मेंदूला ताण न देणारा - 'सुलतान'....

Submitted by अजातशत्रू on 12 July, 2016 - 00:31

एका झपाटयात लागोपाठ कॉमनवेल्थ गेम्स २०१०, इस्तंबुलमध्ये २०११ FILA विश्व कुस्ती चॅम्पियनशिप आणि लंडन ऑलंपिक्स २०१२.. या स्पर्धांमध्ये सुल्तान भारताला विजय मिळवून देतो हे पचनी पडत नाही, कारण या गोष्टी खजूर खाल्ल्यासारख्या अन विटांचे ढिगारे उचलण्याइतक्या सोप्या नसतात. आपल्याकडे पब्लिकला 'च्यु' समजून काहीही दाखवायची दिग्दर्शकांना खोड आहे. उदाहरणार्थ - 'बागबान'मधल्या अमिताभला पहिल्याच पुस्तकासाठी थेट बुकर मिळते असं दाखवलं होतं. 'स्वदेस'मधला शाहरुख थेट नासात 'इमाणाचे राकेट' उडवतो. 'हॉलो मेन'वरून उचललेला इम्रान हाश्मीचा मिस्टर एक्स हा अजूनही अजूनही अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया'च्या तांत्रिक स्तराची पातळी गाठतो. 'क्रिश'मधला 'जादू' हे आणखी एक केविलवाणे उदाहरण. आपले लोक मेंदू घरी ठेवून सिनेमे बघतात हे त्यांना माहिती असते. एकंदर पब्लिकचा आयक्यू मायनस गृहीत धरूनच आपल्याकडे बहुतांश सिनेमे निघत असतात. असे अनेक किस्से देता येतील, असो.

तुम्ही जर बॉलीवूड मसालापटाचे चाहते असाल आणि 'सलमानी' चित्रपट तुम्हाला आवडत असतील तर 'सुलतान' हा सिनेमा तुम्हाला भलताच आवडेल. अन्यथा भव्य पडद्यावर किंचित पोट सुटलेल्या आणि वय वाढलेय याची जाणीव देणाऱ्या सलमानचे बरेच मायनस पॉइंट तुम्ही शोधत बसाल. हरियाणामधील निसर्गरम्य खेड्यांचा, भाषेचा आणि माणसांचा या सिनेमात खुबीने वापर केलाय. या सिनेमाचे टायमिंग दोन कारणासाठी परफेक्ट आहे कारण रिलीजच्या मागेपुढे एकही बॉली वा हॉलीवूडची बिगफिल्म नाहीये दुसरे म्हणजे आमीरमियावर कुरघोडी ! आमीर खानच्या 'दंगल'मध्ये खऱ्या कुस्तीगीर पिता पुत्रीची (गीता फोगट) कथा शीर्षस्थानी आहे असं त्यानं स्वतःच सांगितलं होतं. म्हणजेच त्याचा देखील कुस्तीवर आधारित सिनेमा येणार ! आमीरच्या दंगलनंतर सुल्तान लॉंच करून त्याच्या आधी रिलीज करण्यात यशराजचे कुटील डावपेच आमीरच्या 'दंगल'ला हानी पोहोचवण्याचे आणि आपली तुंबडी भरून घेण्याचे आहेत. असो हा देखील एक धंदा आहे अन धंदे मे सब चलता है ! असं आजकालचं ब्रीदवाक्य आहे.

१९८५ मध्ये आलेल्या पॉपस्टार मेडॉनाच्या 'व्हिजन क्वेस्ट' मध्ये एक तरुण कुस्तीगीर प्रौढ महिलेच्या प्रेमात पडतो असा स्टोरीप्लॉट होता तर १९९९ च्या 'बियॉंड द मॅट'मध्ये कुस्तीगीरांचे बाह्य जग दाखवले होते. २०१४ मध्ये येऊन गेलेल्या 'फॉक्स कॅचर' मध्येही कुस्तीगीर नायक आधी राष्ट्रीय, मग जागतिक आणि शेवटी ऑलिम्पिक मध्ये बाजी मारतो असं दाखवले आहे मात्र त्याला वास्तवाची जोड आहे. २०१४ च्या गोल्डन ग्लोबमध्ये आणि २०१५च्या ऑस्करमध्ये पाच नॉमीनेशन या सिनेमाला मिळाले होते. यातील काही सिक्वेन्स सुल्तानमध्ये भारतीय मुलामा लावून 'उचलले' आहेत. आपली ही जुनी खोड असल्याने त्यावर अधिक न लिहिता विषयाला हात घालुयात.

'बजरंगी भाईजान' पासून सलमानने आपली इमेज बदलण्याचं निश्चित केलेलं दिसतं. फॅमिली ऑडियन्स नजरेसमोर ठेवून त्याने सिनेमे करण्याचे ठरवलेलं दिसतं. 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो' अन् आता अत्यंत हुशारीने त्याने खेळलेलं आपल्याला दिसतं. यामध्ये त्याच्या अँक्शन फॅन्ससाठी आखाड्यातली कुस्ती ते फ्रीस्टाइल फाइट रिंगपर्यंतची अँक्शन आहे अन् त्याची रोमॅण्टिक इमेज जपणारी गोष्ट आहे. एवढं सगळं करताना त्याने कुठेही किसिंग सीन वगैरे वाह्यातपणा हेतुतः केलेला नाही. सलमान फिल्मी स्टाईल मारामारी करतो, एक फाइट मारल्यावर पंधरा फूटावर पडतो, अशी टीका करणाऱ्यांना मातीतली फाइट करणारा सलमान यात आपल्याला दिसतो. त्यामधला रिअलिस्टिक अप्रोच बरा वाटतो. अँक्शन, इमोशन अन् ड्रामाचा हा मिलाफ सलमानचं सुपरस्टारडम अबाधित राखण्यास कारणीभूत ठरतं. त्याच्यासाठी केवळ हा एक जुगार नाही तर हा सिनेमा हा अत्यंत हुशारीचं समीकरण आहे. त्यामध्ये व्यवसाय अन् इमेज लार्जर दॅन लाइफ करणारं समीकरण आहे.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुलतानची रिलीजपूर्वीच चांगलीच हवा झाली होती. कुस्तीगिरांना किंवा खेळांची आवड असलेल्यांनाच चित्रपट आवडेल असे नाही तर 'केवळ करमणूक' या हेतूने चित्रपट पाहणारा सामान्य प्रेक्षकही तितकाच गुंतून राहील असा हा चित्रपट आहे. ‘असली पहेलवान की पहेचान अखाडे मे नही जिंदगी मे होवे है, ताकी जिंदगी जब तुम्हे पटके तो तुम फिर खडे हो, और ऐसा दाव मारो की जिंदगी चित हो जाये’ असा जबरदस्त संवाद सुरू असतानाच बलदंड शररीयष्टीचा पहेलवान सुलतान आखाड्यात येतो. आपले चपखल डाव टाकत समोरच्या पहेलवानाला गारद करतो. अशी एन्ट्री होताच आखाड्यातच नव्हे तर चित्रपटगृहात पिटातलं पब्लिक टाळ्या,शिट्यांचा एकच जल्लोष करतं. पहिल्या हाफ मध्ये साधा सरळ असणारा सलमान अन त्यानं अँक्शनसाठी बॉडी प्रीपेअर करणं आपल्या समोर येतं. सेकण्ड हाफमधला आरशासमोरचा सिक्वेन्स ज्या प्रकारे केला किंवा फ्रीस्टाइल अँक्शन करताना त्यामधलं इमोशन होल्ड करणारे सीन्स चांगले हाताळलं आहेत. त्याच्या शरीर कमावणाऱ्या सिक्वेन्स असतील वा त्याने पतंग पकडण्याचे सिक्वेन्स त्यामध्ये रंगत आणली आहे. त्याने आजपर्यंत जेवढा मार खाल्ला नसेल तेवढा इथे खाल्लेला इथे दिसतो. पण ह्या सगळया फाइट्स रिअलिस्टिक वाटतात कारण त्यामधील व्हीएफएक्सचा कमीत कमी वापर हा एक चांगला मुद्दा नमूद करावा वाटतो.
यापुर्वी ‘ तन्नू वेडस मन्नु’ मध्ये कंगनाच्या हरियाणवी ढंगाला प्रेक्षकांनी पसंती दिली. अनुष्का सलमानवरही हा लहेजा सजला आहे. हरियाणातील चित्रीकरण, तिथले राहणीमान विशेषत: अखाड्यात दोघांनीही चांगली मेहनत केली आहे हे कुस्तीच्या खास डावपेचांतून पहायला मिळते. ‘सुलतान ठैर जा, सपणे देखणे अच्छी बात है, मगर कई बार उसके पिछे भागते भागते अपने पिछे छूट जाते है’ अशा संवादातून पैशांमागे पळू नका आणि जीवनात कधीच हार मानू नका असे संदेश पेरण्यात दिग्दर्शकाला काही प्रमाणात यश आले आहे. पहेलवानालाही हळवं मन असतं हे सलमानने जमेल तेव्हढे ठीक रंगवले आहे. अनुष्का जरा बरी अभिनेत्री आहे, मात्र कुठेतरी कमी पडल्यासारखी जाणवते. बाकी यशराजच्या चित्रपटांची भव्यता इथेही अनुभवायला येते. चित्रपटाची कहाणी जरी हरियाणातल्या पहेलवान पती पत्नी भोवती असली तरीही संपूर्ण जगाची सफर प्रेक्षकांना घडते.

माणूस स्वत:शी हारत नाही तोवर त्याला कुणीही हारवू शकत नाही. आयुष्यात कधीच माघार घेऊ नका, हारू नका असा संदेश यामध्ये देताना मनोरंजनाचा मसाला कमी पडू दिलेला नाही. सलमानची आखाड्यात दुसऱ्या पहेलवानावर डाव टाकण्याची स्टाईल आणि चित केल्यानंतर मिशीला हात लावत उठण्याची स्टाईल लक्ष वेधते. हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील बरौली गावात राहणारा 'सुलतान अली खान' डिश टिव्हीचा व्यवसाय करत असतो. कटलेला पंतग पकडण्यात तो माहिर आहे. एकदा पतंगामागे पळताना 'अरफा'शी त्याची भेट होते. तो प्रेमातही पडतो. अरफा स्टेट लेव्हल कुस्ती चॅम्पियन आहे. तिच्यासमोर प्रेम व्यक्त करतो पण, अरफा त्याला स्वत:ची दाखवून देते. अरफाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी कुस्ती शिकतो आणि स्टेट चॅम्पियनशिपही कमावतो. पुढे नॅशनल, इंटरनॅशनल प्रवास सुरु होतो. दरम्यान दोघांचे लग्न होते. अरफा गर्भवती होते तेव्हा जग्गज्जेता होण्याची इच्छा सुल्तानला स्वस्थ बसू देत नाही. नाव कमावण्याच्या गर्तेत अहंकार कधी येतो कळत नाही. मात्र, याच गडबडीत अनुष्का बाळाला गमावते. या गोष्टींचा राग म्हणून सुल्तानशी सगळी नाती संपवते. अन पुढे काय होते हे खूपच रंजक आहे.

दिग्दर्शनात अली जफरने मसालापटाची नस ओळखली आहे. हा अली अब्बास जफऱ म्हणजे संजय गढवी अन् विजय कृष्ण आचार्य या यशराजच्या पठडीतल्या दिग्दर्शकांच्या तालमीत तयार झालेला दिग्दर्शक. 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'गुंडे' अन् आता 'सुलतान' असे त्याचे ओळीने आलेले चढत्या क्रमातले चित्रपट. त्याने सुलतानचं लेखन अन् दिग्दर्शन केलं आहे. त्या सगळ्यात आतापर्यंतचे हुशारीने रचलेलं समीकरण अन् सलमानच्या स्टारडमने तर त्याला चार चाँद लावले आहेत. पण त्याने कथा ज्याप्रकारे हाताळली अन् ज्याप्रकारे प्रवाही ठेवली आहे त्यात यशराज टच आहे. मध्यंतरापूर्वीचा अन् नंतरचा सिनेमा तेवढाच इंटरेस्टिंग ठेवला आहे. त्यामध्ये कुस्ती ते रेसलर असा प्रवास ज्या इमोशनल धाग्याने जोडून ठेवला आहे. अक्षयकुमारच्या 'ब्रदर्स'मध्येही आपल्याला सेकण्ड हाफ बॉक्सिंग मॅच बघावी लागते. पण इथे मात्र ते गणित इमोशनल करून हुशारीने सोडवलेलं आपल्याला जाणवतं.चित्रपटातील प्रत्येक बारिक गोष्टीवर उत्तम काम झाले आहे. चित्रपटातील संवाद कादरखानची आठवण करून देणारे आहेत. संदेश आणि प्रेरणा देणारे संवाद वाटावेत याकडे लक्ष दिलेले आहे. रामेश्वर भगतच्या एडिटिंगमध्ये खरंच क्रिस्प आहे. एवढा वेळ आपण खिळून राहतो. अली अब्बास जफर अन् रामेश्वर भगत यांच्या केमिस्ट्रीने हे रंग अधिक भरलेले आपल्याला दिसतात. सलमानने रंगवलेला सुल्तान नावाप्रमाणे बॉलीवूडी सुल्तान आहे. एका पहेलवानाचे अनेक पैलू त्याने रंगवले आहेत. तर अनुष्काचे काम तिच्या भूमिकेला साजेसे आहे. रणदीप हुड्डा (सुल्तानचा कोच) आणि अमित साद (सुल्तानचा भाऊ) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ‘बेबी को बेस पसंद है’ हे गाणे धमाल करते आहे. तर राहत फतेह अली खानच्या आवाजातील ‘जग घुमेया’ गाण्याने जादू पसरवली आहे. याशिवाय चित्रपटभर असलेले ‘रे सुल्तान’ गाणे सुद्धा ठीक आहे. चित्रपटात असलेली आणखी दोन गाणी ‘बुलेया’ आणि ‘४४० वोल्ट’ मागणी तसा पुरवठा या धर्तीवरची आहेत. विशाल शेखरचे संगीत पुन्हा धूम करते आहे. सिनेमाची लांबी २ तास ५० मिनिटाची आहे, ती थोडी कमी झाली असती तर सिनेमा आणखी सुसह्य झाला असता.

शेवटी जाताजाता - हा सिनेमा रिलीज होण्याआधी सल्लूने मुक्ताफळं उधळली होती (हे नेक काम तो सातत्याने करत असतो). त्याने आपल्या चित्रीकरणातील वेदनांची तुलना बलात्कारित स्त्रीशी केली होती, यावर त्याने माफी न मागता ५ ओळींचा एक खुलासा पाठवला होता. त्याचे वडील सलीमखान यांनी मात्र त्याचं चुकलं आहे असं सांगितलं होतं. महिला आयोगाने त्याला यावर नोटीस देऊन पाहिल्या पण त्याला सल्लूने दाद दिली नाही. चारेक माणसे गाडीखाली चिरडून आणि अख्खा 'बाराशिंगा' पोटात रिचवून थोडीशी CHARITY केली अन सिस्टीमला विकत घेतले की इथं काहीही करता येते हे ज्या लोकांना माहिती आहे त्यात ह्या 'गरीब नेकदिल' सलमानचे नाव बरयापैकी अग्रस्थानी आहे. या लोकांना एक पक्के माहिती असते की, आपल्या जनतेची स्मृती फार कमजोर असते. मी हे लिहितोय कारण या सिनेमाला पुरुषाइतकीच महिलांची गर्दी होती. ज्या महिला हा सिनेमा पहायला आल्या होत्या त्यांना भाबड्या सल्लूने बलात्कारित स्त्री विषयक केलेल्या विधानाचा राग कसा काय आला नाही ? आणि ज्यांना राग आला होता त्यांचा राग चारच दिवसात कसा काय मावळला ? असो.... सर्वच प्रश्नांना उत्तरे नसतात ! मेंदूला ताण न देणारा सुलतान असं एका ओळीत वर्णन करून या सिनेमाला माझ्याकडून पाचपैकी ३.५ गुणाचं मानांकन.

एक फुकटचा सल्ला - पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या गामाला कुस्तीगीर व्हायचे होते पण त्याला प्रथितयश तालीमवाले वा कुस्तीचे गुरु जवळ फिरकू देत नाहीत. पण वयाच्या १० व्या वर्षापासून डोक्यात आणि देहात कुस्तीची रग असणारया गामाने स्वतःला सिद्ध केले. रोज ५००० बैठका आणि ३००० पुशअप्स मारणारा गामा स्वातंत्र्यपूर्व भारतातील बलदंड आणि यशस्वी पहेलवान ठरला होता. त्याच्या स्ट्रेचअप वर्कआउटचा ब्रुसली देखील चाहता झाला होता. गामाच्या आयुष्यात प्रेमाचे ट्वीस्टही होते. त्याची एक पत्नी भारतीय होती तर एक पाकिस्तानी ! नवाज शरीफ यांची पत्नी कल्सुम हिचे नाते गामाशी आजोबा - नातवंडाचे आहे. १९५२ पर्यंत कुस्ती खेळणारा गामा रुस्तुम-ए -हिंद किताबाचा मानकरी होता. त्याने पाकिस्तानचा रहिमबक्षी सुलतान सह देश विदेशातील अनेक नामवंत मल्लांना पाणी पाजले होते. १९२२ मध्ये रॉयल प्रिन्स ऑफ वेल्सनी त्याला चांदीची कलाकुसर असणारा पट्टा 'बलाढ्य कुस्तीगीराचा इंग्लंडकडून बहुमान' म्हणून भेट दिला होता. या पट्ट्यावर भारतीय कारागिराकडून हनुमंताची प्रतिमा कोरून घेतलेली होती. जन्माने मुसलमान असणारा गामा मोठ्या अभिमानाने हा पट्टा घालून स्वतःला मिरवायचा ! या माणसाच्या रिअल लाईफ कथेत जो दम आहे तो सुलतानमध्ये नाहीये. कथा लेखक आणि पटकथाकार यांना नवे शोधायचे जीवावर येते, तयार मालमसाला वरचा वर्ख बदलून मुलामा लावून समोर आणला तरीही पब्लिक बघतेच हे त्यांना ठावूक आहे. कुस्तीगीरावर सिनेमा काढण्यासाठी गामाच्या आयुष्यावर जो सिनेमा निघू शकतो त्यात साहित्यातील - कथेतील सर्व नवरसाचे भांडार आहे. पण लक्षात कोण घेतो ? कारण मेंदूला ताण न देता सर्वांना सर्व हवे असते ....

- समीर गायकवाड.

ब्लॉगवर भेटा ..
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_66.html

salman_sultan_stills15_14.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान, सकारात्मक लिहिलेय, धन्यवाद.

सलमानच्या उद्गाराबद्दल लिहिलेत म्हणून.... महिला आयोगाने त्याला नोटीस बजावली हे वाचून हसायला आलेले, सलमानच्या निमित्ताने त्यांनी स्वतःची प्रसिद्धीची हौस भागवली. ज्या आयोगाच्या बायका स्वतः बलात्कारबळी स्त्रीबरोबर हसतमुखाने सेल्फी काढतात त्यांना एका नटाचे उदगार आक्षेपार्ह वाटावेत.... कोणाची जास्त कींव करावी हा प्रश्न पडतो.

गामाची story share केलीत ते खूप चांगलं केलं. पुस्तक्/महितीपट जे मिळेल ते वाचेन.
सल्लुचे चित्रपट बघणं सोडून दिलंय आता.

सविस्तर आढावा छान घेतलाय सिनेमाचा.
मी टोरंटवरुन डाऊनलोड करुन पाहील्याने मला, तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे फिल आला नाही हा चित्रपट पाहताना.