एक निखळ मनोरंजन - 'हॅपी भाग जायेगी' (Movie Review - Happy Bhag Jayegi)

Submitted by रसप on 28 August, 2016 - 03:49

आशयसंपन्नता किंवा आशयचमत्कृतीच्या अट्टाहासापायी शायरी स्वत:ची लय हरवत चालली आहे. अर्थपूर्ण शब्द अनेकदा लिहिले जातातही, मात्र त्यांना आवर्तनाच्या गणितात स्वरबद्ध करत असताना त्यांची कुतरओढ होते. खरं तर 'आधी शब्द आणि नंतर चाल' ही पद्धती कधीच मोडीत निघाली आहे. कदाचित त्यामुळेही चालीनुसार शब्द गुंफत जाताना खूप काही सॅक्रीफाईस करावं लागत असावं. चालीसुद्धा आजकाल 'इसीजी' सारख्या वर-खाली होत असतात. त्यांचा हा धसमुसळा स्वभावही बऱ्याचदा शब्दांच्या नाजूक प्रकृतीला झेपणारा नसतो.
कारण काहीही असो पण -

होश बातों का अक्सर नहीं था
दिल हमारा तो शायर नहीं था
तूने लिख दी यह तक़दीर वरना
इश्क़वाला मुक़द्दर नहीं था

- असे घट्ट बांधलेले शब्द आजकाल सिनेसंगीतात सहसा ऐकायला मिळत नाहीत. 'हॅपी भाग जायेगी' खूप हसवतो. पण सोबतच -

ज़रासी दोस्ती कर ले
ज़रासा हमनशीं बन जा
ज़रासा साथ दे बस फिर
चाहे अजनबी बन जा

- असे मनात रेंगाळणारे काही शब्दही सप्रेम भेट देऊन जातो.

चित्रपटाची कहाणी पंजाब आणि पाकिस्तान ह्या भागांतली असल्यामुळे संगीतावर पंजाबी व सूफी संगीताची छाप आहे. ऐकणेबल (अजूनही मी 'सुश्राव्य' असा शुद्ध, शास्त्रीय शब्द वापरणार नाहीच !) संगीताची माझ्या तरी कानांना सवय राहिलेली नाही. ही सगळी गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत. फार क्वचित असं वाटतं की गाणी पूर्ण हवी होती !

ह्यासाठी अगदी सुरुवातीलाच गीतकार 'मुदस्सर अज़ीज़' (बहुतेक) आणि संगीतकार सोहेल सेन ह्यांना मनापासून दाद !

'मुदस्सर अज़ीज़'नी फक्त गीतलेखनच नव्हे तर कथा व पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अश्या तीन आघाड्या सांभाळल्या आहेत. लेखन, दिग्दर्शन एकाच व्यक्तीचं असल्यामुळे एक प्रकारचा 'एकजिन्नस'पणा 'हॅपी भाग जायेगी' मध्ये जाणवतो.

'हॅपी भाग जायेगी' एक वेगळा सिनेमा आहे. कारण 'कॉमेडी म्हणजे वाह्यातपणा' असं एक समीकरण सध्या बनलं आहे. किंबहुना तसं जर नसलं, तर लोकांना पुरेसं हसूही येत नाही. त्यामुळे 'यथा डिमांड, तथा सप्लाय' होत राहतो. 'हॅपी..' मात्र हे समीकरण बाजूला ठेवतो. आहेत, काही कमजोर जागाही आहेत. पण हे वेगळेपण त्यापेक्षा महत्वाचं ठरतं.

सिनेमातल्या एका व्यक्तिरेखेच्या नावावरुन सिनेमाचं शीर्षक असलं की संपूर्ण सिनेमा हा त्या व्यक्तिरेखेभोवतीच फिरत राहणं आणि तीच व्यक्तिरेखा प्रमुख ठरणं हे स्वाभाविक आहे. 'हॅपी'च्या भूमिकेत असलेली 'डायना पेंटी' मला 'कॉकटेल' मध्येही 'सो-सो'च वाटली होती. ती भूमिका खरं तर खूप वाव असलेलीही होती, पण - कदाचित पहिलाच सिनेमा असल्यामुळे असेल - तिने काही कमाल वगैरे केलेली नव्हती. लक्षात राहावा, असं ते काम नव्हतंच. ती मुख्य भूमिकेत असणं, हे जरा पचायला जड जाणारं होतं. अभय देओल आणि जिमी शेरगिलसाठी पाहावासाही वाटत होता आणि इतकी सगळी 'डायना पेंटी' शान होईल असंही वाटत नव्हतं.
२-३ लोकांनी शिफारस केल्यावरच मी 'हॅपी..' पाहायला गेलो आहे.

And it paid off !
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 'हॅपी' म्हणजेच 'डायना पेंटी' ही मुख्य भूमिकेत नाही. सिनेमा तिच्याहून जास्त अभय देओलचा आहे. डायनानेही काम चांगलं केलं आहे, पण ह्या रोलसाठी ती शोभतच नाही, असं वाटलं. 'हॅपी' ही एक रांगडी पंजाबी व्यक्तिरेखा आहे. बिनधास्त, निडर आणि कुणावरही वचक ठेवू शकेल अशी. हाडाडलेली, खप्पड डायना पेंटी इथे फिट्ट वाटतच नाही ! एक बिनधास्त पंजाबी मुलगी इतकी मरतुकडी असू शकते, हे मला तरी पटलंच नाही.

अभय देओल मात्र पाकिस्तानच्या राजकारणातील उगवता सूर्य असणारा 'बिलाल अहमद' सादर करताना पुन्हा एकदा समजून, उमजून अगदी तोलून मापून व्यक्त होत राहतो. त्याला क्रिकेटमध्ये करियर करायचं असतानाही त्याच्या वडिलांनी त्याला राजकारणात ओढलेलं असतं. नसानसांत क्रिकेट भिनलेला माणूस, फलंदाजीसाठी उभा राहताना इतका वाईट 'स्टान्स' कसा घेईल, हा नसानसांत क्रिकेट भिनलेल्या माझ्यासारख्या छिद्रान्वेश्याला पडलेला निरागस प्रश्न, मी स्वत:च अभय देओलसाठी डिस्काऊन्ट केला !

जिमी शेरगिलचा 'दमनसिंग बग्गा' 'तनू वेड्स मनू' मधल्या 'राजा अवस्थी' चंच दुसरं नाव असल्यासारखा झाला आहे. त्याचा सिनेमातला 'लव्ह इंटरेस्ट' कायम त्याला बोहल्यापर्यंत नेऊन पळून जाणारा असतो. त्याला बहुतेक अश्या भूमिकांत स्पेशलायजेशन करायचं असावं ! सहाय्यक भूमिकांत त्याचं स्पेशलायजेशन तर आताशा मान्य करायलाच हवं.

लाहोरचा पोलीस अधिकारी 'उस्मान आफ्रिदी' म्हणून 'पियुष मिश्रा'नी मात्र नुसती धमाल केली आहे ! पियुष मिश्रा हे एक अजब रसायन आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखल्याप्रमाणे घट्ट बांधलेली शायरी करणारा त्यांच्यासारखा दुसरा गीतकार नाही. गच्च बांधलेल्या पटकथा, संवादलेखनही ते करतात आणि वेगवेगळ्या छटांच्या भूमिकाही ताकदीने करतात !

अली फझलला फारसं काम नाहीय. पण तो खूप सहज वावरतो आणि त्याचे बोलके डोळे खूप फ्रेशही वाटतात.

RmUyQLf6.jpg

सिनेमाचं कथानक अगदी थोडक्यात सांगण्यासारखं आहे.
'हॅपी' (डायना पेंटी) ला 'गुड्डू' (अली फझल) शी लग्न करायचं असतं. पण बेकार, बिनकामाच्या गुड्डूशी लग्नाला 'हॅपी'च्या वडिलांचा (कंवलजीत सिंग) विरोध असतो. स्थानिक नगरसेवक दमनसिंग बग्गा (जिमी शेरगिल) शी तिचं लग्न ठरवलं जातं. मात्र ती लग्नाच्या मंडपातून पळून जाते. गडबडी अशी होते की ती गुड्डूकडे न पोहोचता थेट पाकिस्तानात लाहोरला बिलाल अहमद (अभय देओल) च्या घरी पोहोचते ! बिलालचं राजकीय भविष्य, हॅपी-गुड्डूच्या प्रेमाचं भविष्य, बग्गाच्या सामाजिक छबीचं भविष्य आता काय होणार ? ह्या प्रश्नाचं उत्तर सिनेमा देतो.

कथानक विचित्र योगायोगावर कमजोरपणे आधारलेलं असलं, तरी वेगवान पटकथा त्यात रंगत आणते. काही ठिकाणी अजून मजा आली असती, असं मात्र वाटलं. गुड्डूला पाकिस्तानला नेऊ देण्यासाठी बग्गाला पटवणं, अजिबातच कन्व्हिन्सिंग वाटत नाही. इथे 'हॅपी'प्रमाणे 'गुड्डू'ही जर एक जटीलबुद्धी दाखवला असता, तो नकोसा झालेला दाखवला असता, तर ते जास्त कन्व्हिन्सिंग वाटलं असतं किंवा इतर काही तरी मजेशीर 'प्लॅनिंग' तरी दाखवता येऊ शकलं असतं. गुड्डूची व्यक्तिरेखा पूर्णपणे दुर्लक्षितच ठेवली असल्याने किंवा 'बिलाल'वर जास्त फोकस ठेवायचं (अभय देओलला युएसपी मानून) ठरवलं गेलं असल्यामुळे (कदाचित) हा सगळा भाग कमजोर वाटला आहे. एकूणच 'गुड्डू' हा माणूस गुड फॉर नथिंगच वाटतो आणि त्यामुळे हे प्रेमप्रकरणही फुसकं वाटत राहतं.

पियुष मिश्रांचं 'काश अमुक-अमुक पाकिस्तान में होता'वालं पालुपद आणि उर्दूचा वापर जबरदस्त मजा आणतो ! खासकरून बग्गाशी होणारी त्यांची पहिली भेट, तर भारीच रंगली आहे ! एकदा स्वतंत्रपणे पियुष मिश्रांसाठीच हा सिनेमा पाहिला जाऊ शकतो, इतका 'उस्मान आफ्रिदी' जबरदस्त झाला आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री 'मोमल शेख' खूप आश्वासक वाटली. तिचा चेहरा 'दिव्या दत्ता + परिणीती चोप्रा' असं डेडली कॉम्बीनेशन आहे. तिच्या चेहऱ्यावर सूक्ष्मतम भावही खूप सुंदरपणे उमटतात. डायनापेक्षा ती खूपच जास्त देखणी दिसली आहे.

निखळ, कौटुंबिक विनोदाचा जमाना राहिलेला नसताना आणि त्याचा दर्जाही खालावलेला असताना पिकू, मिस तणकपूर हाजीर हो, हॅपी भाग जायेगी सारखे सिनेमेसुद्धा येत असतात. हे प्रमाण खूप कमी आहे, पण तेव्हढाच दिलासा मिळत राहतो.
'हॅपी..' चं बॉक्स ऑफिस ओपनिंग कमी होतं पण हळूहळू वाढत जाईल, अशी लक्षणं दिसत आहेत. माउथ पब्लिसिटीने जे सिनेमे गल्ला जमवतात, ते नक्कीच खास असतात आणि 'हॅपी..' खास आहेच ! पण भारतात चक्क 'टायगर श्रॉफ'च्या 'फ्लायिंग जट्ट' नामक पॉसिबली टाकाऊपटाला जास्त स्क्रीन्स मिळत आहेत आणि पाकिस्तानात 'हॅपी..' वर सेन्सॉरने बंदी घातली आहे ! टाकाऊपणाला हात जोडावे की मूर्खपणाला, समजत नाहीय.

चालायचंच... यथा डिमांड, तथा सप्लाय !

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-happy-bhag-jayegi.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप, मस्त आणि नेमकं परीक्षण . मी ही कालच हा सिनेमा पाहिला . चित्रपटात काही फ्लॉज जरूर आहेत, पण चित्रपटाचा वेग पकडून ठेवण्यात दिगदर्शक यशस्वी ठरलाय . वेगवान हाताळणीमुळे काही अनबिलिव्हेंबल प्रसंगही खपून जातात.

मला अभय देओलच काम मस्त आवडलं . वडिलांच्या धाकात असलेला आणि त्यांच्या इच्छेखातर राजकारणात आलेला , क्रिकेटची आवड असणारा , समंजस विचारी बिलाल अहमद छान साकारलेला आहे . पियुष मिश्रांचा भारतातल्या प्रत्त्येक चांगल्या गोष्टीवर काश अगर ये सब पाकिस्तान मैं होता हा संवाद भारी . एकंदरीतच आफ्रिदी ही व्यक्तिरेखा भन्नाट जमलीये.
डायना पँटीची हॅपी ही मध्यवर्ती भूमिका असूनही काही विशेष प्रभाव पडलेला नाही. परीक्षणात लिहिल्याप्रमाणेच हॅपी म्हणून ती कन्व्हिसिंग वाटत नाही.बग्गा हे राजा अवस्थीच एक्सटेंशन . जिमी शेरगीलने भूमिका चांगली केलीये पण तो अश्या भूमिकेत स्टीरिओटाइप होतोय आता.. गुड्डू हि ठीकठाक . झोयाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री पाकिस्तानी आहे हे आताच कळालं . मस्त एक्स्प्रेशन दाखवलेत तिने चेहऱ्यावर. दिसतेही सुंदर .

एकंदरीत काही मस्त निखळ मनोरंजनात्मक बघायचं असेल तर हॅपी भाग जायेगी हा चांगला पर्याय आहे. अगदी खळाळून हसू नाही आलं तरीही चित्रपट बघताना चेहऱ्यावर स्मित हे नक्की उमटतचं.

थोडक्यात चित्रपट आवडण्याची कारणे --
1) वेगवान हाताळणी
2) पियुष मिश्रा, अभय देओल , झोया ( खरं नाव माहीत नाही ) यांचा अभिनय
3) न केलेला टिपिकल शेवट.
4) काही मजेशीर संवाद . उदा. अभय देओलचा मधुबालाविषयीचा डायलॉग

छान परीक्षण, आणि छान चित्रपट,
हॅपी च्या व्यक्तिरेखेबद्दल सहमत, ती "जब वी मेट " च्या गीत सारखी लिहायचा प्रयत्न केला आहे, पण तितकी एक्सटाब्लिश होत नाही.
त्या मानाने झोया ला जास्त वाव मिळाला आहे असे वाटते (वेग वेगळ्या शेड्स दाखवायला)

बाकी पहिला अभय देओल च्या बॅटिंग चा सीन पाहून (अभय पाकिस्तान मधून आलाय कळल्यावर, एक सरदार पोरगं त्वेषाने बॉलिंग करून त्याची विकेट काढतं), खेळ आणि देशभावना वाल्या पोस्ट आठवल्या Happy

बघायला हवा.
अभय देओल हा नेहमी हटके चित्रपटांत असतो आणि जिमी शेरगील हा देखील बरेचदा अश्या चित्रपटांचा भाग असतो. दोघे माझे आवडते आहेत आणि एकत्र आहेत हे कारण पुरेसे आहे, वरच्या बघायला हवा साठी. बाकी परीक्षण वाचून तर आता नक्कीच. कारण काही वेगळेपण बघायला मिळणार असेल तरच हल्ली आयुष्यातील दोन अडीज तास खर्ची घालावेसे वाटतात.

बघावासा वाटतोय.. हे वाचून.
जिमी कुठल्याही रोल मधे असला तरी चालतो मला.

निखळ विनोदी चित्रपट शेवटचा कुठला बघितला होता, तेच आठवावे लागतेय !

कॉकटेल मधे दिपिका ला आधी चॉईस दिला होता, कुठला रोल करायचा याचा Happy असे वाचले होते मी.

पाहिला काल, टाइमपास आहे.
अभय देओल किलर हॅडसम दिसतो आणि मस्तं काम करतो.
गालपे डिंपल पडे है, उसमे ़कितने दिल पडे है :).
बाकी पाकिस्तानी दिसतो कि नाही माहित नाही.
डायनाचं अ‍ॅक्टींग अगदीच अ‍ॅव्हरेज, आलीया भट्ट हवी होती तिथे .
पियुष मिश्राचा रोलही चांगला आहे.

जब वी मेट सारखा आहे असं वर वाचले... त्यात करीनाने मस्त काम केले होते. इथली डायना जरा थंड वाटलीच होती आधीच्या सिनेमात पाहिली होती तेव्हा. दिसायला मस्त आहे म्हणुन चालवुन घेईन.
अ.दे. चे सिनेमे चांगले असतात... (खरंतर देओल बंधुंचे बरेच सिनेमे चांगले असतात, गाजले नाही तरी).

'Jab We Met' was a different kind of poetry.>>>+१०००

बाकी चित्रपट अ. दे साठी पाहिला जाईल...

काल पाहिलाच शेवटी . मस्त आहे . मी एक्टीच खिदळत होते .
उत्तरार्ध जरा जास्त मजेशीर आहे.

होश बातों का अक्सर नहीं था
दिल हमारा तो शायर नहीं था
तूने लिख दी यह तक़दीर वरना
इश्क़वाला मुक़द्दर नहीं था >>>>>>>>>>>... अगदी वाह! झालं ऐकुन .

कथानक विचित्र योगायोगावर कमजोरपणे आधारलेलं असलं, तरी >>> पूर्ण पॅरा ला अनुमोदन . गुड्डुला जरा आणखी वाव हवा होता . फारच निकम्मा वाटतो तो.

मोमल शेख फार गोड आणि ग्रेसफुल आहे.

काही काही सिन्स/डायलॉग धमाल आहेत
१.हॅप्पी , रशीद लालाला शिव्या देते तेन्व्हा त्याची रिएक्शन
२.बग्गाची मौसिकि
३."वासिम अक्रम ????"
४.हुमारी शादी तोडनेमे पडोसी मुल्क का हाथ है .
५.आप इस गाडी मे मुजरिमोन्का पीछा करते हो ?
६. बग्गाचा "यारा ओ यारा"
७.आफ्रिदी पकिस्तानात परत आल्यावर , फोनवरच त्याच आणि बिलाल च कोड लॅन्गवेज मधलं बोलणं .
७.आणि बगाचं सारखं " तेरे भाई की... " करत बोलणं आणि त्यावर बाजूच्याचं कनफ्युज होणं
आनि बरेच काही .

पण जवीमे मधली गीत मनाला भिडते , पटते तशी हॅप्पी नाही . कुठेतरी काहीतरी राहून जातं

चित्रपट अभय देओल साठी नक्की पाहण्यात येईल.डायना च्या जागी दुसरी कुठली तरी हिरोईन घ्यायला हवी होती.पिक्चर ला पण अजुन पब्लिक मिळाल असत.

काही काही सिन्स/डायलॉग धमाल आहेत
१.हॅप्पी , रशीद लालाला शिव्या देते तेन्व्हा त्याची रिएक्शन
२.बग्गाची मौसिकि
३."वासिम अक्रम ????"
४.हुमारी शादी तोडनेमे पडोसी मुल्क का हाथ है .
५.आप इस गाडी मे मुजरिमोन्का पीछा करते हो ?
६. बग्गाचा "यारा ओ यारा"
७.आफ्रिदी पकिस्तानात परत आल्यावर , फोनवरच त्याच आणि बिलाल च कोड लॅन्गवेज मधलं बोलणं .
७.आणि बगाचं सारखं " तेरे भाई की... " करत बोलणं आणि त्यावर बाजूच्याचं कनफ्युज होणं
आनि बरेच काही .

>> +११११११११११११

डायनानेही काम चांगलं केलं आहे, पण ह्या रोलसाठी ती शोभतच नाही>>> कन्गना राणावत पाहिजे होती. डायना cocktail मध्ये सुद्दा खास वाटली नाही. तिकडे दिपिका पदुकोण भाव खाऊन गेली. इथे अभय देओल भाव खाऊन गेला.

त्याचा सिनेमातला 'लव्ह इंटरेस्ट' कायम त्याला बोहल्यापर्यंत नेऊन पळून जाणारा असतो>>> 'मेरे यार की शादी है' पासूनची परम्परा आहे त्याची हि. तरी बर, 'मोहब्ब्ते' मध्ये प्रीति जान्गियानीचा मेलेला नवरा परत आला नाही म्हणून तिकडे जिमी लकी ठरला.

डायनानेही काम चांगलं केलं आहे, पण ह्या रोलसाठी ती शोभतच नाही>>> कन्गना राणावत पाहिजे होती. डायना cocktail मध्ये सुद्दा खास वाटली नाही. तिकडे दिपिका पदुकोण भाव खाऊन गेली. इथे अभय देओल भाव खाऊन गेला.

त्याचा सिनेमातला 'लव्ह इंटरेस्ट' कायम त्याला बोहल्यापर्यंत नेऊन पळून जाणारा असतो>>> 'मेरे यार की शादी है' पासूनची परम्परा आहे त्याची हि. तरी बर, 'मोहब्ब्ते' मध्ये प्रीति जान्गियानीचा मेलेला नवरा परत आला नाही म्हणून तिकडे जिमी लकी ठरला.

अभय आणि जिमी दोघपन आवडते..
बघणार नक्कीच..
मोहब्बतें वाला जिमी डोक्यात फिट होता माझ्या.. त्यानंतर मधेले कुठले त्याचे सिनेमे पाहिलेच नाही..मग एकदम अ वेनस्डे च्या अवतारात त्याला पाहिल्यावर ऑऑऑऑऑ झालं होत माझं Biggrin

जिमी शेरगिल ने छान काम केलं आहे. पियुश मिश्रा तर वादच नाही.
मोमल शेख मुख्य अभिनेत्रीपेक्षा खूपच सुन्दर दिसते. मला एका क्षणी वाटत होतं ....जाउदे मग ती जिमीलाच मिळो.
गूड्डूच्या आणि हॅपी च्या प्रेमात काही स्पार्क जाणवला नाही... कदाचित त्यामुळेच शेवटपर्यंत काहीही होउ शकतं असं वाटत राहतं.
पण असो एकंदरीत मजा आली..

आणखी एक आठवला :

बग्गाचा चमचा , बग्गाला :
प्राजी मेन लाईन तो बोलो.ईनको लगता है ..
सिरियस वाटणारा सिन एक्दम खुदकन हसवतो.

रच्याकने , ती मोमल शेख , जावेद अहमद ( अभय देओल चे जे वडिल दाखवले आहेत) त्यांची खरी मुलगी आहे.

मग एकदम अ वेनस्डे च्या अवतारात त्याला पाहिल्यावर ऑऑऑऑऑ झालं होत माझं>>> माझ सुद्दा. वाटल नव्हत, लव्हर boy चा एकदम रफ-टफ हिरो होईल त्याचा म्हणून. गुलजारच्या 'माचीस' मध्ये होता तो.

एका चित्रपटात तो सोनाली कुलकर्णीचा (सिनियर) हिरो होता. नाव नाही आठवत त्या चित्रपटाचे.

>>>एका चित्रपटात तो सोनाली कुलकर्णीचा (सिनियर) हिरो होता. नाव नाही आठवत त्या चित्रपटाचे
जहा तुम ले चलो (सो-कुल, निर्मल पांडे, जिमी शेरगिल)

रच्याकने , ती मोमल शेख , जावेद अहमद ( अभय देओल चे जे वडिल दाखवले आहेत) त्यांची खरी मुलगी आहे.

>> आयला ! हो की !!

त्यानंतर मधेले कुठले त्याचे सिनेमे पाहिलेच नाही.>>>> मुन्नाभाई सिरीजमधले त्याचे काम पाहीलेस का? मस्त काम केल होत त्याने दोन्ही पार्टमध्ये.

माफ करा, पण शेरगीलचे संवाद ऐकताना मला बोर होतं. एकाच पट्टीत उगीचच खालच्यात खालचा आवाज काढुन बोलतो. त्याच्या आवाजात चैतन्यच नसते कधी.

नायक म्हणून नशीब आजमावायला आले आणि निदान सहनायक म्हणून तरी तगले असे अलिकडच्या काळातले जिमी शेर्गिल, अर्जून रामपाल आणि सोनू सूद असे मोजकेच अभिनेते आहेत...

अनेकजण काळाच्या गर्तेत वाहून गेले... उदा. जुगल हंसराज, उदय चोप्रा, चंद्रचूड सिंग.....अ‍ॅन्ड सो ऑन!

माफ करा, पण शेरगीलचे संवाद ऐकताना मला बोर होतं >>> ईश्श्श्श्श्श्श्श्श . माफी काय मागायची सुनिधी.
प्रत्येकाची आवड असते गं .

आम्हाला लहानपणापसून( खरतर 'हासिल' पाहिल्यापासून) हेच शिकवण्यात आलं आहे की जिमी शेरगिल ही ऐकण्याची नाही , पहायची आणि अनुभवायची गोष्ट आहे . त्यामुळे कधी त्याच्या संवाद फेकीकडे लक्श दिलं नाही Wink .
त्याचा आवडलेला आणखी एक चित्रपट म्हणजे साहब , बिबी और गँगस्टर Happy

आता रसप येतील , या सर्वांचा चित्रपटाशी काय संबध . मुद्द्याच बोला ( :पळा , पळा: )

सव्स्ती Happy
'पेशल चब्बीस' पाहिलाय की... पण अक्षयकुमार असला की बाकी कोणी दिसत नाही, आठवत नाही Happy
शेरगील वाईट अभिनेता नक्कीच नाही फक्त आवाजात अजुन चढऊतार आण रे.

Pages