रमण राघव - मनोविकृतीचा अपुरा थरार ....

Submitted by अजातशत्रू on 4 July, 2016 - 01:24

हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अशी अन भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग. त्याला सगळी जमीन,रस्ते सारं काही ह्या काळ्या रंगातच दिसतात. तो यातल्या फक्त काळ्या चौकोनांवरून चालतो ! त्याला वाटते की पांढऱ्यावरून चाललो की आपण आऊट ! मात्र या काळ्या पटातून चालताना मध्ये कुणी आडवा आला तर ? मग मात्र तो त्याचा अडथळा संपवतो पण काही केल्या पांढऱ्यात पाय ठेवत नाही. तो स्वतःला कधी रमण म्हणवतो तर कधी सिंधी दलवाई ! त्याचं रक्त आणि मेंदू कमालीचे थंड आहेत. लोक त्याला मानसिक संतुलन गमावलेला दुर्दैवी माणूस म्हणून बघतात अन तो लोकांच्या आतड्या कातड्यात आरपार उतरत राहतो, खोल उतरत जातो, काळ्या पांढरीचा खेळ खेळत राहतो. आड येणाऱ्या लोकांना थंड डोक्याने संपवत जातो. तो कुणालाही कसंही मारतो, त्याला त्याची ना खंत ना खेद. तो हे खून का करतो हे देखील त्याला ठावूक नाही. त्याने सख्ख्या बहिणीवर देखील अत्याचार केलेला आहे. तिचा सारा परिवार खलास केला आहे.

रमन राघव २.० या सिनेमातील लीड रोल असणारया रमणची ही व्यक्तिरेखा आहे. बदलापूरनंतर काहीशा तशाच कोल्ड ब्लडेड किलरचा हा रोल नावाजुद्दिन सिद्दिकी अक्षरशः जगला आहे. काही प्रसंगात त्याची भीती वाटून जाते. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अख्ख्या मुंबईचा वापर एका सेटसारखा केला आहे. मुंबईची रात्रीची अनेक रूपे यात दिसतात, अंगावर काटा आणून जातात. लोकलपासून ते अरुंद गलिच्छ गल्ल्यांपर्यंत त्याने पडदा भणभणता ठेवला आहे. डार्क येलोयीश शेड सगळ्या चित्रपटात सोबत करत राहते. ६० च्या दशकात मुंबईच्या अंधारलेल्या रस्त्यांवर रमण राघव नावाच्या सायको सिरीयल किलरने ४१ जणांचे मुडदे पाडले होते. त्या रमणची कथा बेसलाईन म्हणून अनुरागने वापरली आहे. मात्र त्याच्या जोडीने एक फिक्शन केरेक्टर त्याने वापरले आहे. राघव त्याचं नाव ...

रमण हा माणसाच्या रूपातला पशु आहे तर राघव हा नररूपी गिधाड आहे. रमण स्त्रियांना केवळ मादी समजतो. त्याच्या डोक्यात स्त्रियांची याहून वेगळी अशी प्रतिमा नाहीये. तो स्त्रियांना ज्या नजरेने न्याहाळतो त्यातील अधाशीपणा व हिंस्त्र, वासनांध, पिसाट भावना नवाजुद्दिनच्या थंड चेहऱ्यावर पिचलेल्या आंब्यावर पिवळसर काळपट ओघळ वाहावेत तशी ओघळत राहते. तो सदैव हपापलेला आहे, सदैव दचकून आहे, दक्ष आहे. काही अंशी तो घाबरलेला सुद्धा आहे, पण कुणाला ते मात्र अनुराग शेवटपर्यंत उघड करत नाही कधी सावलीच्या मागोमाग, तर कधी दाराआडून तर कधी थेट समोरून, कधी पाठीआडून तर कधी पाठीवर थाप टाकून तर कधी झोपलेल्या अवस्थेत तो आपलं सावज निर्दयपणे चिरडतो. त्याला लहान मुले,वृद्ध, तरुण, पोक्त स्त्रिया, वृद्धा यात फरक वाटत नाही. मारताना तो कधी कनवाळू होत नाही. पाहणाऱ्याचा जीव कासावीस व्हावा अशा निर्मम पद्धतीने तो मारतो. माणसे मारताना तो पुटपुटतो, बरळतो. कधी सावकाश चालत येऊन तर कधी सुसाट धावत येऊन तो हल्ले करतो. लहान मुलाला मारताना देखील क्रूरथट्टा करतो, "तू लहान आहेस म्हणून तुझं नाव पाकीट आहे... मी तुला मारतो कारण लोक मला पाकीटमार म्हणतात" असं कमालीच्या थंडपणाने सांगतो.

रमणच्या शोधात असलेला राघव हा एक सणकी पोलीस इन्स्पेक्टर आहे. राघव हा खरे तर खाकी वर्दीतला दुसरा 'रमण'च आहे. तो कोकेनचे सेवन करतो पण तो नशेडी नाहीये, त्याला देखील सणक आहे, त्याचेही डोके भणभणते. किशोरावस्थेत शाळेच्या परीक्षेत इंग्लिशमध्ये कमी गुण मिळाल्याने त्याच्या वडिलांनी त्याला हाती लागेल त्या वस्तूने बेदम चोपलेले, तेंव्हा त्याची इच्छा होती की वडिलांचे अख्खे रिव्हॉल्वरच त्यांच्यावर रिकामं करावं. मात्र त्याची तितकी हिंमत होत नाही, आपला राग आपलं फ्रस्ट्रेशन तो शेजारच्या मुलाला गच्चीवरून थंड डोक्याने ढकलून देऊन व्यक्त करतो. तरुण झाल्यावर मोठ्या आवाजात बोलली म्हणून सोबतच्या बाईला एका निमिषार्धात संपवतो. त्याला देखील माणसे मारताना रमणप्रमाणे घाम फुटत नाही., या दोघांत फक्त एक फरक आहे - रमण त्याच्या मेंदूतल्या कृष्णविवरात राहून ह्या हत्या करतो. त्यात त्याचे स्वार्थ नाहीत, कुठलेही आचार विचार त्या पाठीमागे नाहीत कारण तो विकृत आहे. तर राघव त्याच्या फायद्यासाठी माणसे मारतो. तो स्त्रियांशी संबंधही ठेवतो अन काम निपटले की त्यांची गेम वाजवतो.

चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच ह्या दोन्ही व्यक्तिरेखा आलटून पालटून समोर येत राहतात, ही दोन्ही माणसे सुरुवातीला भिन्न वाटतात पण चित्रपटाचा शेवट जसजसा जवळ येऊ लागतो तसतसे यांच्यातले अंतर घटत जाते. आणि सिनेमाच्या शेवटी रमण आणि राघव हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात या निष्कर्षाप्रत आपण येतो. या दोघांत अधिक नृशंस कपटी क्रूर कोण ठरवणं अवघड जावं इतके आपण त्यात गुंतून पडतो. रमण आणि राघव यांच्यात असलेली समानता हायलाईट करण्याच्या नादात या दोघांतला संघर्ष गडद करण्याकडे अनुरागचे दुर्लक्ष झाले आहे. किंबहुना त्याने सिनेमाचा श्वास गुदमरवला आहे. या दोघांना समांतर दाखवत त्यांच्यातली रंजिश अधिक रंगवली असती तर चित्रपट आणखी उठावदार झाला असता. अनुराग ज्या क्वेंटीन टेरेंटीनोच्या प्रतिभेत गुंतून पडला आहे त्याच्या 'रिझर्व्हायर डॉग्ज'मधील व्यक्तिरेखांची आठवण अनुरागचा 'राघव' करून जातो. अनुरागने लवकरात लवकर या लेखक- दिग्दर्शकाच्या पडछायेतून स्वतःला बाहेर काढणे इष्ट ठरेल हे मी मागे 'गॅंग्ज ऑफ वासेपूर'च्या वेळेसही लिहिले होते.....

या चित्रपटातली अनेक दृश्ये चित्रपटगृहाबाहेर पडल्यावरही डोळ्यापुढे तरळत राहतात, डोक्यात भिनत राहतात. अर्धवट बांधकामं झालेल्या जुनाट इमारतींचे सांगाडे, दाट लोकवस्तीच्या बोळवजा गल्ल्या, रस्त्यात साचलेले उकिरडे, जागोजागी पडलेले खड्डे, त्यात साठेलेले काळपट पाणी, उघड्या गटारी, फिरस्ते कुत्रे आणि रस्त्यावर वणवण भटकून थकले भागलेले जीव, रस्त्याच्या मधोमध पडणारा स्ट्रीट लाईटचा झगझगणारा पिवळा उजेड टिपताना अनुरागचा कॅमेरा उजेडाच्या मधोमध न येता कोपऱ्यातल्या धूसर भागात स्थिरावतो. क्रेन वा ट्रॉली वरचे लोडेड सीन्स त्याने टाळले आहेत आणि कॅमेरा धावता ठेवला आहे. सिनेमाची पूर्ण कथा माहिती असूनही, पुढे काय होणार हे माहिती असूनही अनुरागने केवळ एका उत्कंठेवर प्रेक्षक पडद्याच्या समोर रोखून धरलाय, ती बाब म्हणजे 'हे सारं कसं घडतं ?' हे पाहण्याची प्रेक्षकाची हायलाईन त्याने अचूक पकडली आहे. प्रेक्षक कधी डोळे विस्फारून तर कधी मुठी वळून तर हताश होऊन ही दृश्ये पाहतो.

चित्रपटाचा पूर्वार्ध नवाजुद्दिनमुळे खूप वेगवान झालाय तर उत्तरार्धात आपण राघव झालेल्या विकी कौशलकडून नवाजुद्दिनइतकीच अपेक्षा करतो अन तिथं अनुरागचं गणित चुकतं. विकी कौशलची व्यक्तिरेखा डोक्यात रुजायला बारा पंधरा मिनिटाचे चित्रीकरण खर्ची पडलेय. यातून कथा स्लो होत जाते अन परिणामकारकता डायल्युट होते. चित्रपटाच्या शेवटी रमण राघवच्या तावडीत येतो आणि राघवमधला 'रमण' जागृत होतो. चित्रपटाच्या कथानकाची गरजच मुळात चित्रपटाच्या हिंसेत आहे त्यामुळे हिंसा हा चित्रपटाचा डार्क साईड घटक न बनवता त्याला अधोरेखित असे सायकोडिस्टर्ब प्रस्तुतीकरण केले गेले असते तर चित्रपट वेगळ्या उंचीवर गेला असता.

फरशीवर पडलेली रक्ताची थारोळी आणि पाचसहा दिवसांपूर्वी मरून पडलेल्या माणसांचे सडत चाललेले अचेतन देह अनुरागने दाखवले आहेत. यात किंकाळ्या, हाका, आरोळ्या त्याने टाळल्या आहेत. व्हिस्परत जाणारा रमण मध्येच लाउड होतो अन बरळू लागतो हे केवळ नवाजुद्दिनमुळे सुसह्य झालेय. तो कुठेही आक्रस्ताळेपणा करत नाही, त्याची नजर आणि कॅमेरा यांचे विलक्षण ताळमेळ अनुरागने साधले आहेत. रमणच्या बहिणीची अमृता सुभाषची भूमिका लहान आहे मात्र ती ध्यानात राहते. इतर सर्व पात्रे ठाकठीक आहेत. सोभिता आणि अनुष्का यांना विशेष काम नाहीये. जय ओझाची सिनेमेटोग्राफी पडदा व्यापून राहते, आपण डोळ्यात हे साठवावे की नको अशा द्विधा मनस्थितीत राहतो. 'कत्ले आम' हे गाणं सोशल मिडीयावर लोकप्रिय झाले आहे. त्याचं क्रेडीट जयलाच जातं...

रमण कुठल्या क्षणाला काय करेल याची धास्ती शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या काळजात टिकून राहील याची पुरेपूर दक्षता नवाजुद्दिनने घेतली आहे. विकी कौशल तुलनेत फिका वाटतो, त्याची संवादफेक ओव्हररिएक्टेड वाटते, तो नक्कल करतोय असेच वाटत राहते. थंड डोक्याचा पिसाट पोलिस अधिकारी त्याने जोरकस रंगवलाय मात्र पूर्वार्धात नवाजुद्दिन त्याच्यापुढे पहाडा सारखा उभा आहे ती उंची गाठण्यात तो कमी पडतो. त्याच वेळेस अनुरागने राघवची व्यक्तिरेखा रमणला समांतर दाखवण्याच्या अट्टाहास केल्यामुळे दोघांची तुलना अनिवार्य होऊन बसते. हे टाळता आले असते. राम संपत यांच्या पार्श्वसंगीताचा विशेष उल्लेख करावा लागेल, मध्येच जवळपास साडेचार पाच मिनिटे भयाण सायलेन्स त्यांनी ठेवलाय तो अगदीच जीवघेणा आहे ! 'डरना मना है' सारखे तथाकथित थरारपट काढणारया रामगोपाल वर्माने एकदा हा चित्रपट त्याच्या चित्रपटातील कर्कश्श पार्श्वसंगीताच्या तुलनेसाठी पहावा असे सुचवावे वाटते.

अनुराग हा कंगना रानौटच्या 'क्वीन'चा एडिटर होता, त्यात त्याने अफलातून कात्री चालवली होती. इथे आरती बजाज यांच्याकडे एडिटिंग सोपवले आहे, चित्रपटातील विकी कौशलची सिंगल दृश्ये अधिक कापायला पाहिजे होती अन रनिंग कॅमेऱ्याची बेभान दृश्ये अधिक लांबवली असती तर आणखी रंगत आली असती ( मॅड मॅक्स:फ्युरी रोड, फास्ट & फ्युरीअस सिरीज या चित्रपटांचे यश त्यातील पाठलागाच्या दृश्यात आहे, एडिटर हा दिग्दर्शकाइतका महत्वाचा आहे हे या दोन हेवी सुपर डुपर हिट वरून आपल्या लोकांच्या अजूनही ध्यानी आले नाही ..असो)

शेवटी एक उल्लेख करण्याचा मोह आवरत नसल्याने त्यावर दोन शब्द लिहितो- माझ्या मते रमण राघव २.० हा सिनेमा अनुरागसाठी हिंदीतला 'सायलेन्स ऑफ द लेंब्ज' होऊ शकला असता, त्याने राघवच्या व्यक्तिरेखेला उभं करण्याऐवजी त्यास समांतर एखादा विकृत खबऱ्या, मनोविश्लेषक वा एखादा सायको मिडिया रिपोर्टर वा अगदी एंथोनी हापकिंन्सच्या हनिबल लेक्टरसारखा सायकोपाथ मनोविकारतज्ञ जरी रमण समोर उभा केला असता तरी त्यात अधिक रंग भरता आले असते. पण अनुरागने एक चांगली संधी गमावली. असो.. तरीही हा चित्रपट थरारपट आवडणाऱ्या लोकांसाठी नक्कीच बघण्यासारखा आहे. शिवाय तेच तेच बेचव सिनेमे पाहून टेस्ट बिघडली असेल तर खास नवाजुद्दिनच्या अभिनयास दाद देण्यासाठी 'रमण राघव २.० बघायला हरकत नाही.

खरा रमण राघव त्याच्या मानसिक संतुलनाचा आधार घेऊन फासावर जाण्यापासून वाचला. त्याला उम्रकैद झाली नंतर किडनीच्या विकारात त्याचा मृत्यू झाला अन एक विकृत अध्याय संपला. त्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून अनुरागने सादर केले आहे. विकृत व्यक्तिरेखांचा चित्रपट सामान्य माणसाने का पाहावा याचे उत्तर देताना मी म्हणेन की यासुद्धा मानवी मनातील एक भावना आहेत अन या भावभावनांचे कंगोरे अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाद्वारे सजीव करून पडद्यावर सशक्त केले असतील तर त्याला दाद देण्यासाठी आपण हा सिनेमा बघायला हरकत नसावी. नाही तरी प्रत्येकाच्या मनात खोल कुठं तरी एक रमण वेगळ्या रुपात दडून बसलेला असतोच ! बस्स कुणाचे प्रकटीकरण होते तर कुणाच्या भावना अमूर्त राहतात.....

अनुराग, विकी कौशल, आरती बजाज या तिघांचे प्रत्येकी पाव गुण आणि अपेक्षित उत्तुंगता न गाठल्याबद्दल संपूर्ण सिनेमाचा पाव असा सर्व मिळून एक गुण कमी देतो. माझ्याकडून या सिनेमाला ५ पैकी ४ गुण ...एक थरारपट पाहण्यासाठी थियेटरवर जावूनच हा सिनेमा पाहावा हा सल्ला वेगळा देण्याची गरज नसावी..

- समीर गायकवाड.

मला भेटा, या ब्लॉगपत्त्यावर -
http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_3.html

RAGHAV.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ माधव, यात कुठलाही रहस्यभेद केलेला नाही, शेवट काय होतो हे लिहिलेलं नाही...शिवाय पूर्ण कथादेखील लिहिलेली नाही ... तरीही आपला प्रतिसाद असा यावा याचे आश्चर्य वाटले...असो ...

समीर,
नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन. मला तर अशा नावाचा सिनेमा येतोय्/आलाय हे ही नव्हतं माहिती. पण तुमच्या लेखनशैली मुळे मी हिंसक सिनेमे पहात नसूनही, उगिचच पहावासा वाटू लागलाय. Happy

रहस्यभेद करू नका हो. अजून लोकांना चित्रपट पहायचा असेल.>> सगळं कॅरेक्टर काय करतो नाही करत सांगितलं ना तुम्ही.. उगा वाचला हा धागा... Sad

कडक
काल रात्री ३ पर्यंत जागून मी बदलापूर पाहिलाय.. ककाघु वर उतारा म्हणून.. त्यानंतर हा बघायची उत्सुकता वाढलीय .. आपल्या आणि रसपच्या परीक्षणातील साम्यानंतर तर जास्तच पक्केपणे .. पण सोबत कोण येणार नाही . . एकटा जावे की नको या विचारात ..

साधनाजी मला त्याची भिती नाही. स्वताची आहे. आणि शेजारच्याची चिंता. मी इन्वॉल्व होतो खूप चित्रपटात. शाहरूखचा चित्रपट बघताना मी स्वता त्या खुर्चीत तीन तासाचा शाहरूख बनलो असतो. मग रमन राघव बघताना.. कोणीतरी माझ्या ओळखीचे हवे सोबत मला आवरायला..

च्या!@&#(*!&$)(*!&$)(*!$)(!
प्रत्येक धाग्यावर शाखाच्या नावाने संडास करणे गरजेचे आहे काय?
बहुतेक महिन्याभराने माबोवर आलो आणि पहिल्याच धागा मस्त एंजॉय करुन शाखाचे नाव वाचावं लागलं, बरं ते ही गरज नसताना लिहिलय ...
मस्त फुलांच्या बागेत जावे, फुलांचा आनंद घेत असतनाच पाय कुत्राच्या संडासवर पडावा ना अगदी तस्सच वाटलं..
असो..

>> रहस्यभेद करू नका हो. अजून लोकांना चित्रपट पहायचा असेल.>> सगळं कॅरेक्टर काय करतो नाही करत सांगितलं ना तुम्ही.. उगा वाचला हा धागा... अरेरे>> +1

अनुराग हा कंगना रानौटच्या 'क्वीन'चा एडिटर होता, त्यात त्याने अफलातून कात्री चालवली होती. इथे आरती बजाज यांच्याकडे एडिटिंग सोपवले आहे, चित्रपटातील विकी कौशलची सिंगल दृश्ये अधिक कापायला पाहिजे होती अन रनिंग कॅमेऱ्याची बेभान दृश्ये अधिक लांबवली असती तर आणखी रंगत आली असती ( मॅड मॅक्स:फ्युरी रोड, फास्ट & फ्युरीअस सिरीज या चित्रपटांचे यश त्यातील पाठलागाच्या दृश्यात आहे, एडिटर हा दिग्दर्शकाइतका महत्वाचा आहे हे या दोन हेवी सुपर डुपर हिट वरून आपल्या लोकांच्या अजूनही ध्यानी आले नाही ..असो)>>>>>>>>

तुम्हाला असे वाटते का की एडीटर ला पूर्ण मोकळे रान असते? दिग्दर्शक च सर्वेसर्वा असतो. अनुराग ला आरती बजाज चे एडीटींग पूर्ण पटले असणार, नाहीतर त्यानी बदल करायला लावला असता.

>>मी इन्वॉल्व होतो खूप चित्रपटात<<

तसं असेल तर क्रोबार घेउन पिक्यर बघायला जाऊ नकोस...

रमण स्त्रियांना केवळ मादी समजतो. त्याच्या डोक्यात स्त्रियांची याहून वेगळी अशी प्रतिमा नाहीये. तो स्त्रियांना ज्या नजरेने न्याहाळतो त्यातील अधाशीपणा व हिंस्त्र, वासनांध, पिसाट भावना नवाजुद्दिनच्या थंड चेहऱ्यावर पिचलेल्या आंब्यावर पिवळसर काळपट ओघळ वाहावेत >>>>>>>

<<<तर राघव त्याच्या फायद्यासाठी माणसे मारतो. तो स्त्रियांशी संबंधही ठेवतो अन काम निपटले की त्यांची गेम वाजवतो.>>>>>

हे दोन निरिक्षणे माझ्यामते चुकली आहे.

बाकी लेख उत्कृष्ट आहे