बोट – Girl In Every Port

Submitted by स्वीट टॉकर on 19 July, 2016 - 07:01

Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते!

वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात. बहुतांशी बोटी या रिक्षा किंवा टॅक्सीसारख्या असतात. जिथे भाडं मिळेल तिथे जायचं. क्वचितच असं ही होऊ शकेल की दहा दिवसात परत त्याच बंदरात परततील, किंवा आयुष्यात परत कधीच येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रेमात मुली पडण्याचा प्रश्नच नाही. मग खलाशांच्या गळ्यात गळे घालून मुंबईच्या बॅलार्ड पियरजवळ फिरताना दिसायच्या त्या कोण? त्या धंदा करणार्या.

वीस पंचवीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की बॅन्कॉकला बोट गेली की सगळ्यात आधी बायकांची टोळी बोटीवर हजर व्हायची. येणार्या जाणार्या प्रत्येकाकडे बघून लाडिक “हेलो हॅन्सऽऽऽम” चालायचं. दिसायला कितीही छोट्या दिसल्या तरी यांना कोणी ‘गर्ल’ म्हणू शकेल काय? जर त्यांना वर यायला मज्जाव केला तर बोटीवरील माल उतरवायचं किंवा चढवायचं काम करायला बंदरातले लोक यायचेच नाहीत. बोटीचं भाडं तासाला हजारो रुपये असतं. शेवटी बायकांना येवू द्यावंच लागायचं. मगच बोटीचं काम सुरळित सुरू व्हायचं.

पुढे जगभर दहशतवाद बोकाळल्यामुळे सगळीकडेच बंदरांची आणि बोटींची सिक्युरिटी महत्वाची झाली. त्या मुलींना बंदरात प्रवेश मिळेनासा झाला आणि ही प्रथा संपुष्टात आली.

जगभर धंदा करणार्या लाखो बायका आहेत. जगातले सगळे मिळून खलाशी देखील तेवढे नसतील. अर्थातच या बायकांची आमदनी मुख्यत्वे भूवासियांकडूनच येत असणार. फक्त खलाशांवर अवलंबून राहिल्या तर उपासमारच होईल. मग ‘ गर्ल इन एव्हरी पोर्ट’ हा वाक्प्रचार प्रचलित होण्याचं कारण काय? याची कित्येक कारणं आहेत. आता ‘आहेत’ म्हणण्यापेक्षा ‘होती’ असं म्हणायला हवं कारण आता दारू आणी सिगरेटप्रमाणे ही देखील कालबाह्य होत चालली आहेत.

पूर्वी बोटींचं जमिनीशी आणि एकमेकांशी संभाषण ‘मोर्स कोड’ वापरून व्हायचं. (टिंब, डॅश म्हणजेच डिड्, डा म्हणजेच ‘a’ वगैरे.) त्याला दोन्हीकडे रेडियो ऑफिसर लागायचे. म्हणजे घरच्यांशी संभाषणाचा प्रश्नच येत नाही. पत्रांद्वारेच संपर्क. ती सिस्टिम बेभरवशाची होती. पण त्याचं कारण पोस्टाची अकार्यक्षमता अजिबात नव्हे. आमच्या बोटींचाच प्रोग्रॅम सतत दोलायमान. जिकडे माल चढवायचा किंवा उतरवायचा आहे ती बंदरं कित्येक वेळा बदलायची. (याची कारणं कमर्शियल आहेत त्यात आत्ता शिरायला नको.) जर कंपनीने वेळच्या वेळात पत्रांचं पार्सल (कुटुंबीयांनी पत्र नेहमी कंपनीलाच पाठवायची. कंपनी सगळ्या पत्रांचं एक पार्सल बनवून पुढे पाठवायची.) एका बंदरावरच्या एजंटकडे पाठवलं आणि ते बंदर रद्द झालं तर एजंटला फारसे पैसे मिळायचे नाहीत. मग त्याच्याकडून या आलेल्या पार्सलबद्दल हयगय व्हायची. तो ते वेळेत परतही पाठवायचा नाही, ना पुढच्या बंदराला. शिवाय आता ते पत्रांच्या रूपात नसून पार्सलच्या रूपात असल्यामुळे पोस्टाबरोबर कस्टम्सचा ही सहभाग असायचा. कित्येक गठ्ठे गहाळ व्हायचे.

असं होऊ नये म्हणून कंपनी बंदर पक्कं ठरेपर्यंत पत्र पाठवायची नाही. यात कधीकधी फार उशीर व्हायचा आणि बोट निघून गेल्यानंतर पत्र तिथे पोचायची. कधी नंतर लिहिलेलं पत्र आधी आणि आधी लिहिलेलं नंतर बोटीवर पोचायचं. वाचताना काही संदर्भच लागायचा नाही. एक न एक. नकटीचं लग्नं.

आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो.

पूर्वी सगळं जगच धीम्या गतीनी चालायचं. बोट बंदरात गेली की आठवडाभर तरी राहायचीच. खलाशांकडे भटकायला जास्त वेळ असायचा. शॉपिंग करून झालं की बारमध्ये जाणं हे नित्यनेमाचं असायचं. तिथे मदिरेबरोबर मदिराक्षीही घुटमळंत असायच्याच.

रक्तात अल्कोहोल, भरीस पाडायला मित्रमंडळी, खिशात बर्यापैकी पैसे , भोवती बारबाला आणि जाब विचारणारं कोणी नाही. कित्येकांचा पाय घसरायचा, काहींचा नियमितपणे.

मात्र दर्यावर्दींच्या आयुष्याविषयी भूवासियांना गूढ आकर्षण असतं. त्यामुळे सुट्टीवर आल्यानंतर याचं जे वर्णन मित्रमंडळींना केलं जायचं (अजूनही जातं) त्यात ती मुलगी धंदेवाईक नसून दुकानातली सेल्सगर्ल, ऑफिसमधली असिस्टंट किंवा तत्समच असायची. असं म्हणतात की आपण तीन वेळा मोठ्याने खोटं बोललो की ते आपल्यालाच खरं वाटायला लागतं. त्यामुळे बाकीच्या जगालाच नव्हे, तर खुद्द दर्यावर्दींनादेखील आपण कॅसिनोव्हा आहोत असं वाटायला लागलं.

तात्पर्य काय, तर ‘गर्ल इन एव्हरी पोर्ट’ ही कित्येक दर्यावर्दींच्या बाबतीत रिऍलिटी असते, पण त्या ‘गर्ल’ नसतात.

बाकीच्या दर्यावर्दींच्या बाबतीत ही गर्ल व्हर्चुअल असते.

त्यांच्या थापांवर विश्वास ठेवणार्या भूवासियांच्यासाठी ती व्हर्चुअल रिऍलिटी असते.

“ते थापा मारतात” असं लिहून मी त्यांच्या या सवयीवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतो आहे का? तसं नाहिये. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या लैंगिक क्षमता आणि कर्तृत्व यांबाबत खुशाल थापा मारणे हा युवकांचा स्थायी स्वभाव आहे. दैनंदिन जीवनात “अमुक अमुक मुलगी माझ्यावर फिदा आहे” अशी थाप तो मारूच शकंत नाही कारण लगेचच त्याचं पितळ उघडं पडतं. मात्र जेव्हां काही सिद्ध करावं लागत नाही तेव्हां? सर्वेक्षणांना दिलेल्या उत्तरांमध्ये याची प्रचीती येते.

दर दोन वर्षांनी ‘इंडिया टुडे’ चा ‘Survey of India’s Sex Habits’ किंवा तत्सम नाव असलेलं मुख्य फीचर असलेला अंक येतो. खरं तर वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुलामुलींच्या मिसळण्यावर बर्यापैकी निर्बंध होते. पण इंडिया टुडेमधले भन्नाट आकडे वाचून असं चित्र उभं राहायचं की कॉलेजांच्या गच्च्या आणि अर्ध्या-एक तासासाठी रूम भाड्यानी देणारा कळकट लॉज या दोन्हींमध्ये सारख्याच प्रमाणात लफडी चालतात!

‘इंडिया टुडे’ वर माझा पूर्ण विश्वास. मात्र डोळ्यानी जी स्थिती दिसायची ती काही इतकी भयानक नक्कीच नव्हती. या दोन्हीची सांगड घालता येईना.

याचा उलगडा कालांतराने झाला. मी तेव्हां सिंदिया स्टीमशिप्स या कंपनीत काम करीत होतो. बॅलार्ड पियरच्या आमच्या कंपनीच्या मुख्य कचेरीत आमचा एक कोर्स चालू होता. तिथे कुठल्याशा नियतकालिकाचा प्रतिनिधी स्मग्लिंगबद्दल सर्वेक्षण करायला आला होता. त्या काळात स्मग्लिंग खूप चालायचं कारण सर्वच आयात केलेल्या वस्तूंवर कस्टम्स ड्यूटी भरमसाठ होती. बोटीवरच्या काही लोकांचाही त्यात हात असायचा त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये प्रतिनिधी आला होता सर्वेक्षण करायला.

अंडरवर्ल्डच्या भाई लोकांच्या पिक्चरमधल्या उदात्तीकरणामुळे त्यांची एक खोटी प्रतिमा निर्माण केली जाते. वास्तवात ते जग भयंकर cut throat आहे. नको त्या गोष्टी आपण बघणं देखील आपल्या तब्येतीच्या दृष्टीनी बरं नाही. बोटीवरच्या फारच थोड्या जणांचा स्मग्लिंगमध्ये सक्रीय भाग असायचा. पण माझ्या बरोबरच्या ऑफिसर्सनी त्या प्रतिनिधीसमोर असली वर्णनं केली जणु ते सगळेच जण युसुफ पटेल आणि हाजी मस्तानचे लंगोटीयारच आहेत! स्तंभामध्ये ते छापून आलं देखील! तेव्हांपासून माझा सर्वेक्षण आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष यांच्यावरचा विश्वासच उडाला.

तात्पर्य काय, तर मुलींनी आपल्यावर भाळावं अशी सगळ्यांचीच सुप्त इच्छा असते त्यामुळे चान्स मिळाला की ते वाट्टेल त्या थापा मारतात. खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत.

काही थोड्यांच्या बाबतीत मात्र ‘Girl In Every Port’ हे अगदी खरं होतं. कसं ते सांगतो.

जेव्हां कम्युनिस्ट सत्तेवर होते तेव्हां रशियाच्या प्रत्येक बंदरात InterClub नावाची ऑर्गनाइझेशन असायची. या InterClub नी चालवलेले बार आणि Convenience Centers प्रत्येक रशियन बंदरात असायचे. त्यात इंग्लिश उत्तम बोलणार्या मुली असायच्या. त्यांचं काम म्हणजे खलाशांसाठी सहली, प्रेक्षणीय स्थळांना भेटी आयोजित करायच्या, भाषेमुळे ज्या काही अडचणी त्यांना येण्याची शक्यता आहे त्यात मदत करायची, इन्टरक्लबमध्ये पार्ट्यांच्या वेळी त्यांच्या बरोबर डान्स करायचा वगैरे वगैरे. हे सर्व करीत असताना जगाला तारायला कम्युनिझमच कसा सर्वोत्तम उपाय आहे याचं आमचं बौद्धिक त्या वाक्यावाक्याला घेत असायच्या. खरं तर हेच त्यांचं मुख्य काम होतं. त्यासाठीच इन्टरक्लब्सची स्थापना तिथल्या सरकारने केली होती.

तेव्हां रशियामध्ये प्रत्येक वस्तूचा तुटवडा असायचा. त्याबद्दल एक विनोद होता – रशियन मनुष्याला कुठल्याही दुकानासमोर रांग लागलेली दिसली की प्रथम तो त्या रांगेत सामील होतो. नंतर चौकशी करतो ती रांग कशासाठी आहे त्याची!

सामान्य रशियन नागरिकाचं जीवन खडतर होतं. एखाद्या विदेशी ऑफिसरच्या प्रेमात पडून लग्न करून देश सोडणे हा एक त्यातून सुटण्याचा मार्ग होता. त्याकरता त्या मुलींना खूपच प्रयत्न करायला लागायचे कारण कम्युनिस्ट राजवटीत कुठलीच गोष्ट सोपी नव्हती. कित्येक बोटी रशियाच्या तीन तीन बंदरांवर माल उतरवंत. या मुली बोटीच्या पाठोपाठ ट्रेननी त्या त्या बंदराला जाऊन त्यांच्या दर्यावर्दी प्रियकरांना भेटत. या थोड्या दर्यावर्द्यांच्या बाबतीत मात्र ‘Girl In Every Port’ हे शब्दशः खरं होतं. त्या ‘गर्ल’ होत्या आणि ‘एव्हरी पोर्ट’ला असायच्या!

लग्न करून भारतात आल्यावर त्या खूपच एकट्या पडंत पण बहुतेक सगळ्यांनीच व्यवस्थित संसार केला. मात्र नव्वद सालानंतर कम्युनिझम कोसळल्यामुळे रशियामध्ये खूपच बदल झाले. सामान्य माणसाचं जीवनमान सुधारलं. कित्येक बायका नवरेमुलांसकट रशियाला (किंवा एस्टोनिया, लॅटविया वगैरेला, जे पूर्वी रशियाच्या अधिपत्याखाली होते) परत गेल्या. काही घटस्फोट घेऊन गेल्या, काही इथेच राहिल्या.

ज्याला बघून मुली विरघळून जातील असा राजबिंडा तरूण आस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही. पण असलाच तर तो सिनेसृष्टीत जायचं सोडून बोटीवर धक्के खायला थोडाच जाईल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच मस्त!
सर्वेक्षणाच्या खरेपणाबद्दल एकदम अचूक लिहीले आहे.

छान !
बोटींच्या सुरवातीच्या काळात जेंव्हां बोटींचा जलप्रवासाचा वेग खूप कमी व बंदरांतील मुक्कामाच वेळ अधिक असे त्याचवेळीं कदाचित ‘Girl In Every Port’ याचा उगम झाला असण्याची शक्यता जास्त.

सिंडी +१. थोडं मोघम लिहील्यासारखा पण वाटला मला. म्हणजे तुमचे आधीचे लेख पहाता.

सर्वजण,
धन्यवाद!

भाऊ - तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेव्हां सगळं जगच हळु फिरायचं.

सिंडरेला, वत्सला, हर्शल,
यात हसू येण्यासारखे जे प्रसंग आहेत ते इथे लिहिणं उचित वाटलं नाही. त्यामुळे हा लेख लिहिताना खूपच खोडाखोड झाली. परिणामतः या लेखाला पाट्या टाकण्यासारखा फील आला आहे. तुम्ही गोड मानून घ्यालंच!

मस्त...!!! गेल्या दोन तीन दिवसात सगळेच लेख वाचून काढले.... खूपसे गैरसमज दूर झाले..:-) आणि लेखनशैली तर अप्रतिमच...

तुम्ही खूप क्युट लिहीता.इतक्या सेन्सिटिव्ह विषयावर नीट शब्दात आणी तरीही आशय पोहचेल असे लिहीणे कठीण आहे.
आमच्या डोळ्यासमोर सेलर म्हणजे एकदम पांढर्‍या युनिफॉर्म टोपीतला हृतिक किंवा ग्रेगरी पेक वगैरे टाईप्स हँडसम पर्सनॅलिटीच येतो.आणि नात्यातले(भाचे/पुतणे) नेव्हीतले लोक योगायोगाने तसेच देखणे वगैरे आहेत त्यामुळे जास्तच..

मस्त लिहिलंय. ही सगळीच माहिती नवीन आहे माझ्यासाठी. 'प्रत्येक बंदरात खलाश्याची एक बायको असते' ह्या वाक्याखेरीज बाकी काहीही माहीत नव्हतं.

हा लेख वाचून दोन तात्पर्यं काढली, 'प्रत्येक बंदरात बायको' ह्या उक्तीचा पूर्वीइतका धसका घ्यायची गरज नाही आणि एकापेक्षा जास्त बायका, प्रेयसी किंवा अजून कुणी असतीलच एखाद्याच्या आयुष्यात तर त्यासाठी बंदर किंवा खलाशी असायची गरज नाही, ते कुणाच्याही बाबतीत घडू शकतं Happy

>>> ज्याला बघून मुली विरघळून जातील असा राजबिंडा तरूण आस्तित्वात आहे की नाही मला माहीत नाही. <<<< Lol
पण प्रत्येकाला "आपणच ते राजबिंडे वगैरे" तरुण आहोत असे वाटत रहातेच ना..... ! कोणीच अपवाद नाही याला....

Pages