केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग १

Submitted by पद्मावति on 27 August, 2016 - 08:09

काही गावं, जागा आणि शहरं वर्षानुवर्षे भेटूनसुध्दा आपल्याशी फटकून वागतात तर काही अगदी तटस्थ, अनोळखी राहतात. काही मात्र आपल्याला पहिल्या भेटीमधेच स्वत:च्या धाडकन प्रेमात पाडतात..... केप टाउन हे शहर हे निर्विवादपणे या तीसरया प्रकारात येतं.

स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश, भर वस्तीत असूनही सतत असलेली निसर्गाची साथ, सभोवताली उधाणणारा महासागर, एका हाकेच्या अंतरावर असलेले द्राक्षांचे मळे, तर श्वास घ्यावा इतक्या सहजतेने या शहरात भिनलेला आणि रमलेला देशाचा मानबिंदू असा एकमेवाद्वितीय टेबल माउंटन!!!

आयुष्यात कधीतरी साऊथ आफ्रिकेला जायला पाहिजे अशी माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. तिथला अप्रतिम समुद्र, जंगल सफारी, गार्डन रूट आणि जमलंच तर इथून एका फ्लाइटच्या अंतरावर असलेला विक्टोरीया फॉल्स.... पण प्रत्येक वेळेस कधी सुट्टी नाही, तर कधी बजेट नाही तर कधी मुलांना घेऊन एव्हडा दहा अकरा तासांचा प्रवास करण्याची हिंमत नाही अशा कारणांमुळे बेत बारगळतच गेला. पण शेवटी या वेळेस मात्र आम्ही 'अब चाहे सर फुटे या माथा...' असे म्हणत तयारी सुरू केली. अर्थातच वरच्या सर्व कारणांमुळे फार महत्वाकांक्षी बेत ठरवणार नव्हतोच. बरीच काटछाट केल्यानंतर शेवटी केप टाउन, गार्डन रूट आणि सफारी साठी क्रुगर नॅशनल पार्क असा प्लान ठरला.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जायच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विमानतळावर जाऊन पोहोचलो. चेक इन च्या रांगेत आमचा नंबर आला. सगळी कागद पत्रे बघीतल्यावर काउंटर वरच्या मुलाकडून प्रश्न आला की तुमची मुलं अठरा वर्षांखालची दिसताहेत त्यांचा जन्मदाखला कुठेय तो द्या...आता साऊथ आफ्रिकेत जातांना अठरा या वयाच्या खालील मुलांसाठी त्यांचा जन्म दाखला दाखवावा लागतो नाहीतर विमानात चढूच देत नाही ही आमच्यासाठी एक नवीनच माहिती होती. अर्थातच जन्मदाखले आमच्या सोबत नव्हतेच. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या मुलाला ''ओ, करून घ्या ना जरा अड्जस्ट...'' असे म्हणून बघितले. पुढच्या वेळी मुलांचेच काय पण आमचेही जन्माचे दाखले देईन असेही शपथेवर सांगितले. पण त्याने मला '' काहीही हां काकू......" टाइप लुक्स दिले आणि तातडीने आमचे दुसर्या दिवशीच्या फ्लाइट मधे बुकिंग करून तो मोकळा झाला...असो.

दुसर्या दिवशी पुन्हा अ ब क ड.. लवकर उठा, एक दीड तासांचा घर ते विमानतळ प्रवास, चेक इन ची लाइन, सेक्यूरिटी इत्यादी प्रकार करत शेवटी विमानात जाउन बसलो आणि दहा अकरा तासांनंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी केप टाउन मधे येऊन पोहोचलो.
हॉटेल साधंच पण सोयीच्या मध्यवर्ती ठीकाणी होते. रूम वर जाउन आंघोळ केली आणि ताजेतवाने झालो. रूममधेच पटकन कॉफी, बिस्किटे असलं काही बाही खाल्लं. हॉटेलच्या मालकिणबाई उर्सुला खाली होत्या त्यांच्याकडून नकाशे घेतले आणि गावात फेर फटका मारायला बाहेर पडलो.

ही काही क्षणचित्रे...

आम्ही जिथे राहत होतो त्या भागाचे नाव होतं बो काप. तेथलं वैशिष्ट्य म्हणजे ही रंगीत संगीत घरे.

bo kaap 1.jpgbo kaap 3.jpgbo kaap 2.jpg

इथला सगळ्यात लोकप्रिय भाग म्हणजे विक्टोरीया अँड आल्बर्ट वॉटरफ्रंट. केप टाउनची शान. अतिशय सुंदर आणि उत्साहाने सळसळता असलेला हा भाग. काय नाही इथे? रोज संध्याकाळी इथे चक्कर मारली तरीही कंटाळा येणार नाही इतक्या गोष्टी करायला. पाण्याच्या कडेने असलेले रस्ते, बसायला बेंचेस. सायकलींग करा, स्केट बोर्डींग, वॉक करा. सगळीकडे स्वच्छता आणि सुव्यवस्था.
सर्व प्रकारची असंख्य उपाहार गृहे, पब्स, कॅफेस. शॉपिंग साठी हाय एण्ड ब्रॅंड्स मॉल पासून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणारे, तिथल्या वस्तू विकण्यासाठीचे दुकानं, स्टॉल्स. मुलांसाठी एक छानसं अक्वेरियम तीथे आहे आणि एक मोठा आकाश पाळणा देखील. त्या आकाश पाळण्यात बसून संपूर्ण शहर आणि समुद्र असा नजारा उंचीवरुन बघता येतो . फारच सुंदर दृष्य असतं ते.

v & a.jpgv & a again_0.jpgcity 4.jpg

शहरात फिरतांना टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे. शक्यतो हॉटेल वाल्याने ठरवून दिलेल्या टॅक्सी आम्ही वापरायचो पण एक दोन वेळेस रस्त्यावर टॅक्सी केली ती पण सुरक्षितच वाटली. दुसरा पर्याय तो म्हणजे हॉप ऑन- हॉप ऑफ बसेस. अगदी मस्तं भरवशाची सर्विस. आरामात बसच्या वरच्या मजल्यावर बसून केप टाउन फिरा. एखादी सुंदर जागा दिसली की त्या स्टॉप वर उतरा, कुठेतरी छान लंच करा मग पुन्हा बस मधे चढा. शहरात फिरतांना जाणवतं की निसर्गाची साथ इथे कधीच सुटत नाही.

city2.jpgcity.jpgcity3.jpgcity 1.jpg

केप टाउन हे शहर बाकी साऊथ आफ्रिकेच्या तुलनेत अतिशय सुरक्षित आहे. आम्ही मुलांना घेऊन रात्री उशिरा जरी परतलो तरीही आम्हाला कुठे भीती अशी वाटली नाही. नाही म्हणायला आमच्या हॉटेल मधे संध्याकाळ नंतर ग्रिलचा दरवाजा लावून घेण्याची पद्धत बघितली. आम्ही आलो की इंटरकॉम वरुन आल्याचं सांगायचो मग दार उघडल्या जायचं.

रात्री परतल्यावर उर्सुलाकडून दुसरया दिवशी कुठे फिरावं या बाबतीत विचारणा केली. त्यावर तिने सांगितले की येथील हवामान खूप लहरी आहे. त्यामुळे कुठेही जायचं असल्यास वेळेवरच बेत ठरवावा. खास करून टेबल माउंटन च्या बाबतीत. सकाळी उठल्यावर त्या डोंगराकडे बघावं डोंगरावरती ढगांचा पडदा दिसल्यास प्लान कॅन्सल. हवा चांगली नसेल तर वरती जायच्या केबल कार्स बंद ठेवतात.

टेबल माउंटन तर बघायचाच होता त्यामुळे दुसर्या दिवशी हवामान चांगले असु दे अशी आशा करत आम्ही झोपी गेलो.....

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर... छानच शहर आहे हे.
इथल्या टी व्ही वरच्या अनेक कार्यक्रमात याचे सतत दर्शन होत असते, मला पण खुप जायची इच्छा आहे. खास करुन तिथल्या गार्डन मधली प्रोटीआ फुले बघायला.

वर्णन आणि फोटो आवडले. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. Happy

ह्यापुर्वी ही एकदा केप टाऊन आणि क्रुगर बद्दल एक मालिका वाचली होती (आयडी आठवत नाही). जायला आवडेल तिकडे प्रवासाकरता.