. " . आता ते लोक पकडलेल्या कोणालाही बोलून न देता फक्त मारू लागले . त्यांना फक्त मारायचं असावं. माहिती नको होती. रडत रडत काका म्हणाले, " मी , मी यातला नाही हो. माझं ऐकून तर घ्या. सर... प्लीज ....... सर मी तपास कामात तुम्हाला सगळं सांगून मदत करीन सर. " पण देखणे त्यांचं ऐकेनात. तेवढयात फोन वाजला. म्हणून डावले साहेब बाहेर गेले. फोनवरून काय बोलणं झालं काही कळलं नाही. पण त्यांनी बाहृेरुनच ओरडून सांगितलं. " थांबा जरा. दुसरे दोघे पण येतायत, त्यांच्या बरोबर सगळ्यांनाच चार्जरूममधे घेऊन कवुलीजबाब घेऊ. " त्या बरोबर पाची जणांना सोडलं. आणि ते सगळे बाहेर निघून गेले. पुन्हा कोठडीला कुलूप लागलं. मारामुळे दुखरं अंग सांभाळीत काका तिथेच कसेतरी खाली बसले. बाकीच्यांची हालत वेगळी नव्हती. पण त्यांच्या तोंडावर पश्चात्तापाचं चिन्हं नव्हतं. ते काकांकडे संशयाने पाहू लागले.

दुपारचा एक वाजत आला होता. तरी रमझान , अकडा , सूर्या यांचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात जेवण आलं . सुकटलेल्या जाड पोळ्या ,वरणाचा कटोरा, भाताची मूद . कदान्नच ते. इलाज नव्हता. तोंडात पहिला घास घेतला आणि त्याला येणारा वास आणि त्यामुळे बिघडलेली तोंडाची चव विसरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या काकांना ते तिघे आलेले दिसले. दुसऱ्या घासाचा विचार करीत असतानाच त्या तिघांना दोन हवालदारांनी डावलेंच्या आदेशाप्रमाणे काकांच्या कोठडीत ढकलले. ते तिघे धडपडत आत आले. दरवाज्या लागला. सूर्याने प्रथम काकांकडे तांबारलेल्या डोळ्यांनी पाहिलं. ते पाहून काका घाबरले. तरीही त्यांनी थाळीतल्या कदान्नाचा दुसल्रा घास तोंडात घातला. आणि सूर्याने शिव्यांची सरबत्ती चालू केली. " ए कुत्रीच्या, आम्हाला अडकवून मजेत खादाडत बसलायस तो ? बेशरम भडवा. " असं म्हणून तो त्यांच्या अंगावर धावला. त्यांच्या हातातला. दुसरा घास त्याने थाळीसहित कोपऱ्यात उडवला. अन्नाचा सडा पडला आणि थाळी टणटण टणटण आवाज करीत फिरत जमिनीवर स्थिरावली.सूर्याने त्यांना एक दोन कानफटात मारून पोटातही गुद्दे लगावले. तरीही काका जिवाच्या आकांताने उठले आणि गजांजवळ जाऊन ओरडले, " अहो साहेब जरा बघा , हा मला मारतोय हो. तरीही पुढची पर्वा न करता त्यांना मारणं सुरूच ठेवलं. त्याच्या एका हाताला ड्रेसिंग केलेलं होतं, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. काकांच्या तोंडात गेलेला घास बाहेर पडला. आणि आधीचा घास उलटून पडला. मग मात्र डावले साहेब आत आले आणि त्यांनी सूर्या आणि इतर नवीन आलेल्या दोघांना
लाथा बुक्क्यांनी धुवायला सुरुवात केली. पण सूर्या त्यांच्यावरच हात उगारू लागला. तेव्हा नेटके आणि देखणे पण आत आले. त्याच्या ड्रेसिंग केलेल्या हाताची पर्वा न करता तो विव्हळत असतानाही त्याला बेड्या घाऊन एका ठिकाणी बांधून ठेवला. त्याच्यावर खेकसत डावले म्हणाले " नेटके या भडव्यांना जेवण देण्यापेक्षा यांना आत्ताच घ्या चार्जरूममधे" पण कोणालाही चार्जरूममध्ये घेतलं नाही मग काकांकडे वळून म्हणाले, " ए काकाके बच्चे, ओकलायस ते साफ कर. घरी असाच राहतोस का ? तो बघ तिकडे कोपऱ्यात झाडू आहे " आणि कोठडी बाहेर पडल्यावर पहाऱ्यावर असलेल्या हवालदाराला म्हणाले, " याला परत जेवायला द्या. ..... " काकांनी आज्ञाधारकपणे सगळं साफ केलं. त्यांना परत जेवायला देणार ऐकल्यावर राजासाब इंजिनियरला म्हणाला, " साला ये तो पुलिसका आदमी है. " परत काकांसाठी जेवण आलं. ते जेमतेमच जेवले. त्यांना परत उलटीची भावना झाली, पण उलटी झाली नाही. असाच दिवसाचा उरलेला वेळ गेला. श्रमांनी येणाऱ्या ग्लानीने काकांना झोप लागली. ठाण्यात मध्येमध्येच लहान सहान तक्रारी येत राहिल्या. अजूनही सूर्या काकांवर दात ओठ खात होता. त्याला सोडला तर त्याने काकांचा गळा दाबण्याचं पवित्र कार्य केलं असतं.

(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब..भारी झाला हा भाग.
डावले आनि नेटके ना खालच्या भुयाराचा शोध लागला तो प्रसंग तर डोळ्यासमोरच आला.सहीए.

खुपच मस्त चाललीये कथा...!!! काय प्रतिसाद देउ, काहीच कळत नाहीये....!!! काकाची अवस्था, 'आगीतुन फुफाट्यात' अशी झालीये...!!! मला वाटतय की, आता पुढचा भाग हा शेवट्चा असेल...!!