'सुहाना सफर' सायरा- दिलीपसाबचा ......

Submitted by अजातशत्रू on 27 June, 2016 - 23:01

ओढ ज्याची त्याची.....
तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेलाय अन ती 'हिमगौरी' आता थकून गेलीय....
पण त्यांनी अजून हार मानली नाही, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नाहीत
अन ती त्याची सेवासुश्रुषा थांबवत नाहीये..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झालाय...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत चाललेत..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केलीय.
तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत चाललीत अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चाललेय..
त्याच्या देहाची त्वचा आता सैल झालीय, त्याला ऐकायला जवळपास येत नाहीये अन दृष्टी बरयापैकी धूसर झालीय.
मात्र तीच आता त्याचे पंचेंद्रिय झालीय, ती आता त्याची आई झालीय....

कधी काळी ती त्याची मैत्रीण होती, मग ती त्याची पत्नी झाली, पुढे बहिण झाली शेवटी ती त्याची आई झालीय ; तो आता तिचा मुलगा झालाय....
ती दिवस रात्र त्याच्यापाशी बसून असते.... तिलाही आता कळून चुकलंय की आता आपल्या 'साहिबे आलम'चा आखरी सफर सुरु आहे !
जुन्या आठवणींनी घायाळ होऊन ती कधी कधी एकांतात मूकपणे रडत असते.
गोपी, छोटी बहु, बैराग अन दुनिया ही या जोडीच्या सिनेमांची नावे तिच्या रिअल लाईफमध्ये जणू खरीच झालीत.

ज्या बॉलिवूडमध्ये सकाळी केलेलं लग्न संध्याकाळपर्यंत टिकत नाही तिथं यांच्या लग्नाला येत्या ११ ऑक्टोबरला पन्नास वर्षे पूर्ण होताहेत...
तो आता ९३ वर्षांचा आहे तर ती ७१ वर्षांची आहे, पैलतीरावर त्याची नजर आहे तर त्या तीरावरील दूतांना त्याला नेण्याआधी तिची जीर्ण झालेली अभेद्य भिंत पार करावी लागणार आहे....
११ ऑक्टोबर पर्यंत तरी त्याच्या देहातली निरांजने तेवती रहावीत म्हणून ती अल्लाहकडे फरियाद करत असते तर त्याचे मन 'सुहाना सफर और ये मौसम हंसी'च्या स्मृतीरंजनात दंग असते...
अल्लाह तिची दर्दभरी फरियाद ऐकतो, तिचा हट्ट पुरा करतो अन ती लगेच पुढच्या ऑक्टोबरचा हट्ट करून बसते...एका दशकापासून हे असंच चालू आहे...तिची ओढ कदाचित अल्लाहने ओळखली असावी...
कुणाची ओढ कशात असते तर कुणाची आणखी दुसरया तिसरयात असते, पण नेमके कोणीही सांगू शकत नाही की अमुक एका व्यक्तीची जगण्याची ओढ एखाद्या फलाण्या गोष्टीतच आहे...
मात्र सायराची जगण्याची ओढ स्पष्ट आहे, दिलीपसाबने अधिकाधिक जगावे हीच तिच्या जगण्याची ओढ आहे...
त्याच्या खंगत चाललेल्या देहाला चकाकी यावी म्हणून आपल्या देहाची रुपेरी झाक तिनं धुरकट केलीय...

या दोघांच्याबद्दल एक अनामिक ओढ मनात असल्याने टीव्हीवर बातम्या बघत असताना कुठं दिलीपकुमार हे नाव जरी आलं तरी धस्स होतं अन पतीप्रेमात आकंठ बुडालेली, देहाचे अग्निकुंड करून जगणारी सायराच डोळ्यापुढे येते अन उगाच मन हळवे होऊन जाते...

मग वाटते की, माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात आनंदघन बनून आलेले हे मेघ इतक्यात विरतील असं मला तरी वाटत नाही ....

ही दोघे काय करत असतील याचा विचार करताना कधी कधी असे वाटते की त्याचे जीवनगाणेही आता सायराच गात असेल -
वो आसमां झुक रहा है ज़मीं पर.
ये मिलन हमने देखा यहीं पर l
मेरी दुनिया, मेरे सपने, मिलेंगे शायद यहीं
सुहाना सफ़र...

दिलीपसाब आणि सायराचा हा 'सुहाना सफर' वरवर जरी वेदनादायी वाटत असला तरी मनस्वी देखणाही होत चालला आहे...तो असाच जारी रहावा...

- समीरबापू.

ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/06/blog-post_27.html

 कुमार कोंबी.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय.
रुपेरी पडद्यामागे असंही कांहीं सोनेरी असूं शकतं !!
<< ...तो असाच जारी रहावा...>> +१

सुरेख आणि सारेच काही काव्यमय ! सुरुवातीला काहीसा काळजीत होतो की लेखाच्या निमित्ताने समीरबापू सायराशिवाय आणखीन कुणाची नावे घेतात की काय (ज्यांची काहीही गरज नाही...); पण तसे झाले नाही याचे अतीव समाधान वाटत आहे. सायरा सर्वार्थाने दिलीपकुमार यांची पडछाया झाली आहे.....५० वर्षांचा देखणा संसार. आजही त्या जेव्हा जेव्हा मुलाखतीसाठी वा निवेदनासाठी समोर येतात त्यावेळी त्यांच्या चेह-यावर हसू असते त्यातून खरे तर त्या अभिनयसम्राटाच्या प्रकृतीबाबत "सारे काही ठीक चालले आहे" असे कळतेच.

धन्यवाद समीर गायकवाड याना.

छान.

माफ करा. लेख आवडला नाही. एखाद्याच्या जिवंतपणी (दुसर्‍याच) कोणी त्याची आखरी सफर म्हणून असे लिहिलेले आवडले नाही. चीड आली.

समीर, लेख अगदी त्रोटक झालाय. इतकी रात्र झालीये, माबो उघडली आणि तुमचा लेख पाहून मोह आवरला नाही पण थोडा अपेक्षाभंग झाला. लेख सुरू होता होताच संपला.
शिवाय दिलिप साहेबांच्या सध्याच्या आयुष्याचा उल्लेख आखरी सफर असा करायला नको होता.

बाकी मी बर्‍यापैकी न्युट्रल होते या माणसाबद्दल, खूप आवडतो किंवा अजिबात आवडत नाही असं नव्हतं, पण एका पुस्तकात एक प्रसंग वाचला आणि हा माणूस तेव्हा असा का वागला असा प्रश्न पडला. नया दौर सिनेमात पहिल्यांदा दिलिप कुमार बरोबर हिरॉईन होती मधुबाला पण सिनेमाच्या आऊट डोअर शूट साठी मधुबालाच्या वडिलांनी नकार दिला आणि चोप्रासाहेबांना कोर्टात केस करण्याची धमकी दिली. याउलट चोप्रा साहेबांनी स्वतःहून पुढे जाउन कोर्ट केस केली आणि मधुबालाला रिप्लेस करून वैजयंतीमाला ला घेतले. त्या वेळी मधुबाला आणि दिलिपकुमार आकंठ प्रेमात होते, तरिही आपला सर्व पाठिंबा चोप्रासाहेबांना आहे असेच दिलिप कुमारनी दर्शविल्याने अत्यंत संवेदनशील मनाची मधुबाला खूप दुखावली गेली होती.

असो....

>>त्या वेळी मधुबाला आणि दिलिपकुमार आकंठ प्रेमात होते<<

मधुबालाच्या वडिलांच्या आडमुठ्या धोरणांमुळे (दोघांनी त्यांच्या बॅनरखाली एक्सक्लुसिव काम करायचं) दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यात त्या दरम्यान दुरावा आॅलरेडि निर्माण झाला होता. आउटडोर शुटिंगच्या निमित्ताने दिलीपकुमार-मधुबाला यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होऊ नये या उद्देशाने मधुबालाच्या वडिलांनी तिच्या आजारपणाचे कारण पुढे करुन शुटिंगला नकार दिला. अर्थात त्यामुळे प्राॅडक्शनला आर्थिक फटका बसला ज्याचं पर्यवसान लिगल ॲक्शन मध्ये झालं. दोघांच्यात दुरावा असुनहि दिलीपसाबनी मधुबालाला समजवण्याचा प्रयत्न, पुढिल परीणामांचा विचार करुन निर्णय घ्यायचा सल्ला दिला परंतु पुर्विप्रमाणेच बापा विरुद्ध जाण्याचं धाडस मधुबालाने केलं नाहि...

संदर्भ: दिलीप कुमार - दि सबस्टंस ॲंड दि शॅडो, ॲन आटोबायाग्राफि

एखाद्या च्या अभिनयाचा साक्षात्कार होण्याचाही एक क्षण असतो .फार पूर्वी मला दिलिप कुमार आवडत नसे. द्वेषच करी मी त्याचा. ओव्हर हाईप्ड , काही जणांचा नोस्टाल्जिया वाटायचा. त्याची डायलॉग डिलिव्हरी कृत्रिम , उगीचच भावखाऊ वाटायची. तेव्हाच्या हीरो संस्कृती प्रमाणे स्वतःवर कॅमेरा फोकस ठेवण्याच्या त्याच्या वृत्तीचा रागही यायचा.
एकदा अशाच एका दिलीप भक्ताच्या आग्रहास बळी पडून त्याला कंपनी म्हणून त्याचे मन राखण्यासाठी 'आदमी ' ह्या दिलिप कुमार , मनोजकुमार यांच्या काहीशा अप्रसिद्ध सिनेमाला गेलो. आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यातल्या दिलिप च्या अभिनयाने मी एकदम प्रभावित झालो. एकदम अपीलच झाला तो. वास्तविक ''आदमी ''हा काही दिलिपच्या खास अभिनयासाठी ओळखला जात नाही. पण त्या दिसवशी दिलकी घंटी वाजली खरी. मग माझा ड्रुष्टीकोनच बदलून गेला. त्याच्या डायलॉग मधले शब्दांचे 'वजन ', अंडर टोन परफॉर्मन्स एकदम आवडू लागला मला दिलिप्कुमार 'सापडला ' होता.
मला दिलिपकुमारचा सगळ्यात अभिनय आवडतो तो 'शक्ती 'मधला. कित्येक वेळा शक्ती पाहिलाय. काय त्याच्या आवाजाची फिरत आणि त्यानुसार बॉडी लँग्वेज ! शक्ती मधला सगळ्या कळसाचा सीन म्हणजे राखीच्या मृत्युनंतर तिच्या डेड बॉडीजवल दिलिप गुडघ्यात डोके घालून बसलेला असतो आणि अमिताभ येऊन त्याला मानसिक आधारासाठी स्पर्श करतो त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहून एकमेकांचे सांत्वन करणारे दिलेले लूक्स ! वाह... एकही संवाद नाही त्या सीनमध्ये !! दोघांच्याही करीअर मधला उत्कृष्ट सीन आहे तो !