ऐतिहासिकतेत कमी पडणारा 'मोहेंजो दारो....

Submitted by अजातशत्रू on 13 August, 2016 - 10:21

इसवीसन ७९ मध्ये 'पॉम्पे' या देखण्या रोमन शहराचा माउंट व्हेसूव्हियसच्या ज्वालामुखीच्या उद्रेकात विनाश झाला. आताच्या इटलीत असणारया या शहराचे अस्तित्व एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. या पॉम्पेचा विनाश दाखवणारी एक सुंदर प्रेमकथा याच नावाच्या सिनेमातून २०१४ मध्ये आली होती. ज्या प्रमाणे 'टायटॅनिक'च्या प्रेमकथेचा आत्मा तिच्या विनाशात दडला आहे तसेच 'पॉम्पे'चे होते आणि तसेच 'मोहेंजो दारो'चे आहे. पण जेम्स केमेरून, पॉल अँडरसन आणि गोवारीकर यांची तुलना कशी होऊ शकते ? असो .....

काही दिग्दर्शक गुणी असतात पण त्यांच्या अंगात काही खोडया असतात काहींच्या खोडया कालमानानुसार कमी होतात तर काही कधीच सुधारत नाहीत. यापैकी गोवारीकर कुठल्या श्रेणीतले आहेत ते लेखाच्या अखेरपर्यंत तुम्ही स्वतः ओळखाल. ब्रायन पामच्या 'बॉडी डबल' वरून हातोहात उचललेला १९९३ मध्ये रिलीज झालेला 'पहला नशा' हा गोवारीकरांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. या अत्यंत सुमार आणि पडेल सिनेमाने त्यांची दिग्दर्शनाची नशा कमी होण्याऐवजी वाढली. १९९५ मध्ये आलेल्या आमिरखान अभिनित 'बाजी' ला खरे तर त्याच्याच 'सरफरोश'चा पहिला भाग मानला जावा इतकी बेसिक पटकथा त्यात होती. हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही.

२००१ मध्ये आलेला गोवारीकरांच्या 'लगान'चे स्टॅलोनच्या 'एस्केप टू व्हिक्टरीशी थोडे साधर्म्य होते. २००४ मध्ये शाहरुखने गोवारीकरांवर मोठा विश्वास दाखवून त्याचा 'स्वदेस' त्यांच्याकडे दिला. दोन ओळीच्या साध्या सुध्या सिनेमाला आशुतोषने तीन तास पस्तीस मिनिटे घातली ! सिनेमा पाण्यात गेला अन शाहरुखचे विमान जमिनीवर आले ! २००८ मध्ये आलेल्या जोधा अकबर'च्या सुरुवातीलाच हा सिनेमा इतिहासाला धरून नसल्याचे शरणागतीवजा स्टेटमेंट दिसते. मधला स्वदेस वगळता 'लगान' आणि 'जोधा अकबर' ने तिकीट बारीवर धुमाकूळ घातला होता. २००९ मध्ये आलेला तीन तास ३१ मिनिटाचा सिनेमा 'व्होट्स युवर राशी'ने गोवारीकरांचा केमिकल लोचा थोडासा उघड झाला. यात प्रियांका चोप्राने बारा भूमिका केल्याने तिचे नाव गिनीजबुक मध्ये गेले पण प्रेक्षकांच्या डोक्याचे अन तिकीटबारीचे बारा वाजले. या आधीचा लगान तीन तास चौतीस मिनिटांचा होता, तर जोधा अकबर तीन तास तेवीस मिनिटांचा होता ! २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' अशा भयानक नावाचा गोवारीकरांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रेक्षकांच्या जीवाशी खेळून गेला. खरे तर प्रीतीलता वड्डेदार आणि कल्पना दत्ता, गणेश घोष, सूर्य सेन या क्रांतीकारकांनी केलेल्या चितगांव बॉम्बस्फोटांवर हा सिनेमा आधारित होता. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने पाणी देखील मागितले नाही. हा सिनेमा उण्यापुऱ्या तीन तासाचा होता. 'जोधा'मध्ये सहनिर्माता म्हणून कमावलेले पैसे आशुतोषने 'राशी' आणि 'खेले' या दोन सिनेमाचा सहनिर्माता होऊन घालवले. 'लगान'ची निर्मितीमुल्ये देखणी आणि भव्य होती. त्याने थेट ऑस्करवारी पर्यंत धडक दिली. देशभरात 'लगान'मुळे त्यातील इतर छोट्या सहअभिनेत्यांची लोकप्रियता वाढली. गदर आणि लगान एकाच काळात प्रदर्शित होऊनही 'लगान'ला छप्परफाड यश मिळाले होते. 'स्वदेस'चे एडिटिंग चुकल्याची कबुली शाहरुखने दिली होती. खरे तर भारतीय ग्रामीण समाजाचे खरे प्रतिबिंब असल्याने त्याला काही समीक्षकांनी गौरवले होते. मात्र त्याची मांडणी कंटाळवाणी झाली. अर्धा पाऊण तासाची कात्री चालवली असती तर तो एक चांगला व्यवसायिक यश मिळवणारा सिनेमा झाला असता. गोवारीकर निर्मात्यापासून स्वातंत्र्य घेऊन स्वतःच्या शैलीने चित्रपट हाताळणारे दिग्दर्शक आहेत त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

समीक्षकांनी या प्रदीर्घ लांबीच्या सिनेमांमुळे गोवारीकरांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. कदाचित या दबावामुळेच त्यांचा 'मोहेंजो दारो' हा नवा सिनेमा त्या मानाने लहान (दोन तास पस्तीस मिनिटे) आहे. पण इथेच गफलत झालीय. खरे तर हॉलीवूडच्या तोंडात मारेल असे एपिक पिरीयॉडीकल कथानक त्यांच्या हाती लागले होते. 'टेन कमांडमेंटस' किंवा 'बेन हर' च्या तोडीचा सिनेमा बनवण्याची सुवर्णसंधी गोवारीकरांनी सिंधूकालीन मातीत घातली आहे. हा सिनेमा पाहताना 'द परफेक्ट स्टॉर्म' हा समुद्री वादळावरचा नितांत सुंदर सिनेमा डोळ्यापुढे तरळत राहतो.

ऋतिक रोशन, कबीर बेदी, पूजा हेगडे, किशोरी शहाणे, नितीश भारद्वाज, रुणोदय सिंग, सुहासिनी मुळे अशी कागदावरची तगडी स्टारकास्ट घेऊन गोवारीकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. इतिहासकालीन कथानक तेही हजारो वर्षे आधीचे त्यामुळे संवाद, गीते, संगीत, वेशभूषा आणि सेट्स या पाच गोष्टीत दिग्दर्शक डोकेबाज नसेल अन निर्मात्याने जर मुक्त हस्ते पैसा सोडला नाही तर सगळा मामला थंडा पडतो. 'गेम ऑफ थ्रोन'च नव्हे तर 'बाहुबली'चे व्हीएफएक्स इफेक्टस 'मोहेंजो दारो'(मोदा)पेक्षा किती तरी उजवे वाटतात. मूळ थीम पॉम्पेची उचलण्यात आली आहे. विनाश होणाऱ्या शहरातील प्रेम करणारे जोडपे आणि तत्कालीन सामाजिक रिती रिवाज ही एका ओळीची कथा आहे...

जगातील प्राचिन संस्‍कृतीपैकी एक असलेल्‍या सिंधू संस्‍कृतीचा ऱ्हास कसा झाला, तिची लिपी, भाषा कोणती होती याचा अद्यापही पूर्ण उलगडा झाला नाही. पण, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी 'मोहेंजो दारो' या चित्रपटातून हा इतिहास उलगडण्‍याचा प्रयत्‍न केला. तो पूर्णत: काल्‍पनिक असला तरीही त्‍यातून पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रगत शहर मोहेंजोदारो कसे होते किंवा त्‍या काळचे राहिणीमान, याची कल्‍पना प्रेक्षक करू शकतात. या चित्रपटातून केवळ मनोरंजनच होते त्‍यातून सिंधू संस्‍कृतीचा खरा खुरा इतिहास उलगडत नाही. एक मात्र नक्की आहे की विकास आणि शहरीकरणाच्‍या नावाखाली निसर्गाचा व साधनसंपत्तीचा बोजवारा उडाला तर काय होऊ शकते याचा एक पुसट मेसेज हा सिनेमा देतो. किंबहुना गोवारीकरांनी तो इथे मुद्दामहून दिला आहे. आपल्याकडे मूळ कथानकाच्या गाभ्याला हानी पोहोचवून थरार पटात 'ईनोद' करण्याची अन ऐतिहासिक सिनेमात बाळबोध सामाजिक 'संदेश' देण्याची गजकर्णी सवय दिग्दर्शकांना जडली आहे. ती इथे देखील आहे.

शरमन नावाचा एक तरुण आपल्‍या काका आणि काकूसोबत आमीड गावात राहत असतो. हे कुटुंब निळीची शेती करत असते. काका - काकूचा प्राणप्रिय असलेला शरमन खूप मेहनती असतो. मात्र, आपण पिकवलेल्‍या मालाला योग्‍य भाव मिळत नसल्‍याची चीडही त्‍याला असते. त्‍यातूनच त्‍याच्‍यात उंच - उंच डोंगरापलीकडे असलेल्‍या मोहेंजोदारो या शहरातील बाजारपेठेत जाऊन आपला माल स्‍वत: विकण्‍याची महत्‍त्‍वकांक्षा वाढते. तो आपल्‍या काकाला त्‍याबद्दल बोलूनही दाखवतो. पण, त्‍या शहरात माणुसकीच नाही असे सांगून त्‍याचे काका त्‍याला तिथे पाठवण्‍याचे टाळत राहतात. शरमन आपल्‍या काकाचे न ऐकता आपल्‍या मित्राला सोबत घेऊन मोहजो दारोला जाण्‍याची तयारी करतो. मग काकाही त्‍याला परवानगी देतात. मोहेंजोदारोमध्ये गेल्‍यानंतर तेथील माहम नावाचा प्रधान शेतकऱ्यांची, रहिवाशांची पिळवणूक करतो. हे पाहून शरमनचे संवेदनशील मन अधिकच संवेदनशील होते आणि तो परत जाण्‍याचा विचार करतो. याच वेळी त्‍याला चानी दिसते. पाहता क्षणीच तो तिच्‍या प्रेमात पडतो. त्‍यानंतर त्‍याचा परत जाण्‍याचा निर्णय बदलतो. पण, प्रधानाचा मुलगा मुंजा याच्‍यासोबत चानीचे बालपणीच लग्‍न ठरलेले असते. मुंजाही आपल्‍या वडिलांप्रमाणे दृष्‍ट असतो. तरीही चानी आणि शरमनची प्रेम कहानी कशी फुलते, त्‍यांचा विवाह होतो का ? तो प्रधानाविरोधात कसा बंड करतो ? या सर्वांचे उत्‍तरं चित्रपट पाहिल्‍यानंतरच मिळतील.

ऋतिक रोशनचा इपिक कथा असणारा 'जोधा अकबर' हिट झाल्याने त्याने गोवारीकरांना निवडले असावे. ऋतिक रोशनने अभिनय करायचा जीव तोडून आणि स्नायू फुगवून प्रयत्न केलाय. तो बऱ्याचदा ओव्हर रीयेक्ट होतो. अभिनेत्री पूजा हेगडे हिने काही दिवसापूर्वी सांगितले होते की गोवारीकरांनी बैल निवडताना त्यांच्या देखील ऑडीशनस घेतल्या होत्या. गोवारीकरांच्या 'स्वदेस', 'लगान'', 'जोधा' मधल्या नायिका दमदार आणि कसदार भूमिकेने सज्ज होत्या इथे मात्र आनंद आहे. तरीही पूजा हेगडेने हे विधान केलं याचे नवल वाटते. कबीर बेदी अजूनही रॉजर मूरच्या बॉण्डपटात काम करत असल्याच्या अविर्भावात वावरतो याचे फार वैषम्य वाटते. नितीश भारद्वाजचे बंद पडलेले दुकान सुरु करण्याच्या नादात आपले दुकान बंद पडेल याची भीती गोवारीकरांना कशी काय वाटली नाही याचेही नवल वाटते. बाकी नितीशचा चेहरा अजूनही तोंडावर इस्त्री फिरवल्यासारखाच आहे. एकट्या ऋतिक रोशनने आपल्या देहयष्टीवर अन तुटपुंज्या अभिनयावर ओढून नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय हे मान्य करावे लागेल.

ए.आर .रेहमानने काही काळ काम बंद करून आत्मपरीक्षण करणे नितांत गरजेचे आहे अन्यथा एका चांगल्या संगीतकारचा ऱ्हास आपल्याला अकाली पाहावा लागेल. आधीच्या बऱ्याच सिनेमात कारण नसताना रेंगाळणारया पटकथेवर काम करणाऱ्या गोवारीकरांनी इथे पटकथेचा वेग कमालीचा गतिमान ठेवला आहे. मात्र या अतिवेगाच्या वेडापायी सिंधूसंस्कृतीचे बारकावे उलगडून दाखवण्याची नामी संधी त्यांनी घालवली आहे. सिंधूच्‍या वेगवान प्रहावाप्रमाणे कथा वेगाने पुढे सरकते पण सिंधू संस्कृती पूर्ण ताकदीने समोर येत नही इथे गोवारीकर कमी पडलेत. 'ग्लेडीएटर'पासून प्रेरित होऊन घेतलेली दृश्ये परिणामकारक वाटत नाहीत.'पॉम्पे'प्रमाणे इतिहासासोबत यात प्रेमकथेचाही मसाला ठासून भरला आहे. यातून मोहेंजोदारो शहराची भव्‍य दिव्‍यता कमीच दिसते. त्‍यामुळेच इतिहासात गडप झालेले हे शहर नेमके कसे होते, त्‍याचा विनाश कसा झाला, याचा अल्पसाच अंदाज हा चित्रपट पाहिल्‍यानंतर काढता येतो. शहर जलप्रलयात बुडाल्याचे मुख्य दृश्य अगदीच बाळबोधपणे दाखवण्यात आले आहे. १९७८ मधील राजकपूरच्या 'सत्यम शिवं सुंदरम'मध्ये ज्या टेक्निक्सचा वापर केला गेला होता तोच २०१६च्या 'मोहेंजो दारो'मध्ये केला आहे की काय असे वाटावे इतके आउटडेटेड इफेक्टस यात वापरले आहेत. विनाशकथेत जर विनाश पूर्ण ताकदीने समोर आला नाही तर तो प्रेक्षकाच्या मनावर बिंबत नाही. इथे उलट शेवटी नेहमीप्रमाणे प्रेक्षक अंदाज लावत बसतो की आत पुढे काय होणार आहे अन अंतिम दृश्यातील मजा निघून गेल्याने लोक एक्झिट डोअरपाशी जाऊन उभे राहतात.

जबलपूर, भेडाघाट आणि भूज इथे चित्रीकरण करताना तत्कालीन साधने,चिन्हे. हत्यारे, निवास व्यवस्था, नगर रचना, कपडे, भांडी, घरगुती वस्तू,चलन व आभूषणे यांचा अभ्यासपूर्वक वापर केल्याचे जाणवते. या सिनेमात एकूण ३७ मिनिटे लांबीची आठ गाणी आहेत ती पूर्णतः कापून फक्त ऐतिहासिक कॅनव्हासवर भव्य दिव्य प्रेमकथा आणि शहराचा देखणा प्रलयकारी विध्वंस दाखवला असता तर तो अधिक सुसह्य झाला असता. पण गाणी नसतील तर लोक पडदा फाडून थियेटर जाळून टाकतील अशी बालिश भीती आपल्या निर्मात्या दिग्दर्शकांना वाटत असावी. त्यापायी अनेक चांगल्या कथांची हे लोक माती करतात. मी मागे लिहिलेल्या 'रमण राघव'वर देखील हाच आक्षेप तीव्रतेने नोंदवला होता. इथे देखील तीच बोंब आहे. शिवाय ही गाणी कर्णमधुर नाहीत अन चित्रपट काळ हजारो वर्षाआधीचा असल्याने गुलजार सारख्या कसलेल्या गीताकारास शब्द वेचत फिरावे लागले आहे. गाण्यांचा किती हा अट्टाहास ? काही ओळी, शब्‍द ओढून - ताडून घुसवल्‍यासारखे वाटतात. त्यामुळे या गाण्‍यांत नेहमीचे गुलजार नजरेस पडत नाहीत. गाण्यांच्या दरम्यान समूहनृत्ये हास्यास्पद वाटतात. प्रीती ममगेन ह्या लेखिकेकडे 'एव्हरेस्ट' आणि 'आसमा से आगे' या दोन सिरियल्सचा अनुभव आहे त्यामुळे कथा पटकथा या क्षेत्रात सिनेमाने सपाटून मार खाल्ला आहे.

'लगान' संपल्या बरोबर आशुतोषने या सिनेमाची घोषणा केली होती. अत्यंत मेहनत घेऊन त्याने भूजजवळ तब्बल पंचवीस एकराच्या क्षेत्रात या सिनेमाचा सेट उभा केला होता मात्र आजकाल हिंदी न कळणारे लोक सुद्धा हॉलीवूडचे सिनेमे पाहतात याचा निर्माता दिग्दर्शकांना विसर पडला असावा. विशेष बाब म्हणजे 'द डे आफ्टर टुमारो' आणि 'टेन थाऊजंड बीसी' या सिनेमाच्या तंत्रज्ञांची मदत घेऊन सुद्धा सिनेमाचा मुख्य दोष म्हणजे सिनेमा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला अखंडीतपणे सिंधूसंस्कृतीत रममाण करण्यात कमी पडतो.

शेवटी नेहमीप्रमाणे अवांतर - या सिनेमाची कथा आपली होती असा दावा करून निर्मात्याविरुद्ध आणि गोवारीकरांविरुद्ध याचिका दाखल केलेल्या आकाशादित्य लामा या गृहस्थाचे न्यायालयाने कान उपटले आणि त्याला दीड लाखाचा दंड केला होता. ती रक्कम गोवारीकरांनी नाना मकरंदच्या 'नाम' फाउंडेशनला देणगी म्हणून दिली आहे. मात्र चारेक दिवसापूर्वी जेंव्हा अशी चर्चा कानावर येऊ लागली की 'मोहेंजोदारो'ची पाण्यात गेलेली म्हैस बाहेर येणार नाही तेंव्हा एक पुंगळी सोडण्यात आली की या सिनेमाच्या उपग्रह हक्कातून ६० कोटी रुपये कमवले आहेत. ही कंडी पिकवणारया माय डियर फ्रेंडला एकच आठवण करून द्यायचीय की आजकाल बिग बजेट मल्टीस्टार सिनेमा फ्लोअरवर गेला की तेंव्हाच त्याचे हक्क विकले जातात. रिलीजच्या दोन दिवस आधी नव्हे. असो, मुद्दा हा आहे की या साठ कोटीपैकी वा भविष्यातील शेकडो कोटी कमाईपैकी गोवारीकर आणखी काही रककम 'नाम'ला देतात की भविष्यात त्यांनाच निधी उभा करावा लागतो की काय याची भीती आहे. कारण तेही या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

एका हिंदी निर्मात्याने हॉलीवूडच्या तोडीचा सिनेमा काढण्याचे धाडस केले म्हणून आधी त्याला दाद दिली पाहिजे. दुसरे असे की ज्याला इतिहासाची आवड आहे त्यांनी हा सिनेमा पाहावा कारण नेहमीचे तेच तेच सिनेमे पाहण्यापेक्षा काही तरी वेगळे पाहिल्याचे समाधान मिळते. नेत्रसुखद छायाचित्रण आणि सौम्य रंगातील चित्रपटाचाकोलाज यामुळे चित्रपट नेत्रसुखद ठरतो. तत्कालीन शहर कसे होते हे पाहण्यासाठी तरी 'मोहेंजो दारो' पाहावा. आपले पूर्वज किती प्रगत होते याचा एक अंदाज यातून येतो. जे ऋतिक रोशन या अभिनेत्याचे चाहते आहेत ते हा सिनेमा पाहतीलच. ज्यांनी खंडीभर हॉलीवूडचे सिनेमे पाहिलेत त्यांचे मात्र या सिनेमात मन रमणार नाही. ज्याना कसलीही प्रेमकथा आवडते त्यांनाही हा सिनेमा आवडेल. जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना एक वेगळा व्ह्यू यातून मिळू शकतो पण ठोस बारकावे हाती लागतील म्हणून कोणी इतिहासप्रेमी बघणार असेल तर त्याची निराशा होईल. फिल्मीकिडयांनी हा सिनेमा पहिला तर त्यांना कुचाळकीला एक साधन मिळेल. एकंदर हा सिनेमा इतर सिनेमापेक्षा वेगळी कहाणी हाताळली म्हणून आणि एक चांगला प्रयत्न म्हणून बघण्यास हरकत नाही.

नेहमीप्रमाणे एक फुकटचा सल्ला - १९६६ मध्ये बुध्दकाळात घडलेल्या आम्रपालीच्या घटनेवरती त्याच नावाचा सिनेमा आला होता. त्यात लेख टंडनने वैजयंतीमालाच्या सेक्स अपीलचा पुरेपूर वापर केला होता. सिंधू संस्कृतीतील वेशभूषेचा विचार करता गोवारीकरांनी सेक्स अपील करण्याचा अँगल थोडाफार जरी वापरला असता तरी तत्कालीन वेशभूषेच्या जवळपास ते जाऊ शकले असते. मात्र भाकड सभ्य व्हाईट कॉलर प्रेक्षकवर्ग आपल्याला अंडी फेकून मारेल की काय अशी भीती त्यांना वाटली असावी. ही भीती टाळून त्यांनी रिस्क घ्यायला हवी होती....

मानांकन - माझ्याकडून या सिनेमाला पाच पैकी अडीच स्टार. सरधोपट कथा-पटकथा- संवाद, गाण्याचा हव्यास. कमकुवत तांत्रिक बाजू, ऐन मोक्याच्या प्रसंगात कचखाऊपणा आणि बाळबोध क्लायमॅक्स यासाठी प्रत्येकी अर्धा गुण कमी दिला आहे.

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in

mohenjo-daro-new-poster-latest-still-1000x509.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदरीत या चित्रपटात कुणीच , कसलेच चांगले काम केलेले नाहे म्हणायचे ! प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह. कुठला सूड उगवत आहात गायकवाड तुम्ही ?

धन्यवाद बापू,

माझे पैसे वाचले !! ह्या पेक्षा मग आपला मराठमोळा वाय. झेड. तरी बघीन Wink रिव्ह्यु आवडला..
>>अभिनेत्री पूजा हेगडे हिने काही दिवसापूर्वी सांगितले होते की गोवारीकरांनी बैल निवडताना त्यांच्या देखील ऑडीशनस घेतल्या होत्या. गोवारीकरांच्या 'स्वदेस', 'लगान'', 'जोधा' मधल्या नायिका दमदार आणि कसदार भूमिकेने सज्ज होत्या इथे मात्र आनंद आहे. तरीही पूजा हेगडेने हे विधान केलं याचे नवल वाटते<< गोवारिकरांनी ही भाकड गाय कशी काय बुवा घेतली मग ??
हा हा हा

एकंदरीत या चित्रपटात कुणीच , कसलेच चांगले काम केलेले नाहे म्हणायचे ! प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह >>>> माझ्याही मनात अगदी हेच आलं. Happy
शिवाय स्वदेस, लगान बद्दलचे काही उल्लेख पटले नाहीत.

फार अपेक्षा होत्या या चित्रपटाकडून... तरी हृतिककरता बघणारच.

आम्रपालीची आठवण काढलीत.. त्यातला कपडेपट आणि गाणी दोन्हीही अप्रतिम होते.

सिनेमा बघायची हिम्मत अजून झालेली नाही. पण ट्रेलर बघितला आहे (म्हणूनच हिम्मत होत नाहीये) Wink

सिनेमाच्या नावापासूनच 'म्हैस पाण्यात गेली आहे'. मोहंजोदडो हे त्या पांढरीच्या टेकाडाचं आधुनिक स्थानिक भाषेतलं नाव आहे - अर्थ आहे मृतांचं टेकाड. सिंधुसंस्कृतीचे लोक नक्कीच स्वतःच्या शहराला असं म्हणत नसणार (जरी आपल्यापर्यंत तेव्हाचं नाव पोचलं नसलं तरी)
शिवाय एका दृश्यात चारपाच अबलख घोडे दाखवलेले दिसले. त्यानंतर मी शॉकप्रूफ झाल्याने निर्विकार मनाने जर्दोजी काम केलेला स्लिट असलेला झगा घातलेली हिरवीण आणि मोहंजोदडो मोहंजोदडो असे काहीसे शब्द असलेले गाणे बघितले. Proud
तत्कालीन लोक किलोच्या मापात विविध प्रकार-आकाराचे मणी वापरत त्यातला एकही मणी कुठे दाखवलेला दिसला नाही ट्रेलरमधे तरी
गोवारीकरने समस्त एक्स्पर्ट्सची नावे आभारप्रदर्शनात लिहिली आहेत म्हणे. त्यातल्या एकानेही वरील गोष्टी दाखवा असा पुसटसाही सल्ला दिला नसणार हे मी खात्रीने सांगू शकते.

तेव्हा इतिहासातील सिंधुसंस्कृती विसरून जाऊन सिनेमा बघावा. एवढंच.

सविस्तर परिक्षण आवडले.
ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहतानाच कंटाळा आला होता. तर सिनेमा पाहाण्यात किती येईल याचाच विचार करतोय.

मोहंजोदडो हे त्या पांढरीच्या टेकाडाचं आधुनिक स्थानिक भाषेतलं नाव आहे - अर्थ आहे मृतांचं टेकाड. सिंधुसंस्कृतीचे लोक नक्कीच स्वतःच्या शहराला असं म्हणत नसणार (जरी आपल्यापर्यंत तेव्हाचं नाव पोचलं नसलं तरी) >>> इतिहासकारांनीच त्याला तसं नाव द्यायला सुचवलं असं गोवारीकरने एका मुलाखतीत सांगितलं. मोहेंजोदारो ह्या नावाचा अर्थ आणि संदर्भ त्याला माहीत असला तरी दुसरं नाव दिलं तर सामान्य लोकांच्या मनावर ही मोहेंजोदारोची गोष्ट म्हणून ठसणार नाही म्हणून हे नाव दिलं म्हणे.

ट्रेलर बघून निराशा झाली होती पण पेपरमध्ये बरे आले आहेत रिव्ह्यु़ज. रिव्ह्यूत कौतुक करायलाच पाहिजे असं नसलं तरी हा रिव्ह्यू फक्त निगेटिव्हच लिहायचं असा विचार करुन लिहिल्यासारखं वाटला.

I am sure some historians would be very happy with the horses and the sanskritized language and the fair skin and light eyes in the movie. Fits the current scheme of things.

Both Rustom and Mohenjo-Daro are prime examples of how current nationalistic tendencies influence art.

ऐतिहसिकतेत कसा मार खल्ला ते पण नाही कळाले. सुरकोतडा, लोथल इथे खर्या घोड्यान्चे अवशेश सापडले ना? चिनुक्स काहिपण .....

Both Rustom and Mohenjo-Daro are prime examples of how current nationalistic tendencies influence art. >>> हे इथे पण लिहिण्याची खरचं गरज होती का ?

Shree, I would advise you to watch the movies and then comment. What I have written is consistent with the theme and the narrative.

Every movie has its own social, cultural and political texture and that cannot be ignored while trying to understand the movie. I hope you let others decide how they want to appreciate a movie.

घोडा हा भारत सभोवतालचा प्राणी नव्हता अरब इराण असे उत्तरेत असणारा होता. घोड्याला नंतर व्यापारी/लढवय्ये इत्यादींनी जगभरात पोहचवले असेल.
मोहेंजदडो ठिकाणी विविध प्राण्यांची चित्रे होती परंतू त्यात घोड्याचा समावेश नव्हता असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. याचा अर्थ त्या काळात व्यापार फारच कमी प्रदेशात होत असेल. कारण दळणवळण करण्याकरीता प्रमुख साधन म्हणून घोड्याचा वापर प्रामुख्याने केलेला आहे. आणि तिथे घोडा हा प्राणीच ठावूक नव्हता. बहुदा ते इतर प्राण्यांचा वापर करत असतील.
मेसोपोटमिअन संस्कृतीत घोड्याचा वापर झालेला आहे असे तिथे सापडेलेल्या चित्रांवरुन दिसून येते. ती संस्कृती सुध्दा तिथल्या तिथेच उगम पावून तिथेच नष्ट झाली असे म्हणू शकतो.

तसेच उत्खनन मधे कुठले हत्यार सापडले नाही. त्यावरून ही संस्कृती शांतताप्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू माणूस आणि हत्यार (संघर्ष) यांचा संबंध अत्यंत जवळ्चा आहे. त्यामुळे हत्यार मिळाले नाही याचा अर्थ ते वापरत नसतील असाही होत नाही. कदाचित वेगळे हत्यार वापरत असतील जे काळाच्या ओघात नष्ट झाले. किमान प्राण्यांची शिकार करण्याकरीता तरी हत्यारे हे वापरावेच लागणार त्यामुळे इतिहासकारांचे "हत्यार सापडले नाही म्हणून शांतताप्रिय आहे" हे म्हणणे मला तरी अतिशयोक्तीचे वाटते.

इजिप्तिशन लोकांनी मोठाले दगड चौकोणी कसे कापले कसे त्यांना इतक्या लांबवरून आणले हे अजुन कोडेच आहे. तिथे मोहेंजोदडो चे सुध्दा कोडे अजुन ही आहे

चिनुक्स, सरकारने नक्की कुठल्या चित्रपटाला फायनान्स केलेय, मोहेंजो दडो कि रुस्तमला?? कि सरकारने चित्रपटात अमुक तमुक दाखवा हा दंडक काढलाय?? आणि सगळे निर्माते दिग्दर्शक जीवभयास्तव गुपचूप तो दंडक पाळताहेत?

रच्याकने नानावटीच्या बाबतीत रुसी करंजियाने जे केलेले तेच चित्रपटात बेस म्हणून वापरले असेल तर नॅशनलिस्टिक फेर्वेर आपोआप येणारच.

तुझी nationalistic कॅमेन्ट काहीही कॅटेगरीतली आहे. सचिन पगारे असे बोलले असते तर समजू शकले असते.

एनीवेज, लोकांना वरचा रिव्ह्यू निगेटिव्ह वाटला याचे आश्चर्य वाटले. मी परवापासून इतके प्रचंड निगेटीव्ह आणि गोवारीकर-हृतिकवर खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करणारे रिव्ह्यू वाचलेत कि मला हा रिव्ह्यू चक्क पॉझिटीव्ह वाटलं. वरच्या रिव्युतही गोवारीकराची आधीची पापे उगीचच खोदलीत. ती खोदली नसती तरीही चित्रपट वाईट आहे हे बदलले नसते.

भारतामध्ये मनोरंजनात्मक चित्रपटात कोणी मुद्दाम ऑथेंटिक दाखवले तर मला आश्चर्य वाटेल. मोहेंजोदडो नावाच्या जागी अमुक नाव खरे नाव म्हणून दाखवले असते तर बरे झाले असते. Narrative मध्ये उल्लेख करता आला असता तसा. जसे लैला मजनुमध्ये मजनू चा उल्लेख कैस असा केलाय जे त्याचे खरे नाव होते. पब्लिक जरी मजनू ह्या शब्दाशी जास्त परिचित असले तरी मजनू हा शब्द खूप कमी वेळा आलाय.

गोवारीकराने इतक्या जणांचा सल्ला घेऊनही शेवटी स्वतःला जे हवे तेच केले.

Sadhana,

<<तुझी nationalistic कॅमेन्ट काहीही कॅटेगरीतली आहे. सचिन पगारे असे बोलले असते तर समजू शकले असते.>>

Please look up the meaning of 'nationalism' and watch the movies. Happy
Your remarks about Govt. financing the movie are hilarious.

Sadhana,

<<तुझी nationalistic कॅमेन्ट काहीही कॅटेगरीतली आहे. सचिन पगारे असे बोलले असते तर समजू शकले असते.>>

Please look up the meaning of 'nationalism' and watch the movies. Happy
Your remarks about Govt. financing the movie are hilarious.

चिनुक्स, तुझा रोख कशाकडे आहे ते माझ्या लक्षात आलेले.

तुझी पहिली कॅमेन्ट वाचून शेफाली वैद्यचे लेटेस्ट फेसबुक स्टेटस अपडेट आठवलेले.

Huh? Whatever.

Mohenjo-Daro has always been a matter of historical and political debate. One cannot ignore both the facets if the movie is based in and named Mohenjo-Daro. The racial, cultural, political identity of Harappans, Aryans has always been contested and it hasn't been devoid of politics and nationalism. Govarikar's interpretation too clearly brings in nationalist flavour. If you cannot or do not recognise it, then just enjoy the movie. Let others discuss it, if they want.

Govarikar's interpretation too clearly brings in nationalist favour. If you cannot recognise it, then just enjoy the movie..

याचं interpretation "तुम्हाला अक्क्ल नाही" असं केलं बुवा आम्ही..

घोडा सिन्धु सभ्यता कालीन प्राणी नव्ह्ताच मुळी !...
..
..
निदा न ह ड प्पा (१९२१), मोहेजो दारो(१९२२) ही सुरुवातीची उत्खननस्थळे घोडा विरहीत होती
..

..

गोवारीकर साहेबा कडून हि एतिहासिक चूक कशी झाली ??????????

Pages