अनुबंध मैत्रीचे (भाग २)

Submitted by लाडू on 9 August, 2016 - 11:14

खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली होती. अमृतला काय करावे काहीच सुचत नव्हते. आणि तनया तिच्याच विचारात खोलवर हरवली होती. आज एकदाही तिने कैवल्यला फोन केला नव्हता. रोज दिवसातून सतरा कॉल केल्याशिवाय तनयाचे कधीही समाधान होत असे. पण आज तिलाच नको वाटत होते. म्हणजे माझ आणि तन्मयचं भांडण झालंय हे त्याला सांगण्यापलीकडे तिच्या डोक्यात काहीच नव्हते. पण हे ही तितकच खर की जगात कैवल्य हा एकच माणूस असा होता ज्याची फक्त जाणीव झाली तरी तनया खुश होऊन जात असे. कितीही दुखात, टेन्शनमध्ये असताना कैवल्यचा फक्त आवाज ऐकला तरी तनयावर जादूची कांडी फिरल्यासारखे होत असे.

“अमृत, मी जरा कैवल्यला फोन करू?” असे म्हणत तिने फोन काढला पण.

अमृतला मात्र बरेच वाटले. ‘आता निदान कैवल्य तरी हिला नीट समजावू शकेल. अशा आशेवरच त्याने हसून मान डोलावली. शिवाय आता आपले इथे जास्त काम नाही हे ही त्याला कळलेच. “मी आलोच तनया. तू बोल कैवल्यशी. माझी उगाच अडचण नको तुम्हाला.” अस म्हणत डोळे मिचकावत तो बाहेर गेला. तनायाने लटक्या रागाने त्याच्यावर उशी फेकून मारली. “चला, कॉफीचं अप्रिसिएशन मिळालं. चेहरा बघा एका मुलीचा लाल लाल” उशी झेलत अमृत बाहेर पळून गेला. कैवल्यमुळे का होईना तिचा मूड परत ठीक होईल आता या विचारानेच तो निर्धास्त झाला.

तनयाने सकाळी तन्मयशी भांडण झाल्यापासून फोन पाहिला पण नव्हता. एव्हाना कैवल्यचे तेरा मिस्ड कॉल्स होते. तिने जराही वेळ न दवडता पटकन कॉल केला आणि कैवल्यने एका रिंगमधेच उचलला.
"बोला सरकार. कधीपासून वाट पाहतोय फोनची. आहात कुठे? आमची आठवण येते की नाही हल्ली?" तनयाला हसूच आल पटकन.
“अरे आज ना डोक खूप दुखत होत. आणि थोडा मूड डाऊन. म्हणून राहून गेलं.”
“वाटलंच मला. नाहीतर मला कधीपासून एवढ सुख मिळायला लागलं की गर्लफ्रेंडने पूर्ण दिवसात डोक खाल्लच नाही. चुकल्याचुकल्यासारखं वाटत ग त्यामुळे.”
“गप्प बस हां कैवल्य. म्हटलं ना मूड खराब आहे. अजून काही बोललास तर जीवच घेईन तुझा.”
“हा हा हा. बर ठीकाय. घाबरलो. आता सांग. मूड का खराब? कोण तुझ्या वाटेला गेला?”
“तन्मय... तो फार विचित्र वागतोय माझ्याशी. मला फार राग आलाय.”

यावर मात्र कैवल्य खो खो हसू लागला. कैवल्यसाठी हे काही नवीन नव्हते. हल्ली तो फोनवर तन्मयबद्दलच जास्त ऐकायचा. ‘तन्मय अस म्हणाला, मग मी अस म्हणाले; तन्मय मूर्ख आहे. त्याला सध्या सध्या गोष्टी कळत नाहीत, तन्मय खूप मस्त आहे. त्याने मला एक मस्त आयडिया सांगितलीय’ अस काहीतरी तनया रोजच बडबडायची. त्याला खर तर तनयाची सततची बडबड सहन करू शकत असणाऱ्या या तन्मयबद्दल जरा आदरच वाटायचा कारण कधीकधी तनया फारच निरर्थक बडबड करायची आणि तिला सहन करून योग्य ते रिप्लाय करण म्हणजे तसं महाकठीणच काम होतं.
“कैवल्य मी फोन ठेवतेय. तू माझ सिरिअसली ऐकत नाहीयेस.” तनया आता तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत होती.
“अरे नाही नाही. ऐक तर.”
“मनापासून काही बोलणार असशील तर बोल. नाहीतर माझं मी बघते.”
“हो. एकदम मनापासून. मला फक्त एक सांग, विचित्र म्हणजे कसा वागतोय तो? कारण मला माहितेय. तुझ्या पंचवीस ओळींच्या मेसेजला एका शब्दाचा रिप्लाय करण पण तुझ्यासाठी विचित्रच असत. तसं काही नाही ना?”
"नाही. तस नाही. तो मुद्दाम तोडून वागतोय कदाचित. किंवा मला नाही माहित रे. पण मला नाही आवडत आहे त्याच वागण. आणि मी नेहमी त्याच्या तक्रारी करते तसं काही नाही. हे प्रकरण खूप सिरीअस आहे.”
"हे बघ तनया, त्याला बाकीपण प्रॉब्लेम असतीलच न. त्याच्या घरी, ऑफिस मध्ये काही झाल असेल, ठीकाय ना. बोलेल तो तुझ्याशी. इतकं काय टेन्शन घ्यायचं कशाचं पण?overeract करू नकोस उगाच. धीर धरावा जरा माणसाने."

"ओ बाई, काय म्हणतोय मी? बर मी ठेवू का फोन, घरी आलोय. काम आहेत. तुझे मित्र तुझ्यासारखेच सेंटी. त्यात मी काय बोलणार बिचारा पामर. पण काळजी नको करूस. मित्र आहे न तुझा. बोलेल नीट तुझ्याशी. हो पण तो म्हणजे काय कैवल्य नाही. तूच प्रायोरिटी असायला. त्याला वेळ दे जरा. आणि बाकी काम करा जरा स्वत:ची. चल बाय. लव यु."

कैवल्यने फोन ठेवला सुद्धा. त्याच्या मते विचार करण्याएवढ विशेष काहीही झाल नव्हत.‘खरच? विचार करण्यासारखं काहीच झालेलं नाहीये? मी पराचा कावळा करतेय का मग? हा कैवल्य काय समजतो स्वत:ला? गर्लफ्रेंड इतकं सिरिअसली काहीतरी सांगतेय, पूर्ण ऐकून पण नाही घेतलं त्याने.’ तनयाची अजूनच चिडचिड झाली. त्याच तिरीमिरीत तिने पुन्हा कैवल्यला कॉल केला

“तुला माझी जरा तरी किंमत आहे का कैवल्य? तू फोन कसा काय ठेऊ शकतोस? मी किती टेन्शन मध्ये आहे कळत नाही आहे का तुला?”
“होल्ड ऑन तनया. मी घरी आहे. आताच आलोय. मी करतो तुला परत कॉल”
“कशाला? काही गरज नाहीये. तू कर आराम घरी. काही फोन वगैरे नको करूस.”
“तनया अग पण इतकं काय झालंय? त्या कुणा तन्मयचा राग माझ्यावर का काढतेयस तू?”
“कुणा तन्मयचा नाही. मला तुझाच राग आलाय कैवल्य. उगाच जस्टीफीकेशन देऊ नको तू, तुझच कस बरोबर आहे ते. कायम तूच बरोबर का? मला तुझा राग आलाय तरी तू म्हणतोयस की मी दुसऱ्याचा राग काढतेय. तुझ चुकतय तर चुकतय. कधी तरी मान्य कर ना निमूटपणे.”
“बर बाई. माझ चुकलं. पण ना तनया, आपण रात्री बोलूया का प्लीज? मी कॉल करतो ना तुला. आता खरच पॉसिबल नाहीये अग.”
“हो मला माहित आहे. मला तुझी खूप गरज असते तेव्हाच नेमका तू अस वागणार माझ्याशी. तुझ्याकडे कधीच वेळ नसतो माझ्याशी बोलायला. कायम बिझी.”
“तनया शांत राहा. काय झालंय? मी मघापासून तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि तू मुर्खासारखी वागतेयस. मी जास्त सहन नाही करू शकत ओके? अजून एकदा सांगतो. थोड्या वेळाने कॉल करेन. मग बोलू. तोपर्यंत हायपर होऊ नकोस.”
“नाही मला आताच बोलायचय. हाच फरक आहे खर तर तुझ्यात आणि तन्मयमध्ये. तो अस नही वागत माझ्याशी. कितीही बिझी असेल ना तरीसुद्धा कमीतकमी माझं म्हणण पूर्ण ऐकून घेतो.”
“बास झाल तनया आता. कोण आहे कोण ग हा तन्मय? आतापर्यंत खूप ऐकून घेतल. आता अजून नाही ऐकू शकत. सारखं आपलं तन्मय तन्मय. ठीकाय ना. आहे तुझा मित्र, समजून घेतो तुला. मग मी कोणीच नाही काय? मी काहीच नाही केल का कधी? तू माझी तुलना करतेयस चक्क? इतका चांगला मित्र आहे तुझा तर मग माझ्याशी का बोलायचय तुला? आणि त्याच्या पण तक्रारीच करणार ना तू माझ्याकडे? तुझा प्रॉब्लेम काय आहे तनया? ”
“तू. तू प्रॉब्लेम आहे माझा. समजून सुद्धा घेत नाहीस मला जरा. आताही ओरडतोयस” तनया कसबस मुसमुसत म्हणाली.”
“हो का? वा. छान. हेच ऐकायचं राहील होत आता. आजच्या दिवसात इतक्या वेळा फोन करून तू उचलला नाहीस. ते ही का तर मूड नव्हता. फोन कडे लक्ष नव्हत. कारण तन्मयशी भांडण झालेलं. ते मी समजून घेतलं. दिवसभरात एका कॉल वर बोललो आपण ते ही तन्मयबद्दल. ते ही मी समजून घेतल. मला अजिबात ऐकायचं नसताना फक्त तुझ्यासाठी मी तुझी फालतू बडबड ऐकली. तुला समजावलं माझ्या परीने. तू आता फोन वर माझ्याशी वाटेल तस बोलतेयस तरी तुझा मूड खराब आहे म्हणून मी समजून घेतोच आहे. आणि तरीही माझ्यापेक्षा तन्मय चांगला हे ऐकवलंस तू मला?”
“मग आता तू पण एकच एक गोष्ट. अस मी ही म्हणू शकतोच की तू मला समजून नाही घेत. तू बस फक्त तुझीच दुख कुरवाळत. आणि मग आठवलं ना की कैवल्य पण आहे जगात, तर कॉल कर मला. तोपर्यंत मलाच तुझ्याशी बोलयच नाहीये. तन्मयशी प्रॉब्लेम आहे ना? मग त्याला कॉल कर आणि कर सॉर्ट आउट. पण मला त्रास देऊ नकोस आता. गुड नाईट फॉर नाऊ.”
“हो. तेच योग्य आहे. तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी. झोप तू गुड नाईट.”

तनयाने फोन आपटलाच आता. रागाचा अतिरेक झाला होताच. आणि आता तर अश्रूंचा महापूर आला होता तनयाच्या डोळ्यात. ‘हे काय होतंय माझ्यासोबत. जितकं सोडवायला जातेय तितके गुंते वाढत आहेत. एका नात्याचा विचार करत होते आता दुसरही बिघडत चाललय. तन्मयला कॉल करायचा म्हणजे स्वत:च्या आत्मसन्मानाशी तडजोड. त्यापेक्षा नकोच ते. पण कैवल्यलाही अस वाटावं? ? मला वाटायचं कैवल्य कधी असा विचार नाही करणार. तो मला समजून घेतो. मैत्री माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे त्याला ठावूक आहे. पण आज त्याने अस बोलून मला खूप हर्ट केलंय. त्याने तरी अस वागायला नको होत माझ्याशी. माझच काही चुकतय का? मी काय करायला हव अशावेळी? खरच तन्मयला करू का कॉल? का कैवल्य ला करू? सगळ्यांना एकदमच माज आलाय बहुतेक. की मीच खूप इगोईस्टिक वागतेय? काहीच कळत नाहीये मला. जाऊ दे. मला विचारच नही करायचा आता. आणि कोणाशी बोलायचं पण नाही. झोपते मी.’

तनयाने लाईट्स बंद केले. आणि तिच्या फोनची नोटीफिकेशन टोन वाजली. बघते तर तन्मयचा मेसेज. तिने फोन तसाच पालथा फेकला गादीवर. आणि बळेबळेच उशीत तोंड खुपसून पडून राहिली.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाडू,

हिला भाग फारसा नव्हता आवडला कारण कदाचित त्यात परिच्छेद नव्हते हे असेल.

पण हा भाग आवडला. तनयाचं व्यक्तिचित्र उभं राहिलं डोळ्यासमोर. अशा बर्‍याच व्यक्ति पाहिल्या आहेत त्यामुळे चांगली कनेक्ट झाले. इमोशनली इनसिक्युअर किंवा लो सेल्फ एस्टिम किंवा सरळ शब्दात सांगायचं तर समोरचा माझ्याशी बोलला किंवा मला हवा तसा तरच मला त्याच्या आयुष्यात महत्त्व आहे नाहीतर नाही अशा विचारगुंत्यात गुंतलेल्या...

पुढ्च्या भागाची वाट पाह्तेय..