पिंपळसमाधी ....

Submitted by अजातशत्रू on 20 August, 2016 - 02:27

नात्यांची एक कहाणी जी संपत्ती आणि माती यातील फरक उलगडते, एक कहाणी जी नात्यातला ओलावा आपल्या डोळ्यात आणते, एक कहाणी जी मुल्ये आणि वारसा यांचे महत्व सांगते... मना मनातली घालमेल जी प्रश्न बनून कदाचित प्रत्येकाच्या जीवनात कधी तरी समोर उभी ठाकते. तुम्ही कसा सोडवाल हा गुंता ? जाणून घ्यायचंय ? तर मग वाचा ....

नुकतेच कुठे झुंजूमुंजू झाले होते, निम्मं गाव अजून जागं झालेल नव्हतं अन गावच्या वेशीजवळून शिंद्यांच्या वस्तीवरचा प्रौढ वयाचा औदु अक्षरशः बोंब मारत ओरडत ओरडत गावात शिरला .......
“घात झाला, घात झाला ! वासुकाकानी जीव दिला !, माझ्या धन्यानं फास लावून घीतला! अरे पांडूरंगा तुझ्या दाराला लागली काठी ! असाकसा रे दावा साधलास ? घात झाला, आता मी कुणाकडे बघून जगू रे देवा ? असा कसा रे दुश्मन झालास देवा ? वासुकाका ओ काकाsss !! आमाला सोडून का गेलासा ?” त्याचा असा धावा सुरूच होता.
देवळाजवळ रामपारी गोळा झालेले काही लोक आणि नुकतेच पारापाशी आलेले काही रिकामटेकडे त्याच्या आक्रोशाने जागेवर थबकून गेले. त्यांच्या डोळ्यावरची झोप पाखरागत उडून गेली. त्याचा आवाज ऐकून शंकर गुरव तर मारुतीची पूजा अर्ध्यात थांबवून देवळाबाहेर आला अन खुळयागत पाठमोरया औदुंबराकडे बघत उभा राहिला. काही लोकांनी हातातली कामे टाकली अन जे ते पळणारया औदुंबरच्या मागे जाऊ लागले.
नेमके काय झालेय हे कुणालाच काही कळत नव्हते पण वासुकाकाच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट झालेय एव्हढे मात्र प्रत्येकाने ताडले होते.
धावतपळत आलेला औदु गावाच्या मधोमध असणारया वासुकाकाच्या वाड्यासमोर आला अन ‘धनी’ असे म्हणून मोठ्याने आर्त किंकाळी फोडून दारावर डोके बडवून घेऊ लागला. त्याच्या मागे धावत आलेल्या पोरासोरांनी त्याला दारापासून मागे ओढला, तरी त्याचे सगळे अंग थरथरत होते.त्याच्या डोळ्यातून संततधार वाहत होती. अनवाणी पायाने वस्तीतून थेट घरी आलेल्या औदूचे पाय पुरते ठेचकाळलेले होते.

घराबाहेरच्या तुळशीला पाणी घालून अन सूर्यनारायणाला नमस्कार करून नुकत्याच चुलीपुढे येऊन बसलेल्या यशोदाकाकूनी त्याचा गलका ऐकला अन औदुंबरच्या आर्त किकाळीने जागेवर भोवळ येऊन पडल्या. वासु काकाच्या तिन्ही सुना तरातरा बाहेर आल्या अन औदुला प्रश्न करू लागल्या,
“आण्णा, नीट सांगशीला का न्हाई ? काय झालंया ? का रडाया लागलासा ?”
एव्हाना त्यांची मुलेही तेथे आली, त्यांनी ओळखले की काही तरी आक्रीत झालंय. त्यांनी औदुंबरला नीट बोलते केले. इकडे सुनांनी यशोदाकाकुच्या तोंडावर पाणी मारून सावध केले. नाही म्हटले तरी अख्ख्या गावात बातमी कानोकानी झाली होती अन वासुकाकाच्या चौसोपी वाड्यासमोर ही गर्दी जमा झाली. ज्या बाया बापड्या वाडयाजवळ आल्या होत्या, त्या दारातनं थेटयाशोदाकाकूकडे गेल्या अन बायकांचा गदारोळ वाढत गेला. कोण काय म्हणतंय काही कळत नव्हते इतका आवाज वाढला. शेवटी औदुंबरने रडत रडत सगळी हकीकत सांगितली अन सर्वांचाच धीर सुटला. इतका वेळ धीराने उभी असलेली वासुकाकांची मुलं एकनाथ अन यादवराव या दोघांनीही कंबर खचल्यागत जमिनीवर बसकण मारली. वासुकाकांची नातवंडे सज्ज्यातून पळत खाली आली अन ती देखील अवसान गळाल्यागत भुईवर पडलेल्या आपापल्या बापाच्या गळ्यात पडून रडू लागली. आत बायांनी टाहो फोडले होते. घरातली सान लेकरेही आता जागी झाली अन त्यांचा जीव ह्या सगळ्या रडारडीने कावराबावरा झाला. या सर्वांचे पाणावलेले डोळे अन बायकांचा आक्रोश पाहून दारात गोळा झालेली माणसेही रडू लागली. बघता बघता सगळ्या गावावर शोककळा पसरली.

वासुकाका म्हणजे वासुदेव गोरक्षनाथ शिंदे. गावातल्या वयाने आणि मानाने जेष्ठ व्यक्तीपैकी एक. रामायणातली रामटाळी असो वा आषाढातली काकडआरती किंवा चातुर्मासातले किर्तन, वासुकाका सगळ्यात आधी हजर असणारच. सत्तरी पार केलेले वासुकाका गावातल्या पहिल्या टाळकरयांपैकी एक. गावातले पहिले मॅट्रिक शिकलेलं आता पिवळे झालेले हे पिकल पान. कोणाच्या अधेमध्ये नसणारा धार्मिक वृत्तीचा सांप्रदायिक अन सात्विक संस्काराचा हा मितभाषी जाणता माणूस. गावात कोणाच्याही घरचे तंटेबखेडे असोत वा कोणाचे जमिनीचे वाद असोत वासुकाकापाशी तो वाद आला की त्यावर ते नामी तोडगा काढत. अगदी पंचक्रोशीतल्या गावातली सगळी माणसे त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत. पापभिरू अन हसतमुख अशा या वासुकाकांना तीन मुले अन दोन मुली होत्या. जयवंत, एकनाथ अन यादवरावही मुले अन कृष्णा – कावेरी ह्या मुली. त्यापैकी जयवंत हा चांगले उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थाईक झालेला तर एकनाथ अन यादवराव हे गावातच आपल्या वडिलांच्या घरी असत. कावेरी अन कृष्णेची लग्ने चांगल्या घरी पण जवळच्याच गावांमध्ये देऊन केलेली होती. वासुकाकांच्या पोराबाळांना मुलेही त्यांच्या सारखीच लवकर झाली होती, त्या पोरांनाही आता नुकतेच मिसरूड फुटले होते. एकनाथ अन येदा दोघांच्याही बायका चांगल्या घरच्या गुणी मुली होत्या. त्यांनी आपल्या सासूसासऱ्यांच्या सेवेत कधी खंड पडू दिला नव्हता. मागील तीनेक वर्षात वासुकाकांचाथोरला मुलगा जयवंत याच्या गावाकडच्या चकरा मात्र खूप वाढल्या होत्या. येताना त्याच्या हाताशी आलेल्या पोराला तो गावाकडे घेऊन आल्याचे गावकरयांनी अलीकडे खूपवेळा बघितले होते. कृष्णा कावेरी देखील सणावाराला येऊन जात असत.
वासुकाकांचे वडिलोपार्जीत वीस एकरांचे शेत होते. काळीभोर जमीन होती अन बापलेक मन लावून काळ्या आईची सेवा करायचे, वर पांडुरंगाच्या कृपेने विहिरीला पाणीही बारमाही होते. त्यामुळे त्यांच्या शेतात सदा शिवार फुललेले असायचे, धान्याची कणगी भरलेली असायची अन कडब्याचे भले मोठे बुचाड लागलेले असायचे. गोठ्यातल्या जनावरांचे बक्कळ दुभदुभते घरात येत होते. वासुकाकांशी लग्न झाल्यापासून आपल्या नवरयाची सावली बनून राहिलेल्या यशोदेकडे तर सगळे गाव आपली आई म्हणून बघायचे. यशोदाकाकूकडे कोणी पदर पसरून गेलंय अन तिने त्याची नड भागवली नाही असे घडलेच नव्हते. आपला नवरा अन आपले कुटुंब हेच तिच्या जीवनाचे परिघ होते. वारकरी सांप्रदायातले घराणे असल्याने घरात देवधर्माची ओढ होती, घरातले वातावरण शांत असायचे, वासुकाकांची नातवंडेही अभ्यासात हुशार होती. हसतमुख चेहरयाचे हे घर म्हणजे गावाची शान होती.
नाही म्हणायला गावाला खटकणारी एकच गोष्ट अलीकड घडत होती, म्हणजे उतारवयाला लागलेल्या वासुकाकांचे सारखे सारखे शेतातल्या आडवस्तीत जाऊन राहणे. अलीकडे ते घरी कमी असायचे अन वस्तीवर जास्त. त्यामुळे त्यांचे देवळातले नित्यक्रमही ते चुकवू लागले होते. पण त्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते. अशा देवमाणसाच्या घरात डोकावणे अन त्यांच्यासारख्या मानी अन इमानी माणसाच्या वैयक्तिक प्रश्नात तोंड खुपसणे गावाला देखील मान्य नव्हते. त्यामुळे त्याच्या खुलाशाच्या भानगडीत कोणी पडले नव्हते. एव्हढे सर्व आलबेल असूनही वासुकाकानी आपला जीव का दिला असावा हा प्रश्न गावातल्या लोकांच्या डोक्यात नागानं फणा काढावा तसा उभा राहिला होता....

पन्नाशीच्या वयाचे विष्णू पाटील गावाचे सरपंच. इतर लोकांप्रमाणे ते देखील आपली सगळी कामे टाकून ते वासुकाकांच्या वाड्यावरआले. त्यांनी इशारा करून वासुकाकांच्या मुलांपैकी मधल्याला म्हणजे एकनाथाला बाहेर बोलावले. 'नेमके काय घडलेय' याचा काही अंदाज काढता येतो का ते त्यांनी जोखण्यास सुरुवात केली.
'थोरल्या जयवंताला सांगावा दिला का न्हाई ?', अशी विचारणा केली.
त्यांच्या या प्रश्नाने इतका वेळ आपल्या मनावर ताबा ठेवून असलेल्या एकनाथाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले मात्र हुंदके बाहेर पडत नव्हते. त्या सरशी विष्णू पाटलांनी पुन्हा तोच सवाल केला. तरीही एकनाथ नुसताच मुक्याने रडत होता. "आरं, काही बोलशील का नाही ? का नुस्ताच रडणार हायेस ?"
त्यांच्या या प्रश्नासरशी मात्र एकनाथ टाहो फोडून रडू लागला. त्या बरोबर आजूबाजूच्या माणसांनी कान टवकारले.
“तो मुंबैला गेलाय. कालच तो तिथून निघाला असल. तिथनं तडक गावाकडं येतो म्हटला होता. निघाला बी असंल. यीलच तो आता ! आपल्या बापाला पाणी पाजायला !"
त्याचे हे बोलणे ऐकून इतका वेळ हमसून हमसून रडत असणारा येदा म्हणजे यादवराव जोरात ओरडला, "नाव नग काढूस त्येचं ! त्येनं वाड्यात पाय ठिवला तर पाय कापून काढीन! माझ्या बाच्या अंगाला त्येचा हात लागला तर याद राखा, एकाला बी मी सोडणार नाही !......."
इतक्या वेळ स्वतःवर संयम राखून असलेला यादवराव आता छाती बडवत रडू लागला अन रडता रडता तो आपल्या पित्याला उद्देशून बोलू लागला- "आबा ह्या समद्या लोकांला कोण खरे सांगणार ? कोण सोडीवणार ह्यो गुत्ता ? का वो असा केलासा ? एक डाव आमच्याशी बोलायचे तरी हुतावो आबा !’
रागाने येदाचा चेहरा लालबुंद झाला होता आणि तरीही त्याचे अश्रू आणि आक्रोश काही केल्या थांबत नव्हते.
तो असा सैरभैर आक्रोश कारायला लागलेला पाहून एकनाथ त्याच्याजवळ गेला अन त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणाला.” आपण आपल्या आबाची पोरं हाव ना ? मग आपल्याला त्येनी असं बोलायला शिकवलंय का ? शांत हो येदा, माझ्या भावा ! पांडुरंगच आता काय तो न्याय करील.”
भावाभावातला हा संवाद ऐकून गावकरी मात्र पार गोंधळून गेले होते. 'वासुकाकाच्या घरात सगळं ठाकठीक नाही काही तरी ग्यानबाची मेख दडून हाय' हे एव्हाना सगळ्याना कळून चुकले होते. आपली पोक्त मुले असा कोलाहल करताना बघून यशोदाकाकुच्या अंगावर वीज कोसळल्यागत झाले, त्या लगबगीने पुढे आल्या अन दोन्ही पोरांच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाल्या, "गप बसा ! देवावर भरुसा ठेवा, रडून जगाला तमाशा दावायचा का ? आपला गुत्ता आता पांडुरगच सोडवील. आपले आबा आपल्यातच हायीत, ते आपल्याला सोडून कुठंबी जाणार न्हाईत."
आपल्या डोळयाला लागलेली धार आपल्या पदराने पुसत ती माय माऊली आपल्या मुलाना धीर देत होती खरं, पण ती स्वतःच या आघाताने एखादया जुनाट वडाच्या झाडाप्रमाणे उन्मळून गेली होती..

तिथला हा गोंधळ वाढताना पाहून विष्णू पाटलांनी येदाला आपल्याबरोबर घेतले आणि त्याला घेऊन ते शिंद्यांच्या वस्तीकडे निघाले. खरे तर त्यांच्या मनातसुद्धा या घटनेमागे काय नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा होती. पण ते विचारण्याची धमक गावातल्या कोणत्याच माणसात नव्हती कारण तेव्हढी पतच वासुकाकांच्या कुटुंबाने साभाळून ठेवली होती. विष्णू पाटलाच्या अगोदर गावातली काही तरुण मुले अन आजूबाजूच्या वस्तीवरची माणसे तिथे गोळा झाली होती. भैरूनाना जे गावचे पोलीस पाटील होते ते देखील हजर झालेले होते. गावाकडे येणारया रस्त्याच्या थेट सुरुवातीच्या हद्दीत हमरस्त्याला लागून वासुकाकाचे शेत होते.
एक पाय हमरस्त्याच्या सडकेवर अन एक पाय शेतात असं म्हटलं तरी चालल अशा मोक्याच्या जागेवर त्यांचे शेत होते. शेताला लागून असणारा रस्ता आता साधा राहिला नव्हता. तिथं आता जलदगती सुपर हायवे झाला होता. या रस्त्याच्या निमित्ताने जेंव्हा सरकारने गावकरयांच्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती तेंव्हा सर्वात आधी आवाज वासुकाकांनी उठवला होता. आजूबाजूच्या गावातली माणसे गोळा करून जिल्हा परिषद ते सडक बनवणारया ठेकेदाराच्या कंपनी ऑफिसपर्यंत त्यांनी खेटे मारले होते. सरकारी यंत्रणेकडून जमिनीला योग्य मोबदला यावा म्हणून अनेक अधिकारी अन पुढारयांचे उंबरठे झिझवले होते. लागेल तेव्हढीच जमीन सरकारने ताब्यात घ्यावी म्हणून त्यांनी जीवाचे रान केले होते. एव्हढ्या उतारवयात त्यांनी गावासाठी केलेला हा संघर्ष सगळ्यांसाठी चर्चेचा विषय झाला होता. पण त्यामुळेच सगळ्याना मुबलक पैसा मिळाला होता अन वासुकाकानाही त्यांच्या शिवाराचे पुढल्या अंगाचे काही गुंठे रान सडकेत गेल्यामुळे काही पैसा मिळाला होता. त्यांमुळे या मुद्द्यावरून या कुटुंबात असले काही घडले असेल असे विष्णू पाटलांना वाटत नव्हते. विचार करत करत त्यांची गाडी वस्तीला लागली....

वस्तीतले ते दृश्य कोणाही माणसाला हेलावून टाकणारे होते. शेताच्या मधल्या अंगाने विहिरीच्या कडेनं गेलेल्या दंडाला लागून एक बांधहोता, हा बांध थेट शेताच्या वरल्या अंगापर्यंत गेला होता. त्या बांधावर उंबराची अन चिंचेची झाडे होती., अन त्या झाडांच्या रांगेत शेवटी एक मोठे पिंपळाचे झाड होते. फार जुने अन फार मोठे असं ते जुनाट पिंपळपान होतं. तीन साडेतीन फुटाचा मोठा लठ बुंधाहोता. त्या झाडाच्या खाली वासुकाकाच्या वडिलांच्या अन आज्याच्या समाध्या होत्या. शेताला लागून सडक असल्याने हे पिंपळाचे झाड अन त्याच्याखालच्या ह्या शाळीग्रामच्या काळ्या कुळकुळीत ताशीव दगडातून केलेल्या स्वच्छ, देखण्या समाध्या कोणाचेही लक्ष वेधून घ्यायच्या. त्यामुळेच की काय गच्च बहरलेल्या मळ्यातले ते पिंपळाचे झाड म्हणजे वासुकाकाचे जीव की प्राण होते. एक वेळ कोंबडा आरवायला चुकेल पण वासुकाका रोज तिथ येऊन गेल्या शिवाय अन चार घटका तिथं घालवल्याशिवाय त्याना हायसे वाटत नव्हते. आज त्याच झाडाच्या सर्वात खालच्याफांदीला त्यांनी फास घेऊन आपला जीव दिला होता. विष्णू पाटलानी भैरूनानाच्या कानात कुजबुज केली अन पोराना हाताने खुणावल. तशी गोळा झालेली पोरे पुढे सरसावली अन त्यांनी लगबगीने वर चढून वासुकाकाचा निष्प्राण देह झाडावरून खाली उतरवला.

वस्तीतली त्यांचीच रोज पांघरायची गोधडी खाली अंथरण्यात आली अन त्यांचा देह त्यावर विसावण्यात आला तशी इतका वेळ अश्रुंचे बांध अडवून उभा असणारा येदा त्यांच्या अंगावर कोसळला अन लहान पोरांगत ओक्साबोक्शी रडू लागला. “आबा का गेलासा ? आमी आता कुणाकडं बघून जगायच वो आबा...बोला की वो आबा....रामकृष्ण हरी म्हणा वो आबा...टाळ वाजवा...भजन म्हणा ... गायी म्हशीच्या अंगावरून हात फिरवा. घरी नातवंडे तुमची वाट बघत्येत वो आबा...घरी जाऊन आईला आता मी काय सांगू ? तिला असं टाकून कागेला वो तुमी? माझ्या बहिणीना आता काय तोंड दावू वो आबा, काय तरी बोला वो...मनमोकळं करा वो, असं गपगुमान तुमाला जाता येणार नाही....द्येवा तुला बी असं कस गुमान घालून त्यास्नी न्यावं वाटलं रे ? आबा वो आबा उटा की ! चला, तुम्हाला काकड आरतीला जायाचं नाही का ?.. पांडुरगा का रे असा दावा मांडला ?" त्याचं हे रडणे आणि आक्रोश बघून जमलेली सगळी माणसे हेलावून गेली. अनेकांच्या डोळ्याला धारा लागल्या. आजूबाजूच्या वस्तीवरून गोळा झालेल्या बायांनी डोळ्याला पदर लावला अन त्या हुंदका देऊन रडू लागल्या. हा गलका ऐकून गोठ्यात इतका वेळ शांत उभी असलेली जनावरे बिथरली, ती मोठ्याने हंबरू लागली, जोराचे सोसाट्याचे वारे सुटले अन पिंपळपानांचा जणू पाऊस पडावा तसा सडा पडू लागला. वारया वाव्दानाचे रूप बघून विष्णूपाटील पुढे झाले, त्यांनी येदाला जवळ घेतले, ऊराशी कवटाळले. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला अन ते भैरूनानांच्या कानात पुन्हा कुजबुजले. बघता बघता सर्वांचे सांत्वन करून त्यांनी वासुकाकांचा देह गाडीत ठेवला ....

पाटलांनी त्यांची गाडी फिरवली अन गावाकडच्यादिशेने वळवली, त्या गाडीत मागचे सीट दुमडून वासुकाकांचा देह ठेवण्यात आला. त्यांच्या शेजारी येदा अन पुढे औदुंबरची बायको अन मुले बसली. खाच खळगे चुकवत हळूहळू ती गाडी त्या शेतातून पुढे निघाली. ज्या वासुकाकानी गावाला अनेक आदर्श घालून दिले, अनेक तंटेबखेडे सोडवले, ज्यांच्या घराचा सगळा गाव अभिमान बाळगायचे त्या घरातला आधारवड म्हणजे वासुकाका. त्यांनीच अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला होता. जो तो आपापाल्या परीने याचा अर्थ लावत होता. गाडीने वस्तीला वेढा घालून पुढे जाताना सर्वाना अश्रू अनावर झाले होते. येदा मोठयाने ओरडला "ये, आईं गं, बग बग तुजा राजा तुला सोडून चालला गं ! आता हितं दारं कोन धरणार ? मोट कोण बांधणार ? चारा कोण खाऊ घालणार ? कोण नांगर धरणार अन तुजी माती रोज आपल्या कपाळाला कोण लावणार ?" त्याचं रडणं सुरूच होतं आणि अखेर वासुकाकानी आपल्या शेतातून निरोप घेतला......

इकडे गावात त्यांच्या वाडयात हुंदक्यांचा हल्लकल्लोळ माजला होता. त्यांच्या दोन्ही मुली घरी आल्या होत्या. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. तिथल्या सगळ्यांच्या नजरा आता शेतातून येणारया वासुकाकांच्या पार्थिवाकडे होत्या. वेळ जड जात होता काटा पुढं सरकत नव्हता. इतक्यात वेशीत जयवंत त्याच्या मुलासह गाडीतून दाखल झाला. गावात उतरता क्षणी दिसलेले वातावरण त्याच्या समजण्याच्या पलीकडचे होते. गावातल्या माणसांच्या शोधक नजरा त्याच्यावर खिळून राहिल्या. त्या सरशी त्याच्या मनात गावात काहीतरी अघटीत घडल्याची शंकेची पाल चुकचुकून गेली. तो तसाच पुढे जाऊ लागला, तशी माणसे त्याच्या मागोमाग चालत येऊ लागली, त्याला जेंव्हा आपल्या वाडयाबाहेर मधमाशाच्या मोहोळासारखी माणसे दिसली तेंव्हा त्याच्या पायातले अवसान गळून गेले. घशाला कोरड पडली, जीभ आत ओढू लागली, चेहरा पांढरा फटक पडला. वाडयापुढच्या माणसामध्ये कुजबुज सुरु झाली, ‘जयादादा आला, जयादादा आला”.....

दाराशी आलेला जयवंत आतले दृश्य बघून थिजून गेला. यशोदाकाकूच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडणारया आपल्यां बहिणी बघून त्याला धक्का बसला,. दाराशी येऊन उभारलेल्या जयवंताला बघून गुडघ्यात डोके खुपसून रडत बसलेला एकनाथ पुढे झाला अन त्याने जयवंताला करकचून मिठी मारली अन त्याचा संयम तुटला. त्याने अश्रुना वाट मोकळी करून दिली, “दादा, आबा आपल्याला सोडून पांडुरंगाकडे गेलं रे ! दादा आपण आता पोरकं झालो रे! आई आन अक्काला आता तुच समजीव ! तुच आता निभावून ने रे दादा !!’ असे म्हणून एकनाथाने फोडलेला टाहो सगळ्यांना भारावून गेला.
काय घडलेय याचा जयवंतने अंदाज घेतला अन तो आईजवळ गेला. तिला कवेत घेतले, इतक्या वेळ रडत असणारया याशोदाकाकू जया आल्यावर अचानक शांत झाल्या होत्या. कृष्णा- कावेरी थिजून गेल्यासारख्या जयाकडे पाहत होत्या. जयाला काय बोलावे ते सुचत नव्हते. त्याच्या सर्व अंगाला कापरे भरले होते. तो सर्व बळ एक करून कावेरीकडे गेला तसा तिने त्याला जोरदार हिसडा देऊन त्याला दूर लोटले. अन ती मोठ्याने ओरडली, ‘ खबरदार, मुडदया याद राख माझ्या अंगाला हात लावशीला तर !”
त्या सरशी जमलेले सगळे लोक अवाक होऊन पाहत राहिले तशी यशोदाकाकू पुढे झाली अन कावेरीच्या डोक्यावरून तिने हात फिरवत डोळ्याने शांत राहायला खुणावले. तिथे आणखी काही तरी अघटीत घडण्याआधी झालेली हकीकत कानावर घालावी या हेतूने जयाला बाजूला घेऊन शेजारच्या अप्पा पवारांनी सर्व किस्सा सांगितला तसं जया पार हबकून गेला. त्याची बोबडी वळायचीच राहिली. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. सोबत आलेला त्याचा मुलगा देखील ह्या सगळ्या प्रकाराने भांबावून गेला होता ......

विष्णू पाटलांची गाडी वेशीतून येऊन वासुकाकांच्या वाडयाकडे निघाली तसा जमलेल्या लोकांनी गलका सुरु केला. दिस उगवल्यापासून गावात कोणाच्याही घरी चुल पेटली नव्हती. सगळा गाव जणू सैरभैर झाला होता, आपल्या लाडक्या भूमीपुत्राच्या अखेरच्या दर्शनासाठी तहानभूक हरपून सगळे तिथे गोळा झालेले होते. गाडीचे दार उघडून सावकाशपणे वासुकाकांचा देह बाहेर काढण्यात आला आणि गोधडीत लपेटलेला आपल्या बापाचा देह बघून कृष्णा कावेरीला अश्रू अनावर झाले आणि त्यांनी हंबरडा फोडला. अगदी आर्त स्वरात त्या आपल्या लाडक्या पित्याला आर्जव करू लागल्या. वासुकाकांचा देह दाराकडे तोंड करून ढेलजेतल्या भिंतीला टेकवून ठेवण्यात आला. लोक भरलेल्या डोळ्याने येऊन त्यांच्या पायावर डोके टेकवून आपले मन हलके करू लागले. यशोदा काकू त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या, त्यांचा देह बघून त्या थिजून गेल्या होत्या. कृष्णा, कावेरी आपल्या वडिलांच्या अंगावर डोके टेकवून रडत होत्या. आपल्या वडिलांचा देह आत घेऊन आलेल्या येदाची नजर बाहेर उभ्या राहिलेल्या आपल्याथोरल्या भावावर, जयावर पडली अन त्याचा संताप अनावर झाला, नकळत हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन पुढच्याच क्षणी तो त्याच्या अंगावर धावून गेला. आता काहीतरी विपरीत घडणार हे ओळखून बेगीने याशोदाकाकू ओरडल्या.’येदा जागेवरच थांब....आपल्या आबाचं सागणं इसारलास काय ?’

आईच्या बोलण्याने येदा जागेवर मुठी आवळत तिथेच उभा राहिला, रागाने लालाबुंद झालेला येदा स्फुंदत होता. समोरच्या शिसवी खांबावर हाताच्या बुक्क्या मारू लागला. दहा हत्तीचं बळ अंगी असलेला येदा रागानं नुसता थरथर कापत होता. त्याचा तो अवतार बघून जयाला धडकी भरली. तो वाडयाबाहेर निघून आला. या सर्व प्रकाराने दाराबाहेर उभे असलेले गावकरी आपसात कुजबुज करू लागले तसं वडिलांच्या पायाशी बसलेला एकनाथ उठला अन त्याने येदाला जवळ जाऊन आपल्या मिठीत घेतले अन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तो त्याला शांत करू लागला. येदाला त्याने वासुकाकांच्या पायाशी नेऊन बसवले. बाहेर उभ्या असलेल्या जयवंताजवळ एकनाथ गेला आणि त्याने त्याला हाताला धरून घरात आणले. जयाच्या मुलालासुद्धा त्याने पोटाशी धरले. गावकरी अवाक होऊन सगळे दृश्य बघत होते....

दुपार टळून गेली आणि दूर शहरात राहणारी वासुकाकांची एकुलती एक बहिण त्यांच्या वाड्यात रडत रडतच आली तेंव्हा शांत झालेल्या बायाबापड्यानी एकच टाहो फोडला. आपल्या वृद्ध भावाच्या तोंडावरून हात फिरवताना तिला भरून आले होते. आता बाहेर जमलेल्या पै पाहुण्यांनी चुळबुळ सुरु केली. मयतीचे सामान आले आणि सर्व सोपस्कार पार पडून वासुकाकांचा देह तिरडीवर ठेवला. त्यांची अखेरची आरती झाली. राम कृष्ण हरीच्या गजरात टाळकरी पुढे आणि मागे गावकरी त्यांना आपल्या खांदयावर घेऊन निघाले.
शेतातल्या पिंपळाच्या झाडाजवळच त्यांची चिता रचण्यात आली होती. त्यावर त्यांचा देह ठेवण्यात आला. गवरया लावण्यात येऊ लागल्या. विष्णू पाटलांनी वासुकाकाना अखेरचे पाणी पाजण्यासाठी त्यांची मुले मुली आणि यशोदाकाकूला पुढे बोलावले. सर्वांनी आपल्या पित्याच्या ओठावर पाणी सोडले. भाळी बुक्का लावलेला वासुकाकांचा गोरापान सुरकुतलेला चेहरा त्यावेळी खुप तेजस्वी वाटत होता. झुकेलेल्या कानाच्या पाळ्या अन ओघळलेले ओठ त्यांचे प्राण निघून गेल्याचे खुणवत असले तरी चेहरामात्र ते आता काही तरी बोलतील इतका बोलका आणि प्रसन्न वाटत होता. त्यांच्या मुखात तुळशीपत्र ठेवून चेहरा गोवरयाने कायमचा झाकण्यात आला. त्यांची चिता आता पूर्ण रचून झाली होती. अग्नी देण्यासाठी रिवाजाप्रमाणे थोरल्या मुलाला जयवंताला पाटलांनी पुढे बोलावले. तसं इतका वेळ शांत बसलेला येदा अंगात वाऱ्याचे उफान याव तसं उसळून पुढे आला आणि म्हणाला.” थांबा, आबाला अग्नी दादा देणार नाही...त्येच्या पायी माझं आबा गेल्येत..एकनाथा माज्या भावा तुज्याच हाताने दहान दे रे माझ्या आबांना !”

जमलेले लोक अवाक झाले, एकनाथ गांगरून पुढे झाला तसं येदा म्हणाला “ मी ह्यात तरी आता कोणाचंच काय ऐकणार नाही, आन जर का माझं ऐकलं नाही तर मीच चितेत उडी घिवून जीव दीन .'
एव्हढा वेळ शांत उभा असेलला जयवंत आता मात्र साफ कोलमडून गेला होता. तो चितेवरच पडला आणि मोठ्यामोठ्याने धाय मोकलून रडू लागला, ‘आबा मला माफ करा. मला छातीशी घ्या आबा. चुकलो मी आबा...मला तुमच्या पदरात घ्या आबा..अस गुमान जाऊन नका आबा...मला निदान माफ तरी करा...मी तुमचा दोषी आहे...येदा बरोबर सांगतोय, माझीच सगळी चूक आहे. मी तुमचा घोर अपराधी आहे. चूक माझी होती आणि तुम्ही सजा स्वतःला करून घेतलीत. असं का केलंत आबा तुम्ही ?”
असे म्हणून तो रडू लागला, "जसा गावाला चार पदरी रस्ता झाला, तसा आबांनी सगळ्यांसाठी सरकारशी भांडून पैसा मिळवून दिला. त्याना देखील काही रक्कम मिळाली पण त्यांनी तो पैसा देवळाच्या जिर्णोद्धारासठी वापारला तेंव्हा मला त्यांचा जरा राग आला होता. पण मी गप्प बसलो. नंतर काही महिन्यांपुर्वी इथल्या होऊ घातलेल्या टोल नाक्याची माहिती मला मिळाली.’
त्याचे हे वाक्य अर्ध्यात तोडण्याचा प्रयत्न एकनाथाने केला पण जया म्हणाला, “ थांब आज बोलू दे मला, माझे पाप कबुल करू देत. माझा खरा चेहरा गावाला कळू देत. टोल नाक्याची जागा आमच्या शेताला लागूनच होती. त्याची सर्व माहिती मिळाल्यावर मला माझी बायको आणि पोरांनी तिथे हॉटेल काढण्याचे माझ्या मनात भरवले. जरी त्यांनी मला सांगितले असले तरी माझ्या मनात सुद्धा लालसा तयार झाली अन मी गावाकडे येऊन आबांशी त्या विषयावर बोललो. ते मला रानात घेऊन गेले,नेमकी जागा कोणती हे त्याना मला दाखवायचे होते. मी रस्त्यावर उभा राहून हातानेच इशारे करून त्याना हॉटेलसाठी लागणारी जागा दाखवली तसे त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.
ते म्हणाले, 'सगळं शेत माग पण एव्हढी जागा सोडून काहीही तु माग. मी तुला ते देतो, हा माझा शब्द आहे तुला.' पण मी हट्टाला पडलो होतो. मी परत सहा महिन्यात दहा चकरा मारल्या अन त्याना म्हणालो वेळ निघून चाललीय मला लवकर तेव्हढा जमिनीचा तुकडा दया, मला बाकी काहीही नको, तेवढे जरी मिळाले तरी माझे आयुष्य सुखात जाईल.'
पण आबांनी नकार दिला. मग मी वाटण्या करून मागितल्या, आई आन आबा दोघेही दुखावले, माझे भाऊ बहिण माझ्यावर नाराज झाले. कावेरीने मला समजावून सांगितले पण पैशाची हाव सुटलेल्या माझ्या मनाने कोणाचाही सल्ला मानला नाही. एक दिवशी मी तहसील कार्यालयात जाऊन वाटणीची नोटीस देऊन आलो तंव्हा आबा माझ्या समोर हात जोडून रडले.
"ठीक आहे,तुझी इच्छा पूर्ण करतो' म्हणून त्यांनी माझ्या इतर भावंडाना अंधारात ठेवून मला त्या कागदावर सह्या दिल्या, रस्त्यालगतचा तो सलग एक एकराचा तुकडा त्यांनी माझ्या नावावर केला. पण त्या दिवसापासून ते शेतातच राहू लागले.घर जवळजवळ वर्ज्य केले. स्वतःला ते क्लेश करून घेऊ लागले... त्यामुळे माझे मन खाऊ लागले पण मोहाचा वारू माझ्यावर स्वार झाला होता...मागच्या एक आठवड्यापूर्वी माझ्या हॉटेलची कागदाची पूर्तता झाली अन एक नवीन अडचण माझ्यापुढे उभी राहिली’ ... जमलेला सगळा गाव कानात प्राण आणून जयाचे कथन ऐकत होता...

"सरकारी अधिकारयांनी नियमाप्रमाणे मला माझ्या जमिनीलगतच्या शेतकरयांच्या सह्या म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र आणायला सांगितले होते. हा निरोप मी आबांना चार दिवसांपूर्वी येऊन दिला. तेंव्हा ते नखशिखांत हादरले. रडू लागले. झाले असे होते की रस्त्याला लागून असलेल्या त्या एक एकराच्या तुकड्यात आबांच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या समाध्या होत्यां अन त्यावर त्यांची जिवापेक्षा जास्त माया होती.
ते रडवेले होऊन म्हणाले.’ जया तु पिंपळ तोडणार ? बापजाद्यांच्या समाध्या पाडणार ? घोर पाप आहे रे हे जया ! माझा जीव घे पर असलं वंगाळ काही करू नगस रे माझ्या वासरा !” माझ्या गालावर हात त्यांनी फिरवलेला तो अखेरचा हात. माझ्या मुळे त्यांनी स्वतःला कोंडून घेतले होते. त्यांचा जीव झुरत होता. पण माझे डोळे उघडत नव्हते ...
थोडा विचार करून ते म्हणाले, 'तु इथेच थांब मी घरी जाउन येदा आणि एकाशी बोलतो. कृष्णा कावेरीलाबी समदं सांगावे लागल.यशोदाला हे कसं सांगावं काही कळत नाही पर सांगाव तर लागंलच...'
"ते स्वतःशी पुटपुटतच वाड्याकडे गेले. त्या दुपारी त्यांनी सगळ्याना जवळ घेऊन सगळा प्रकार सांगितला. येदा आणि एका दोघांकडून शब्द घेतला की त्यांच्या माघारी देखील कोणी भांडणार नाही, कोणी वाद घालणार नाही. जयाने जर कुठल्या कागदावर सह्या मागितल्या तर त्या त्याला देऊन टाका असे ते म्हणाले. नंतर त्यांनी मळ्यात येऊन मला कागदावर सह्या घ्यायला आज यायला सांगितले. पण त्याना त्यांच्या जिवंतपणी हा दिवस बघायचा नव्हता. आपल्या पिंपळपानावर कुऱ्हाड चाललेली त्यांना सहन झाली नसती. वाडवडलांच्या समाधीच्या ठिकरया उडालेल्या बघून त्यांच्या काळजाचे तुकडे झाले असते हे आज माझ्या लक्षात आलंय. जे काही वाईट व्हायचे ते आपल्या पाठीमागे व्हावे हा विचार त्यांनी केला अन त्यांनी आपले जीवनदान दिले. त्यामुळे का होईना पण माझे डोळे उघडले. पण खूप उशीर झालाय, मी खूप चुकलो. माझी चूक कळण्यासाठी माझ्या आबांना जीव गमवावा लागला. इथून पुढे आयुष्यभर देवाहून श्रेष्ठ असणारया माझ्या वडिलांच्या मृत्यूचे कारण म्हणून मला जगावे लागेल. माझ्यासाठी हीच मोठी शिक्षा आहे. तुम्ही मला सांगाल ती शिक्षाही मी भोगेन, पण मला प्रायश्चित्त करायची संधी दया. आबा मला माफ करा" असे म्हणत तो जागेवरच ऊर बडवू लागला....

तसे पुढे होऊन विष्णू पाटलांनी आणि एकनाथाने त्याला सावरले. सगळे स्तब्ध झाले होते. शेवटी यशोदाकाकू आपले अश्रू पुसत पुढे झाल्या आणि म्हणाल्या, "तुला तुजी चूक कळली यात समदं आलं. तुला पच्चात्ताप हुतो ह्येचं त्येंच्या जीवाला समाधान होईल. त्यांचं संस्कार वाया जाणार न्हाईत ह्येचा मला इश्वास होता."
आईचे बोलणे ऐकून सगळी भावंडे एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागली. गावकरीसुद्धा शोकाकुल झाले. थोड्या वेळाने जयाच्या हातानेच वासुकाकांच्या चितेला अग्नी देण्यात आला.पिंपळाजवळ पेटवलेली वासुकाकांची चिता धडाडून पेटली आणि वारयाने गळून पडणारी पिंपळपाने हळुवार गिरक्या खात त्या चितेत स्वतःला झोकून देऊ लागली ....

या घटनेला आता बराच काळ लोटलाय.....जयवंताने आबांनी त्याच्या नावावर केलेली जमीन परत दिलीय. त्या जागेवर रस्त्यालगतच्या भागात वारीत पायी जाणारया वारकरयांसाठी एक मोठा हॉल जयाने स्वतःच्या खर्चाने बांधलाय. त्यांच्या विसाव्याची सोय करण्यात आलीय. मोठी बदामाची झाडे तिथे सावलीसाठी लावलेली आहेत. वारीच्या दरसाली मुक्कामी वेळेस जया आणि त्याचे कुटुंबीय पुण्याहुन गावाकडे येतात. आबांचे सगळे कुटुंब वारकरयांची सेवा करतं. शेताकडे येणं झालं की आजोबांच्या समाधीशेजारीच जिथं आबांची समाधी बांधलीय तिथं पिंपळाच्या झाडाखाली बसलेला जया झाडाच्या प्रत्येक पानात आपल्या आबांना पाहतो अन नकळत त्याच्या डोळ्याना अश्रूंची संततधार लागते. तो पिंपळ आता जणू काही त्यांचा पुराणपुरुष झाला होता. यशोदाकाकू त्याला पोटाशी कवटाळून आभाळाकडे बघत काहीतरी पुटपुटतात..

त्या पिंपळवेडया रातींना काळ्याकुट्ट आकाशात पश्चिमेला एक चांदणी जोमाने चमकत राहते.. तिच्याकडे बघत वाडयाच्या माळवदावर अंथरुणावर पडल्या पडल्या यशोदाकाकू हात जोडतात अन वासुकाकांच्या जगात स्वतःला घेऊन जातात.....

- समीरबापू गायकवाड.

आणखी वाचनासाठी ब्लॉगला भेट द्या खालील ब्लॉगपत्त्यावर ...
http://sameerbapu.blogspot.in/2015/06/blog-post_24.html

129059613.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users