कामथे काका (भाग ४ था )

Submitted by मिरिंडा on 6 September, 2016 - 03:24

सूर्यनारायण स्थानापन्न झाला. काका त्याच्यासमोरच्या खुर्चीत बसले. काकांना चकित झालेले पाहून तो म्हणाला, " ये सब दादाकी माया है. दादाने तुमको भेजा है, मतलब दादाको तुम्हारे उपर भरोसा है. फीर भी मै कुछ बताना चाहता हूं. फिलहाल तुमको सिर्फ फोन लेनेका और मेसेज मेरेतक पहुचानेका, इतनाही काम है. फोन करनेवाले का नाम, कहांसे बोलता है, कौन चाहिये और तुम्हारा नाम ये चीजे बिलकुल नही बोलना. कौनसा भी मेसेज कही भी लिखना नही, या टेप करना नही. अगर ऐसा करोगे तो पकडे जाओगे. देखो सब जगह कॅमेरे लगाए है. तुम यहां जब आ गये तब मैने तुम्हे स्क्रीन पर देखा. मगे त्याने टेबलावरील मॉनिटर त्यांच्याकडे फिरवून दाखवलं. त्यात बाहेरचा सगळा हॉल, आणि आतल्या केबिनचा काही भागही त्यांना दिसला. थोडं थांबून तो पुढे म्हणाला, " और एक बात, रोज शामको सात बजे जानेका, सुबे दस साडेदस बजे तक आयेगा तो भी चलेगा. देखो, यहॉ चार ज्युनियर काम करते है. उनको काम पडता है जभी आते है. उनसे कुछ बात नही करना, वो भी तुमको पूछेगे नही. हमारी सब केसेस मुंबईके बाहरकी है. महिनेके आखरी दिन तुमको तनखा मिलेगी. वो दादा हम को बतायेंगे. तुम हमारे काम आओगे तो ज्यादा पैसा भी मिल सकता है. पूरी इमानदारीसे काम करना. यहॉ भूल की कीमत सिर्फ मौत होती है. अब तुम सब कुछ समझ गये हो. तुमको आनाही होगा. दादासे चुंगुलसे आज तक कोई नही छूटा. यहॉ आनेसे पयले तुम तय कर सकते थे, अब नही. लंच बाहर लेकर आ सकते हो. जो कहा उतना काफी है. अब तुम कामपे लग जाओ.

काका निमूटपणे उठले. बाहेरच्या झगमगीत हॉलमध्ये आले. एका टेबलावर तीन चार फोन होते. एक फिरणारी खुर्ची ठेवली होती. त्यावर ते बसले. दोन मिनिटाकरिता ते रेळले. अचानक त्यांना आपलं स्वातंत्र्य, धोक्यात आल्यासारखं वाटलं. मग त्यांना रोहिणीची आठवण झाली. ती नेहमी म्हणायची, "फार लवकर विश्वास ठेवता तुम्ही दुसऱ्यावर, एखाद दिवशी फसाल तुम्ही. " तेच तर झालं, म्हणूनच आपल्यावर केस झाली. आपण चिवटे वर फार विश्वास ठेवला. या विचारासरशी ते घाबरले. चिवटे त्यांचा शिपाई. मुरलेला आणि बनेल. मग त्यांच्या मनात आलं. आपण पटकन एखाद्या गोष्टीला होकार कसा देतो. वाटेल तिथे भिडस्तपणा काय कामाचा. पण त्यांचा मूळ स्वभाव थोडासा घाबरट असल्याने ते स्पष्टपणे बोलत नसत. निदान गडाकडे असल्या अटी तरी नव्हत्या. आपल्याला इथे दुसरा "चॉईस " नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. पैसे किती मिळणार तेही कळलं नाही. ते स्वतःला दोष देण्यात गढले असतानाच अचानक फोनची बेल वाजली. ते केवढे तरी दचकले. थरथरत्या हाताने त्यांनी फोन उचलला. ते हॅलो म्हणायच्या आतच पलीकडून एक राकट आवाज आला, " १७ नंबर पूरा किया ". आणि फोन बंद झाला. त्यांना कळेना हा सतरा नंबर कोण? मग सांगितल्या प्रमाणे त्यांनी बाजूचा इंटरकॉम उचलून मेसेज पास ऑन केला. तो ओके म्हणाला. फोन डेड झाला. मग जवळ जवळ तास दीड तास गेला.

मग पुन्हा फोन आला. बोलणारा म्हणाला, " सचिनने बाउंड्री मार दी. " तोही मेसेज त्यांनी आत मध्ये कळवला. त्यांनी विचार केला, हा काय मेसेज? मॅचचा स्कोर सूर्यनारायणला सहज समजू शकेल. नक्कीच हा काहीतरी सांकेतिक मेसेज असला पाहिजे. सचिन नक्कीच सचिन तेंडुलकर नव्हता. आणि बाउंड्री मारली म्हणजे काय? ते पुन्हा पुन्हा विचार करीत राह्यले..... अर्थ लागेना. त्यांनी नाद सोडला. हे काय काम आहे? नुसतेच मेसेज घेऊन ते पास करायचे आणि दिवस भर पुस्तकांची थोबाडं बघत बसायचं. कुणाशी बोलणं नाही, कुणी येत नाही, कुणी जात नाही. असा काय पगार मिळणार इथे? तो सरदार म्हणाला तेच बरोबर आहे. इथे कुणीही येत नाही, जात नाही आणि ऑफिस तर मोठं थाटून ठेवलंय. दोन वाजता त्यांनी लंचसाठी जात असल्याचं सांगितलं. ते बाहेर आले. अचानक उन्हात आल्यामुळे त्यांच्या अंगात सुयांसारखी उष्णता घुसत होती. एसी चा परिणाम तसा वाईटच होणार. आपण हे काम कसं काय करणार आहोत? त्यांना समजेना. समोरच एक उडुपी हॉटेल होतं. तिथे जाऊन त्यांनी जेवण केलं. पान खाल्लं. सिगारेट शिलगावली. मग त्यांना जरा बरं वाटू लागलं. ते पुन्हा ऑफिसमध्ये शिरले. त्यांना तो चक्क एसी तुरुंगच वाटला. निव्वळ कोंडवाडा........ इथे फक्त घरी जाण्याची परवानगी होती. त्यांनी मनाशी काहीतरी ठरवलं...... मध्येच एकदम दोन फोनची बेल वाजू लागली. त्यांनी एक फोन घेतला. बोलणारा म्हणाला, " कोण बोल राहा है?.. " दुसरा फोन वाजतच होता. ते घाईघाईने म्हणाले, " आप मुझे मेसेज दीजिये " त्यावर पलीकडच्या माणसाने त्यांना एक गलिच्छ शिवी दिली. आणि फोन बंद केला. हा फोन नक्कीच यांच्या सर्कलमधल्या माणसाचा नसावा. मग कोण असेल? मागे बरीच माणसं ही बोलत असल्याचं त्यांना ऐकू आलं. मग त्यांनी दुसरा फोन घेतल्यावर बोलणारा वैतागून म्हणाला, " इतना टाइम क्यू लगता है, फोन उठानेमे. जीवनराम बाहर है. " आणि तोही फोन बंद झाला. त्यांनी दोन्ही फोनवरचे मेसेज आत पाठवले. उगाच प्रॉब्लेम नको.

हळू हळू त्यांना या कामाचा कंटाळा आला. पहिल्याच दिवशी ते कंटाळले. जसे ते तुरुंगात कंटाळले. नंतर रुळले होते. तिथे निदान इतर कैद्यांशी संपर्क तरी येत होता. कसेतरी पाच वाजले. त्यांना चहाची तलफ आली. पण बाहेर जाता येईल असं सांगितलं नव्हतं किंवा चहाची व्यवस्था आतच होईल असंही सांगितलं नव्हतं. उद्यापासून एखादा थर्मास आणावा. म्हणजे लागेल तेव्हा चहा पिता येईल. साडेसहा वाजले...... अचानक केबिनचा दरवाजा उघडून सूर्यनारायण बाहेर आला. म्हणाला, " तेरा काम ठीक चल राहा है, ऐसाही काम करते रहना. इससे ज्यादा इधर अभी तो कोई काम नही. आजके दिन तू अभी जा सकता है. लेकीन कलसे जानेसे पयले मेरेको बोलनेका. " तो आत गेला. काकांनी बरोबर काहीच आणलं नव्हतं. ते दरवाजा उघडून बाहेर आले. रस्त्याला घर गाठणाऱ्यांची आणि वाहनांची तुफान गर्दी होती. अचानक थोडासा पाऊस आला असावा. आतमध्ये कशाचाच पत्ता लागत नव्हता. मग त्यांना जोरदार शिंक आली. ते स्वतःशीच पुटपुटले. " हा एसी चा परिणाम. पण रोज बसल्यावर सवय होईल. " जणूकाही त्यांच्या या समजुतीला विरोधी म्हणून पुन्हा ते शिंकले. त्यांना जीवन बेचव वाटू लागले. मनातलं कोणाशीही बोलता येत नाही. रात्री रोहिणीच्या मिठीत कसं सगळं विसरता येत होतं. आपण कुणाला तरी हवे आहोत असं आजूबाजूला कुणीही नाही. त्यामुळे अगदी एकटं वाटतं, या विचारांनी ते अस्वस्थ झाले. इच्छा नाही तरी आपल्याला इथे काम करावं लागणार. आपल्या वाट्याला असं जबरदस्तीचं जीवन का येतंय?..... त्यांचं डोकं चालेना. आपल्यावर भ्रष्टाचाराची केस झाली, आपण तुरुंगात गेलो, मुलाने आणि सुनेने वाईट वागणूक दिली. सगळ्या बाबतीत आपल्याला पर्याय का राह्यला नाही? त्यांच्या जवळ उत्तर नव्हतं. त्यांना एखादा पेग मारावा असं वाटू लागलं. निदान हे वांझोटे लोंबकळणारे विचार तरी थांबतील. तसे ते पिणारे नव्हते. पण कोणी "बसायचं" म्हं टलं तर माघार घेणारेही नव्हते. त्यांनी स्वतःचा कोटा ठरवला होता. तो झाला की ते उठत असत. त्यावेळी त्यांच्या मनात एकच विचार असायचा. रोहिणीला आपल्या तोंडाला वास आलेला आवडणार नाही. त्यांना रोहिणीचं फार आकर्षण होतं. पन्नाशीला आली तरी रोहिणी छान दिसायची. ते तिच्या दिसण्याचं कौतुक करायचे. रोहिणी म्हणायची सुद्धा, " आता मी फारशी चांगली दिसत नाही हो. किती आकर्षण आहे तुम्हाला. हे चांगलं नाही. वयानुसार ते कमी व्हायला हवं. आपण केवढी मजा केल्ये, पण तुम्हाला रोजचा दिवस नवा का वाटतो, कळत नाही बाई. जरा आवरा की स्वतःला. ते कधीतरी पिऊन आले, तरी रोहिणी त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक द्यायची. पण त्यांना कधी तिचा राग आला नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र ती नॉर्मल वागायची...... नीताचा प्रश्नच नव्हता, तिला त्यांचं घरातलं अस्तित्वच मान्य नव्हतं........

काका घरी पोचले. रमेश केव्हाच आला होता. त्यांनी त्यांना काहीच विचारलं नाही. काय काम आहे पगार किती मिळणार, कुछ नही. उलट आधीपासून गाळलेला चहा त्यांच्यापुढे नीताने केला. त्यांनी तो तसाच प्यायला त्यांच्या तोंडाची चव बिघडली. रोहिणी असती तर तिनी दुसरा चहाच केला असता. काकांना तर वाफेभरला चहा लागायचा. जास्त न बोलता ते तसेच जेवले, झोपण्यासाठी हॉलमध्ये आले. मग त्यांना एकदम थर्मासची आठवण झाली. ते उठून हॉलमधल्या कपाटांमध्ये आवाज न करता थर्मास शोधू लागले. त्यांना काही तो मिळाला नाही. तो आत असणार असं समजून ते झोपले. सकाळ झाली. रमेशला ते कोणाकडे कामाला जातात हे माहीत नव्हतं. पण त्यांना भीती होती की नरेशभाई नाहीतर विपुलभाई यापैकी नक्की च कोणीतरी त्याला सांगेल. पण अजून सांगितलेलं नसावं. मग त्यांच्या लक्षात आलं, इंटरव्ह्यूला घ्यायला बसलेला दुसरा माणूस विपुलभाई होता. पण त्यांना आता त्याच्याशी कर्तव्य नव्हतं.

नेहमीप्रमाणे ते तयार झाले. दहा सव्वा दहा पर्यंत निघून त्यांनी नाश्ता केला. एक थर्मास घेऊन त्यांनी चहा भरून घेतला. ऑफिसमध्ये आल्या आल्या त्यांना सूर्यनारायणने बोलावून काँटॅक्ट ठेवण्यासाठी एक मोबाईल दिला. तसा मोबाईल काही वर्षांनी त्यांच्या हातात आला होता. निलंबन कालावधीत त्यांनी मोबाईल विकून टाकला होता. का कोण जाणे पण त्यांना एकदम साधना बेनची आठवण झाली. तिला फोन करावासा त्यांना वाटला. तिला फोन करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ऑफिसमध्ये कुणालाही फोन करता आला नसता. त्यांच्याकडे विपुल भाईचं कार्ड होतच. फक्त आपण का फोन करतोय हे सांगणं सोपं नव्हतं. आज त्यांना एकावर एक बरेच फोन आले, त्यांनी मेसेज ताबडतोब सूर्यनारायणला कळवले आणि ते मोकळे झाले. त्यांना आता त्या मेसेजेस मध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. पण मन जागरूक राहिलं. तसा ह्या कामात काहीच धोका नव्हता, आणि जबाबदारीही नव्हती. मग आपण का कंटाळतोय? त्यांनी स्वतःला विचारलं. उत्तरही त्यांनीच दिलं. "स्वातंत्र्य नाही ". पुन्हा अस्वस्थ मनस्थितीत खुर्चीत एखाद्या किड्यासारखे वळवळत राह्यले. एक वाजत आला. ते लंचला गेले. जेवण झाल्यावर त्यांना साधनाबेनची आठवण आली. पण त्यांनी फोन करण्याचा मोह टाळला. साधनाबेन आणि पाटकरची पुष्पा यांची नकळत ते तुलना करू लागले. आणि त्यातल्या त्यात रोहिणीच्या जवळची कोण याचा विचार करू लागले. त्यांना ठरवता येईना. साधनाबेन एक अनुभवी स्त्री होती. पुष्पा एक दबलेली, घाबरलेली, वर्षानुवर्ष दारिद्र्यात पिचलेली, लग्नाळलेली प्रौढ कुमारिका होती. एवढी विशेषणं द्यायचा मनाला कंटाळा आला नाही. पण मन असं हलकट होतं, एखाद्या कामाबद्दल विचार करायला घेतला असता तर लगेच कंटाळलं असतं. मग त्यांच्या मनात आलं, रोहिणी गेल्या पासून ते सगळ्याच बाबतीत एकटे पडले होते. वय वाढलं म्हणून गरजा संपतात किंवा कमी थोड्याच होतात? विचारांच्या तंद्रीतच ते उठले आणि ऑफिसमध्ये आले...... त्यांच्याशिवाय तिथे माणसाचं वारं नव्हतं. नाही म्हणायला सूर्यनारायण नावाच माणसाच्या रूपातलं भूत आत बसलं होतं. सध्या ते त्यांच्या मानगुटीवर बसलं होतं तो म्हणेल तसंच करावं लागणार होतं. उरलेला दिवसही सकाळसारखाच गेला. आज ते साडेसात आठला घरी आले. रात्र तशीच गेली. आता हे रोजचंच झालं, त्यांच्या मनानं स्वीकारायला सुरुवात केली. करता करता महिना झाला.

शेवटच्या दिवशी, ठरल्याप्रमाणे सूर्यनारायणने बोलावून पगार दिला. ते सात हजार रुपये होते. त्याच्याशी जास्त बोलणं झालं नाही. काका घरी आले. सात वाजत होते. त्यांनी विचार केला, तसंही पाच हजार पगार मिळणार हे रमेशला माहीत होतं. सगळा पगार घरात दिल्यावर आपल्याजवळ काय उरणार? नाहीतरी ते दोघेही आपल्याला धड वागणूक देत नाहीत. त्यांनी आत जाऊन रमेशला पाच हजार दिले. रमेश एकदम खुशीत आला. त्याच्याच बेडवर बसवून म्हणाला, " पगार लवकर होतो वाटतं तुमचा? असं करा यातले हजार रुपये, दर महिन्याला तुम्हाला खर्चायला ठेवत चला. " नीतालाही जरा बरं वाटलेलं दिसलं. तिनी मग काही वेळापूर्वी गाळलेला, थंड चहा गरम करून त्यांच्यापुढे ठेवला. रमेश म्हणाला "चला, बरं झालं. नरेश, नाहीतर विपुलभाईला तरी फोन करावा. आभार मानायला हवेत त्यांचे. नाहीतर, तुमच्यासारख्या बदनाम माणसाला कामावर कोण ठेवणार आहे? " काकांना त्यातला धोका जाणवला. गरम चहाचा घुटका घशात अडकल्याने ते अडखळत ते म्हणाले, " अरे आज संध्याकाळीच ते दोघेही कामासाठी बाहेर गेल्येत. बहुतेक महिना पंधरा दिवस तरी येणार नाहीत. तू नंतर फोन कर. बाहेर गावच्या केसेस असतात ना! " विषय जास्त ताणला जाऊ नये म्हणून ते उठले. रमेशला ते पटलेलं दिसलं. काका हॉलमध्ये आले. खरोखरीच ते दोघेही बाहेर गावी गेले असतील तर किती बरं होईल. या विचाराने त्यांना जरा बरं वाटलं. सध्यातरी संकट टळलं म्हणायचं..... पण... नरेशभाईचाच फोन रमेशला आला तर? " त्यासरशी ते गढुळले....... जास्त विचार न करण्याचं त्यांनी ठरवलं....... बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. थंड हवा येत होती तरी त्यांना घाम येत होता. मनाच्या गढुळलेल्या अवस्थेतच त्यांनी जेवण केलं. आज जेवणही गरम होतं. मुख्य म्हणजे आत जेवायला बोलावलं होतं. पैसा काहीही करू शकतो हेच खरं.

पुढे दिवस असेच जात राह्यले. काका सकाळी दहाला बाहेर पडत, नाश्ता करून कामावर जात. संध्याकाळी कधी आठ वाजता, तर कधी दहा वाजता ते घरी येत. फोन येतच होते, मेसेजेस पास ऑन होत होते, आजकाल रोजच पाऊस येऊ लागला. पावसाळाच तो, नेमेची येतो. दुसरं काय म्हणणार? त्यातून मुंबईचा पाऊस, म्हणजे वेडा पाऊस. काकांनी धाडस करून दोन तीन दिवसांनी साधनाबेनला फोन लावला.........

(क्र म शः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. कॉपि पेस्ट काढले आहे. सध्या दुसर्‍याच्या संगणकावरून पाठवीत आहे. त्यामुळे तिथल्या कॉपि पेस्टची पद्धत अंगवळणि न पडल्याने चूक झाली.