रामदास स्वामी रचित ७ कडव्यांची संपूर्ण गणपती आरती

Submitted by joshnilu on 19 September, 2013 - 01:36

रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती

प्रचलित आरती आपण म्हणतो ती फ़क्त ३ कड़वी म्हटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे असे म्हणतात ती खालिलप्रमाणे आहे.

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती

साभार --- उमेश जोशी गुरूजी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

joshnilu - आपल्या खटपटीबद्दल धन्यवाद!

पण मला ही पूर्ण आरती रामदासांची म्हणून स्वीकारण्यात अडचणी आहेत -

१. मोरया शब्द रामदासांच्या काळात गणपतीचं नाव म्हणून वापरला जात होता असं वाटत नाही. जाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलच.

२. नर्तन करणारा गणेश हे रूपही मध्ययुगीन दख्खनमधे फारसं प्रचलित होतं, उपास्य होतं असं वाटत नाहीये

३. माथा मुकुट.. वालं कडव्यातलं वर्णन आणि पारंपरिक कडव्यातली वर्णने समानार्थी आहेत. रामदासांच्या इतर आरती पाहिल्या तर तेच वर्णन परत परत करायची शैली दिसत नाही. शिवाय पारंपरिक कडव्यांची भाषा आणि इतर कडव्यांची भाषा यातही चांगलाच फरक जाणवतो आहे. तसंच या कडव्यात वृत्तं खूप काटेकोरपणे पाळलंय असं वाटत नाही. सगळ्या गणमात्रांची बेरीज बहुदा जुळत नाहीये असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. शिवाय रामदासांच्या शैलीचं 'डायग्नोस्टिक मार्कर' म्हणजे अनुप्रास अलंकाराचा वापर आणि 'नादबद्धता' निर्माण करणे (मारुती, शंकराची आरती) - तोही या इतर कडव्यांमधे दिसत नाही

४. मुळातल्या रामदासांच्या आरतीत नंतरच्या काळात कुणीतरी भक्ताने (मोरया गोसावींसारख्या/तत्सम) भर टाकून ही आरती वाढवली असावी असं मला वाटतं आहे

वरदास अनुमोदन Happy
हल्ली गेल्या पन्धरावीस वर्षात तर "दर्शनमात्रे" च्या पुढे स्मरणेमात्रे वगैरे सारखे शब्द सर्वच आरत्यांमधे सर्रास घुसडलेले आढळतात.

रत्नखचित फरा.. आणि लंबोदर पीतांबर.. ही कडवी एका छंदात आहेत. तशी इतर कडवी नाहीत विशेषतः "ता ता धि मि.."

जाणकार अजुन सांगतिलच!

हल्ली गेल्या पन्धरावीस वर्षात तर "दर्शनमात्रे" च्या पुढे स्मरणेमात्रे वगैरे सारखे शब्द सर्वच आरत्यांमधे सर्रास घुसडलेले आढळतात.
>>

हो, असे अनेक आरत्यांबाबत झालेय जसे
"युगे अठ्ठावीस" मधे "जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा
"दुर्गे दुर्घटभारी" मध्ये ".. जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी

बरीच उदाहरणे आहेत. जर असेच चालू राहिले तर येत्या काही वर्षात मूळ आरतीऐवजी भलतीच आरती गायली जाईल असे वाटते.

स्मरणेमात्रे वगैरे सारखे शब्द सर्वच आरत्यांमधे सर्रास घुसडलेले >> अगदीच अनुमोदन
संकटी पावावेचं सुद्धा आता 'संकष्टी' पावावे म्हणतात खूप जण. Uhoh

नविन शब्द जोडुन आरति म्हन्तात त्याला मि रिमिक्स म्हणतो
हाहाहाहा

हि वरील ७ कडव्यान्चि आरती मला माझ्या भावाने दिली
आणी त्याच्या सान्गण्याप्रमाणे मी अधिच टीप टाकली कि
प्रचलित आरती आपण म्हणतो ती फ़क्त ३ कड़वी म्हटली जातात पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे असे म्हणतात ती खालिलप्रमाणे आहे.

ती ७ कडव्यांची आरती 'मूळ' नसावी तर नंतर भर टाकून झाली असावी असं माझं आणि लिंबूटिंबूचं मत आहे Happy

ती ७ कडव्यांची आरती 'मूळ' नसावी तर नंतर भर टाकून झाली असावी
>>
अगदी बरोबर! समर्थांच्या इतर आरत्या एकदम आटोपशीर आहेत, अगदी २-३ कडव्यांच्या.

मारुतीची आरती "सत्राणे उड्डाणे.." तर इतकी छोटी आणि वेगवान आहे की पुस्तकात शोधेपर्यंत ती संपते सुद्धा!

संकष्टी पावावे चुक आहे आय अ‍ॅग्री कारण अर्थच बदलतो.
पण स्मरणेमात्रे म्हणलं तर काय फरक पडतो?
आरतीतल्या मुळ शब्दांपेक्षा भाव आणि श्रद्धा महत्वाची नाही का?
नुसत्या दर्शनाने, स्मरणाने कामनापुर्ती होते किती भक्तीभाव आहे या विचारात..
मला ही आरती अशीच म्हणायला आवडते... मी कायम 'स्मरणेमात्रे' म्हणणारच!

(इथे मला कोणी नको म्हणूस म्हणलेलं नाहीये पण इतर जण म्हणतात म्हणून त्रागा इथे)

ही ७ कडवी ह्या वर्षी देखिल फिरत होती व्हॉटसअ‍ॅपवरती. वरदा यांनी मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत.
शिवाय 'हो श्रीमंगलमूर्ती', 'दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन (इथे मनकामना हा शब्द तोडून)', 'हो दैत्यासुरमर्दिनी', 'ते तू भक्तालागे, ते तू दासालागे', 'क्लेषापासुनी सोडी, दु:खापासुनी सोडी', 'हो हरी पांडुरंगा', 'केशवासी नामदेव, माधवासी नामदेव भावे ओवाळीती (हे 'केशवा माधवा' ऐकून बनवल्यासारखे वाटते)', 'जय श्री गुरुदत्ता, हो स्वामी अवधूता', 'जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा... आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू..' - अशी प्रचंड प्रमाणात भेसळ झाली आहे. तरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या भेसळ करणार्‍यांनी देखिल गणमात्रांची बेरीज चुकवलेली नाही. त्यामुळे स्वामी रामदास त्यांच्या 'मूळ' आरतीमध्ये गणमात्रांच्या घोडचुका नक्कीच करणार्‍यातले नव्हते. त्यामुळे ती सर्व जास्तीची कडवी प्रक्षिप्तच असावीत.

ही जास्तीची कडवी रामदासांची नसावीत यावर सहमत आहे.

विदर्भात ही आरती चार कडव्यांची म्हणतात. मी माझ्या बालपणापासून (७० पासून) ही ऐकली आहेत.
त्यातले चौथे कडवे असे म्हटले जाते:

चरणीच्या घागरीया रुणुझुणु वाजती
तेणे नादे देवा अंबर गरजती
ता ता ठुमकत नाचे गणपती
तव शंकर पार्वती कौतुक पाहती॥

हे कडवे तर उघड पणे प्रक्षिप्त आहे! आमच्या कडे ही हे म्हटले जाते, पण ही मूळ आरती नाही यावर मी ठाम आहे. (मी ते कडवे माझ्या पुरते म्हणत नाही!)

शंतनु
बापरे तुम्ही लिहलेली सगळी भेसळ मी लहानपणापासुन करत, एकत, बोलत आलेली आहे. Uhoh म्हणजे हा नक्कीच अलीकडचा प्रकार नाही.आधीपासुन असावा.

'सज्जनगड' आजोळ असलेल्या समर्थांच्या वंशातील एक किर्तनकार ताई आमच्या व्हॉटस अपच्या अध्यात्मिक ग्रुप वर आहेत. त्या ही म्हणत होत्या कि ही चुकीची माहिती पसरवली जात आहे.
तरी त्यांच्याकडून परत एकदा कन्फर्म करून सांगते.

ही पूर्ण आरती मी माझ्या लहानपणी आजोबांकडुन ऐकलीये, पण त्यात कडवं क्रमांक ३ आणि ४ होते का हे नीट आठवत नाही,पण ५ वं आणि ६ वं कडव म्हणायचे आजोबा अस आठवत