शांति निकेतन डाळ

Submitted by मेधा on 21 July, 2016 - 12:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी मसूर डाळ
१ छोटा कांदा , इथे अमेरिकेत मी शॅलट वापरते
२-३ लसूण पाकळ्या,
पांच फोडण ( मेथी ,जिरं मोहरी, बडीशेप, कलौंजी )
१ सुकी मिरची
हळद
मोहरीचं तेल,
मीठ

क्रमवार पाककृती: 

डाळ स्वच्छ धुऊन, चिमूट्भर हळद आणि दीड-दोन वाट्या पाणी घालून शिजत ठेवावी .
शिजताना फेस येईल तो जमेल तितका काढून टाकावा.

लसूण पाकळ्या सोलूण त्यांचे बारीक काप करावेत.
कांद्याच्या उभ्या पात़़ळ चकत्या कराव्यात

डाळ शिजत आली की दुसर्‍या एका जाड बुडाच्या पातेल्यात फोडणी करावी

मोहरीचे तेल ( किंवा मोहरी + तुमच्या आवडीचे तेल अर्धे अर्धे ) गरम करुन त्यात हळद, पांच फोडण, सुक्या मिरचीचे तुकडे घालावेत. हे तडतडले की पाठोपाठ लसणीच्या चकत्या घालाव्यात.
एक- दोन मिनिटे परतून कांदा घालावा. कांदा, लसणीच्या पाकळ्या व्यवस्थित खरपूस ब्राउन होई पर्यंत परतत रहावे.
मग शिजलेली डाळ फोडणीच्या पातेल्यात ओतून, चवी प्रमाणे मीठ घालून ढवळून घ्यावे.
एक उकळी आली की डाळ तयार

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
शांतिनिकेतन मधे राहून शिकलेला बंगाली मित्र
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहोरीचं तेल + पंचफोडणानी याला मस्त चव असेल. करून पाहायला हवी.
पंचफोडणात नक्की काय काय असतं? अंदाजेच माहीतीये मला...

मोहरी, जिरे, मेथ्या (मेथी दाणे), बडिशेप, कलौंजी ह्यांचे मिश्रण = पंचफोडण; बरोबर की अजून काही +/- आहेत?

मोहरी, जिरे, मेथ्या (मेथी दाणे), बडिशेप, कलौंजी ह्यांचे मिश्रण >> हो हेच .

मी मोहरी, जिरे, बडिशेप समप्रमाणात घेते. कलौंजी थोडी कमी आणि मेथीदाणे कलौंजीच्या निम्मे.

छान सोपी रेसिपी आहे. मसूर डाळीला स्वतःची फारशी चव नाही तेव्हा पंच फोडण, मोहोरीचं तेल आणि परतलेला कांदा, लसूण ह्यांची चव चांगली लागत असणार.

Nice

फोटो द्यायला काय हरकत होती!?

करुन पाहीन.. मसुर अख्खी वापरली की साल काढलेली डाळ घेतलीस?

पाकृ त लसूण बघून थोडं आश्चर्य वाटलं. सहसा बंगाली डाळींमधे लसूण वापरत नाहेत, एरवी शाकाहारी स्वैपाकातही क्वचित वापरतात Happy
आता शांतिनिकेतन पब्लिकला विचारून घेते तिकडे काही खास अशी लसूण घालून करतात का म्हणून.

लोणी किंवा साजूक तुपात फोडणी केली तर आणखी मजा येईल! >> मी साध्या गोड्या वरणाला साजूक तुप आणि लसणाच्या पातळ चकत्या, हिरवी मिरचीची वरुन फोडणी घालते. उकळल्यावर वरुन कोथींबिर घालायची. वरण थोड दाटच ठेवायच. गरमा गरम भाता बरोबर झकास लागत Happy

छाने रेसिपी.. मसुर डाळ फारशी आवडत नाही आणि वरणासारखी केली की अगदीच आजारल्यासारखे वाटायला लागते. अशी करुन पाहिन.

वरदा, नक्की विचारुन सांग.
माझा मित्र तिथली ही डाळ आणि फ्लावर बटाटा भाजी याची सतत आठवण काढत असे. मी दोन्ही प्रकार त्यांच्या घरी ( इथे अमेरिकेत) खाल्ले आहेत. फ्लावर बटाटा भाजी मला इतकी खास वाटली नाही, पण ही डाळ मात्र लव्ह अ‍ॅट फर्स्ट बाइट !

हो, फ्लॉ. ब. रस्सा ही एक बंगाल्यांची (माझ्या मते उगीचच) आवडती भाजी असते. हिवाळा आला की अगदी हौसेहौसेने फ्लावर आणून रांधून चवीचवीने खातात.
मी शांतिनिकेतनला बरेचदा गेलीये. पण अशी डाळ कधी दिसली नाहीये. शां.नि च्या नावाने सारखं स्मरणरंजन करणार्‍या लोकांच्या तोंडून पण कधी ऐकलं नाही. एरवी मसूराच्या वरणाला पंचफोडण आणि कांदा घालतातच. एक टिपिकल स्वाद असतो त्या डाळीचा. पण आता विचारते होस्टेलमधे वगैरे लसूण घालतात का म्हणून

हर्ट, मी करते लोण्यातली फोडणी! Proud पांढरे लोणी किंवा अमूल बटर, कोणतेही लोणी. कधीकधी लोणी + तूप किंवा तेल + तूप अशीही फोडणी करते.

घरी चणा डाळ थोडी जास्त आहे सध्या म्हणून चणा डाळ वापरून ही शांतीनिकेतन/बिहारी डाळ केली. चव खूप आवडली. मोहोरीच्या तेलाबरोबर थोडं नेहेमीचं तेलही घातलं होतं.

Shanti daal.JPG

सशल किती छान रंग उतरला आहे डाळीत. तू आपल्या मेधाताईने जी पाककृती वर लिहिली हीच पाककृती वापरुन ही डाळ केली आहे का?

हो तीच पाककृती. मला कोथींबीर आवडते ज्यात त्यात म्हणून कोथींबीरीची अ‍ॅडिशन आणि वर म्हंटलंय तसं मसूर ऐवजी चणा डाळ.