स्फुट २१ - संगम

Submitted by बेफ़िकीर on 20 July, 2016 - 10:34

संगम!
हे 'नांव' कर्णोपकर्णी होण्यासाठी
त्याने काय केले नसेल?

आपण कोणीच नाही आहोत
हे त्याला नकळत्या वयातच कळले
आपणही कोणी आहोत
हे जगाला दाखवायची उर्मी तेव्हाच संपली
आपणही कोणी आहोत
हे आई, बाप, भावंडे
वहिन्या, मेव्हणे
मित्र, शेजारी, अनोळखी
ह्यांना नव्हते दाखवायचे त्याला

'मी संगम आहे'
हे त्याला स्वतःला दाखवायचे होते

स्वतःला स्वतःसमोर सिद्ध करणे
हे महाभयंकर आव्हान आहे
जे त्याने पेलले खरे

सगळ्याच बाबतीत सामान्य असल्यावर
करावे काय माणसाने

मग तो कविता करू लागला

त्याची कविता 'ट' ला 'ट' होती
हे त्याला नंतर कळले
खूप जणांनी टाळल्यावर

मग त्याने नवा उपाय योजला

जो गाजतो, त्याला टाळ्या वाजवा
हा निर्णय घेताना
तो वीस वर्षांचा होता
आज साठ वर्षांचा आहे

चाळीस वर्षे
त्याने टाळ्या पिटल्या
ऑटोग्राफ्स घेतले
दिग्गजांच्या कविता पाठ केल्या
महंतांची भाषणे टिच्चून ऐकली
भारावून गेल्याचा अभिनय केला
सतरंज्या घालण्यापासून
माईक अ‍ॅडजस्ट करण्यापासून
तिसर्‍या रांगेत बसण्यापासून
ते
हक्काचा श्रोता होण्यापर्यंत
सारा प्रवास एकहाती केला

कोणीच सोबती नव्हता त्याचा
ना बायको, मुले, आई, बाप
वहिन्या, मेव्हणे, मित्र, शेजारी
आणि ना त्याची स्वतःची कविता

ह्या प्रवासात
अनेकदा त्याने स्वतःची कविता सादर केली
सुरुवातीला नवशिका म्हणून
नंतर मुरलेला म्हणून
कविता होती तिथेच राहिली
रिअ‍ॅक्शन्स बदलल्या, इतकेच

पण रेटून नेले त्याने
वाट्टेल त्या परिस्थितीत
वर्तुळ सोडले नाही

त्याच्या असण्याची सवय होऊ लागली
श्रोता म्हणून, सहभागी कवी म्हणून

त्याच्या असण्याची गरज बनू लागली
श्रोता म्हणून, सहभागी कवी म्हणून

सर्जनशीलता, प्रातिभ सक्षमता
असले शब्द
जाऊ लागले त्याच्या कानावरून
येऊ लागले तोंडातून बाहेर
होऊ लागले त्याचे अंकित

मानधन, शाल, श्रीफल, उल्लेख
ह्यापासून लांब असलेला तो

एक दिवस स्टेजवर बसला

कुठल्याश्या दरिद्री काव्यसंमेलनात
अपरिहार्य निवड म्हणून

'द अदर साईड ऑफ द टेबल'

मग तो पाठ करू लागला
गझला, ओव्या, रुबाया
गदिमा, कुसुमाग्रज, ग्रेस
आणि
त्यांचा वापरही करू लागला
अनाठायी

मग त्याचे 'सर्वत्र' असणे'च'
एक गृहीतक बनले

लीलया मोठमोठ्या बाता मारणे
हा व्यासंग ठरला

सोबतीचे कवी
कामाला लागले
संसाराला लागले
निवृत्त झाले
दिवंगत झाले

पण हा?

हा टिच्चून तिथेच

पाठांतर? एक नंबर
संदर्भ? एक नंबर

झाला प्रमुख पाहुणा
इतर कोणीच नव्हते म्हणून
आणि टाकले गाजवून सभागृह
लोक अवाक

मग स्वतःची कविता ऐकवली
पुन्हा लोक अवाक
इतका असामान्य माणूस
इतके सामान्यांना कळेल
असे लिहितो?

एका महामूर्खाने मग
त्याला चक्क अध्यक्षच केले
एका काव्यसंमेलनाचे

अख्खा जमाव तोंडात बोटे घालून
फोटो काढणारे स्तिमित
ऐकणारे हबकलेले

अरे भाषण का काय?
पार पिसे काढली एकेकाची
आणि स्वतःची कविता म्हणाल तर!!!!
आरामात कोणालाही पोचेल अशी

मग एक मत्सरी उगवला
"हा ट ला ट जुळवणारा
सामान्य मनुष्य आहे"
म्हणाला

त्याच्यावरच टीका झाली

मग येऊ लागल्या बातम्या

आज संगम ह्यांचे भाषण

गर्दी खेचायला तेवढे पुरे होऊ लागले
संगम स्वतःची कविता विसरला
मर्ढेकर, चित्रे, ग्रेस, विंदा
वगैरेवर फडाफडा बोलू लागला

हेडलाईन्स येऊ लागल्या
'कविता जगण्याची समाजाला गरज - संगं'

घरी शाली विकायला काढल्या
नारळ वाटप सुरू झाले
मानधन चिरंजिवांच्या पगाराहून जास्त
सौभाग्यवती उतारवयात इम्प्रेस्ड

मग हळूहळू पदव्या बदलल्या
अभ्यासक
व्यासंगी
समीक्षक
ज्येष्ठ समीक्षक

पूर्वीचे सगळे मित्र
आलिशान बंगल्यात बसून बातम्या वाचतात
आणि मनाशी म्हणतात
"साला आपण काय मिळवले?"

संपत गंगाधर महाडदळकर

उर्फ संगं

उर्फ संगम

तुच्छपणे हसतो सगळ्या काव्यविश्वावर
आणि....
आता आधी मानधन विचारतो

=====================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users