उमरान दानिशच्या निमिताने - विनाशकारी मौनाचे दशक !

Submitted by अजातशत्रू on 19 August, 2016 - 00:40

हा आहे उमरान दानिश. वय वर्षे पाच. सीरियाच्या आलेप्पो शहरात परवा झालेल्या रॉकेटहल्ल्यात हा जखमी झाला होता. त्याला अँब्युलन्समध्ये जखमी अवस्थेत बसवले गेले तेंव्हा तो झपाटल्यासारखा शांत बसून होता.. पूर्णतः निशब्द.. त्याच्या तोंडून वेदनांचे हुंकार देखील निघत नव्हते.. काय चालले असेल त्याच्या मनात ?... त्याच्या आईवडिलांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.... जखमी दानिशवर नंतर उपचार करण्यात आले...त्यानंतरही तो गप्पच राहिला मात्र त्याची डोकं बधीर करून जाणारी सुन्न निशब्दता सारया जगाला 'खामोश' करून गेली... अशी हजारो मुले सिरीयामध्ये मेली आहेत.... यांचे खरे गुन्हेगार कोण याचा शोध घेताना दानिशच्या निमित्ताने इतरही काही मुद्द्यांचा विचार होणे गरजेचे आहे....

अशा प्रकारच्या हल्ल्यांना अन हत्याकांडाना कट्टर इस्लामी धारणेचे आतंकवादी सर्वात जास्त जबाबदार आहेत हे सारं जग मान्य करतं. हे घडत असताना इतर इस्लामी देश आणि जनता काय करते आहे हे देखील तपासले जाणे आवश्यक आहे. माझ्या मते जगभरातील मुस्लिमांनी जोवर एकत्र येऊन मुलतत्ववाद्यांच्या विरुद्ध एल्गार केल्याशिवाय या विषयीची कुठलीच संख्यात्मक परिस्थिती स्पष्ट होणार नाही. कारण मुस्लीम जगतातून यावर अगदी फुटकळ निषेध व्यक्त होताना दिसतो. इस्लामी अभ्यासक जीवाची पर्वा न करता याविरुद्ध बोलताना कुठेच आढळत नाहीत. इस्लामी बंडखोर विचारवंताना देशातून परागंदा व्हावे लागते अन ते जिथे राहतात तिथे देखील त्यांना लपून छपून राहावे लागते. या विरुद्ध त्या विचारवंताच्या बाजूने त्याच्या मुळच्या देशातील लोकही काही बोलत नाहीत अन त्यांनी जिथे आश्रय घेतलेला असतो तिथेही मुस्लिमांचे कुठले जन आंदोलन त्यांच्या समर्थनार्थ उभे राहत नाही. या उलट दिवसेंदिवस जगभरातील इस्लामी देश आणि इस्लामी जनता मौनाच्या आधीन होताना दिसत आहे.

यामुळे जगभरात जेंव्हा जेंव्हा अतिरेकी हल्ले होत जातील अन त्यात इस्लामशी संबंधित लोकांचे धागेदोरे मिळत जातील तसतसे गैरइस्लामी समुदायाची एक मोट आपोआप तयार होत जाईल जी कालांतराने कुणाच्या आवाक्यात राहील की नाही यावर कुठले भाष्य आता करता येणार नाही. याचबरोबर इस्लामी जनतेविषयी अन इस्लाम धर्माविषयी मने कलुषित होत जातील हा भाग वेगळाच. इतके सारे असूनही याचा एक कंगोर इस्लाम अंतर्गत असणाऱ्या दोन पंथांच्या वर्चस्वाच्या लढ्याचाही आहे. तो तर अधिकच दुर्दैवी आहे. एखाद्या छोटयाशा चिमूरडयाच्या मृत्यूने जग हळवे होते मग इतक्या साऱ्या लोकांचा नृशंस नरसंहार घडवून आणणाऱ्या इस्लामी मुलतत्ववादयांच्या विरोधात जगभरातील इतर मुसलमान मोठ्या प्रमाणात एका प्लॅटफॉर्मवर आलेले का दिसत नाहीत हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

आधुनिक विचारांप्रमाणे हा धर्म बदल स्वीकारणार आहे की नाही की आणखी मुलतत्ववादा कडे झुकत जाणार यावर आधुनिक मुस्लिम विचारवंत अत्यंत तुरळक संख्येने बोलताना आढळतात. जरी जगभरात असे कुठे प्रयत्न सुरु झाले तरी इतर धर्मातील हळूहळू वाढत जाणारी कट्टरता इस्लामी मुलतत्ववादी लोक हत्यार म्हणून वापरतात अन किशोरवयीन वा तरुण मुलांच्या डोक्यात त्याचा बागुलबुवा उभा करून त्यामागून आपला स्वार्थ साधत बसतात. त्याचबरोबर जगभरात सुरु असलेली आर्थिक वर्चस्वाची लढाई अन तेलसमृद्ध प्रदेशावरील कब्जे ही देखील या रक्तरंजित इतिहासाची कारणे आहेत. जगभरातील शेकडो देश आणि युनायटेड नेशन्सची बोटचेपी भूमिका यामुळे या सर्वावर कधी पडदा पडणार हे कळायला मार्ग नाही .दोन देशात युद्ध खेळायचे पण रणभूमी तिसरया देशाची वापरायची हे नवे युद्धतंत्र आता जगजाहीर झाले आहे. याविरुद्ध जगभरातील देश कधी एकत्र येणार हे कळायला मार्ग नाही. कारण इराण, इराक, अफगाणीस्तान आणि सिरीया ही युद्धतंत्राची उदाहरणे आहेत, भविष्यात ही भूमी भारत पाकिस्तान असू शकते. आपण त्या बाबतीत किती जागरूक आणि सज्ज आहोत याचेही नेमके उत्तर मिळत नाही.

दानिशच्या निमित्ताने सगळीकडे सहानुभूतीची लाट येईल अन पुन्हा निर्वासितांचे लोंढे युरोपच्या दिशेने वळतील. मात्र या निर्वासितापैकीच काही लोकांनी मागील दोनेक वर्षात युरोपीय देशात अतिरेकी हल्ले घडवून आणण्यात महत्वाची भूमिका समोर आलीय. मग यांना आश्रय द्यावा का ? दिला तर तो कसा असावा ? त्याची संख्या किती असावी ? त्यांना कुठे ठेवले जावे अन त्यांच्याशी कसा व्यवहार करावा हे निश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने नवे धोरण आखणे गरजेचे आहे. मानवतावादाचा बळी उपकारकर्ते देश ठरणार असतील तर उर्वरित जग निव्वळ तमाशबीन बनून या घटनांकडे बघत राहील अन केवळ सुस्कारे सोडत बसेल...

इतके सारे आजूबाजूला घडत असताना आखाती देशांनी घेतलेली बघ्याची भूमिका अधिक संशयास्पद आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी इस्त्राईली फौजा आणि हमास यांच्यात झालेल्या गृहयुद्धात इस्लामी जगतातून तीव्र निषेधाचे सोसाट्याचे वारे वाहत होते. ताज्या महितीनुसार सिरियात या आठवडाअखेरची आकडेवारी सांगते की चार लाख सत्तर हजार लोक तिथे मृत्युमुखी पडलेत. जगातील आजवरचा सर्वात मोठया नरसंहारावर त्या राष्ट्राला लागून असलेले अरेबियन देश कसे काय गप्प बसतात ? हेच लोक हमासच्या बाजूने कसे काय बोलत होते ? इस्त्राईली हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुसलमानांचे दुःख वाटते पण सिरियन मुसलमानांच्या मृत्यूचे दुःख वाटत नाही. हे कशाचे निदर्शक आहे ?

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी सत्ता सोडली पाहिजे. त्यानंतरच गृहयुद्ध संपेल, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी आपली भूमिका मांडली होती. असाद यांच्या सत्तेला अमेरिकेने पाठिंबा दिला तरी देशातील बंडखोर ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अर्थातच असाद यांना देशातून बहुमत मिळणार नाही. जनतेला अशा प्रकारची तडजोड कदापि मान्य नाही हे जरी खरे असले तरी जगाच्या दुसऱ्या गोलार्धातून याच्या विरुद्ध भूमिका पहायला मिळते. सिरियातील आपले तैनात सैनिक मागे हटणार नसल्याचे रशियाने याआधीच खूप वेळा स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर असाद यांनी सत्ता सोडू नये, असेही रशियाने उघडपणे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सिरियन जनता गृहयुद्धात होरपळून निघाली आहे. त्याचा फायदा इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना घेण्याचा प्रयत्न करत आहे. आयएसने भूप्रदेश, मालमत्ता मिळवली आहे. एवढेच नव्हे तर असाद विरोधक बंडखोरांना संघटनेत सामील करून घेतले आहे. यामुळे ही लढाई नेमकी कुणाची अन कुणाविरुद्ध आहे हे जगाला दिसते आहे पण कोण याविरुद्ध शड्डू ठोकायला तयार नाही. सिरियन जनतेची मात्र मधल्या मध्ये होरपळ सुरु आहे अन सारे जग शांतपणे बघते आहे. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता हे वाक्य आपण सर्वांनी अनेक वेळा वाचलेले आहे किंवा लिहिलेलेही मात्र काही दशकांनी जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा, 'सिरिया जळत होते अन जग शांतपणे बसून पाहत होते' अशा अर्थाचे वाक्य आढळले तर त्यात नवल वाटायचे कारण नाही.

आजच्या घडीला पाच वर्षाचा उमरान दाकनिश हा सिरियामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाचा प्रतिक बनला आहे. त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. या फोटोला हजारो लोकांनी शेअर केले असून यामुळे दोन गटातील संघर्षाचा बळी ठरलेल्या एका निष्पाप मुलाचा चेहरा सर्वांना धक्का देणारा ठरला आहे. सीरियातील अलेप्पो शहराजवळ हवाई हल्ल्यामध्ये एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे उमरान गंभीर जखमी झाला होता. हा हवाई हल्ला कोणी केला आहे अजून स्पष्ट झालेले नाही. उमरानचा हा फोटो अलेप्पो येथील एका डॉक्टरने काढला होता. उमरान दानीश बंडखोरांनी बळकावलेल्या अलेप्पो येथील एका उपनगरात राहतो. बुधवारी झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचे घर नष्ट झाले आहे. बचावदलातील लोक उमरानला एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढत असल्याचा व्हिडिओ येथील मीडिया सेंटरने प्रसिद्ध केला आहे. ढिगाऱ्याखालून काढताना उमरान रडत नव्हता. त्याला हवाई हल्ल्यात अंशत: उदध्वस्त झालेल्या एका रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला सोडून दिले. डॉक्टरांना त्याच्या आई-वडीलांबाबत काहीच माहिती नव्हते. दुसऱ्या एका व्हिडिओत उमरान एका ठिकाणी केशरी रंगाच्या खुर्चीवर रक्तबंबाळ अवस्थेत शांत बसल्याचे दिसून येतो. तो आपल्या डाव्या हाताने चेहऱ्यावरील रक्त पुसत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. जगभरातून या फोटोवर प्रतिक्रिया येऊ लागल्या त्या सरशी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून या युद्ध संघर्षावर त्वरीत मार्ग काढण्यात येईल असे रशियाच्या अधिकाऱ्याने निवेदन प्रसिद्ध केले आहे मात्र त्यात काही राम नाही. सिरियन गृहकलह ही अमेरिका आणि रशिया यांची पूर्वनियोजित यादवी असल्याचे मत काही राजकीय समीक्षक मांडतात त्यातही तथ्य असावे असे या संपूर्ण सिरियन गृहयुद्धाकडे बघितले की जाणवत राहते.

फ्रान्सची राजधानी पॅरिसवर झालेल्या हल्ल्यानंतर अलीकडेच दहशतवादाच्या विरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होत होती मात्र काही दिवसाच्या इशारे- निषेधाचे बुडबुडे या पलीकडे काही झाले नाही. नुकत्याच झालेल्या जी-२० शिखर परिषदेतही हाच सूर उमटला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून फ्रान्सने सिरियातील इसिसच्या ठावठिकाणांवर हल्ले केले होते. सिरियातील रक्का हे शहर इसिसच्या दहशतवाद्यांचा गढ मानला जातो. या शहरावर फ्रान्सने अनेक बाँब टाकले. परंतु दहशतवादी संघटना अशा प्रत्युत्तराला जुमानत नसल्याचे दिसून आले. उलट आम्ही अधिक जोमाने हल्ले करू, असा इशारा दहशतवादी संघटनांकडून दिला गेला. अशा परिस्थितीत हा दहशतवादाचा भस्मासुर कसा नष्ट करायचा, या प्रश्‍नाचा साकल्याने विचार करायची वेळ आली आहे.

सिरियन यादवीचा सर्वाधिक फायदा आयसीसने घेतला आहे आणि त्यांनी जगभरात आपले पाय पसरल्याचे आता लक्षात येते आहे. त्यांचे थेट संबंध ज्या देशात नाहीत तिथल्या इतर इस्लामी मुलतत्ववादी गटांना ते हाताशी धरून जगभरात जागतिक दहशतवाद लादण्याच्या प्रयत्नात सफल होतात की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. सीमापार होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमुळे दहशतवाद ही एका राष्ट्राची समस्या न राहता जागतिक समस्या बनली आहे. आज जगातील कोणत्याही मोठ्या शहरात सात-आठ दहशतवादी स्वयंचलित बंदुका घेऊन कोठेही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवू शकतात हे विदारक सत्य आहे. जागतिक व्यापार, परिवहन क्षेत्रातील क्रांती आणि माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील माहितीमुळे संपूर्ण जग हे एक खेडेगाव बनले आहे. जागतिक दहशतवाद हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. दहशतवाद यापूर्वीही होता. परंतु त्यात धर्माधिष्ठित आत्मघातकी हल्लेखोरांमुळे ही समस्या अधिक जटील झाली आहे. हल्लेखोर स्वत:च्या जिवाची पर्वा करत नसल्यामुळे कोणतेही सुरक्षा- कवच भेदू शकतात आणि स्वत:भोवती स्फोटके लावून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून आणू शकतात. आत्मघाती हल्लेखोरांच्या ठायी मृत्यूनंतर स्वर्गात आपली जागा पक्की आहे, अशा प्रकारची विचारसरणी भिनवली गेलेली असते. ती कशी नष्ट करायची किंवा त्या विचारसरणीच्या प्रभावापासून संंबंधितांना कसे दूर ठेवायचे, हा मुख्य प्रश्‍न आहे. त्या दृष्टीने सर्व धर्मगुरूंनी एकत्र येऊन आत्महत्या ही धर्माच्या विरोधातली कृती आहे आणि अशा हल्लेखोरांना त्या प्रकारचा दफनविधी मिळणार नाही किंवा तसा धार्मिक विधी केला जाणार नाही, असे स्पष्ट करावे लागणार आहे. तसे झाल्यास आत्मघाती हल्ले करणार्‍यांवर वचक बसू शकेल. कारण धार्मिक पद्धतीने दफनक्रिया न झाल्यास मृत्यूनंतर स्वर्गात जाता येत नाही, ही कल्पना त्यांच्या मनात रुजली आहे. अशा प्रकारे आत्मघाती हल्ल्यांविरुद्ध धर्माचा उपयोग करणे गरजेचे आहे. कारण या मूठभर लोकांमुळे संपूर्ण जगात इस्लामची बदनामी होत आहे. परंतु इस्लामी धर्मगुरू हे पाऊल उचलतील का, याबद्दल निश्‍चित काही सांगणे कठीण आहे.

या शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे सिरियन यादवीमध्ये लढताना इथून पुढे तरी निष्पापांचे बळी जाणार नाहीत किंवा हजारो, लाखो कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा, अशा कारवाईत बळी पडलेल्यांचे नातलग किंवा विस्थापित यांच्या मनात संबंधित देशाविरुद्ध, यंत्रणेविरुद्ध सुडाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर सुडापोटी विस्थापित कुटुंबांमधील तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचा किंवा दहशतवाद्यांना मदत करण्याचा धोका संभवतो. तो वेळीच लक्षात घ्यायला हवा. या सार्‍या बाबींचा विचार करून दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन योग्य प्रकारची ठोस पावले उचलणे ही आता काळाची गरज आहे.

दहशतवाद हा जागतिक रोग किंवा महामारी होण्यापूर्वी त्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने काही पावले उचलणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही दशकांपासून राष्ट्र संघ दहशतवादाची व्याख्या करण्यात अपयशी ठरला आहे. एकाचा दहशतवादी दुसर्‍याचा स्वातंत्र्य योद्धा असतो हे आपण काश्मीर किंवा पॅलेस्टाईनच्या संदर्भात पाहिले आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी कृत्य, ते करणारे दहशतवादी आणि त्यांचे राजकीय उद्दिष्ट यात फारकत करणे गरजेचे आहे. कोणतेही लष्करी महत्त्व नसलेल्या आणि केवळ सर्वसामान्य नागरिकांचा वावर असलेल्या ठिकाणी हल्ले करून निरपराध नागरिकांचा बळी घेणे हे दहतशवादी कृत्य मानले जाण्याची आवश्यकता आहे. मग ते काश्मिरी दहशतवाद्यांनी केलेले असो किंवा पॅलेस्टाईन दहशहवाद्यांनी केलेले असो, त्यावर जागतिक एकवाक्यता होण्याची गरज आहे. थोडक्यात, तुमचे राजकीय उद्दिष्ट काहीही असो, ते प्राप्त करण्यासाठी दहशतवादी मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित शक्ती दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्या जाण्याची आवश्यकता आहे. अशा संघटनांना थारा देणार्‍या देशांविरुद्ध सक्तीचे आर्थिक निर्बंध लादण्याचीही गरज आहे. अशा प्रकारचे उपाय केल्यास दहशतवादाच्या जागतिक प्रसारास आळा बसू शकेल. पाकिस्तानसारख्या देशाने दहशतवादाचा वापर भारताविरुद्ध केला. परंतु आज तेच दहशतवादी पाकवरच उलटले आहेत आणि भारतापेक्षा पाकमध्ये दहशतवादाचे थैमान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु तेथील सरकार कमजोर असल्याने दहशतवाद्यांच्या भीतीपोटी त्या संघटनांविरुद्ध कारवाई करू शकत नाही. परंतु एकदा संयुक्त राष्ट्रसंघानेच काही नियम लागू केल्यास पाकिस्तानलाही दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास सबब मिळेल. तेलसमृद्ध सिरिया हा शक्तीप्रदर्शनाबरोबरच आर्थिक वर्चस्वासाठीच्या यादवीचा देश बनून राहिला आहे अन जगभरातील भरकटलेले मुस्लीम तरुण इथल्या यादवीमुळे आयसीसकडे आकर्षित होत आहेत. आताच्या मूकदर्शकतेमुळे येणाऱ्या काळात जगाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. म्हणूनच सार्वत्रिक मौनाचा हा विनाशकारी कालखंड ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे....

- समीर गायकवाड.

सदर पोस्टवर धार्मिक, जातीय, वैयक्तिक वा राजकीय शेरेबाजी करू नये. त्याच बरोबर भडक व आक्षेपार्ह कॉमेंटस करू नयेत.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_27.html

daniosh.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या साऱ्या लोकांचा नृशंस नरसंहार घडवून आणणाऱ्या इस्लामी मुलतत्ववादयांच्या विरोधात जगभरातील इतर मुसलमान मोठ्या प्रमाणात एका प्लॅटफॉर्मवर आलेले का दिसत नाहीत हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

विचार प्रवर्तक लेख, सवडीने परत एकदा वाचावा लागेल.

बेकार आहे.
यावर उपाय सुचत नाही.हे सगळं बघवत पण नाही.कालपासून बीबीसी न्युज मध्ये वाचल्यापासून फोटो मनाआड करण्याचा प्रयत्न करते आहे.

लेखात मूलभूत असे मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यावर चर्चा राहुदेच, २०१४ आधी त्यांना उल्लेख करणेही अशक्य होते. (कदाचित अजुनही परिस्थिती बदलली नसेल).
पण असो.
सकाळी साधी दाढी करताना जर बोटाला/गालाला ब्लेडने कापले तर हास्सहुस्स करणारे, अन आलेले स्वतःचेच ठिपकाभर रक्त पाहुन गर्भगळीत होणार्‍या मजसारख्यांना घाबरटांना या विषयावर "बाजुने अथवा विरुद्ध" बोलण्याचा अधिकारच नाही, असे माझे मत.
माझ्यासारख्या घाबरटांनी सोईस्कर असे "अहिंसेचे" ढोल बडवावे, फारफार तर काळ्या फिती लावुन वा मेणबत्या पेटवुन निषेध वगैरे नोंदवावा, मनःस्ताप अगदीच असह्य झाला, "तर ते तसे वागले म्हणजे आपणही त्यांच्यासारखेच वागुन त्यांच्यातलेच एक बनायचे का" अशी एक वैचारिक ढाल वापरुन स्वतःच्या शब्दशः षंढपणाचे समर्थन करीत बसायचे.
असोच.

भयानक आणी अतीशय संतापजनक आहे हे. त्या दुर्दैवी मुलाला पाहुन खूप वाईट वाटले आणी आपण काहीच करु शकत नाही यांची खंत पण. समीर, तुम्ही अतीशय परीणाम काऱक व योग्य लिहीले आहे. आपल्या देशातले तथाकथीत गोरक्षक आणी हे सिरीयातले दहशतवादी यांच्यात तर काहीच फरक नाही.

या दहशत् वाद्याच्या बायका पोराना वेठीस धरले पाहीजे ( तात्पुरता बंदीवास) म्हणजे कदाचीत यांची अक्कल ठिकाणावर येईल.:राग:

या दहशत् वाद्याच्या बायका पोराना वेठीस धरले पाहीजे ( तात्पुरता बंदीवास) म्हणजे कदाचीत यांची अक्कल ठिकाणावर येईल.राग >> रश्मी, ज्या लोकांना स्वत:च्या जीवाची पर्वा नसते त्यांना त्यांच्या बायकापोरांबद्दल एवधी आत्मीयता असेल? हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात.. याला उपाय नाही.. यांच्या हाती आता अण्वस्त्र पडायचे राहिलेत फक्त.. त्यानंतर तर आनंदीआनंद असेल..

ह्म्म्म.. कसलाही फायदा होत नाहीये हे तर आलेय वर. आपण सुपात बसुन जात्यात कधी जाणार याची जीव मुठीत धरुन वाट पाहायची बस्स...

पुर्ण लेख वाचताना मनात कितीतरी उलटसुलट विचार येत होते.. काय करावे,कसे करावे,किंवा कोण काय करु शकत.अनि अस बरंच... तो शेवटचा फोटो पाहिल्यावर एकदम सुन्न झाले.बधीर. नो कमेंटस.

उमरानचे सर्व कुटुंब (आई वडील आणि तीन भावंडे) सुखरूप आहे ही एक चांगली गोष्ट आहे. ते सर्व जण ह्या हल्ल्यात सापडले होते.

लेख विचारप्रवर्तक आहेच सोबत आजच्या जागतिक घडामोडीवर एकदम परिणामकारक भाष्य करणारा आहे. दहशतवाद आणि सत्तालोलपूपणामुळे आज जे सिरियात घडते आहे ते खरंच खुप भयानक आहे. आणि यावर तोडगा काढण्यापेक्षा मोठी राष्ट्रे तसेच इस्लामिक राष्ट्रे तिथे आपल्यालाच हवे तसे कसे घडेल हे पाहण्यात मश्गुल आहेत. हे तर सिरियन लोकांचे खरे दुर्देव आहे. आणि आज सिरियन आणि इराकी जनता त्यात भरडली जात आहे.

ज्यावेळी युरोपियन समुदायातील राष्ट्रे सिरिया आणि लिबियामधील निर्वासितांना आश्रय देत आहेत त्याचवेळी तेलसमृध्द आणि श्रीमंत अरब राष्ट्रे मात्र आपल्याच धर्मबांधवांना आश्रय देत नाही आहेत. ही गोष्ट सुध्दा विचार करण्यासारखी आहे.

थोडक्यात सद्दाम हुसेन असे पर्यंत जग सुरक्षित होत अस म्हणता येईल.

इराक वर झालेल्या हल्ल्या नंतर परिस्थिती वेगाने बदलली. अता ती पूर्वपदावर येणे कठीण आहे.

हल्ल्यात जे सुखरूप सापडतात ते कायम सुखरूप राहतील असे अजिबात नाही. त्या पोराचा फोटो छापला गेला म्हणून जगाने तो पाहिला. अशी अजून हजारो पोरे तिथे उध्वस्त झालेल्या अवस्थेत आहेत. त्याच वयाच्या पळवून नेलेल्या कोवळ्या मुलींच्या वाट्याला जे येते ते मी वाचतानाही अर्धवट सोडून देते इतके भयानक आहे. आयसिसच्या तावडीतून पळून आलेल्या एकीने यू इन मध्ये जाऊनसुद्धा स्वतःची हकीकत सांगितली पण फारसा परिणाम झाला नाही. आज एकूण जगात जी परिस्थिती आहे त्याला थेट आणि पडद्यामागे राहून जे जबाबदार आहेत त्यापैकी कोणालाही बाकी जगाची फिकीर नाही. त्यांची उद्दिष्टे वेगळी आहेत. बोको हरामने पळवून नेलेल्या मुलींचा नवा फोटो प्रसिद्ध केलाय तर तिथल्या नागरिकांची संघटना धडपडतेय आपल्या मुली त्यात दिसताहेत का बघायला. सरकार नुसत्या घोषणा करतेय.

हे असले काही वाचले/बघितले कि सगळ्या चांगुलपणावरचा, कर्मावरचा, देवावरचा, स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो. आपणही कधी सुपात येऊ हे कळणार नाही असे वाटायला लागते. अजूनतरी मी भारतात सर्वात जास्त सुरक्षित आहे असा विश्वास आहे. हा विश्वास माझ्या हयातीत तरी न तुटो एवढीच प्रार्थना करणे हाती आहे.

थोडक्यात सद्दाम हुसेन असे पर्यंत जग सुरक्षित होत अस म्हणता येईल.
इराक वर झालेल्या हल्ल्या नंतर परिस्थिती वेगाने बदलली. अता ती पूर्वपदावर येणे कठीण आहे. >> +१.. पूर्वपदावर येणं आणि कोणि येउ देणं कठीण आहे..