नाचणी पिठाचे लाडू

Submitted by सुलेखा on 24 August, 2016 - 03:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नाचणी पिठ २ वाटी
तूप अर्धी वाटी
बदाम पुड अर्धी
जवस / फ्लेक्स सीड १/२ वाटी
बीया काढलेला खजूर १ वाटी साधारण २० नग खजुर
सालासकट वेलची १० ते १२ व १ चमचाभर साखर

क्रमवार पाककृती: 

नाचणी पिठ मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर १-१-१ मिनिट भाजुन घ्या. त्यात तुप घालुन ढवळा व पुन्हा १-१ मिनिट भाजुन घ्या. प्रत्येक १ मिनिटानंतर चमच्याने पिठ छान ढवळुन घ्या.
वेलची सालासकट २० सेकंद मायक्रोवेव्ह मधे भाजुन घ्या. ह्या वेलचीत साखर घालुन मिक्सरमधे बारीक पुड करुन घ्या
जवस १-१ मिनिट मायक्रोवेव्ह मधे भाजुन घ्या.त्याची मिक्सरमधे बारीक पुड करुन घ्या.
मिक्सरच्या भांड्यात थोडे पिठ साधारण २/३ चमचे त्यावर खजूर घालुन मिक्सरमधे फिरवुन घ्या असे केल्याने पिठाबरोबर सर्व खजुर छान बारीक होईल व ओलसर मिश्रण तयार होईल.
या मिष्रणात वेलची पुड, बदाम पुड, जवसाची पुड घालुन सर्व मिश्रण हाताने छान एकत्र करा.
आता या मिश्रणाचे गोल लाडू वळा.

अधिक टिपा: 

नाचणी लाडू साठी अतिरिक्त साखर्/गूळ घालायचा नाही. खजुराची गोडी पुरते.
नाचणी पिठ थोडेसे उग्र चवीचे असते त्यासाठी वेलची पुड वापरायची आहे.
जवसाची महती सगळ्यांनाच माहिती आहे.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी . नाचणीचे पीठ आम्ही भाकरी आणि आंबील करायलाच वापरतो . आमच्या कडे घरची असते नाचणी आणि त्यामुळे पीठ ही नेहमी असतं घरी आता असे लाडू करून पाहीन .

जवसाचं प्रमाण किती घ्यायचं? (वर घटक पदार्थात दिसत नाहोये). मला जवस चटणी अजिचबात आवडत नाही पण गुणकारी आहे हे माहिती असल्यामुळे कधीतरी खाल्लं जावं असं वाटतं. नाचणी सत्त्व कधीतरी आवडतं पण नाचणीही फार आवडीची नाही. पण हे लाडू आवडतील असं वाटतंय. मस्त रेस्पी आहे.

प्रज्ञा जवस अर्धी वाटी घ्यायचे आहेंत. इतर पदार्थां बरोबर भाजलेल्या जवसाची पूड मिळुन येते.साहित्यात जवसाचे प्रमाण लिहित आहे.

उत्तम आरोग्यदायी पाककृती. मी नेहमी साखर किंवा गुळ घालुन लाडु करते आता असे पण करुन बघेन, खजुर घालण्याची आयडीया आवडली. स्त्रियांनी आहारात नियमीतपणे नाचणी आणि खजुर दोन्ही घेतलं पाहिजे. कॅल्शियम आणि आयर्न दोन्ही मिळतं.

मी नाचणीच्या पिठाचे फुलके करतो. छान टम्म फुलतात. >>>>>> बी खरचं लवकर रेसिपी द्या, माझ्या नाचणीच्या भाकर्‍या नीट होत नाहीत, फुलके जमले तर बरचं होईल.

नक्की मुग्धा, आज घरी गेल्यानंतर नाचणीचे फुलकेचं करणार आहे तेंव्हा फोटो घेईन. मग उद्याला तुला इथे कृती दिसेल.

मस्त आहे रेसिपी. खजुराच्या चिकटपणामुळे तूप कमी लागेल ही आयडिया फारच आवडली.

अग्रजच्या एका दुकानात मध्ये जवस-अक्रोड-गूळ असे काळ्याकुट्ट रंगाचे लाडू दिसले. त्या रंगाला घरच्या सदस्यांनी निषेध नोंदवूनही उत्सुकता म्हणून आणले Proud छान होते चवीला.

मुग्धा आपण नाचणी सत्व वापरुन लाडू, खिर किंवा दूधात घालुन देतो.पण नाचणी पिठाचे गुण माझ्या मते जास्त आहेंत. खजुर गोड आणि ओलसर असतो .जवस चटणी फार खाल्ली जात नाही.त्यामुळे हा प्रकार सुचला आणि केला. बदाम पुड सालासकट केली.अर्थात ती एच्छिक आहे. पण एकुण लाडू चवीला उत्तम .
हर्ट नाचणीचा गरम फुलका छान लागतो.

अगो. तूप कमीच लागते. नाही घातले तरी चालते. असेही हे लाडू खाताना बेसनाच्या लाडवांसारखी तूपाची चव येत नाही.केमिकल विरहित गूळामुळे रंग गडद येणारच.

जवस चटणी फार खाल्ली जात नाही>>>

जवसाची चटणी लसूण घालून केली की छान होते. जवस शुष्क असल्याने तेल घालून बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत खूपच छान लागते!..

जवस आणि खुरसणी(कारळं) ह्या चटण्या सारख्याच..