एक निखळ मनोरंजन - 'हॅपी भाग जायेगी' (Movie Review - Happy Bhag Jayegi)

Submitted by रसप on 28 August, 2016 - 03:49

आशयसंपन्नता किंवा आशयचमत्कृतीच्या अट्टाहासापायी शायरी स्वत:ची लय हरवत चालली आहे. अर्थपूर्ण शब्द अनेकदा लिहिले जातातही, मात्र त्यांना आवर्तनाच्या गणितात स्वरबद्ध करत असताना त्यांची कुतरओढ होते. खरं तर 'आधी शब्द आणि नंतर चाल' ही पद्धती कधीच मोडीत निघाली आहे. कदाचित त्यामुळेही चालीनुसार शब्द गुंफत जाताना खूप काही सॅक्रीफाईस करावं लागत असावं. चालीसुद्धा आजकाल 'इसीजी' सारख्या वर-खाली होत असतात. त्यांचा हा धसमुसळा स्वभावही बऱ्याचदा शब्दांच्या नाजूक प्रकृतीला झेपणारा नसतो.
कारण काहीही असो पण -

होश बातों का अक्सर नहीं था
दिल हमारा तो शायर नहीं था
तूने लिख दी यह तक़दीर वरना
इश्क़वाला मुक़द्दर नहीं था

- असे घट्ट बांधलेले शब्द आजकाल सिनेसंगीतात सहसा ऐकायला मिळत नाहीत. 'हॅपी भाग जायेगी' खूप हसवतो. पण सोबतच -

ज़रासी दोस्ती कर ले
ज़रासा हमनशीं बन जा
ज़रासा साथ दे बस फिर
चाहे अजनबी बन जा

- असे मनात रेंगाळणारे काही शब्दही सप्रेम भेट देऊन जातो.

चित्रपटाची कहाणी पंजाब आणि पाकिस्तान ह्या भागांतली असल्यामुळे संगीतावर पंजाबी व सूफी संगीताची छाप आहे. ऐकणेबल (अजूनही मी 'सुश्राव्य' असा शुद्ध, शास्त्रीय शब्द वापरणार नाहीच !) संगीताची माझ्या तरी कानांना सवय राहिलेली नाही. ही सगळी गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत. फार क्वचित असं वाटतं की गाणी पूर्ण हवी होती !

ह्यासाठी अगदी सुरुवातीलाच गीतकार 'मुदस्सर अज़ीज़' (बहुतेक) आणि संगीतकार सोहेल सेन ह्यांना मनापासून दाद !

'मुदस्सर अज़ीज़'नी फक्त गीतलेखनच नव्हे तर कथा व पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अश्या तीन आघाड्या सांभाळल्या आहेत. लेखन, दिग्दर्शन एकाच व्यक्तीचं असल्यामुळे एक प्रकारचा 'एकजिन्नस'पणा 'हॅपी भाग जायेगी' मध्ये जाणवतो.

'हॅपी भाग जायेगी' एक वेगळा सिनेमा आहे. कारण 'कॉमेडी म्हणजे वाह्यातपणा' असं एक समीकरण सध्या बनलं आहे. किंबहुना तसं जर नसलं, तर लोकांना पुरेसं हसूही येत नाही. त्यामुळे 'यथा डिमांड, तथा सप्लाय' होत राहतो. 'हॅपी..' मात्र हे समीकरण बाजूला ठेवतो. आहेत, काही कमजोर जागाही आहेत. पण हे वेगळेपण त्यापेक्षा महत्वाचं ठरतं.

सिनेमातल्या एका व्यक्तिरेखेच्या नावावरुन सिनेमाचं शीर्षक असलं की संपूर्ण सिनेमा हा त्या व्यक्तिरेखेभोवतीच फिरत राहणं आणि तीच व्यक्तिरेखा प्रमुख ठरणं हे स्वाभाविक आहे. 'हॅपी'च्या भूमिकेत असलेली 'डायना पेंटी' मला 'कॉकटेल' मध्येही 'सो-सो'च वाटली होती. ती भूमिका खरं तर खूप वाव असलेलीही होती, पण - कदाचित पहिलाच सिनेमा असल्यामुळे असेल - तिने काही कमाल वगैरे केलेली नव्हती. लक्षात राहावा, असं ते काम नव्हतंच. ती मुख्य भूमिकेत असणं, हे जरा पचायला जड जाणारं होतं. अभय देओल आणि जिमी शेरगिलसाठी पाहावासाही वाटत होता आणि इतकी सगळी 'डायना पेंटी' शान होईल असंही वाटत नव्हतं.
२-३ लोकांनी शिफारस केल्यावरच मी 'हॅपी..' पाहायला गेलो आहे.

And it paid off !
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे 'हॅपी' म्हणजेच 'डायना पेंटी' ही मुख्य भूमिकेत नाही. सिनेमा तिच्याहून जास्त अभय देओलचा आहे. डायनानेही काम चांगलं केलं आहे, पण ह्या रोलसाठी ती शोभतच नाही, असं वाटलं. 'हॅपी' ही एक रांगडी पंजाबी व्यक्तिरेखा आहे. बिनधास्त, निडर आणि कुणावरही वचक ठेवू शकेल अशी. हाडाडलेली, खप्पड डायना पेंटी इथे फिट्ट वाटतच नाही ! एक बिनधास्त पंजाबी मुलगी इतकी मरतुकडी असू शकते, हे मला तरी पटलंच नाही.

अभय देओल मात्र पाकिस्तानच्या राजकारणातील उगवता सूर्य असणारा 'बिलाल अहमद' सादर करताना पुन्हा एकदा समजून, उमजून अगदी तोलून मापून व्यक्त होत राहतो. त्याला क्रिकेटमध्ये करियर करायचं असतानाही त्याच्या वडिलांनी त्याला राजकारणात ओढलेलं असतं. नसानसांत क्रिकेट भिनलेला माणूस, फलंदाजीसाठी उभा राहताना इतका वाईट 'स्टान्स' कसा घेईल, हा नसानसांत क्रिकेट भिनलेल्या माझ्यासारख्या छिद्रान्वेश्याला पडलेला निरागस प्रश्न, मी स्वत:च अभय देओलसाठी डिस्काऊन्ट केला !

जिमी शेरगिलचा 'दमनसिंग बग्गा' 'तनू वेड्स मनू' मधल्या 'राजा अवस्थी' चंच दुसरं नाव असल्यासारखा झाला आहे. त्याचा सिनेमातला 'लव्ह इंटरेस्ट' कायम त्याला बोहल्यापर्यंत नेऊन पळून जाणारा असतो. त्याला बहुतेक अश्या भूमिकांत स्पेशलायजेशन करायचं असावं ! सहाय्यक भूमिकांत त्याचं स्पेशलायजेशन तर आताशा मान्य करायलाच हवं.

लाहोरचा पोलीस अधिकारी 'उस्मान आफ्रिदी' म्हणून 'पियुष मिश्रा'नी मात्र नुसती धमाल केली आहे ! पियुष मिश्रा हे एक अजब रसायन आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखल्याप्रमाणे घट्ट बांधलेली शायरी करणारा त्यांच्यासारखा दुसरा गीतकार नाही. गच्च बांधलेल्या पटकथा, संवादलेखनही ते करतात आणि वेगवेगळ्या छटांच्या भूमिकाही ताकदीने करतात !

अली फझलला फारसं काम नाहीय. पण तो खूप सहज वावरतो आणि त्याचे बोलके डोळे खूप फ्रेशही वाटतात.

RmUyQLf6.jpg

सिनेमाचं कथानक अगदी थोडक्यात सांगण्यासारखं आहे.
'हॅपी' (डायना पेंटी) ला 'गुड्डू' (अली फझल) शी लग्न करायचं असतं. पण बेकार, बिनकामाच्या गुड्डूशी लग्नाला 'हॅपी'च्या वडिलांचा (कंवलजीत सिंग) विरोध असतो. स्थानिक नगरसेवक दमनसिंग बग्गा (जिमी शेरगिल) शी तिचं लग्न ठरवलं जातं. मात्र ती लग्नाच्या मंडपातून पळून जाते. गडबडी अशी होते की ती गुड्डूकडे न पोहोचता थेट पाकिस्तानात लाहोरला बिलाल अहमद (अभय देओल) च्या घरी पोहोचते ! बिलालचं राजकीय भविष्य, हॅपी-गुड्डूच्या प्रेमाचं भविष्य, बग्गाच्या सामाजिक छबीचं भविष्य आता काय होणार ? ह्या प्रश्नाचं उत्तर सिनेमा देतो.

कथानक विचित्र योगायोगावर कमजोरपणे आधारलेलं असलं, तरी वेगवान पटकथा त्यात रंगत आणते. काही ठिकाणी अजून मजा आली असती, असं मात्र वाटलं. गुड्डूला पाकिस्तानला नेऊ देण्यासाठी बग्गाला पटवणं, अजिबातच कन्व्हिन्सिंग वाटत नाही. इथे 'हॅपी'प्रमाणे 'गुड्डू'ही जर एक जटीलबुद्धी दाखवला असता, तो नकोसा झालेला दाखवला असता, तर ते जास्त कन्व्हिन्सिंग वाटलं असतं किंवा इतर काही तरी मजेशीर 'प्लॅनिंग' तरी दाखवता येऊ शकलं असतं. गुड्डूची व्यक्तिरेखा पूर्णपणे दुर्लक्षितच ठेवली असल्याने किंवा 'बिलाल'वर जास्त फोकस ठेवायचं (अभय देओलला युएसपी मानून) ठरवलं गेलं असल्यामुळे (कदाचित) हा सगळा भाग कमजोर वाटला आहे. एकूणच 'गुड्डू' हा माणूस गुड फॉर नथिंगच वाटतो आणि त्यामुळे हे प्रेमप्रकरणही फुसकं वाटत राहतं.

पियुष मिश्रांचं 'काश अमुक-अमुक पाकिस्तान में होता'वालं पालुपद आणि उर्दूचा वापर जबरदस्त मजा आणतो ! खासकरून बग्गाशी होणारी त्यांची पहिली भेट, तर भारीच रंगली आहे ! एकदा स्वतंत्रपणे पियुष मिश्रांसाठीच हा सिनेमा पाहिला जाऊ शकतो, इतका 'उस्मान आफ्रिदी' जबरदस्त झाला आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री 'मोमल शेख' खूप आश्वासक वाटली. तिचा चेहरा 'दिव्या दत्ता + परिणीती चोप्रा' असं डेडली कॉम्बीनेशन आहे. तिच्या चेहऱ्यावर सूक्ष्मतम भावही खूप सुंदरपणे उमटतात. डायनापेक्षा ती खूपच जास्त देखणी दिसली आहे.

निखळ, कौटुंबिक विनोदाचा जमाना राहिलेला नसताना आणि त्याचा दर्जाही खालावलेला असताना पिकू, मिस तणकपूर हाजीर हो, हॅपी भाग जायेगी सारखे सिनेमेसुद्धा येत असतात. हे प्रमाण खूप कमी आहे, पण तेव्हढाच दिलासा मिळत राहतो.
'हॅपी..' चं बॉक्स ऑफिस ओपनिंग कमी होतं पण हळूहळू वाढत जाईल, अशी लक्षणं दिसत आहेत. माउथ पब्लिसिटीने जे सिनेमे गल्ला जमवतात, ते नक्कीच खास असतात आणि 'हॅपी..' खास आहेच ! पण भारतात चक्क 'टायगर श्रॉफ'च्या 'फ्लायिंग जट्ट' नामक पॉसिबली टाकाऊपटाला जास्त स्क्रीन्स मिळत आहेत आणि पाकिस्तानात 'हॅपी..' वर सेन्सॉरने बंदी घातली आहे ! टाकाऊपणाला हात जोडावे की मूर्खपणाला, समजत नाहीय.

चालायचंच... यथा डिमांड, तथा सप्लाय !

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-happy-bhag-jayegi.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कुणी ह्या अमक्या हिरवणी ऐवजी कंगना हवी होती असं म्हणलं की जाम डोकं फिरतं. मला ती प्रचंड आवडत नाही. तनु वेडस मनु च्या भैताडगिरीपासुन तर भलतीच नावडु लागलीय.

मला कुणी ह्या अमक्या हिरवणी ऐवजी कंगना हवी होती असं म्हणलं की जाम डोकं फिरतं. मला ती प्रचंड आवडत नाही. तनु वेडस मनु च्या भैताडगिरीपासुन तर भलतीच नावडु लागलीय. >>>>>>>>>>>>>>> +१

काल पाहिला. आवडला. डायना पंजाबन शोभत नाही, पण दिसण्यात जे घालवले ते तिने आरडा ओरडा करून काही प्रमाणात मिळवले. तिचे अपहरण केल्यानंतरचे त्या गोदामामधले प्रसंग चांगले आहेत.

चित्रपटाचे नाव जरी हिरोइनवरून ठेवले तरी अभय देओल बाजी मारून जातो. पाकिस्तानी कपड्यांमध्ये खूप हँडसम दिसलाय आणि वावरलाय. जिमी शेरगीलला तर आता सवयच झाली असेल असे रोल्स करायची. पियुष मिश्राने मजा आणली. मॊसिकी तर खूप भारी.

चित्रपटाला बर्याच कमकुवत बाजू असूनही तिकडे दुर्लक्ष करता येते. काही वेळा अगदी मनापासून हसू येते. एका क्षणी मला वाटले की हा पाकिस्तानी आता भारतीय हॅप्पीच्या गळ्यात पडणार आणि भारतीय गुड्डू पाकिस्तानी झोयाच्या. पण तरीही शेवटी तो झोयाकडे परततो तेही तितकेच कनविन्सिंग झाले. झोया बिलावलचे सीन्स जास्त चांगले वाटले.

बाकी पाकिस्तानी आणि भारतीय लोक असे एका दिवसात व्हिसा बिसा मिळवून मुम्बैतून पुण्यात जावे तसे एकमेकांच्या देशात फिरतात हे पाहून डोळे भरून आले Happy

वैजंती | 7 November, 2016 - 09:16 नवीन
ती मोमल शेख नम्रता शिरोडकर सारखी वाटली.

>>
+ १

झोया बिलावलचे सीन्स जास्त चांगले वाटले. >>> भनायक मस्त झाले आहेत ते सीन्स. जेन्व्हा तिला कळतं की तो हॅप्पी मध्ये गुंतत चालला आहे , त्यावेळी तिची रिअ‍ॅक्शन , एकदा तो तिला घरी सोडतो तेन्व्हा ती आय लव यु म्हणून उतरते , तेन्व्हा तो ही केवळ उपचार म्हणून आय लव यु टु म्हणतो. आणि ती उतरल्यावर झपकन गाडी घेउन जातो आणि ती मागे वळून बघते.
त्यान्च्या साखरपुड्याची अनाउन्स्मेन्ट होते , तेव्हा फोटो काढताना त्याची ओढाताण - मस्तच आहेत .

तो आय लव्ह यू वाला सिन खूप मस्त आहे, मलाही आवडला. त्या सिनच्या आधीचे सीन्स पाहून हे दोघे एकमेकांबरोबर अजिबात सुखी नाहीयेत/भविष्यातही नसणार हे वाटायला लागते आणि हा सिन बघून खात्री पटते. आणि एवढं अंतर असतानाही शेवटी ते दोघे एकत्र येतात ते मजबुरी म्हणून नाही तर प्रेमापोटी हे एरवी पटले नसते पण इथे पटते.

कालच पाहिला.. खूप आवडला.
अभय देओल आणि ती झोया.. यांचे काम जबरदस्त झाले आहे. त्यांच्यातले सगळेच सीन मस्त..!
पहिल्यांदा हॅपी अभय ला सांगते. तुम इससे शादी कर रहे हो.? तेव्हा आपल्यालाही हाच प्रश्न पडतो.. पण ती मॅच्युअर आहे हे पुढे कळतं.. जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिलेत तिने पूर्ण चित्रपटात.. हॅपी आणि गुड्डू पेक्षा बिलाल आणि झोया जास्त छान वाटले..

कालच हा चित्रपट परत पाहिला . आणि परत तेवढीच खो खो हसले .
विनोदाच्या जागा न जागा माहिती होत्या त, त्यामुळे प्रत्येक वेळेला नवर्याला , आता बघ हं , आता ऐक हं .. वगैरे चालू होतं .
मज्ज्जा आली .

Pages