स्वातंत्र्योत्तर गरीबीचे मरणोपरांत भोग आणि सर्वव्यापी क्लीन चीट....

Submitted by अजातशत्रू on 26 August, 2016 - 01:38

स्वातंत्र्योत्तर गरीबीचे मरणोपरांत भोग आणि सर्वव्यापी क्लीन चीट.......
ओडिशात जे घडलं त्याला जगाच्या पाठीवर तोड नसेल. तरी एक खोटं समाधान आहे की, दाना मांझी या गृहस्थाचे नशीब थोर म्हणावे लागेल कारण आपल्याकडच्या तपासयंत्रणांनी बायकोचा खून करून मृतदेह पळवून नेल्याचे आरोप त्याच्यावर लावले नाहीत. या संपूर्ण प्रकरणात भवानीपटणाच्या वैद्यकीय प्रशासनास व जिल्हा प्रशासनास आज लगोलग घाऊक क्लीनचीटचे जे वाटप करण्यात आले ते मात्र भुवया उंचावणारे वगैरे नाहीये. कारण आपल्याकडे अशा क्लीन चीटचा सर्वव्यापी सुकाळ झालाय.

गरिबीच्या झळा सोसणारा हतबल झालेला नवरा, त्याच्या खांदयावरचा बायकोचा मृतदेह आणि शेजारची अश्रू ढाळत उभी असलेली अभागी मुलगी. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य म्हणजे बधीर प्रशासनाच्या असंवेदनशील कारभाराचे आणखी 'जिवंत' उदाहरणच म्हणावे लागेल. या घटनेत दोषारोप झालेल्या लोकांना क्लीन चीट देण्यात जी तत्परता ओडिशाच्या आरोग्य विभागाने दाखवली तितकी तत्परता जरी रुग्णसेवेत दाखवली असती तरी ही लाजिरवाणी घटना घडली नसती. असो...या घटनेने जागतिक पातळीवर आपली जी काही नाचक्की व्हायची होती ती झाली आहे...

मरण आल्यावर माणूस त्याच्या यातनेतून मुक्त होतो, पण मेल्यानंतरही यातनेच्या पीडेतून या मृतदेहाची मुक्तता झाली नाही, असेच म्हणावे लागले. प्रशासनातील लोकांच्या दगडाच्या काळजामुळे एका पतीला आणि बारा वर्षांच्या मुलीला आपल्या आईचा मृतदेह खांद्यावरून १२ किलोमीटरपर्यंत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळी आली. मरणानंतर त्यांची पुढची यात्रा सुखकारक होवो, अशी श्रद्धा ठेवणाऱ्या देशातले हे क्लेशकारक सत्य आहे. हा प्रकार काल ओडिशातील कलाहंडी जिल्ह्यात घडला.

रामपूर तालुक्यातील मेलघारा या अतिमागास गावचा रहिवासी असणारया दाना माजी यांच्या पत्नीचा आजारामुळे बुधवारी सकाळी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. तिला क्षयाचा आजार झाला होता. त्याने चांगले उपचार मिळावेत म्हणून तिला गावापासून ६० किमी अंतरावरील भवानीपटणा इथे नेला ही त्याची चूक ठरली आणी तो अत्यंत गरीब होता ही दुसरी महत्वाची चूक होती. पत्नीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मृतदेह घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याची विनंती माजी यांनी रुग्णालयातल्या जवळपास सगळ्यांनाच केली. पण दुःखाचा डोंगर आणि गरिबीने हतबल झालेल्या या याचकाला मदत करावी, असे कोणालाही वाटले नाही. त्यांच्या दुःखाने एकाही पाषाणहृदयी माणसाला पाझर फुटला नाही शेवटी हतबल झालेल्या दाना यांनी आपल्या पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून खांद्यावर घेतला आणि रुग्णालय ते घर असे ६० किलोमीटर अंतर पायी तु़डवण्याचा एकमेव पर्याय स्वीकारला. ते तब्बल बारा किमी अंतर आपल्या पत्नीच्या कलेवरासह चालले देखील ! वाटेत काही ठिकाणी खांदे भरून आले की ते खांद्यावरचा मृतदेह सडकेच्या कडेला ठेवत आणि पुन्हा एकट्यानेच तो देह आपल्या खांदयावर घेत. विशेष म्हणजे हे सर्व ते करत असताना रस्त्याच्या दुतर्फा बघे लोक तमाशबीन बनून उभे राहत होते. त्यांना मृतदेह खांद्यावर वाहुन नेताना पाहून काही स्थानिकांनी संबधित प्रशासनाला याची माहिती देत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे विदारक चित्र जगासमोर आलेही. यावर जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारले असता 'आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली असती पण रुग्णवाहिकेची वाट बघण्यासाठी दाना थांबले नाही', असा खुलासा त्यांनी केला होता. पण दुसरीकडे 'पैसे नसल्याने रुग्णवाहिकेची सोय करावी अशी विनंती सगळ्यांना केली होती पण कोणीही माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही', असा आरोप दाना यांनी केला आहे. दाना यांना मृतदेह वाहून नेताना पाहून पुढेच ४८ किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. वास्तविक या राज्यात कोणत्याही व्यक्तीचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह हा रुग्णालय ते घर नेण्यासाठी निःशुल्क रुग्णवाहिकेची व्यवस्था सरकारने केली आहे. परंतु, असे असतानाही मृतदेह खांद्यावर वाहुन नेण्याचे दुदैवी प्रकार अनेकदा घडले आहेत. बहुतेक मांझीनी काही पैसे लाच म्हणून दिले असते तर त्यांना ही मोफत सेवा त्यांना मिळाली असती मात्र त्यांच्याकडे तितकेही पैसे नव्हते !

या घटनेवरच्या छापील व बधीर प्रतिक्रिया अधिक अस्वस्थ करून गेल्या ;
कलहंडीच्या जिल्हाधिकारी वृंदा डी - " या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून रुग्णवाहिकेची सोय केली. गरीब व निराधार व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या सरकारच्या "हरिश्‍चंद्र योजने‘नुसार मात्झी कुटुंबाला सर्व मदत करण्याची सूचना मी तहसीलदारांना दिली आहे, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनाही सहकार्य करण्यास सांगितले आहे."

बी. ब्रह्मा, मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी, भवानीपटणा - अनंग माझी ही मंगळवारी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा मृत्यू त्याच रात्री झाला. रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांना न कळविताच दानूने मृतदेह परस्पर नेला.

कैलाससिंह देव, खासदार, बिजू जनता दल - या घटनेची संपूर्ण चौकशी करून योग्य कारवाई करण्याची सूचना स्थानिक मंत्र्यांना दिली आहे.

खरे तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी "महापरायण‘ ही योजना फेब्रुवारी महिन्यात अमलात आणली आहे. यात मृतदेह रुग्णालयातून संबंधित गावी पोचविण्यासाठी सरकारतर्फे निःशुल्क वाहन व्यवस्था केली जाते. मृतदेह वाहून नेण्यासाठी राज्यातील ३७ सरकारी रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ४० वाहनेही उपलब्ध करण्यात आली आहेत. तरीदेखील ही लांच्छनास्पद अन माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडावी हे अत्यंत क्लेशदायक आहे. विशेष म्हणजे कालच ओडिशातीलच बालासोर येथे आणखी एक अशीच घटना घडली होती ज्यात ८० वर्षे वयाच्या वृद्ध आईचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर बांबूला टांगून नेण्यात आला होता.

आसपास इतकं भयंकर आणि पोटात गोळा आणणारया घटना सदोदित घडत असूनही माणसं, समाज, गावे, नगरं, शहरं. महानगरे, राज्यं आणि देश स्वप्नातील विविध बेगडी घटनावधानात दंग होऊन आत्ममग्न स्तुतीत गढून गेला आहे हे चित्र सृजन मनाला विद्ध करणारे आहे.

देशाच्या एका कोपरयात काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडत असताना मी 'नऊ थर की चार थर' याविषयीच्या ढाकूमाकूमच्या आवाजात बुडून गेलेल्या अन सेलिब्रिटीनी विकत घेतलेल्या मंचावरच्या ओंगळवाण्या दृश्यांनी भरलेल्या बातम्यात गुंतलो होतो याची काल मला मनोमन लाज वाटली ....

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in

_90915345_mancarriesbodyofhiswife-1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदारक आहे ! खुप चिड आली आहे समाजाची
बरे पण मिडायाचे लक्शात आल्यावर मिडीयाने जर ती व्यवस्था केली असती तर मीडीयाही गौरवास्पद ठरली असती पण नुसते चित्रण दाखुन मोकळे होतात. समाजही मोबा. फोटो काढण्यापुरता राहीला आहे.

मेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणे म्हणतात ना ते हेच. समीर, फार विदारक घटना तुम्ही लिहीलीत. मी खरच आत्ताच हे वाचले. फार संताप होतो असे वाचले बघीतले की. सरकार काय नी सरकारी बाबु काय नी मिडीया काय, सगळे सारखेच.

तुमचा हा लेख वाचून मन एकदम विषण्ण झाले आहे. गरिबाचे जीवन म्हणजे नरक करून टाकले आहे व्यवस्थेने आणि समाजाने. भयंकर संताप येतो आहे. यापुढे कोणावरही ही वेळ येऊ नये.

माणुसकी फक्त पैशाने मिळते आणी त्याची सवय आम्हीच लावली. याला त्याला बोलुन काही उपयोग नाही.
स्वतःपासुन सुरुवात हेच अंतिम सत्य.

आसपास इतकं भयंकर आणि पोटात गोळा आणणारया घटना सदोदित घडत असूनही माणसं, समाज, गावे, नगरं, शहरं. महानगरे, राज्यं आणि देश स्वप्नातील विविध बेगडी घटनावधानात दंग होऊन आत्ममग्न स्तुतीत गढून गेला आहे हे चित्र सृजन मनाला विद्ध करणारे आहे.>>>>>>>> +1

अतिशय भयंकर घटना. समाज दिवसेंदिवस दगडी होत चाललाय.

>>>>> बी. ब्रह्मा, मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी, भवानीपटणा - अनंग माझी ही मंगळवारी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा मृत्यू त्याच रात्री झाला. रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांना न कळविताच दानूने मृतदेह परस्पर नेला. <<<<<<
हे तारे तोडले आहेतच की..... Angry

सगळेच जण दगड झाले आहेत का अशी शंका यायला लागलीये. प्रत्यक्ष न्यूज चॅनेल वर हे दाखवत होते. मन पिळवटल, मनात विचार आला ह्या जागी मी असतो तर ? लोकांच्या भावना इतक्या दगडी झाल्यात का कि १२ किलोमीटर चालेपर्यंत एकही माणसाला दया ना यावी ? महासत्ता बनायला निघालेल्या भारताला हेच विचारावासा वाटतं जिथे किमान सुविधा नाहीत जिथे वैद्यकीय सुविधा पण मिळत नाहीत तिथे तुम्ही महासत्ता होणार म्हणजे नक्की काय होणार आहेत? फक्त आर्थिक प्रगती करणार का ? महासत्ता बनताना माणुसकी मेली तर त्याचा काय उपयोग?

या न्यूज चॅनल वाल्यांनी घटनेचं प्रक्षेपण केलं पण एकालाही आपल्या ओबी व्हॅन मधुन तो मृतदेह न्यावासा वाटला नाही?? Angry