

माझी मुलगी ऋचा अमेरिकेत इंडियाना राज्यातल्या पर्ड्यू विद्यापीठात पि एच डी करते . तिच्याकडे गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव.
एका रविवारी ठरले जावई शशांक बरोबर जवळच असलेली एक डेअरी पाहायला जायचे. इंडियाना पोलीस ते शिकागो कडे जाणाऱ्या आंतर -राज्य महामार्गावर तासाभराचा कारने प्रवास होता. जाताना दुतर्फा अशी पसरलेली हिरवीगार कुरणे , मका व सोयाबीनची शेते , मध्ये मध्ये लागणारी दाट वृक्षराजी …. नुसती हिरवाई होती. एव्हडी मैलोगणती बहरलेली शेते बघत जात होतो पण एक गोष्ट मात्र सारखी खटकत होती. ती म्हणजे कुठेही आपल्याकडच्या सारखे ‘शेतामधले घर कौलारू…’ दिसत नव्हते. मोजक्याच छोट्याछोट्या घरांचे खेडेगाव, घरांच्या दारात बांधलेल्या गायी-म्हशी, इकडे तिकडे फिरणारी कोंबड्या-कुत्री , आजूबाजूला खेळणारी शेंम्बडी पोरे इत्यादी इत्यादिंचे अगदी आपल्यासारखे खेडे नसले; तरी निदान दारात गाडी बरोबरच एखाद दुसरे खिल्लार आणि थोडा जुन्या वाड्याचा आब असणारी खेड्यातली वाटावी अशी घरे माझी नजर सारखी ढुंढाळत होती. शेवटी मी शशांकला विचारले की इथली ही शेते राखणारे शेतकरी आणि त्यांची घरे कशी कुठे दिसत नाहीत. वाटेतल्या एक दोन आधुनिक वाटाव्या अश्या घरांकडे निर्देश करून त्यांनी सांगितले असेच राहतात इथले शेतकरीही!
आम्ही पाहणार असलेली डेअरी ही ‘फेअर ओक फार्म्स’ असे नाव असलेली, काही कुटुंबांच्या मालकीची खासगी डेअरी होती. अमेरिकेतल्या महा डेअऱ्यांपैकी एक. डेअरी पाहायची म्हटले म्हणजे आपल्या डोक्यात काही संकल्पना पक्क्या असतात तसेच चित्र मनात होते. तीस हजार एकर जमिनीवर तीस हजार गायींना सांभाळत ह्या डेअरीचा कारभार आहे ऐकल्यावर मनातल्या मनात ‘अबबब … ‘ असे म्हंटले खरे. वाटले, तीस हजार गायीचे दूध काढायचे, त्यांची निगा राखायची म्हणजे गडी- माणसे पण ढीगभर लागणार . त्यांचे व्यवस्थापन करायचे; आज हा आला नाही उद्या तो आला नाही असे सांभाळायचे म्हणजे भलतीच डोके दुखी ! पण हे तर भलतेच हाय- टेक काम होते!
या डेअरीला मध्यवर्ती घेऊन एक ऍग्रो टुरीझम इथे विकसित केली आहे. पण पूर्वीसारखी , जुन्या पद्धतीची खेडी आता औषधाला सुध्दा नसल्याने आणि जवळपास सगळी अमेरिकन जनता शहरातच राहत असल्याने अमेरिकेतल्या लहानग्यांना गाय दूध देते हे माहीत असणे अवघडच आहे. याचाच फायदा घेऊन ह्या ऍग्रो टुरिझमचा गाजावाजाच मुळी ‘तुमच्या ज्ञानात भर टाकणारी’ असा केला गेला आहे. अगदी मस्त पत्रक वगैरे तयार करून ‘डेअरी ऍडव्हेंचर’ , ‘पिग ऍडव्हेंचर’ , ‘क्रॉप ऍडव्हेंचर’ अश्या नावाखाली डेअरी च्या जोडीला शेती विज्ञान,वराह पालन हे दाखवण्यासाठी बसने फिरवून सर्व दाखवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे . एवढेच नवे तर खाण्यापिण्याच्यासाठी खूप नावाजलेले रेस्टोरंट पण तिथे होते . वेगवेगळ्या आईस्क्रिम चीझ आणि सँडविच, बर्गर साठी तिथे आबालवृध्दाची नुसती रीघ लागली होती. खूप पालक आपल्या बाल - बच्च्यांना घेऊन मजा, करमणूक आणि मुलांच्या ज्ञानात भर पदवी म्हणून पूर्ण दिवसभराची तिथली ट्रिप आखतात .
आम्ही डेअरीच्या आवारात गेलो. आवार खूपच मोठं होतं. लांब एका बाजूला कडब्याचा डोंगर दिसत होता त्यावरूनच हे खूप मोठे काम असणार याची कल्पना आली ! डेअरीच्या कार्यालयात गेलो तर, कोपऱ्यात एक अगदी खरे डुक्कर वाटावे असा गुलाबीसर रंगाचा डुकराचा पुतळा होता. आणि त्याच्या गळ्यात पडून एक अमेरिकन छोटी खेळत होती. प्राण्यांशी जवळीक करायला शिकायची सुरुवात इथपासूनच होत होती.
आमचे अमेरिकन पद्धतीने ‘हाय’ वगैरे म्हणून स्वागत झाले. त्यांची प्रत्येकी २० डॉलर अशी फी भरल्यावर कर्मचारी स्त्री ने मनगटावर एक बँड बांधला आणि बसमध्ये जायला सांगितले. बस सुद्धा अगदी गायीच्या रंगात आणि अंगावरचे ठिपके बिपके रंगवलेली होती. बस चालवायला एक चालिका होती तिने गम्मत म्हणून गायीचा आवाज काढला आणि बस सुरु केली. लगेच बस मध्ये रेकॉर्ड केलेली माहिती स्पीकर वर सांगितली जाऊ लागली. म्हंटले कुठेतरी दूरवर गायी बांधल्या असतील तिथंपर्यंत न्यायला म्हणून असेल ही बस . पण पाच मिनिटातच रस्त्याच्या बाजूला अगदी छोटे छोटे तंबूसारखे वासरांचे आठ -दहा गोठे दिसले. गोठ्यापुढे वासरू बाहेर येऊन बसू शकेल एवढी जागा ठेऊन ते बंदिस्त केले होते. थोडे पुढे गेल्यावर गायी बांधलेला गोठा आला . गोठा कसला एक लांबच्या लांब शेड होती. मधून बसला जायला रस्ता होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गायींचा चारा पसरलेला होता, त्यापलीकडे गजांचे कुंपण होते. कुंपणापलीकडे ओळीने हजारो गायी उभ्या होत्या. त्यांचे डोके चांगले बाहेर येईल अशा गजांमधल्या जागांमधून त्या डोके बाहेर काढून चारा खात होत्या. त्यांच्या कानाला नंबरचे कार्ड होते . म्हणजे ही गंगू, ही ताम्बू… अशी ओळख ठेवायचा प्रश्नच नाही!सगळ्या शेडमध्ये वर छताला पंखे फिरत होते. थोडा कुबट वास सोडला तर सगळे कसे टाप-टीप वाटत होते . पुढे गायींची जागा रिकामी होती तिथे यांत्रिक पद्धतीने खालची फरशी धुऊन काढली जात होती .
गोठ्याच्या शेवटी बस एका मोठ्या इमारतीपाशी थांबली . बसमधले सगळेजण एका जिन्यावरून वरच्या पुढे काच असणाऱ्या बंदिस्त गॅलरीत गेलो. काचेतून समोरचे दृश्य स्पष्टपणे पाहायची सोय होती. पुढे एक रंगभूमीवर हळू फिरणारे स्टेज असते तसे स्टेज गोल फिरत होते आणि त्यावरच्या प्रत्येक कंपार्टमध्ये कानाला नंबर चे कार्ड लावलेली एक एक गाय उभी होती . अशा ७२ गायी तिथे गोलाकार उभ्या होत्या .अश्या धष्टपुष्ट आणि भरलेल्या, मोठमोठ्या कासेच्या गायी होत्या त्या . प्रत्येक कंपार्टला दूध काढायचे मशीन आणि संगणक जोडला होता.
त्या भल्या मोठ्या स्टेज ची एक फेरी आठ मिनिटात व्हायची आणि तेवढ्याच वेळात प्रत्येक गायीचे दूध मशीनच्या साहाय्याने काढून व्हायचे . प्रत्यकीचे किती गॅलन दुध काढले त्याची नोंद शेजारच्या छोट्या संगणकावर व्हायची . गोल फिरून मूळच्या जागेवर आल्या की एक एक करून गायी दुसऱ्या दालनात सोडल्या जायच्या आणि त्यांची जागा नवीन दूध काढायच्या गायी घ्यायच्या. अशा पद्धतीने जवळ जवळ दोन लाख ऐंशी हजार गॅलन दूध रोज जमा होते.
गायींचे दूध काढले कि लगेच ते एका मोठ्या पाइपमधून दुसऱ्या दालनात नेले जाते. तेथे पाश्चरायझेशन व थंड करून दुसऱ्या पाइपमधून पुढच्या वापरासाठी म्हणजे चीझ वगैरे बनवायसाठी किंवा पॅकिंग करून विकण्यासाठी पाठवले जाते. आम्ही उभे होतो तिथेच दोन्ही स्टीलच्या मोठ्या पाईप होत्या. एका पाइपचा स्पर्श धारोष्ण दूध वाहत असल्याने गरम होता तर दुसरीचा थंड केलेल्या दुधामुळे बर्फासारखा गार !
हे पाहून बाहेर आलो आणि बसमधून जिथून सुटली होती तिथे आलो . आता पाहायचा होता वासराचा जन्म होताना . अर्थात ‘बर्थिंग बार्न’. रोज शंभर-एक वासरांच्या जन्म होत असल्याने दिवसभरच कुठली ना कुठली गाय प्रसूत होत असणारच . त्यासाठी दर्शकांना बसायला काँक्रीट चे बाक असलेले एक स्टेडियम होते .बाकांवर काही पर्यटक, लहान मुले आणि पालक बसले होते. समोर दोन गायी व भरपूर कडबा ठेवलेला, मोठा स्टेजसारखा भाग दिव्याच्या प्रकाशात होता. तो जमिनीपासून छप्परापर्यंतच्या एका काचेच्या जाड भिंतीने दर्शकांपासून वेगळा केला होता . गायी शांतपणे कडब्याच्या गादीवर बसलेल्या होत्या . थकल्यासारख्या दिसत होत्या . नुकत्याच विलेल्या असाव्यात किंवा विणार असाव्यात ! त्यांना अत्यंत विश्रांतीची गरज असणार. मला मनामधून मात्र असे वाटले की , व्यावसायिकतेसाठी पिल्लू होण्याच्या क्षणाचा असा देखावा केला नाही केला गेला पाहिजे .
अजून खूप पाहायचे होते म्हणून बाहेर आलो आणि वासरे ठेवलेले छोटे गोठे दिसले. प्रत्येकाचा घरासारखा एक छोटा गोठा. बाहेर त्या वासराच्या नावाची पाटी. आज जन्मलेली वासरे तिथे ठेवली होती. ती पाहायला छोट्या मुलांची थोडी गर्दी होती . पुढे आणखी एक मोठी इमारत होती. शेती विज्ञानाची माहिती देण्यासाठी इथे माती परीक्षणापासून मक्याची पिके मोठी होण्यापर्यंतची बरीच माहिती आकर्षक फोटो, आणि डिजिटल फलकांसहित गुहेची रचना केलेल्या मोठ्या दालनात मांडली होती. एक भले मोठे मॉडेल मक्याचे दाणे यंत्राने कसे काढले जातात ते दाखवत होते. मुलांना आणि मोठ्यांनाही सहज समजेल अशीच सर्व मांडणी होती.
मुलांना कोठे गेले तरी खेळायला काहीतरी असले तरच ती चांगली रमतात. म्हणून हिरवळ असलेल्या एका मैदानावर मुलांना उड्या मारायला हवा भरलेली भली मोठी गादी ठेवली होती. दुधातल्या कॅल्शिअम मुले हाडे सशक्त बनतात असा फलक लावून , रॉक क्लाइंबिंग साठी एका गायीचे चित्र रंगवलेल्या भिंतीवर मोठा दोर लटकावत ठेवला होता आणि मध्ये मध्ये ठोकलेल्या आधारावर पाय ठेऊन दोराला लटकत मुले वर चढत होती. एक छोटी ट्रेन अगदी लहान मुलांसाठी होती. अजून थ्री डी मुव्ही पण होता .
एवढं सगळं विजेवर चालणारं आधुनिकीकरण करताना वीज पाण्यासारखी लागत असणार हे नक्की . पण इथे त्यांच्याच शेतीच्या आणि इत्तर कचऱ्यापासून विद्द्युत निर्मिती करून वापरली जाते. गाइंचे शेण आणि डुकरांच्या विष्ठे पासून तयार केलेले खत शेतीमध्ये वापरले जाते.
एवढे सगळे दुपारच्या उन्हात पाहून झाल्यावर श्रम परिहार म्हणून कंपनीच्याच रेस्टोरंट मध्य जाणे अपरिहार्य होते .तिथे उभे राहायलासुध्दा जागा नाही एवढी गर्दी होती. तिथले अप्रतिम चवीचे आईस्क्रिम खाल्यावर आणि तिथे तयार होणाऱ्या चीझचे खूप प्रकार पाहिल्यावर हे रेस्टोरंट नावाजलेले आणि पर्यटकांना तृप्त करणारे असणार असे वाटले.
आपल्याकडे असणाऱ्या पशुपालन या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालवलेल्या आधुनिक उद्योगाचे स्वरूप मिळते आहे त्याची झलक इथे पाहायला मिळाली . झपाट्याने बदलत जाणारया आणि वाढत्या गरजा असणाऱ्या आधुनिक जगात जिवंत पशूंची यंत्रे होणे एवढे अपरिहार्य आहे का असे मनात खटकत राहिले खरे.
अधिक माहीती: http://fofarms.com/
एक अमेरिकन ‘हाय -टेक’ डेअरी …
Submitted by दीपा जोशी on 17 August, 2016 - 06:26
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माहितीपूर्ण अप्रतिम लेख.
माहितीपूर्ण अप्रतिम लेख.
बोलुन चालुन पक्के व्यावसायिकच
बोलुन चालुन पक्के व्यावसायिकच ते अमेरिकन्स,प्रत्येक गोष्टीचे भांडवल करणे हा युरिपिय्नांचा स्थायीभाव आहे.त्यामुळे गायी म्हशी यांच्यासाठी यंत्रेच.त्यामुळे गंगू तांबू वगैरे नावं ठेवत ते बसत नाहीत.बाकी लेख छान होता ,ओघवती भाषा आहे.
"बोलुन चालुन पक्के
"बोलुन चालुन पक्के व्यावसायिकच ते अमेरिकन्स,प्रत्येक गोष्टीचे भांडवल करणे हा युरिपिय्नांचा स्थायीभाव आहे" - अमेरिकन्स की यूरोपियन्स?
छान लेख !
छान लेख !
अमेरिकन्स की
अमेरिकन्स की यूरोपियन्स?>>>>>> अमेरीकन्स हे मुळात युरोपिअन्सच आहेत ,त्यातही ब्रिट्स ,स्पॅनिश वगैरे.ज्यांनी गुलामगिरीची सुरुवात केली.
लेख आवडला...जागतिकीकरणाच्या
लेख आवडला...जागतिकीकरणाच्या जमान्यात माणसाची ती यंत्रे झालीयेत तिथे जनावरांची काय बिशाद...फोटो पहायला मिळाले असते तर आणखी आवडलं असत..
आमची ही अमेरिकेची दुसरी
आमची ही अमेरिकेची दुसरी वारी, पण न्युयोर्क्,वाशिन्ग्टन्,अटलाण्टीक सिटी, व मोठे मोठे मॉल , पाहण्याव्यतिरिक्त, अशा तर्हेचे काही अद्याप बघता आले नाही. त्यामुळे वर्णन फारच आवडले. फोटो असते तर अधिक छान वाटले असते. पुलेशु.
मलाही नवीन धागा सुरु करावयाचा आहे, पण कसा सुरु करावा ह्याचे मार्गदर्शन हवे आहे. कोणीतरी व्यनि करिल काय ?
मस्त
मस्त
छान लिहल आहे.शेवटच खटकण अगदीच
छान लिहल आहे.शेवटच खटकण अगदीच पटल.
फोटो का नाही टाकलेत?
फोटो का नाही टाकलेत?
छान लेख! आमच्या
छान लेख!
आमच्या एक्स्टेंशनच्या एजुकेटरने सांगितले होते या फार्म बद्दल. मोठे डेअरी फार्म म्हणजे पाणी प्रदूषणाचा जास्त धोका/ त्रास ! मात्र या डेअरी फार्मने शेणापासून बायोगॅस आणि नॅचरल गॅस तयार करुन प्रदुषणाचा प्रश्न सोडवलाय म्हणून मुद्दाम माहिती दिली होती. फोर्चुनमधे लेख आला होता त्यात फोटो आहेत. http://fortune.com/2016/01/27/fair-oaks-dairy-farm-manure-fuel/
छान लेख आहे. आवडला. गंगू
छान लेख आहे. आवडला.
गंगू तांबू वगैरे नावं ठेवत ते बसत नाहीत >> सिंजी तुम्ही चुकीची तुलना करत आहात. असे यांत्रिकीकरण न झालेल्या डेअर्या, किंवा काही गुरे असलेले छोटे शेतकरी आहेत अमेरिकेत ते ही गुरांना भारतातल्या शेतकर्यांसारखेच घरातल्या व्यक्तींप्रमाणेच समजतात. त्यांच्याशी गप्पाबिप्पाही मारतात.
माहितीपूर्ण अप्रतिम लेख.
माहितीपूर्ण अप्रतिम लेख.
माझ्या माहितीतले एक दोघे जण
माझ्या माहितीतले एक दोघे जण आहेत इथे ज्यांच्याकडे घरी एक दोन गायी आणि काही वासरे आहेत. त्यांची ते घरातल्या सदस्या सारखी काळजी घेतात....
छान आहे लेख. फोटो दिले असते
छान आहे लेख. फोटो दिले असते तर बरं झालं असतं
लेख उत्तमच जमलाय
लेख उत्तमच जमलाय
माझ्या या लेखाला दिलेल्या
माझ्या या लेखाला दिलेल्या सुन्दर प्रतिसादाबद्ल धन्यवाद.
आपण सुचवल्या प्रमाणे लेखात फोटो टाकले आहेत.
छान लेख !
छान लेख !
अप्रतिम लेख.
अप्रतिम लेख.
खुप छान लेख.
खुप छान लेख.
मस्तं माहिती पूर्ण लेख.. फोटो
मस्तं माहिती पूर्ण लेख.. फोटो टाकलेस ते बरं केलंस, आयडिया आली..
मस्त लेख आहे. खूप आवडला.
मस्त लेख आहे. खूप आवडला.
छान लेख आणि माहिती.
छान लेख आणि माहिती.
आधी वाचलं असतं तर भेट देता आली असती याची रुखरुख लागली.
भारतातला दूध उद्योग पण असाच
भारतातला दूध उद्योग पण असाच चालतो, in terms of commercialization. मी २० वर्षापूर्वी चितळे यांचा dairy plant बघितला होता तासगाव मधला. गायींना क्रुत्रिम रीत्या pregnant करणे (एक प्रकारचा बलात्कारच), त्यांचं दूध यंत्रांनी काढणं हे खटकलं होतं.
Male वासरांचं काय होतं हे पण भयानक आहे.
खूप हिंसाचार आहे या उद्योगात.