आम्ही आणि आमचा ......?

Submitted by अजातशत्रू on 11 August, 2016 - 00:24

गावाच्या वेशीपासून कोसो दूर असणाऱ्या शेताजवळील वस्तीत राहणाऱ्या हरिबाला एकशे चाळीस रुपयाची जाडजूड ढवळपुरी चप्पल घ्यायचीय. एक महिन्यापासून तो तळपायाला चुका ठोकलेल्या, चार ठिकाणी शिवलेल्या चपला घालतोय. अजून पैसे बाजूला काढणे त्याला शक्य झालेले नाही.
सायकल पंक्चर काढण्याच्या सामानाची ट्रंक घेऊन पिंपळाखाली बसणाऱ्या कवड्याच्या पोराला सावकारीच्या व्याजाचे हप्ते जड झालेत.
हुतात्मा बागेबाहेरील गजरे विकणाऱ्या उस्मानची मुलगी दोनशे रुपयांचे टॉप दोन महिन्यापासून मागते आहे.
धुणेभांडी करणाऱ्या विमलबाईंचा रात्र शाळेत शिकणारा मुलगा शिकवणी लावायची म्हणून जून महिन्यापासून अडून बसला आहे.
रोजंदारीवर रंगकाम करायला जाणाऱ्या माणिकचे आता पाय लटपटतात, रात्री घरी आल्यावर रंगाच्या ऍलर्जीने अंगावर पुरळ येतेय. बायकोला नवी साडी घ्यावी असं त्याला मनोमन वाटते घरच्या टेन्शनने त्याचे बरेच पैसे व्यसनात खर्च होतात.
एसटी स्टॅन्डवर हमाली करणाऱ्या दत्तूच्या वडिलांचे ऑपरेशन दोन वर्षापासून रखडलेले आहे.
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या अझरच्या पायाला चिखल्या झाल्यात अन त्यांचे कपडे जागोजागी फाटलेले आहेत.
पार्क चौपाटीवर चार तास उभं राहून रोज शंभर रुपयांचे खारे चणे फुटाणे विकणारया रास्तेकाकांचे तीन महिन्यापासून घरभाडे थकलेले आहे.
रिक्षा चालवणारया रामभाऊंच्या मुलीला स्थळ येताहेत पण हुंड्यावर गाडी अडकली आहे.
गँरेजमध्ये काम करणारया इस्माईलला स्वतःला सेकंड हॅन्ड गाडी घ्यायचे स्वप्न खूप महिन्यांपासून त्रास देतंय.
भागवत थियेटर बाहेर काकडी कणिस विकणारया ज्योतीला फेअरनेस क्रीम लावावे असे मनापासून वाटते पण त्या साठी पैसे खर्च करण्याची तिची हिंमत होत नाहीये.
सिग्नलवर तान्हुल्यासह भीक मागणारया आशाला रोजच्या जेवणाची अन निवारयाची भ्रांत आहे.
फुटपाथवर झोपणारया कोमूला थंडी ताप आहे, सरकारी दवाखान्याचा त्याला गुण येत नाहीये अन खाजगी दवाखान्यासाठी तोंडावर मारायला फुटकी कवडी देखील त्याच्या कडे नाहीये.
भाजी मंडईत बसणारया गोदामावशीला नवा चष्मा घ्यायचाय, त्यांचा नंबर क्रिटीकल सांगितलाय. जास्ती खर्चाची बाब आहे.
सेंट्रिंग कामावर जाणाऱ्या बज्जूला लग्न करायचेय, पण स्वतःचे घर नाही, नोकरी नाही, शेतीवाडी नाही, घरी सोन्याचा मणी नाही म्हणून त्याला कोण मुलगी देत नाही.
साड्याच्या दुकानात कामास असणारे काशीराम थकून गेले आहेत, सायकल चालवताना आता त्यांना धाप लागते पण घरातील उत्पन्न तुटपुंजे आहे.

देशातील पन्नास टक्क्याहून अधिक लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांना रोज हात चालवावे लागतात. ...

तरीही आमच्या देशातील स्वतःला विदवान आणि ज्ञानी म्हणवून घेणारे लोक जात आणि धर्माच्या व्याख्या आणि त्यानुसारचे आचरण या बद्दलच जास्त कंठशोष करत असतात.....
सर्वच राजकीय पक्षांबद्दल न बोललेले बरे अन अशा मुर्दाड लोकांना निवडून देणारया व्यवस्थेला कशी आणि कोणती नावे ठेवायची ?

यांच्याशिवाय देशभरातील अनेक लोक गाय, स्मारकं, पुतळे, जयंत्या, पुण्यतिथ्या, फतवे, दुखवल्या जाणारया भावना, आहार, पोशाख, टोपी, गंध, अभिनिवेश, संस्कृती, वर्ण, संस्कार, धर्मग्रन्थ, धर्मस्थळे, डॉल्बी, स्पीकर, सार्वजनिक सर्वधर्मीय प्रार्थना, धर्मांतर , मिरवणूका, आरक्षण, नामबदल, नामविस्तार अशा एक ना अनेक लाखो गोष्टीवर तासंतास रक्त आटवत बसलेले दिसतात, आमचे प्राधान्य कशाला आहे याचे हे द्योतक आहे.

विकसित देश आणि आपल्यात जमीनअस्मानाची दरी का वाढते आहे याचा विचार करताना आम्ही या मुद्दयालाच फाट्यावर मारतो आणि आपला शहाजोगपणा चालू ठेवतो ...

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_54.html

POOR.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म

एकीकडे ह्या कथा आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या मॉल्स मध्ये लोक घरातली कपाटे कपड्यांनी ओसंडून वाहत असताना हजारो रुपयांचे कपडे घेत असतात. वाटेल त्या किमतीत अन्नपदार्थ घेऊन वाया घालवत असतात. लग्नसमारंभावर करोडो रुपये प्रतिष्ठेपायी वाया घालवत असतात. Sad

पण हा फार एकांगी विचार झाला. लोकांची पैशाची गरज तर अनएंडींग आहे. कितीही जास्त पैसा असला तरी तो कमीच वाटतो.
म्हणून बाकीचे समाजिक इशूज दुर्लक्ष करुन कसे चालेल?
सदैव गरजूंना पैसा पुरविणे हाच एककलमी कार्यक्रम होऊ शकत नाही ना.....मान्य आहे गरिबी आहे, गरजा आहेत, पण दूर करण्याची साधने अपुरी आहेत. लोकसंख्या मोठी व संसाधने कमी हा तर नेहमीचाच यक्षप्रश्न.

बरं. फुकट देऊन लोकांना किंमत राहत नाही.

फुटपाथवर झोपणारया कोमूला थंडी ताप आहे, सरकारी दवाखान्याचा त्याला गुण येत नाहीये अन खाजगी दवाखान्यासाठी तोंडावर मारायला फुटकी कवडी देखील त्याच्या कडे नाहीये. >>>> सरकारी दवाखान्यात ताप सर्दी साठी उत्तम औषधे मिळतात. तेही फुकट.

पण हा फार एकांगी विचार झाला. लोकांची पैशाची गरज तर अनएंडींग आहे. कितीही जास्त पैसा असला तरी तो कमीच वाटतो.
म्हणून बाकीचे समाजिक इशूज दुर्लक्ष करुन कसे चालेल?
सदैव गरजूंना पैसा पुरविणे हाच एककलमी कार्यक्रम होऊ शकत नाही ना.....मान्य आहे गरिबी आहे, गरजा आहेत, पण दूर करण्याची साधने अपुरी आहेत. लोकसंख्या मोठी व संसाधने कमी हा तर नेहमीचाच यक्षप्रश्न.
बरं. फुकट देऊन लोकांना किंमत राहत नाही.
>>>>+111