एका अस्सल नटरंगाची गाथा ....

Submitted by अजातशत्रू on 22 August, 2016 - 11:15

चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू अतिक्रमणच करून गेली.त्यांची मुले मोठी झाली पण कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण 'अशा' माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट...

नेटमुशाफिरीत रवि जाधवांची जुनी मुलाखत वाचनात आली अन 'त्यां'च्या त्या घटनेची आठवण झाली…….
दूरदर्शनवरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली…
त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली त्यातून एका कलाकाराची जिंदगानी कशी उद्धवस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.

ती घटनाच तशी होती मुलाखतीत ते रडत होते, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर ते बोलत होते, "या माणसाला मुलगी कशी काय असू शकते ? शक्यच नाही, आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का जे आम्ही यांची मुलगी करू ? यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार ! आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडिल "हे"आहेत म्हणून ! यांना चालत असेल पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे ! आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे टाळी वाजवून थोडेच भागणार आहे का ? लोक असंच काहीबाही बोलत रहायचे आणि लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीचा भावनांचा बांध तुटत होता, ती कोलमडून गेली होती… मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता. समाजाने फार वाईट वागणूक दिली, माझ्या अभिनयाची शिक्षा बायको पोराना भोगावी लागली. ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले होते" इतके बोलून ते पुएन्हा धाय मोकलून रडू लागले. बोलताना भावना अनावर झालेले ते ज्येष्ठ अभिनेते अभिनेते गणपत पाटील होते.

त्यांच्या 'आत्ता ग़ बया' ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती, पण ह्या जीवघेण्या अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. 'नटरंग' आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती. २००५ च्या झी गौरव पुरस्कारात त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अन त्याचे क्लिपिंग यापासून प्रेरणा घेऊन रवी जाधव यांनी नटरंग बनवला खरा, पण तेंव्हा ते हयात असते तर त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले असते…

गणपत पाटलांचा जन्म १९२० मधला, कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले व खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली. एका कार्यक्रमाच्या दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.

त्याच सुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.

चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.

बायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची . प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात, अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार,चंद्रकांत यांची नावे समोर येतात. जयश्री गडकर, लीला गांधी, सीमा ते उषा नाईक - उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील !

गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. बालध्रुवमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. १९४९ मधल्या 'मीठभाकर'ने त्यांना ओळख दिली. 'राम राम पाव्हणं' ने शिक्का मारला तर १९५१ च्या 'पाटलाचा पोर'ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या 'छत्रपती शिवाजी'मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. १९५७ मधला 'सांगत्ये ऐका' त्यांची दखल घेण्यास भाग पाडून गेला. १९६०मधल्या 'शिकलेली बायको'ने त्यांचे बस्तान पक्के केले. १९६३ मधील 'थोरातांची कमळा'ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्या नंतर आलेल्या १९६४ मधल्या 'पाठलाग', 'सवाल माझा ऐका', 'वाघ्या मुरळी' या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसनसात भिनला. १९६५ मध्ये आलेल्या 'केला इशारा जाता जाता'ने त्यांना स्टार कलाकारांईतके महत्व आले. १९६५ च्या 'मल्हारी मार्तंड' आणि 'रायगडचा राजबंदी'ने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. १९६७ -'बाई मी भोळी' आणि 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' आणि 'सांगू मी कशी' 'सुरंगा म्हनत्यात मला', 'छंद प्रीतिचा','धन्य ते संताजी धनाजी' पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र १९६८च्या 'एक गाव बारा भानगडी'ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. १९६९ मधील 'खंडोबाची आण' व 'गणगौळण' मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण १९७०च्या 'अशी रंगली रात' आणि 'गणानं घुंगरू हरवलं' या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले. १९७१ च्या 'अशीच एक रात्र' आणि 'लाखात अशी देखणी'ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र १९७१ मध्ये दादांच्या 'सोंगाड्या'ने त्यांना नाव दिले अन समाजाने त्यांचे नाव घालवले.

एका अनधिकृत माहितीनुसार एकोणीसशे सत्तरच्या दरम्यानच्या काळात मुलाच्या वियोगाचा गणपतरावांना मोठा धक्का बसला. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यातून ते बाहेर यावेत यासाठी शेवटी पुन्हा भालजी पेंढारकरच पुढे सरसावले. त्यांनी १९७२ मधील 'सख्या सजना'त पाटलांना मोठा रोल दिला. हा पाटलांचा सर्वात मोठा रोल ठरला. गणपतरावांच्या मुलाची त्याचे मित्र आणि सहकारी गणपत पाटलांच्या फिल्मी भूमिकांवरून नेहमी टवाळी करत इतकीच माहिती या प्रकरणी समोर आली मात्र त्याने आत्महत्या नक्की का केली हे कळू शकले नाही. हे दुःख विसरायला पाटलांनी पुन्हा तोंडाला रंग फासला तेंव्हा त्यांच्या मनात नेमक्या काय भावना असतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. यानंतर आलेल्या अनेक सिनेमात १९७२ - 'पुढारी' १९७४ - 'सून माझी सावित्री', 'सुगंधी कट्टा' १९७६- 'जवळ ये लाजू नको' १९७८ - 'कलावंतीण', 'नेताजी पालकर' १९७९ - 'ग्यानबाची मेख', 'हळदी कुंकू' १९८० - 'मंत्र्याची सून', 'सवत' १९८१- 'पोरी जरा जपून' १९८१ - 'तमासगीर' १९८२ - 'दोन बायका फजिती ऐका', 'राखणदार' १९८७ - 'बोला दाजिबा', 'इरसाल कार्टी' १९९०- 'थांब थांब जाऊ नको लांब' १९९३ - 'लावण्यवती' २००६ - 'मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे' हे चित्रपट मुख्य गाजले.

गणपत पाटील जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण,उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव पर्यंत कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाच्याचे काम गणपत पाटलांना दया असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा हेका असे. त्यामुळे ते तिकडे फिल्मी दुनियेत रमत गेले अन इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पना करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले मात्र अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

4JUN10U.jpg
चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या 'रंग नटेश्वराचे' मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा 'विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी २००५ चा 'झी जीवनगौरव पुरस्कार' हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा. ३ जून २००६ रोजी सुलोचना दीदी आणि निर्माते दिग्दर्शक किरण शांताराम यांच्या हस्ते 'चित्रभूषण' पुरस्कार मिळाला तेंव्हा, ८६ वर्षे वयाचे गणपत पाटील मंचावरच धाय मोकलून रडले त्यावेळी तरी मराठी चित्रपटसृष्टीतील तारे तारकांना गलबलून आले असावे का हा प्रश्न बेचैन करतो. त्यांना पुरस्कार प्रमाणपत्र देऊन त्यांचा अश्रूंचा बांध थांबवताना शेवटी सुलोचना दिदींनी आपल्या या उपेक्षित आणि व्यथित भावाच्या पाठीवरून हात फिरवला मग कुठे ते रडायचे थांबले ! त्यांच्यातील कलावंताचा आत्मा किती तळतळला असेल याचे हे जिवंत प्रतिकच होते.
काही मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या रिअल लाईफवरती आणखी एक सिनेमा निर्माण करण्याचा प्रोजेक्ट मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा विचाराधीन आहे.

२३ मार्च २००८ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला.
मला कधी कधी वाटते की त्या विश्वनिहंत्याने देखील त्यांना एकदा टाळी वाजवून 'आत्ता गं बया !' म्हणायला लावले असेल अन तोही मनमुराद हसला असेल. पण यांच्या डोळयातले अश्रू त्यालाही कदाचित कळले नसतील...

आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली. आज सहज स्मरण झाले म्हणून त्यांच्या स्मृतीना दिलेला हा उजाळा…
या गुणी पण अभागी अभिनेत्यास सलाम …

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in

ganpat patil.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख...

सख्या सजणा बद्दल थोडेसे..

या चित्रपटाची कथा पण अशीच होते, एक नर्तिका ( उषा चव्हाण ) पैज हरते म्हणून तिला नाच्याशी ( गणपत पाटील ) लग्न करावे लागते, पण ती जिद्दीने त्या नाच्यातला पुरुष जागवते अशी कथा होती.

लताने बर्‍याच वर्षानंतर या चित्रपटासाठी लावण्या गायल्या होत्या.. त्यातल्या दोन आठवताहेत.

सख्या सजणा नका तूम्ही जाऊ, तूम्हावीणा एकली कशी राहू.

आणि

गत करु काई, कळं ना गं बाई, सजण शिपाई परदेसी

नेहमीप्रमाणेच छान लेख .
गणपत पाटलांच्या हालअपेष्टांविषयी पुर्वीही वाचलं होतं , अशा गुणी कलाकारांची दयनीय अवस्था वाचुन मन विषण्ण होतं.

विषण्ण झालं वाचून..
तुम्ही खूपच छान लिहिताय.समाजातील उपेक्षित आणि कायम उपहास वाट्याला आलेले अनुभव वाचून खूप अस्वस्थ होतं.

छान लेख Happy त्यांच्या हाल-अपेष्टांची कल्पना करू शकतो... (सध्याच्या काही कार्यक्रमांमध्ये पुरुषांनी बायकी वेषात काम करणे अगदीच कॉमन झालेय. पण ते आजच्या काळात असते, तर त्यांच्या अभिनयाचे सार्थक झाले असते, की थिल्लर भुमिका वाट्याला येऊन माती, हे सांगणे मात्र अवघड आहे...)

सागर कारंडे, सुनील ग्रोव्हर, अली असगर इत्यादी लोकांचा कपिल शर्मा, हवा येऊ द्या मध्ये सध्या सलेला वावर, यावरून वरचे विधान करावेसे वाटले....

खूप चांगला लेख आहे.अस्वस्थ करणारा.
गणपत पाटील आताच्या काळात असते तर त्यांच्या भूमिका 'नो बिग डिल' असत्या.त्यांना प्रतिष्ठा मिळाली असती.
हल्ली प्रत्येक हिरो चॅलेंज म्हणून एकदातरी स्त्री भूमिका करतोच.
ही वॉज बॉर्न अहेड ऑफ टाईम Sad

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख!!!

गणपत पाटलांनी आयुष्यात जे सोसले ते वाचून खुप वेदना झाल्या. आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारा हा कलाकार मनातून किती रडला असेल ते खरंच कधीही समजणार नाही.

या गुणी पण अभागी अभिनेत्यास सलाम …>>>>> +१००

अतिशय सुरेख लेख आहे. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात असे घडावे ही दुर्दैवाची बाब आहे. समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

हल्ली प्रत्येक हिरो चॅलेंज म्हणून एकदातरी स्त्री भूमिका करतोच.>>>>
मला वाटत एखाद्या स्त्रीपात्राची भूमिका साकारणे आणि नाच्याची भूमिका साकारणे दोन्ही खुप वेगळ्या गोष्टी आहे..

गणपत पाटलांबद्दल इतका छान व विस्तृत लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.. _/\_

छान लेख!
सुंदर अभिनयामुळे, नशिबी आलेल्या दु:खाचं वाईट वाटलं. किती सोसावं लागलं असेल त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना. दुर्दैवी आहे हे! Sad

हो स्त्री पात्र आणि नाच्यात फरक आहे हेही खरेच.ते त्या सोंगाड्याच्या रोल मध्ये टाईप कास्ट केले गेले हे फिल्म सृष्टीचं चुकलं,त्यांना हे तोच तो पण वाले रोल पैश्याच्या गरजेमुळे स्वीकारावे लागले असतील.